Friday, March 27, 2015

पराधीन आहे जगती...!

राजाभाऊ परदेशी
मंगळवार, दि. 24 मार्च 2015. वेळ : सकाळची. स्थळ : ‘चपराक’चे कार्यालय. फर्ग्युसन महाविद्यालयातून एम.ए. करणार्‍या रूक्मिणी येवले या आमच्या मुलाखतीसाठी आलेल्या. मराठी हा त्यांचा विशेष विषय. ‘मराठी प्रकाशन संस्थेचे कामकाज’ या विषयावर त्यांना प्रकल्प करायचा आहे. आम्ही संपादकीय विभागात बसून त्यांच्याशी तळमळीने बोलत होतो. बाहेरच्या कक्षात बालसाहित्यिक सुभाष कुदळे, राजाभाऊ परदेशी, समीर नेर्लेकर, सागर सुरवसे, तुषार उथळे पाटील, सचिन गोरे, नरहरी पत्तेवार आदी मंडळी गप्पा मारत बसलेली. रूक्मिणी येवले यांना हवी ती माहिती देऊन झाल्यानंतर आम्ही सांगितले, ‘‘प्रकाशक म्हणून आमची भूमिका तुम्ही ऐकली, आता बाहेर बसलेल्या लेखकांशी चर्चा करा. त्यांचे अनुभव तुम्हाला उपयुक्त ठरतील.’’
रूक्मिणीताईसह आम्हीही बाहेर आलो. नेर्लेकर, कुदळे, पत्तेवार, सुरवसे या लेखकांनी त्यांचे पुस्तक प्रकाशनाचे अनुभव सांगितले. तेव्हा राजाभाऊ परदेशी म्हणाले, ‘‘माझी लेखनाची गोडी ‘चपराक’मुळे वाढली. पीएमपीएमएलला असताना मी रोज एक सुविचार लिहायचो. त्याचे पुढे ‘शब्दरत्ने’ हे पुस्तकही काढले. आता निवृत्तीनंतर मी भरपूर लिहायचे ठरवले आहे आणि ‘चपराक’ हे आम्हाला त्यासाठी हक्काचे व्यासपीठ वाटते. मागच्याच महिन्यात ‘साहित्य चपराक‘ मासिकाच्या अंकात माझा लेख प्रकाशित झाला. मला ‘चपराक’ने लिखानासाठी विषय देऊन लिहिते केल्याचे समाधान मोठे आहे.’’
साहित्यावरची चर्चा संपल्यावर राजाभाऊंनी त्यांचे काही वैयक्तिक अनुभव सांगायला सुरूवात केली. सुभाष कुदळे यांना ते आदर्श मानायचे. कुदळे यांचे ‘बस मार्ग 42’ हे पुस्तक लवकरच ‘चपराक’कडून येत आहे. पीएमपीएमएलचे चालक आणि वाहक अनेक प्रकारामुळे बदनाम होत असताना त्यांचे प्रभावी कामकाज आणि चांगुलपण ठळकपणे अधोरेखित करणारे हे पुस्तक. परदेशी आणि कुदळे हे दोघेही याच संस्थेतून निवृत्त झाले असल्याने दोघांचेही दांडगे अनुभव. त्यात राजाभाऊ म्हणजे खर्‍याअर्थी जगन्मित्र. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन चुकलेल्यांना दिशा दाखवणारे आदर्श व्यक्तिमत्त्व.
ते म्हणाले, ‘‘मी पीएमपीएमएल मध्ये वरिष्ठ लेखापाल म्हणून नोकरी करताना सतत कर्मचार्‍यांच्या संपर्कात असायचो. एखादा कर्मचारी कामानिमित्त आला की मी त्याला तंबाखू मागायचो. साहेब तंबाखू मागताहेत म्हटल्यावर तो लगबगीने पुडी काढायचा. ती मी डसबीनमध्ये टाकायचो आणि त्याला व्यसनमुक्तीवर व्याख्यान द्यायचो.’’
बरे, कर्मचारी मित्रांना समजावून सांगायची यांची पद्धतही न्यारीच. म्हणजे एखाद्या कागदावर ते पेन्शिलने एक झाड काढायचे. त्या झाडाच्या खोडाला वाळवी दाखवायचे आणि विचारायचे, ‘‘आता या झाडाचे काय होईल?’’ कर्मचारी सांगायचा, ‘‘साहेब, झाड कोसळेल...’’ त्यावर ते म्हणायचे, ‘‘तुझ्या कुटुंबाचा गाडा तुझ्यावर अवलंबून आहे. या झाडाची भूमिका तुला पार पाडायची आहे. जर तू व्यसनाच्या वाळवीने कोसळलास तर तुझ्या संसाराच्या फांद्यांचे काय होईल याचा विचार कर!’’ कर्मचारी ओशाळायचा. ‘यापुढे कधीच व्यसन करणार नाही’ अशी शपथ घेऊन बाहेर पडायचा.
परवा राजाभाऊ सांगत होते, ‘‘समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे. विशेषतः 40 ते 45 या वयोगटातील लोकाचे मद्यपान थांबायला हवे. या वयात लिव्हर लवकर ‘डॅमेज’ होते. हृदयविकाराने मरणार्‍यांचे प्रमाणही या वयात जास्त आहे.... नुकतीच निवृत्ती झाल्याने मी काही कौटुंबीक जबाबदार्‍यात अडकलो होतो. आता यापुढे जीवनाचा आणखी आनंद लुटणार. अजून काम करणार....’’
आम्ही ऐकतच होतो. विविध क्षेत्रात तळमळीने काम करणारे, निकोप आणि व्यसनमुक्त समाजाची अपेक्षा व्यक्त करणारे, त्यांच्या दोन्ही मुलींवर कायम भरभरून बोलणारे कुटुंबवत्सल राजाभाऊ, अंध कलाकारांसाठी हिरीरीने काम करणारे समाजसेवक, आपल्या सुरेल आवाजात मराठी आणि हिंदी गाणे गाऊन समोरच्याला थक्क करणारे कलाकार राजाभाऊ, सतत नव्याचा ध्यास घेत लिखानासाठी धडपडणारे लेखक राजाभाऊ... आणि सतत हसत राहत समोरच्या व्यक्तिची कोणतीही समस्या असली तरी सर्वस्व झोकून देऊन त्याच्या मदतीसाठी धडपडणारे राजाभाऊ.... एकाच माणसाची ही कितीतरी रूपे... मनासारखा राजा.. राजासारखे मन...
सुभाष कुदळे आणि राजाभाऊ परदेशी हे एक समीकरणच झाले होते. कुदळे यांच्यासोबत ते कायम ‘चपराक’च्या कार्यालयात यायचे. येताना कधी द्राक्षे, कधी केक-ढोकळा तर कधी भेळ आणायचे. ‘चपराक’च्या सदस्यांसह दिलखुलास गप्पा मारायचे. जे चांगले आहे, उदात्त आहे, मंगल, पवित्र आहे त्याचा त्यांना ध्यास होता. ‘इंग्रजीवर प्रभुत्व असायलाच हवे,’ हे ठासून सांगताना ‘मायबोली मराठीवरचे प्रेम यत्किंचितही कमी होऊ नये,’ असे ते म्हणायचे. त्याचसाठी त्यांनी त्यांच्या काही नातेवाईकांची ‘चपराक’ची वर्गणीही भरली होती.
मध्यंतरी त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येण्याची विनंती केली. आम्ही म्हणालो, ‘‘राजाभाऊ, निवृत्ती हा आयुष्यातला महत्त्वावा टप्पा आहे. एखाद्या नामवंत लेखकाला आपण बोलवूया. मी कार्यकर्ता म्हणून उपस्थित असेनच...’’ पण त्यांनी काही ऐकले नाही. ‘‘पीएमपीएमएल मधील माझ्या कर्मचारी, पदाधिकारी बांधवांना तुमचे विचार आवडतात, तुम्ही माझ्यासाठी म्हणून आलेच पाहिजे...’’ असा आग्रह त्यांनी धरला. आमच्यापुढे पर्याय नव्हता. आम्ही गेलो. त्यांच्याविषयी मनमोकळे बोललो. ते खुश झाले.
