Thursday, February 19, 2015

महाराजांचा पराक्रम समजून घ्यायचाय? मग शिवशाहीरांना भेटा!

महाराजांचा पराक्रम समजून घ्यायचाय? मग शिवशाहीरांना भेटा!


मागच्या आठवड्यात पुण्यात ‘चपराक साहित्य महोत्सव’ दणक्यात झाला. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, इतिहासलेखक उमेश सणस आणि सुप्रसिद्ध पत्रकार विनायक लिमये हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना शिवशाहीरांनी सांगितले की, ‘शिवाजीराजांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करा. शिवजयंतीवरून भांडणे कसली करता? ज्याक्षणी कोणत्याही निमित्ताने शिवाजीराजांचे नाव तुमच्या ओठावर येईल, त्यांचा पराक्रम आठवेल, हृदयात शिवरायांविषयींचे प्रेम जागे होईल, त्या क्षणी शिवाजीमहाराजांचा जन्म तुमच्या मनात झालेला असेल. शिवजयंतीवरून भांडणे करण्याऐवजी शिवाजीमहाराजांनी घालून दिलेल्या नैतिक मूल्यांचे पालन करा. त्यांच्यासारखा पराक्रम गाजवा.’ 
‘महापुरूषांचे केवळ पुतळे उभारून काही होत नाही. त्यांचा विचारांचा वारसा पुढे चालवा. अद्वितीय सामर्थ्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे शिवराय. त्यांचा पराक्रम आठवा. तो स्वतःत बाणवा आणि मग बघा, जगातील कोणत्याही संकटाला तुम्ही कसे सहजपणे सामोरे जाऊ शकाल,‘ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ‘शिवप्रतापकार’ उमेश सणस म्हणाले, ‘चपराक’च्या माध्यमातून आज ज्या बारा पुस्तकांचे प्रकाशन होत आहे ते लेखक खरोखरी नशीबवान आहेत; कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या अभ्यासू महापुरूषाच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. ‘आज जर आपल्याला शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सहकार्‍यांची भेट झाली तर आपण त्यांना शिवचरित्राविषयी विचारू शकू! शिवाजी महाराज किंवा त्यांचे सहकारी हंबीरराव मोहिते, हिरोजी फर्जन, तानाजी मालुसरे, मदारी मेहतर अशा कुणाचीही आपली भेट झाली आणि आपण त्यांना आग्य्राहून सुटका, प्रतापगडची भेट, शाहिस्तेखान अशा कोणत्याही प्रसंगाविषयी विचारले तर ते सांगतील, आधी तुम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटा, त्यांना या सर्व प्रसंगाविषयी विचारा. ते तुम्हाला सारे काही सांगतील; आणि त्यातूनही काही राहिलेच तर आम्हाला विचारायला या!’ 
‘चपराक’च्या पहिल्या साहित्स महोत्सवाला ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे उपस्थित होते तर दुसर्‍या ‘चपराक साहित्य महोत्सवा’च्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. या दोन्ही अफाट प्रतिभेच्या बेफाट माणसांचे आशीर्वाद आम्हास लाभले. यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते?  
आज सर्वत्र शिवजयंती उत्सव साजरा होत असताना आपण महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यात खारीचा वाटा उचलतोय याचा आनंद वाटतोय. एका कवीने म्हटलंय, ‘पुतळे उभारून स्फूर्ती कधी मिळते का?, सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का?’ अगदी हाच संदेश शिवशाहीरांनी ‘चपराक’ च्या व्यासपीठावरून दिला. महाराजांचे विचार आमच्या अल्प कुवतीप्रमाणे आचरणात आणण्यासाठी, ते समाजात रूजवण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलू, हेच या निमित्ताने नम्रपणे सांगावेसे वाटते. 
आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! शिवरायांना मानाचा मुजरा!!



1 comment: