Monday, December 19, 2022

मराठीचे मारेकरी

मराठी साहित्यात जे लेखक लिहितात त्या लेखकांच्या कलाकृतींना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार दिले जातात. विविध साहित्यप्रकारातील हे पुरस्कार मिळवण्यासाठी संबंधित लेखक किंवा प्रकाशकांना सरकारकडे अर्ज करावा लागतो. अशा अर्ज करून आलेल्या पुस्तकांपैकी त्यांची योग्यायोग्यता पाहून परीक्षक पुस्तकांची निवड करतात. यावर्षी जे पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यातील अनुवादाच्या पुरस्कारासाठीचे पुस्तक नक्षलवादाचे समर्थन करणारे आहे, असे म्हणत शासनाने जाहीर केलेला पुरस्कार रद्द केला. मग पुरोगामी गँग सक्रिय झाली आणि त्यांनी सरकारचा निषेध म्हणून पुरस्कारवापसी सुरू केली. काहींनी त्यांना मिळालेले पुरस्कार घेणार नसल्याचे कळवले तर काहींनी त्यांच्याकडे असलेल्या साहित्यिक समित्यावरील राजीनामे दिले. मुळात स्वतः अर्ज करून मिळवलेले हे पुरस्कार परत करण्यात कसली मर्दुमकी आलीय? आणि जे विविध साहित्य समित्यांचे राजीनामे देत आहेत त्यांची तशीही हकालपट्टीची वेळ आलेलीच होती. सरकारने बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या आधी यांनी हे निमित्त करून बाहेर पडणे योग्यच आहे. निदान यामुळे तरी काही नव्या, कार्यक्षम लोकांना या ठिकाणी संधी मिळून आपली कर्तबगारी सिद्ध करता येईल. त्यामुळे जे बाहेर पडत आहेत त्यांचे नागरी सत्कार व्हायला हवेत.

लक्ष्मीकांत देशमुख यांनी भाषा सल्लागार समितीचं अध्यक्षपद मिळावं यासाठी मंत्र्यांकडं जोडे झिजवले होते. त्यानंतर सरकार बदललं. मग पुढच्या नेमणुका करता याव्यात यासाठी स्वाभिमानानं बाहेर पडणं अपेक्षित असताना शासनाच्या विरोधी भूमिका घेत राजीनामा देणं म्हणजे ‘आपण कसे महान आहोत’ हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. फक्त राजीनामा देऊन न थांबता त्यांनी मसापला विचारले आहे की, ‘‘तुम्ही मिंधे का? मी एक दगड भिरकावलाय आता तुम्ही पुढे या!’’

महाराष्ट्र साहित्य परिषदेने 116 वर्षाच्या इतिहासात एकही पुरस्कार मागे घेतलेला नसताना त्यांना मिंधे ठरविणारे लक्ष्मीकांत देशमुख कोण? एखाद्या व्यक्तिने भूमिका घेणे आणि संस्थेने भूमिका घेणे यातील फरक लक्षात घ्यायला हवा. उजव्या विचारधारेच्या लेखकाच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तर डावे विरोध करतात. डाव्यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला तर उजवे नाराज होतात. मात्र साहित्य परिषद त्याला कधीही बधलेली नाही. सरकार दरबारी पदासाठी खेटे घालणार्‍यांनी मिंधेपणाची भाषा इतरांना शिकवूच नये.
 
आपण शेण खाल्ल्यावर इतरांनीही ते खावे हा पुरोगामी दुराग्रह कशासाठी? मसापच्या पदाधिकार्‍यांनी आजवर अनेकदा तुमच्यापेक्षा ठाम भूमिका घेतलेल्या आहेत. ज्या देशमुखांनी आयुष्यभर सरकारची चाकरी केली, आयएस अधिकारी म्हणून मंत्र्यांसमोर टाचा घासल्या, माना झुकवल्या ते निवृत्त झाल्यावर मतपत्रिका गोळा करून लोकशाहीविरोधी भूमिकेतून संमेलनाध्यक्ष झाले. त्यासाठी त्यांनी काय काय केलं हे आम्ही सांगावं का?
इतकं सगळं करून बडोद्याच्या संमेलनात ते मानभावीपणे व्यासपीठावरून सांगतात, ‘राजा तू चुकलास!’ ज्या राजाच्या जिवावर तुम्ही आयुष्यात सगळं केलं त्या राजाला निवृत्तीनंतर ‘तू चुकलास’ असं सांगताय! हेच जर पदावर असताना सांगितलं असतं तर तुमची देशमुखी दिसली असती.

महाराष्ट्र साहित्य परिषद ही एक स्वायत्त संस्था आहे. ती कुणाला मिंधी नाही. ती राजाश्रयावर चाललेली नाही. मसाप रसिकाश्रयावर चालते. या संस्थेनं आजवर कुणाचं मिंधेपण स्वीकारलंय किंवा कुणाच्या आश्रयाला गेलीय असं दिसलं नाही. वाचक आणि रसिकांशिवाय साहित्य परिषद कुणाच्या दारात गेली नसल्यानं त्यांनी काय करावं हे देशमुखांसारख्या आणखी कुणाला सांगायची गरज नाही. परिषदेला राजकारणाशी, विचारधारेशी देणंघेणं नाही. शरद पवार पंतप्रधान झाले तरी मराठी माणूस म्हणून परिषदेला अभिमान वाटेल किंवा नितीन गडकरी पंतप्रधान झाले तरी हे मराठमोळं नेतृत्व सर्वोच्चपदी पोहोचलं म्हणून समाधान असेल. परिषदेला समोरचा कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या वंशाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आहे याच्यात स्वारस्य नाही. तो मराठी माणूस आहे, भाषाप्रेमी आहे इतकंच पुरेसं आहे. अशा सोयीस्कर भूमिका आपले काही लेखकच घेऊ शकतात.

पुरस्कार परत घेण्यावरून परिषदेनं भूमिका घ्यावी असं देशमुखांना वाटतं. ज्यांनी अर्ज करून पुरस्कार घेतलेत त्यांच्याबाबत परिषदेनं काय भूमिका घ्यावी? ज्या ‘अर्जदारांनी’ पुरस्कार पदरात पडावा म्हणून प्रयत्न केले त्यांनी सांगू नये ‘मी पुरस्कार परत करतोय’ किंवा ‘राजीनामा देतोय!’ ज्यांनी अर्ज करून पुरस्कार स्वीकारलेत त्यांना तो परत करण्याचा अधिकार नाही. अगदीच वाटलं तर त्यांनी सरकारकडे तसा अर्ज करावा की ‘माझा पुरस्कार परत घ्या!’ त्यांची ती विनंती मान्य करायची की नाही हा सरकारचा अधिकार आहे. केवळ चमकोगिरी करण्यासाठी हे लेखक दुटप्पीपणा करत आहेत.

साहित्य आणि कला शासनदरबारी कायम दुर्लक्षित असते. एखाद्या नेत्याच्या घराकडे जाणारा रस्ता तातडीनं केला जातो. नाशिकमध्ये मुंबईहून येणारा उड्डाणपूल थेट छगन भुजबळांच्या घराजवळ थांबवला जातो. साहित्यिक उपक्रमासाठी मात्र सरकारकडे कसलीही तरतूद नसते. देशमुख अशा विषयांवर बोलणार नाहीत. सरकार कोणतंही असेल यात फार फरक नसतो. मनोहरपंत मुख्यमंत्री असताना पु. ल. देशपांडे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मान देण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘हे युतीचे सरकार लोकशाहीविरोधी आहे’ अशा आशयाचं विधान केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘झक मारली अन याला पुरस्कार दिला!’ तेव्हा सरकारी चाकरीत असलेले देशमुख याविषयी काही बोलल्याचं स्मरत नाही.

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज असलेल्या डॉ. सदानंद मोरे यांनीही नेहमीप्रमाणे बोटचेपी आणि सोयीस्कर भूमिका घेतली आहे. ‘मी पदावर असल्यानं बोलू शकत नाही’ असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना कोणीतरी सांगायला हवं की, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सुवर्णमुद्रा दिल्यानंतर त्यांनी त्या नम्रपणे नाकारल्या होत्या. श्री संत तुकाराम महाराज राज्यकर्त्यांचे भाट नव्हते. त्यामुळे त्यांनी तो नम्रपणा दाखवला. आजकालचे लेखक सरकारपुढे चापलुसी करत पुरस्कार घेतात आणि पुन्हा त्यावरून सरकारलाच ट्रोल करतात. आपल्याकडील पद टिकवण्यासाठी सरकारपुढे लाचारी करणारे सदानंद मोरे आणि आपले पद जाणार हे माहीत असताना आपण किती स्वाभिमानाने राजीनामा देतोय हे दाखवणारे लक्ष्मीकांत देशमुख हेच आजच्या व्यवस्थेचे नागडे वास्तव आहे. एखादे पद मिळावे, एखादा पुरस्कार मिळावा, आपले साहित्य अभ्यासक्रमात लागावे यासाठी लाळघोटेपणा करणारे साहित्यिक मराठी भाषेचे मारेकरी आहेत. त्यामुळेच सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, त्यांचे वारसदार नाहीत हे त्यांच्या वागण्यातून सिद्ध झाले. हरी नरके, सदानंद मोरे हे ज्यांचं सरकार आहे त्यांच्याशी जमवून घेतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला काही अर्थ राहत नाही. तरीही त्यांचा सोयीस्कर ढोेंगीपणा अशा प्रकरणात सिद्ध होतोच. कोणतेही सरकार असू द्या, महत्त्वाच्या पदावरील खुर्च्या अडवायला हे महाभाग कायम तत्त्पर असतात.

बरं, या अशा पुरस्कारांनी लेखक फार मोठा होतो असेही नाही. आजवर ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांनी भविष्यात आणखी काही मोठं योगदान दिलंय असंही दिसत नाही. मग इतकी हुजरेगिरी कशासाठी? या कणाहीन मराठी लेखकांचे ढोंग वाचकांनी ध्यानात घ्यायला हवे. महाकवी कालिदास, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी अशा कोणालाही सरकारी पुरस्काराची गरज वाटली नाही. शेक्सपिअर कोणत्या पुरस्काराने मोठा झाला नाही. एकही पुरस्कार न मिळालेल्या जगदगुरू तुकाराम महाराजांनी जे लिहिलं ते बघा. आज महाराष्ट्रातलं एकही गाव नसेल जिथे तुकाराम महाराजांच्या चार ओळी रोज कुणा न कुणाच्या ओठात नसतील. किंबहुना सामान्य वाचकांचाही या पुरस्काराशी, असल्या राजकारणाशी काडीमात्र संबंध नसतो.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक ग्रंथ पारितोषिक स्पर्धेसाठी स्तंभलेखन या साहित्यप्रकाराचा परीक्षक म्हणून मी काम केले. त्यावेळी मी प्रखर हिंदुत्त्वादी विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे गुरूजींच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाची निवड केली होती. आज शासनाने हा पुरस्कार मागे घेतला म्हणून थयथयाट करणारे त्यावेळी साहित्य परिषदेवर शेवडे गुरूजींचा पुरस्कार परत घ्या म्हणून दबाव आणत होते. विश्वंभर चौधरी, हरी नरके, संजय आवटे अशा अनेकांचा त्यात पुढाकार होता. त्यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब कसबे आणि कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे माझ्या पाठिशी ठामपणे राहिले. त्यांनी असा पुरस्कार परत घेण्याचा पराक्रम केला नाही. कोणत्याही राष्ट्रविरोधी शक्तिंचा पुरस्कार आम्ही करणार नाही याचा त्यांना विश्वास असल्यानेच त्यांनी परीक्षक म्हणून आमची निवड केली होती.

राज्य शासनाकडे प्रत्येक साहित्यप्रकारात दरवर्षी पुरस्कारासाठी किती अर्ज येतात? अशा अर्ज करून आलेल्या पुस्तकांपैकी किती पुस्तके परीक्षकांकडे दिली जातात? ती वाचण्यासाठी त्यांना किती वेळ मिळतो? वाचल्यानंतर ते आपला निर्णय कोणत्या निकषांवर देतात? हे जाहीर व्हायला हवे. इतकेच नाही तर या परीक्षकांची नावेही जाहीर व्हायला हवीत. त्यात कसली गोपनीयता आलीय? एखाद्या गंभीर प्रकरणाचा खटला सुरू असतानाही आरोपी आणि फिर्यादी यांना न्यायाधीश कोण ते माहीत असते. मग स्वाभिमान जागा असलेल्या अशा समीक्षकांना घाबरण्याचे काय कारण? तुम्ही योग्य न्यायनिवाडा करत असाल तर तुमचे नाव जाहीर व्हायलाच हवे.

देशमुख म्हणतात, साहित्य परिषद मिंधी का? उलट त्यांनी लक्षात घ्यायला हवे की परिषद अतिशय तटस्थपणे पुरस्कार वितरण करते. त्यामुळे असे गोंधळ यापुढे व्हायचे नसतील तर राज्य शासनाकडे आलेल्या अर्जातून पुरस्कारांसाठी निवड करण्याचे अधिकारही सरकारने महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या मातृसंस्थेकडे द्यावेत. तसे झाले तर ही निवड आणखी पारदर्शक होईल. लक्ष्मीकांत देशमुख आणि गँगचा थयथयाट त्यांच्या पवारप्रेमात आहे हे न समजण्याइतका मराठी माणूस लेचापेचा नाही. देशमुख, ‘राजा तू चुकलास’ असे सांगताना एक गोष्ट लक्षात घ्या की खरंच काही चूक झाली असेल तर असे पुरस्कार परत घेऊन ती चूक दुरूस्त करता येते पण तुमच्यासारखे लोक केवळ आपल्या विरूद्ध विचारधारेच्या सरकारला बदनाम करायचे म्हणून असे स्वार्थांधपणे वागत असतील तर मराठीचे मारेकरी म्हणून इतिहासात तुमच्या नावाची नोंद होईल.
- घनश्याम पाटील

चपराक प्रकाशन, पुणे
7057292092

Saturday, December 10, 2022

साहित्य स्वानंदातून मिळालेली 'ज्योती!'

माझ्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीची माहिती नाही, माझी जात, धर्म, पंथ माहिती नाही. मी दिसतो कसा, बोलतो कसा याचाही फेसबुकवरूनच अंदाज घेतलेला. आमची दोघांची किंवा आमच्या दोघांच्या घरच्यापैकी एकमेकांची कुणाचीही एकदाही भेट नाही. गेला बाजार आम्ही कधी एकमेकांना व्हिडीओ कॉलवरही बोललो नाही... तीन-चार वेळा व्हाट्सअ‍ॅपवर बोलणं झालं होतं तेही ‘चपराक’च्या अनुषंगानं! म्हणजे तिचा मला मेसेंजरवर एसएमएस आला तर मी लहरीनुसार चार-दोन दिवसांनी उत्तर द्यायचो. मी उत्तर दिल्यावर ती एक-दोन दिवसांनी त्याला प्रतिउत्तर द्यायची.

...असं सगळं असताना एके दिवशी अचानक तिनं मला व्हाट्सअ‍ॅपवरच लग्नाची मागणी घातली. ‘लग्न केलं तर तुमच्याशीच’ हेही निक्षून सांगितलं. माझं थोडंफार लेखन तिनं वाचलं होतं आणि त्यावरच इतका मोठा ‘धोका’ स्वीकारला होता. तिनं मला माझ्याविषयी थोडं विस्तारानं विचारलं होतं. मी माझ्या आळशी स्वभावाप्रमाणं तिला मित्रवर्य महादेव कोरे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्‍या ‘साहित्य स्वानंद’ दिवाळी अंकातील ‘राहिलेलं राहूच द्या’ हा लेख पाठवून दिला. या लेखानं एखाद्या प्रेमपत्राप्रमाणं किमया केली आणि तिच्यावर गारूड घातलं. तिनं सांगितलं, ‘यातली तुमची राहून गेलेली एक तरी गोष्ट मला पूर्ण करायची आहे. आजवर माझ्यासाठी अनेक स्थळं आलीत पण दिवसभर काम करून नवरा घरी आल्यानंतर किंवा मी बाहेरून घरात पाऊल टाकल्यावर ज्याच्याविषयी आदर वाटावा असं स्थळ आलं नाही. ते मला तुमच्यात दिसतंय. तुम्ही जसे आहात तसे मला माझे वाटता...’

का ते अजूनही सांगता येणार नाही पण मीही भारलेल्या अवस्थेतच तिला होकार दिला. माझ्यासाठी आदरणीय असलेल्या माझ्या यशोदामैय्याशी मी याबाबत चर्चा केली. त्यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केल्यानं त्यांचा सल्ला मोलाचा होता. मी लग्न करण्यासाठी तयार आहे या बातमीनंच त्या आनंदविभोर झाल्या. मग मी निश्चिंत मनानं तिला कळवलं, ‘प्रभू श्रीरामाच्या साक्षीनं मी आजपासून तुला पत्नी म्हणून स्वीकारत आहे. यानंतर आपली भेट होईल, पुढचं काय ते ठरेल. ती केवळ औपचारिकता. मी तुला मनानं स्वीकारलंय. माझ्या आईविषयी माझ्या मनात जसा आणि जितका आदर आहे तसं आणि तितकंच प्रेम तुझ्यावर असेल...’

दुसर्‍या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर 2021 ला तिचे आईवडील आणि भावाशी माझं बोलणं झालं. त्यांना मी सांगितलं, ‘तुमच्या मुलीनं मला लग्नासाठी प्रपोज केलंय. आम्ही दोघे किंवा आपण कुणीही भेटलो नाही, बोललो नाही. गेली वीस वर्षे माझा संघर्ष सुरूच आहे. तो आयुष्यभर तसाच राहील. माझी संस्था माझ्यासाठी सर्वस्व आहे. ‘चपराक’ हे माझं पहिलं प्रेम असेल. चपराकची सवत म्हणून माझ्या आयुष्यात तुमची मुलगी असेल. माझ्या गुणदोषासह मला स्वीकारणं तुम्हाला जमणार आहे का?’

त्यापूर्वी तिनं त्यांना माझ्याविषयी कल्पना दिली होती. ‘चपराक’चे अंकही तिच्या घरात गेलेले होते. तिच्या आईला श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध वर्गात ‘चपराक’ मिळालेला होता. त्याहून मोठी गंमत म्हणजे त्या कण्हेरी मठाच्या प. पू. काडसिद्धेश्वर स्वामींच्या अनुयायी आहेत. गेल्या वर्षीच्या चपराक दिवाळी अंकात मी स्वामीजींची सविस्तर मुलाखत घेतली होती. ती मुलाखत आणि स्वामीजींसोबतचा माझा फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची दक्षता माझ्या होणार्‍या बायकोनं घेतली होती. ते पाहताच त्यांना विरोध करण्याचं काही कारण बाकी नव्हतं.

दुसर्‍या दिवशी फोनवर बोलून आम्ही लगेचच चौथ्या दिवशीचा आमच्या साखरपुढ्याचा मुहूर्त काढला. ती म्हणाली, ‘पुण्यात माझे मामा असतात. आपण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करू!’

मी म्हणालो, ‘मुलगी म्हणजे भाजीपाला नाही. माझ्यासारख्या फकिरासोबत तुला लग्न करावं वाटतंय यातच सगळं आलं. माझी काही पुस्तकांची धावपळ सुरू आहे. लग्नदिनी आपण मंगल कार्यालयातच भेटू! माझं लेखन तू वाचलंय. तुझं लेखन मी बघितलंय. मी जात-धर्म मानत नाही. शारीरिक सौंदर्य चिरकाल टिकत नाही. मनाच्या सौंदर्यावर, कर्तृत्वावर माझा विश्वास आहे.’

ती वैमानिक शास्त्राची अभ्यासक. एरॉनॉटिकल इंजिनिअर म्हणून बंगळूरूत काम केलेलं. तिची ‘कॅलिबर कंटेट’ ही संस्थाही कोल्हापूरात कार्यरत होती. उत्तम गीतकार आणि कवयित्री म्हणून मी तिच्याकडे बघायचो. आम्ही एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केल्यानंतरचा तो मोरपंखी दिवस... तिनं तातडीनं तिच्या कार्यालयात या घडामोडी कळवल्या. केवळ चार दिवसांनी साखरपुडा होणार म्हणून लगबगीनं सर्वांचा निरोप घेतला. ज्या एका प्रकल्पावर काम सुरू होतं ते लॅपटॉपवर पूर्ण करून पाठवेन असं तिनं तिच्या वरिष्ठांना सांगितलं. सगळंच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक असलं तरी आनंददायी होतं. त्यामुळं कसलीही अडचण आली नाही. ती बेंगळूरूहून कोल्हापूरला निघाली. बेळगाव येईपर्यंत आमचं एकमेकांविषयी बोलणं सुरू होतं.

...रात्र सरली. सकाळ झाली. कोल्हापूर आलं. मी म्हटलं ‘मी थोड्या वेळानं आवरून फोन करतो. तोपर्यंत तुही घरच्यांना सगळं सांग.’ साडे-अकरा बाराला मी पुन्हा फोन केला. तिला म्हटलं, ‘मी प्रकाशक, पत्रकार! रिकामा डामडौल मला आवडत नाही. अनावश्यक उधळपट्टी तर नाहीच नाही. समाज काय म्हणतो हे मला कधीच महत्त्चाचं वाटलं नाही. आपण लग्न केलं तरी ते अतिशय साधेपणानं करणार आहोत. कोर्ट मॅरेज! त्यासाठी जेमतेम दहा-पंधरा स्नेही उपस्थित असतील. साखरपुड्यासाठी मात्र माझ्या घरचे आणि कार्यालयातले असे दहा-पंधरा जण येत आहेत. तुमच्या घरचेही तितकेच लोक असावेत. आताच कोविडचा काळ संपलाय. त्यातून आपण बाहेर पडतोय. मग वेळेचा आणि पैशाचा असा अनावश्यक उपयोग करण्याऐवजी आपण लग्नच का करू नये?’

ती म्हणाली, ‘माझ्याही मनात हे आलं होतं! पण आज 23 तारिख. दोनच दिवस हातात राहिले. इतक्यात सगळं होईल का?’

तिला म्हटलं, ‘आपल्याला कोण विचारणार आहे? जसं होईल तसं करू! तुझ्या घरच्यांना विचार.’

त्यांनीही आनंदानं सहमती दिली. माझ्या आईबाबांना तर गगन ठेंगणं वाटत होतं.

24 तारखेला माझी यशोदामैय्या सौ. शुभांगी गिरमे, आमच्या परिवाराच्या ज्येष्ठ सदस्य सौ. चंद्रलेखा बेलसरे, रवींद्र कामठे काका, माधव गिर सर आणि जिगरी यार प्रमोद येवले अशा सर्वांची एक छोटीशी बैठक झाली. माझी ताई, आई आणि भाच्या यांना कपडे खरेदीला पिटाळलं. गिरमे, बेलसरे, कामठे, गिर, प्रमोद आणि मी दागिणे खरेदी करायला गेलो. तिकडे कळवलं, ‘मुलीचे कपडे, अंगठी तिकडेच घ्या. मुलाचे कपडे, अंगठी आम्ही इकडे घेऊ! म्हणजे आवड, माप अशा अडचणी येणार नाहीत.’ दोन तासात आमची सगळी खरेदी उरकली आणि आम्ही कार्यालयात येऊन पुस्तकाच्या कामात गढून गेलो. 26 डिसेंबरला लग्न होतं. त्या दिवशी रविवार असला तरी सुटी घ्यावी लागणार होती. समोर कामं तर खूप पडली होती. मग 25 ला मध्यरात्रीपर्यंत मी काम करत होतो. तिकडे तिनेही अचानक नोकरी सोडल्याने जो प्रकल्प अर्धवट राहिला होता तो मध्यरात्रीपर्यंत पूर्ण केला. त्यांना तो पाठवला. दोघांचंही काम पूर्ण झाल्याचं आम्ही एकमेकांना कळवलं आणि दुसर्‍या दिवशीची वाट पाहू लागलो.  

रविवारी आईवडिलांसह घरातले पाच-सात सदस्य आणि कार्यालयातले बारा-पंधरा सहकारी अशा वरातीसह आम्ही श्री क्षेत्र नृसिंहवाडी गाठली. गाडीवरील ‘चपराक’ ही अक्षरे पाहून एक गृहस्थ जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, ‘मी मुलीचा बाबा!’

मंगल कार्यालय परिसरात आमची नजरानजर झाली आणि बोहल्यावर थांबल्यावर आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष बघितलं. कसलाही थाटमाट न करता, अतिशय साधेपणानं आमचं लग्न झालं. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ऐनवेळी काही लेखक आले. माझा आवडता युवा कवी प्रशांत केंदळे यांना त्याच दिवशी एक महत्त्वाचा पुरस्कार होता. त्यासाठी त्यांना नागपूरला जायचं होतं. अचानक माझ्या लग्नाची ही बातमी कळल्याने आदल्या रात्री ते पुण्यात आले. रवींद्र कामठे काकांच्या घरी त्यांनी मुक्काम केला आणि पुरस्कार समारंभ टाळून तेही लग्नाला आवर्जून उपस्थित राहिले.

त्यांचा ‘गुलमोहराचं कुकू’ हा संग्रह ‘चपराक’नं प्रकाशित केलाय. त्यातील हीच शीर्षककविता मला अतिशय आवडते. प्रशांतदादांनी मंगल कार्यालयात लग्नस्थळी मंगलाष्टक म्हणून हीच कविता गाऊन सादर केली. एका आवडीच्या कवितेच्या साक्षीनं आम्ही एकमेकांना माळा घातल्या.  

आजच्या काळात अविश्वसनीय वाटेल असा हा पाच दिवसातला घटनाक्रम. तिला बेंगळुरूहून लग्नासाठी कोल्हापूरला यायचं म्हणून ती त्या चार दिवसात दिवसरात्र कार्यरत होती. अचानक जॉब सोडल्यानं सगळ्या गोष्टींची तिला पूर्तता करावी लागणार होती. लग्नाच्या आदल्या रात्री बारा-साडेबारापर्यंत आम्ही आपापलं काम पूर्ण करत होतो. रविवारी लग्न झालं आणि सोमवारी मी कार्यालयात होतो. इतकंच नाही तर अंगावरची हळदही उतरलेली नसताना अवघ्या चार दिवसात मी बीड जिल्ह्यात चौथ्या एकता साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून गेलो... ते सगळं पाहून काहींनी प्रश्न उपस्थित केले. ‘समाजमाध्यमावरून झालेली अशी लग्नं फार काळ टिकत नाहीत’ हेही स्पष्टपणे कळवायचा अगोचरपणा केला. त्या सगळ्याकडं दुर्लक्ष करत आम्ही एकमेकांना समजून घेत आहोत. दोघांचंही विश्व वेगळं असं राहिलंच नाही. आमच्यात जी एकरूपता साधलीय ती कमालीची आश्चर्यकारक आहे.

हे सगळं सांगण्याचं कारण आम्ही फार काही वेगळं केलंय हे नाही. साहित्य माणसाला मानसन्मान, प्रतिष्ठा, पैसा यासह योग्य जोडीदार देतं हे सांगणं मात्र आहे. यासाठी कारणीभूत ठरला तो ‘साहित्य स्वानंद’चा दिवाळी अंक. दिवाळी अंकातील एक लेख काय करू शकतो? असं मला कोणी विचारलं तर मी आनंद आणि अभिमानानं सांगू शकतो की, ‘बाबा रे, एक लेख आपला संसार उभा करतो.’

एकमेकांना समजून घेत आमचा संसार सुखात चाललाय. येत्या 26 डिसेंबरला आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल.

...आणि हो,

आमच्या दोघात आता तिसर्‍याची गोड चाहूलली लागलीय बरं! आमच्या पहिल्या लग्नदिनाला आमच्या दोघांसोबत तिसराही असेल. आमचे उमेश सणस सर मला नेहमी गंमतीनं म्हणायचे, ‘संपादक महोदय, लवकर लग्न करून हिंदुंची लोकसंख्या वाढवा...’

‘कधीच लग्न करायचे नाही,’ या निश्चयाचा डोलारा सपशेल आपटला असून सणस सरांची ही इच्छा आम्ही पूर्ण केली आहे.

जीवन खरंच खूप विलक्षण आहे. आयुष्यात कसे आणि काय बदल होतील हे कोणीही सांगू शकणार नाही.

माझ्यावर अमाप प्रेम करणारी माझी प्रिय बायको, माझी सच्ची मैत्रिण तिच्या क्षेत्रात तळपत आहे. आमच्या ‘लाडोबा’ या बालकुमारांच्या मासिकाची ऑनलाईन संपादक म्हणून काम पाहतानाच ती सहायक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत योगदान देत आहे. लवकरच प्रदर्शित होणार्‍या ‘मुगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या सिनेमात गीतकार म्हणून ती झळकतेय. तिची गाणी ऐकताना माझं मन प्रफुल्लित होतं. बालपणापासून आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणं आणि तारूण्यात आवडीच्या क्षेत्रातच कार्यरत असलेली जीवनसाथी मिळणं ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.

तिचं नाव ज्योती! ती तिच्या कर्तृत्वाचा प्रकाश सर्वत्र पेरत आहे. अशावेळी तिला माझं एकच सांगणं आहे, तू मनासारखं जग, हवं ते कर, आभाळासारखी विशाल हो! बस्स! मला आणखी काय हवंय?

- घनश्याम पाटील
7057292092

ता. क. : ‘साहित्य स्वानंद’चा दिवाळी अंक हाती आला आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे 2 नोव्हेंबरला आमच्या परिवारात तिसरी सदस्य आली आहे. परमेश्वरानं एक गोड परी आमच्या घरी पाठवलीय. ‘यशदा’ असं तिचं नामकरण आम्ही केलंय.


Friday, December 9, 2022

'लिव्ह इन'सारख्या 'अनोख्या रेशीमगाठी'

ज्येष्ठ लेखक श्री. रवींद्र कामठे यांची ‘अनोख्या रेशीमगाठी’ ही महत्त्वपूर्ण कादंबरी नुकतेच ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केली आहे. या कादंबरीची प्रस्तावना.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशभक्तिवरील अनेक कार्यक्रमांना उधाण आले आहे. ‘आम्हीच कसे देशभक्त!’ हे दाखवून देण्याची अहमहमिका तर कायम सुरूच असते. या सगळ्या वातावरणात आम्हाला प्रामुख्याने आठवतात ते गोपाळ गणेश आगरकर! ‘देशाला स्वातंत्र्य तर मिळेलच पण आधी समाजसुधारणा आवश्यक आहेत’ या त्यांच्या आग्रही प्रतिपादनाचा फारसा गांभिर्याने विचार झालाच नाही. तो झाला असता तर समाजात आज सररासपणे दिसणार्‍या कुप्रथा मोडीत निघाल्या असत्या.


एखादी व्यक्ती मोहाच्या झाडाखाली थांबली तर ती मद्यपिच आहे, या समजातून अनेकजण संबंधितांकडे पाहतात. अशा वातावरणात रवींद्र कामठे यांच्यासारखे ज्येष्ठ लेखक मोहाच्या झाडाखाली बसून तल्लीनतेने बासरीवादन करतात आणि प्रसंगी गीतापठणही करतात. अशावेळी ‘लोक काय म्हणतील?’ असा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यातील निर्मळता ते जपू आणि जोपासू शकतात. वेदांचा अभ्यास तर करूयाच पण वेदापेक्षा सामान्य माणसाच्या वेदना कळणे अधिक महत्त्चाचे आहे, अशा भूमिकेतून त्यांची मांडणी असते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखा नाजूक विषय पुढे आल्यास काही तथाकथित धर्मरक्षक नाक मुरडत असताना कामठेकाकांनी आगरकरांच्या सुधारणावादी भूमिकेतून या विषयाची मांडणी केली आहे. मुख्य म्हणजे कादंबरीच्या माध्यमातून हा विषय मांडताना त्यांनी भारतीय संस्कृतीतील सद्विचारांचेही जतन आणि संवर्धन केले आहे.

भारतीय जीवनव्यवस्थेत विवाहाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात, असा अनेकांचा समज आहे. इथल्या परिस्थितीनुसार अनेकदा या गाठी सैल होतात, काही वेळा तुटतात. अकाली अशा गाठी तुटून एकाकी असलेल्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. आपल्या समाजात आजही विधवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित आहे, हे नागडे सत्य कोण नाकारणार? एखादा विधुर असेल तर त्यालाही त्याचे जीवन एकट्याने जगणे असह्य होते. काही वेळा एकटे असणे परवडते पण एकाकी पडणे म्हणजे दिव्यातील तेल संपल्यानंतर वातीने मिणमिणत राहिल्यासारखे आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या व्यथा-वेदना समजून घेण्याइतकीही संवेदनशीलता आपण अंगी बाळगू शकत नाही. हाच धागा पकडून रवींद्र कामठे यांच्यासारख्या जीवनानुभव समृद्ध असलेल्या लेखकाने पुढाकार घेत कादंबरी लिहिणे म्हणजे प्रारंभी उल्लेखल्याप्रमाणे आगरकरांचा विचार पुढे नेण्यासारखेच आहे. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील या कादंबरीकडे व्यापक नजरेने पहायला हवे.

प्रभाकर आणि पूजा यांच्यासह दीपक आणि सई अशा दोन पिढ्यांच्या भावभावनांचे प्रगटीकरण या कादंबरीतून झाले आहे. एकाच इमारतीतील एक बाप आणि मुलगा आणि एक आई आणि तिची मुलगी सहवासातून एकत्र येतात आणि त्यांचे ऋणानुबंध निर्माण होतात. या सगळ्यांना जवळ आणताना लेखकाने ‘लिव्ह इन’सारखा पर्याय निवडूनही कुठेही उथळपणा येऊ दिला नाही. आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन हा प्रश्न सामर्थ्याने मांडताना त्यांनी आपल्या परंपरा, रीतिरिवाज जपले आहेत. अशा धाडसी विषयाला हात घालूनही संस्कार आणि संस्कृतीला मूठमाती दिली नाही. दोन पिढ्यातील प्रेमसंबंध फुलवताना कुठेही वाह्यातपणा येऊ दिला नाही. एकमेकांना समजून घेणे, आधार देणे, दुःखातून सावरायला मदत करणे यातून त्यांनी ही कलाकृती साकारली आहे.

कोकणातील आंजर्ल्याचे आणि त्या परिसराचे आलेले मनोहारी वर्णन हा तर या कादंबरीचा आत्मा आहे.
तिथल्या आजीने म्हणजे प्रभाकर-दिवाकरच्या आईने एका विधवेला आपल्या मुलासोबत सत्यनारायणाच्या पूजेला सन्मानाने बसवणे, आपल्या मुलासोबत लग्न होण्यापूर्वीच तिचा सून म्हणून स्वीकार करणे, हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात तिची सर्वांसोबत ओळख करून देणे आणि या दोघांना एकत्र आणण्यासाठी धडपड करणे यातून आजचा बदलता भारत दिसतो. असा पुरोगामी विचार जपणे हीच तर काळाची खरी गरज आहे. रवींद्र कामठे यांच्या लेखणीने ही किमया साध्य केलीय.

आंजर्ल्याहून परत येताना जिथे दीपाचा मृत्यू झाला होता तिथे पूजाने ओटी भरणे, मुंबईला परतल्यावरचे दोन्ही जोडप्यांचे सहजीवन, वकीलकाका, विजयकाकांनी केलेली मदत आणि स्वतःच्या स्वतःच्या साखरपुड्यातील दीपकचे भाषण अशा अनेक प्रसंगात या कादंबरीने कमालीची उंची गाठली आहे. विवाहसंस्था समजून घेण्याच्या आधीची एक महत्त्चाची पायरी म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था समजून घेणे! त्याच्याच प्रांजळ प्रतिबिंबातून या अनोख्या रेशीमगाठी सिद्ध झाल्या आहेत. वाचकांनी ही कादंबरी वाचणे, समजून घेणे आणि जमल्यास आचरणात आणून अशा परिस्थितीतील स्त्री-पुरूषांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणे हेच या कलाकृतीचे फलित असणार आहे.
अनोख्या रेशीमगाठी
लेखक - रवींद्र कामठे
प्रकाशन - चपराक
(7057292092)
पाने - 192, मूल्य - 300/-
- घनश्याम पाटील

ही कादंबरी www.shop.chaprak.com वरून घरपोच मागवू शकाल. 

Monday, November 21, 2022

समाजव्यवस्था बदलावी!

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी ललकारी लोकमान्य टिळकांनी दिली. त्यावर ‘सर्वांगीण समाजसुधारणा’ हे स्वप्न उराशी कवटाळून टिळकांशी वैचारिक वाद घालणार्‍या गोपाळ गणेश आगरकरांनी सांगितलं, ‘पूर्वी आपल्या देशाचे स्वराज्य होतेच ना? ते आपण का गमावले? त्याची कारणे शोधून ती दूर केल्याशिवाय आपल्याला स्वराज्य मिळवता येणार नाही आणि चुकून मिळालेच तर ते टिकवता येणार नाही. खर्‍या अर्थाने ‘स्वराज्य’ लाभावे असे वाटत असेल तर विद्यमान समाजव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणे आवश्यक आहे...’

स्वातंत्र्यपूर्व काळातील या विचारमंथनाचा विचार करता आजही आपण ‘स्वराज्य’ निर्मितीत सपशेल अपयशी ठरलो आहोत, हे कोणीही अमान्य करणार नाही. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण उत्साहात साजरा केला. या निमित्ताने रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, विज्ञान-तंत्रज्ञान या आणि अशा सगळ्या क्षेत्रात आपण प्रगतीचे किती पर्वत सर केले हे सांगितले गेले; मात्र आजही आपल्यातले पशूत्व संपुष्टात आल्याचे दिसत नाही. आपल्यावर प्रेम करत सर्वस्व अर्पण करणार्‍या एखाद्या अभागी जिवाचे तुकडे करून ते घरातील फ्रिजमध्ये साठवण्यापर्यंतचे क्रौर्य माणसात आहे. अनैतिक संबंध, जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, आर्थिक देवाण-घेवाणीतून नात्यात निर्माण झालेले वैतुष्ट्य, असूया यामुळे माणूस माणसाच्या जिवावर उठतोय. भौतिक सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात निर्माण झालेल्या असताना आणि सर्वप्रकारची साधने उपलब्ध असताना आपण आपले तारतम्य का गमावतोय? आजही हुंडाबळी जातात, मुलगी नको म्हणून गर्भपात होतात, नवजात अर्भके कचराकुंडीत टाकली जातात, जाती-जातीत संघर्ष होतात, धर्माचे राजकारण केले जाते, या सगळ्यात महापुरूषांचीही वाटणी केली जाते. जो तो आपापल्या सोयीनुसार आचरण करतो आणि वर निर्लज्जपणे देशभक्तिचा आव आणतो. अशी विषमता आणि विसंगती जपत जीवनव्यवहार सुरू आहे. मग पुन्हा आपल्याकडे सुराज्य कसे येणार आणि आलेच तरी आगरकर म्हणतात त्याप्रमाणे ते कसे टिकणार?

आपल्या राष्ट्राला लाभलेली शौर्य आणि पराक्रमाची परंपरा खंडित झाली आहे की काय? असे चित्र सर्वत्र आहे. ‘मी आणि माझे’ या वृत्तीने कळस गाठल्याने आपण ‘समाज’ म्हणून काही विचार करतच नाही. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी हसत-हसत आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे हौतात्म्य प्राप्त परिस्थितीत दुर्दैवाने वांझोटे ठरत आहे. महापुरूषांच्या विचारधारांवरून, त्यांच्या कार्यकर्तृत्वावरूनही आपल्यात मतभेद निर्माण झाले आहेत. प्रत्येकजण कुणाच्या तरी प्रभावाखाली जगतो. समाजमाध्यमांमुळे या सगळ्यांना खतपाणी घातले जाते. इतिहासाचे ज्ञान नाही, वर्तमानाचे आकलन नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही. त्यामुळे आजची तरूणाई एका अराजकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्यांच्याकडे काही स्वयंप्रज्ञा आहे आणि आर्थिक सुबत्ता आहे ते तरूण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विदेशात जाऊन स्थिरावत आहेत. हे ज्याला जमत नाही त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. नोकरी, उद्योगासाठी भांडवल अशा जंजाळात अडकलेला तरूण इथल्या व्यवस्थेच्या, राजकारणाच्या कचाट्यात अडकतो आणि त्यातच भरडला जातो. या दुष्टचक्रातून सावरताना त्याला मोठी कसरत करावी लागते. एकीकडे अशा दिशाहीन तरूणाईचे प्रमाण झपाट्याने वाढत असतानाच दुसरीकडे काही ध्येयवादी तरूणही आहेत. त्यांचे प्रमाण मात्र अत्यल्प दिसते. वर्षानुवर्षे प्रतिकूलतेत आणि टोकाच्या विवंचनेत जगणार्‍या या पिढीने आपल्या जगण्याचे इप्सित हेरले आहे. प्रशासनाबरोबरच विविध क्षेत्रात तळपणार्‍या अशा मोजक्या प्रज्ञावंतांनी परिस्थितीवर यशस्वी मात करून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्याकडे बघितल्यावर पुन्हा एकदा आशेच्या अंकुराची पालवी फुटते.

आकाशातून उत्तुुंग भरारी घेणार्‍या घारीचे सारे लक्ष आपल्या पिलाकडेच असते. त्याप्रमाणे नवनवीन क्षेत्रात यशाचे मानदंड निर्माण करताना आपण माणूस म्हणून अंगी असलेले मूलभूत चांगुलपण जपले पाहिजे. स्वतःतील अवगुण बाजूला सारून स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि पर्यायाने समाजाच्या व्यापक उत्कर्षाची वेगळी वाट निर्माण केली पाहिजे. इतरांचे सुख-दुःख समजून घेतल्यास आपल्याही दुःखमुक्तिचा मार्ग मोकळा होईल. गरजेतून आलेल्या हतबलतेवर मात करण्याची कुवत आपल्यात निर्माण झाली तर चैतन्याचे नंदादीप प्रज्वलीत होतील.

‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ अशा संस्कृतीची शिकवण असलेल्या आपल्या देशाला संपन्न विचारधारेचा वारसा लाभला आहे. मंडन मिश्र आणि आद्य शंकराचार्य यांच्यापासून ते वैचारिक संपन्नता जपणार्‍या अनेक परस्सरभिन्न विचारधारेच्या तत्त्वज्ञ, प्रज्ञावंतापर्यंतची ही परंपरा आहे. ‘विचारकलहाला का भीता?’ असा प्रश्न उपस्थित करणार्‍या आगरकरांनीही म्हटले होते, ‘दुष्ट आचारांचे निर्मुलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणार्‍या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत.’ आज आपण मात्र अशा ‘विचारशलाका’ चेतवण्याऐवजी सातत्याने आपल्या वाचाळवीरतेचे प्रदर्शन घडवत आहोत. सामान्य माणसापासून ते उच्चस्तरीय अधिकार्‍यांपर्यंत आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिग्गजांपासून ते साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत अनेकांनी वेळोवेळी त्यांचा हिणकसपणा दाखवून दिला आहे. कोणतीही घटना घडली, कुणी काही मत व्यक्त केले की, त्यावर तातडीने व्यक्त होणे हे आपले जीवितकर्तव्य आहे, असा ग्रह करून घेतलेल्या प्रतिक्रियावाद्यांनी समाज आणि पर्यावरण गढूळ केले आहे. अभ्यासाची, चिंतनाची वाणवा असताना केवळ लोकशाहीने दिलेला अधिकार सोयीस्कररित्या वापरायचा आणि आपण कसे संवेदनशील, विचारवंत आहोत हे दाखवायचे या अट्टहासामुळे आपले अपरिमित नुकसान होत आहे. हे थोपवण्यासाठी आपली सारासारविवेकबुद्धी जागृत असणे गरजेचे आहे. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेले ‘स्वराज्य’ आणि आगरकरांना हवे असलेले ‘सुराज्य’ याचा आजच्या परिप्रेक्ष्यात विचार करून व्यवस्था बदलाचे आव्हान स्वीकारायला हवे.
(दैनिक 'प्रभात' - 22 नोव्हेंबर 2022)

- घनश्याम पाटील
7057292092

Sunday, November 20, 2022

व्यथितेच्या भावभावनांचं शब्दरूप प्रतिनिधित्व

परभणी जिल्ह्याच्या सेलू येथील शिक्षिका आणि प्रतिभावंत कवयित्री, लेखिका जयश्रीताई सोन्नेकर यांचा ‘व्यथिता’ हा स्त्रियांच्या काळजातील कालवाकालव मांडणारा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. एकीकडे स्त्रीला लक्ष्मी-सरस्वतीपासून दुर्गा-चंडिकेपर्यंत सर्वांच्या रूपात पाहण्याची आपली संस्कृती असताना दुसरीकडे मात्र स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारांची मालिका सुरूच आहे. या सर्वांच्या व्यथा-वेदनांचं, त्यांच्या भावभावनांचं शब्दरूप प्रतिनिधित्व करणारी लेखिका म्हणून जयश्रीताईंचा उल्लेख करावा लागेल. एखाद्याच्या असह्य वेदना, त्याचं अपार दुःख, त्याचा जिवघेणा संघर्ष पाहून करूणाभाव जागृत होणं, हृदयाला पाझर फुटत त्याच्यासाठी व्यथित होणं, परपिडा समजून घेत शोक व्यक्त करणं वेगळं आणि हे सर्व स्वतःच्या वाट्याला आल्यानं या अशा व्यथा सहन करणं वेगळं. जयश्रीताईंनी आजूबाजूच्या माता-भगिनींच्या व्यथा समजून घेऊन त्या शब्दबद्ध केल्या आहेत. मातृसंस्कृतीच्या गौरवाची परंपरा अभिमानानं मिरवणार्‍या मुर्दाड समाजाच्या मनोवृत्तीचा भंडाफोडच या सगळ्या कथांतून त्यांनी प्रभावीपणे केला आहे.
या संग्रहातील दहा कथा म्हणजे दहा जीवांच्या आयुष्याची घेतलेली कथारूप दखलच आहे. यातल्या सर्व नायिका आपल्याला खिळवून ठेवतात. आपल्यातील माणुसकीचा अंश जागवतात. आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात आणि माणूस म्हणून जगण्याची शिकवणही देतात. मुख्य म्हणजे यात कुठंही एकसुरीपणा आला नाही. संपूर्ण पुरूष वर्गाविषयी टोकाचा द्वेष किंवा स्त्रीवादाच्या बंडाचा झेंडा फडकवणंही नाही. जयश्रीताई त्यांच्यासोबतच्या चारचौघींकडं उघड्या डोळ्यानं पाहतात, त्यांना समजून घेऊन त्यांच्या दुःखाला वाहण्याचा मार्ग मोकळा करून देतात. 

 ‘वेदना अंतरीची’ ही पहिली कथा वाचतानाच आपल्याला गलबलून येतं. ट्रेनिंग ऑर्डर निघाल्यानंतर सगळे एकत्र येतात आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात प्रत्येकानं स्वतःविषयी बोलावं असं ठरतं. ‘विधवेचं जीवन कसं जगावं हे त्या विधवेपेक्षा समाजानं निश्चित केलेलं असतं’ हे विदारक वास्तव या कथेत लेखिकेनं खूप सामर्थ्यानं मांडलंय. यातील कथानायिका असलेल्या आसावरीचं नाव अनपेक्षितपणे घेतलं जातं आणि तिला बोलण्याचा आग्रह होतो. त्यावेळी ती म्हणते, ‘‘ज्या घरात कुटुंबप्रमुख समजला जाणारा नवराच आडदांट, बेजबाबदार, बायकोला मारणारा असतो, त्या कुटुुंंबाला कुटुंब म्हणायचं का हो? ज्यानं वारशात दु:ख ठेवलेलं असतं, ज्या घराची स्थिती विस्कळीत असते, त्या घराला कुटुंब नावाची संस्था असते का हो? मी आणि माझा मुलगा एवढंच कुटुंब!’’ ही कथा वाचताना कुणाचेही डोळे खाडकन उघडतील. 

तशा म्हटल्या तर या लघुकथा; मात्र जयश्रीताईंनी आशय आणि विषयाच्या दृष्टीनं त्या अत्यंत उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत. दारूच्या नशेत नवरा दाराला बाहेरून कडी लावतो आणि शेजारच्या गाडीतून पेट्रोल काढून दारावर टाकतो. त्यातच त्याच्या अंगावरही पेट्रोल सांडतं आणि दरवाजा पेटवताना भडका उडून तोही पेटतो. नवरा डोळ्यासमोर जळत असताना आतून आसावरी काहीच करू शकत नाही. ही ‘अंतरीची वेदना’ वाचताना, अनुभवताना वाचक मात्र व्याकुळ होतो. ‘मृदू झंकार’ या कथेत ‘मनोरंजनासाठी गाणार्‍या गायकांकडं पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ का नसतो?’ असा प्रश्न पडलेल्या सविताच्या मनाची घालमेल आली आहे.

समाजातील सत्प्रवृत्तीचा दाखला देताना यात अनेक सुभाषितांसारखी जीवनमूल्यं आली आहेत. ‘स्टेजवर भले तुझं कुणी किती कौतुक करो पण लोकांना घरी राहणारी बायको जास्त पसंत असते. स्त्रियांचं थोरपण सहन करणारे कमीच!’ असं वास्तव मंजू मांडते खरी; पण संदीप आणि त्याच्या घरच्यासारखे प्रेमळ लोक सविताला मिळतात. ‘अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं की व्यक्ती बावरून जाते, संभ्रमात पडते. उणीवेत जगणार्‍याला त्याच पठडीतलं जीवन अंगवळणी पडतं. परमेश्वराकडूनही त्याच्या अपेक्षा संपलेल्या असतात’ असं जीवनविषयक तत्त्वज्ञान या कथेत येतं. ‘आधार नसलेल्या व्यक्तिवर लोक टपून असतात बोलण्यासाठी आणि जेव्हा सौंदर्य, बुद्धिमत्ता एकत्र येऊनही साधारण परिस्थिती असेल नं... मग तर त्या व्यक्तिच्या प्रत्येक हालचालीची बातमीच होते...’ हे वास्तव जयश्रीताईंनी कथेच्या माध्यमातून अधोरेखित केलंय. 

 ‘सगळ्या घराचा केंद्रबिंदू असलेल्या स्त्रीकडं दुर्लक्ष झालं की ती स्वतःला एकटेपणा बहाल करत स्वतःचीच कीव करू लागते’ हे सांगणारी ‘कोलाहल’ ही कथा स्त्री मनाच्या द्वंद्वाचा समर्पक आढावा घेते. कुटुंबातील जबाबदार्‍या पार पाडताना इतरांशी तुलना का करायची? आणि नेमकं कुणाला ‘भाग्यवान म्हणायचं’ ते या कथेत खूप प्रभावीपणे मांडलंय. यातला मतितार्थ समजून घेतला तर उद्ध्वस्त होऊ पाहणारे अनेक संसार वाचतील आणि वेगळ्या कौन्सिलरची गरजही भासणार नाही. 

कथेच्या माध्यमातून अनेक गंभीर विषयही सहजपणे मांडणं आणि वाचकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडणं हे जयश्रीताईंचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच हा कथासंग्रह अनेक व्यथा-वेदना मांडण्याबरोबरच माणसाला माणूस म्हणून जोडून ठेवणारा आहे. नवरा गेल्यावर ‘चांगलं दिसणं’ लोकांना खुपणार्‍या कुसूमची व्यथा ‘एकटी’ या कथेत आलीय. ‘विधवांना मनं नसतात? त्यांनी जगू नये?’ असा रोकडा सवाल या कथेत लेखिका करते. 

पदरात तीन मुलं आणि वाट्याला फाटका संसार आलेल्या ‘शांता’ची गोष्ट वाचतानाही अंतःकरण भरून येतं. जयंतीचं आणि तिचं नातं समजून घेताना स्त्री मनाचे अनेक पदर आपोआप उलगडत जातात. जिवंतपणी साधी रिक्षा मिळाली नाही पण शांताला न्यायला नंतर स्वर्गरथ येतो, हे पाहून जयंती टाहो फोडते. तिचा आक्रोश म्हणजे समाजाला दिलेली सणसणीत चपराक आहे. ‘पुन्हा येऊ नकोस या स्वार्थी जगात, आपलं समर्पण द्यायला’ हे निरोपाचे शब्द वाचकांना हेलावून सोडतात. ‘इंद्रजाल’ या कथेत रेणू आणि अलकाचं जगणं आलंय. आयुष्याची केरसुणी होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक बहुरूप्यांप्रमाणे चेहरा रंगवत भावना लपवाव्या लागतात याचं शल्य आहे. अलकाचं रेणूसाठी व्याकूळ होणं आणि परमेश्वराकडं ‘रेणूचं सौंदर्य अबाधित ठेव आणि तिचं सौभाग्य मर्यादित’ असं मागणं मागणं आपलं सामाजिक वास्तव दाखवून देतं. 

 ‘उत्तरार्ध’ या कथेत मंदाताईंच्या वार्धक्याची कहाणी मांडताना लेक सुरभीसोबतचे अनुबंधही आलेत. आयुष्याकडं सकारात्मकतेनं पहायला शिकवणारी ही कथा आहे. हृदयाला छिद्र असलेल्या मुलीचं चार दिवसाचं तरी बाईचं जगणं पहावं म्हणून तिच्या लग्नाचा घाट घालणारी आई ‘काळीज’ या कथेत येते. ‘आई’ या कथेतील शिक्षिका रिना, विद्यार्थी सिद्धेश्वर, त्याची जन्मदात्री गेल्यावर भाजलेल्या हातांचा पाळणा करून त्याला फुलांप्रमाणं वाढवणारी आणि त्याच्या ‘आई’च्याच भूमिकेत गेलेली आजी हे सगळं वाचताना मन भरून येतं. ‘जन्मदात्री होता येतं पण ‘आई’ सर्वांनाच होता येत नाही’ असा विचार मांडणारी ही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेते. ‘पिल्लू’ ही या संग्रहातली शेवटची कथा. ही कथा अक्षरशः हेलावून टाकते. आपलं पिल्लू, आपलं बाळ आपल्या डोळ्यादेखत जाणं यापेक्षा वाईट काही नसतं. नियतीपुढं मात्र आपण हतबल असतो. तरीही परमेश्वरी लीला समजावून घेत उभं राहणं गरजेचं असतं. या कथेतील ही आर्तता, हे दुःख, या वेदना अनुभूतीच्या पातळीवर समजून घेतल्यास या ‘व्यथिते’चा हुंकार कळेल. 

 प्रथमदर्शनी या शोकात्मिका वाटल्या तरी यात मानवी भावभावना आल्यात. रोजच्या जगण्यातील वास्तव आलंय. या कथा म्हजणे स्त्री जीवनाची व्यथा आहे. ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ असं तिचं जे वर्णन केलं जातं ते यात कथारूपांतून मांडलं आहे. वर्षानुवर्षे किंबहुना शतकानुशतके तिच्या डोळ्यातील हे ‘पाणी’ आपण उघड्या नजरेनं बघू शकलो नाही तर हे आपल्या पुरूषार्थाला काळीमा फासणारं आहे. मराठवाड्यातल्या सेलूसारख्या भागात वास्तव्यास असलेल्या जयश्रीताईंनी मानवतावादी दृष्टिकोनातून या कथांची मांडणी केली आहे. यात शब्दांचं अवडंबर नाही. कसली रूक्षता नाही. उपदेशाचा आवही नाही. अन्यायाची तक्रार नाही. जे आहे, जसं आहे ते मात्र प्रभावीपणे मांडलंय. छोट्या-छोट्या संवादाच्या माध्यमातून त्यांनी वाचकांच्या मनाची पकड घेतलीय. त्यांचं लेखन काळजाचा तळ ढवळून काढतं. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती हे वाचून स्वतःत काही बदल करण्याचा प्रयत्न नक्की करेल. हेच जयश्रीताईंच्या लेखणीचं यश म्हणावं लागेल. 

कथा हा प्रांत सध्या दुर्लक्षित राहत असताना त्यांनी केलेला हा प्रयत्न निश्चितच दखलपात्र आहे. विशेषतः ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ या संतवचनाप्रमाणे एका महिलेनं मांडलेल्या समस्त स्त्री जातीच्या व्यथांचा हा आक्रोश आहे. तो समजून घेणं आणि स्वतःत काही बदल करणं हाच त्यावरील एकमात्र उपाय असेल. जयश्रीताईंच्या भावी लेखनासाठी माझ्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा! 

  - व्यथिता 
लेखिका - जयश्री सोन्नेकर 
प्रकाशक - चपराक, पुणे 
हा कथासंग्रह घरपोच मागविण्यासाठी www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. 

  - घनश्याम पाटील 
लेखक, प्रकाशक आणि संपादक 7057292092

Monday, June 21, 2021

सरनाईकांचा लवंगी फटाका


प्रताप सरनाईक
हे शिवसेना सोडून भाजपच्या वाटेवर आहेत असं स्पष्ट चित्र आहे. शिवसेना सोडणं म्हणजे राजकीय आत्महत्या! परंतु अशी आत्महत्या करावी लागली तरी चालेल पण आपलं अर्थकारण सांभाळलं गेलं पाहिजे एवढीच काळजी अशा नेत्यांना असते. प्रताप सरनाईक नावाचा एक रिक्षावाला दहा-वीस वर्षाच्या कारकिर्दीत शंभर कोटींचा मालक कसा झाला? हे समजून घेण्यासाठी ईडीच्या चौकशीची आवश्यकता नाहीच असं म्हणण्यात काही अर्थ नाही. दोन-दोन पिढ्या शेतीत राबणार्‍या शेतकर्‍याच्या तिसर्‍या पिढीवर आत्महत्या करण्याची वेळ येते आणि एका रिक्षावाल्याकडं अशी कोणती गोष्ट असते की ज्याच्या जोरावर तो एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकतो? त्यामुळं या चौकशीला त्यांनी सामोरं जाणं गरजेचं आहे.

गेल्या दोन वर्षाचा कार्यकाल बघितला तर फक्त शिवसेनेच्या आमदारांची आणि मंत्र्यांची चौकशी लागतेय. त्यांना टार्गेट केलं जातंय. शिवसेनेचे अनिल परब, रवींद्र वायकर हे भाजपच्या रडारवर आहेत. संजय राऊतांना ईडीची नोटीस दिली गेली. त्या मानानं काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत असं समजण्याचं कारण नाही. ईडी या स्वायत्त संस्थेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या पद्धतीनं करण्याचा प्रयोग भाजपनं पश्चिम बंगालमध्ये केला असा आरोप केला जातो. तोच प्रयोग महाराष्ट्रातही सुरू आहे का? असा प्रश्न पडतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या या प्रयोगाला ममता बॅनर्जी पुरून उरल्या. त्या ‘खेला होबे’ म्हणाल्या आणि त्यांनी खेळ केला. महाराष्ट्रात मात्र तशी परिस्थिती नाही. ‘मोडेन पण वाकणार नाही’ असे ताठ कण्याचे नेते महाराष्ट्रात कोणत्याही पक्षात दिसत नाहीत. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी का झाली नाही? आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली काही वर्षे महाराष्ट्रात भाजपची बी टीम म्हणून काम करतो आहे का? यावरही संशोधन करण्याची वेळ आलीय.

राजकारणात भ्रष्टाचार ही सर्व काळात असलेली फार मोठी समस्या आहे. भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि मोठेपणा मिरवण्यासाठी राजकारणात आलेले धनदांडगे यामुळं सामान्य माणसाचं आयुष्य कमालीचं हवालदिल होतं. शिवसेनेच्या जुन्या आमदारांना जर अशा पद्धतीनं रणांगणातून पळून जावं वाटत असेल तर शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. प्रताप सरनाईक हे ‘शिवसेना भाजपबरोबर युती करत नाही,’ या कारणावरून भाजपमध्ये गेले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. काही लोकांना असं वाटतं की प्रताप सरनाईक हे उद्धव ठाकरे यांचे इतक्या जवळचे आहेत की लिहिलं गेलेलं पत्र, व्हायरल झालेलं पत्र हे उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंच लिहिलं गेलंय! मात्र पुन्हा भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची चूक उद्धव ठाकरे करणार नाहीत.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उद्धव यांना अपेक्षित असेलेला आदर अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळतोय. सत्तेत असताना, एक सारीपाठ जमलेला असताना, राष्ट्रीस सर्वेक्षणात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अग्रणी असताना आहे हा डाव मोडायचा आणि भाजपकडे जायचं यात उद्धव ठाकरे यांना काही रस असेल असं वाटत नाही. भाजपाच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची वाटचाल शिवसेनेच्या दिशेनं सुरू आहे. अशावेळी पक्षविस्तार होतोय, पक्षाचं स्थान बळकट होतंय. हे सगळं सोडून भाजपच्या मागं जाण्याची उद्धव यांना काही गरज आहे असं वाटत नाही.

प्रताप सरनाईक यांचा जेवढा राजकीय गैरफायदा घेता येईल आणि शिवसेनेला अस्थिर करता येईल तेवढे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. सरनाईकांच्या लेटरबॉँबला बाँब म्हणणंही चुकीचं वाटतंय. त्या पत्राचा काहीच धमाका होणार नसल्यानं फार तर याला आपण ‘लवंगी फटाका’ म्हणूया. बरेचसे लवंगी फटाके हे फुसके असतात. ते लावले तरी त्याची वात ओली झाल्यानं पेटत नाही. सरनाईकांचा हा फटाका फुटण्याची, त्याचा स्फोट होण्याची, आवाजाचा धमाका होण्याची शक्यता नाही. सरनाईक हे काही महाराष्ट्राच्या राजकारणातलं फार मोठं नाव नाही. ते गाजलेलं व्यक्तिमत्त्व नाही. त्यांच्याकडं वक्तृत्व नाही किंवा ते पक्षाच्या पहिल्या फळीतले महत्त्वाचे नेतेही नाहीत. पक्षाला महानगरात अर्थपुरवठा करणारे जे आमदार आहेत त्यापैकी एक एवढ्यापुरतं त्यांचं स्थान मर्यादित आहे.

प्रताप सरनाईक असोत अथवा नारायण राणे! शिवसेना हे अशा अनेक नेत्यांसाठीचं ‘करिअर’ आहे का? राजकारणात यायचं, प्रचंड पैसा मिळवायचा आणि धनदांडगे व्हायचं यासाठी शिवसेना हा पक्ष वापरला जातो का? हे सर्व होताना मराठी माणूस मात्र आहे तिथंच राहतोय का? याबद्दलचं आत्मचिंतन पक्षनेतृत्वानं आता पक्षाला 55 वर्षे झाल्यावर तरी पुन्हा एकदा करायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे हे चक्र असं थांबणारं नाही. शिवसेनेच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना कायम टार्गेंट केलं जाईल. राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही असंच टार्गेेट करून पदावरून घालवण्यात आलं. आपल्याला जो माणूस नकोय त्याला त्या पदावरून घालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सातत्यानं प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारला आक्रमक व्हावं लागेल.

महाराष्ट्र सरकारच्या हातातही यंत्रणा आहेत आणि भाजपचा गेल्या पाच वर्षांचा कारभारही खूप चांगला आहे अशातला भाग नाही. भाजपच्या काळातही अनेक भ्रष्ट गोष्टी घडल्या आहेत. सुधीर मुनगंटीवारांनी 33 कोटी झाडं कशी आणि कुठं लावली? तितकी झाडं लावल्यावर महाराष्ट्राचं दंडकारण्यासारखं एक मोठं जंगल झालं नसतं का? फडणवीसांच्या जलयुक्त शिवारमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाले. पंकजा मुंडे यांचा चिकी घोटाळा गाजला. या व अशा कशाचीही चौकशी सध्याच्या महाआघाडी सरकारकडून होत नाही कारण राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम म्हणून कार्यरत असावी. अशी चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अपेक्षित धाडस दाखवावंच लागेल. पक्षाच्या एकेका आमदाराला असं टार्गेंट केलं जात असताना तुम्ही जर त्याच्या मागं उभे रहात नसाल, त्याला मदत करत नसाल तर तुम्हाला पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावी लागतील.

उसने नेते गोळा करून पक्ष मोठा होत नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं तो अनुभव घेतलाच. चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणूनच शोभत होत्या. त्यांना पक्षात आणून महिला आघाडीच्या अध्यक्ष करून काय मिळवलंत? वर्षानुवर्षे भाजपमध्ये निष्ठेनं काम करणार्‍या अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. प्रा. मेधा कुलकर्णी यांची महिला आघाडीची प्रमुख म्हणून वर्णी लावली असती तर एक धडाडीची आणि लढाऊ  प्राध्यापक तिथं खूप चांगलं काम करताना दिसली असती. आयात केलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या मदतीवर पक्ष कसा चालवायचा हे भाजपनंही ठरवण्याची वेळ आली आहे. गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, राम कदम, मनसेत जाता-जाता राहिलेले अतुल भातखळकर या लोकांनी भाजपचं जेवढं नुकसान केलंय तेवढं नुकसान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळूनही गेल्या दोन वर्षात केलं नाही.

प्रताप सरनाईक, नारायण राणे, अनिल परब यांची चौकशी करायला काहीच हरकत नाही. त्यांना चौकशीला सामोरं जात आर्थिक हिशोब द्यावे लागतील. ते देऊ शकत नसतील तर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटण्याचं कारण नाही. प्रताप सरनाईक यांच्यासारख्या नेत्याच्या मागं स्वतःशिवाय एकही आमदार नाही. त्याचा कसलाही फायदा भाजपला होणार नाही. उलट असा नेता गेला तर त्या ठिकाणी एखादा नवा कार्यक्षम नेता देणं शिवसेनेला सोपं जाईल. कदाचित भाजपकडून सेनेची वाटचाल अधिक सोपी केली जातेय. अनेक वर्षे जागा अडवून बसलेली अशी जी मंडळी आहेत त्यांची यादी उद्धव यांनीच तर भाजपकडे दिली नाही ना? या जड झालेल्या आणि जागा अडवून बसलेल्या नेत्यांची सोय भाजपनं परस्सर केली तर ते त्यांना चांगलंच आहे असं वाटत असेल.

महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हे ते एका वेगळ्या टप्प्यावर आलंय. लोकांच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नसलेल्या सर्वपक्षीय राजकारण्यांचं वागणं कमालीचं दुःखद आहे. प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी काम करताना दिसतोय. आज बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आणि त्यांचा शिवसैनिकही राहिला नाही. बाळासाहेबांच्या शब्दाखातर रस्त्यावर उतरणारी, तुरूंगात जाणारी पिढी सध्या राजकारणात नाही. त्याऐवजी ते भाजपमध्ये जाण्यात धन्यता मानतात. या सगळ्या परिस्थितीत प्रताप सरनाईक यांच्यासारखी प्यादी पुढे करत ती कशीही फिरवली तरी पक्षाला त्यांचा काहीही उपयोग होणार नाही याची नोंद भाजपनं घ्यायला हवी. मोडेन पण वाकणार नाही, लढेन पण माघार घेणार नाही अशा पद्धतीनं लढणारा एखादा नेता आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात असायला हवा होता असं वाटतं.
- घनश्याम पाटील
7057292092
दै. पुण्य नगरी, मंगळवार, दि. 22 जून 2021
 

Monday, June 14, 2021

... तर सैतानाशीही हातमिळवणी करू!


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
यांनी राजगडावर रोपवेची तयारी सुरू केल्यानंतर काही तथाकथित शिवप्रेमींकडून त्यांना विरोध होत आहे. इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन करायचं असेल तर गडावर जाणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे. रायगडावर रोपवे केला तर तिथं जाणार्‍या-येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली. तिथल्या पर्यटनालाही चालना मिळाली. ज्यांना रायगडावर जाण्याची इच्छा आहे पण शारीरिक दुर्बलतेमुळं जे तिथं जाऊ शकत नाहीत त्यांची सोय रोपवेमुळं झाली. एखादा माणूस तरूणपणी कायम रायगडला जायचा पण आता वयाच्या सत्तरीत अनेक आजारांनी ग्रासलं असताना त्याला जमत नाही किंवा एखाद्या गृहिणीला वाटतंय की रायगडाची माती कपाळाला लावावी पण तब्येतीमुळं जमत नाही त्यांची सोय रोपवेमुळं झाली. पर्यटकांच्या येण्या-जाण्यानं गडांचं आणि किल्ल्यांचं सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करणार्‍यांनी लक्षात घ्यावं की हे सौंदर्य आपण कधीच नष्ट केलंय.

गड आणि किल्ले यांच्याकडं दुर्लक्ष करणं गेली दीडशे-दोनशे वर्षे सुरूच आहे. सातार्‍याच्या समोर अजिंक्यतारा आहे. तिथं किती लोक जातात? फिरायला म्हणून जाणारेही अर्ध्यातूनच परत येतात. तो किल्ला आहे तसाच पडून आहे. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात प्रिय असणारा किल्ला. शत्रूला सुद्धा महाराज रायगडावर आहेत की राजगडावर याबाबत कायम संभ्रम निर्माण व्हायचा. त्या संभ्रमावस्थेतल्या शत्रूला फसवण्यासाठी महाराजांनी या दोन गडांचा वापर केला. शिवाजी महाराज आग्र्याला जायला बाहेर पडले ते राजगडावरून आणि महाराज जेव्हा आग्र्याहून परत आले तेही थेट राजगडावर. जिजाऊसाहेबांचा मुक्काम अनेक वर्षे राजगडावर होता. महाराज शाहिस्तेखानावर छापा मारायला बाहेर पडले तेही राजगडावरून. ते राजगडावरून खेडशिवापूरला आले, तिथून पुण्यात आले आणि मग सिंहगडावर जाऊन राहिले. सुरत लूट करून आल्यावरही महाराज राजगडावर आले. शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी, त्यांच्या पराक्रमाशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य इतिहासाशी निगडित असणार्‍या अनेक घटना राजगडावर घडलेल्या आहेत.

मग इथं सध्या नेमकं कोण जातं? इथं सामान्य पर्यटक जात नाहीत. राजगडचा टे्रक हा अवघड आहे. सामान्य इतिहासप्रेमी माणसाला जर राजगड बघता आला आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांचं वैभव बघता आलं आणि त्यासाठी जर रोप वे तयार केला गेला तर कुणाला काही त्रास व्हायचं कारण नाही. राजगडाचं सौंदर्य कमी होईल, इथलं सौंदर्य ढासळेल असं काही होत नाही. रोप वे साठी लागणारी जागा ही अतिशय मर्यादित असते. रायगडावर रोप वे केला गेला तेव्हाही त्याला असाच विरोध केला गेला. रोपवेमुळं रायगड बघणार्‍यांची संख्या वाढली हे वास्तव कोण नाकारणार?

6 जून 1674 ला रायगड जसा होता तसाच आज तो त्यावेळची साधनसामग्री वापरत नव्यानं उभारण्याची गरज आहे. राजगडही पुन्हा तसाच उभारणं शक्य आहे. राजगडावर महाराजांचे महाल कुठं होते, राजसदर कुठं होती, नगारखाना कुठं होता या सगळ्याच्या जागा माहीत आहेत. त्याच्यावर काम करून हे गड पूर्ववत बांधावेत. सामान्य इतिहासप्रेमी शोधतो की या किल्ल्यावर आहे काय? वैराडगड, कमळगड, पालीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, वासोटा, लोहगड, पांडवगड, चंदनगड, वंदनगड, अजिंक्यतारा, तिकोना, सोनगीरचा किल्ला अशा किल्ल्यावर काय शिल्लक आहे? शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती म्हणून शिवप्रेमी तिथंली माती कपाळाला लावतात आणि साडेतीनशे वर्षानंतरही एखाद्या श्रद्धाळू भाविकांप्रमाणे या इतिहासापासून प्रेरणा घेऊन घरी येतात.

रोपवे झाल्यानंतरही रायगडाची अवस्था बर्‍यापैकी चांगली आहे. राजगड टे्रकरसाठी आहे. मग तिथं जाण्यासाठी काही चांगल्या सुविधा झाल्या तर आपण उगीच आरडाओरडा का करतो? जे अवघड आहेत अशा प्रत्येक किल्ल्यावर रोप वे झाले तर बिघडलं कुठं? बरं, रोप वे केला तरी टे्रकरला कोणी पायी जाण्यासाठी अडवत नाही. आज आपल्या गडांची, किल्ल्यांची काय अवस्था आहे? पन्हाळ्यावर आख्खा तालुका वसवलाय. न्यायकोठीत पोलीस स्टेशन चालू केलंय. जिथून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज न्यायनिवाडे करायचे तिथं खाबूगिरी करणारे पोलीस अधिकारी बसून असतात. प्रतापगडावर लोकांनी घरं बांधली आणि तो कमर्शिअल करून टाकला. सिंहगडावर टिळकांपासून ते लता मंगेशकरांपर्यंत अनेकांनी जागा घेतल्या आणि खाजगी बांधकाम केलं. विशाळगडावर गेलात तर मन विषन्न होतं. एका कोपर्‍यात बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांची समाधी आहे. शिवाजी महाराजांना या गडावर पोहोचवण्यासाठी तीनशे बांदल धारातीर्थी पडले. त्यांचं नेतृत्व करणारे बाजीप्रभू आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या धाकट्या भावाच्या नेतृत्वाखाली लढणारे फुलाजी यांनी आदिलशहाचे, जिद्दीचे घाव धाडसानं आपल्या उरावर घेतले. त्यांच्या समाध्या इथं कोपर्‍यात आहेत आणि मस्जिद गडाच्या मध्यभागी आहे. ‘पतीव्रत्तेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’ हा प्रकार इथं घडत असूनही कुणाला इथलं सौंदर्य नष्ट झालंय असं वाटत नाही.

ज्यांनी इतिहास घडवला, इतिहास निर्माण केला, इतिहासाची चाकं बदलली, इतिहासाचा प्रवाह बदलला त्यांच्या समाध्या कोपर्‍यात असाव्यात? आणि ज्यांचा इतिहासाशी काही संबध नाही, महाराजांच्या विशाळगडाशी काही संबंध नाही त्यांच्या मस्जिदी बांधून तिथं कोंबड्या मारल्या जातात. हे गलिच्छ वातावरण बघून कोणताही शिवप्रेमी विमनस्क झाल्याशिवाय राहणार नाही. अशा सगळ्या विषयावर काम न करता शासन काही चांगलं करत असेल तर इथं हे करू नका, तिथं ते करू नका म्हणत हिरीरिनं पुढं येणारे ढोंगी आहेत.

शिवकाळात रायगडावर राजाराम महाराजांचं लग्न झालं होतं. अनेक मावळ्यांची, सैनिकांची, स्वराज्यातील अनेक महत्त्वाच्या लोकांची लग्नं गडावर झाल्याचे उल्लेख आढळतात. एखाद्याला जर वाटलं की अशा गडाला साक्षी ठेवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना, त्या भगव्याला साक्षी ठेवून मला लग्न करायचंय तर त्याला कशाला अडवताय? निदान पत्नीशी कसं प्रामाणिक वागावं याचं तरी भान त्याला येईल. पत्नीला जाहीरपणानं ‘सखीराज्ञी’ म्हणणारा राजा सतराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेला हा संस्कार या जोडप्यांवर नाही का होणार? किल्ल्यांवर रिसॉर्ट करू नका, हॉलिडेज होम करू नका पण इथलं पावित्र्य जपत लग्न लावायला काय हरकत आहे? इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्या वास्तू जपाव्या लागतात. युरोपातल्या अशा अनेक वास्तू त्या देशांनी प्राणपणानं जपल्यात. नेपोलियनच्या आठवणी फ्रान्सनं जपल्यात आणि ड्युक ऑफ वेलिंग्टनच्या आठवणी इंग्लंडनं जपल्यात.

रायगडावरची मोडकी बाजारपेठ, भग्न अवस्थेतील महाराजांचा राजवाडा आणि राणी वसाहत, वरती छप्पर नसलेला आणि अर्धवट भिंती असलेला महाराजांचा दरबार... हे सौंदर्याचं नाही तर पराक्रमाचं प्रतीक आहे. त्यामुळं महाराजांचा इतिहास जपण्याचं काम पर्यटन विभागाला करावं लागेल. त्यासाठी रोप वे सारख्या सुविधा गरजेच्या आहेत. शिवचरित्राचा कोणताही विषय निघाला की तो वादग्रस्त करायचा हा प्रकार लोकांनी आता थांबवला पाहिजे. तात्यासाहेब शिरवाडकरांची कविता आहे, ‘अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!’ ज्यांनी हा इतिहास घडवला त्यांची काही इच्छा नव्हती की त्यांचा स्तंभ बांधा आणि वात पेटवा. त्यांना भविष्यात आपल्या कर्तृत्वाचे अवशेष ठेवायचे नव्हते. त्यासाठी ते लढले नाहीत. एक उदात्त स्वप्न उराशी घेऊन महाराज आणि त्यांचे मावळे लढले. तो इतिहास चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या जातील त्यांच्या सोबत आपण उभं रहायला हवं. एखादा सैतान जरी किल्ल्यांच्या रक्षणासाठी पुढं आला तरी आम्ही त्या संदर्भापुरती त्याच्याशी हातमिळवणी करू.

शिवराज्याभिषेकामुळं रायगड, शिवजन्मामुळं शिवनेरी, अफजलखानाचा कोथळा काढला म्हणून प्रतापगड आपल्या स्मरणात असतात पण राजगडांसारख्या किल्ल्यावरही आपण जायला हवं. शिवचरित्र पुढं नेणारे चार मराठी तरूण याच मातीतून आणि याच प्रेरणेतून उभे राहतील. त्यामुळं तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व प्रकारचे शर्थीचे प्रयत्न करायला हवेत. मग हे प्रयत्न करणारे राज ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, भिडे गुरूजी असोत किंवा आणखी कुणी. त्यांच्या पाठिशी आपण समर्थपणे उभं रहायला हवं.
- घनश्याम पाटील

7057292092

दै. पुण्य नगरी,
मंगळवार, 15 जून 2021