मात्र निवृत्तीला निरोप द्यायला गेल्यानंतर इतक्या लवकर त्यांना शेवटचा निरोप द्यायची वेळ येईल असे कधीच वाटले नव्हते...
राजाभाऊ म्हणजे चैतन्याचा झरा. महाबळेश्‍वरला एका संस्थेने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. ‘चपराक’च्या ज्येष्ठ उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे यांच्याकडे पुरस्कारासाठी नावे सुचवण्याची आणि निवडण्याची जबाबदारी होती. आम्ही बहुआयामी असलेल्या राजाभाऊंचे नाव या पुरस्कारासाठी सुचवले. सर्वजण कार्यक्रमासाठी गेलो. आमचे सहसंपादक माधव गिर, सुभाष कुदळे, मोहन ननावरे, तुषार उथळे-पाटील, संजय ऐलवाड आणि राजाभाऊ अशी आमची मैफिल रंगली. वाईला उमेश सणस यांच्याकडे पाहुणचार घेतला. राजाभाऊंनी तिथे ‘मानसीचा चित्रकार तो...’ हे गीत ठेक्यात म्हणून दाखवले. आम्हा सगळ्यांना कविता म्हणण्याचा आग्रह केला. ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या गोड आवाजाचे कौतुक केले तर त्यांना इतका आनंद झाला... त्यानंतर कितीतरीवेळा त्यांनी सबनीस सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘या पुरस्कारामुळे माझी उमेद वाढलीय, आता पुरस्काराच्या ट्रॉफी ठेवण्यासाठी वेगळे कपाट करून घेतो,’’ असेही त्यांनी मिश्किलीने सांगितले.
आकाशवाणीच्या निवेदिका व सुप्रसिद्ध कवयित्री स्वाती महाळंक आणि त्यांच्या मातोश्री अरूणा महाळंक यांनी मध्यंतरी मराठी भाषा दिनानिमित्त एका कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी आम्ही अध्यक्ष म्हणून यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी राजाभाऊंना मधे घातले आणि आम्हाला उपस्थित राहण्यास भाग पाडले. त्या कार्यक्रमाला आमचे लेखक संदिपान पवार, विनोद श्रा. पंचभाई, सागर सुरवसे यांच्यासह आम्ही गेलो. राजाभाऊंनी सर्वांच्या कविता ऐकल्या. भरभरून दाद दिली आणि वडील या विषयावर त्यांना आवडलेली एका कवीची कविता सादर केली. हा कुटुंबवत्सल पिता होता. त्यांच्या दोन्ही मुलींचे, जावयाचे संदर्भ त्यांच्या बोलण्यात नेहमी यायचे.
राजाभाऊंनी इंटक या कामगारांच्या संस्थेतही भरीव योगदान दिले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते कायम आग्रही असायचे. पीएमपीएमएल मधील कामगारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ते धडपडायचे. त्यांनी ‘सूर संगम निराली’ हा अंध कलाकारांचा एक ग्रुप केला होता. त्यामाध्यमातून ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करायचे. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी धडपडायचे.
24 मार्चला नेहमीप्रमाणे आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या. घुमानच्या साहित्य संमेलनाची तयारी सुरू असल्याने त्यांनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. ‘‘माझीही यायची इच्छा होती पण कौटुंबीक जबाबदारीमुळे ते शक्य नाही.’’असे सांगितले. ‘‘चपराकचा विस्तार नक्की आहे. आपल्याला आता कोणीही थोपवू शकणार नाही. नवीन वाचक जोडण्यासाठी आणखी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. समाजाने, वाचकांनीही अशी मासिके वाढावित यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’’ असे ते अंतःकरणापासून सांगत होते.
