Friday, February 27, 2015

लाभले आम्हास भाग्य...!


एक पंडित होता. त्याला अनेक भाषांचे उत्तम ज्ञान होते. तो ज्या भाषेत बोले तीच त्याची मातृभाषा वाटे. प्रत्येक भाषेवरील त्याचा व्यासंग अफाट होता. एकदा तो राजाच्या दरबारी आला. राजाने त्याच्या भाषाज्ञानामुळे त्याला मोठे इनाम दिले. मात्र पंडिताचा अहंकार वाढला होता. त्याने राजाला आव्हान दिले की, त्याच्या दरबारातील किंवा प्रजेतील कुणीही विद्वान असेल तर त्याने त्याची मातृभाषा ओळखावी. अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न करून बघितले. मात्र तो ती भाषा इतक्या सफाईदारपणे बोले की कुणालाही त्याची मातृभाषा कळली नाही. राजाने शेवटचा पर्याय म्हणून बिरबलाला निरोप धाडला. बिरबल आला. त्याने त्या पंडिताला विनम्रतेने नमस्कार केला आणि सांगितले की, ‘‘तुम्ही आमचे पाहुणे आहात. आज रात्री मुक्काम करा. उद्या आपण चर्चा करू.’’
बिरबलाने त्या पंडिताची सर्वप्रकारची व्यवस्था केली. त्याचा योग्य तो पाहुणचार केला. पंडितही त्यामुळे सुखावला. रात्री मिष्ठान्नाचे सेवन केल्यानंतर पंडित आलिशान गालिचावर झोपी गेला. तो झोपलेला असताना अचानक एक मोठा आवाज झाला. पंडित घाबरून उठला. त्याच्या निद्रेत व्यत्यय आल्याने बिरबलाने त्याची अंतःकरणपूर्वक माफी मागितली. 
दुसर्‍या दिवशी दरबारात प्रवेश करताच बिरबलाने ठामपणे सांगितले की हा पंडित कन्नड भाषक आहे. पंडितही अवाक् झाला. त्याची मातृभाषा आतापर्यंत कोणीही ओळखू शकले नव्हते. त्याने आपली मातृभाषा मान्य करत बिरबलाने ती कशी ओळखली हे विचारले. बिरबल म्हणाला, सोपे आहे. रात्री जेव्हा तुम्ही घाबरून उठलात तेव्हा तुम्ही कानडी भाषेमध्ये बोलत होतात. संकटाच्या काळी आपल्याला आपली मातृभाषाच आठवते.
भाषेविषयी जागृती करणारी, स्वाभिमान पेरणारी ही बालकथा अनेकांना माहिती असेल. मात्र आज काय परिस्थिती आहे? आपण आपल्या मातृभाषेतच बोलत नाही. मराठी बोलणे आपल्याला कमीपणाचे वाटते. खरेतर भारताला राष्ट्रभाषा नाही. लोकशाही व्यवस्था मान्य करणार्‍या बहुतेक राष्ट्रांना राष्ट्रभाषा नाही. केवळ हुकूमशाही राष्ट्रातच राष्ट्रभाषा लादली गेली आहे. 
संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. मात्र केवळ उत्तर प्रदेशपुरता संकुचित विचार करणार्‍या पंडित नेहरूंनी हिंदीसाठी आग्रह धरला. शेवटी हिंदीला ‘संपर्क भाषा’ म्हणून मान्यता मिळाली. त्या धबडग्यात राष्ट्रभाषेचा मुद्दा बाजुलाच पडला. हिंदुस्तानाच्या सर्वाधिक प्रांतात बोलली जाणारी माय मराठी आज मरणासन्न अवस्थेत आहे. 
