Sunday, May 31, 2015

गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे तरलो! : उज्ज्वल निकम

ही गोष्ट आहे 1993 ची. जळगावमध्ये वकिली व्यवसायात नेकीने कार्यरत असल्याने वेगळी ओळख झाली होती. मुंबईतील बॉम्बस्फोटाने देश हादरला होता. त्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून माझी नियुक्ती झाली आणि मी मुंबई गाठली. मुंबईत ना कुणाच्या ओळखी ना या शहराची कसली माहिती. मात्र ‘आपण भले आणि आपले काम भले’ या न्यायाने मी येथे आलो. वकीलपत्र घेतले.
त्याचवेळी मला पोलीस आयुक्तांकडून सूचना आल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भेटायला बोलावले आहे. मी त्यांच्याकडे गेलो. बाळासाहेबांनी अधिकाराने सांगितले की, ‘‘निकम, या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला आपल्याला सोडवायचे आहे.’’
मी सांगितले, ‘‘जमणार नाही. संजय दत्तला सोडायचे तर आणखी दहा-बारा गुन्हेगारांना सोडावे लागेल.’’
तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका शिवसैनिकाने मला दम भरला की, ‘‘तुम्ही सरकारचे नोकर आहात. सरकार आमचे आहे आणि बाळासाहेब हेच सरकार आहेत. त्यांचा शब्द हा अंतिम असतो. तुम्हाला तसेच वागावे लागेल.’’
मी म्हणालो, ‘‘बाळासाहेब, चर्चा आपल्या दोघात ठरली होती. हा मला विचारणारा कोण?’’
त्यांनी तो त्यांचा ‘मानसपुत्र’ जयंत जाधव असल्याचे सांगितले.
‘‘हे काम माझ्याच्याने होणार नाही’’, असे मी स्पष्टपणे सांगताच त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला ‘पंतां’ना फोन करण्यास सांगितला. हे ‘पंत’ कोण हेही माझ्या तेव्हा लक्षात आले नाही. नंतरच्या संवादावरून कळले की राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांनी फोन लावला होता. या खटल्याचे कामकाज माझ्याकडून काढून घेण्याच्या सूचना त्यांनी माझ्या समोरच दिल्या.
मी ‘मातोश्री’वरून बाहेर पडलो. बाहेर आल्याआल्या वायरलेसवरून सूचना मिळाल्या. मला तडक पोलीस आयुक्तांनी बोलावले. आमचा ताफा तिकडे गेला. त्यांनी मला सांगितले की, ‘‘तुम्ही तुमचे सामान भरा. जळगावला जायची तयारी करा. मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत.’’
मी निघण्याच्या तयारीत होतो तोच पोलीस आयुक्तांना तेव्हाचे गृहमंत्री गोपीनाथ मंुंडे यांचा फोन आला. त्यांना मी ओळखतही नव्हतो. त्यांनी सांगितले की, ‘‘उज्ज्वल निकम यांची मी सगळी माहिती काढली आहे. ते प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ वकील आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना परत जाऊ देऊ नका...’’
पोलीस आयुक्तांनी मी त्यांच्यासमोरच बसलो असल्याचे सांगितले. त्याबरोबर मुंडे यांनी आम्हाला दोघांनाही तिकडे बोलावले.
आम्ही त्यांच्याकडे गेलो. माझे वकीलपत्र रद्द करण्याचा निर्णय खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतला होता. त्यामुळे मुंडेंनी जोशींना फोन करून विचारणा केली. हा आदेश ‘मातोश्री’चा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ‘गृहखाते तुमच्याकडे आहे. कसे ते तुम्ही ठरवा पण निकमांना जळगावला परत पाठवा’ असे जोशींनी त्यांना सांगितले.
त्याबरोबर गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या देखत बाळासाहेबांना फोन केला. ते म्हणाले, ‘‘साहेब, उज्ज्वलची सर्व माहिती मी काढली आहे. हा प्रामाणिक माणूस आहे. गृहखात्याची प्रतिमा डागाळू नये यासाठी अशाच खमक्या आणि निःस्वार्थ वकीलाची गरज आहे.’’
बाळासाहेब त्यांना म्हणाले, ‘‘तो शरद पवारांचा माणूस आहे...’’
मुंडेंनी त्यांना ठासून सांगितले, ‘‘साहेब, मी यांची खात्री देतो. ते फक्त प्रामाणिकपणाची वकिली करतील. पवारांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. गृहखाते माझ्याकडे आहे. मला काही निर्णय घ्यायचे तरी स्वातंत्र्य द्या!’’
बाळासाहेबांनी फोन आपटला.
माझी आणि गोपीनाथ मुंडे यांची ही पहिलीच भेट होती. यापूर्वी आम्ही कधी फोनवरही बोललो नव्हतो. मात्र माझी सगळी कुंडलीच त्यांनी काढली होती. माझ्यासाठी त्यांनी बाळासाहेबांकडे आपला शब्द टाकला. टोकाची भूमिका घेत माझी पाठराखण केली.
तेव्हा खरेतर माझी आणि शरद पवार यांचीही ओळख नव्हती. तोपर्यंत त्यांच्याशी माझा कसलाही संपर्क आला नव्हता. त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत माझ्याकडे सरकारी वकील म्हणून महत्त्वाचे खटले आले होते. मात्र मुख्यमंत्र्याशी थेट संपर्क येण्याचे काहीच कारण नव्हते.
सुनील दत्त यांनी साकडे घातल्याने बाळासाहेब संजयची पाठराखण करत होते, पण खटल्याचे काम सुरू झाल्यावर त्यांनी त्यात कधीही हस्तक्षेप केला नाही. उलट त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिल्याने त्यांनी मला पुन्हा भेटायला बोलवून घेतले. माझे कौतुक केले. आमची पुढे चांगली गट्टी जमली. विविध विषयांवर ते मोकळेपणाने बोलायचे. त्यांच्यात एखाद्या लहान मुलासारखा निरागसपणा होता. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचेही त्यांना कौतुक वाटायचे.
त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी तटस्थपणे माझी पाठराखण केली नसती तर मला मुंबई सोडावी लागली असती. मी जळगाव सारख्या ‘गावातून’ मुंबईत गेलो होतो. मुंबईची संस्कृती मला माहीत नव्हती. न्याय व्यवस्थेची पूजा बांधताना मी कधीच कोणापुढे लाचार झालो नाही. सद्विवेक सोडला नाही. मी फार काही वेगळे करतोय असेही मला कधी वाटले नाही. जे केले तो माझ्या कामाचाच एक भाग आहे. मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी स्वतःहून पुढाकार घेतला नसता तर कदाचित आजचा उज्ज्वल निकम दिसला नसता.
मुंबई बॉम्बस्फोट, गुलशनकुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन खून खटला, कसाबची फाशी अशा अनेक प्रकरणात सरकारी वकील म्हणून मला काम पाहता आले. या व अशा सर्व महत्त्वाच्या प्रकरणात मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो. लोकांच्या मनात विश्‍वास निर्माण झाला. मात्र मुंडे साहेबांनी त्यावेळी बाळासाहेबांना समजावून सांगितले नसते तर मी जळगावपुरताच मर्यादित राहिलो असतो. फक्त विद्वत्ता असून चालत नाही, तर ती सिद्ध करण्याची संधी मिळावी लागते. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यतत्पर, प्रामाणिक आणि तटस्थ वृत्तीच्या नेत्यामुळे ही संधी मला मिळाली.
या नेत्याचे अपघाती निधन सर्वांनाच चटका लावणारे आहे. बिनधास्त बोलणारी एक धडधडती तोफ अकाली थंडावली आहे. मैत्रीला आणि दिल्या शब्दाला जागणारा हा नेता सामान्यांच्या हितासाठी लढला. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त (3 जून) माझ्यातर्फे त्यांना विनम्र श्रद्घांजली.

- उज्ज्वल निकम (विशेष सरकारी वकील)
(शब्दांकन: घनश्याम पाटील, संपादक 'चपराक' पुणे)

झक मारली अन पुरस्कार दिला!

डॉ. प्रभा अत्रे  
मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचे ठरवले. याबाबत बाळासाहेबांना सांगताच ते म्हणाले, ‘‘आपलेच सरकार असताना आपणच पुरस्कार घेणे योग्य नाही. महाराष्ट्रात या पुरस्काराच्या योग्यतेचे अनेकजण आहेत. पु. ल. देशपांडे हे आघाडीचे लेखक त्यासाठी मला पात्र वाटतात. हा पुरस्कार त्यामुळेच माझ्याऐवजी त्यांना देणे योग्य ठरेल.’’
बाळासाहेबांच्या या निर्वाळ्यानंतर पाच लाख रूपये व पहिला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार पुलंना देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभात बोलताना पुलंनी मात्र औचित्यभंग करत काही गोष्टी मांडल्या. शिवसेनेच्या सत्तेकडे बोट दाखवत त्यांनी ‘ही लोकशाही नसून ठोकशाही आहे,’ असे प्रतिपादन केले. पुरस्काराची रक्कम मात्र त्यांनी स्वीकारली. एखाद्या सुहृदयी माणसाने आपणास आग्रहाने जेवायला बोलवावे, पंचपक्वान्नाचा बेत आखावा आणि जेवायला येणार्‍याने अन्नदात्यालाच दूषणे लावावीत, असा काहीसा प्रकार घडल्याने बाळासाहेबांच्या प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच होते. ‘झक मारली अन् आम्ही पुरस्कार दिला’ अशा खास ठाकरी शैलीत बाळासाहेबांनी त्यांचा समाचार घेतला.
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पुणे महानगरपालिकेने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मरणार्थ ‘स्वरभास्कर’ पुरस्कार जाहीर केला. तो वेळेत न दिला गेल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आणि अत्रेंनी हा पुरस्कार नाकारला. यावरून पुणे महानगरपालिकेवर टीकेची झोड उठवली जात आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी याबाबतचा खुलासा करताना अत्रे यांच्याशी झालेला पत्रव्यवहार माध्यमांच्या समोर आणला आहे. या पुरस्काराबाबत अत्रे यांनी अनेक अटी लादल्यानेच या कार्यक्रमाला उशीर होत असल्याचे सिद्ध झाले आहे. अत्रेबाई या ज्येष्ठ असल्या तरी बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रतिक्रिया आज आम्हाला स्मरते.
हा पुरस्कार कुणाच्या हस्ते दिला जावा, कार्यक्रमाचे स्वरूप काय असावे, कार्यक्रमाच्यावेळी अत्रे यांच्या जीवनपटाची चित्रफीत दाखवली जावी, पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या नावे चालू असलेल्या  एका संस्थेस ७५ हजार रूपये देण्यात यावेत, अशा काही अटी त्यांनी घातलेल्या आहेत. प्रकाश जावडेकर, मनोहर पर्रीकर आणि माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याच हस्ते हा पुरस्कार द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पुरस्कार घेणार्‍याने पुरस्कार देणार्‍यांना अशा अटी घालण्याचे धाडस आश्‍चर्यकारक आहे. अत्रे यांच्याविषयी नितांत आदर असूनही त्यांच्या या हेकटपणाचे समर्थन करता येणार नाही.
एखादी व्यक्ती किंवा संस्था सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतरच तिची पुन्हा घसरण सुरू होते हा सृष्टीचा नियम आहे. भलेभले याला अपवाद ठरू शकले नाहीत. डॉ. प्रभा अत्रे यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदरभावना असतानाच त्यांनी विक्षिप्तपणा दाखवून दिल्याने त्यांची घसरण सुरू झाली आहे. ‘हा पुरस्कार वेळेत मिळावा म्हणून आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो,’ असे सांगणार्‍या अत्रेबाई पुरस्कार आपल्या परवानगीशिवाय जाहीर केल्याचेही सांगतात. केवळ भाजप नेत्यांच्याच हस्ते पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करणार्‍या अत्रेबाई अन्य कोणत्याही राजकीय नेत्याने मात्र या पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यासपीठावर येऊ नये, हे ठासून सांगतात. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या पुणे महानगरपालिकेने हा पुरस्कार जाहीर केल्याने राष्ट्रवादीची कोंडी करणे, त्यांची प्रतिमा मलीन करणे या उद्देशाने तर हा सारा बनाव केला जात नाही ना? अशी शंका येण्यास त्यामुळेच मोठा वाव आहे. राज्यातील महत्त्वाची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे महानगरपालिकेने अत्रे यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. असे असताना त्यांच्यावर अटी लादणे, आपणास हवे ते करवून घेणे यामागे अत्रे याच आहेत की अन्य कोणती विचारधारा सुप्तपणे त्यांची पाठराखण करतेय हेही तपासून घ्यायला हवे.
‘मी पुण्याची नागरिक असून गेल्या८३ वर्षात महापालिकेने मला कोणताही पुरस्कार दिला नाही,’ अशी खंत व्यक्त करणार्‍या प्रभा अत्रे पुणे महापालिकेचा अवमान करत आहेत. कोणताही कलाकार त्याच्या कलेला सर्वस्व मानतो. त्या त्या क्षेत्रातील दर्दींचा त्याला मिळणारा प्रतिसाद हाच त्याच्यासाठी मोठा पुरस्कार असतो. राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेकडून त्याने कौतुकाची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. कलावंतांचा सन्मान करणे हा मात्र यंत्रणेचा धर्म असतो. पुणे महापालिका हा धर्म पार पाडत असताना अशी मुजोरी कोणीही करू नये.
लोककवी मनमोहन नातू म्हणायचे, ‘उद्याचा कालीदास जर अनवाणी पायाने जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते.’ या प्रकरणात मात्र राजा भोज त्याचे कर्तव्य चोखपणे पार पाडत असताना कालीदास अकारण स्वत:ची आणि भोजाची अब्रू घालवत आहे. इतके सारे होऊनही पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे आणि उपमहापौर आबा बागुल यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ‘डॉ. प्रभा अत्रे यांची नाराजी दूर करू, त्यांच्या अटींचे शक्य तितके पालन करून त्यांचा जाहीर समारंभातून गौरव करू’ असेच ते सभ्यपणे सांगत आहेत. ही सभ्यता अत्रे यांच्याकडून पायदळी तुडवली जात आहे. त्यांच्या वयाचा मान राखून, त्यांची कर्तबगारी लक्षात घेऊन आणि या पुरस्काराचे महत्त्व समजून पुणे महापालिका पडती भूमिका घेत असेल तर अत्रे यांनी अतिरेक करू नये. समस्त पुणेकरांचा हा एकप्रकारचा अवमानच आहे. कारण हे पुरस्कार शेवटी करदात्यांच्या खिशातूनच दिले जातात.
सध्या गल्लोगल्ली अनेक पुरस्कार दिले जात असताना पुरस्काराचे महत्त्व कमी कमी होत चालले आहे. एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर गौरव वाटण्याऐवजी लोक त्याच्याकडे उपहासाने पाहतात. वशिलेबाजी, चमचेगिरी, हितसंबंध अशा प्रकारामुळे आपल्या मर्जीतल्या लोकांना पुरस्कार दिल्याने त्याची प्रतिष्ठा लयास जात आहे. एकाच व्यक्तिला, एकाच कामगिरीसाठी, एकाच संस्थेकडून सलग तेरा-तेरा वर्ष पुरस्कार मिळाल्याचे यापूर्वी आपण पाहिलेलेच आहे. अशा परिस्थितीत पुणे महापालिका डॉ. प्रभा अत्रे यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिकेला पुरस्कार देत असेल तर अशा पुरस्कारांना पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त होईल. पुरस्कार घेणार्‍यांनी आपला संकुचितपणा आणि आत्मकेंद्रित प्रवृत्ती दाखवून देत ‘पुरस्कार’ या संकल्पनेचा ‘कचरा’ करू नये एवढीच या निमित्ताने माफक अपेक्षा व्यक्त करत आहोत.
- घनश्याम पाटील 

संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 


Saturday, May 23, 2015

जुने जाऊ द्या मरणालागूनि...!


निजामाची जुलूमी राजवट उलथवून लावत 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला. तेव्हापासून मराठवाड्याच्या विकासाच्या गप्पा कायम रंगतात. ‘दुष्काळी भाग’ म्हणून सातत्याने रडगाणे गाणार्‍या मराठवाड्याला चार मुख्यमंत्री लाभले. दोन केंद्रीय गृहमंत्री लाभले. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या नेत्याला तर कित्येक वर्षे मंत्रीपदाची उब मिळाली. शिवराज पाटील चाकुरकर हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही देशाचे गृहमंत्री झाले. सत्तेत कायम असूनही मराठवाडा मात्र मागासलेलाच राहिला. ‘राजकीय इच्छाशक्तीचा अभाव’ हे त्यामागचे एक प्रमुख कारण सांगितले जात असले तरी वर्षानुर्षे ‘मागास’लेपण मिरवणार्‍या जनतेविषयी मात्र आमच्या मनात करूणा आहे.
मराठवाड्याचा पाणीप्रश्‍न गंभीर आहे. दुष्काळी भागात टँकर पुरवठा असेल किंवा अन्य प्रकारची मदत असेल, यात होणारा गैरव्यवहार दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. लातूर, धाराशिव, नांदेड, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड अशा आठ जिल्ह्यांचा समावेश मराठवाड्यात होतो. लातूरला स्वर्गीय विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकुरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर असे नेते लाभले. तरीही लातूर विकासासाठी आतूरच आहे. नांदेडला कै. शंकरराव चव्हाण आणि त्यांचे सुपूत्र अशोकराव चव्हाण यांच्यासारखे नेते मिळाले; मात्र त्यांच्या ‘आदर्श’ कामगिरीमुळे ते कायम चर्चेत राहिले. डॉ. पद्मसिंह पाटील हे अजित पवारांचे मेव्हणे; मात्र त्यांनी किमान धाराशिव शहराचाही विकास केला नाही.
संभाजीनगर शिवसेनेसारख्या लढावू पक्षाच्या ताब्यात आहे. मात्र तिथली परिस्थितीही अभिमान बाळगावा, अशी नाही. जालन्याच्या दुष्काळी परिस्थितीविषयी तर केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार यांनीही जाहीरपणे चिंता व्यक्त केली होती. पाण्याची उपाययोजना नसल्याने सातत्याने  दुष्काळाला सामोरे जावे लागणार्‍या मराठवाड्याची अवस्था दयनीय आहे. संघर्षाची परंपरा असलेला मराठवाडा कुचकामी राजकारण्यांच्या मागे फरफटत जातो, याचे प्रत्येक विचारी आणि बुद्धीवादी माणसाला सखेद आश्‍चर्य वाटते. 
आपल्याकडे काय आहे, यापेक्षा काय नाही, हे रडगाणे गाण्यातच धन्यता मानणार्‍या संकुचित वृत्तीच्या नेत्यांनी मराठवाड्याची कायम उपेक्षा केली आहे. त्यामुळे लोकही उठसूट त्याच त्या विषयांवर चर्चा करतात. वैभवशाली मराठवाड्याच्या विकासाचे पर्व आता सुरू व्हायलाच हवे. बुरसटलेल्या अमंगळ कल्पना बाजूला सारून नवीन पिढीने आता परिवर्तनाची कास धरायला हवी. आजही मराठवाड्यातील निरक्षरांचे प्रमाण चिंताजनक आहे. प्रौढ साक्षरता वर्गापासून सरकारने सर्व प्रयोग राबवले; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. ग्रामीण भागात लोक पिचले जातात. शेतीसाठी वीज, पाणी अशा मुलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने पाठीचा कणा कायम सावकारापुढे झुकलेला असतो. परिणामी स्वाभिमान गहाण पडून लाजिरवाणे जीवन जगावे लागते. 
दिल्लीच्या कॅनॉट प्लेसनंतर आश्‍चर्यकारक भुलभुलैय्या असलेली गंजगोलाई लातूरात आहे. लातूरमधील तूर आणि गुळाची बाजारपेठ सर्वत्र प्रसिद्ध आहे. तुळजापुरात महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीचे देऊळ आहे. संत गोरोबाकाकांचे तेर हे गाव धाराशिव जिल्ह्यातच आहे. वेरूळ अंजठ्याच्या लेण्या किंवा पैठणचे संत एकनाथ महाराजांचे मंदिर हे मराठवाड्याचे वैभव आहे. नांदेडचे सुवर्णमंदिर देशभर प्रसिद्ध आहे. नळदूर्ग, भूम परंडा, उदगिर येथील किल्ले इतिहासाचे पान नजरेसमोर आणून देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा मुक्त विद्यापीठ असेल किंवा परभणीचे कृषी विद्यापीठ असेल ही अशी अनेक ज्ञानकेंद्रे मराठवाड्याची झलक दाखवून देतात. ‘लातूर पॅटर्न’चा अभ्यास आज सर्वत्र केला जातो. शालेय गुणवत्तेत अव्वल ठरणारी मुले जीवनाच्या परीक्षेत मात्र सपशेल का आपटतात, याचे चिंतन करण्याची वेळ आता आलेली आहे. 
कर्नाटकसारख्या शेजारच्या राज्यात तीर्थक्षेत्रांचा उपयोग चक्क लोकांच्या उपजिविकेसाठी केला जातो. देवाविषयी आपल्या मनात नितांत श्रद्धा असली तरी या अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आता आपल्याला आपल्याकडील देवस्थानांचा पर्यटनातील संधीच्या दृष्टीने विचार करायला हवा. भक्तांची लुबाडणूक न करता ज्यांना ज्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यांना त्यांना अशा संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक स्थळांची रेलचेल असणारा संपन्न मराठवाडा कुणालाही उपाशी मरू देणार नाही. फक्त त्यादृष्टिने प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. 
कोकणसारख्या भौगोलिकदृष्ट्या विचित्र भागात रेल्वे जाऊ शकते तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात रेल्वेचे जाळे निर्माण करणे ही तशी फारशी अवघड बाब नाही. रेल्वेच काय, मराठवाड्यातील वाड्या वस्त्यापर्यंत मेट्रो नेणेही सहज शक्य आहे. दळणवळणाची अशी विपुल साधने उपलब्ध झाली तर मराठवाड्यात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी त्यानंतर रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता फक्त आणि फक्त मराठवाड्यातच आहे.
स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत आहे. मात्र मराठवाड्यातील बांधवांनी अशी वेगळी मागणी कधी केली नाही आणि करणारही नाहीत. पुण्या-मुंबईसह जर वेगळा मराठवाडा शक्य असेल तरच अशी मागणी होऊ शकते. मराठवाडा हे महाराष्ट्राचे एक अविभाज्य अंग आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रानेही मराठवाड्यातील बांधवांच्या सुखदुःखाचा विचार करावा.
17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त फक्त मराठवाड्यात एक दिवस शासकीय सुटी दिली जाते. निजामाशी संघर्ष हा फक्त या आठ जिल्ह्यांचा विषय नव्हता. त्याचे महत्त्व आणि सामर्थ्य फार मोठे आहे. शासकीय सुटीमुळे फायदा काहीच होत नाही, उलट राष्ट्राचे नुकसानच होते; पण मराठवाड्यातील शाळा-महाविद्यालयांतून, विविध कार्यालयातून जसे मुक्तीदिनाचे कार्यक्रम होतात तसे ते महाराष्ट्रभर किंबहुना भारतभर व्हायला हवेत, अशी अपेक्षा अनेक विचारवंतांकडून सातत्याने व्यक्त केली जाते. यादृष्टीने सरकारनेही विचार करावा. हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगायला हवे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या एका शिक्षकाने लोकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आणि क्रांतीच्या ज्या ज्वाला प्रज्वलीत केल्या त्याचा स्फोट करण्याची खरी वेळ येवून ठेपली आहे.
येत्या 30 सप्टेंबरला किल्लारी भूकंपाला वीस वर्षे पूर्ण होतील. या वीस वर्षांचा मागोवा घेतला तर मराठवाड्याची संघर्षाची आणि प्रतिकुलतेतून मार्ग काढण्याची परंपरा खंडित झाली नाही, हे सप्रमाण अधोरेखित होते. नैसर्गिक आपत्ती असेल अथवा मानवनिर्मित! मराठवाड्यातील लढवय्या बाधवांनी कधीही धीर सोडला नाही. 
मराठवाड्यातील दुसर्‍या फळीतील राजकीय नेत्यांकडून विधायक कामाच्या अपेक्षा ठेवता येवू शकतात. या पिढीला बर्‍यावाईटाची जाण आहे. लोकांच्या सुखदुःखाशी एकरूप झालेले हे युवा नेते सकारात्मक विचारधारेचे आहेत. त्यांनी ठरवले तर मराठवाडा यशाचे शिखर पादाक्रांत करत राहील. अन्यथा गरीबी, बेकारीत होरपळणार्‍या मराठवाड्याची ससेहोलट कोणीही थांबवू शकणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. इतिहासातून बोध घेतानाच आता जुन्या, बुरसटलेल्या संकल्पनांना तिलांजली देऊन नवनिर्माणाची वाट धरणे हेच प्राप्त परिस्थितीत शहानपणाचे ठरणारे आहे.
('चपराक प्रकाशन'च्या झुळूक आणि झळा या पुस्तकातून )


Monday, May 18, 2015

वैचारिक भ्रष्टतेविरुद्धची लढाई!

'चपराक'चे नवे पुस्तक 

लॉर्ड मेकॉले याची अवलाद शोभावेत असे अनेक महाभाग आपल्याकडे आहेत. ‘जातीजातीत, धर्माधर्मात फूट पाडा, येथील लोकाच्या भक्कम असलेल्या श्रद्धा कमकुवत करा, त्यांची शिक्षणव्यवस्था तकलादू करा आणि या देशावर हवे तसे राज्य करा’  असा मंत्र मेकॉलेने ब्रिटिशांना दिला आणि आपल्या नशिबी गुलामीच्या शृंखला आल्या. पुढे असंख्य क्रांतिविरांच्या बलिदानातून, त्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले; मात्र या मेकॉलेची पैदास पुरती नष्ट झाली नाही. त्याने जे तत्त्वज्ञान सांगितले त्यानुसार आपल्या समाजात जी फूट पडली आहे ती प्रयत्नपूर्वकही दूर होत नाही. मुख्य म्हणजे आपलेच अनेक बांधव यात सदैव आघाडीवर असतात.
एखाद्याची पैशात फसवणूक केली तर ती भरून येऊ शकते, मात्र जर कोणी एखाद्याच्या श्रद्धेला, विश्‍वासाला तडा दिला तर त्यातून सावरणे कठीण असते. अशा भंगलेल्या मनात क्रांतीच्या ज्वाला पेरणे हे महाकठीण काम होऊन बसते. ‘वाचकांना ज्ञानी आणि जागरूक करण्याचे व्रत’ स्वीकारलेल्या आपल्या प्रसारमाध्यमांची प्रतिमाही अशीच तडकली आहे, भंगली आहे. ‘विकाऊ’ वृत्तीच्या पत्रकारांमुळे हे क्षेत्र पुरते बदनाम झाले आहे. सत्य आणि न्याय भूमिका न घेता जसा धंदा होईल तसा गल्ला भरायचा, या वृत्तीमुळे साहित्य आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनेकांची बुद्धी गंजली आहे. भूमिका न घेणारे लेखक आणि पत्रकार किंवा सोयीस्कर भूमिका घेणारे ‘विद्वान’ यामुळे ज्ञानाचे हे क्षेत्र डागाळले आहे. ‘आपण सांगू तेच खरे’ या वृत्तीमुळे अशा स्वयंघोषित विचारवंतांनी समाजमन कलुषीत केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या दोन प्राध्यापकांनी त्यांच्या ‘तोकड्या’ कुवतीनुसार, सुमार आकलनानुसार ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’  हा ग्रंथ लिहिला आणि ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित केला. प्रकाशक दिनकर गांगल आणि अरूण साधू या दोघांनी या लेखकद्वयींना ‘मार्गदर्शन’ केले, सहकार्य केले आणि ‘अगा जे घडलेच नाही‘ तेही यांच्या ‘दिव्य’दृष्टिला दिसू लागले. केवळ शरद पवार यांची पाठराखण करण्यासाठी या सर्व ‘विचारवंतांनी’ त्यांना हव्या तशा थापा मारत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘ वाचकांच्या हाती दिले. प्रत्येक परिच्छेदाला धडधडीत खोटी विधाने करत, वाचकांची दिशाभूल करत आपण फार मोठे तीर मारलेत अशा आविर्भावात या सर्वांनी पुढे विचाराच्या क्षेत्रात बिनदिक्कतपणे दुकानदारी सुरू केली.
ओंजळीत धरून ठेवलेले पाणी कितीकाळ टिकणार? त्याप्रमाणेच सत्य हे फार काळ लपून राहत नाही. या पुस्तकाचा सर्वत्र गवगवा होत असतानाच सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी हे पुस्तक वाचले आणि त्यातील फोलपणा पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. भाऊ तोरसेकर यांची पत्रकारिता आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मध्ये सुरू झाली आणि बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’मध्ये बहरली. सदैव जागता पहारा देणार्‍या भाऊंनी हा धादांत खोटेपणा लेखक आणि प्रकाशकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी ‘ग्रंथाली‘च्या प्रकाशकांनी आणि या लेखकद्वयींनी भाऊंना पत्र लिहून माफी मागितली आणि पुस्तकातील ‘चुका‘ तपासून घेण्यासाठी थोडा वेळ मागितला. स्वतःच लिहिलेल्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी लेखकाला किती वेळ लागावा?  19 ऑगस्ट 1997 पासून आजपर्यंत त्यांचा ‘अभ्यास‘च सुरू आहे आणि दुसरीकडे या पुस्तकाच्या आवृत्यावर आवृत्त्या निघाल्या आहेत. सुहास पळशीकर यांच्यासारखा माणूस सार्वजनिक जीवनात ज्या बेमालूमपणे भाषणबाजी करत असतो तो पाहता हा वेश्येेने पतिव्रता धर्म शिकवण्याचा भाग वाटतो. व्होरा आणि पळशीकर यांच्या चुकीच्या नोंदी व खोटेपणाला आक्षेप घेत भाऊंनी त्यांची परखड आणि सत्यनिष्ठ चिकित्सा करत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर‘चा प्रतिवाद केला आहे. येत्या 21 मे रोजी भाऊंनी प्रतिवाद केलेले हे पुस्तक ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट‘ या नावाने ‘चपराक प्रकाशन‘कडून प्रकाशित होत आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन सत्याचा कैवार घेणार्‍या उज्ज्वल निकम यांच्यासारख्या लढवय्या सरकारी वकीलाच्या हस्ते होत आहे, हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.
‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या विषयावर लिहिताना आणि ते प्रकाशित करताना लेखक आणि प्रकाशकांचे ‘मडके’ कच्चे होते असेही म्हणता येत नाही, कारण हा इतिहास केवळ पवारांची आरती ओवाळण्यासाठी आणि सेनेला कमी लेखण्यासाठी मांडलाय हे पानापानावर जाणवते. व्होरा आणि पळशीकरांनी त्यांच्याच पुस्तकात जे संदर्भ दिलेत, जी मांडणी केलीय त्याच्याशी विसंगत मजकूर त्याच पुस्तकात दिलाय. ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ अशातला हा मामला आहे. धडधडीत खोटी विधाने पेरत, आपल्या ‘धन्या’शी प्रामाणिक राहत हे पाखंडी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बदलायला निघालेत. जे घडलेच नाही ते यांनी कसलीही लाज न बाळगता ठोकून दिले आहेच; पण ‘महाराष्ट्रातील सत्तांतरा’च्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार्‍या व राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार्‍या अनेक घटनांना त्यांनी जाणीवपूर्वक टांग मारली आहे. भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या पुस्तकात या खोटेपणाची जंत्रीच दिली आहे.
शालीनीताईंची मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून झालेली नाईकविरोधी मोहिम (1973), बाळासाहेब देसाईंचा मंत्रीमंडळातून राजीनामा, पी. के. सावंत, राजाराम बापू पाटलांना अर्धचंद्र, तुळशीदास जाधव, आनंदराव चव्हाण यांची यशवंतराव विरोधी खुली मोहिम (1970-74), शंकरराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळातून वसंतदादांना अर्धचंद्र, रजनी पाटील यांच्या मुंबई कॉंग्रेसकरवी महाराष्ट्र कॉंग्रेसला शह, 1960 पासून यशवंतरावांनी विरोधी नेत्यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याचा लावलेला सपाटा, लाटेच्या राजकारणाने मोडून पडणारी कॉंग्रेस संघटना, टाळलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका (1970-80), मुंबईचा ऐतिहासिक गिरणी संप आणि त्यानंतर शिवसेनाला मिळालेली पालिकेतील सत्ता (1985), पवारांच्या नेतृत्व काळात डाव्या पक्षात आलेले शैथिल्य आणि नंतरचे पांगळेपण-दिशाहीनता (1986), औरंगाबाद महापालिकेत सेनेचा देदीप्यमान विजय, पार्ला पोटनिवडणुकीत हिंदुत्त्वावर जनतेचे शिक्कामोर्तब, 1991 ला संक्रांतीदिवशी पवारांच्या विरोधात चार मंत्र्यांनी पुकारलेले बंड, शहाबानू निकाल व रूपकुवर सतीचे वादळ अशा कितीतरी घटना ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ लिहिणार्‍या व्होरा आणि पळशीकरांनी दुर्लक्षित ठेवल्या आहेत. राज्यशास्त्राच्या सामान्य विद्यार्थ्याला या घटनांचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही तिथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील या विभागाचे प्रमुख प्राध्यापक नालायक ठरले. ‘झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही’ या म्हणीप्रमाणे या प्राध्यापकांची लबाडी केवळ शरद पवारांची तळी उचलून धरण्यासाठी होती हे कुणाच्याही सहजपणे ध्यानात येईल.
मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणाचा डोळस अभ्यास असलेल्या भाऊ तोरसेकर यांनी सातत्याने सत्य पुढे आणण्यासाठी आपली लेखणी झिजवली आहे. त्यांच्या ब्लॉगचे सात लाखाहून अधिक वाचक आहेत. त्यांचे अचूक राजकीय विश्‍लेषण महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवले आहे. ‘चपराक प्रकाशन’ची सुरूवातीपासून ‘संवाद आणि संघर्ष’ हीच भूमिका असल्याने वैचारिक भ्रष्टतेच्या लढाईत भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या चतुरस्त्र लेखकाची निर्भिड आणि निःपक्ष बाण्याचे दर्शन घडविणारी काही पुस्तके लवकरच आपल्या भेटीस आणत आहोत. तुर्तास, ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाद्वारे भाऊ तोरसेकर यांनी राजकीय विश्‍लेषक आणि विचारवंत म्हणून सर्वत्र मिरवणार्‍यांचे जे बुरखे फाडले आहेत ते वाचकांनी आवर्जून वाचावेत, अभ्यासावेत, पडताळून पहावेत. यातूनच कणखर बाण्याची एक जबाबदार पिढी घडण्यास हातभार लागणार आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

Sunday, May 17, 2015

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’

सुप्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक येत्या 21 मे रोजी प्रकाशित होत आहे. ‘चपराक प्रकाशन’ने हे पुस्तक प्रकाशित केले असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची तटस्थपणे आणि प्रांजळ भूमिकेतून केलेली परखड चिकित्सा या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. त्याविषयी थोडेसे...

‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’
'चपराक प्रकाशन,'पुणे 

पुणे विद्यापीठातील राजेंद्र व्होरा आणि सुहास पळशीकर या दोन प्राध्यापकांनी चुकीच्या नोंदी व खोटेपणा करत ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ हे पुस्तक लिहिले आणि ‘ग्रंथाली’ या मान्यवर प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केले. अनेक न घडलेल्या घटना, प्रसंग अथवा अस्तित्त्वात नसलेल्या गोष्टी, काल्पनिक माहिती-घटनांवर  आधारित केलेली विधाने व निष्कर्ष देऊन वाचकांची दिशाभूल या प्राध्यापकद्वयींनी केली. सामाजिक बांधीलकीची भाषा बोलणार्‍या व्यक्ती व संस्थांकडून झालेली अशी बेपर्वाई, दडपेगिरी खटकल्याने सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी ही बाब संबंधित लेखक आणि प्रकाशकांच्या लक्षात आणून दिली. दोघांनीही तोरसेकर यांची लेखी दिलगिरी व्यक्त करत पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे मान्य केले. मात्र 1997 पासून आजवर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि त्यात तोरसेकर यांनी निदर्शनास आणून दिलेल्या सर्व चुका तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत. या वैचारिक भ्रष्टतेचा पर्दाफाश  करणारे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक पुण्यातील ‘चपराक’ या अग्रगण्य प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होत आहे. 
‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या पुस्तकात शब्दाशब्दात चुकांची जंत्री देण्यात आली आहे. शरद पवार यांचे गुणगाण करण्यासाठी, वाचकांच्या मनात त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठीच हे पुस्तक लिहिले आहे की काय अशी शंका येण्याइतपत खोटे संदर्भ पेरण्यात आले आहेत. या चुकीच्या व धडधडीत खोट्या माहितीने वाचकांची दिशाभूल होत आहे. उदा. लेखक आपल्या ‘महाराष्ट्राचे सत्तांतर’ या पुस्तकात पृष्ठ क्र. 6 वर लिहितात की, ‘‘अल्पवाधितच त्यांनी (शरद पवारांनी) संयुक्त मंत्रिमंडळाला सुरूंग लावला आणि अठरा आमदारांसह समाजवादी कॉंग्रेस या नावाने प्रादेशिक गट स्थापन करून बिगर कॉंग्रेस पक्षांचे नेतृत्त्व स्वत:कडे घेतले.’’
हे धादांत खोटे विधान खोडून काढताना भाऊ तोरसेकर पुढील वस्तुस्थिती मांडतात. ‘‘पवारांनी स्थापलेल्या गटाचे नाव समांतर कॉंग्रेस होते, कारण त्याच काळात शंकरराव चव्हाण, विखे-पाटील यांचा महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस नावाचा प्रादेशिक पक्ष अस्तित्त्वात होता. पुलोदचा भागीदार म्हणून त्याचे नेते शंकरराव चव्हाण पवार सरकारात अर्थमंत्री होते.’’
प्रत्येक पानावरील अशा विधानांची अभ्यासपूर्वक चिकित्सा केल्याने भाऊ तोरसेकर यांचे हे पुस्तक केवळ ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’चा प्रतिवाद करणारे ठरले नसून, महाराष्ट्राचा राजकीय सत्य इतिहास उलगडून दाखविणारे झाले आहे. ‘मराठा’ सारख्या मान्यवर दैनिकातून पत्रकारितेची सुरूवात झालेल्या भाऊ तोरसेकर यांची निर्भिड व नि:पक्ष लेखनासाठी ख्याती आहे. राज्यशास्त्राचे आणि पत्रकारितेचे विद्यार्थी, महाराष्ट्राविषयी जिज्ञासा असणारे वाचक यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणारे आहे. 
 शरद पवारांची अब्रू झाकण्याच्या नादात ‘ग्रंथाली प्रकाशन’ची स्थिती शरद पवारांसारखीच होईल आणि ही संस्था रसातळाला जाईल असा धोका तोरसेकर यांनी या पुस्तकातून वर्तविला आहे. ‘चपराक’सारख्या परखड बाण्याच्या प्रकाशन संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित होत असल्याने या विषयाला पुरेपुर न्याय मिळणार आहे.

Sunday, May 10, 2015

वादाला का भीता?

संजय सोनवणी (साहित्यिक आणि संशोधक)

... होय, संजय सोनवणी हे एक तटस्थ वृत्तीचे आणि ठाम भूमिका घेणारे साहित्यिक आहेत. वेगवेगळ्या साहित्य प्रवाहात कणखर आणि परखड भूमिका घेऊन त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले असले तरी त्यांनी सत्याची कास सोडली नाही. त्यांच्या काही भूमिकांविषयी मतभेद जरूर असू शकतात; मात्र हा माणूस नेक वृत्तीचा आणि साहित्य क्षेत्राशी प्रामाणिक आहे हे मान्य करावेच लागेल.
सध्या एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे दिवस आहेत, तर दुसरीकडे या स्वातंत्र्याचा अतिरेकही केला जातो. मध्यंतरी  पेरूमल मुरूगन या लेखकाने या व्यवस्थेला कंटाळून स्वतःतील लेखकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, हा  आपल्याकडील काळाकुट्ट इतिहास आहे. ही मुस्कटदाबी कुणा एका विचारधारेकडून, समाजाकडून होते असे नाही. सत्य काय हे जाणून न घेता केवळ आपला स्वार्थ पुढे दामटण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे.
क्षमा आणि शांतीचा संदेश देणार्‍या आपल्या देशात आजवर अनेक समाजद्रोह्यांनी थयथयाट सुरूच ठेवला आहे. राजकीय लाभापायी इथल्या पोखरलेल्या व्यवस्थेने अशा दुष्प्रवृत्तींना सातत्याने खतपाणी घातले. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा तो स्वबळावर पूर्ण करू शकतोय. इतकी समज आणि कुवत त्याच्यात निर्माण होण्याइतपत बदल नक्की झालाय. मात्र तरीही समाजाच्या अनेक गरजा आज दुर्लक्षित आहेत. साहित्य आणि संस्कृती हा आपल्या आदर्श समाजरचनेचा पाया आहे. तो मात्र दिवसेंदिवस तकलादू होत चालला आहे.
’महाराष्ट्र भूषण’ श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांची संपूर्ण हयात शिवसेवेसाठी घालवली. युगपुरूष शिवरायांचे चरित्र तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी जे कष्ट घेेतले, जे कार्य उभे केले त्याला तोड नाही. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला समाज घडू शकेल, लोकापुढे शौर्य आणि पराक्रमाची मशाल तेवत राहील यादृष्टिने बाबासाहेबांनी जे कार्य उभे केले आहे त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांचे हे काम अद्वितीय आहे. महाराष्ट्र सरकारने उशीरा का होईना पण त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. असे सारे असताना काही विकृत मनोवृत्तीचे लोक त्यांच्यावर खोटे आरोप घेऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्राला जात, धर्म, प्रांत यावरून भांडत राहणे परवडणारे नाही, हे ठाऊक असूनही केवळ स्वतःचा स्वार्थ पुरा करण्यासाठी काहीजण आपल्यात भांडणे लावण्याचे उद्योग सुरू ठेवत आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांनी जे लेखन केले त्यातील आपल्याला हवा तो भाग, हव्या त्या पद्धतीने घेऊन टाळकी भडकवण्याचे काम वेगात सुरू आहे. आजची विचारी तरूणाई अशा भूलथापांना बळी पडणार नाही, मात्र त्यांच्यापुढे यातील सत्य आले पाहिजे. बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथातील काही वाक्ये उचलून, त्याचे कपोलकल्पित संदर्भ जोडून समाजात दुही निर्माण करण्याचे कारस्थान सुरू आहे. अशा बिकट वेळी संजय सोनवणी या लढवय्या लेखकाने अत्यंत अभ्यासपूर्वक, जिद्दीने सत्य पुढे आणण्याचा चंग बांधला. बाबासाहेबांचे पुस्तक त्यांनी अभ्यासले आणि तथाकथीत काही अविचारी लोकाचे सर्व आरोप पुराव्यासह खोडून काढले. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जे आक्षेप घेतले जात होते ते राजकीय हेतूने, पूर्वग्रह ठेवून आणि जातीय भूमिकेतून होते हे सिद्ध झाले. अशाने आधीच बंद पडत चाललेली आपली दुकानदारी बंद होणार, हे ध्यानात येताच काही ब्रिगेडी टाळकी पेटून उठली आहेत. वाटेल त्या थराला जाऊन, खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे ठरवून हे लोक आपले घोडे पुढे दामटत आहेत. संजय सोनवणी यांनी मुद्देसूदपणे आणि अभ्यासपूर्वक बाबासाहेबांवरील सर्व आरोप फेटाळून लावल्याने यांची गोची झाली आहे.
संजय सोनवणी हे मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की ज्यांचे पुस्तक अमेरिकेत, व्हाईट हाऊस मध्ये ‘रेफरंस बुक’ म्हणून ठेवण्यात आले आहे. मराठी आणि इंग्रजीत त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यांचे साहित्य जगभर वाचले जाते. वंचित, उपेक्षित, भटके विमुक्त, आदिवासी, दलित यांचे सुखदुःख मांडण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या सूड भावनेने वागणार्‍या माणसाला न्यायालयात अधिकृत माफी मागण्यास भाग पाडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर मार्गाने लढत दिली. हिंदू आणि हिंदुत्व या दोन्हीपासून हजारो मैल दूर असणार्‍या सोनवणी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील आरोप विवेकाने खोडून काढले आहेत. त्यासाठी लागणारी सच्चाई आणि अच्छाई त्यांच्याठायी आहे. जातीपातीच्या बाहेर पडून अशी न्याय भूमिका घेणार्‍या आणि धाडसाने सत्य पुढे आणणार्‍या सोनवणी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास पूत्र आहेत. त्यांनी शिवकाल जिवंत केला आहे. एव्हरेस्टसारख्या उंचीचा हा ध्येयवेडा माणूस अनेकांच्या हृदयावर राज्य करतोय. ज्यांचा प्रत्येक श्‍वास शिवमय होऊन गेलाय, ज्यांनी आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण शिवाजीराजांच्या प्रेमात घालवलाय त्यांच्याविषयी आमच्या मनात श्रद्धाभाव आहे. बाबासाहेबांवर केवळ ‘ब्राह्मण’ म्हणून टीका करणे हे काही ‘ब्रिगेडियर’ नेत्यांचे कारस्थान आहे. संभाजीनगर येथे बोलताना बाबासाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ बद्दल अभिनंदन करणार्‍या शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भूमिका मात्र पक्षाची नसून ती त्यांची स्वतःची आहे, असे केविलवाणे विधान केले. यातून पवारांसारख्या नेत्याची विखारी वृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला जवळून पाहता आली.
संजय सोनवणी यांच्या चिकित्सेनंतर नगर येथील ‘शिवप्रहार’ या संस्थेचा अध्यक्ष असलेल्या संजीव भोर नावाच्या एकाने सोनवणी यांना धमक्या देणे सुरू केले आहे. त्याने सोनवणी यांना सूड भावनेने  आव्हान देऊन नगरला बोलवून घेतले. आजपर्यंत अनेकवेळा लेखकांना काळे फासले गेले, त्यांच्यावर शाई टाकण्यात आली, लेखकांचा निषेध करण्यात आला किंबहुना लेखकाला स्वतःतील लेखक मेल्याचेही जाहीर करावे लागले. मात्र मराठीच्या इतिहासात प्रथमच असा एक लेखक पुढे आला की ज्याने आव्हान देणार्‍याला ठामपणे सांगितले,  की ‘‘ठिकाण आणि वेळ तू ठरव, तू मला काळे फासण्याच्या आधी मी तुझ्या कानाखाली ओढतो. तुझ्या मुस्कटात ठेऊन देतो!’’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सांगितले होते की, ‘‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या!’’ सोनवणी यांनी ज्या बेडरपणे हे आव्हान स्वीकारले ते पाहता आता स्वातंत्र्यवीरांचे विचार खोलवर रूजलेत असे मानायला हरकत नाही.
मात्र या संजीव भोरने संजय सोनवणी यांना बोलवण्याचा आततायीपणा केला. आपली आता काही खैर नाही हे ध्यानात येताच त्याने काही महिला गोळा केल्या. संजय सोनवणी यांच्या अंगावर या महिलांना सोडायचे आणि विनयभंग, ऍट्रॉसिटी असे गुन्हे दाखल करायचे असे कारस्थान त्याने रचले. याची माहिती मिळताच नगरला गेलेल्या सोनवणी यांनी माघार घेतली आणि भोर याचा कुटील डाव हाणून पाडला.
आगरकरांनी विचारले होते की, ‘‘वादाला का भीता?’’
ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांची चर्चेची तयारी असते. ते कोणत्याही तात्त्विक वादाला कधीही घाबरत नाहीत. मात्र संजीव भोर याच्यासारख्या भ्याड माणसाने सोनवणी यांच्यासारख्या दिग्गजाला आव्हान देऊच नये. भोर याच्या आडून हे आव्हान सरळ सरळ ‘संभाजी ब्रिगेड’चे आहे हे पुरते ठाऊक असल्याने सोनवणी यांनी ते स्वीकारले पण भोरने पळपुटेपणा करत कट रचला.
बाबासाहेब पुरंदरे आणि संजय सोनवणी यांच्यात वैयक्तिक काहीही संबंध नाहीत. बाबासाहेबांच्या लेखनावर चुकीचे आक्षेप घेतल्याने  संजय सोनवणी यांच्यासारखा एक सत्लेखक दुखावला गेला आणि त्याने सत्य पुढे आणण्याचे काम धाडसाने केले. पुरंदरे आणि सोनवणी या दोन मात्तबर लेखकांची भेट ‘चपराक’च्या पुढाकाराने लवकरच घडवून आणत आहोत, मात्र यात कसलेही राजकारण, स्वार्थ नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. केवळ सत्य पुढे यावे आणि आजच्या तरूणाईच्या मनात जे जातीभेदाचे विष कालवले जात आहे ते दूर व्हावे या प्रांजळ भूमिकेतून संजय सोनवणी यांच्यासारख्या खमक्या लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्यावर सध्या राळ उडवण्यात येत असून त्यांची वैयक्तिक बदनामी केली जात आहे. हे सारे संतापजनक आहे. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वजण संजय सोनवणी यांच्या पाठिशी राहणे, बाबासाहेबांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिचा गौरव करणे हे आपले कर्तव्यच आहे.

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२
संजीव भोर याने संजय सोनवणी यांच्याविरुद्ध अशी राळ उडवली.




Monday, May 4, 2015

महाराष्ट्र भूषण बाबासाहेब!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेताना घनश्याम पाटील
ज्यांच्या श्‍वासाश्‍वासात शिवचरित्र आहे अशा ऋषितुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयाला उशीर झाला हे जरी खरे असले तरी फडणवीस आणि त्यांच्या चमूला यासाठी धन्यवादच द्यायला हवेत. ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात आणि मनामनात पोहोचले त्या वंदनीय बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ देणे ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
माझे 'दखलपात्र' हे पुस्तक आपुलकीने पाहाताना महाराष्ट्र भूषण बाबासाहेब.
देश-विदेशात छत्रपती शिवरायांचे कार्य तळमळीने पोहोचविणार्‍या बाबासाहेब पुरंदरे यांच्या या सन्मानाने छत्रपती शिवरायांविषयी ज्यांना हृदयातून आत्मीयता वाटते, महाराजांविषयी ज्यांच्या मनात डोळस श्रद्धाभाव आहे त्यांचा ऊर गौरवाने भरून आला आहे. वयाच्या 93 व्या वर्षीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ज्या तडफेने, जिव्हाळ्याने कार्यरत आहेत, ते पाहता हे निश्‍चितच देवाचे काम आहे.
11 फेब्रुवारी 2015 रोजी श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा ‘चपराक साहित्य महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. ‘शिवप्रतापकार’ उमेश सणस यावेळी बोलताना म्हणाले होते की, ‘‘इतिहासकाळातील कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला आज भेटण्याची संधी मिळाली असती तरी आपण त्यांना शिवाजीराजांविषयी विचारले असते. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, मदारी मेहतर, राजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणीही किंवा राजांच्यासोबत असणारे कोणीही भेटले असते आणि त्यांना आपण राजांविषयी विचारले असते तर ते निश्‍चितपणे म्हणाले असते की आधी तुम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटा. त्यांच्याकडून शिवरायांविषयी माहिती घेतल्यानंतर जर तुमची काही शंका राहिलीच तर आम्हाला भेटा...’’
सणस यांचे हे विधान अगदी खरे आहे. शिवरायांच्या सहकार्‍यांनी त्यांचे वर्णन केले नसते इतक्या जिवंतपणे महाराज डोळ्यांसमोर आणण्याचे अभूतपूर्व काम बाबासाहेब करतात. गडकोट, किल्ले, संशोधन हेच ज्यांचे आयुष्य बनून राहिले त्यांनी कायम शिवचरित्राचाच ध्यास घेतला. याठिकाणी गोनी दांडेकरांची एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. गोनी तथा अप्पा दांडेकर एसटी बसने महाबळेश्‍वरहून पुण्याकडे येत होते. मुसळधार पाऊस सुरू होता. त्यांनी पाहिले की एक तरूण इतक्या पावसात सायकल चालवत जात आहे. त्यांना जवळून या तरूणाचा चेहरा दिसला आणि ते लगबगीने गाडीतून उतरून त्याच्या जवळ गेले. ‘‘इतक्या पावसात कुठे निघालात?’’ अशी त्यांनी चौकशी केली. त्या तरूणाने सांगितले, ‘‘प्रतापगडावरून हाडपांचा निरोप आलाय. एक शिवकालीन पत्र त्यांना मिळाले आहे. ताबडतोब या. त्यामुळे पुण्यातून निघालो. तिकिटाला पैसे नसल्याने सायकल काढली...’’ हा तरूण म्हणजे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे!
बाबासाहेबांनी शिवसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला आणि महत प्रयासाने तो पूर्णत्वासही आणला. ‘जाणता राजा’ या भव्यदिव्य नाटकाचे प्रयोग त्यांनी जगभर केले. त्यासाठी घोडे, हत्ती त्यांनी रंगमंचावर आणले. भारत इतिहास संशोधक मंडळातून इतिहास संशोधनाची दिशा मिळाल्यानंतर त्यांनी शिवकार्यासाठी त्यांचे आयुष्य समर्पित केेले. कशाचीही तमा न बाळगता त्यांनी सातत्याने राजांची महती लोकापर्यंत जावी, यासाठीच प्रयत्न केले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची जाहीर मुलाखत घेतली. त्यावेळी राज यांनी त्यांना शिवजयंतीवरून प्रश्‍न विचारला. ‘‘शिवजयंतीची नक्की तारीख कोणती?’’ असे विचारताच या शिवशाहीराने जे उत्तर दिले ते प्रत्येकाला विचार करायला लावणारेच आहे. ते म्हणाले, ‘‘हा प्रश्‍न विचारण्याच्या निमित्ताने तुम्हाला शिवाजीराजे आठवले ना! मग तुमच्या मनात शिवरायांचा जन्म झाला. अरे, शिवजयंतीवरून वाद कसला घालता? शिवरायांचे रूप आठवा, त्यांचा प्रताप आठवा. रयतेसाठी त्यांनी जे अमाप काम केले ते आठवा. ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.’’ इतके छान आणि तात्त्विक उत्तर बाबासाहेब त्यांच्या जीवनसाधनेच्या बळावर देऊ शकतात.
वंदनीय बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच काही पूर्वग्रहदूषित लोकानी कोल्हेकुई सुरू केली आहे. स्वयंघोषित शिवश्रींनी आपली ‘शिवीश्री’ वृत्ती दाखवून देत कायम जातीय तेढ निर्माण केली आहे. त्याबद्दल त्यांनी न्यायालयात माफीही मागितली आहे. अशा लोकानी बाबासाहेबांवर लिहिणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. यावर बाबासाहेबांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी दिलेले उत्तरही नेहमीप्रमाणे मार्मिकच होते. ते म्हणाले, ‘’मला शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचावे यासाठी आणखी बरेच काम करायचे आहे. अशा प्रवृत्तींना उत्तर देण्यात वेळ घालवणे मला परवडणारे नाही...’’ ज्यांनी सातत्याने शिवाजीराजांची पूजा बांधण्यात, त्यांचा आदर्श नव्या पिढीपुढे ठेवण्यात आपल्या देहाची काडे केली त्यांना अशा थिल्लरबाजांची दखल घेण्याएवढी उसंत नसणे हे रास्तच आहे.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असला तरी या पुरस्कार निवड समितीत सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर, दिलीप वेंगसरकर, कीर्तनकार मंगल कांबळे, सांस्कृतिक कार्यसचिव वल्सा नायरसिंह, सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर, नामवंत चित्रकार वासुदेव कामत अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या मनात ज्यांच्याविषयी अत्यंत आदराचे स्थान आहे आणि ज्यांचे आयुष्य शिवसेवेसाठी समर्पित आहे अशा एका महान विभुतीची निवड या सदस्यांनी केली आहे. बाबासाहेबांच्या महाराष्ट्र भूषणला विरोध करणे म्हणजे या सर्वांच्या निवडीला आव्हान देण्यासारखेच आहे. तटस्थ वृत्तीच्या आणि आपापल्या क्षेत्रात मानदंड ठरलेल्या या विचारवंतांनी बाबासाहेबांची निवड करणे हे आपले सांस्कृतिक संचित आहे. त्यामुळे त्यांच्यावर चिखलफेक करणे म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्रावर आरोप डागण्यासारखे आहे. केवळ द्वेषमूलक, जातीच्या चष्म्यातून असे करंटेपण कोणी करत असेल तर करू देत बापूडे!
बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य यापूर्वीच जागतिक स्तरावर गेले आहे. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणजे आपण आपल्या बाजूने कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे आहे. अशा पुरस्काराचा सोस त्यांना नक्कीच नाही; मात्र मराठी माणूस त्यांच्या ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नसताना हे एक निमित्त आहे.
इतरांना सतत प्रोत्साहन देणारे, कार्यक्रमांपेक्षा कार्याला महत्त्व देणारे शिवशाहीर बाबासाहेब यांचे आयुष्य सुयोग्य ध्येयाने प्रेरीत आहे. नव्या पिढीसाठी त्यांचे चरित्र निश्‍चितपणे प्रेरणादायी आहे. या बलाढ्य शिवशाहीरास 'चपराक' परिवारातर्फे मानाचा मुजरा!

 
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२