Monday, June 15, 2015

‘खाटीक’वाणी

ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे जेवढे रूक्ष आणि कंटाळवाणे, निरर्थक लिहितात तितकेच ते चांगले बोलतात. त्यांचे लिहिणे, बोलणे आणि जगणे यात फार विसंगती आहे. त्यांची जाहीर कार्यक्रमातली विधाने विचार करण्यास भाग पाडणारी असतात. इतक्या ठामपणे आणि भूमिका घेत अभ्यासपूर्ण मांडणी करणारा दुसरा साहित्यिक तूर्तास तरी मराठीत दिसत नाही. त्यामुळेच त्यांच्या लेखनावर आमचा जितका राग आहे तितकेच त्यांच्या बोलण्यावर प्रेम आहे.
पुणे शहराविषयी आपल्याला किती पुळका आहे हे सांगताना नेमाडेंनी ‘पुण्याचे सामाजिक स्वास्थ्य हरवतेय’ अशी खंत व्यक्त केली. हे जरी खरे असले तरी थोड्या फार फरकाने सर्वत्रच ही अवस्था आहे. त्यामुळे उगीच पुणेकरांना दोष देण्यात काही अर्थ नाही. मात्र अशी काही विधाने केली की सनसनाटी निर्माण होते आणि त्यातून चर्चेत राहता येते हे नेमाडे यांच्यासारख्या बुजूर्गाला चांगलेच ठाऊक आहे. गंमत म्हणजे, ‘इंग्रजी शाळा म्हणजे खाटीकखाना’ असे प्रतिपादनही त्यांनी केले आहे. आयुष्यभर इंग्रजी हाच विषय शिकविणार्‍या या प्राध्यापकाचे बोलणे त्यामुळेच आम्हाला ‘खाटीक’वाणी वाटते.
‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ असे काहीसे त्यांच्याबाबत होत आहे. इंग्रजीचे अध्यापन करणारा हा प्राध्यापक सध्या इंग्रजीविरूद्ध भूमिका मांडतो. इंग्रजी शाळा बंद करण्याची मागणी सातत्याने करतो. मराठी शाळा धडाधड बंद पडत असताना, इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना नेमाडेंच्या या विधानाचे स्वागत करायला हवे. ते आम्ही केलेही! मात्र केवळ पोपटपंची करून काही साध्य होणार नाही. सत्तावीस-सत्तावीस वर्षे खपून नेमाडे यांच्यासारख्या लोकांनी इतक्या बोजड, निरस आणि कंटाळवाण्या कादंबर्‍या लिहिल्या नसत्या तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. आजच्या तरूणांनी मराठीकडे इतके दुर्लक्ष केले नसते आणि भाषेचा द्वेषही केला नसता. ‘आजचे तरूण वाचत नाहीत’ असे म्हणताना ‘ते का वाचत नाहीत’ याचाही विचार झाला पाहिजे. तुम्ही जर स्वान्तसुखाय लेखनासाठी वाटेल ते खरडत असाल आणि तरूण वाचत नाहीत, अशा आवया देत असाल तर ते सत्य नाही. भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या प्रगल्भ बोलणार्‍या लेखकाने स्वतःच्याच लेखनाकडे तटस्थपणे पाहिले तर मुलं का वाचत नाहीत, हे त्यांच्या ध्यानात येईल.
‘इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीकखान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे. इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात. सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला आहे’ असे मत नेमाडे यांनी मांडले आहे. याचाच अर्थ आयुष्यभर त्यांनी इंग्रजी शिकवून किमान दोन पिढ्या बरबाद केल्या आहेत. त्यांना मूर्ख बनविले आहे. म्हणजे शिक्षणव्यवस्थेचा ‘उकिरडा’ कोणी केला याचे उत्तरही आता नेमाड्यांना द्यावे लागेल. सोयीनुसार बोलणारे नेमाडे त्याविषयी मात्र मूग गिळून गप्प बसतील.
‘कोसला’मधील तरूण आणि आजचा तरूण यात खूप बदल झाला असल्याचे सांगणारे नेमाडे ‘ज्ञानेश्‍वरीएवढ्या तोडीचे अनेक ग्रंथ साठ हजार वर्षापासून असल्या’चे सांगतात आणि याबाबत आपण ‘अज्ञान’ बाळगत असल्याचा ठपका ठेवतात. हे जरी खरे असले तरी ज्ञानेश्‍वरीसारखे चिरंतन आणि शाश्‍वत साहित्य कालातीत आहे हे नेमाड्यांना कळत नाही, असे तरी कसे म्हणावे? नेमाडे यांच्या पुस्तकावर आणि त्यांच्या मनावर जळमटं साचल्याने ते असे बडबडत असतात. आपले साहित्य कंटाळवाणे आहे, ते कालबाह्य होतेय या भीतिने ते उद्विग्न झाले असावेत.
इतिहासाची पाने चाळताना ज्ञानेश्‍वरीहून श्रेष्ठ ग्रंथ आपल्याकडे नाहीत, असा आमचा दावा नाही. मात्र नेमाडे ज्या आवेशात सांगतात आणि त्यापुढे जाऊन ‘ब्राह्मणांचा राष्ट्रवाद रोखण्यासाठी मराठा’ अशी मांडणी करतात ती घातक आहे. जातीअंताच्या लढाईची भाषा करणारे असे महाभागच जातीजातीत फूट पाडण्याचे काम करत आहेत. ‘न सुटणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे शोधत राहणे हिंदू समाजाचे लक्षण आहे’ असे सांगणारे नेमाडे तरी दुसरे काय करत आहेत? त्यांच्या ‘हिंदू’तून कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे गवसली हे कोणी सांगू शकेल का?
भालचंद्र नेमाडे बिथरलेत. ते सध्या काही विधाने विचारपूर्वक करतात. त्यात सत्य आणि तथ्यही असते. मात्र आपण जे बोलतो तसे जगावे लागते हे त्यांच्या गावीही नसते. सर्व जातीपातीच्या संस्था प्रबळपणे कार्यरत आहेत. ‘आम्ही जात मान्य करत नाही’ असे सांगणार्‍या नेत्यांची ओळखही ‘अमुकतमुक जातीचे पुढारी’ अशीच करून दिली जाते.
नेमाडे हे ज्येष्ठ आहेत. त्यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळालाय. तो कसा मिळाला, कसा मिळतो याची चर्चा त्यांनीच यापूर्वी केली आहे. मात्र आम्ही त्यावर भाष्य करणार नाही. ‘उशीरा सुचलेले शहाणपण’ म्हणून आपण नेमाड्यांची विधाने गंभीरपणे घेऊ! मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी जो कोणी भूमिका घेईल त्याचे स्वागतच करायला हवे. ते करताना ‘इंग्रजी शाळा म्हणजे खाटीकखाना’ असे सांगणार्‍याची ‘खाटीक’वाणीही दुर्लक्षित करता येणार नाही.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

No comments:

Post a Comment