Saturday, December 10, 2022

साहित्य स्वानंदातून मिळालेली 'ज्योती!'

माझ्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीची माहिती नाही, माझी जात, धर्म, पंथ माहिती नाही. मी दिसतो कसा, बोलतो कसा याचाही फेसबुकवरूनच अंदाज घेतलेला. आमची दोघांची किंवा आमच्या दोघांच्या घरच्यापैकी एकमेकांची कुणाचीही एकदाही भेट नाही. गेला बाजार आम्ही कधी एकमेकांना व्हिडीओ कॉलवरही बोललो नाही... तीन-चार वेळा व्हाट्सअ‍ॅपवर बोलणं झालं होतं तेही ‘चपराक’च्या अनुषंगानं! म्हणजे तिचा मला मेसेंजरवर एसएमएस आला तर मी लहरीनुसार चार-दोन दिवसांनी उत्तर द्यायचो. मी उत्तर दिल्यावर ती एक-दोन दिवसांनी त्याला प्रतिउत्तर द्यायची.

...असं सगळं असताना एके दिवशी अचानक तिनं मला व्हाट्सअ‍ॅपवरच लग्नाची मागणी घातली. ‘लग्न केलं तर तुमच्याशीच’ हेही निक्षून सांगितलं. माझं थोडंफार लेखन तिनं वाचलं होतं आणि त्यावरच इतका मोठा ‘धोका’ स्वीकारला होता. तिनं मला माझ्याविषयी थोडं विस्तारानं विचारलं होतं. मी माझ्या आळशी स्वभावाप्रमाणं तिला मित्रवर्य महादेव कोरे यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणार्‍या ‘साहित्य स्वानंद’ दिवाळी अंकातील ‘राहिलेलं राहूच द्या’ हा लेख पाठवून दिला. या लेखानं एखाद्या प्रेमपत्राप्रमाणं किमया केली आणि तिच्यावर गारूड घातलं. तिनं सांगितलं, ‘यातली तुमची राहून गेलेली एक तरी गोष्ट मला पूर्ण करायची आहे. आजवर माझ्यासाठी अनेक स्थळं आलीत पण दिवसभर काम करून नवरा घरी आल्यानंतर किंवा मी बाहेरून घरात पाऊल टाकल्यावर ज्याच्याविषयी आदर वाटावा असं स्थळ आलं नाही. ते मला तुमच्यात दिसतंय. तुम्ही जसे आहात तसे मला माझे वाटता...’

का ते अजूनही सांगता येणार नाही पण मीही भारलेल्या अवस्थेतच तिला होकार दिला. माझ्यासाठी आदरणीय असलेल्या माझ्या यशोदामैय्याशी मी याबाबत चर्चा केली. त्यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केल्यानं त्यांचा सल्ला मोलाचा होता. मी लग्न करण्यासाठी तयार आहे या बातमीनंच त्या आनंदविभोर झाल्या. मग मी निश्चिंत मनानं तिला कळवलं, ‘प्रभू श्रीरामाच्या साक्षीनं मी आजपासून तुला पत्नी म्हणून स्वीकारत आहे. यानंतर आपली भेट होईल, पुढचं काय ते ठरेल. ती केवळ औपचारिकता. मी तुला मनानं स्वीकारलंय. माझ्या आईविषयी माझ्या मनात जसा आणि जितका आदर आहे तसं आणि तितकंच प्रेम तुझ्यावर असेल...’

दुसर्‍या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर 2021 ला तिचे आईवडील आणि भावाशी माझं बोलणं झालं. त्यांना मी सांगितलं, ‘तुमच्या मुलीनं मला लग्नासाठी प्रपोज केलंय. आम्ही दोघे किंवा आपण कुणीही भेटलो नाही, बोललो नाही. गेली वीस वर्षे माझा संघर्ष सुरूच आहे. तो आयुष्यभर तसाच राहील. माझी संस्था माझ्यासाठी सर्वस्व आहे. ‘चपराक’ हे माझं पहिलं प्रेम असेल. चपराकची सवत म्हणून माझ्या आयुष्यात तुमची मुलगी असेल. माझ्या गुणदोषासह मला स्वीकारणं तुम्हाला जमणार आहे का?’

त्यापूर्वी तिनं त्यांना माझ्याविषयी कल्पना दिली होती. ‘चपराक’चे अंकही तिच्या घरात गेलेले होते. तिच्या आईला श्री समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध वर्गात ‘चपराक’ मिळालेला होता. त्याहून मोठी गंमत म्हणजे त्या कण्हेरी मठाच्या प. पू. काडसिद्धेश्वर स्वामींच्या अनुयायी आहेत. गेल्या वर्षीच्या चपराक दिवाळी अंकात मी स्वामीजींची सविस्तर मुलाखत घेतली होती. ती मुलाखत आणि स्वामीजींसोबतचा माझा फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची दक्षता माझ्या होणार्‍या बायकोनं घेतली होती. ते पाहताच त्यांना विरोध करण्याचं काही कारण बाकी नव्हतं.

दुसर्‍या दिवशी फोनवर बोलून आम्ही लगेचच चौथ्या दिवशीचा आमच्या साखरपुढ्याचा मुहूर्त काढला. ती म्हणाली, ‘पुण्यात माझे मामा असतात. आपण मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करू!’

मी म्हणालो, ‘मुलगी म्हणजे भाजीपाला नाही. माझ्यासारख्या फकिरासोबत तुला लग्न करावं वाटतंय यातच सगळं आलं. माझी काही पुस्तकांची धावपळ सुरू आहे. लग्नदिनी आपण मंगल कार्यालयातच भेटू! माझं लेखन तू वाचलंय. तुझं लेखन मी बघितलंय. मी जात-धर्म मानत नाही. शारीरिक सौंदर्य चिरकाल टिकत नाही. मनाच्या सौंदर्यावर, कर्तृत्वावर माझा विश्वास आहे.’

ती वैमानिक शास्त्राची अभ्यासक. एरॉनॉटिकल इंजिनिअर म्हणून बंगळूरूत काम केलेलं. तिची ‘कॅलिबर कंटेट’ ही संस्थाही कोल्हापूरात कार्यरत होती. उत्तम गीतकार आणि कवयित्री म्हणून मी तिच्याकडे बघायचो. आम्ही एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केल्यानंतरचा तो मोरपंखी दिवस... तिनं तातडीनं तिच्या कार्यालयात या घडामोडी कळवल्या. केवळ चार दिवसांनी साखरपुडा होणार म्हणून लगबगीनं सर्वांचा निरोप घेतला. ज्या एका प्रकल्पावर काम सुरू होतं ते लॅपटॉपवर पूर्ण करून पाठवेन असं तिनं तिच्या वरिष्ठांना सांगितलं. सगळंच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक असलं तरी आनंददायी होतं. त्यामुळं कसलीही अडचण आली नाही. ती बेंगळूरूहून कोल्हापूरला निघाली. बेळगाव येईपर्यंत आमचं एकमेकांविषयी बोलणं सुरू होतं.

...रात्र सरली. सकाळ झाली. कोल्हापूर आलं. मी म्हटलं ‘मी थोड्या वेळानं आवरून फोन करतो. तोपर्यंत तुही घरच्यांना सगळं सांग.’ साडे-अकरा बाराला मी पुन्हा फोन केला. तिला म्हटलं, ‘मी प्रकाशक, पत्रकार! रिकामा डामडौल मला आवडत नाही. अनावश्यक उधळपट्टी तर नाहीच नाही. समाज काय म्हणतो हे मला कधीच महत्त्चाचं वाटलं नाही. आपण लग्न केलं तरी ते अतिशय साधेपणानं करणार आहोत. कोर्ट मॅरेज! त्यासाठी जेमतेम दहा-पंधरा स्नेही उपस्थित असतील. साखरपुड्यासाठी मात्र माझ्या घरचे आणि कार्यालयातले असे दहा-पंधरा जण येत आहेत. तुमच्या घरचेही तितकेच लोक असावेत. आताच कोविडचा काळ संपलाय. त्यातून आपण बाहेर पडतोय. मग वेळेचा आणि पैशाचा असा अनावश्यक उपयोग करण्याऐवजी आपण लग्नच का करू नये?’

ती म्हणाली, ‘माझ्याही मनात हे आलं होतं! पण आज 23 तारिख. दोनच दिवस हातात राहिले. इतक्यात सगळं होईल का?’

तिला म्हटलं, ‘आपल्याला कोण विचारणार आहे? जसं होईल तसं करू! तुझ्या घरच्यांना विचार.’

त्यांनीही आनंदानं सहमती दिली. माझ्या आईबाबांना तर गगन ठेंगणं वाटत होतं.

