Monday, March 16, 2015

चकटफूंना चपराक!


 घुमान येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रसारण दूरदर्शन आणि आकाशवाणीने मोफत करावे, अशी मागणी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार घेताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘साहित्य संमेलनाची फुकटेगिरी बंद करा’ असा योग्य सल्ला दिला आहे. यावरून साहित्य क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया येत असतानाच सांस्कृतिक मंत्र्यांनी घुमजाव करत ‘घुमानजाव’चा नारा दिला आहे आणि दूरदर्शनच्या अधिकार्‍यांशी यासंदर्भात बोलणे सुरू असल्याचे सांगितले आहे. असे जरी असले तरी तावडेंच्या तावडीतून ही फुकटेगिरी सुटली नाही, याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. ही फुकटेगिरी केवळ मोफत प्रसारणापुरती नाही तर यांच्या कामकाजात आणि वृत्तीत अनेक ठिकाणी ठळकपणे अधोरेखित होते. 
संत नामदेवांची कर्मभूमी असल्याने घुमानला साहित्य संमेलन झाल्यास त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका ‘चपराक’ने सुरूवातीपासून घेतली आहे. मात्र या संमेलनाच्या निमित्ताने केवळ ‘पिकनिक टूर’ करता येईल, इतक्या संकोचित भूमिकेतून अनेकजण या संमेलनाकडे पाहत आहेत. राज्य सरकारकडून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी पंचवीस लाख रूपये देण्यात येतात. शिवाय आयोजक संस्था त्यांच्या कुवतीप्रमाणे मोठा निधी उभा करते. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी यापूर्वीच प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. पंजाब सरकारनेही पुढाकार घेऊन या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबिले आहे. असे असताना महामंडळाच्या पदाधिकार्‍यांचा प्रसिद्धीचा सोस काही सुटत नाही. सरकारकडून सर्वकाही फुकटात मिळावे ही वृत्ती अत्यंत घातक आहे.
य. दि. फडके हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना बेळगावला एस. टी. बसने, स्वतःच्या खर्चाने गेले होते. हा इतिहास दुर्लक्षून साहित्य परिषद, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी सर्वकाही फुकटात कसे मिळेल यासाठी धडपडताना दिसतात. विमान प्रवासाचा हट्ट असेल किंवा मोफत प्रसारणाची मागणी असेल. प्रत्येक वेळी या लोकाच्या मनाचे भिकारपण दिसून येते.
आज महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललाय. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय. रोज विविध भागातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. असे सारे असताना आपण सरकारी तिजोरीवर डोळा ठेऊन स्वतःची हौसमौज पुरी करून घेणे म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच आहे. खरेतर यावेळी साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून संमेलनाला जाणे अपेक्षित होते. मात्र हे कर्मदरिद्री लोक केवळ तीन हजार रूपये प्रतिनिधी शूल्क असूनही हे रेल्वेने येणार नाहीत. त्यांना सरकारच्या, आयोजकांच्या खर्चातून विमानसेवा हवी. स्वयंसेवक आणि इतर अनेक निमित्तानेही रेल्वेत फुकट्यांचा सुळसुळाट असणार आहे. संत नामदेवांच्या नावावर सहानुभूती मिळवत कोणी सरकारला गाळात घालण्याचे धंदे करीत असेल, तर ते हाणून पाडायला हवेत.
