विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण! मराठी माणसाचे आध्यात्मिक वैभव ठरणारी, सामान्य माणसांत श्रद्धा जागवणारी, त्यांच्यात विश्वास निर्माण करणारी आणि भक्तीमार्गातून जगण्याचा आधार ठरणारी पंढरीची वारी वर्षानुवर्षे सुरूच आहे. कोणीही निमंत्रण न देता, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या मार्गाने, ठराविक ठिकाणी पोहोचणारे वारकरी हे जागतिक व्यवस्थापन तज्ज्ञांसाठी मोठे आश्चर्य आहे. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत आपापल्या दिंड्या घेऊन या आनंदसोहळ्यात, भक्तीसोहळ्यात सहभागी होणारे वारकरी मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.
ज्ञान आणि भक्ती मार्गाने, एका समान ध्येयाने एकत्र येणारे वारकरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहाचे पाईक आहेत. विठू माऊलीच्या दर्शनाची आस असलेले असंख्य वारकरी एकत्र येतात आणि आपल्या संतांनी घालून दिलेल्या आदर्श परंपरांचे जतन करतात. वैष्णवांचा हा महामेळावा भक्तीमार्गात तल्लीन झालेला असतो. या काळात त्यांना कोणत्याही विवंचनेचे भान नसते. असंख्य अडचणींना पुरून उरत ते भगवंतप्रेमाची अनुभूती घेतात. आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर मात करण्याची ऊर्जा वारकरी बांधवांत वारीमुळे निर्माण होते.
गावागावातील भाविक वारीला जायचे म्हणून जोरदार तयारी करतात. मे महिन्यातच त्यांची शेतीची मशागत पूर्ण झालेली असते. आषाढी वारीचे वेध लागताच पुढच्या कामांचे त्यांचे नियोजन युद्धपातळीवर सुरू होते. वारीच्या आधी पाऊस अपेक्षित असल्याने त्यादृष्टिने बळीराजाची तयारी सुरू होते. जिथे पाऊस झाला तिथे पेरणी पूर्ण होते. जिथे पावसाने दगा दिला तिथे कुटुंबातील इतर सदस्यांवर, मित्रांवर पेरणीची जबाबदारी सोपवली जाते. कशाचीही पर्वा न करता निश्चिंतपणे आणि भक्तीरसात ओतप्रोत न्हालेला वारकरी टाळ, मृदुंग घेऊन दिंडीत सहभागी होतो. सर्वकाही ‘त्याच्या’वर सोपवून तो बिनघोर राहतो.
मानवता धर्माची शिकवण देणार्या संतांनी वारीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या, छोट्या छोट्या गावातील सामान्य माणसांचे संघटन केले. त्यांच्यात जवळीकता साधावी, स्नेहभावना निर्माण व्हावी, धर्म आणि आध्यात्माच्या माध्यमातून श्रद्धा बळकट व्हाव्यात यासाठीचे स्फुल्लींग चेतवले. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या घराण्यात त्यांच्या आठ पिढ्या आधीपासून म्हणजे विश्वंभरबाबांपासून वारीची परंपरा होती, असे सांगितले जाते. तुकोबारांयाचे वडील बोल्होबा यांनी चाळीस वर्षे पंढरीची वारी केल्याचे संत महिपतीबाबा महाराज ताहाराबादकर सांगतात. ‘चाळीस वर्षे ते भवसरी, केली पंढरीची वारी’ अशी नोंद त्यांनी केली आहे. मुघलांची नोकरी झुगारून देत 252 संतांची काव्यात्मक चरित्रे लिहिणार्या महिपतींनी वारीचे महत्त्व चांगल्या प्रकारे उलगडून दाखवले आहे. तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जाईपर्यंत कधी वारी चुकवली नाही. नित्यनेमाने वारीला जाणे आणि कीर्तनसेवा पार पाडणे हे त्यांचे व्रत होते. महाराष्ट्रातील तमाम मराठी भाविकांनी हा वारसा जपला आहे. वर्षानुवर्षे वारीला जाणारे भाविक म्हणूनच अनेकांना प्रेरणा देतात. चालताही न येणारे जख्खड लोक किंवा गंभीर आजाराशी सामना करणारे वारकरी सुद्धा कशाचीही पर्वा न करता भक्तीची पताका आपल्या खांद्यावर डौलाने आणि अभिमानाने फडकावतात.
महाराष्ट्राच्या आणि इतर राज्याच्या गावागावातून येणार्या पालख्या आळंदीत एकत्र येतात आणि भक्तीचा पूर वाहू लागतो. साधारण वीस दिवस घर सोडून, शेतीच्या कामाचे नियोजन करून, आवश्यक ती सामुग्री सोबत घेऊन वारकरी या लोकप्रवाहात सहभागी होतात. संसार आणि व्यवहार यातील कोणतेही प्रश्न उपस्थित न करता केवळ विठ्ठलाच्या भक्तीची, त्याच्या दर्शनाची भूक भागवण्यासाठी इतकी खटाटोप करणारे, आपल्या भक्तीरसाचे जाज्ज्वल्य दर्शन घडवणारे वारकरी आणि त्यांची दिंडी, त्यांची वारी हे जगातील एक विरळ उदाहरण आहे. हे चैतन्य, हा उत्साह, ही भक्ती, हा त्याग आणि समर्पणाची भावना हेच तर आपले सांस्कृतिक संचित आहे.
पालखी मार्गावर गावागावात वारकर्यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. अन्नदान, कपडे वाटप, फळवाटप, पाणी इथपासून ते त्यांचे हातपाय दाबून देण्यापर्यंत, डोक्याचे केस कापण्यापर्यंतची सेवा केली जाते. माणसामाणसातील अतूट स्नेहाचे, सेवेचे हे मूर्तीमंत उदाहरणच. गणेश मंडळांचे कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, सामान्य नागरिक आपापल्या परीने यात खारीचा वाटा उचलतात.
दिंडी मार्गातील लाखोंच्या समुदायामुळे वाहतुकीस येणारे अडथळे, त्यांनी केलेली अस्वच्छता यामुळे काही अपवादात्मक लोक त्यांना दूषणे लावतात. मात्र लाखो लोकांच्या मनात श्रद्धेचे बीज पेरणारी, त्यांना निखळ आनंद देणारी, त्यांचे आयुष्य समृद्ध करणारी, त्यांच्यात संस्कार, भक्तीचे, त्यागाचे, सेवेचे बीज पेरणारी वारी एकमेवाद्वितीय आहे. संत गाडगेबाबा वारीच्या काळात पंढरपुरास जाऊन, हाती खराटा घेऊन स्वच्छता करायचे, चंद्रभागेतील प्रदूषण थांबवायचे हा इतिहास आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञान आता गावागावात पोहोचलेय. वारकर्यांच्या हातात आता मोबाईल, लॅपटॉप आलाय. जगातील ज्ञानाची कवाडे त्याच्यासाठी सताड उघडी आहेत. या विज्ञानयुगातही तो वारीसारख्या भक्तीसोहळ्यात मात्र आनंदाने सहभागी होतोय हे फार महत्त्वाचे आणि दुर्मिळ उदाहरण आहे. या वारकर्यांनी आता सामाजिक भान ठेऊन, पर्यावरणाचा विचार करून वागायला हवे. स्वच्छतेच्या दृष्टिने शक्य तितकी काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे पर्यावरणाचा र्हास होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसे झाले तर अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचा लौकीक आणखी वाढेल.
नामदेव, तुकाराम, एकनाथांसह सर्व संतांचे अभंग आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीची एकनएक ओवी शाश्वत आहे. त्यातून कसे जगावे आणि कशासाठी जगावे याचे आत्मभान लाभते. विठ्ठल हा गरिबाचा देव आहे. तिरूपती, शिर्डी असे देवस्थानांचे जे आर्थिक प्रवाह आहेत त्यात अजूनतरी पंढरपूरचा समावेश नाही. इथे कसला प्रांतवाद नाही, जातीवाद नाही.. इथे फक्त भक्तीचा मळा फुलतो. याचे पावित्र्य जपणे, ते वृद्धिंगत करणे हे आपल्याच हातात आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२
‘चपराक प्रकाशन’तर्फे युवा पत्रकार रमेश पडवळ लिखित ‘तपोभूमी नाशिक’ या पुस्तकाचे लोकार्पण गुरूवार, दि. 9 जुलै 2015 रोजी नाशिक येथे समारंभपूर्वक होत आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्याचा सर्वांगिण आढावा या पुस्तकात घेतला आहे. अतिशय अभ्यासपूर्वक, साध्यासोप्या भाषेत पडवळ यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. ‘चपराक’चे हे 66 वे पुस्तक आहे. त्यासाठी मी लिहिलेली प्रस्तावना.
- घनश्याम पाटील, संपादक ‘चपराक’
मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक हे शहर म्हणजे हिंदू धर्माचा बालेकिल्ला. या शहराला मोठी परंपरा आहे. अनेक ऋषिमुनी, साधुसंत, महंत, राजेमहाराजे यांनी या भूमित विजयाच्या गुढ्या उभारल्या आणि ही तपोभूमी ठरली. शौर्य आणि विद्वत्तेचा, आध्यात्माचा, कलाकौशल्याचा, राजकारणाचा मानदंड ठरणार्या या शहराचा आरसा नाशिक येथील युवा पत्रकार रमेश पडवळ यांनी वाचकांसमोर धरला आहे. या आरशात दिसणारा लख्ख चेहरा नाशिकच्या पुढच्या वाटचालीसाठी मोलाचा ठरणारा आहे. इतिहासाची माहिती देताना, वर्तमान अचूकपणे टिपताना पडवळ यांनी नाशिकची भविष्यातली वाटचाल कशी असावी, हेही डोळसपणे सुचवले आहे. एका शहराचे मूल्यमापन करताना इथल्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा, प्रथापरंपरांचा, विविध क्षेत्रातील घटनांचा तटस्थपणे मागोवा घेताना पडवळ यांची लेखणी गौरवास पात्र ठरली आहे. एका धडपड्या पत्रकाराने या शहराची दिशा आणि दशा लेखणीद्वारे मांडण्यात मोठा वाटा उचलला आहे, याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन करतो.
पंधरा प्रकरणामधून पडवळ यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्याचा उलगडा केला आहे. श्रद्धेचा सोहळा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची ‘साधुग्राम’ अशी वेगळी ओळख आहे. हे इतके साधू या मेळ्यात करतात तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडत असेल! तर यात साधुंचे विचारमंथन होते, प्रत्येक आखाड्यात तत्त्वज्ञान, संख्याशास्त्रज्ञ, अध्यात्म आणि धर्म या शाखांचे अभ्यासक असतात, हे पडवळांनी मांडले आहे. संस्कृती, संस्कार, भक्ती, प्रार्थना, जगण्याच्या पद्धती, सेवाव्रत यावर सखोल चर्चा होत असल्याचे सत्य त्यांनी सांगितले आहे. अनेक साधू मात्र याठिकाणी ‘नको ते’ उद्योग करतात, गोदावरीचे पावित्र्य धोक्यात आणतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. पर्यावरणाबाबत दक्ष असलेल्या लेखकाने हे पुस्तक ‘गोदामाईच्या स्वच्छतेसाठी श्रमणार्या हातांना’ अर्पण करून त्याबाबतचे गांभीर्य दाखवून दिले आहे. त्यामुळे इथे येणार्या साधुंनीही याबाबत भान बाळगून गोदावरीच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. योग्य यंत्रणेकडून त्याबाबत त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे.
सिंहस्थातील विविध आखाडे, त्यांच्या निर्मितीचा इतिहास, त्यांचे कार्य, परंपरा, विधी याचा प्रगल्भ अभ्यास या ग्रंथात दिसून येतो. आध्यात्मिक वारसा जपण्याबरोबरच ‘धार्मिक अर्थशास्त्र प्रवाहीत करणारे शहर’ अशी नाशिकची नवी ओळख झाल्याचा निष्कर्ष पडवळ काढतात. मात्र तरीही हा सोहळा केवळ ‘संधीसाधुंचा’ आहे हे त्यांना मान्य नाही. नाशिक ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक प्रमुख पावनभूमी असल्याचे भान त्यांना आहे. म्हणूनच या शहराविषयी वाटणारी सार्थकता आणि अभिमानाची ओतप्रोत भावना त्यांच्या शब्दाशब्दातून दिसून येते. नाशिकच्या कला, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध आणि वैभवशाली आलेख मांडण्यात रमेश पडवळ यशस्वी ठरले आहेत. नाशिकमध्ये ज्ञानोपासनेचे केंद्र होण्याची क्षमता असल्याचे मार्केंडेय ऋषिंनी म्हटले होते. ही क्षमता सिद्धीस येऊ लागल्याचे पडवळ सप्रमाण दाखवून देतात.
शरीरापासून आत्मा आणि गाडीपासून इंजिन जसे वेगळे करता येत नाही, तसेच नाशिकपासून मंदिरे वेगळी करता येत नाहीत. ‘मंदिरांचे शहर’ अशी नाशिकची ओळख सर्वश्रुत आहे. प्राचीन काळापासूनचे मंदिरांचे दाखले देताना पडवळ त्याचे बारकावे समजावून सांगतात, त्यांची सविस्तर माहिती देतात. औरंगजेबासारख्या जुलमी क्रुरकर्त्याने त्याकाळी नाशिकमधील पंचवीस मंदिरे पाडली होती. मात्र तरीही आज विविध मंदिरे हीच नाशिकची आभूषणे आहेत. रामाबरोबरच इथे रावणाचे आणि भारतातील एकमेव असणारे छत्रपती शिवरायांचेही मंदिर आहे. नाशिकमधील ही मंदिरे, त्यांच्या आवारातील कुंडे यांचे जिवंत चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर पडवळांनी उभे केले आहे. सध्याच्या विज्ञानयुगात मंदिरांचे काय काम? असा प्रश्न काहीजण उपस्थित करतात. मात्र आजही देव, धर्म यामुळे लोकांचे संघटन होते, त्यांच्यात जवळीकता आणि स्नेहभाव साधला जातो, त्यांच्या अढळ श्रद्धा विविध संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बळ देतात, यानिमित्ताने पर्यटन होते आणि आपला समृद्ध वारसा जपला, जोपासला जातो हे ध्यानात घ्यायला हवे.
हे पुस्तक म्हणजे नाशिकचा फक्त आध्यात्मिक वारसा सांगणारे नाही. या शहराच्या प्रत्येक शाखांचे, प्रत्येक मूळांचे दर्शन पडवळ यांनी समर्थपणे घडवले आहे. नाशिकच्या जडणघडणीतील पेशव्यांचे योगदान, 1783 नंतरचे होळकरांचे प्रस्थ, त्यांनी चांदवड येथे नाणी पाडणारी सुरू केलेली टाकसाळ हे सर्व वाचताना जसे प्रत्येक नाशिककराला अभिमान वाटेल तसाच तो महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी बांधवासही वाटेल. ‘शिवशाहीपासून पेशवाईपर्यंतचा काळ म्हणजे नाशिकच्या जीवनातील चैतन्याने नटलेले सोनेरी पान. पेशवाईच्या अस्ताबरोबरच नाशिकचा स्वातंत्र्यसूर्यही अस्तास गेला’ हे पडवळ यांचे निरीक्षण आजच्या राज्यकर्त्यांनी विचारात घ्यायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘गंगा विकासा’ची मोहिम राबवत असताना नाशिककरांना मात्र या शहराच्या सामर्थ्याचा विसर पडला आहे की काय, असे आपसूक वाटते. सर्वच राजकीय पक्ष गोदाविकासाचा नारा देत असताना, इतका समृद्ध आणि सशक्त वारसा असताना सामान्य नाशिककरांना मात्र विकासाच्या वांझोट्या स्वप्नरंजनात रमावे लागते.
असे असले तरी नाशिक ही शूरांची भूमी आहे. सशस्त्र क्रांतीची मशाल या शहरात कायम धगधगत राहिली. प्रभू श्रीरामापासून ते स्वातंत्र्यवीर श्री श्री श्री विनायक दामोदर सावरकर यांच्यापर्यंत जुलमी साम्राज्य उलथवून लावण्याचे महत्कार्य या नगरीने केले असल्याची जाणीव लेखकाला आहे. त्यामुळे तो या व्यवस्थेवर भाष्य करत नाही. जे आहे ते मात्र ठामपणे आणि प्रामाणिकपणे दाखवून देतो. आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचे, समाजमनाला दृष्टी देण्याचे, त्यांच्या डोळ्यांसमोरील जळमटं पुसण्याचे कार्य मात्र रमेश पडवळ या हरहुन्नरी पत्रकाराने केले आहे.
नाशिकमध्ये ज्या घटना घडल्या त्याचे पडसाद सर्वदूर उमटले. राज्याला आणि देशाला विशिष्ट दिशा देण्याचे महत्कार्य या भूूमीने केले. त्याचे अनेक दाखले या पुस्तकात आढळून येतात. गंगापूर रस्त्यावरील मल्हार खाणीत पोहताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीव गेला असता, मात्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी त्यांना प्रयत्नांची शिकस्त करून वाचवले. दादासाहेबांनी महाडपासून ते काळाराम मंदिर प्रवेशापर्यंतच्या प्रत्येक सत्याग्रहात ठिणगीचे काम केले. अस्पृश्यता निर्मूलन लढ्यातील त्यांच्या कार्याची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना प्रोत्साहित केले. ही घटना आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. असायला हवी. ‘भावड्या किसन महार’ ही ओळख पुसून ‘भाऊराव कृष्णराव गायकवाड’ असे गौरवांकित झालेले दादासाहेब हे महाडचे पहिले सत्याग्रही आहेत.
या पुस्तकात नाशिकमधील स्थळांची, व्यक्तिंची माहिती मिळते तशीच प्रमुख घटनांचीही उजळणी होते. दुसर्या परिषदेत ‘चवदार तळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सत्याग्रह तहकूब करावा’ असा ठराव डॉ. आंबेडकरांनी मांडला. मात्र दादासाहेबांचा निर्धार ठाम होता. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असे ठरवले आणि सत्याग्रह सुरू ठेवला. त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी मतदान घेण्याचा आग्रह धरला. तो मान्य करत मतदान घेण्यात आले. त्यात दादासाहेबांनी बाजी मारल्याने आंबेडकरांपुढे पर्याय राहिला नाही.
1931 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुंना बजावले, ‘‘अस्पृश्य हे तुमचे बंधू आहेत. आपण सारे एकाच धर्मात जन्म घेतलेले लोक आहोत. तेव्हा त्यांना आता मंदिरात घेतल्याशिवाय तुम्हाला तरणोपाय नाही.’’ हिंदू महासभेच्या डॉ. कृष्णराव मुंजे यांनीही पत्र लिहून दादासाहेबांना पाठिंबा दर्शविला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मंदिर प्रवेशासाठी उपोषणाची तयारी केली होती. यावेळी उसळलेल्या दंगलीत एका वृद्धाला वाचवताना तेव्हा विद्यार्थी दशेत असलेले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जखमी झाले होते.
13 ऑक्टोबर 1935 रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या सल्ल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला परिषद बोलवली. यावेळी ते म्हणाले होते, ‘‘अस्पृश्य जातीत जन्मलो हा माझा अपराध नाही पण मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.’’ त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी नागपूरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे बीज नाशिकमध्ये, येवल्यात रोवले गेले होते. म्हणूनच नाशिकने बौद्ध धर्माला नव्याने जन्म दिल्याचे वास्तव लेखक रमेश पडवळ अधोरेखित करतात. ते स्वीकारणे सांस्कृतिक परिभाषेत अपरिहार्य ठरते.
यातील एक काळीकुट्ट बाजू म्हणजे नाशिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खूनाचाही कट करण्यात आला होता. बाबाराव सावरकर यांनी डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांना सांगितले होते की, ‘‘बाबासाहेबांचा आचारी माझ्या ओळखीचा आहे. त्याच्यासाठी पाचशे रूपये दिले तर तो त्यांच्या जेवणात विष कालवून त्यांना ठार मारेन.’’ मात्र डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांनी बाबारावांना तिथल्या तिथे झापडत विचारले की, ‘‘तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझ्या मनात आदरभावना आहे. त्यांचे कार्य मोठेच आहे. त्यांना मारणे हा मोठा अविचार आणि कधीही भरून न येणारे नुकसान ठरेल.’’ शंकराचार्यांनी बाबारावांचा हा कट सहजी उधळून लावल्याने मोठा अनर्थ टळला.
या सर्व घटनांची सुयोग्य मांडणी करून पडवळ म्हणतात, ‘‘पुढे अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करावाच लागला नाही कारण हा काळाराम आणि त्याचा हिंदू धर्मच दलितांनी नाकारला...’’
या ग्रंथात नाशिक शहरातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा, प्रसंगांचा उहापोह करण्यात आला आहे. या शहराची महत्ती समजून घेण्यासाठी त्या मुळातून वाचणे गरजेचे आहे. 1952 साली कॉंग्रेसचे 56 वे अधिवेशन नाशिकच्या गांधी मैदानात झाले. त्यावेळी संत गाडगेबाबांनी स्वतःच्या हातात खराटा घेऊन संपूर्ण मैदान झाडून काढले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने आता यापुढे जनतेवर अन्याय होणार नाही, त्यांना मुक्तपणे, निर्भयपणे जगता येईल असा उदात्त दृष्टिकोन गाडगेबाबांचा होता. त्याचचेळी नाशिकात झालेल्या एका कीर्तनात त्यांनी सांगितले होते की, ‘‘माणसानं माणसाला कमी लेखावं यासारखा दुसरा अधर्म नाही...’’
इ. स. पूर्व पहिल्या शतकात पहिले स्वातंत्र्यसमर लढणारा गौतमीपुत्र सातकर्णी ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंतच्या अनेक जाज्वल्य घडामोडींचा योग्य परामर्ष रमेश पडवळ यांनी घेतला आहे. त्यामुळेच हे पुस्तक केवळ धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ठरत नाही तर आपल्याला आपल्या वैभवाची साक्ष पटवून देते. कृतज्ञता हाही नाशिककरांचा मोठा गुण आहे. आजारपणात काही काळ वास्तव्य केलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रभावीपणे कार्यरत आहे.