आज, म्हणजे, गुरूवार, दि. 26 मार्चला सकाळी त्यांनी ‘चपराक’च्या व्हाटस् अप ग्रुपला आजच्या क्रिकेट मॅचच्या निमित्ताने ‘आजचा दिवस विजयाचा’ अशी प्रतिक्रिया दिली. दुपारी ते ‘चपराक’च्या कार्यालयात आले. सुभाष कुदळे आणि राजाभाऊंची जोडगोळी असल्याने त्यांचे एकट्याने येणे आम्हाला विशेष वाटले. त्यांनी सांगितले, ‘‘सुभाषअण्णाची तब्येत बरी नसल्याने त्यांना त्रास दिला नाही. त्यांचे पुस्तकाचे स्क्रिप्ट द्या, तुम्ही घुमानवरून येईपर्यंत व्याकरण तपासून घेतो.’’
आज प्रथमच ते ‘चपराक’च्या कार्यालयातून चहा न घेता गेले. ‘’नातेवाईकाकडे जेवायला जायचे आहे’’ असे म्हणत ते लगबगीने पळाले. ‘‘येतो घनश्यामजी’’ हा त्यांचा निरोपाचा स्वर आमच्या कानात स्पष्टपणे घुमतोय. दुपारी ‘चपराक’मधून गेल्यानंतर ते सुभाष कुदळे यांच्या घरी गेले. त्यांना स्क्रिप्ट दिले. थोडावेळ मॅच पाहिली आणि ‘‘जरा जाऊन येतो’’ म्हणत गेले. नातेवाईकाकडे ते जेवायला जाणार होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रूग्णालयात नेईपर्यंत तर सगळा खेळ संपला होता. आमचे एक घनिष्ठ स्नेही, जॉॅली, रूबाबदार, सुहृदयी व्यक्तिमत्त्व काळाने हिरावून नेले. दुपारी एक वाजता भेटून गेलेला हट्टाकट्टा, हसतमुख माणूस चार वाजता गेला हा धक्का कसा पचवणार?
सुभाष कुदळे यांचा दूरध्वनी आला आणि अक्षरशः हबकून गेलो. काळजाचे पाणी पाणी झाले. ‘जो आवडे सर्वांना, तोचि आवडे देवाला’ असे म्हणतात ते उगीच नाही. त्यांच्याशी संबंधित कितीतरी घटना लख्खपणे डोळ्यासमोर दिसत आहेत. ‘निवृत्ती ही वृत्तीवर अवलंबून असते, तुम्ही निवृत्त झालात तरी चांगल्या कामापासून कधीही परावृत्त होणार नाही याची आम्हाला खात्री आहे’ असे मी त्यांच्या निवृत्ती समारंभातून अध्यक्षीय भाषणात बोललो होतो. त्यानंतर त्यांनी ‘चपराक’मधून सातत्याने लिहिण्याची अपेक्षा व्यक्त केली होती आणि आज अचानक ते कायमचे निवृत्त झाले. त्यांच्या दोन्ही मुली, जावई, पत्नी, त्यांचे गुरू कम मित्र सुभाष कुदळे, राजाभाऊंचे अन्य कुटुंबीय, मित्रमंडळी, पीएमपीएममधील सर्व चाहते यांना या धक्क्यातून सावरण्याची ताकत परमेश्‍वराने द्यावी.
अंध कलाकारांसाठी हाडाची काडे करणार्‍या राजाभाऊंनी जातानाही नेत्रदान केले. स्वतःजवळ जे आहे ते समाजाला देण्याचे व्रत त्यांनी शेवटपर्यंत जोपासले. राजाभाऊ, तुम्हाला विसरणे कदापि शक्य नाही. तुमच्या स्मृती आमच्या हृदयात जिवंत आहेत.
‘पराधीन आहे जगती, पूत्र मानवाचा’ हेच खरे! राजाभाऊ परदेशी यांना साप्ताहिक ‘चपराक’ परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली!!

1 comment: