Monday, March 23, 2015

'मसाप’चा अव्यापारेशु व्यापार!


राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाच्या नावाखाली माकडचाळे; लाखोंचा चुराडा


 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या संमेलनात एक-दोन स्थानिक कलाकारांच्या एकांकिका वगळता दुसरे काहीच झाले नाही. पाहुण्यांना यायला उशीर झाला म्हणून वेळ मारून नेण्यासाठी एका कलाकाराने मिमिक्रीच्या नावाखाली नुसतेच माकडचाळे केल्याचे पहायला मिळाले.
नाट्य क्षेत्रातील अभिराम भडकमकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते नाट्य-साहित्यावर कमी आणि व्यवसाय प्रशिक्षणावरच जास्त बोलले. व्यवसाय निष्ठेने करावा, नैतिकतेने करावा, कल्पकतेने करावा या विषयी भडकमकर भरभरून बोलले. मात्र नाट्यसाहित्य कसे लिहावे, त्याचे नियम काय, संवाद लेखन कसे असावे, नेपथ्य कसे असावे यावर मात्र त्यांनी चकार शब्दही काढला नाही.
या राज्यस्तरीय युवा नाट्य-साहित्य संमेलनाला रंगभूमीवरील एकही कलाकार उपस्थित नव्हता, हे दुर्दैवच. येथील काही तुरळक युवकांशी संवाद साधण्यास एकाही नाट्यलेखकाची उपस्थिती नव्हती. कार्यकारिणी सदस्यांची व्याख्याने आयोजित करून 'मसाप’ने या युवा नाट्यसाहित्य संमेलनाची बोळवण केली.
चित्रपट आणि साहित्य या विषयावर बोलताना राज काझी यांनी तर साहित्यातील गुणवत्तेचा मुद्दा बाजूला ठेऊन मार्केटींगलाच महत्त्व असल्याचे ठासून सांगितले. त्यामुळे युवा नाट्य-साहित्य संमेलन भरकटल्याचे पहायला मिळाले.
समारोपाचे प्रमुख पाहुणे असलेल्या ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहन जोशी यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. संमेलनाचे सभामंडप तीनही बाजूंनी पडद्यांनी बंदिस्त असल्यामुळे जे काही जेमतेम श्रोते होते. मात्र उकाड्याने ते हैैराण झाले. कसलेही पूर्वनियोजन नसलेले हे युवा नाट्य-साहित्य संमेलन घाईघाईने उरकण्याचा अट्टहास 'मसाप’ने का केला असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.     
(साप्ताहिक चपराक २३ मार्च २०१५)

Sunday, March 22, 2015

‘मराठवाड्यातून मिळवले आणि पुण्यात टिकवले’






सुप्रसिद्ध कथाकार प्रा. भास्कर बडे यांच्याकडून स्वागत

कवी रामदास केदार आणि सुधाकर वायचळकर

मराठवाडा आणि कविता हे दोन विषय माझे आत्यंतिक जिव्हाळ्याचे आहेत. अनेक वर्षानंतर केवळ दोन दिवसासाठी मराठवाड्यात गेलो आणि मायभूमिच्या दर्शनाने आत्मिक सामर्थ्याची ऊर्जा कैक पट वाढल्यासारखे वाटले. माझ्या मराठवाड्यातील लोकाचे उदंड प्रेम आणि त्यांच्याकडून मिळणारी जिव्हाळ्याची वागणूक याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
मी आणि सागर सुरवसे! आम्ही दोघांनी परवा लातूर शहर गाठले. तिथे भल्या सकाळी माझे स्नेही, सुप्रसिद्ध कथाकार डॉ. भास्कर बडे  यांचे घर गाठले. बडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती नभाताई यांनी जोरदार स्वागत केले. त्याठिकाणी कवयित्री अस्मिता फड याही आल्या होत्या. विविध विषयांवर आमच्या दिलखुलास गप्पा झाल्या. बडे सरांनी पत्रकारिता, राजकारण आणि साहित्य क्षेत्रातील अनेक रंजक व तितक्याच सुरस कथा सांगितल्या. त्याचवेळी तिथे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे युवा पत्रकार निशांत भद्रेश्‍वर, लातूर पत्रकार संघाचे सचिव विजयकुमार स्वामी हे भेटण्यासाठी आले. विजयकुमार स्वामी म्हणजे शून्यातून वेगळे विश्‍व निर्माण करणारा संघर्षशील माणूस!

मराठवाडयातील पत्रकार आणि लेखकांसह!
मराठवाड्यातील ‘पुण्य नगरी’च्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
बडे संराचे ‘वावर’ हे निवासस्थान म्हणजे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्रच झाले आहे. त्याठिकाणी सौ. नभाताई नृत्याचे प्रशिक्षण वर्गही चालवतात. या दाम्पत्याने आमचे जोरदार स्वागत केले. साप्ताहिक आणि मासिकाच्या अंकाची त्यांनी स्वतःची व बीड जिल्ह्यातील काही ग्रंथालयांची वर्गणी भरली. अस्मिताताई फड याही सभासद झाल्या. मराठवाड्यात ‘चपराक’चा विस्तार व्हावा यासाठी लातूरकरांनी सदैव पुढाकार घेतला आहे. थोडावेळ गप्पा झाल्यानंतर डॉ. बडे, भद्रेश्‍वर, स्वामी, सागर आणि मी असे सर्वजण गांधी चौकात पोहोचलो. तिथे माझे जुने स्नेही, ज्येष्ठ पत्रकार प्रदीपजी नणंदकर आले. पुन्हा सगळ्यांच्या गप्पा झाल्या आणि आम्ही उदगीरकडे निघालो.
उदगीर हे माझे आजोळ! मात्र मामा कंपनी आता पुण्यातच स्थायिक झाल्याने फारसा संपर्क राहिला नाही. उदगीरला सांस्कृतिक, ऐतिहासिक मोठी परंपरा आहे. या परंपरेचे खंदे पाईक आणि प्रचंड सद्गुणी असलेल्या सुधाकरराव वायचळकर यांनी आमचे जोरदार स्वागत केले. उदगीरमध्ये ‘चपराक’च्या विस्तारात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आतिथ्याने भारावून गेलो. अनेक साहित्यविषयक गप्पा, जेवण यात तीन-चार तास गेले. मराठवाड्याची ओळख ठरण्याची क्षमता असलेले ताकतीचे युवा कवी प्रा. रामदास केदार आणि ज्येष्ठ कवयित्री सुनंदा सरदार यांनी वायचळकर सरांच्या घरी भेट घेऊन चर्चा केली.
तिथून आम्ही देगलूरला पोहोचलो. या सर्व व्यापात देगलूरला जायला उशीर झाला. तब्बल सात वर्षाने देगलूरला गेल्याने तिथे माझ्या ताईकडे कल्ला केला. भाचे कंपनीत रमताना मिळणारे सुख अवर्णनीय असते. सर्व थकवा धूम पळून गेला आणि पुन्हा ताजातवाना झालो.

सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. शेषराव मोरे सरांसोबत
काल सकाळी (शनिवार. दि. 21) देगलूरहून नांदेडला गेलो. जाताना चालकाशी गप्पा सुरू होत्या. मराठवाड्यातील दुष्काळ, विकासयोजना, भ्रष्टाचार अशा विषयांवर गप्पा सुरू होत्या. गाडीचे चालकही त्या परिसरातील बातमीदार असल्याने नवनवीन माहिती मिळत होती. ‘अशोक चव्हाणांचे कॉंग्रेसने पुनर्वसन केल्याने नांदेडकर खुश असतील ना?’ असे विचारल्यावर त्याने ‘मुडद्याला सफारी घालून काही उपयोग आहे का साहेब?’ असा प्रतिप्रश्‍न करून आमची बोलती बंद केली.
मराठवाड्याचेच नव्हे तर साहित्य क्षेत्राचे वैभव असलेल्या ज्ञानयोगी तत्त्वचिंतक प्रा. शेषराव मोरे सरांच्या घरी झालेल्या गप्पा अविस्मरणीय आहेत. त्याविषयी लवकरच एक वेगळा लेख लिहितो. सावरकर, आंबेडकर, टिळक, आगरकर, गांधी, जिना अशा असंख्य विषयांवर सरांनी इतकी तर्कसुसंगत मांडणी केली की अवाकच झालो. त्यांचा पाहुणचार घेऊन आम्ही कळमनुरीला नरेंद्र नाईक यांच्या निवासस्थानी पोहोचलो.
त्याठिकाणी कळमनुरी, हिंगोली परिसरातील साहित्यिक, कवी आमची वाटच पाहत बसले होते. त्यांच्याकडे प्रथम ग्रंथपूजन केले. साहित्यविषयक चर्चा केली. मराठवाडा मुक्ती दिनाविषयी जास्तीत जास्त लिहिण्याचे आवाहन केले. या लढ्याचे अभ्यासक असलेल्या विजय वाकडे काकांनी लगेच आम्हाला या विषयावरील एक दुर्मिळ ग्रंथ दिला. नरेंद्र नाईक, कवी शफी बोल्डेकर, कवी राजाराम बनसोडे, डॉ. रमेश पाईकराव, गजानन थळपते, धनंजय मुुळे, कलानंद जाधव, शीलवंत वाढवे आदींनी भेट घेतली, अंकाची वर्गणी भरली. नरेंद्र नाईक यांच्या आग्रहाने पुन्हा त्यांच्या घरी ‘सक्ती’ने जेवावे लागले. गुडीपाडव्याच्या दिवशी मराठवाड्यातील या माझ्या बांधवांकडून मिळणार्‍या प्रतिसादाने, त्यांच्या निर्व्याज प्रेमाने शब्दशः भाराऊन गेलो. नरेंद्र नाईक हे चिकित्सक वृत्तीचे कवी, लेखक, कादंबरीकार आहेत. ‘चपराक’च्या विस्तारासाठी त्यांनी स्वतःहून घेतलेला पुढाकार हे आमचे मोठे यश आहे.नरेंद्र नाईक यांनी केलेला सत्कार
तिथून आम्ही हिंगोली मार्गे परभणीला पोहोचलो. तिथे संतोष धारासुरकर आणि विजयराव जोशी यांनी दैनिक ‘दिलासा’चे पुनर्प्रकाशन सुरू केले आहे. त्यांच्या प्रथमांक सोहळ्यास हजेरी लावली. तिथे ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्यासह अनेकांशी गप्पा झाल्या. ‘दिलासा’च्या प्रथमांक सोहळ्याची मुख्य बातमी त्यांच्याकडे बसून लावून घेतली. शीर्षक दिले आणि बाहेर पडलो.
मराठवाड्याच्या या आठवणी माझी श्रीमंती वृद्धिंगत करणार्‍या आहेत. जीवनात आनंद निर्माण करणार्‍या आहेत. ‘आपण कुठे आहोत, यापेक्षा कुठून आलोय याला जास्त महत्त्व असते’ असे म्हणतात. मराठवाड्याच्या मातीशी जोडलेली नाळ हे माझे खरे वैभव आहे. या मातीनेच माझ्या आयुष्याचे सोने केले आहे आणि त्यामुळेच मी स्वतःला धन्य समजतो. पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत चांगल्याला चांगले म्हणणारे आहेत, त्यामुळे उत्साह द्विगुणीत होतो. ‘मराठवाड्यातून मिळवले आणि पुण्यात टिकवले’ अशी काहीसी माझी गत आहे.
आठवणींचा हा मृद्गंध असाच दरवळत रहावा आणि ‘चपराक’च्या व्यासपीठावर सामान्य माणसाचा आवाज आणखी बुलंद व्हावा, यासाठी माझे आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांचे प्रामाणिक प्रयत्न असतील!
नरेंद्र नाईक यांच्याकडून सत्कार स्वीकारताना


- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२




Monday, March 16, 2015

चकटफूंना चपराक!


 घुमान येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण दूरदर्शन आणि आकाशवाणीने मोफत करावे, अशी मागणी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार घेताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘साहित्य संमेलनाची फुकटेगिरी बंद करा’ असा योग्य सल्ला दिला आहे. यावरून साहित्य क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया येत असतानाच सांस्कृतिक मंत्र्यांनी घुमजाव करत ‘घुमानजाव’चा नारा दिला आहे आणि दूरदर्शनच्या अधिकार्‍यांशी यासंदर्भात बोलणे सुरू असल्याचे सांगितले आहे. असे जरी असले तरी तावडेंच्या तावडीतून ही फुकटेगिरी सुटली नाही, याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. ही फुकटेगिरी केवळ मोफत प्रसारणापुरती नाही तर यांच्या कामकाजात आणि वृत्तीत अनेक ठिकाणी ठळकपणे अधोरेखित होते. 
संत नामदेवांची कर्मभूमी असल्याने घुमानला साहित्य संमेलन झाल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका ‘चपराक’ने सुरूवातीपासून घेतली आहे. मात्र या संमेलनाच्या निमित्ताने केवळ ‘पिकनिक टूर’ करता येईल, इतक्या संकोचित भूमिकेतून अनेकजण या संमेलनाकडे पाहत आहेत. राज्य सरकारकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी पंचवीस लाख रूपये देण्यात येतात. शिवाय आयोजक संस्था त्यांच्या कुवतीप्रमाणे मोठा निधी उभा करते. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी यापूर्वीच प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. पंजाब सरकारनेही पुढाकार घेऊन या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबिले आहे. असे असताना महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा प्रसिद्धीचा सोस काही सुटत नाही. सरकारकडून सर्वकाही फुकटात मिळावे ही वृत्ती अत्यंत घातक आहे.
य. दि. फडके हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना बेळगावला एस. टी. बसने, स्वतःच्या खर्चाने गेले होते. हा इतिहास दुर्लक्षून साहित्य परिषद, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी सर्वकाही फुकटात कसे मिळेल यासाठी धडपडताना दिसतात. विमान प्रवासाचा हट्ट असेल किंवा मोफत प्रसारणाची मागणी असेल. प्रत्येक वेळी या लोकाच्या मनाचे भिकारपण दिसून येते.
आज महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललाय. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय. रोज विविध भागातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. असे सारे असताना आपण सरकारी तिजोरीवर डोळा ठेऊन स्वतःची हौसमौज पुरी करून घेणे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे. खरेतर यावेळी साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून संमेलनाला जाणे अपेक्षित होते. मात्र हे कर्मदरिद्री लोक केवळ तीन हजार रूपये प्रतिनिधी शूल्क असूनही हे रेल्वेने येणार नाहीत. त्यांना सरकारच्या, आयोजकांच्या खर्चातून विमानसेवा हवी. स्वयंसेवक आणि इतर अनेक निमित्तानेही रेल्वेत फुकट्यांचा सुळसुळाट असणार आहे. संत नामदेवांच्या नावावर सहानुभूती मिळवत कोणी सरकारला गाळात घालण्याचे धंदे करीत असेल, तर ते हाणून पाडायला हवेत.
दुष्काळ, गारपीट आणि नापिकी यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालाय. सरकारकडून त्यांना यथायोग्य मदत मिळतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका श्रीकृष्ण फडणवीस यांची चंद्रपूर जिल्ह्यात मूल आणि कोसंबी येथे शेती आहे. यंदाच्या नापिकीचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र यांचे ज्येष्ठ बंधू आशिष आणि काका बाळासाहेब तथा श्रीकृष्ण यांनाही बसलाय. गारपिटीने त्यांच्या शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याच्या पिकाची नासाडी झाली. शेतकर्‍यांना मिळणारी शासकीय मदत मुख्यमंत्र्यांचे ज्येष्ठ बंधू आणि काका यांच्याही बँक खात्यात जमा झाली. मात्र ‘आपण सधन शेतकरी असून ही मदत अन्य गरीब शेतकर्‍यांना देण्यात यावी’ असे म्हणत त्यांनी मूलच्या तहसीलदाराकडे हे पैसे धनादेशाद्वारे परत केले. याला म्हणतात नैतिकता! साहित्य आणि संस्कृतीच्या गप्पा मारणार्‍यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. केवळ तीन पाच हजार रूपयांसाठी आयोजकांवर आणि सरकारवर अवलंबून राहणार्‍या या टीनपाटांनी आपल्या मनाचा कोतेपणा सोडावा आणि पदरच्या पैशाने या साहित्योत्सवात सहभागी व्हावे.
साहित्य संमेलनाच्या नावावर ही ‘नाटक कंपनी’ वाटेल ते उद्योग करत आहे. श्री. पु. भागवतासारखा प्रकाशक साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झाला होता, हा इतिहास विसरून प्रकाशक परिषदेने सुरूवातीला घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला. ‘चपराक’सारख्या काही संस्थांनी आणि अस्सल साहित्य रसिकांनी हा बहिष्कार फेटाळून लावला. ज्या अरूण जाखडे यांनी प्रकाशक परिषदेच्या वतीने आवेशात भाषणबाजी केली आणि प्रकाशक परिषदेच्या वतीने बहिष्काराची आवई दिली तेच आज घुमानमधील साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळाची ही ‘नाटक कंपनी’ तर नाही ना? अशी शंका येण्यासही वाव आहे.
आजवरचा इतिहास पाहता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पवार कुटुंबीयांचे योगदान मोठे राहिले आहे. दरवेळी पवारांचेच कोणीतरी बगलबच्चे या संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घ्यायचे. मात्र यावेळी सत्तेचे फासे उलटे पडले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची वृत्ती दाखवून देत माधवी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे (लोगो)े अनावरण केले. उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे मराठी माणसाचा पुळका येणारे घटक आहेत. त्यांना विनंती केली असती तर ते पुण्यात साहित्य महामंडळाच्या कार्यालयात नक्की आले असते. मात्र कायम लाचारीचे दर्शन घडवणार्‍यांनी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवले. त्यानंतर नितीन गडकरींनी स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि यांच्या जीवात जीव आला.
सुरूवातीला शे-पाचशे लोक तरी या संमेलनाला येतील की नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र ‘चपराक’ सारख्या संस्थांचा कृतीशील पाठिंबा बघून आठ ते दहा हजार साहित्य रसिक संमेलनाला येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. असे सारे पोषक वातावरण असताना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना तुम्हाला ‘फुकटेगिरी बंद करा’ असे सांगण्याची वेळ येत असेल तर तुम्ही मराठी माणसाचे नाक कापले आहे. तुमच्या करणीमुळे पदरचे पैसे टाकून येणारे साहित्य रसिक बदनाम होत आहेत.
‘चपराक’ परिवाराचे बारा सदस्य स्वतःचे पैसे टाकून या संमेलनास उपस्थित राहत आहेत. ते कुणापुढेही मिंधे नाहीत. पत्रकार म्हणून किंवा स्वयंसेवक म्हणून चार टाळकी घुसडण्याचा उद्योग आम्ही केला नाही. नेमके याच ठिकाणी चकटफू वृत्ती दाखवून देत महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या साहित्योत्सवाला गालबोट लावले आहे. अशा करंट्या आणि कंजुष, चकटफू वृत्तीला चपराक देण्याचे दखलपात्र कार्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केले आहे. त्यातून काहीतरी बोध घेऊन या बेशरमांनी आपली उरली सुरली लाज राखावी, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक "चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Monday, March 9, 2015