नाशिक शहराबरोबरच नाशिक जिल्ह्याचीही उचित दखल पडवळ यांनी घेतली आहे. येथील आदिवासी परंपरांपासून प्रत्येकाचा ‘आंखों देखा हाल’ त्यांनी अभ्यासपूर्वक मांडला आहे. नाशिक व जिल्ह्यातील लेण्या, नाशिकमधील स्वातंत्र्यसंग्राम, लोकपरंपरा, प्रतिभावंत, संस्कृतीचे पदर, पर्यटन या सर्व दृष्टीने हे पुस्तक परिपूर्ण ठरले आहे. ह्युएनस्तंगची नाशिक भेटही रमेश पडवळांनी जिवंत करून ठेवली आहे. पत्रकारितेच्या निमित्ताने नाशिकात गेलेले पडवळ कधीचेच नाशिककर बनले आहेत. फिरस्ती वृत्ती आणि चिकित्सक स्वभाव, हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची हातोटी, माणसे जोडण्याचे असलेले कसब यामुळे त्यांनी नाशिकचा धांडोळा चांगल्याप्रकारे घेतला आहे. यापुढे नाशिकविषयी कुणालाही आणि कसलीही माहिती हवी असेल तर या पुस्तकाशिवाय ते केवळ अशक्य होणार आहे. सामान्य वाचकांबरोबरच राजकीय नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक मोलाचे ठरणारे आहे. विद्यापीठाने हे पुस्तक संदर्भासाठी म्हणून वापरावे, अभ्यासक्रमाला लावावे आणि अनेकांनी त्यावर पीएचडी करावी इतक्या क्षमतेचे नक्कीच झालेले आहे. लेखक म्हणून पडवळ यांचे आणि हे पुस्तक लिहावे यासाठी त्यांना प्रवृत्त करणारे सार्वजनिक वाचनालय नाशिकचे आप्पा पोळ या दोघांचेही अभिनंदन! ग्रंथालय चळवळीतील व्यक्तिंनी तरूणांना अभ्यासाची, लेखनाची दिशा दिल्यास काय घडू शकते ह्याचे हे प्रतिक आहे.
नाशिकविषयीची इतकी दुर्मिळ माहिती वाचताना वाचक भारावून जातील. या देवभूमीची, तपोभूमीची ओढ प्रत्येकाला लागेल. काहीजण आपापल्या शहराचा, गावाचा अभ्यास सुरू करतील. हेच या पुस्तकाचे आणि रमेश पडवळ यांच्या कष्टाचे सार्थक ठरणार आहे. आपल्या पहिल्याच पुस्तकातून मोठे शिवधनुष्य पेलणार्या पडवळ यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस ‘चपराक’ परिवाराच्या शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची हवा अजून टिकून असताना 89 व्या संमेलनाचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी साहित्य परिषदेची धाराशिव शाखा, सातारा मसाप, पिंपरी-चिंचवड येथील कलारंग संस्था आणि कामगार साहित्य संघ अशा अकरा ठिकाणहून निमंत्रणे आली आहेत. त्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेची भर पडली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अमृतमहोत्सवी वर्षाची भेट म्हणून हे संमेलन बारामतीत व्हावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. पवारांचेच स्नेही असलेल्या ना. धों. महानोर यांनी ‘निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सहन करत असताना साहित्य संमेलन घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करू नका’ असा चकटफू सल्ला दिलेला आहे. त्यानंतर आता बारामतीचे नाव पुढे आल्याने त्यांची बोलती बंद झाली आहे.
संमेलन हा मराठी भाषेतील मोठा साहित्योत्सव आहे. हजारो कोटींचे घोटाळे उघड होत असताना त्याविषयी चकार शब्दही न काढणार्यांना संमेलनाच्या खर्चाची चिंता असते. अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडत नसल्याने कुणालाही असा पोटशूळ होऊ शकतो. त्यात दुष्काळासारखे वास्तववादी कारण सांगितले की लोकही पेटून उठतात. वर्षानुवर्षे जो स्वतःचे वीजबील भरत नाही आणि त्यासाठी ज्याच्यावर कारवाई करावी लागते त्याने दुष्काळाची चिंता करूच नये! एनकेनप्रकारे चर्चेत राहण्याचा हा अट्टाहास असतो.
त्यातही बारामतीत संमेलन घ्यायचे ठरले तर महानोरांना संमेलनाध्यक्षपदाची भेट दिली जाऊ शकते. त्यामुळे संमेलनास आज विरोध करणारे महानोर बारामतीतून घसा ताणून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाविषयी उपदेशाचे डोस पाजू शकतात. साहित्य संमेलनातील कार्यक्रम कशा पद्धतीचे असावेत हे ठरविण्यासाठी महामंडळाने मार्गदर्शन समिती स्थापन केली आहे. या समितीबरोबरच स्थळ निवड समितीची आणि महामंडळाच्या पदाधिकार्यांची बैठक येत्या 2 जुलै रोजी होत आहे. त्यामुळे ‘संमेलन घेऊ नका’ हा महानोरांचा सल्ला मोडीत निघाल्यात जमा आहे. असो.
शरद पवार यांनी साहित्य आणि संस्कृतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन आदींना सढळ हाताने मदत करण्याचा त्यांचा गुण सर्वश्रूत आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले असले तरी त्यातील एकही सिद्ध झालेला नाही. प्रत्येक गोष्टीचे खापर त्यांच्यावर फोडले जात असल्याने त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. देशाच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे पवार साहेब आरोप सहन करण्यास पुरते निर्ढावलेले आहेत. ‘लोक जोपर्यंत किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय, असे म्हणणार नाहीत तोपर्यंत मला त्याचे काहीच वाटणार नाही’ असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याने त्यांच्यावर आता आणखी काही आरोप करण्यात अर्थ नाही.
अजित पवार आणि सुनील तटकर्यांचा जलसंपदा खात्यातील गैरव्यवहार उघड होत असताना आणि छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सदनातील घोटाळा, त्यांची अडीच हजार कोटींची संपत्ती समोर येत असताना ‘आता आमच्या अटकेचीच वाट पाहतोय’ असे हतबल उद्गार काढणारे साहेब ‘कधीतरी’ सामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखतात. येत्या डिसेंबरमध्ये ते पंचाहत्तरीत प्रवेश करत आहेत. महाराष्ट्राचा आणि देशाचाही पन्नास वर्षाचा हा चालताबोलता इतिहास आहे. साहित्यात वैचारिक भ्रष्टता आलेली असताना साहित्यिक अकारण राजकारण करतात आणि राजकारणी साहित्यात रमतात हे चित्र सध्या सर्रास दिसत आहे. त्यामुळे पवारांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जर बारामतीत संमेलन होणार असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे.
कर दी यहॉं बरबादी, बिछाके अपना जाल
बारामती के संत तुने कर दिया कमाल
अशा काही कविता काही कवींनी तयारच ठेवल्या आहेत. बारामतीत संमेलन म्हटल्यावर साहित्य क्षेत्राबरोबरच प्रसारमाध्यमे, सर्वपक्षीय सामान्य कार्यकर्ते, नेते यांच्या कल्पनाशक्तीला, प्रतिभेला उधाण येईल. साहेबांचे ‘एकेकाळचे’ कार्यकर्ते असलेल्या रामदास आठवलेंना कवी संमेलनाचे अध्यक्षपद मिळू शकते. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा दोन शक्तिंचे मनोमिलन झाले तर ते त्या दोघांसाठीही पोषकच ठरणारे आहे.
घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर साहित्यात थोडा प्राण फुंकला गेला आहे. मराठी भाषेचा विजयध्वज कुठेही आणि केव्हाही डौलात फडकू शकतो याची खात्री मराठी बांधवाला झाली आहे. हा विश्वास टिकवून ठेवायचा असेल तर बारामती येथे संकल्पीत असलेल्या साहित्य संमेलनास ‘खमक्या’ अध्यक्ष लाभायला हवा. त्यासाठी तूर्तास तरी आमच्या डोळ्यासमोर एकच नाव आहे, ते म्हणजे अजित पवार यांचे! अजित पवार यांच्यासारखा नेताच मराठी साहित्याला आता दिशा देऊ शकतो.
एकतर साहित्य आणि राजकारण यात आता तसा फारसा फरक शिल्लक राहिलेला नाही. जेमतेम हजार लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतात. त्यातही साहित्यिक शोधून काढावे लागतात. प्रत्येकाला ‘करंगुळी’ दाखवत त्यांच्याकडून पुरेशा मतपत्रिका मिळवणे हे दादांच्या कार्यकर्त्यांना सहज शक्य आहे. तसे झाले तर अजित पवारांना सध्याच्या राजकीय उपेक्षेच्या गर्तेतून बाहेर पडता येईल. त्यांना नवी आणि प्रतिष्ठेची ओळखही प्राप्त होईल. जितेंद्र आव्हाडासारखा नेता मतपत्रिका गोळा करण्यासाठी पाठवला तर त्यासाठीचा मार्ग आणखी सुकर होईल.
जगद्गुरू संत तुकोबारायांच्या भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचे मोलाचे कार्य नामदार अजित पवारांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात तुकाराम महाराज आणि काही प्रमाणात रामदास स्वामी कळण्यास कारणीभूत ठरलेले दादा हेच यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात. याच महिन्यात (म्हणजे 22 जुलै) दादांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन दादांच्या अध्यक्षपदाची तयारी सुरू करायला हवी. घुमानच्या संमेलनातील पंचपक्वान्नाचे कोडकौतुक करणार्यांना दादा सणसणीत चपराक देऊ शकतात. बियरपासून ते रेड वाईनपर्यंत आणि कोंबड्या-बकर्यापासून ते मराठमोळ्या पुरणपोळ्यापर्यंत ‘जे हवे ते’ उपलब्ध करून देण्याची ‘ताकत’ या नेत्यात आहे.
अजित पवार अध्यक्ष होणार असतील तर महामंडळाला निधीसाठी पायपीट करावी लागणार नाही. ‘घुमानच्या संमेलनात व्यासपीठावर महामंडळाच्या अध्यक्षांची ‘नथ’ दिसली पण संमेलनाचे ‘नाक’ (अध्यक्ष) मागे दडले होते’ अशी टीका झाली होती. अजित पवार अध्यक्ष झाले तर जगबुडी झाली तरी प्रसारमाध्यमे सविस्तर वार्तांकन करतील. महामंडळाच्या अध्यक्षापेक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला मान मिळेल. आतापर्यंत प्रत्येक संमेलनात राजकारणी असतातच आणि ते संमेलनाध्यक्षांचे औपचारिकपणे गोडगोड कौतुक करून निघून जातात. संमेलनाध्यक्षही तेच तेच विचार रेटून नेत असतात. या असल्या थिल्लर प्रकाराची मराठी भाषेला आता गरज नाही. मराठीला आता खमकेपणे बोलणारा, प्रसंगी साहित्यिकांचीही कानउघाडणी करणारा, भाषेचा ठसा उमटवणारा, त्यातील रांगडेपणा सिद्ध करणारा अजित पवार यांच्यासारखा अध्यक्ष हवाय. ‘शिव्या देण्यात माझी पीएचडी आहे’ असे मोठ्या साहेबांनी यापूर्वीच सांगितले आहे. काकणभर त्यांच्या पुढे जाऊन हा वारसा चालवणार्या त्यांच्या या शिष्याची कदर मराठी बांधवांनी केलीच पाहिजे.
शरद पवार यांनी घालून दिलेल्या ‘मार्गदर्शक तत्त्वा’नुसार आजवर अनेक संमेलने झाली आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्षही त्यांच्या इशार्यावर ‘नेमले’ गेले आहेत. त्यांच्या सल्ल्याशिवाय संमेलनाचे पान हालत नाही. त्यांच्या सहभागाशिवाय संमेलनाचे व्यासपीठ रितेरिते वाटते. मात्र सत्ताबदल होताच रंगबदलूपणा करत महामंडळाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण आजवरच्या प्रथेला फाटा देत, ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या चेल्यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. पवारांचे अमृतमहोत्सवी वर्ष ही त्यासाठी एक चांगली संधी आहे. या निमित्ताने का होईना पण अजित पवारांना थोडीफार किंमत मिळेल. त्यामुळे यंदाच्या संमेलनाध्यक्ष पदासाठी कार्यकर्त्यांनी दादांच्या नावाचा आग्रह जरूर धरावा!
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२
ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे जेवढे रूक्ष आणि कंटाळवाणे, निरर्थक लिहितात तितकेच ते चांगले बोलतात. त्यांचे लिहिणे, बोलणे आणि जगणे यात फार विसंगती आहे. त्यांची जाहीर कार्यक्रमातली विधाने विचार करण्यास भाग पाडणारी असतात. इतक्या ठामपणे आणि भूमिका घेत अभ्यासपूर्ण मांडणी करणारा दुसरा साहित्यिक तूर्तास तरी मराठीत दिसत नाही. त्यामुळेच त्यांच्या लेखनावर आमचा जितका राग आहे तितकेच त्यांच्या बोलण्यावर प्रेम आहे.
पुणे शहराविषयी आपल्याला किती पुळका आहे हे सांगताना नेमाडेंनी ‘पुण्याचे सामाजिक स्वास्थ्य हरवतेय’ अशी खंत व्यक्त केली. हे जरी खरे असले तरी थोड्या फार फरकाने सर्वत्रच ही अवस्था आहे. त्यामुळे उगीच पुणेकरांना दोष देण्यात काही अर्थ नाही. मात्र अशी काही विधाने केली की सनसनाटी निर्माण होते आणि त्यातून चर्चेत राहता येते हे नेमाडे यांच्यासारख्या बुजूर्गाला चांगलेच ठाऊक आहे. गंमत म्हणजे, ‘इंग्रजी शाळा म्हणजे खाटीकखाना’ असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे. आयुष्यभर इंग्रजी हाच विषय शिकविणार्या या प्राध्यापकाचे बोलणे त्यामुळेच आम्हाला ‘खाटीक’वाणी वाटते.
‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ असे काहीसे त्यांच्याबाबत होत आहे. इंग्रजीचे अध्यापन करणारा हा प्राध्यापक सध्या इंग्रजीविरूद्ध भूमिका मांडतो. इंग्रजी शाळा बंद करण्याची मागणी सातत्याने करतो. मराठी शाळा धडाधड बंद पडत असताना, इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना नेमाडेंच्या या विधानाचे स्वागत करायला हवे. ते आम्ही केलेही! मात्र केवळ पोपटपंची करून काही साध्य होणार नाही. सत्तावीस-सत्तावीस वर्षे खपून नेमाडे यांच्यासारख्या लोकांनी इतक्या बोजड, निरस आणि कंटाळवाण्या कादंबर्या लिहिल्या नसत्या तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. आजच्या तरूणांनी मराठीकडे इतके दुर्लक्ष केले नसते आणि भाषेचा द्वेषही केला नसता. ‘आजचे तरूण वाचत नाहीत’ असे म्हणताना ‘ते का वाचत नाहीत’ याचाही विचार झाला पाहिजे. तुम्ही जर स्वान्तसुखाय लेखनासाठी वाटेल ते खरडत असाल आणि तरूण वाचत नाहीत, अशा आवया देत असाल तर ते सत्य नाही. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या प्रगल्भ बोलणार्या लेखकाने स्वतःच्याच लेखनाकडे तटस्थपणे पाहिले तर मुलं का वाचत नाहीत, हे त्यांच्या ध्यानात येईल.
‘इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीकखान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे. इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात. सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला आहे’ असे मत नेमाडे यांनी मांडले आहे. याचाच अर्थ आयुष्यभर त्यांनी इंग्रजी शिकवून किमान दोन पिढ्या बरबाद केल्या आहेत. त्यांना मूर्ख बनविले आहे. म्हणजे शिक्षणव्यवस्थेचा ‘उकिरडा’ कोणी केला याचे उत्तरही आता नेमाड्यांना द्यावे लागेल. सोयीनुसार बोलणारे नेमाडे त्याविषयी मात्र मूग गिळून गप्प बसतील.
‘कोसला’मधील तरूण आणि आजचा तरूण यात खूप बदल झाला असल्याचे सांगणारे नेमाडे ‘ज्ञानेश्वरीएवढ्या तोडीचे अनेक ग्रंथ साठ हजार वर्षापासून असल्या’चे सांगतात आणि याबाबत आपण ‘अज्ञान’ बाळगत असल्याचा ठपका ठेवतात. हे जरी खरे असले तरी ज्ञानेश्वरीसारखे चिरंतन आणि शाश्वत साहित्य कालातीत आहे हे नेमाड्यांना कळत नाही, असे तरी कसे म्हणावे? नेमाडे यांच्या पुस्तकावर आणि त्यांच्या मनावर जळमटं साचल्याने ते असे बडबडत असतात. आपले साहित्य कंटाळवाणे आहे, ते कालबाह्य होतेय या भीतिने ते उद्विग्न झाले असावेत.
इतिहासाची पाने चाळताना ज्ञानेश्वरीहून श्रेष्ठ ग्रंथ आपल्याकडे नाहीत, असा आमचा दावा नाही. मात्र नेमाडे ज्या आवेशात सांगतात आणि त्यापुढे जाऊन ‘ब्राह्मणांचा राष्ट्रवाद रोखण्यासाठी मराठा’ अशी मांडणी करतात ती घातक आहे. जातीअंताच्या लढाईची भाषा करणारे असे महाभागच जातीजातीत फूट पाडण्याचे काम करत आहेत. ‘न सुटणार्या प्रश्नांची उत्तरे शोधत राहणे हिंदू समाजाचे लक्षण आहे’ असे सांगणारे नेमाडे तरी दुसरे काय करत आहेत? त्यांच्या ‘हिंदू’तून कोणत्या प्रश्नांची उत्तरे गवसली हे कोणी सांगू शकेल का?
भालचंद्र नेमाडे बिथरलेत. ते सध्या काही विधाने विचारपूर्वक करतात. त्यात सत्य आणि तथ्यही असते. मात्र आपण जे बोलतो तसे जगावे लागते हे त्यांच्या गावीही नसते. सर्व जातीपातीच्या संस्था प्रबळपणे कार्यरत आहेत. ‘आम्ही जात मान्य करत नाही’ असे सांगणार्या नेत्यांची ओळखही ‘अमुकतमुक जातीचे पुढारी’ अशीच करून दिली जाते.
नेमाडे हे ज्येष्ठ आहेत. त्यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळालाय. तो कसा मिळाला, कसा मिळतो याची चर्चा त्यांनीच यापूर्वी केली आहे. मात्र आम्ही त्यावर भाष्य करणार नाही. ‘उशीरा सुचलेले शहाणपण’ म्हणून आपण नेमाड्यांची विधाने गंभीरपणे घेऊ! मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी जो कोणी भूमिका घेईल त्याचे स्वागतच करायला हवे. ते करताना ‘इंग्रजी शाळा म्हणजे खाटीकखाना’ असे सांगणार्याची ‘खाटीक’वाणीही दुर्लक्षित करता येणार नाही.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२
गुन्हेगारी, महागाई आणि भ्रष्टाचार याला वैतागलेल्या जनतेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला घरी बसवत भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आणले. निवडणुकीपूर्वी आघाडीच्या विरूद्ध राळ उडविणार्या भाजपा नेत्यांनी सत्ता हाती आल्यानंतर मात्र आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे.
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या चमुंचा सिंचन घोटाळा बाहेर काढल्याच्या आविर्भावात भाजपने त्यांच्यावर वाटेल तसे आरोप केले. राष्ट्रवादीने मागच्या काही वर्षात सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचे सातत्याने समाजमनावर बिंबवले. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी भाजपायींनी सोडली नाही. ‘अजित पवारांच्या विरूद्ध भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे देऊ’ असे निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी घसा ताणून सांगितले. मात्र आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)कडून चौकशी सुरू झाल्यानंतर सगळेच मूग गिळून गप्प आहेत. दोनवेळा नोटीस काढूनही अजित पवारांना एसीबीपुढे चौकशीसाठी न जाता लेखी उत्तर देण्याची मुभा देण्यात आली आहे. ‘आपण दोघे भाऊ-अर्धे अर्धे खाऊ’ अशातला तर हा प्रकार नाही ना, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
अजित पवारांचा स्वभाव फटकळ असला तरी त्यांची वृत्ती कार्यतत्पर आहे, त्यांचा प्रशासनावर जबरदस्त वचक आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आज देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कणखर आणि मुख्य म्हणजे प्रशासनावर वचक असलेला पंतप्रधान मिळाला आहे. राज्यापुरते बोलायचे झाल्यास असेच नेतृत्वगुण असलेला अजित पवारांखेरीज दुसरा नेता दिसत नाही. सत्तेत असताना त्यांनी ज्या तडफेने कामे मार्गी लावली ती पाहता त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होणे स्वाभाविक मानायला हवे. आता मात्र भाजपा सरकारची अजितदादांवर असलेली मेहरनजर पाहता दोनच निष्कर्ष निघतात. एक म्हणजे भाजपवाल्यांनी त्यांच्यावर केवळ राजकीय उद्देशाने पुराव्याअभावी आरोप केले किंवा त्यांचे अजित पवार आणि राष्ट्रवादीसोबत साटेलोटे झाले आहे.
असे साटेलोटे करण्याएवढी मुत्सद्देगिरी भाजपवाल्यात अजून तरी मुरलेली दिसत नाही. त्यामुळेच ते भांबावून गेले आहेत. छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना चौकशीसाठी बोलावले असताना एसीबीकडून अजित पवार, सुनील तटकरे यांना मात्र सूट दिली जात आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी पवार, तटकरे यांना नोटीसा गेल्या आहेत. पर्यावरण विभागाची मान्यता नसताना प्रकल्पाच्या कामाला सुरूवात केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोंढणा प्रकल्पाची किंमत 56 कोटींवरून 614 कोटीवर नेणे आणि काळू प्रकल्पाचा खर्च 382 कोटींवरून 700 कोटींवर नेण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. असे सारे असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बजावलेल्या नोटीसला समक्ष जाऊन उत्तर देण्याऐवजी लेखी उत्तर देण्याची मुभा त्यांना देण्यात आल्याने सिंचन घोटाळ्याच्या चौकशी समितीवर आणि सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे कमी म्हणून की काय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी अजित पवार यांना शासनाकडूनच माहिती हवी आहे. त्यासाठी त्यांनी जलसंपदा विभागाकडे माहिती अधिकार कायाद्याअंतर्गत मागणी केल्याचे वृत्त आहे. याचाच अर्थ आपण किती घोटाळे केले याची माहिती सरकारने ठेवावी आणि ती आम्हाला उपलब्ध करून द्यावी, त्यासंदर्भात त्यांच्याकडे किती माहिती आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे किती पुरावे आहेत हे तपासून पाहणे त्यांना गरजेचे वाटत असावे.
मंत्रालयाला आग लागली तेव्हा ‘महाराष्ट्र शंभर टक्के भ्रष्टाचार मुक्त झाला, सर्व फाईल्स जळाल्या’ अशी प्रतिक्रिया आम्ही दिली होती. अजित पवार यांना मिळत असलेली सूट पाहता त्यातील तथ्य समोर येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या अवाढव्य घोटाळ्याचे चित्र रंगवताना भाजपवाल्यांनी जंग जंग पछाडले होते. मात्र सत्तेत येऊन त्यांना एक वर्ष पूर्ण होत आले असताना अजित पवार किंवा त्यांच्या सहकार्यांचा अजून तरी एकही घोटाळा सरकारला सिद्ध करता आला नाही.
छगन भुजबळ यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बोलवून घेऊन चौकशी केली. त्याउलट अजित पवार यांना दोनवेळा नोटीस पाठवूनही ते आले नाहीत. ते महाराष्ट्राबाहेर असल्याने लेखी उत्तर देतील असे सांगण्यात आले आणि एसीबीकडून ते मान्यही करण्यात आले. किंबहुना सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना अजून आरोपी ठरवले नसल्याने त्यांना एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी येण्याची सक्ती करता येत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या सिंचन घोटाळ्यावरून जंग जंग पछाडले त्यात अजित पवारांना अजून आरोपीही करण्यात आले नसल्याने भाजपवाल्यांचा तो केवळ आततायीपणा होता का, हे तपासून पहावे लागेल. जर अजित पवार यांच्याविरूद्ध काही पुरावेच नसतील आणि ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या न्यायाने सातत्याने जनतेवर ते बिंबवण्यात आले असेल तर हे गंभीर आहे. सत्तेसाठी वाटेल ते या न्यायाने बिनबुडाचे आरोप करणारे भाजपवाले कांगावा करत आहेत.
‘सत्तेत असताना राष्ट्रवादीकडून कोणतेही घोटाळे अथवा नियमबाह्य काम झाले नाही. पवार, तटकरे, भूजबळ यांच्यावर झालेले घोटाळ्याचे आरोप निराधार असून आम्ही चौकशीला जाण्यास तयार आहोत,’ असे राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील आरोप सिद्ध करणे किंवा ती केवळ राजकीय आरोपबाजी होती हे मान्य करणे असे दोनच पर्याय सत्ताधार्यांपुढे आहेत. भ्रष्टाचाराचे ‘बैलगाडी’भर पुरावे असल्याच्या बाता करणारे देवेंद्र फडणवीस मोदी शेठचे दिवे ओवाळण्यातच मश्गुल आहेत.
सामान्य माणूस अजूनही भरडला जातोय. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. श्रमाला प्रतिष्ठा नाही. गावपातळीपासून सर्वत्र छोटे-मोठे घोटाळे सुरूच आहेत. महागाई वाढतच चाललीय. दुष्काळ, नापिकी यामुळे जगणे अवघड झालेय. जे आघाडीच्या काळात होते तेच भाजपेयींच्या कारकिर्दीत आहे. राष्ट्रवादीवाल्यांना ‘घोटाळेबहाद्दर’ समजून भाजपने आक्रमक प्रचार केला. लोकांच्या मनात खदखदणारा राग व्यक्त केला आणि सत्तेची सूत्रे हस्तगत केली. मात्र तेही आता त्याच वाटेवरून जात असल्याचा समज सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतोय.
सिंचन घोटाळाच नव्हे तर अन्य असंख्य घोटाळे त्वरीत उघड व्हावेत आणि त्यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी. मात्र हे करताना अकारण राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप करून सामान्य माणसाला खेळवत ठेऊ नये, अन्यथा त्यांच्या भावनांचा स्फोट झाला तर सरकारला पळता भुई थोडी होईल.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२
नाशिक
‘लोकमत’ने ‘नवे कोरे’ या सदरात आज माझ्या ‘झुळूक आणि झळा’ या
अग्रलेखसंग्रहाची दखल घेतली आहे. ‘लोकमत’ आणि हा परिचय देणारे मित्रवर्य
संजय वाघ या दोघांचेही मनःपूर्वक आभार!
नवे कोरे
झुळूक आणि झळा
‘दखलपात्र’च्या यशानंतर वाचकांच्या भेटीला आलेला घनश्याम पाटील यांचा
‘झुळूक आणि झळा’ हा दुसरा अग्रलेखसंग्रह. यात समाविष्ट असलेल्या चाळीस
अग्रलेखांचे विषय प्राप्त परिस्थितीशी निगडित असले तरी त्यातील आशय मात्र
आजही चिरतरूणच वाटावा अशी मांडणी पाटील यांनी या ग्रंथात केली आहे. कधी
ओघवती, कधी लालित्यपूर्ण तर कधी आक्रमक भाषाशैली हे पाटील यांच्या लिखाणाचे
वैशिष्ट्य आहे. स्पष्ट आणि रोखठोकपणाची कास धरताना, अकारण आक्रस्ताळेपणा
त्यांच्या लेखनात कोठेही जाणवत नाही. एखाद्या घटनेवर भाष्य करताना केवळ
त्या विषयाच्या आहारी न जाता त्यावर मार्मिक टिपण्णी करताना पाटील यांनी
कमालीचा तटस्थपणा बाळगून त्या विषयाच्या सकारात्मक-नकारात्मक परिणामांची
सांगड समाज जीवनाशी घातली आहे. यातच लेखकाची खरी कसोटी असते. त्या कसोटीला
उतरलेले हे लेखन आहे. ‘नेमाडेंचा बेगडी नेम’, ‘हरी नावाचा नरके’, ‘भाजपा
सरकार की रॉंग नंबर’, ‘गप ‘घुमान’संमेलन’, ‘मराठीच्या मारेकर्यांना मारा’,
‘पप्पू फेल हो गया’, ‘पत्रकारिता धर्म की धंदा?’, ‘तो मी नव्हेच!’,
‘सामान्य माणसा जागा हो!’, ‘कोंबडा झाकून ठेवला म्हणून आरवण्यावाचून राहत
नाही!’ ही काही शीर्षके जरी वाचली तरी वाचकाला तो अग्रलेख पूर्ण वाचण्याचा
मोह झाल्यावाचून राहणार नाही. गुरूगोविंद आंबे यांचे विषयानुरून मुखपृष्ठ
आणि बजरंग लिंभोरे यांची मांडणी सुरेख आहे. एकूणच यातील झुळूक आणि झळाही
हव्याहव्याशा वाटतात.
* झुळूक आणि झळा
लेखक - घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन, पुणे (7057292092)
पृष्ठे-140, मूल्य - 150/-
ही गोष्ट आहे 1993 ची. जळगावमध्ये वकिली व्यवसायात नेकीने कार्यरत असल्याने वेगळी ओळख झाली होती. मुंबईतील बॉम्बस्फोटाने देश हादरला होता. त्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून माझी नियुक्ती झाली आणि मी मुंबई गाठली. मुंबईत ना कुणाच्या ओळखी ना या शहराची कसली माहिती. मात्र ‘आपण भले आणि आपले काम भले’ या न्यायाने मी येथे आलो. वकीलपत्र घेतले.