24 तारखेला माझी यशोदामैय्या सौ. शुभांगी गिरमे, आमच्या परिवाराच्या ज्येष्ठ सदस्य सौ. चंद्रलेखा बेलसरे, रवींद्र कामठे काका, माधव गिर सर आणि जिगरी यार प्रमोद येवले अशा सर्वांची एक छोटीशी बैठक झाली. माझी ताई, आई आणि भाच्या यांना कपडे खरेदीला पिटाळलं. गिरमे, बेलसरे, कामठे, गिर, प्रमोद आणि मी दागिणे खरेदी करायला गेलो. तिकडे कळवलं, ‘मुलीचे कपडे, अंगठी तिकडेच घ्या. मुलाचे कपडे, अंगठी आम्ही इकडे घेऊ! म्हणजे आवड, माप अशा अडचणी येणार नाहीत.’ दोन तासात आमची सगळी खरेदी उरकली आणि आम्ही कार्यालयात येऊन पुस्तकाच्या कामात गढून गेलो. 26 डिसेंबरला लग्न होतं. त्या दिवशी रविवार असला तरी सुटी घ्यावी लागणार होती. समोर कामं तर खूप पडली होती. मग 25 ला मध्यरात्रीपर्यंत मी काम करत होतो. तिकडे तिनेही अचानक नोकरी सोडल्याने जो प्रकल्प अर्धवट राहिला होता तो मध्यरात्रीपर्यंत पूर्ण केला. त्यांना तो पाठवला. दोघांचंही काम पूर्ण झाल्याचं आम्ही एकमेकांना कळवलं आणि दुसर्‍या दिवशीची वाट पाहू लागलो.  

रविवारी आईवडिलांसह घरातले पाच-सात सदस्य आणि कार्यालयातले बारा-पंधरा सहकारी अशा वरातीसह आम्ही श्री क्षेत्र नृसिंहवाडी गाठली. गाडीवरील ‘चपराक’ ही अक्षरे पाहून एक गृहस्थ जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, ‘मी मुलीचा बाबा!’

मंगल कार्यालय परिसरात आमची नजरानजर झाली आणि बोहल्यावर थांबल्यावर आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष बघितलं. कसलाही थाटमाट न करता, अतिशय साधेपणानं आमचं लग्न झालं. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ऐनवेळी काही लेखक आले. माझा आवडता युवा कवी प्रशांत केंदळे यांना त्याच दिवशी एक महत्त्वाचा पुरस्कार होता. त्यासाठी त्यांना नागपूरला जायचं होतं. अचानक माझ्या लग्नाची ही बातमी कळल्याने आदल्या रात्री ते पुण्यात आले. रवींद्र कामठे काकांच्या घरी त्यांनी मुक्काम केला आणि पुरस्कार समारंभ टाळून तेही लग्नाला आवर्जून उपस्थित राहिले.

त्यांचा ‘गुलमोहराचं कुकू’ हा संग्रह ‘चपराक’नं प्रकाशित केलाय. त्यातील हीच शीर्षककविता मला अतिशय आवडते. प्रशांतदादांनी मंगल कार्यालयात लग्नस्थळी मंगलाष्टक म्हणून हीच कविता गाऊन सादर केली. एका आवडीच्या कवितेच्या साक्षीनं आम्ही एकमेकांना माळा घातल्या.  

आजच्या काळात अविश्वसनीय वाटेल असा हा पाच दिवसातला घटनाक्रम. तिला बेंगळुरूहून लग्नासाठी कोल्हापूरला यायचं म्हणून ती त्या चार दिवसात दिवसरात्र कार्यरत होती. अचानक जॉब सोडल्यानं सगळ्या गोष्टींची तिला पूर्तता करावी लागणार होती. लग्नाच्या आदल्या रात्री बारा-साडेबारापर्यंत आम्ही आपापलं काम पूर्ण करत होतो. रविवारी लग्न झालं आणि सोमवारी मी कार्यालयात होतो. इतकंच नाही तर अंगावरची हळदही उतरलेली नसताना अवघ्या चार दिवसात मी बीड जिल्ह्यात चौथ्या एकता साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून गेलो... ते सगळं पाहून काहींनी प्रश्न उपस्थित केले. ‘समाजमाध्यमावरून झालेली अशी लग्नं फार काळ टिकत नाहीत’ हेही स्पष्टपणे कळवायचा अगोचरपणा केला. त्या सगळ्याकडं दुर्लक्ष करत आम्ही एकमेकांना समजून घेत आहोत. दोघांचंही विश्व वेगळं असं राहिलंच नाही. आमच्यात जी एकरूपता साधलीय ती कमालीची आश्चर्यकारक आहे.

हे सगळं सांगण्याचं कारण आम्ही फार काही वेगळं केलंय हे नाही. साहित्य माणसाला मानसन्मान, प्रतिष्ठा, पैसा यासह योग्य जोडीदार देतं हे सांगणं मात्र आहे. यासाठी कारणीभूत ठरला तो ‘साहित्य स्वानंद’चा दिवाळी अंक. दिवाळी अंकातील एक लेख काय करू शकतो? असं मला कोणी विचारलं तर मी आनंद आणि अभिमानानं सांगू शकतो की, ‘बाबा रे, एक लेख आपला संसार उभा करतो.’

एकमेकांना समजून घेत आमचा संसार सुखात चाललाय. येत्या 26 डिसेंबरला आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल.

...आणि हो,

आमच्या दोघात आता तिसर्‍याची गोड चाहूलली लागलीय बरं! आमच्या पहिल्या लग्नदिनाला आमच्या दोघांसोबत तिसराही असेल. आमचे उमेश सणस सर मला नेहमी गंमतीनं म्हणायचे, ‘संपादक महोदय, लवकर लग्न करून हिंदुंची लोकसंख्या वाढवा...’

‘कधीच लग्न करायचे नाही,’ या निश्चयाचा डोलारा सपशेल आपटला असून सणस सरांची ही इच्छा आम्ही पूर्ण केली आहे.

जीवन खरंच खूप विलक्षण आहे. आयुष्यात कसे आणि काय बदल होतील हे कोणीही सांगू शकणार नाही.

माझ्यावर अमाप प्रेम करणारी माझी प्रिय बायको, माझी सच्ची मैत्रिण तिच्या क्षेत्रात तळपत आहे. आमच्या ‘लाडोबा’ या बालकुमारांच्या मासिकाची ऑनलाईन संपादक म्हणून काम पाहतानाच ती सहायक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत योगदान देत आहे. लवकरच प्रदर्शित होणार्‍या ‘मुगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या सिनेमात गीतकार म्हणून ती झळकतेय. तिची गाणी ऐकताना माझं मन प्रफुल्लित होतं. बालपणापासून आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणं आणि तारूण्यात आवडीच्या क्षेत्रातच कार्यरत असलेली जीवनसाथी मिळणं ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.

तिचं नाव ज्योती! ती तिच्या कर्तृत्वाचा प्रकाश सर्वत्र पेरत आहे. अशावेळी तिला माझं एकच सांगणं आहे, तू मनासारखं जग, हवं ते कर, आभाळासारखी विशाल हो! बस्स! मला आणखी काय हवंय?

- घनश्याम पाटील
7057292092

ता. क. : ‘साहित्य स्वानंद’चा दिवाळी अंक हाती आला आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे 2 नोव्हेंबरला आमच्या परिवारात तिसरी सदस्य आली आहे. परमेश्वरानं एक गोड परी आमच्या घरी पाठवलीय. ‘यशदा’ असं तिचं नामकरण आम्ही केलंय.


22 comments:

  1. सहज प्रमाणिक कथन... कौतुकास्पद प्रेम लग्न.. तुम्हाला आणि यशदाला अनेक शुभाशीर्वाद....

    ReplyDelete
  2. वा! सर्व काही आल्हाददायक, आनंददायक, ज्योतिर्मय....👍💐 हार्दिक शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  3. घनश्याम-ज्योती यांच्या मिलनाची ही कहाणी चित्रपट कथेइतकीच अविश्वसनीय, हवीहवीशी आणि सुरस आहे. दोघांनाही आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला. हे क्वचितच घडतं. त्यासाठी आपण दोघं अभिनंदनास पात्र आहात. तो सर्वशक्तिमान, परमपिता परमेश्वरही आपणावर खुष आहे. आपल्या घरी यशदा नावाची परी पाठवून, त्यावर त्याने शिक्कामोर्तब केलं आहे.
    आपणा तिघांना अनेकोत्तम आशीर्वाद आणि आभाळभर शुभेच्छा.!

    🌷🌷👍😀👍🌷🌷
    देवरुप परिवार, धरणगाव.

    ReplyDelete
  4. खूप छान. आपलं प्रांजळ, प्रामाणिक मनोगत आवडलं. उभयतांचे अभिनंदन!

    ReplyDelete
  5. छान.वाचून आश्चर्याचा धक्का बसला पण तो सुखद. त्याची पार्टी करायला मी 14 डिसेंबर ला पुण्यात येत आहे.दोन अडीच वर्षात कोरपना मुळे भेटी झाल्या नाहीत. या काळात चपराक मासिक व साप्ताहिक आणि लाडोबा पाहिला नाही.जे राहिलं ते आता पूर्ण करू .वेळ काढा.

    ReplyDelete
  6. स्वर्गानुभूती! खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  7. खूप छान. मनातल्या खोल कप्प्यातून आलेला हा ज्योतिर्मयी उमाळा आहे. वेदना तर आहेतच परंतू त्या पचविल्याचा हर्ष आहे.

    ReplyDelete
  8. अप्रतिम योगायोग.अनुरूप जोडी.Made for each other. का कोण जाणे! पण आपल्या जोडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती.ज्योती एक प्रतिभासंपन्न कवयित्री आहेत ,आणि त्यांचे आपल्यावर नितांत प्रेम आहे ,हे त्यांच्या प्रत्येक पोस्ट मधून जाणवते.मन जुळणारा क्षण सुवर्ण मती असतो ,आपले विचार ,मते,आवडीनिवडी यांचा सुरेख संगम आपल्या प्रपंचात आहे,यांचे प्रतिबिंब आपल्या कार्यकत्रुत्वात होवो! या आपणा उभयतांना मंगलमयी शुभेच्छा

    ReplyDelete
  9. व्वा..! किती भारी खूप छान खूप अभिनंदन 👌👍💐

    ReplyDelete
  10. आपला जीवनप्रवास आणि वैवाहिक आयुष्य असंच आनंददायी असू दे..

    ReplyDelete
  11. अमर कुसाळकरDecember 10, 2022 at 4:09 AM


    खूप आनंदात रहा ,
    वराकडील वऱ्हाडात कदाचित मी ही असतो पण. . .

    आम्ही सांगून थकलो होतो , लग्न करा म्हणून . . . खूप छान लेख

    घन-ज्योती कथा 😄

    ReplyDelete
  12. अभिनंदन पाटील सर

    ReplyDelete
  13. दादा खूपच सुंदर लिहलंय 👍आपणास व ज्योती ताईंना वैवाहिक आयुष्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा🍃🌹 यशदा परीला भरभरून प्रेम व शुभेच्छा🍃🌹🥰🥰🥰🥰😍😍

    ReplyDelete
  14. विचारांची अनुरुपता या पायावर सुरू झालेले सहजीवन  म्हणजे आशयगर्भ कविताच जणू, अन् एका चिमुकल्या जीवाच्या आगमनाने त्या कवितेला सुखाचे सूर लाभून त्याचं सुरेल आनंदगाणं होऊन जातं. आपला प्रवास याच सुंदर वाटेवर असाच अव्याहत सुरू राहो या शुभेच्छा!

    ReplyDelete
  15. अगदी मनभावन लिहिलंय दादा... खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  16. मित्रवर्य घनशाम जी, वरील उल्लेखित काही घटनांचा साक्षीदार होता आलं हे आमचं भाग्य ! बाकी आपणा उभयतांना आणि यशदा ला एकता परिवाराच्या वतीने अनंत शुभेच्छा !!

    ReplyDelete
  17. वाह! ❤️ खुप छान 🥰

    ReplyDelete
  18. घनश्याम ज्योती पाटील उभयतांचे तिसरीसह स्वागत आणि अभिनंदन. सुखी आणि समाधानी सहप्रवासा साठी अनेक शुभेच्छा

    ReplyDelete
  19. आपल्या लग्नाची आगळी वेगळी कहाणी!
    खूप छान, आपण उभयतांना आणि यशदाला मनःपूर्वक शुभेच्छा…

    ReplyDelete
  20. हा लेख एखाद्या सुंदर चित्रपटासारखा डोल्यांसमोर उभा राहतो, अप्रतिम…

    ReplyDelete
  21. आपली कहाणी वाचुन मला लहानपणी ऐकलेली रुक्मीणी स्वयंवर व नल दमयंती स्वयंवराची आठवण झाली हे क्षण सर्व सामान्याच्या जीवनात येवू शकत नाहीत त्यासाठी बैद्धीक वैचारीक तपाची अवश्यकता असते आपल्या विचारात ती महानता दिसते आहे आपला जीवन प्रवास खुप छान होवो व आपल्या कडून महान कार्य होवो ही सदीच्छा .

    ReplyDelete