डॉ. प्रभा अत्रे |
बाळासाहेबांच्या या निर्वाळ्यानंतर पाच लाख रूपये व पहिला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार पुलंना देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभात बोलताना पुलंनी मात्र औचित्यभंग करत काही गोष्टी मांडल्या. शिवसेनेच्या सत्तेकडे बोट दाखवत त्यांनी ‘ही लोकशाही नसून ठोकशाही आहे,’ असे प्रतिपादन केले. पुरस्काराची रक्कम मात्र त्यांनी स्वीकारली. एखाद्या सुहृदयी माणसाने आपणास आग्रहाने जेवायला बोलवावे, पंचपक्वान्नाचा बेत आखावा आणि जेवायला येणार्याने अन्नदात्यालाच दूषणे लावावीत, असा काहीसा प्रकार घडल्याने बाळासाहेबांच्या प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. ‘झक मारली अन् आम्ही पुरस्कार दिला’ अशा खास ठाकरी शैलीत बाळासाहेबांनी त्यांचा समाचार घेतला.
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पुणे महानगरपालिकेने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मरणार्थ ‘स्वरभास्कर’ पुरस्कार जाहीर केला. तो वेळेत न दिला गेल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आणि अत्रेंनी हा पुरस्कार नाकारला. यावरून पुणे महानगरपालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी याबाबतचा खुलासा करताना अत्रे यांच्याशी झालेला पत्रव्यवहार माध्यमांच्या समोर आणला आहे. या पुरस्काराबाबत अत्रे यांनी अनेक अटी लादल्यानेच या कार्यक्रमाला उशीर होत असल्याचे सिद्ध झाले आहे. अत्रेबाई या ज्येष्ठ असल्या तरी बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रतिक्रिया आज आम्हाला स्मरते.
हा पुरस्कार कुणाच्या हस्ते दिला जावा, कार्यक्रमाचे स्वरूप काय असावे, कार्यक्रमाच्यावेळी अत्रे यांच्या जीवनपटाची चित्रफीत दाखवली जावी, पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या नावे चालू असलेल्या एका संस्थेस ७५ हजार रूपये देण्यात यावेत, अशा काही अटी त्यांनी घातलेल्या आहेत. प्रकाश जावडेकर, मनोहर पर्रीकर आणि माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याच हस्ते हा पुरस्कार द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पुरस्कार घेणार्याने पुरस्कार देणार्यांना अशा अटी घालण्याचे धाडस आश्चर्यकारक आहे. अत्रे यांच्याविषयी नितांत आदर असूनही त्यांच्या या हेकटपणाचे समर्थन करता येणार नाही.
एखादी व्यक्ती किंवा संस्था सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतरच तिची पुन्हा घसरण सुरू होते हा सृष्टीचा नियम आहे. भलेभले याला अपवाद ठरू शकले नाहीत. डॉ. प्रभा अत्रे यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदरभावना असतानाच त्यांनी विक्षिप्तपणा दाखवून दिल्याने त्यांची घसरण सुरू झाली आहे. ‘हा पुरस्कार वेळेत मिळावा म्हणून आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो,’ असे सांगणार्या अत्रेबाई पुरस्कार आपल्या परवानगीशिवाय जाहीर केल्याचेही सांगतात. केवळ भाजप नेत्यांच्याच हस्ते पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करणार्या अत्रेबाई अन्य कोणत्याही राजकीय नेत्याने मात्र या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यासपीठावर येऊ नये, हे ठासून सांगतात. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या पुणे महानगरपालिकेने हा पुरस्कार जाहीर केल्याने राष्ट्रवादीची कोंडी करणे, त्यांची प्रतिमा मलीन करणे या उद्देशाने तर हा सारा बनाव केला जात नाही ना? अशी शंका येण्यास त्यामुळेच मोठा वाव आहे. राज्यातील महत्त्वाची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे महानगरपालिकेने अत्रे यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. असे असताना त्यांच्यावर अटी लादणे, आपणास हवे ते करवून घेणे यामागे अत्रे याच आहेत की अन्य कोणती विचारधारा सुप्तपणे त्यांची पाठराखण करतेय हेही तपासून घ्यायला हवे.
‘मी पुण्याची नागरिक असून गेल्या८३ वर्षात महापालिकेने मला कोणताही पुरस्कार दिला नाही,’ अशी खंत व्यक्त करणार्या प्रभा अत्रे पुणे महापालिकेचा अवमान करत आहेत. कोणताही कलाकार त्याच्या कलेला सर्वस्व मानतो. त्या त्या क्षेत्रातील दर्दींचा त्याला मिळणारा प्रतिसाद हाच त्याच्यासाठी मोठा पुरस्कार असतो. राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेकडून त्याने कौतुकाची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. कलावंतांचा सन्मान करणे हा मात्र यंत्रणेचा धर्म असतो. पुणे महापालिका हा धर्म पार पाडत असताना अशी मुजोरी कोणीही करू नये.
लोककवी मनमोहन नातू म्हणायचे, ‘उद्याचा कालीदास जर अनवाणी पायाने जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’ या प्रकरणात मात्र राजा भोज त्याचे कर्तव्य चोखपणे पार पाडत असताना कालीदास अकारण स्वत:ची आणि भोजाची अब्रू घालवत आहे. इतके सारे होऊनही पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे आणि उपमहापौर आबा बागुल यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ‘डॉ. प्रभा अत्रे यांची नाराजी दूर करू, त्यांच्या अटींचे शक्य तितके पालन करून त्यांचा जाहीर समारंभातून गौरव करू’ असेच ते सभ्यपणे सांगत आहेत. ही सभ्यता अत्रे यांच्याकडून पायदळी तुडवली जात आहे. त्यांच्या वयाचा मान राखून, त्यांची कर्तबगारी लक्षात घेऊन आणि या पुरस्काराचे महत्त्व समजून पुणे महापालिका पडती भूमिका घेत असेल तर अत्रे यांनी अतिरेक करू नये. समस्त पुणेकरांचा हा एकप्रकारचा अवमानच आहे. कारण हे पुरस्कार शेवटी करदात्यांच्या खिशातूनच दिले जातात.
सध्या गल्लोगल्ली अनेक पुरस्कार दिले जात असताना पुरस्काराचे महत्त्व कमी कमी होत चालले आहे. एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर गौरव वाटण्याऐवजी लोक त्याच्याकडे उपहासाने पाहतात. वशिलेबाजी, चमचेगिरी, हितसंबंध अशा प्रकारामुळे आपल्या मर्जीतल्या लोकांना पुरस्कार दिल्याने त्याची प्रतिष्ठा लयास जात आहे. एकाच व्यक्तिला, एकाच कामगिरीसाठी, एकाच संस्थेकडून सलग तेरा-तेरा वर्ष पुरस्कार मिळाल्याचे यापूर्वी आपण पाहिलेलेच आहे. अशा परिस्थितीत पुणे महापालिका डॉ. प्रभा अत्रे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिकेला पुरस्कार देत असेल तर अशा पुरस्कारांना पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त होईल. पुरस्कार घेणार्यांनी आपला संकुचितपणा आणि आत्मकेंद्रित प्रवृत्ती दाखवून देत ‘पुरस्कार’ या संकल्पनेचा ‘कचरा’ करू नये एवढीच या निमित्ताने माफक अपेक्षा व्यक्त करत आहोत.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२