Showing posts with label anokhya reshim gathi. Show all posts
Showing posts with label anokhya reshim gathi. Show all posts

Friday, December 9, 2022

'लिव्ह इन'सारख्या 'अनोख्या रेशीमगाठी'

ज्येष्ठ लेखक श्री. रवींद्र कामठे यांची ‘अनोख्या रेशीमगाठी’ ही महत्त्वपूर्ण कादंबरी नुकतेच ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केली आहे. या कादंबरीची प्रस्तावना.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशभक्तिवरील अनेक कार्यक्रमांना उधाण आले आहे. ‘आम्हीच कसे देशभक्त!’ हे दाखवून देण्याची अहमहमिका तर कायम सुरूच असते. या सगळ्या वातावरणात आम्हाला प्रामुख्याने आठवतात ते गोपाळ गणेश आगरकर! ‘देशाला स्वातंत्र्य तर मिळेलच पण आधी समाजसुधारणा आवश्यक आहेत’ या त्यांच्या आग्रही प्रतिपादनाचा फारसा गांभिर्याने विचार झालाच नाही. तो झाला असता तर समाजात आज सररासपणे दिसणार्‍या कुप्रथा मोडीत निघाल्या असत्या.


एखादी व्यक्ती मोहाच्या झाडाखाली थांबली तर ती मद्यपिच आहे, या समजातून अनेकजण संबंधितांकडे पाहतात. अशा वातावरणात रवींद्र कामठे यांच्यासारखे ज्येष्ठ लेखक मोहाच्या झाडाखाली बसून तल्लीनतेने बासरीवादन करतात आणि प्रसंगी गीतापठणही करतात. अशावेळी ‘लोक काय म्हणतील?’ असा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यातील निर्मळता ते जपू आणि जोपासू शकतात. वेदांचा अभ्यास तर करूयाच पण वेदापेक्षा सामान्य माणसाच्या वेदना कळणे अधिक महत्त्चाचे आहे, अशा भूमिकेतून त्यांची मांडणी असते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखा नाजूक विषय पुढे आल्यास काही तथाकथित धर्मरक्षक नाक मुरडत असताना कामठेकाकांनी आगरकरांच्या सुधारणावादी भूमिकेतून या विषयाची मांडणी केली आहे. मुख्य म्हणजे कादंबरीच्या माध्यमातून हा विषय मांडताना त्यांनी भारतीय संस्कृतीतील सद्विचारांचेही जतन आणि संवर्धन केले आहे.

भारतीय जीवनव्यवस्थेत विवाहाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात, असा अनेकांचा समज आहे. इथल्या परिस्थितीनुसार अनेकदा या गाठी सैल होतात, काही वेळा तुटतात. अकाली अशा गाठी तुटून एकाकी असलेल्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही. आपल्या समाजात आजही विधवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित आहे, हे नागडे सत्य कोण नाकारणार? एखादा विधुर असेल तर त्यालाही त्याचे जीवन एकट्याने जगणे असह्य होते. काही वेळा एकटे असणे परवडते पण एकाकी पडणे म्हणजे दिव्यातील तेल संपल्यानंतर वातीने मिणमिणत राहिल्यासारखे आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या व्यथा-वेदना समजून घेण्याइतकीही संवेदनशीलता आपण अंगी बाळगू शकत नाही. हाच धागा पकडून रवींद्र कामठे यांच्यासारख्या जीवनानुभव समृद्ध असलेल्या लेखकाने पुढाकार घेत कादंबरी लिहिणे म्हणजे प्रारंभी उल्लेखल्याप्रमाणे आगरकरांचा विचार पुढे नेण्यासारखेच आहे. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील या कादंबरीकडे व्यापक नजरेने पहायला हवे.

प्रभाकर आणि पूजा यांच्यासह दीपक आणि सई अशा दोन पिढ्यांच्या भावभावनांचे प्रगटीकरण या कादंबरीतून झाले आहे. एकाच इमारतीतील एक बाप आणि मुलगा आणि एक आई आणि तिची मुलगी सहवासातून एकत्र येतात आणि त्यांचे ऋणानुबंध निर्माण होतात. या सगळ्यांना जवळ आणताना लेखकाने ‘लिव्ह इन’सारखा पर्याय निवडूनही कुठेही उथळपणा येऊ दिला नाही. आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन हा प्रश्न सामर्थ्याने मांडताना त्यांनी आपल्या परंपरा, रीतिरिवाज जपले आहेत. अशा धाडसी विषयाला हात घालूनही संस्कार आणि संस्कृतीला मूठमाती दिली नाही. दोन पिढ्यातील प्रेमसंबंध फुलवताना कुठेही वाह्यातपणा येऊ दिला नाही. एकमेकांना समजून घेणे, आधार देणे, दुःखातून सावरायला मदत करणे यातून त्यांनी ही कलाकृती साकारली आहे.

कोकणातील आंजर्ल्याचे आणि त्या परिसराचे आलेले मनोहारी वर्णन हा तर या कादंबरीचा आत्मा आहे.
तिथल्या आजीने म्हणजे प्रभाकर-दिवाकरच्या आईने एका विधवेला आपल्या मुलासोबत सत्यनारायणाच्या पूजेला सन्मानाने बसवणे, आपल्या मुलासोबत लग्न होण्यापूर्वीच तिचा सून म्हणून स्वीकार करणे, हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात तिची सर्वांसोबत ओळख करून देणे आणि या दोघांना एकत्र आणण्यासाठी धडपड करणे यातून आजचा बदलता भारत दिसतो. असा पुरोगामी विचार जपणे हीच तर काळाची खरी गरज आहे. रवींद्र कामठे यांच्या लेखणीने ही किमया साध्य केलीय.

आंजर्ल्याहून परत येताना जिथे दीपाचा मृत्यू झाला होता तिथे पूजाने ओटी भरणे, मुंबईला परतल्यावरचे दोन्ही जोडप्यांचे सहजीवन, वकीलकाका, विजयकाकांनी केलेली मदत आणि स्वतःच्या स्वतःच्या साखरपुड्यातील दीपकचे भाषण अशा अनेक प्रसंगात या कादंबरीने कमालीची उंची गाठली आहे. विवाहसंस्था समजून घेण्याच्या आधीची एक महत्त्चाची पायरी म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था समजून घेणे! त्याच्याच प्रांजळ प्रतिबिंबातून या अनोख्या रेशीमगाठी सिद्ध झाल्या आहेत. वाचकांनी ही कादंबरी वाचणे, समजून घेणे आणि जमल्यास आचरणात आणून अशा परिस्थितीतील स्त्री-पुरूषांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणे हेच या कलाकृतीचे फलित असणार आहे.
अनोख्या रेशीमगाठी
लेखक - रवींद्र कामठे
प्रकाशन - चपराक
(7057292092)
पाने - 192, मूल्य - 300/-
- घनश्याम पाटील

ही कादंबरी www.shop.chaprak.com वरून घरपोच मागवू शकाल.