स्त्री-पुरुष भेद अमंगळ!


कालच जागतिक महिला दिन झाला. प्रत्येक दिवसाप्रमाणे हा दिवसही ‘साजरा’ करण्याची पद्धत रूढ होऊ पाहत आहे. महिलांच्या आरोग्य शिबिरापासून ते चर्चासत्र, व्याख्याने, पुरस्कार सोहळे असे कार्यक्रम या निमित्ताने पार पडतात. आज बर्‍याच ठिकाणी स्त्री सन्मानाचे चित्र रंगवले जात असले तरी महिला या ‘दीन’च असल्याचे चित्र दुर्दैवाने पहायला मिळते. एकीकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते  देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत, राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेल्याचे वास्तव असताना दुसरीकडे मात्र गावागावात, वस्त्यांवस्त्यांवर महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे.
यंदाच्या महिला दिनाच्या पार्श्‍वभूमिवर दोन घटना प्रामुख्याने चर्चेत आल्या. पहिली म्हणजे, दिल्लीतील निर्भयाच्या बलात्कार प्रकरणात जो आरोपी आहे त्याची बीबीसीने तिहार तुरूंगात जाऊन मुलाखत घेतली. त्याबदल्यात त्याला चाळीस हजार रूपयेही दिले. स्त्रियांनी कसे कपडे घालावेत, येथपासूनची मुक्ताफळे त्याने उधळली आणि आपण किती ‘दिव्य ज्ञान’ लोकापर्यंत पोहोचवतोय या आविर्भावात बीबीसीने ते प्रेक्षकापर्यंत आणले. ‘चेहराच खराब असेल तर आरशाला दोष देण्यात अर्थ नाही’ असा युक्तीवादही त्यावर काहींनी केला; मात्र कवडीचीही नैतिकता शिल्लक नसलेल्या प्रसारमाध्यमांचे हे हिडीस आणि ओंगळवाणे रूप आहे. आसारामसारख्या भोंदूने किंवा तरूण तेजपालसारख्या लिंगपिसाटाने चारित्र्यावर प्रवचने झोडणे जितके हास्यास्पद आहे तितकेच प्रसारमाध्यमांनी ‘आपण फक्त सत्य समोर आणतोय’ असे म्हणणे हास्यास्पद आहे. समाजाला ज्ञान देणे, मार्गदर्शन करणे, त्यांचे रंजन करणे ही वृत्तपत्रांची उद्दिष्टे केव्हाच मागे पडलीत आणि त्यांना ‘धंदेवाईक’ रूप आलेय. त्यामुळे अशा माध्यमांनी आपण समाजमन कसे घडवतोय, याचा डांगोरा पिटणे म्हणजे ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ असा प्रकार आहे.
दुसरी घटना नागालँडमधील दिमापूर शहरातील आहे. येथील सईद फरिद खान या 35 वर्षाच्या नराधमाने एका महाविद्यालयीन युवतीवर धमकावून सातत्याने अत्याचार केले. तो दिमापूर जिल्हा तुरूंगात होता. तेथील जमावाने एकत्र येऊन सईदला आपल्या ताब्यात देण्याची मागणी तुरूंग प्रशासनाकडे केली. त्याला नकार मिळाल्याने जमावाने तुरूंगावर हल्लाबोल केला. पोलिसांनी त्यांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार केला पण त्यांचे काही चालले नाही. तेथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या चौकापर्यंत सईदला फरफटत नेऊन जाहीर फाशी द्यायची असा जमावाचा बेत होता. त्यांनी त्याला नग्न करून गाडीला अडकवले आणि फटकारत चौकापर्यंत नेले. मात्र त्याआधीच या माराने त्याचा मृत्यू झाला. जनक्षोभ उसळल्यानंतर काय होते याचे हे उदाहरण आहे.
गुन्हेगाराला ठेचून मारण्याच्या घटना यापुर्वीही आपल्याकडे घडल्या आहेत. 13 ऑगस्ट 2004 ला नागपूर जिल्हा न्यायालयात बलात्कार प्रकरणातीलच अक्कू यादव नावाच्या गुन्हेगारास संतप्त झालेल्या दोनशे महिलांनी एकत्र येऊन न्यायालयाच्या आवारातच मारले होते. त्याच्यावर लाल तिखट टाकून आणि दगडांचा मारा करून या रणरागिणींनी त्याला ठेचून काढले. बलात्काराचा आरोप सिद्ध होऊनही त्याला वेळेत शिक्षा होत नसल्याने या महिलांनी कायदा हातात घेतला. आपली न्यायप्रक्रिया संथ गतीने चालते आणि बर्‍याच प्रकरणात सत्य प्रभावीपणे मांडूनही न्याय मिळेलच याची खात्री नसल्याने महिला असे करायला धजावतात. ही टोकाची प्रतिक्रिया असली तरी हा उद्रेक आपण समजून घेतला पाहिजे. एखादी गोष्ट आपण जितकी दाबून ठेऊ तितकी ती उफाळून येणार, हे सर्वमान्य सत्य आहे. त्यामुळे महिला अत्याचारांचा अतिरेक झाल्याने भविष्यात अशा घटना वाढल्या तर आश्‍चर्य वाटायला नको!
पुरूषांची वाढत चाललेली विकृती आणि आधुनिकतेच्या, स्वातंत्र्याच्या नावावर स्त्रियांचा वाढलेला स्वैराचार या दोन्ही चिंतेच्या बाबी आहेत. जिथे पाच वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार होतो तिथे काय बोलावे? मोकाट जनावरातही अशी विकृत वासना नसते. आज भारतातील एकही शहर स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने योग्य नसेल तर हे आपले सर्वांचेच मोठे अपयश आहे. जिथे तिथे वखवखलेल्या नजरा! एखादे भुकेजलेले हिंस्त्र श्‍वापद शिकारीवर तुटून पडते तसे स्त्रियांना ओरबाडण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारेही यात मागे नाहीत. बायकोवरच्या ‘बलात्कारातून’च जन्माला येणारी ‘हायब्रिड’ पिढी पुढे स्त्रीकडे फक्त ‘मादी’म्हणूनच पाहते.
दुसरीकडे काही स्त्रियांही या प्रवृत्तीला खतपाणी घालताना दिसतात. फुटकळ आमिषाला, वैयक्तिक लाभाला बळी पडलेल्या स्त्रिया अशा घटनांच्या मोठ्या प्रमाणात शिकार होतात. ‘शरीर’ आणि ‘सौंदर्य’ या अनेकींच्या दृष्टिने त्यांच्या प्रगतीच्या पायर्‍या आहेत. ‘एकाच पुरूषासोबत अनेकवेळा झोपणे किंवा काही पुरूषांसोबत काहीवेळा झोपणे यात फरक तो काय? शेवटी आपली प्रगती महत्त्वाची नाही का?’ असा निर्लज्ज सवाल करणार्‍या काही करंट्या बायकाही आम्हाला भेटल्यात. त्यामुळे समाजात आज जे काही चालले आहे ते भविष्यात कोणत्या दिशेने जाणार याचा अंदाज बांधणेही अवघड आहे.
एकीकडे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळत नाही, त्यांच्यावर कायम अन्याय होतो, त्यांना नागवले-पिचवले जाते असे गळे काढायचे आणि दुसरीकडे स्त्रियांनी असे उद्योग करून समाजमन कलुषित करायचे याला काही अर्थ नाही. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही. स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा करताना ज्या दुर्बल आहेत त्यांच्या पाठिशी आपण उभे रहायला हवे. त्या स्वावलंबी होतील, कुटुंब आणि समाजात मानाने राहू शकतील, इतरांना दिशा देऊ शकतील, संस्काराची शिदोरी नव्या पिढीकढे हस्तांतरीत करू शकतील, असे पोषक वातावरण निर्माण व्हायला हवे. स्त्रियांकडे केवळ ‘भोगवस्तू’ म्हणून पाहणार्‍या, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणार्‍या पुरूषांना कठोर शासन व्हायला हवे. समाजमनावर वचक बसेल अशा जबर शिक्षा त्यांना न्यायव्यवस्थेने द्यायला हव्यात.
स्त्रीमुक्ती असेल किंवा पुरूषमुक्ती असेल! हे केवळ हवेचे बुडबुडे आहेत. आपण सध्या तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. ज्ञानाची, माहितीची कवाडे सर्वांसाठी खुली झालीत. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार संधी उपलब्ध झाल्यात. ग्रामीण भागातील ‘संधी’अभावी वंचित असलेले स्त्री-पुरूष आणि शहरी भागातील ‘अतिरेक’ करणारे स्त्री-पुरूष यांच्याकडे  आता लक्ष दिले पाहिजे. सर्व असूनही त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचले नाही असा वर्ग आणि सर्व असूनही त्याचा गैरवापरच करणारा वर्ग यातील फरक आपल्या ध्यानात आला तर बर्‍याचशा समस्या सुटतील. देशासमोर अनेक आव्हाने असताना किमान स्त्री-पुरूष असा भेद आता रोडावत जायला हवा. सर्वजण एकमेकांचा सन्मान उंचावत, निर्भयपणे जगतील अशी अपेक्षा बाळगूयात आणि ती पूर्णत्वास येईल यासाठी खारीचा वाटा उचलूयात!


- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Wednesday, March 4, 2015

साहित्याचं घुमान घोंगडं




येत्या एप्रिल महिन्यात पंजाब येथील घुमान या छोट्याशा गावात ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जे साहित्यिक मैदानात उतरले होते त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे यंदाचे संमेलन ‘वादाशिवाय’ पार पडण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी प्रकाशक परिषदेने घुमानच्या संमेलनावर बहिष्कार टाकला आणि नव्या वादाची ठिणगी पडली.
मराठी भाषा, मराठी संस्कृती हाच आत्मा असलेल्या ‘चपराक’ला प्रकाशक परिषदेची ही भूमिका मान्य होणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रकाशक परिषदेने संमेलनावर बहिष्कार टाकताच ‘चपराक’ने आपली अस्मिता दाखवून देत या संमेलनाला पाठिंबा दिला. प्रकाशक परिषदेने सुरूवातीला एल्गार करत ‘एकही मराठी प्रकाशक या संमेलनाला जाणार नाही’ अशी भूमिका घेतली. जे प्रकाशक परिषदेचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी काही निर्णय झाला तर एकवेळ मान्य करता येईल, मात्र ‘चपराक प्रकाशन’सारखे अनेक प्रकाशक कुणाशीही बांधील न राहता, मिंधे न राहता वेगळ्या वाटेने जात असतील तर त्यांच्यावर आचारसंहिता लादणारे हे कोण? त्यामुळेच ‘चपराक’ने ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आणि तिथे जर मराठी वाचक असतील तर आम्ही आमच्या सर्व सदस्यांसह तिथे आवर्जून जाणार’ अशी भूमिका घेतली.
घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी आहे. त्याकाळी एक मराठी संत पंजाबमध्ये गेला. त्याने आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा तिकडे फडकवला. इतकेच काय तर शीख बांधवांचा धर्मग्रंथ असलेल्या ‘गुरूग्रंथसाहिबात’ही संत नामदेवांना स्थान मिळाले. असे सारे असताना इतक्या शतकांनी जर पुन्हा मराठी माणसाला पंजाबला सन्मानाने जाण्याची संधी मिळत असेल तर यापेक्षा मोठा आनंद तो कोणता? मात्र काही कर्मदरिद्री लोकाना धंद्यापुढे कधीही धर्म दिसत नाही. प्रत्येकवेळी केवळ धंदाच करायचे ठरवले तर मराठी भाषा वृद्धिंगत करण्यात आपण हातभार लावतोय, असा डांगोरा पिटण्याचा अधिकार यांच्याकडे राहतो का? म्हणूनच ‘चपराक’ने कशाचीही पर्वा न करता ही रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिका घेतली.

माधवी वैद्यांच्या गळ्यातले ताईत? -


‘चपराक’च्या या भूमिकेनंतर प्रकाशनविश्‍व ढवळून निघाले. मराठी प्रकाशकांनी ‘ज्यांना जाण्याची इच्छा आहे, ज्यांना जाणे परवडते त्यांनी जावे’ अशी भूमिका घेतली असती तर ते रास्त ठरले असते. मात्र ‘एकही मराठी प्रकाशक साहित्य संमेलनाला जाणार नाही’ असे सांगण्याचा नैतिक अधिकार यांच्याकडे उरतो का? त्यामुळेच ‘चपराक’ने प्रवाहाविरूद्ध भूमिका घेत ही कोंडी फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. समाजमाध्यमाद्वारे ‘चपराक’ने आपली भूमिका जाहीर करताच सर्व प्रसिद्धीमाध्यमांनी त्याची योग्य ती दखल घेतली. त्यावेळी प्रकाशक परिषदेच्या अण्णा कुलकर्णी यांनी ‘माधवी वैद्य यांच्या गळ्यातले ताईत बनायला जाऊ नका’ असा सल्ला दिला.

सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर -


चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष ही आद्याक्षरे घेऊन एक प्रभावी वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि वाचनसंस्कृती वाढीस हातभार लावणारी पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून ‘चपराक’चा लौकीक आहे. ‘सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर’ हे आमच्या संस्थेचे मूलतत्त्व आहे. साहित्य परिषद, साहित्य महामंडळ किंवा अन्य कोणत्याही संस्था, संघटनांना, राजकीय पक्षांना ‘चपराक’ने कधी भीक घातली नाही. ‘संवाद आणि संघर्ष’ ही भूमिका घेऊन कार्यरत असताना जे चांगले ते आम्ही स्वीकारले आणि जे वाईट ते अव्हेरले. डॉ. माधवी वैद्य यांच्यावर आम्ही अनेकवेळा तोफगोळे फेकले आहेत. मात्र घुमानबाबत त्यांची भूमिका योग्य वाटल्याने ‘चपराक’ने त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. येथे त्यांच्या गळ्यातला ताईत बनण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? ‘चपराक’ साहित्य, संस्कृती, राजकारण अशा सर्व क्षेत्रात नेकीने कार्यरत आहे, पुढेही राहील. अण्णा कुलकर्णी ज्येष्ठ प्रकाशक आहेत. योगायोगाने तेही मराठवाड्यातले आहेत. त्यामुळे मराठवाडी माणसाला आपल्या कर्तव्यापुढे बाकी कशाचीही फिकीर नसते, हे काय आम्ही त्यांना सांगावे?


‘मी मराठी’वर येण्याचे निमंत्रण -

प्रकाशकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकल्याची बातमी येताच मराठीतील काही लोकानी प्रकाशन क्षेत्र बदनाम करण्यास सुरूवात केले. सर्वच प्रकाशक पैशाच्या मागे लागले असून ते आपले तुंबडे भरण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र प्रकाशक परिषदेने बहिष्कार टाकताच ‘चपराक’ने क्षणाचाही विलंब न करता ‘आम्ही संमेलनाला जाणार व तिथे पुस्तकेही विकणार’ अशी भूमिका घेतली. ही भूमिका योग्य वाटल्याने ‘सकाळ’, बेळगाव ‘तरूण भारत’, ‘केसरी’, ‘नवभारत’ अशा मान्यवर वृत्तपत्रांनी ‘चपराक’चा आवाज सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. त्याचवेळी ‘मी मराठी’ या वृत्तवाहिनीने आमचा ‘फोनो’ घेऊन ‘चपराक प्रकाशन घुमानला जाणार, प्रकाशक परिषदेच्या निर्णयाला विरोध’ अशी बातमी चालवली. सर्व माध्यमातून ‘चपराक’ची भूमिका वाचकांपर्यंत पोहोचल्याने प्रकाशक परिषदेत असलेली चार टाळकीभडकली. याचवेळी ‘मी मराठी’ने या विषयावर स्वतंत्र कार्यक्रम ठेवला. घुमानला जाणार, अशी भूमिका तोपर्यंत केवळ ‘चपराक’ने घेतली होती. त्यामुळे त्यांच्या ‘पॉईंट ब्लँक’ या कार्यक्रमातील चर्चासत्रात सहभागी होण्याची विनंती ‘मी मराठी’या वाहिनीने केली. त्यासंदर्भात त्यांनी निमंत्रण देऊन पुण्याच्या स्वारगेट येथील स्टुडिओत रात्री येण्यास सांगितले.

‘मी मराठी’ची दुटप्पी भूमिका -


असे निमंत्रण देऊन पाहुणे ठरल्यानंतर त्यात फारसा बदल होत नाही. दरम्यान ही बातमी इतर पाहुण्यांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात पोहोचल्याने ‘प्रकाशक परिषदेबाबत कठोर भूमिका घेऊ नका’ अशा काही सूचना आमच्याकडे येत होत्या. मात्र आम्ही आमच्या विचारावर ठाम होतो. अचानक संध्याकाळी पाचच्या सुमारास ‘मी मराठी’च्या मुंबई कार्यालयातून दूरध्वनी आला आणि ‘काही तांत्रिक कारणामुळे आजचा हा कार्यक्रम रद्द झाला आहे’ असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात ठरलेल्या वेळी हा कार्यक्रम प्रसारित झाला आणि त्यात सर्वांनीच गुळगुळीत भूमिका घेतली. स्वतःच निमंत्रण देऊन, एखाद्याची भूमिका दाबण्यासाठी असे वागणे हे दृकश्राव्य माध्यमातील संकेतांना धरून नव्हते. मात्र काळ बदललाय म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केले.

तर निखिल वागळेंची पुस्तके कोण खपवणार? -


या कार्यक्रमानंतर पुण्यातील एका मात्तबर विक्रेत्याने आम्हाला आवर्जून कळवले की, ‘‘तुम्ही प्रकाशक परिषदेविरूद्ध भूमिका घेतल्याने आम्ही ठरवून तुमचे नाव चर्चासत्रातून वगळले. या कार्यक्रमाचे निवेदक असलेले निखिल वागळे हे आमच्या शब्दाबाहेर नाहीत. जर त्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही तर त्यांची पुस्तके कोण खपवणार? त्यांच्या निर्भिड आणि निःपक्ष पत्रकारितेच्या गप्पा फक्त स्टुडिओत असतात. शेवटी ही यंत्रणा सांभाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते, हे ध्यानात ठेवा.’’

साम टीव्ही आणि ‘सकाळ’ने केलेले सहकार्य -


प्रकाशकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे क्षेत्र बदनाम होऊ नये, अशी आमची आंतरिक ईच्छा होती. त्यामुळे याच दरम्यान  आम्ही समाजमाध्यमाद्वारे ‘घुमानला जाऊ चला’ अशी चळवळ सुरू केली होती. अनेक वाचक, लेखकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. ‘महाराष्ट्राबाहेरील मराठी वाचकांना आपण आणखी कितीकाळ गृहीत धरणार नाही?’ याचा विचार करण्यास आम्ही भाग पाडले. त्याचवेळी मुंबई ‘सकाळ’च्या श्रद्धा पेडणेकर यांनी आमची ही भूमिका ‘सकाळ’च्या माध्यमातून राज्यभर प्रभावीपणे पोहोचवली होती. ती वाचून पुण्यातील ‘साम टीव्ही’ची बातमीदार स्नेहल कांबळे आमच्याकडे आली आणि ‘चपराक’ कार्यालयात येऊन तिने आमची आणि आमच्या सहकार्‍यांची प्रतिक्रिया नेली. त्यावर एक विशेष कार्यक्रमही केला. विविध माध्यमाद्वारे आमचा आवाज एव्हाना मराठी वाचकांपर्यंत पोहोचल्याने प्रकाशक परिषदेचे बुडबुडे फुटले होते.

प्रकाशक परिषदेचा बहिष्कार मागे -


घुमानवरून प्रकाशक परिषदेत फूट पडल्याचे वृत्त आमचा संदर्भ देत काही वृत्तपत्रांनी दिले. मात्र आम्ही इथे नम्रपणे नमूद करू इच्छितो की, ‘चपराक’ची भूमिका ‘एकला चलो रे’ ची आहे. आम्ही कोणत्याही प्रकाशक परिषदेचे अजून तरी सदस्य नाही. (होय, ‘कोणत्याहीच. कारण प्रकाशक परिषदही एकच नाही. प्रत्येकाचे वेगळे कळप.’) असो. आमच्या या भूमिकेनंतर प्रकाशक परिषद आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांत काही चर्चा झाली आणि प्रकाशक परिषदेने सकारात्मक चर्चा करून बहिष्कार मागे घेतला असल्याचे प्रकाशक परिषदेचे पदाधिकारी आणि ‘पद्मगंधा’चे मालक अरूण जाखडे यांनी जाहीर केले. त्यानंतर काही वृत्तपत्रांनी आपणच प्रकाशक परिषद आणि महामंडळात समेट घडवून आणली, अशा बातम्याही दिल्या.

किमान दहा मराठी कुटुंब असलेल्या गावात संमेलन व्हावे -


हा बहिष्कार मागे घेताना ‘किमान दहा मराठी कुटुंबे असलेल्या गावात यापुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे आणि विभागीय साहित्य संमेलने व ग्रंथ प्रदर्शन भरविण्यास महामंडळाने सहकार्य करावे अशी मागणी केली असून ती मंजुर झाल्याने हा बहिष्कार मागे घेत आहोत’, असे जाखडे यांनी पत्रकारांना सांगितले. प्रकाशक परिषदेच्या बहिष्कारानंतरही राज्यभरातील अनेक प्रकाशक संमेलनाला जाणार, असे चित्र तोपर्यंत निर्माण झाले होते आणि त्यामुळेच प्रकाशक परिषदेला अशी नरमाईची भूमिका घ्यावी लागली.

मुंबईत ग्रंथप्रदर्शन -


दरम्यान ‘घुमानला येणार नाही’ असे राणा भीमदेवी थाटात जाहीर केल्यानंतर प्रकाशक परिषदेने घुमानच्या निर्णयाला विरोध म्हणून मुंबईत पुस्तक प्रदर्शन भरवले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्यासारख्या मान्यवर लेखकांचे तिथे कार्यक्रम घेऊन चांगली गर्दी जमवली आणि गल्लाही भरून घेतला. हे प्रदर्शन संपताच आपली भूमिका बदलत प्रकाशक परिषदेने घुमानला ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, आमची त्यांच्यावर बंधने नाहीत, ही सांमजस्याची भूमिका घेतली.

संमेलनाच्या पार्श्‍वभूमिवर बारा पुस्तके -


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान होत असल्याने ‘चपराक’ने पुण्यात साहित्य महोत्सव घेतला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार विनायक लिमये, कादंबरीकार उमेश सणस उपस्थित होते. यात सदानंद भणगे, संजय वाघ, चंद्रलेखा बेलसरे, प्रभाकर तुंगार, सागर सुरवसे, हणमंत कुराडे, विनोद श्रा. पंचभाई, माधव गिर, संदिपान पवार, प्रभाकर चव्हाण, शांताराम हिवराळे यांच्या पुस्तकांसह आमच्या झुळूक आणि झळा या अग्रलेख संग्रहाचेही प्रकाशन केले. मराठी लेखक सातासमुद्रापार पोहोचावेत यासाठी ‘चपराक’ने सुरुवातीपासूनच विशेष प्रयत्न केले आहेत. साने गुरुजी यांची ‘आंतरभारती’ची संकल्पना घुमान येथील 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे, असे आम्हांस वाटते. ‘चपराक’च्या साहित्य महोत्सवात बाबासाहेब पुरंदर यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे या सर्व साहित्यिकांसाठी पर्वणीच होती. आपली पुस्तके घुमानला जाणार याचे समाधान या सर्व लेखक आणि कविंच्या चेहर्‍यावर दिसत होते. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविणे ही आमची साहित्यिक जबाबदारी आहे.

‘चपराक’ची पुस्तके घुमानलाच विका;

काही विक्रेत्यांची मगु्ररी -

प्रकाशक परिषदेची अरेरावी मोडीत काढल्याने काही विक्रेत्यांनी ‘चपराक’ची पुस्तके विकणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ‘तुम्ही घुमानला जाणार आहात, तिकडे तुम्हाला वाचक मिळतील. आमच्याकडे आधीचीच कोट्यवधी रूपयांची पुस्तके विक्रीअभावी पडून आहेत, तुम्ही घुमानलाच पुस्तके विका...’ असे काही धंदेवाईक विक्रेत्यांनी आम्हास कळवले. मात्र ‘सामान्य वाचकांची शक्ती हीच सर्वोच्च शक्ती’ यावर आमची श्रद्धा असल्याने आम्ही त्यांना भीक घातली नाही, किंवा किंचितही डगमगलो नाही. उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणे, मराठीतील नवनवे लेखक प्रकाशात आणणे हे आमचे व्रत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यात खंड पडू देणार नाही.

पंजाबमध्ये साहित्यिक वातावरण नाही -


भारतातील विविध शहरात उत्तम सांस्कृतिक वातावरण आहे. मात्र देशाचा विचार करता, पंजाब साहित्याच्या बाबत सर्वात मागासलेले राज्य आहे, असा अपप्रचार काही नतद्रष्ट मंडळी करत आहेत. अमृता प्रीतम यांच्यासारखी ज्ञानपीठ विजेती कवयित्री जिथे होऊन गेली त्यांना ‘साहित्यिक मागासलेपण’ म्हणून कसे हिणवता येईल? संत नामदेवांनी आपल्या विद्वत्तेचा प्रभाव ज्या भूमिवर पाडलाय ती मागासलेली असूच शकत नाही. उलट पंजाब ही शूरांची भूमी आहे. भारतीय सैन्यदलात पंजाबी बांधवाचे प्रमाण मोठे आहे. पंजाबी बांधव हे शूर तर आहेतच पण स्वाभिमानीही आहेत. एकही शीख बांधव तुम्हाला कधी भीक मागताना दिसणार नाही. इतकेच काय, नोेकरी करणारा शीख बांधवही तुम्हाला अभावानेच सापडेल. शौर्य आणि स्वाभिमानाची पंरपरा जपणार्‍या या लोकाकडून उद्यमशीलतेचे हे संस्कार घेण्याऐवजी आपण त्यांची ‘मागासलेले’ म्हणून चेष्टा करत असू तर तो दोष आपला आहे. ‘विद्वत्तेचा ठेका’ हा कुण्या एका जातीकडे, एका धर्माकडे, एका प्रांताकडेच आहे, असा जर कुणाचा ग्रह झाला असेल तर त्या कपाळकरंट्यांचा विचार करण्याची गरज नाही.

संमेलनाध्यक्षांची आणि महामंडळाची भूमिका -


भालचंद्र नेमाडे नावाच्या एका लेखकाने ‘साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग’ अशी दर्पोक्ती केल्यानंतर आम्ही ‘नेमाडेंचा बेेगडी नेम’ या अग्रलेखाद्वारे त्यांचा समाचार घेतला. त्यावेळी अनेकांनी दूरध्वनीद्वारे आमचे कौतुक केले. मात्र वैयक्तिक हितसंबंधामुळे कोणीही आमच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला नाही. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील सर्वच दिग्गज मुगाचे अख्खे पोते गिळून गप्प बसले. किंबहुना ‘चपराक’ने घुमानबाबत धाडसी भूमिका घेऊनही  संमेलनाध्यक्ष, साहित्य परिषद, साहित्य महामंडळ किंवा आयोजक यांच्यापैकी कोणीही त्याची दखल घेतली नाही. आमच्या भूमिकेचे राजकारण करणार्‍यांनी प्रकाशक परिषदेचा बहिष्कार मोडून काढला मात्र त्यासंदर्भात साधा दूरध्वनीही आम्हास केला नाही. घुमानसाठी पुस्तक विक्री गाळा आरक्षित करायला गेल्यानंतर मात्र महामंडळाच्या कार्यालयात डॉ. माधवी वैद्य भेटल्या. त्यावेळी निमित्त म्हणून त्यांनी ‘तुमची भूमिका ऍप्रिसिएट केली,’ असे मोघमपणे सांगितले.

आता सगळेच ढोल पिटत आहेत -


‘चपराक’ने घुमानला जाण्यासाठी वातावरण निर्मिती केली. ‘चपराक’परिवाराचे सर्व सदस्य पदरचे पैसे टाकून घुमानला जात आहेत. वाचकांनीही या संमेलनात सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन आम्ही सुरूवातीपासून केले आहे. त्याचा परिणाम घुमानला येणार्‍या साहित्य रसिकांच्या नोंदणीवरून येतच आहे. आयोजक, महामंडळ, संमेलनाध्यक्ष आता मात्र नेमाडेंच्या भूमिकेविरूद्ध बोलत आहेत. घुमानला चला, असे आवाहन करत आहेत. त्याला किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हेही सांगत आहेत.

घुमानला पायी गेलो असतो -  द. भि. -


घुमानच्या पार्श्‍वभूमिवर माजी संमेलनाध्यक्षांचा एक कार्यक्रम झाला. त्यात पुण्यातील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्यांनी पार पाडले ते ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणाले की, ‘‘आता मी वयाने ऐंशीच्या घरात आलोय. जर मी अठरा वर्षाचा असतो तर पुण्याहून घुमानपर्यंत साहित्यप्रेमींची दिंडी घेऊन पायी गेलो असतो. संत नामदेवांना वंदन करण्यासाठी ‘नामा आकाशाएवढा’ हे सर्वांना कळण्यासाठी मराठी रसिकांनी, वाचकांनी घुमानला अवश्य जायला हवे.’’ या संमेलनाच्या अध्यक्षपदी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. डॉ. सदानंद मोरे हे असून हा दुग्धशर्करा योग आहे, साहित्यप्रेमींनी या साहित्योत्सवात सहभागी होऊन मराठीची अस्मिता उंचवावी, असेही दभिंनी सांगितले.

‘चपराक’ साहित्यक्षेत्रात नवे मानदंड तयार करणार -


‘चपराक’ने वेळोवेळी स्पष्ट, परखड भूमिका घेत विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना सणसणीत चपराक देण्याचे काम केले आहे. प्रस्थापित प्रकाशक ज्यांना जवळपासही फिरकू देत नाहीत अशा अनेक लेखकांचे दर्जेदार साहित्य ‘चपराक’ने प्रकाशित केले आहे. हा वारसा आम्ही प्राणपणाने जपू! माय मराठीची सेवा करण्यात आम्ही खारीचा वाटा नक्की उचलू! कुणाचीही भिडभाड न बाळगता, कशाचीही तमा न बाळगता ‘चपराक’ अविरत कार्यरत राहील, हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, न आवरण्याएवढी लेखनाची ऊर्मि आहे, त्यांच्यासाठी ‘चपराक’ हे हक्काचे व्यासपीठ आहे. कसल्याही राजकारणाला बळी न पडता, मनात न्यूनगंड न बाळगता, कसदार लिहिणार्‍यांनी ‘चपराक’शी संपर्क साधावा.


घुमानला जाऊ चला! -


जवळपास सात हजार मराठी बांधव घुमानला येत असल्याचे आयोजकांनी नुकतेच सांगितले आहे. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे जाणे हे आपले आद्य सांस्कृतिक कर्तव्य आहे. रोजच्या जीवनाचे रहाटगाडे चालूच असते. मात्र आपल्यापासून दुरावत चाललेल्या अन्य प्रांतातील मराठी बांधवांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांना साहित्याच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी सर्वांनी घुमानच्या संमेलनात सहभागी व्हावे. तेथील मराठी बांधवांशी संपर्क साधावा. ज्या पंजाबी बांधवांनी त्याकाळात संत नामदेवांना त्यांच्यात सामावून घेतले, त्यांना देवाचा दर्जा दिला, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे ‘चपराक’चे सर्व सदस्य या साहित्योत्सवात सहभागी होत आहेत. परप्रांतातील या संमेलनाला प्रारंभी जो विरोध होत होता तो आता मावळला आहे. हे भिजतं घोंगडं आता वाळलं आहे. ‘विचार अन् पुस्तकं घेऊ द्या की रं, मला बी घुमानला येऊ द्या की रं’ असं म्हणतं अनेक साहित्यरसिक संमेलनात सहभागी होत आहेत. आपणही घुमानला नक्की भेटूया! तोपर्यंत जय हरी!!


Sunday, March 1, 2015

त्यांना आवरा; यांना सावरा!


एक माणूस सोफ्यावर बसून बायकोला विचारतो की, आज कोणती भाजी केलीय? बायको, काहीच उत्तर देत नाही म्हणून आणखी जवळ जाऊन विचारतो. तरीही प्रतिसाद शून्य. असे करत शेवटी तिच्या अगदी मागे उभा राहतो. बायकोची त्याला चिंता वाटायला लागते. तिला श्रवणयंत्र घेऊन द्यायला हवे, असा विचार करत अगदी जवळ जाऊन पुन्हा विचारतो, ‘‘आज भाजी कुठली केली?’’ तेव्हा बायको त्याच्यावर खेकसते, ‘‘मी तीनवेळा सांगितले की, आज भरलेल्या वांग्याची भाजी केलीय. हाच प्रश्‍न कितीवेळा विचारताय?’’ तेव्हा त्याला लक्षात येते की, श्रवणयंत्राची गरज बायकोला नाही तर आपल्या स्वत:लाच आहे.
महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचेही असेच काहीसे सुरू आहे. भाजपवाले शिवसेनेवर वाट्टेल तसे तोंडसुख घेत आहेत. ‘‘सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना सत्ताधारी आहे की विरोधी?’’ असा खुळचट सवाल राज्याचे कृषीमंत्री असलेल्या एकनाथ खडसे नावाच्या नेत्याने विचारला आहे. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे की विरोधी हे जनतेपुढे मांडण्याएवढे हे नेते निगरगट्ट झालेत. शिवसेनेच्या सहकार्यानेच यशाची अनेक शिखरे भाजपने पादाक्रांत केली. प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शिवसेनेची ताकत माहिती आहे. म्हणूनच भू-संपादन विधेयकाबाबत शिवसेनेची समजूत काढावी यासाठी नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ’मातोश्री’वर शिष्टाई करण्यास पाठवले. गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काही सूचना स्वीकारून सेना-भाजपमधील तणाव निवळावा यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडे खडसे मात्र पक्षीय भूमिका विचारात न घेता सातत्याने सेनेवर तुटून पडत आहेत. 
भू-संपादन विधेयकाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. ‘वाट्टेल ते करून शेतकर्‍यांच्या जमिनी लाटण्याचा उद्योग चालू देणार नाही’ असे त्यांनी निक्षून सांंगितले आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी घेताना त्यांना जमिनीच्या किंमतीच्या चारपट रक्कम द्यावी, त्यासाठी सत्तर टक्केहून अधिक शेतकर्‍यांची संमती हवी, संबंधित प्रकल्प पाच वर्षात सुरू झाला नाही तर त्याला न्यायालयात जाता यायला हवे अशा त्यातल्या काही तरतुदी होत्या. मात्र या सर्व तरतुदी रद्द करून मोदी सरकार मनमानी कारभार करत आहे असा आक्षेप शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यासह देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी घेतला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी भूमिका घेऊन कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना सहकार्य करण्याची या सर्व प्रादेशिक पक्षांची मानसिकता आहे. तरीही खडसे यांच्यासारखे नेते आपल्या अहंकारापोटी दुधात खडे टाकून आपापसात वैतुष्ट्य निर्माण करत आहेत. कॉंग्रेसच्या कालावधीत अण्णा हजारेंनी उपोषण केल्यानंतर ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायच्या ते सर्वजण मात्र आज चिडीचूप आहेत. 
केंद्र सरकारने जमिनीचे व्यवहार ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बर्‍याच प्रमाणात भ्रष्टाचार आटोक्यात येईल. सातबारा उतारा आणि अन्य जीर्ण झालेल्या कागदपत्रांची डिजीटलायझेशन करण्याचे धाडसी पाऊलही मोदी सरकारने उचललेले आहे. विधायक दृष्टिकोनातून सुरू असलेल्या या कामाला बळ देण्याऐवजी भाजपातील अनेक नेते मात्र अकारण ‘तू तू-मै मै’ करीत आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या मोठ्या झटक्यानंतरही त्यातून काही शिकण्याची यांची वृत्ती दिसत नाही. अहंकाराने आणि न्यूनगंडाने पछाडलेली माणसे स्वत:ची आणि राष्ट्राचीही वाट लावतात. भाजपमधील अनेकांचा अहंकार टोकाला गेला आहे तर विरोधक सपाटून मार खाल्ल्याने न्यूनगंडातून सावरायला तयार नाहीत. हे सारे चित्र लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टिने घातक आणि तितकेच मारक आहे.
देश प्रगतीच्या दिशेने पाऊले टाकतोय असे वाटत असतानाच महाराष्ट्राची मात्र पुरती धुळधाण उडाली आहे. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे अशा नेत्यांचा अपवाद वगळता सत्ताधारी नेते फारसे गंभीर दिसत नाहीत. केवळ अपघाताने आणि कॉंग्रेसविरोधी लाटेने मिळालेल्या या संधीने ते बिथरले आहेत. पंतप्रधान या नात्याने मोदी उत्तमोत्तम निर्णय घेत असताना यांचा कलगीतुरा थांबायला तयार नाही. आर. आर. आबांच्या   अकाली निधनाने राष्ट्रवादी कॉंग्रेस हादरली आहे. राष्ट्रवादीतील स्वच्छ चारित्र्याचे आणि समाजमान्य नेतृत्व म्हणून आबांकडे पाहिले जायचेे. भुजबळ, अजित पवार, तटकरे, जितेंद्र आव्हाड, पद्मसिंह पाटील या नेत्यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यातून पक्षाला बाहेर काढणे आणि राष्ट्रवादीने जनहिताची भूमिका घेणे हा आता एक कल्पनेचाच भाग बनून गेलाय. 
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकतेचा उसना आव आणतेय. ‘जिथे अन्याय दिसेल तिथे लाथा मारा’ असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय. जनतेने अशा लाथा घालायच्या ठरवल्या तर मनसेला युपी-बिहारी लोकाप्रमाणे पळ काढावा लागेल. ‘‘आम्ही पुढे कशी वाटचाल करायची यासाठी आम्हाला कोणी बाळकडू देण्याची आवश्यकता नाही, कारण ते बाळासाहेबांच्या सोबत राहून मी प्रत्यक्ष अनुभवले आहे,’’ असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. अपयशातून, न्यूनगंडातून अशी दर्पोक्ती करणे स्वाभाविकच आहे. ‘‘निवडणुकीनंतर मी एकेकाची औकात दाखवतो’’ असे सांगणार्‍या राज यांचा गर्व अजूनही उतरलेला दिसत नाही. कोणत्याही परिस्थितीत मनसेची शिवसेनेशी तुलना होऊ शकत नाही, हे न कळण्याएवढे राज ठाकरे दुधखुळे नाहीत. पक्ष कार्यकर्त्यांत, नेत्यात, पदाधिकार्‍यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा यासाठी पक्षप्रमुखांनी धीरोदात्त भूमिका घ्यायलाच हवी. मात्र ते करताना इतरांचा द्वेष केल्यास काय होते ते भारतीय लोकशाहीत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदी यांना माझे खासदार पाठिंबा देतील’ असे सांगणार्‍या राज ठाकरे यांनी मोदींना तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात याचे भान ठेवा, असे सांगण्याचा अधिकार तरी उरतो का? ही नैतिकता तूर्तास तरी राज ठाकरे यांच्याजवळ दिसत नाही. 
मोदींच्या निमित्ताने मारवाडी, गुजराथ्यांवर आगपाखड करण्याऐवजी आपण आता व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी. विधायक आणि सकारात्मक निर्णयाचे मोठ्या मनाने स्वागत करायला हवे. या मातीतल्या पक्षांना बळकटी द्यायला हवी. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधणार्‍या नेत्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे. हे काम शिवसेनेशिवाय अन्य कुणी करताना दिसत नाही. शिवसेनेने त्यांचा स्वाभिमानी बाणा टिकवत, दूरदृष्टितून घेतलेले निर्णय राज्यहिताचे आहेत. आपल्या शहराच्या, राज्याच्या विकासासाठी यापुढे प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यायला हवा. तशी दक्षता घेतली गेली तर आणि तरच महाराष्ट्र देशापुढे काहीतरी वेगळा आदर्श निर्माण करू शकेल.  
- घनश्याम पाटील 

संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२
Follow Me : @EditorChaprak

Friday, February 27, 2015

लाभले आम्हास भाग्य...!


एक पंडित होता. त्याला अनेक भाषांचे उत्तम ज्ञान होते. तो ज्या भाषेत बोले तीच त्याची मातृभाषा वाटे. प्रत्येक भाषेवरील त्याचा व्यासंग अफाट होता. एकदा तो राजाच्या दरबारी आला. राजाने त्याच्या भाषाज्ञानामुळे त्याला मोठे इनाम दिले. मात्र पंडिताचा अहंकार वाढला होता. त्याने राजाला आव्हान दिले की, त्याच्या दरबारातील किंवा प्रजेतील कुणीही विद्वान असेल तर त्याने त्याची मातृभाषा ओळखावी. अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न करून बघितले. मात्र तो ती भाषा इतक्या सफाईदारपणे बोले की कुणालाही त्याची मातृभाषा कळली नाही. राजाने शेवटचा पर्याय म्हणून बिरबलाला निरोप धाडला. बिरबल आला. त्याने त्या पंडिताला विनम्रतेने नमस्कार केला आणि सांगितले की, ‘‘तुम्ही आमचे पाहुणे आहात. आज रात्री मुक्काम करा. उद्या आपण चर्चा करू.’’
बिरबलाने त्या पंडिताची सर्वप्रकारची व्यवस्था केली. त्याचा योग्य तो पाहुणचार केला. पंडितही त्यामुळे सुखावला. रात्री मिष्ठान्नाचे सेवन केल्यानंतर पंडित आलिशान गालिचावर झोपी गेला. तो झोपलेला असताना अचानक एक मोठा आवाज झाला. पंडित घाबरून उठला. त्याच्या निद्रेत व्यत्यय आल्याने बिरबलाने त्याची अंतःकरणपूर्वक माफी मागितली. 
दुसर्‍या दिवशी दरबारात प्रवेश करताच बिरबलाने ठामपणे सांगितले की हा पंडित कन्नड भाषक आहे. पंडितही अवाक् झाला. त्याची मातृभाषा आतापर्यंत कोणीही ओळखू शकले नव्हते. त्याने आपली मातृभाषा मान्य करत बिरबलाने ती कशी ओळखली हे विचारले. बिरबल म्हणाला, सोपे आहे. रात्री जेव्हा तुम्ही घाबरून उठलात तेव्हा तुम्ही कानडी भाषेमध्ये बोलत होतात. संकटाच्या काळी आपल्याला आपली मातृभाषाच आठवते.
भाषेविषयी जागृती करणारी, स्वाभिमान पेरणारी ही बालकथा अनेकांना माहिती असेल. मात्र आज काय परिस्थिती आहे? आपण आपल्या मातृभाषेतच बोलत नाही. मराठी बोलणे आपल्याला कमीपणाचे वाटते. खरेतर भारताला राष्ट्रभाषा नाही. लोकशाही व्यवस्था मान्य करणार्‍या बहुतेक राष्ट्रांना राष्ट्रभाषा नाही. केवळ हुकूमशाही राष्ट्रातच राष्ट्रभाषा लादली गेली आहे. 
संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. मात्र केवळ उत्तर प्रदेशपुरता संकुचित विचार करणार्‍या पंडित नेहरूंनी हिंदीसाठी आग्रह धरला. शेवटी हिंदीला ‘संपर्क भाषा’ म्हणून मान्यता मिळाली. त्या धबडग्यात राष्ट्रभाषेचा मुद्दा बाजुलाच पडला. हिंदुस्तानाच्या सर्वाधिक प्रांतात बोलली जाणारी माय मराठी आज मरणासन्न अवस्थेत आहे. 
खरेतर महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात मराठी आहेच; मात्र कर्नाटकातही मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. बडोदा, झांशी, ग्वाल्हेर, तंजावर अशा प्रांतातही मराठी प्रशासक होते. त्यामुळे त्या त्या प्रांतातही मराठी भाषकांचे प्रमाण लक्ष्यवेधी होते. मध्यप्रदेश सारख्या ठिकाणी आजही मराठी वाचक मोठ्या संख्येने आहे. इतकेच काय, स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमधून ‘केरळ पर्यटन’ नावाचे मराठी मासिक प्रकाशित व्हायचे आणि त्याचे त्याकाळी तब्बल 3200 सभासद होते. याचा अर्थ केरळमध्ये मराठी वाचता येणारे असंख्य लोक होते. एखाद्या मासिकाची सभासद संख्या 3200 म्हणजे वाचकसंख्या किमान त्याच्या पाचपट नक्की असणार! भारतात तर सोडाच पण इस्त्राईल सारख्या देशातही मराठी बांधवांचे प्रमाण लक्ष्यवेधी आहे. 
बुद्धिमत्तेच्या, गुणवत्तेच्या बाबतीत मराठी माणूस आघाडीवर आहे. नवीन पिढी वाचनापासून दूर जातेय, असा जावईशोध काहींनी लावला असला तरी त्यात तथ्य नाही. आजचे तरूण झपाट्याने वाचत आहेत. त्यांची वाचनाची अभिरूची बदलली असेल, मात्र सकस आणि दर्जेदार साहित्य न वाचण्याचा करंटेपणा ते कधीही करत नाहीत. इतके सगळे असूनही माय मराठीचे अस्तित्व धोक्यात का येतेय, तर खोट्या प्रतिष्ठेपायी आपण मराठी बोलणे टाळतोय. हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या दुराग्रहामुळे आपण मराठी बोलण्याबाबत आग्रही राहत नाही. सरकारही त्यादृष्टिने ठोस भूमिका घेत नाही. एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताहेत, नवीन शाळांना परवानगी मिळत नाही, अनुदान मिळत नाही आणि दुसरीकडे गल्लीबोळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. 
इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणारी बहुतेक मराठी मुले नालायक निघतात, असा एका विश्‍वसनीय सर्वेक्षणाचा निकाल आहे. कारण या मुलांना मातृभाषा असलेली मराठीही जमत नाही आणि परकीय भाषा असलेल्या इंग्रजीचेही धड ज्ञान घेता येत नाही. या कोंडमार्‍यात त्यांचे मोठे नुकसान होते. त्याऊलट मराठी माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण घेवून अनेक जागतिक कंपन्यात महत्त्वाच्या हुद्यावर समाधानाने कर्तव्य बजावणार्‍यांचे प्रमाण लक्षवेधी आहे. जिथे आई आपल्या चिमुकल्याला प्यायला दूध दिल्यानंतर तो तिला ‘थँक्स ममा’ म्हणतो तिथेच आपली संस्कृती संपतेय! 
भाषा, संस्कृती याविषयी जागृत न राहता पाश्‍चात्य राष्ट्रांची भलावण करणारे महाभाग हे खरे राष्ट्रद्रोही आहेत. आपण शेक्सपिअरचा अभ्यास जरूर करू; मात्र तो करताना आपल्याला आपल्या महाकवी कालीदासाचा विसर पडत असेल तर ते आपले दुर्दैव आहे. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त प्रत्येकाने आता मराठीतच बोलण्याचा संकल्प करायला हवा. इंग्रजी नववर्षाच्या संकल्पाप्रमाणे त्याचे बुडबुडे न उडता तो अंमलातही आणायला हवा. मराठी भाषा, मराठी संस्कृती जगवण्यासाठी आपण किमान मराठीत बोलणे सुरू ठेवायला हवे. मराठी भाषेबाबत आग्रही असणारेच आजच्या काळात मराठीचे तारणहार ठरू शकतील!

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२