खरेतर महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात मराठी आहेच; मात्र कर्नाटकातही मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. बडोदा, झांशी, ग्वाल्हेर, तंजावर अशा प्रांतातही मराठी प्रशासक होते. त्यामुळे त्या त्या प्रांतातही मराठी भाषकांचे प्रमाण लक्ष्यवेधी होते. मध्यप्रदेश सारख्या ठिकाणी आजही मराठी वाचक मोठ्या संख्येने आहे. इतकेच काय, स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमधून ‘केरळ पर्यटन’ नावाचे मराठी मासिक प्रकाशित व्हायचे आणि त्याचे त्याकाळी तब्बल 3200 सभासद होते. याचा अर्थ केरळमध्ये मराठी वाचता येणारे असंख्य लोक होते. एखाद्या मासिकाची सभासद संख्या 3200 म्हणजे वाचकसंख्या किमान त्याच्या पाचपट नक्की असणार! भारतात तर सोडाच पण इस्त्राईल सारख्या देशातही मराठी बांधवांचे प्रमाण लक्ष्यवेधी आहे. 
बुद्धिमत्तेच्या, गुणवत्तेच्या बाबतीत मराठी माणूस आघाडीवर आहे. नवीन पिढी वाचनापासून दूर जातेय, असा जावईशोध काहींनी लावला असला तरी त्यात तथ्य नाही. आजचे तरूण झपाट्याने वाचत आहेत. त्यांची वाचनाची अभिरूची बदलली असेल, मात्र सकस आणि दर्जेदार साहित्य न वाचण्याचा करंटेपणा ते कधीही करत नाहीत. इतके सगळे असूनही माय मराठीचे अस्तित्व धोक्यात का येतेय, तर खोट्या प्रतिष्ठेपायी आपण मराठी बोलणे टाळतोय. हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या दुराग्रहामुळे आपण मराठी बोलण्याबाबत आग्रही राहत नाही. सरकारही त्यादृष्टिने ठोस भूमिका घेत नाही. एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताहेत, नवीन शाळांना परवानगी मिळत नाही, अनुदान मिळत नाही आणि दुसरीकडे गल्लीबोळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. 
इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणारी बहुतेक मराठी मुले नालायक निघतात, असा एका विश्‍वसनीय सर्वेक्षणाचा निकाल आहे. कारण या मुलांना मातृभाषा असलेली मराठीही जमत नाही आणि परकीय भाषा असलेल्या इंग्रजीचेही धड ज्ञान घेता येत नाही. या कोंडमार्‍यात त्यांचे मोठे नुकसान होते. त्याऊलट मराठी माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण घेवून अनेक जागतिक कंपन्यात महत्त्वाच्या हुद्यावर समाधानाने कर्तव्य बजावणार्‍यांचे प्रमाण लक्षवेधी आहे. जिथे आई आपल्या चिमुकल्याला प्यायला दूध दिल्यानंतर तो तिला ‘थँक्स ममा’ म्हणतो तिथेच आपली संस्कृती संपतेय! 
भाषा, संस्कृती याविषयी जागृत न राहता पाश्‍चात्य राष्ट्रांची भलावण करणारे महाभाग हे खरे राष्ट्रद्रोही आहेत. आपण शेक्सपिअरचा अभ्यास जरूर करू; मात्र तो करताना आपल्याला आपल्या महाकवी कालीदासाचा विसर पडत असेल तर ते आपले दुर्दैव आहे. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त प्रत्येकाने आता मराठीतच बोलण्याचा संकल्प करायला हवा. इंग्रजी नववर्षाच्या संकल्पाप्रमाणे त्याचे बुडबुडे न उडता तो अंमलातही आणायला हवा. मराठी भाषा, मराठी संस्कृती जगवण्यासाठी आपण किमान मराठीत बोलणे सुरू ठेवायला हवे. मराठी भाषेबाबत आग्रही असणारेच आजच्या काळात मराठीचे तारणहार ठरू शकतील!

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

1 comment:

  1. पाटील साहेब.खूप सुंदर विचार मांडलेत! मराठी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete