|
'चौथा स्तंभ'च्या प्रकाशन सोहळ्यात रोपाला पाणी घालताना बेळगावचे पहापौर किरण सायनाक. यावेळी सुप्रसिद्ध लेखक सुनीलकुमार लवटे, प्रा. श्रीकांत नाईक, लेखक सुभाष धुमे आणि 'चपराक'चे प्रकाशक, संपादक घनश्याम पाटील |
तो एक चक्रव्यूह होता का? म्हणजे काय? चक्रव्यूह नाही म्हणणार तुम्ही त्याला तर आणखी काय म्हणणार? पण मग अशावेळी सत्य कुणाच्या बाजूनं असतं? चक्रव्यूह ज्यानं रचला त्याच्या की जो चक्रव्यूहाशी लढतो आहे त्याच्या? बेळगावात पाऊल ठेवायचा अवकाश, मनात असे विचार सुरू होतात. महाभारतात एक खूपच विलक्षण वाक्य आलंय. काय आहे ते वाक्य? ‘‘जिथं कपट आणि कारस्थानं असतात तिथं कधीही सत्य नसतं.’’ हा चक्रव्यूहसुद्धा असाच निर्माण झाला. कारस्थानातूनच! कोण होते याचे निर्माते? तर तो चक्रव्यूह रचला कर्नाटकच्या सत्ताधार्यांनी. त्यात अडकला बेळगाव, कारवार, निपाणी व आजूबाजूचा असा पंचवीस एक लाखांचा मराठी प्रदेश. बरं, हा चक्रव्यूह किती भयंकर असावा? तर गेली साठ एक वर्ष तो आपल्याला भेदताच येत नाहीये. दि. 1 नोव्हेंबर 1956. या दिवशी म्हैसूर (आत्ताचं कर्नाटक) राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून हा सीमाभाग कर्नाटकातच आहे. मगरीच्या जबड्यात पायच अडकावा अशी सगळी परिस्थिती! ज्यांनी तो पाय सोडवायचा ते दुर्दैवाने काठावर! पण मग अशा कारस्थानांच्या विरूद्ध उठाव करणार नाही ती सामान्य जनता कसली? कपट पाहून उसळणार नाही ते तिचं मग रक्त कसलं? मग ती धडपड सुरू झाली. प्राणांतिक धडपड! सीमाभागातल्या जनतेची. अगदी बाबूराव ठाकूरांपासून ते किरण ठाकूर व त्यापुढची पिढी! सगळेच या चक्रव्यूहाशी लढत राहिले. आता हा प्रश्न आहे सुप्रिम कोर्टात! कर्नाटकचे पुढारी मात्र चाणक्याचेही बाप! नऊ वर्ष सुप्रिम कोर्टात खटला पडून राहिला. सुनावणीच झाली नाही. यामागं कालहरणाचे डावपेच नसतीलच असं कोण म्हणेल? अखेर सुनावणी सुरू झाली. सुप्रिम कोर्टाने मनमोहन सरीन यांची नियुक्ती केली. सरीन जम्मू काश्मीरच्या हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश. सुप्रिम कोर्टानं सांगितलं, जे सांगायचंय व पुरावे द्यायचेत ते सरीनांकडे द्या. हे महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही सरकारांना सांगितलं. मग कर्नाटक सरकारची पळापळ सुरू झाली. साठ वर्षांची दडपशाही! आता त्यांना ही दडपशाही लपवायची आहे, तीही सुप्रिम कोर्टात.
‘‘आपल्या ‘चौथा स्तंभ’ या पुस्तकाचं प्रकाशन बेळगावला आहे’’ काही दिवसापूर्वी घनश्याम पाटील म्हणाले. स्वस्थता पाटलांच्या रक्तात नाही. परवाच नाशिकला एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. आता बेळगावला. सीमाप्रश्नाचा मीही अभ्यास करतोच आहे. शिवाय ‘चपराक प्रकाशन’चं पुस्तक. घरातलं काम. दि. 27 ऑगस्ट 2015. मी व पाटलांनी ‘चौथा स्तंभ’ या पुस्तकाचे गठ्ठे रिक्षात घातले. निरोप द्यायला ‘चपराक’चे सहसंपादक माधव गिर आले होते. संध्याकाळची वेळ. रिक्षा थेट सुखसागरनगरकडे. तिथं महादेव कोरे वाट पाहत होते. ते पाटलांचे खूप जुने स्नेही. कोरेंच्या कारमधून आम्ही गेलो ते येवलेवाडीत. प्रमोद येवले हा पाटलांचा कॉलेजमधला यार दोस्त! तो रियल इस्टेट क्षेत्रात काम करतो. पाटील पत्रकार. हेवा वाटावा अशी दोघांची मैत्री! येवलेंच्या प्रशस्त बंगल्यात चहापाणी झालं. मग प्रमोदनं त्याची मारूती स्वीफ्ट बाहेर काढली. हायवेला लागताच स्वीफ्ट विमानाच्या वेगाने धावू लागली. प्रमोदचं ड्रायव्हींग मात्र अत्यंत सावध! एका क्षणासाठी नजर रस्त्यावरून ढळत नव्हती. आम्ही गप्पात रंगलो. पाटलांकडे उत्तमोत्तम कविता, गझलांचा संग्रह! मग त्यांनी मोबाईलला ‘खुलजा सिम सिम’चा आदेश दिला व मोबाईल बोलू लागला.
मुझे ऐसे अश्क की है तलाश
जिसे मेरे अक्स की है तलाश
मुझे कोई छू न सके जहॉं
मुझे ऐसे तख्त की है तलाश
जो मुझे वजूद दिला सके
किसी ऐसी बज्म की है तलाश
मुझे धडकनों में मिला सके
मुझे ऐसे शख्स की है तलाश
मैं छुपा सकूँ गम-ए-दिल जहॉं
मुझे ऐसे जश्न की है तलाश
तेरे नामसे भी न धड़के दिल
मुझे खुद की नब्ज की है तलाश
मेरे दिल में कोई न चाह हो
मुझे ऐसे वक्त की है तलाश
बने फिर से खाक से आदमी
किसी ऐसी रस्म की है तलाश
एक बाई शांत, संथ आवाजात कविता म्हणत होत्या. ‘‘या अपर्णा कडसकर’’ पाटील सांगतात. ‘‘आपल्या परिचयाच्या आहेत. सांगवीत राहतात’’ पाटील. हिंदीत अशी कविता करणारी माणसं महाराष्ट्रात आहेत? मनात सुखद विचार येतो. तेवढ्यात पाटलांनी पुन्हा ‘खुलजा सिम सिम’ म्हटलेलं असतं.
तोपर्यंत पाटलांनी पुढच्या कवितेला हाक मारलेली असते.
माझ्या गावात राहतो तिकडं
राब राबणारा माझा बाप
राब राबून मातीत तेथे
त्याच्या कातड्याला पडलाय राप...
तो मातीत गाळतोय घाम
त्याचा लाटतात सारे दाम
नाही राहण्यास चांगले धाम
त्याच्या मुखात तरीही राम
तो भाकरीशी खातोय ठेचा
तुम्हा पुरवून साखर तूप...
इथं तुमची लाखाची भाषा
त्याला पैशाची नाही आशा
त्याच्या हाताच्या पुसल्या रेषा
वेच वेचुन रानातल्या काशा
तुम्ही सुखात राहता येथे
त्याच्या दुःखाला नाही माप...
इथं बुटात लागतात मोजे
तिथं पायाला कुरूपाचे ओझे
घटं हाताला रोजच ताजे
त्याला दुपार सदाच भाजे
जगण्यापरीस देखील आता
त्याला मरण वाटतंय सोपं...
त्याला सुखाचं हाय बघा वाण
त्याला उन्हाचं लाभलंय दान
नाही तालात जगायचं भान
त्याची कर्जात सापडली मान
पुण्य साधून देखील फेडतोय
कुण्या जन्मातलं तो पाप...
त्याला लाभावी सदिच्छा थोडी
गोड गुळाची भाकरीला गोडी
गायी गुरानं फुलावी वाडी
गहू जोंधळ्यानं भरावी गाडी
दैन्य सरुन जीवाचे सारे
त्याची सुखात नांदावी खोप...
माझ्या गावात राहतो तिकडं
राब राबणारा माझा बाप.
हे कवी असतात माधव गिर. ‘चपराक’चे सहसंपादक. कविताच जगणारा माणूस! पाटलांचं वय तीस. अठराव्या वर्षी त्यांनी ‘चपराक’ सुरू केलं. मधे बारा वर्ष गेली या काळात ‘चपराक’ने किती लेखक, कवी जोडले गणती नाही! गाडी कराडमध्ये येते. तिथं तुषार उथळे पाटील वाट पाहत असतात. उथळे पाटील ‘चपराक’चे व्यवस्थापक. मग एका हॉटेलमध्ये जेवण होतं. मग ठरतं, आजचा मुक्काम कराडमध्येच. जवळच बर्यापैकी लॉज मिळतं. प्रमोद लॉजच्या आवारात त्याची ती देखणी गाडी पार्क करतो. आम्ही आमच्या रूम गाठतो. झोपण्यापूर्वी मी ‘शिवसहस्त्रनामावली’ म्हणतो. मनात एक भावना असते, सगळं काही घडवून आणणारा ‘तो’ आहे. बारा साडे बारा वाजतात. झोप लागते. शांत झोप.
दि. 28 ऑगस्ट. पहाटेचे पाच वाजलेले. पाटलांनी हाक मारली. जाग आलेलीच होती. उठल्यावर चहा हवाच असतो. पाटलांनी चहाची ऑर्डर दिलेली. प्रमोदनं गरम पाण्याची बादली आणून ठेवली. तुषार पुढच्या तयारीला लागला. तिशीबत्तिशीतली ही लेकरं! सकाळपासूनच अशी सगळी काळजी घेत असतात. अशा वेळी उगीचच प्रौढ झाल्यासारखं वाटत राहतं आपल्याला. ‘शिवकवच’ म्हणत आंघोळ आटोपली. सगळे आवरून तयार होते. साडेसहाच्या आसपास गाडी बेळगावच्या दिशेने निघालीसुद्धा. पहाटेची प्रसन्न वेळ! गार वारा! गप्पांची मैफल! पाटील, तुषार, कोरे धमाल किस्से सांगतात. मी व प्रमोद ऐकत राहतो. एके ठिकाणी नाश्ता व चहा होतो. तेवढ्यात मी किरण गावडेंना एसएमएस करतो ‘‘दादा, व्हेरी गुड मॉर्निंग! नऊ वाजेपर्यंत बेळगावात येतो आहे.’’ किरण गावडे कोण? तर गेली पंचवीस वर्ष सीमालढ्यात लढणारा बेळगावातला एक कार्यकर्ता! पाहताक्षणी प्रेमात पडावं असं व्यक्तिमत्त्व! अतिशय दिलेर!! इथल्या त्या दुष्ट चक्रव्यूहाशी लढताना हा माणूस नेहमीच पुढं होता. किरण ठाकूरांच्या गळ्यातला ताईत! पाचच मिनीटात गावडेंचा फोन येतो, ‘‘खानापूरला थोडं काम आहे. ते उरकून प्रकाशनाच्या ठिकाणी भेटतो.’’ गावडेसुद्धा तिकडं रियल इस्टेटच्या क्षेत्रात काम करतात. किरण ठाकूरांच्या अनेक संस्था. त्याचंही काम ते पाहतात. तर आता गाडी बेळगावच्या जवळ आलेली असते. समोर बेळगाव दिसू लागतं. नितांतसुंदर शहर! लोकमान्य रंगमंदीर. तिथं प्रकाशनाचा कार्यक्रम असतो. आम्ही पत्ता विचारत सभागृहाकडे जातो. मग लक्षात येतं, हे रंगमंदीर किरण ठाकूरांचंच आहे. मूळात किरण ठाकूर हीच एक मोठी संस्था आहे. ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी’ ही ठाकूरांची संस्था. तिच्या देशभर 195 शाखा. नुसत्या गोव्यातच 46 शाखा. सुमारे पंधराशे कोटींच्या ठेवी व बाराशे कोटींच्या आसपास कर्जवाटप! नुसत्या गोव्यातच 550 कोटींपेक्षा जास्त ठेवी! सगळा अवाढव्य कारभार! कारभाराला मात्र शिस्त व विश्वासार्हता! कुणीही डोळे झाकून विश्वास ठेवावा! शिवाय ठाकूरांचं ‘तरूण भारत’ हे वृत्तपत्र आहेच. सीमाभागात प्रत्येक घरात असतं हे वृत्तपत्र. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधूदूर्ग इथं वृत्तपत्राचा चांगला खप. गोव्यात तर हे वृत्तपत्र चक्क पहिल्या क्रमांकावर! हजारो कर्मचार्यांनी हे काम उभं केलेलं! आता तर ठाकूरांचं ‘तरूण भारत’ मुंबई-पण्यातही आलंय. ठाकूरांना सीमाभागात सगळे ‘मामा’ म्हणतात. मामा जगभर फिरतात; मात्र सीमाभागावर त्यांचं बारीक लक्ष असतं. हा माणूस सीमाभागातल्या जनतेची काळजी घेणारा. सीमालढा लढणारा त्याचवेळी शेकडो तरूणांच्या आयुष्याशी जोडला गेलेला. साहित्यावर प्रेम करणारा व पत्रकारितेत तर अफाट उंची गाठणारा!
|
'लोकमान्य ग्रंथालयाची माहिती देताना अशोक याळगी. |
|
मग हे ‘लोकमान्य रंगमंदीर’ आहेे काय नेमकं? तर पूर्वी हे ‘रीझ थिएटर’ होतं. चित्रपटाचं टॉकीज. त्याचे मालक होते रावसाहेब हरीहर. ते कानडी गृहस्थ. माणूस रसिक. मराठी कलाकारांना प्रोत्साहन देणारा. अनेक गायक वादकांची कदर करणारा. पु. ल. देशपांडे त्यांचे मित्र. त्यावेळी पु. ल. बेळगावमध्येच राहत. रीझ टॉकीजचं आवार. तिथं पु. ल. खुर्ची टाकून बसत. ‘दूधभात’ हा मराठी चित्रपट. त्याचं संवादलेखन पु. ल. नी इथंच केलं. ही सगळी माहिती आम्हाला देत होते प्रसाद प्रभू. ‘तरूण भारत’चे पत्रकार. बेळगावचं राणी पार्वतीदेवी कॉलेज. तिथं पु. ल. मराठीचे प्राध्यापक होते. आजही ते कॉलेज आहे. बेळगाव हे रसिकांचं शहर! वेडी(?) माणसं राहतात इथं. किरण ठाकूर यांनी रिझ थिएटर विकत घेतलं. का? तर मराठी भाषा, साहित्य, मराठी सांस्कृतिक कार्यक्रम यांना हक्काची जागा असावी म्हणून. हा व्यवहार झाला 2009 साली. बेळगावातली ही मध्यवर्ती जागा. बेळगावातलं राजकारण ठाकूर कोळून पिलेले. कानडी सत्ताधारी एकेक कट रचत होते. मराठी शाळा त्यामुळं बंद पडत होत्या. कानडीची सक्ती होत होतीच, शिवाय बेळगावातला कानडी टक्का वाढावा अशीही कारस्थानं होत होती. ठाकूरांकडे आर्थिक ताकत होती. तिचा सदुपयोग त्यांनी अत्यंत शांतपणे व मुत्सद्दीपणे हे कानडी आक्रमण रोखण्यासाठी केला. रिझ थिएटरचं मग ठाकूरांनी ‘लोकमान्य रंगमंदीर’ करून टाकलं. त्याच्याच आवारात लोकमान्य मल्टी. को-ऑप. सोसा.चं अप्रतिम ऑफिसही बांधलं. रिझ थिएटर खूप जूनं. आजही ते तसंच आहे. जून्या काळातच घेऊन जातं ते आपल्याला. आता तिथं सर्व मराठी कार्यक्रम होतात. अगदी हक्काची जागा!
विजय नाफडे हे गृहस्थ. बेळगावलाच राहतात. या थिएटरमध्ये ते सातत्यानं एक कार्यक्रम करतात. जून्या चित्रपटांशी संबंधित. जूने हिंदी चित्रपट दाखवणं, त्यांच्या आठवणी जागवणं असा तो प्रकार. जूनी हिंदी गाणी. त्याच्याशी संबंधितही अनेक कार्यक्रम ते करतात. बलराज सहानी, कमाल अमरोही, गीता दत्त, शंकर जयकिशन, साहिर लुधियानवी, मीना कुमारी, लता मंगेशकर यांच्याशी संबंधित हे कार्यक्रम असतात. इतरही अनेक जुने कलाकार. त्यांची पोस्टर्स थिएटरमध्ये कायमस्वरूपीच लावून ठेवलेली. ‘‘नाफडेंना भेटता येईल का आपल्याला?’’ मी प्रसाद प्रभूंना विचारतो. ‘‘येईल की; पण त्यांना भेटायचं म्हणजे एक दिवस पाहिजे’’ प्रभू. अर्थ स्पष्ट होता. जुन्या चित्रपटांचा चालता बोलता कोषच असला पाहिजे तो माणूस. अशा माणसांना भेटणं हे तास दोन तासांचं काम नाही. मी जगदीश कुंटेंना फोन करतो. कुंटे ठाकूरांचे विश्वासातले सहकारी. ‘दै. तरूण भारत’चा व्याप सांभाळतात. पत्रकार व व्यंग्यचित्रकार देखील. ‘‘संध्याकाळी पाचच्या दरम्यान भेटू. त्याआधी तुम्ही अशोक याळगींना भेटून घ्या’’ ते सांगतात. दुसर्या क्षणी एसएमएस येतो. कुंट्यांनी याळगींचा मोबाईल क्रमांक पाठवलेला असतो. साधारण साडेदहाचा सुमार. प्रभू आम्हाला प्रशांत बर्डेंच्या घरी घेऊन गेले. बर्डे बेळगावातले ज्येष्ठ पत्रकार. सध्या आजारी आहेत. तिथंच ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे व त्यांचे अनेक सहकारी असतात. बेळगावातली पत्रकार विकास अकादमी. धुमे तिचे अध्यक्ष आहेत व बर्डे तिच्या कार्यकारी मंडळात. घनश्याम पाटलांच्या उपस्थितीत घरातच बर्ड्यांचा सत्कार केला जातो. बेळगावमध्ये पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याची परंपराच आहे. अगदी बाबूराव ठाकूरांपासून चालत आलेली. त्याकाळी महाराष्ट्रातून बेळगावात कार्यकर्ते येत. अगदी आचार्य अत्र्यांपासून क्रांतीसिंह नाना पाटलांपर्यंत. मग बाबूराव ठाकूर सगळ्यांच्या राहण्या-जेवण्याची काळजी घेत. बर्डेंच्या घरात जाताक्षणीच आमच्यापुढं नाश्ता आला; मात्र आमचा नाश्ता झालेला; पण चहाला कोण नाही म्हणतो? पाटलांच्या शब्दात सांगायचं तर आपण सगळी ‘चहाबाज’ माणसं!
इथून लोकमान्य रंगमंदीरात आलो. प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी स्थानापन्न झालो. बेळगावकरांच्या रसिकतेचा पावलोपावली अनुभव येत असतो इथं. प्रकाशनापूर्वी जुन्या हिंदी चित्रपट गीतांची संगीतधून ऐकवली जात होती. ‘रसिक बलमा तोसे दिल क्यूँ लगाया’, ‘वो जब याद आये, बहुत याद आये, गमे जिंदगीके अंधेरेमे हमने चरागे मोहब्बत जलाये बुझाये’, ‘बहारो फुल बरसाओ मेरा महबूब आया है’ या चित्रपटांच्या संगीतधून. आपल्याकडे बर्याचदा कुठल्याही कार्यक्रमापूर्वी उगीचच माशा मारत बसावं लागतं. तेवढ्या वेळात मनाला तृप्त करणारं, हुरहूर लावणारं काही ऐकवता येतं हे आवर्जून लक्षात घेणारे बेळगावकरंच. आत येण्यापूर्वी बाहेरच्या शोकेसकडे नजर गेली तर तिथेही एक कविता.
पाऊस आला, पाऊस रूसला, लपून बसला
वारा पुसतो आकाशाला
किती शोधला नाही गवसला
पाहिलंस का तू मेघाला?
रखरखलेली वसुंधरा ही
पाण्यासाठी आसुसलेली
शुष्क वृक्ष अन् सुकल्या वेली
शेतामधल्या वाफ्यामधली
बीजपेरणीही पुरी करपली
तहानलेल्या विहीरी आटल्या
नद्या आपुले पात्र विसरल्या
तळी, कालवे, ओढे, नाले
पाण्याविन सारे तळमळले
मग यानंतर होतं काय? तर
सुसाट वारा चमकत बिजली
गर्दी ढगांची नभी दाटली
थेंबी थेंबी पाऊस आला
गंध मातीचा जगी पसरला
उधानलेल्या आनंदाला
सुख सौख्याचा बहर आला
सुख सौख्याचा बहर आला
प्रकाशनाच्या कार्यक्रमाला चांगली गर्दी झालेली. सुत्रसंचालन प्रसाद प्रभूच करत होते. कुंडीतल्या एका रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. हा पर्यावरण संभाळण्याचा संदेश. तो किती महत्त्वाचा हे सांगायलाच नको. बेळगावमधली पत्रकार विकास अकादमी. ती बाबूराव ठाकूरांच्या नावाने पत्रकारांना पुरस्कार देते. आधी हे पुरस्कार देण्यात आले. दै. हिंदूचे विजय पाटील, लोकमतचे भिमगोंडा देसाई, तरूण भारतचे युवराज पाटील, प्रजावाणी व डेक्कन हेरॉल्डचे छायाचित्रकार चेतन कुलकर्णी यांना हे पुरस्कार देण्यात आले. मग दोन पुस्तकांचं प्रकाशन. ‘फ्लॅश बॅक’ व ‘चौथा स्तंभ’. बेळगावचे महापौर किरण सायनाक, कवी व लेखक सुनिलकुमार लवटे, या दोन्ही पुस्तकांचे लेखक सुभाष धुमे, घनश्याम पाटील आदी मंडळी व्यासपीठावर होती. कुंतीनाथ कल्पनी हे कन्नड पत्रकार. त्यांनाही पुरस्कार देण्यात आला. प्रकाशनाच्या कार्यक्रमात डॉ. लवटे खूप सुंदर बोलले. ‘‘बेळगावच्या महापौरपदाच्या वेदना त्या खूर्चीवर बसल्यावरच कळतात’’ ते म्हणाले. कार्यक्रमानंतर मी व महादेव कोरेंनी डॉ. लवटेंशी संवाद साधला. लवटे हा कमालीचा संवेदनशील माणूस! त्यात लेखक व कवीदेखील. सध्याच्या एकूण परिस्थितीबद्दल ते बोलले. माणसं माणसांपासून तुटताहेत हा त्यांचा मुद्दा होता. ‘‘आता कुणी कुणाला ‘घरी चला’ असंही म्हणायला तयार नाही. आधी सांगून वेळ घेतल्याशिवाय कुणाकडे जाण्याची सोय नाही. पूर्वी पत्रकार सुद्धा घरी येत, चहापाणी होत असे त्यातून पत्रकार मुद्दे घेत. आता असं होत नाही’’ लवटे म्हणाले. पुण्यावर तर त्यांचा रागच होता. ‘‘पुणं हे सर्वात अमानुष शहर आहे. तिथं माणसं नाही, यंत्रं राहतात’’ ते पुढं म्हणाले. लवट्यांचं बोलणं खोडून काढता येणं कठिण होतं. लवटे कोल्हापूरचे. याबाबतीत पुणे असं अप्रिय का झालंय हे ज्याचं त्यानं ठरवावं. कार्यक्रमात सर्वांचीच भाषणं झाली. घनश्याम पाटीलही बोलले. ‘चौथा स्तंभ’ हे चपराक प्रकाशनचं 80 वं पुस्तक. पाटलांनी किती लेखक, कवींना लिहितं केलं असेल याची कल्पना यावी. चपराकचा दिवाळी अंकसुद्धा असतोच. ‘‘दिवाळीच्या वेळी मिठाईच्या बॉक्सबरोबर दिवाळी अंकसुद्धा भेट दिले पाहिजेत’’ पाटील म्हणाले. विचार करण्यासारखं वाक्य होतं ते. मिठाईच्या बॉक्सबरोबर दिवाळी अंक! दुधात केशर! हे घडलं पाहिजे. माणसं वाचती होणं फार महत्त्वाचं असतं कुठल्याही समाजात. आपल्याकडे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात कमीच. दिवाळी अंक वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतात. त्याचा विचार व्हायला हवा. काही वेळा तो होत नाही. विशेषत: डोक्यात नुसत्या जाहिराती असतात काही जणांच्या. त्यांचे अंकही बेकार! खरा संपादक अर्थकारण सांभाळतोच; मात्र काही अस्सल छापायच्या मागं असतो. बर्याचदा ते त्याला लेखकाकडून काढून घ्यावं लागतं.
एक सांगायचं राहूनच गेलं. प्रकाशनानंतर सायनाकांशी बोललो. सीमाप्रश्नाबद्दल विचारलं. त्यांनी वेगळाच मुद्दा मांडला. ‘‘आता कर्नाटकचेच दोन राज्य होतील. उत्तर व दक्षिण कर्नाटक. बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने जी विधानसभा बांधलीय ती त्यासाठीच. उत्तर कर्नाटकसाठी. हेच होणार बघा तुम्ही’’ सायनाक म्हणाले. त्यांचं ते वाक्य खटकत राहिलं. हेच होणार असेल तर साठ-साठ वर्ष माणसं लढताहेत कशासाठी? आणि महापौरांनी तर सामान्य जनतेसोबतच असलं पाहिजे. त्यांनी कर्नाटक सरकारची री ओढून कसं चालेल? महापौरांनी आम्हाला महानगरपलिकेत यायचं निमंत्रण दिलं. त्याआधी आम्ही लोकमान्य ग्रंथालय पाहयला गेलो. किरण ठाकूरांनी उभं केलेलं हे ग्रंथालय. बेळगाव शहराबाहेरचा एक सुंदर जुना दगडी वाडा! तो ठाकूरांनी विकत घेतला. तिथं सुंदर ग्रंथालय उभं केलं. हजारो ग्रंथांचा तो सुंदर संसार! प्रत्येकानं तिथं जाऊनच तो पहावा. ग्रंथालयात दोन दालनं आहेत. एक जी. ए. कुलकर्णी दालन व दूसरं कमल देसाई दालन. हे दोघे प्रसिद्ध मराठी साहित्यिक. त्यांची पुस्तकं, हस्तलिखितं, पत्रं तिथं आहेत. जी. ए. उत्तम चित्रकारसुद्धा होते. त्यांची चित्रे तिथं आहेत. ते राहत धारवाडला. बेळगावमध्येही त्यांचं घर होतं. गोंधळी गल्लीत. बेळगावात त्यांचा जीव अडकला होता. त्या घराचा फोटोही आहे इथं. आता बेळगाव खूप आधुनिक झालंय. जी. ए. च्या घराचा तो फोटो मात्र आपल्याला पंचवीस-तीस वर्ष मागं घेऊन जातो. या ग्रंथालयाचे काम पाहतात अशोक याळगी. सत्तरीला टेकलेले वय; मात्र उत्साह भन्नाट! तरूणांना लाजवेल असा! याळगी ग्रंथालयाचा कानाकोपरा दाखवतात. तळहाताच्या फोडाप्रमाणे हे ग्रंथालय जपलंय याळगींनी. याळगी स्वत: मराठी व कानडी साहित्याचे उत्तम जाणकार. मराठीतले उत्कृष्ट लेखक व अभ्यासक! हे ग्रंथालय त्यांचा जीव की प्राण! ग्रंथांलयाच्या मागे प्रशस्त आवार. तिथं अधुनमधून सांस्कृतिक कार्यक्रम होतात. छोटी कविसंमेलनंसुद्धा. जवळच एक सुंदर विहिर! इतकी खोल की डोळे फिरावेत! पहिल्या मजल्यावर मुख्य ग्रंथालय. ज्ञानेश्वर, तुकोबा व समर्थांचे फोटो व त्यांची वचनं. पहिल्या मजल्याकडे जाताना ती समोरच लावलेली. याळगी अखंड बोलत असतात. माहिती देत असतात. या ग्रंथालयाला अनेक मोठ्या लोकांनी भेटी दिलेल्या. त्यात डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. भीमराव गस्ती, गिरीश कुबेर, अरूणा ढेरे, पुष्पा भावे अशी अनेक मंडळी आहेत. ग्रंथालयातील अभिप्राय पुस्तिका. त्यातल्या नेमाडे सरांच्या शुभेच्छा सांगण्यासारख्या. दि. 5 ऑक्टोबर 2014. या दिवशी ते ग्रंथालयात आलेले. ‘‘आज लोकमान्य ग्रंथालयातला वेळ माझ्या कायम स्मरणात राहिल. आपली संस्कृती टिकवण्याचं हे महत्त्वाचं वेड आहे. माझ्या या कार्यकर्त्यांना शुभेच्छा!’’ नेमाडे सर अभिप्रायात म्हणतात. याळगींचे मित्र श्री. सुधीर जोगळेकर. ते सावलीसारखे याळगींबरोबर वावरत असतात. पन्नाशीचा शांत व अत्यंत नम्र माणूस! ते फारसं बोलत नाहीत; मात्र त्यांच्या डोळ्यात कौतुक असतं, इतकी तरूण मुलं ग्रंथालयात आल्याचं. ग्रंथालयात हर तर्हेचे ग्रंथ. अगदी गो. स. सरदेसाईंच्या मराठी रियासतीच्या आठ खंडापासून ते अपर्णा वेलणकरांच्या ‘शांताराम’ पर्यंत. ग्रंथालयाचं पहिल्या मजल्यावरील दालन. तिथं आम्ही थोडा वेळ विसावतो. याळगी कॉफी व बिस्किटं मागवतात. मग घनश्याम पाटील अभिप्राय पुस्तिकेत अभिप्राय लिहितात. त्यांचा साहित्याच्या क्षेत्रातला अधिकार मोठा. त्यांनी अभिप्राय लिहिणं संयुक्तिकच; मात्र तिथलं वातावरण पाहून मलाही राहवत नाही. मग मीही अभिप्राय लिहितो. दरम्यान किरण सायनाकांचे दोन-तीन फोन येतात. श्री. व्यंकटेश जाधव यांना ते फोन करत असतात. जाधव मग आम्हाला आग्रह करतात, ‘‘महापौर वाट पाहताहेत. लवकर चला.’’ मात्र याळगी आम्हाला सहजासहजी सोडायला तयार नसतात. ते तिथून आम्हाला उचलतात व सरळ एका भन्नाट माणसाकडे घेऊन जातात. रिटायर्ड असिस्टंट कमांडंट शंकर चाफाडकर! बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये आयुष्य वेचलेला माणूस! तेव्हा त्यांच्या हातात बंदूक होती. ते त्यांचं कर्तव्य होतं. त्याकाळी त्यांनी पदवी घेतली. नंतर लगेचच ते शिपाई म्हणून बीएसएफ मध्ये भरती झाले. पदोन्नती मिळाली. पुढं निवृत्ती. नंतर या माणसानं काय करावं? तर स्वत:च्या सुंदर अशा छोटेखानी फ्लॅटमध्ये एक अप्रतिम ग्रंथालयच निर्माण केलं. मागच्या दहा एक वर्षातला हा त्यांचा अचाट उद्योग! काय गरज होती पदराला खार लावून हे करण्याची? मात्र एका लष्करी माणसाला ग्रंथांचं महत्त्व पटलं होतं. लष्कराच्या भाकर्या भाजण्याचं महत्त्व! ग्रंथांवर अतूट प्रेम या माणसाचं! बायको, मुलं काही नाही. ‘‘हीच माझी बायका पोरं’’ हॉलमधील ग्रंथांकडे बघत ते म्हणतात. घरातली ग्रंथांची शोकेसमधली चौफेर मांडणी अत्यंत शिस्तबद्ध! सगळ्या ग्रंथांचं पद्धतशीर वर्गीकरण. चरित्र, आत्मचरित्र, काव्य, कादंबर्या, वैचारिक, मराठी ग्रंथ, इंग्रजी ग्रंथ! ग्रंथांची अक्षरश: लयलूट!! अलीबाबाची गुहाच!! बरं, माणूस लष्करातला तर कठोर तरी असावा की नाही? तसंही दिसत नाही. कमालीचा प्रेमळ माणूस! सुमारे पाच हजार ग्रंथांच्या संसारात रममाण झालेला! कोणीही केव्हाही त्यांच्याकडे जाऊ शकतो. तिथं बसून कितीही वेळ वाचू शकतो. अट एकच, त्यांच्या हातचा चहा प्यायचा व पुस्तकं बाहेर मात्र न्यायची नाहीत. आपल्या समाजात अशी माणसं नसती तर? जग अशा माणसांमुळं सुंदर वाटू लागतं. सायनाकांचे इकडे पुन्हा फोन येतात; मात्र आम्हाला सहजासहजी सोडतील ते चाफाडकर कसले? त्यांनी कॉफी ठेवलेली असते. आम्ही किचनमध्ये डोकावतो तर तिथंही ग्रंथांचा प्रपंच! दोन छोट्या बेडरूम. तिथंही तेच. आमचं डोकंच चालत नाही. बरं, हा माणूस स्वत:ही वाचतो. उगीच केलेली शोबाजी नाही ही. ग्रंथांशी संबंधित सुविचार सुंदर अक्षरात भिंतींवर ठिकठिकाणी लावलेले. ‘‘लायब्ररी इज द हॉस्पीटल फॉर माइन्ड(ग्रंथालय हे मनाचे आरोग्य केंद्र होत.)’’ त्यातलाच एक सुविचार. एका बेडरूमच्या भिंतीवर आणखी एक विलक्षण दृश्य दिसतं. 88 संमेलनाध्यक्षांचे फोटो भिंतीवर लावलेले. अगदी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांपासून ते डॉ. सदानंद मोरेंपर्यंत. खरोखर आश्चर्य! एकेका फोटो साठी या माणसानं किती यातायात केली असेल? भिंतीवर अजून दोन फोटो श्रद्धेनं लावलेले. एक शिवशाहिर बाबासाहेब पुरंदर्यांचा व दुसरा डॉ. भालचंद्र नेमाडेंचा. ‘‘पुन्हा तुमच्याकडे निवांत वेळ काढून येतो’’ आम्ही त्यांना म्हणतो. निघण्यापूर्वी मी चाफाडकर, याळगी व जोगळेकरांचे पायच धरले. अशी माणसं होणार आहेत का परत? मनात हेच काहूर होतं त्यांचे पाय धरताना!
तिथून आम्ही थेट आलो ते बेळगाव महानगरपालिकेत. महानगरपालिकेची ती प्रशस्त, भव्य इमारत! तिच्याकडे पाहतो तेव्हा जाणवतं, बेळगाव चक्रव्यूहात आहे! किती लढे पाहिलेत या शहरानं! किती वेळा ही महापालिका बरखास्त करण्यात आली! हे कानडी सत्ताधार्यांचे उद्योग! मात्र आजही इथं झेंडा फडकतो तो महाराष्ट्र एकीकरण समितीचाच. महाराष्ट्र एकीकरण समिती हे काय प्रकरण आहे? तर 1946 सालीच हिची स्थापना झाली होती. उद्देश एकच, हा सगळा सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा. त्याच्याही आधी काय घडलं होतं? ते 1921 साल होतं. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी. तिनं तेव्हा 15 प्रांतिक कॉंग्रेस कमिट्यांची स्थापना केली. त्यावेळी बेळगाव जिल्ह्याचा समावेश कर्नाटक प्रांतिक कमिटीत करण्यात आला. दुखणं तिथूनच सुरू झालं. मग सीमा भागातले कार्यकर्ते एकत्र आले. त्यात डॉ. गो. शा. कोवाडकर, वि. ना. मिसाळ, वसंतराव हेरवाडकर, बाबूराव देसाई ही मंडळी होती. त्यांनी म. ए. समिती स्थापन केली. याचा अर्थ चाळीसच्या दशकापासून हा लढा सुरू आहे. लढ्याला अद्यापही अंत नाही अशी परिस्थिती! दुसरीकडं कर्नाटकच्या सत्ताधार्यांनी सगळीकडून फास आवळत आणलेला! बेळगावचं नामकरण त्यांनी बेळगावी केलंच. मराठा लाईट इन्फट्रीचं मोठं लष्करी कार्यालय. ते बेळगावमध्ये आहे. मराठी शाळा आहेत. शिवाजी गार्डन सारख्या बागा आहेत. या मराठमोळ्या खुणा कानडी सत्ताधार्यांना सलतात, मग त्यांनी ठरवलं, मूळावरच घाव घालावा. केलं ‘बेळगावी’. एका मोठ्या मेडीकल इन्स्टिट्यूटच्या फलकावर बेळगावी असाच उल्लेख होता. बर्याच ठिकाणी तो तसा आहेच. हा सगळा जुलमाचा रामराम!
तर लिहित होतो महापौरांच्या भेटीबद्दल. सायनाक महाराष्ट्र एकीकरण समितीचेच महापौर; मात्र म. ए. समितीत सगळं काही आलबेल नाही. आम्ही गेलो तर सायनाकांची मिटींग चालू होती. थोडा वेळ वाट पहावी लागली. तेवढ्यात चहा झाला. नंतर सायनाकांशी बोललो. सायनाकांचं बोलणं मिठास! जिभेवर नुसती साखर! त्यांना समजलं, आम्ही बेळगावजवळ बांधलेली विधानसभा बघायला जाणार आहोत. ‘‘एकदम मस्त बांधलीय विधानसभा! बघण्यासारखी आहे!’’ सायनाक म्हणाले. ‘‘मी तुम्हाला म्हटलो होतो ना! तसंच होणार बघा! लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून’’ ते मला म्हणाले. काय म्हणाले होेते ते मला? तर भविष्यात कर्नाटकची दोन राज्यं होतील. उत्तर व दक्षिण कर्नाटक. मग उत्तर कर्नाटकसाठी ही नुकतीच बांधलेली विधानसभा उपयोगी येईल. प्रश्नच पडला आम्हाला! सायनाक कौतुक कुणाचं करत होते? तर कर्नाटक सरकारचं. विधानसभा बांधल्याबद्दल. कर्नाटकचे सत्ताधारी. ते सीमाप्रश्नाच्या संदर्भात सरळ कधीच वागले नाहीत. त्यांनी ही विधानसभा बांधली. त्यामागचं कारण काय? तर त्यांना बेळगावला कर्नाटकच्या उपराजधानीचा दर्जा द्यायचा आहे. तसं करून बेळगाव व सीमाभाग कायमचा गिळायचा हा हेतू. त्यासाठी सीमाभागाच्या उरावर ही टोलेजंग विधानसभा बांधलेली. त्यासाठी फक्त (?) तीनशे साठ कोटी रूपये खर्च केले. बरं, ही विधानसभा बांधून कुणाकडून घ्यावी त्यांनी? तर पुण्यातल्या बी. जी. शिर्के यांच्या कंपनीकडून! शिर्केंना इतरही सरकारी कंत्राटं मिळतात म्हणे कर्नाटकमध्ये. मग त्यांनी थेट विधानसभाच बांधून दिली. कसला सीमालढा अन् कसलं काय? सीमालढा महत्त्वाचा की तीनशे साठ रूपयांचं कंत्राट महत्त्वाचं? पण सायनांकांनाही असंच वाटत होतं की काय? तसं वाटत असेल तर काळ कठीण आहे! सीमाभागात हे चाललंय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. हे सगळे प्रकार घातकी!! दुसरीकडे माणसं लढताहेत! किरण ठाकूर लढताहेत! त्यांचा ‘दै. तरूण भारत’ लढतोय. ही गल्लीतली लढाई नाही. काल परवाची लढाई नाही. पाच तपांची लढाई आहे. साठ वर्षांचा लढा आहे. दुसरीकडे आहेत चार-चारशे कोटींची कंत्राटं!! त्यात सायनाकांचं ते वाक्य. काय होणार आहे या सीमालढ्याचं? महापालिकेतून किरण गावडेंना फोन केला. व्यापात होते; मात्र भेटतो म्हणाले.
तिथून निघालो ते विधानसभा बघायला. बेंगलोरच्या दिशेने हायवेनं आम्ही निघतो. बेळगावपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर आलो. समोर पाहतोय तर डाव्या बाजूला एका छोट्या डोंगरावर एक भव्य इमारत! आमच्याबरोबर व्यंकटेश जाधव होते. तरूण भारतचे पत्रकार. अतिशय सहकार्यशील माणूस. सकाळपासून आमच्याबरोबरच होते. जाधव विधानसभेच्या सुरक्षारक्षकांशी बोलले. तिथला बंदोबस्त कडेकोट! विधानसभेचं आवार प्रचंड! त्याला चारी बाजूनं कपांऊंड. सुरक्षारक्षक मोजकेच; मात्र सावध व जागरूक. मुख्य दरवाजातून आम्हाला आत जाऊ देण्यात आलं. समोर उंचच्या उंच भव्य इमारत! इमारतीच्या आत जायची परवानगी मात्र मिळाली नाही. ‘‘त्याला जिल्हाधिकार्यांची परवानगी लागते’’ जाधव म्हणाले. थेट जिल्हाधिकार्यांची परवानगी! अधला मधला मार्गच नाही. मग आम्ही संपूर्ण विधानसभेला चालतच वळसा घातला. तिनशे साठ कोटींचा तो देखावा खरोखर पहावा ैअसा! मात्र कौतुकानं पहावा असा आहे काय? बरं, ही जागा ताब्यात घेतानाही खुनाखुनीचे प्रकार घडले. ही खाजगी जागा. ती ताब्यात घेताना जागा मालकांना कर्नाटक सरकारने पैसे दिले. त्याच्या देवघेवीतून बेळगावातल्या एका पुढार्याचा मुडदा पडला. इमारतीपुढं उभं राहून फोटो काढले तर अंगावर पाल पडल्यासारखं वाटत राहिलं. ‘‘आम्ही कधीही इकडं येत नाही. आम्हाला आवडत नाही’’ जाधव म्हणाले. हा काही जाधवांचा कानडी द्वेष नाही किंवा त्यांचा खुनशीपणा तर अजिबात नाही. त्यांचा संताप आहे तो हे सगळं वर्षानुवर्ष सोसावं लागत आहे त्याबद्दल. हा संताप कटकारस्थानांबद्दलचा आहे. कपट व कपटातून निर्माण होणारं क्रौर्य त्याबद्दलचा हा संताप आहे. साम-दाम-दंड-भेद! यात कानडी सत्ताधारी पटाईत! माणसं विकत घेण्यात वस्ताद! आता प्रश्न सुप्रिम कोर्टात आहे अन् सगळ्या सीमाभागाचा जीव टांगणीला लागलेला! अकरा कोटींचा महाराष्ट्र या सगळ्याकडे कसं पाहतोय तेही महत्त्वाचं. मध्यंतरी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मागणी केलीय. ‘सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र मंत्रालय हवं.’ संजय राऊत हे धडाडीचे पत्रकार! अभ्यासू खासदार! सीमाप्रश्नावर ते सातत्यानं लिहिताहेत. अनेक वर्ष लिहिताहेत. कित्येक लेख, अग्रलेख त्यांनी या विषयावर लिहिलेत व कानडी सत्ताधार्यांच्या कपटावर हल्ले चढवले आहेत. त्यांची ही मागणी महत्त्वाची. पण मग हे मंत्रालय होणार कधी? सीमाप्रश्नाची सुप्रिम कोर्टातली सुनावणी संपल्यानंतर? तिकडे कर्नाटकने कधीच मोर्चेबांधणी केलीय. फली नरीमन नावाचा वकील. त्याची कर्नाटक सरकारनं नियुक्ती केलीय. सुप्रिम कोर्टात महाराष्ट्राविरूद्ध लढण्यासाठी. हा नरीमन पक्का महाराष्ट्र द्वेष्टा आहे. कर्नाटकची ही नियुक्ती फार बोलकी. आपण त्यातून सावध होतो की नाही हाच खरा प्रश्न. कालपरवा पर्यंत हा नरीमन कर्नाटकची बाजू सुप्रिम कोर्टात मांडत होता. यापूर्वी हा प्रश्न इंदिरा गांधींकडे गेला तेव्हा त्यांनी महाजन आयोगाची नियुक्ती केली. हा प्रश्न सोडविण्यासाठी. ते साल होतं 1966. महाजन हे सुप्रिम कोर्टाचे माजी न्यायाधिश. या माणसानं सीमाप्रश्नाची माती केली. प्रश्न सोडवणं राहिलं दूर, या माणसानं महाराष्ट्राची अवस्था ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी करून टाकली. संपूर्ण अहवाल कर्नाटकच्या बाजूनं दिला. हे असं का? त्यामागचं कारण काय? हे आपण बोलायचं नाही. का? कारण महाजन हे सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश होते व इतकी मोठी माणसं कधीच चुकत नाहीत किंवा विकली जात नाहीत असं आपण गृहीत धरायचं. प्रश्न इथल्या व्यवस्थेचा आहे. एक प्रश्न साठ वर्ष सुटत नसेल तर सामान्य माणसांचा इथल्या व्यवस्थेवर विश्वास राहिल की उडून जाईल? इथं तर सगळा तोंड दाबून बुक्क्यांचा मार! सगळीकडून कोंडी झालेली माणसं मग व्यवस्थेला शिव्याशाप द्यायला लागतात. याचा विचार व्यवस्थेने नाही तर कुणी करायचा? राजानं मारलं व पावसानं झोडपलं तर जायचं कुठं अशी परिस्थिती.