त्याचवेळी मला पोलीस आयुक्तांकडून सूचना आल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भेटायला बोलावले आहे. मी त्यांच्याकडे गेलो. बाळासाहेबांनी अधिकाराने सांगितले की, ‘‘निकम, या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला आपल्याला सोडवायचे आहे.’’
मी सांगितले, ‘‘जमणार नाही. संजय दत्तला सोडायचे तर आणखी दहा-बारा गुन्हेगारांना सोडावे लागेल.’’
तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका शिवसैनिकाने मला दम भरला की, ‘‘तुम्ही सरकारचे नोकर आहात. सरकार आमचे आहे आणि बाळासाहेब हेच सरकार आहेत. त्यांचा शब्द हा अंतिम असतो. तुम्हाला तसेच वागावे लागेल.’’
मी म्हणालो, ‘‘बाळासाहेब, चर्चा आपल्या दोघात ठरली होती. हा मला विचारणारा कोण?’’
त्यांनी तो त्यांचा ‘मानसपुत्र’ जयंत जाधव असल्याचे सांगितले.
‘‘हे काम माझ्याच्याने होणार नाही’’, असे मी स्पष्टपणे सांगताच त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला ‘पंतां’ना फोन करण्यास सांगितला. हे ‘पंत’ कोण हेही माझ्या तेव्हा लक्षात आले नाही. नंतरच्या संवादावरून कळले की राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांनी फोन लावला होता. या खटल्याचे कामकाज माझ्याकडून काढून घेण्याच्या सूचना त्यांनी माझ्या समोरच दिल्या.
मी ‘मातोश्री’वरून बाहेर पडलो. बाहेर आल्याआल्या वायरलेसवरून सूचना मिळाल्या. मला तडक पोलीस आयुक्तांनी बोलावले. आमचा ताफा तिकडे गेला. त्यांनी मला सांगितले की, ‘‘तुम्ही तुमचे सामान भरा. जळगावला जायची तयारी करा. मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत.’’
मी निघण्याच्या तयारीत होतो तोच पोलीस आयुक्तांना तेव्हाचे गृहमंत्री गोपीनाथ मंुंडे यांचा फोन आला. त्यांना मी ओळखतही नव्हतो. त्यांनी सांगितले की, ‘‘उज्ज्वल निकम यांची मी सगळी माहिती काढली आहे. ते प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ वकील आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना परत जाऊ देऊ नका...’’
पोलीस आयुक्तांनी मी त्यांच्यासमोरच बसलो असल्याचे सांगितले. त्याबरोबर मुंडे यांनी आम्हाला दोघांनाही तिकडे बोलावले.
आम्ही त्यांच्याकडे गेलो. माझे वकीलपत्र रद्द करण्याचा निर्णय खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतला होता. त्यामुळे मुंडेंनी जोशींना फोन करून विचारणा केली. हा आदेश ‘मातोश्री’चा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ‘गृहखाते तुमच्याकडे आहे. कसे ते तुम्ही ठरवा पण निकमांना जळगावला परत पाठवा’ असे जोशींनी त्यांना सांगितले.
त्याबरोबर गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या देखत बाळासाहेबांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘साहेब, उज्ज्वलची सर्व माहिती मी काढली आहे. हा प्रामाणिक माणूस आहे. गृहखात्याची प्रतिमा डागाळू नये यासाठी अशाच खमक्या आणि निःस्वार्थ वकीलाची गरज आहे.’’
बाळासाहेब त्यांना म्हणाले, ‘‘तो शरद पवारांचा माणूस आहे...’’
मुंडेंनी त्यांना ठासून सांगितले, ‘‘साहेब, मी यांची खात्री देतो. ते फक्त प्रामाणिकपणाची वकिली करतील. पवारांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. गृहखाते माझ्याकडे आहे. मला काही निर्णय घ्यायचे तरी स्वातंत्र्य द्या!’’
बाळासाहेबांनी फोन आपटला.
माझी आणि गोपीनाथ मुंडे यांची ही पहिलीच भेट होती. यापूर्वी आम्ही कधी फोनवरही बोललो नव्हतो. मात्र माझी सगळी कुंडलीच त्यांनी काढली होती. माझ्यासाठी त्यांनी बाळासाहेबांकडे आपला शब्द टाकला. टोकाची भूमिका घेत माझी पाठराखण केली.
तेव्हा खरेतर माझी आणि शरद पवार यांचीही ओळख नव्हती. तोपर्यंत त्यांच्याशी माझा कसलाही संपर्क आला नव्हता. त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत माझ्याकडे सरकारी वकील म्हणून महत्त्वाचे खटले आले होते. मात्र मुख्यमंत्र्याशी थेट संपर्क येण्याचे काहीच कारण नव्हते.
सुनील दत्त यांनी साकडे घातल्याने बाळासाहेब संजयची पाठराखण करत होते, पण खटल्याचे काम सुरू झाल्यावर त्यांनी त्यात कधीही हस्तक्षेप केला नाही. उलट त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिल्याने त्यांनी मला पुन्हा भेटायला बोलवून घेतले. माझे कौतुक केले. आमची पुढे चांगली गट्टी जमली. विविध विषयांवर ते मोकळेपणाने बोलायचे. त्यांच्यात एखाद्या लहान मुलासारखा निरागसपणा होता. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचेही त्यांना कौतुक वाटायचे.
त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी तटस्थपणे माझी पाठराखण केली नसती तर मला मुंबई सोडावी लागली असती. मी जळगाव सारख्या ‘गावातून’ मुंबईत गेलो होतो. मुंबईची संस्कृती मला माहीत नव्हती. न्याय व्यवस्थेची पूजा बांधताना मी कधीच कोणापुढे लाचार झालो नाही. सद्विवेक सोडला नाही. मी फार काही वेगळे करतोय असेही मला कधी वाटले नाही. जे केले तो माझ्या कामाचाच एक भाग आहे. मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी स्वतःहून पुढाकार घेतला नसता तर कदाचित आजचा उज्ज्वल निकम दिसला नसता.
मुंबई बॉम्बस्फोट, गुलशनकुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन खून खटला, कसाबची फाशी अशा अनेक प्रकरणात सरकारी वकील म्हणून मला काम पाहता आले. या व अशा सर्व महत्त्वाच्या प्रकरणात मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो. लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. मात्र मुंडे साहेबांनी त्यावेळी बाळासाहेबांना समजावून सांगितले नसते तर मी जळगावपुरताच मर्यादित राहिलो असतो. फक्त विद्वत्ता असून चालत नाही, तर ती सिद्ध करण्याची संधी मिळावी लागते. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यतत्पर, प्रामाणिक आणि तटस्थ वृत्तीच्या नेत्यामुळे ही संधी मला मिळाली.
या नेत्याचे अपघाती निधन सर्वांनाच चटका लावणारे आहे. बिनधास्त बोलणारी एक धडधडती तोफ अकाली थंडावली आहे. मैत्रीला आणि दिल्या शब्दाला जागणारा हा नेता सामान्यांच्या हितासाठी लढला. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त (3 जून) माझ्यातर्फे त्यांना विनम्र श्रद्घांजली.
- उज्ज्वल निकम (विशेष सरकारी वकील)
(शब्दांकन: घनश्याम पाटील, संपादक 'चपराक' पुणे)