अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास 18 महिने पूर्ण झाले. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला आणि नंतर भाजप सरकारलाही सपशेल अपयश आले. या धक्क्यातून महाराष्ट्र सावरलेला नसतानाच डाव्या चळवळीचे पितामह अशी ओळख असलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर त्याच पद्धतीने हल्ला करण्यात आला. महाराष्ट्रासाठी निश्चितच हा मोठा कलंक आहे.
या दोन्ही प्रकरणात हल्लेखोरांनी सकाळच्या वेळी दुचाकीवरून येऊन गोळ्या घातल्या. दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही मिनिटांत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, ‘यामागे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हात आहे.’ कोणताही पुरावा नसताना मुख्यमंत्री महोदयांनी हे जे तारे तोडले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र विचलित झाला. पृथ्वीराज चव्हाण यांना दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाची दिशा बदलायची होती की काय? अशी शंका येण्यास मोठा वाव आहे. यामागे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते तर आजपर्यंत त्यांना अटक का झाली नाही? पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना पाठीशी तर घातले नाही ना? राज्याचा जबाबदार मुख्यमंत्री अशी विधाने करून तपासकामात अडथळे आणतो हे दुर्देवी आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीप्रमाणे दाभोलकरांच्या हत्येत सहभागी असणार्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नावे चव्हाणांनी जाहीर करावीत.
गोविंदराव पानसरे यांच्या हत्येनंतरही धर्मवादाचे राजकारण करत हिंदुत्ववाद्यांनी हे कारस्थान केल्याचा आरोप सगळीकडून होत आहे. हे जर खरे असेल, तर आरोप करणार्यांनी तसे पुरावे देऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल याची दक्षता घ्यावी. उगीच आरोप करून किंवा निषेधाचे काळे झेंडे फडकवून काहीही साध्य होणार नाही. विचारवंतांवरील, सामाजिक कार्यकर्त्यांवरील असे हल्ले दुर्देवी आहेत. त्यामागील खरी कारणे शोधून काढण्यासाठी आणि हल्लेखोर पकडण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे.


जवखेडा प्रकरणात ‘दलित अत्याचार’ म्हणून राज्य धुसमुसत असताना हल्लेखोर त्यांच्याच नात्यातील निघाले. ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे. कोणत्याही जातीत किंवा कोणत्याही धर्मात सगळेच चांगले अथवा सगळेच वाईट असूच शकत नाहीत. जे चुकीचे आहेत, समाजद्रोही आहेत, त्यांना कठोर शासन अवश्य करावे, मात्र यानिमित्ताने कोणत्याही धर्माला बदनाम करू नये ही विनंती. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे सर्वांसाठी वंदनीय होते. त्यांचे कार्य खरोखरीच अफाट होते. स्वामी विवेकानंदांनीही हिंदू धर्मातील काही चुकीच्या गोष्टी ठामपणे दाखवून दिल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कुणी हल्ला केला नाही. दाभोलकर, पानसरे हेसुद्धा समाजातील कुप्रवृत्तींविरूद्ध संघर्ष करत होते. त्यांचा संघर्ष द्वेषमूलक नव्हता, हे त्यांच्या अनुयायांनी लक्षात घ्यावे. अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी समाजानेही दक्षता घ्यायला हवी. आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे, ते जागरूकपणे पहावे आणि कुप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. विचारांची लढाई विचारानेच लढली गेली तर ती खरी अशा विचारवंतांना श्रद्धांजली ठरेल.
संपादक, प्रकाशक, ‘चपराक‘, पुणे
7057292092
No comments:
Post a Comment