विधानसभा बघत असतानाच किरण गावडेंचा फोन येतो. कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचा एक दवाखाना आहे. तिथं ते थांबायला सांगतात. दवाखान्याजवळ पुणे-बेंगलोर हायवे. तिथं आम्ही गावडेंची वाट पाहत थांबतो. बराच वेळ आम्ही वाट पाहतो. मग एक लांबलचक मोठी कार रस्त्यावरील समोरच्या बाजूला येऊन थांबते. त्यातून एक पन्नाशीकडे झुकत चाललेला कार्यकर्ता उतरतो. झपाट्यानं रस्ता ओलांडून तो आमच्याकडे येतो. चेहर्यावर स्मितहास्य. हातात बेळगावच्या सुप्रसिद्ध मिठाईचे, कुंद्याचे काही बॉक्स. ते तो मोठ्या प्रेमानं माझ्याकडे देतो. मला राहवत नाही. मी त्याचे चरणस्पर्श करायला जातो; मात्र तो तसं करू देत नाही. मला सरळ मिठीत घेतो. किरण गावडे! किरणदादा! आता चष्मा लागलाय त्याला व खुरट्या दाढीचे केसही पांढरे होत चाललेले! काळ्याचे पांढरे झाले तरी सीमाप्रश्नावर आजही लढतो आहे. त्याच्यासारख्यांनी हा प्रश्न अर्धवट सोडलेलाच नाहीये. लाठ्याकाठ्या खाऊन झाल्या. कारागृहातल्या यातनाही भोगल्या; मात्र किरणदादा लढत राहिला. आजही किरण ठाकूरांबरोबर सावलीसारखा वावरतो तो. काही दिवसांपूर्वी तर कर्नाटक सरकारने आणखी एक दुष्ट प्रयत्न केला. किरण ठाकूर व किरणदादावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे बालंट ठेवलं. ही माणसं या सगळ्याला सामोरी गेली. किरणदादाला बेळगावमध्येच भेटलो होतो यापूर्वी. तो दिवस होता दि. 26 जुलै 2013. सीमाप्रश्नाच्या अभ्यासासाठीच गेलो होतो तेव्हा बेळगावला. त्या दिवशी सकाळी नऊ वाजले होते. लॉजच्या रूमचा दरवाजा वाजला. समोर हा उभा. ती पहिली भेट. तेव्हाही हातात मिठाईचा बॉक्स होताच त्याच्या. पहिल्या भेटीतच जाणवलं, माणूस ताकतीचा कार्यकर्ता आहे. त्यानंतर ही भेट. बरोबर दोन वर्षांनी झालेली. अधूनमधून फोन व्हायचे इतकंच. त्यामुळेच की काय दादा घडाघडा बोलत राहिला. सीमाप्रश्नाबद्दल, त्यातल्या राजकारणाबद्दल. बोलण्यात नुसती पोटतिडीक! सीमाभागात म. ए. समितीचे आमदार ैआहेत. महापौर आहेत; मात्र गणित कुठंतरी चुकतंय. दादा बर्याच गोष्टी सांगत राहिला. ‘‘बेळगाव शांत आहे तोपर्यंत शांत आहे’’ मध्येच तो म्हणाला. ही धमकी नव्हती किंवा अहंकारही नव्हता त्याचा. बेळगावच्या रस्त्यावर सीमाप्रश्नाच्या लढाया त्यानं लढल्या होत्या. त्याला त्याच्या शहराचा स्वभाव माहीत होता. त्याला एक आत्मविश्वास होता. बेळगाव हे शहर कुणापुढंही झुकणारं नाही. मग अशा आणखी चार विधानसभा बांधल्या तरी बेळगावला फरक पडत नाही. ‘‘आता सुप्रिम कोर्टात काही चांगलं घडायला हवं’’ मी त्याला म्हणालो. ‘‘कर्नाटकचे पुढारी समजतात तितकं सोपं नाही त्यांनुसद्धा’’ तो म्हणाला. बोलत राहिलो बराच वेळ. घनश्याम पाटील तर त्या दिवशी आजारीच होते. उभं राहवत नव्हतं अशी परिस्थिती! तरीही किरणदादाचं सगळं बोलणं ते तासभर उभं राहून ऐकत राहिले. शेवटी ते महाराष्ट्राचं दु:ख होतं. ते ऐकून घेण्याशिवाय आमच्या हातात तरी काय होतं? थोड्यावेळानं त्याचा निरोप घेतला. ‘‘एकदा चपराकच्या कार्यालयात ये पुण्याला आलास की’’ मी म्हणालो. संध्याकाळची वेळ. अंधार पडलेला. गाडी पुण्याच्या दिशेने बेफाम धावू लागली. ‘‘ही माणसं हे सगळं सहन कसं करत असतील?’’ महादेव कोरे म्हणाले. कोरे लिंगायत समाजातले. कन्नड भाषिक; मात्र सीमाभागाचं दु:ख जाणणारे. त्यांचा निम्मा जीव इकडं तर निम्मा तिकडं अडकलेला! मात्र मराठीवर उत्कट प्रेम! महाराष्ट्रातच त्यांचं आयुष्य गेलेलं. मराठी त्यांची सख्खी मावशीच. ‘माय मरो मावशी जगो’ उगीच म्हणत नाहीत. कोर्यांना मात्र सीमाभागाची वेदना नेमकी कळली होती हे महत्त्वाचं. पुण्यात आलो तेव्हा रात्रीचे दीड वाजले होते.
दुसर्या दिवशी सकाळी आठची वेळ. पत्र्या मारूती चौकात उभा होतो. चहाच्या नेहमीच्या ठेप्यावर. हातात कटींग चहा व मनात नुसत्या बेळगावच्या आठवणी! अश्रूच आले दाटून! नुसती हुरहूर! काहीच कळेना.
संध्याकाळी घनश्याम पाटील नारायण पेठेतल्या माझ्या ऑफिसवर आले व त्याच चौकात चहा घ्यायला गेलो तेव्हाही अवस्था तशीच होती. ‘‘दादा, मी आता किरण ठाकूर व किरण गावडेंना पत्र लिहिणार आहे’’ मी पाटलांना म्हणालो. ‘‘उत्तम’’ पाटलांनी प्रतिसाद दिला. पत्रात या मोठ्या माणसांना मी अशी काय अक्कल शिकविणार होतो? मात्र मला पत्र त्यांनाही लिहायचं आहे व ‘बेळगाव’ नावाच्या त्या देखण्या, उमद्या व बंडखोर शहरालादेखील!!
|
लोकमान्य ग्रंथालयाच्या आवारात डावीकडून सुधीर जोगळेकर, महादेव कोरे, अशोक याळगी, 'चपराक'चे संपादक घनश्याम पाटील, प्रमोद येवले, लेखक महेश मांगले आणि व्यंकटेश जाधव |
- महेश मांगले
(पूर्वप्रसिद्धी - साहित्य चपराक दिवाळी अंक २०१५)