दुष्काळ, गारपीट आणि नापिकी यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालाय. सरकारकडून त्यांना यथायोग्य मदत मिळतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका श्रीकृष्ण फडणवीस यांची चंद्रपूर जिल्ह्यात मूल आणि कोसंबी येथे शेती आहे. यंदाच्या नापिकीचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र यांचे ज्येष्ठ बंधू आशिष आणि काका बाळासाहेब तथा श्रीकृष्ण यांनाही बसलाय. गारपिटीने त्यांच्या शेतातील गहू, हरभरा व भाजीपाल्याच्या पिकाची नासाडी झाली. शेतकर्‍यांना मिळणारी शासकीय मदत मुख्यमंत्र्यांचे ज्येष्ठ बंधू आणि काका यांच्याही बँक खात्यात जमा झाली. मात्र ‘आपण सधन शेतकरी असून ही मदत अन्य गरीब शेतकर्‍यांना देण्यात यावी’ असे म्हणत त्यांनी मूलच्या तहसीलदाराकडे हे पैसे धनादेशाद्वारे परत केले. याला म्हणतात नैतिकता! साहित्य आणि संस्कृतीच्या गप्पा मारणार्‍यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. केवळ तीन पाच हजार रूपयांसाठी आयोजकांवर आणि सरकारवर अवलंबून राहणार्‍या या टीनपाटांनी आपल्या मनाचा कोतेपणा सोडावा आणि पदरच्या पैशाने या साहित्योत्सवात सहभागी व्हावे.
साहित्य संमेलनाच्या नावावर ही ‘नाटक कंपनी’ वाटेल ते उद्योग करत आहे. श्री. पु. भागवतासारखा प्रकाशक साहित्य महामंडळाचा अध्यक्ष झाला होता, हा इतिहास विसरून प्रकाशक परिषदेने सुरूवातीला घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला. ‘चपराक’सारख्या काही संस्थांनी आणि अस्सल साहित्य रसिकांनी हा बहिष्कार फेटाळून लावला. ज्या अरूण जाखडे यांनी प्रकाशक परिषदेच्या वतीने आवेशात भाषणबाजी केली आणि प्रकाशक परिषदेच्या वतीने बहिष्काराची आवई दिली तेच आज घुमानमधील साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळाची ही ‘नाटक कंपनी’ तर नाही ना? अशी शंका येण्यासही वाव आहे.
आजवरचा इतिहास पाहता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पवार कुटुंबीयांचे योगदान मोठे राहिले आहे. दरवेळी पवारांचेच कोणीतरी बगलबच्चे या संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घ्यायचे. मात्र यावेळी सत्तेचे फासे उलटे पडले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची वृत्ती दाखवून देत माधवी वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे (लोगो)े अनावरण केले. उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे मराठी माणसाचा पुळका येणारे घटक आहेत. त्यांना विनंती केली असती तर ते पुण्यात साहित्य महामंडळाच्या कार्यालयात नक्की आले असते. मात्र कायम लाचारीचे दर्शन घडवणार्‍यांनी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवले. त्यानंतर नितीन गडकरींनी स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि यांच्या जीवात जीव आला.
सुरूवातीला शे-पाचशे लोक तरी या संमेलनाला येतील की नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र ‘चपराक’ सारख्या संस्थांचा कृतीशील पाठिंबा बघून आठ ते दहा हजार साहित्य रसिक संमेलनाला येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. असे सारे पोषक वातावरण असताना सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना तुम्हाला ‘फुकटेगिरी बंद करा’ असे सांगण्याची वेळ येत असेल तर तुम्ही मराठी माणसाचे नाक कापले आहे. तुमच्या करणीमुळे पदरचे पैसे टाकून येणारे साहित्य रसिक बदनाम होत आहेत.
‘चपराक’ परिवाराचे बारा सदस्य स्वतःचे पैसे टाकून या संमेलनास उपस्थित राहत आहेत. ते कुणापुढेही मिंधे नाहीत. पत्रकार म्हणून किंवा स्वयंसेवक म्हणून चार टाळकी घुसडण्याचा उद्योग आम्ही केला नाही. नेमके याच ठिकाणी चकटफू वृत्ती दाखवून देत महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी या साहित्योत्सवाला गालबोट लावले आहे. अशा करंट्या आणि कंजुष, चकटफू वृत्तीला चपराक देण्याचे दखलपात्र कार्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केले आहे. त्यातून काहीतरी बोध घेऊन या बेशरमांनी आपली उरली सुरली लाज राखावी, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक "चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

No comments:

Post a Comment