Saturday, February 21, 2015

दाभोलकर-पानसरे यांच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न?





अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास 18 महिने पूर्ण झाले. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला आणि नंतर भाजप सरकारलाही सपशेल अपयश आले. या धक्क्यातून महाराष्ट्र सावरलेला नसतानाच डाव्या चळवळीचे पितामह अशी ओळख असलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर त्याच पद्धतीने हल्ला करण्यात आला. महाराष्ट्रासाठी निश्‍चितच हा मोठा कलंक आहे. 
या दोन्ही प्रकरणात हल्लेखोरांनी सकाळच्या वेळी दुचाकीवरून येऊन गोळ्या घातल्या. दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही मिनिटांत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, ‘यामागे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हात आहे.’ कोणताही पुरावा नसताना मुख्यमंत्री महोदयांनी हे जे तारे तोडले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र विचलित झाला. पृथ्वीराज चव्हाण यांना दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाची दिशा बदलायची होती की काय? अशी शंका येण्यास मोठा वाव आहे. यामागे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते तर आजपर्यंत त्यांना अटक का झाली नाही? पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना पाठीशी तर घातले नाही ना? राज्याचा जबाबदार मुख्यमंत्री अशी विधाने करून तपासकामात अडथळे आणतो हे दुर्देवी आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीप्रमाणे दाभोलकरांच्या हत्येत सहभागी असणार्‍या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नावे चव्हाणांनी जाहीर करावीत.
गोविंदराव पानसरे यांच्या हत्येनंतरही धर्मवादाचे राजकारण करत हिंदुत्ववाद्यांनी हे कारस्थान केल्याचा आरोप सगळीकडून होत आहे. हे जर खरे असेल, तर आरोप करणार्‍यांनी तसे पुरावे देऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल याची दक्षता घ्यावी. उगीच आरोप करून किंवा निषेधाचे काळे झेंडे फडकवून काहीही साध्य होणार नाही. विचारवंतांवरील, सामाजिक कार्यकर्त्यांवरील असे हल्ले दुर्देवी आहेत. त्यामागील खरी कारणे शोधून काढण्यासाठी आणि हल्लेखोर पकडण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे. 
वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा प्रमुख स्तंभ असतो. मात्र, काही भांडवलदार वृत्तपत्रे अशा घटनांचे भांडवल करून समाजात दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत. समाज किती असंवेदनशील आहे, पोलीसयंत्रणा किती सुस्तावलेली आहे हे सिद्ध करण्यासाठी दैनिक ‘लोकमत’ने पुण्यात काल एक स्टींग ऑपरेशन केले. कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सुप्रसिद्ध विचारवंत हरी नरके, पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्यावर पाळत ठेऊन, हल्ल्याचा प्रयत्न करून ‘लोकमत’सारख्या जबाबदार वृत्तपत्राने काय सिद्ध केले हे कळायला मार्ग नाही. आपल्या शहरात कुणालाही, कधीही, कसेही मारता येते याचे प्रात्यक्षिकच ‘लोकमत’ने दाखवून दिले आहे. विद्या बाळ यांच्यावर हल्ला करताना वापरलेल्या दुचाकीवर ‘प्रेस’ असे लिहिलेेले स्पष्टपणे दिसते, तर विश्‍वंभर चौधरी यांना गोळ्या घालणारा हल्लेखोर हसताना दिसतो. हे सारेच क्लेषकारक आहे. आपले शहर असुरक्षित असल्याने काहीही होऊ शकते अशी भीतीची भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली आहे. 
वृत्तपत्रांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करायला हवे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या लक्षात आणून द्यायला हव्यात. लोकाना निर्भय करायला हवे. मात्र, घडतेय ते उलटेच! प्रसारमाध्यमे लोकाच्या मनातील भीती वाढवत आहेत. यंत्रणेचे हसे करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, तथाकथीत विचारवंत कोणतीही घटना घडल्यानंतर हिंदुत्ववाद्यांवर खापर फोडून मोकळे होत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, कायद्याचा धाक निर्माण व्हावा, असे कुणाला गंभीरपणे वाटते की नाही?
जवखेडा प्रकरणात ‘दलित अत्याचार’ म्हणून राज्य धुसमुसत असताना हल्लेखोर त्यांच्याच नात्यातील निघाले. ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे. कोणत्याही जातीत किंवा कोणत्याही धर्मात सगळेच चांगले अथवा सगळेच वाईट असूच शकत नाहीत. जे चुकीचे आहेत, समाजद्रोही आहेत, त्यांना कठोर शासन अवश्य करावे, मात्र यानिमित्ताने कोणत्याही धर्माला बदनाम करू नये ही विनंती. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे सर्वांसाठी वंदनीय होते. त्यांचे कार्य खरोखरीच अफाट होते. स्वामी विवेकानंदांनीही हिंदू धर्मातील काही चुकीच्या गोष्टी ठामपणे दाखवून दिल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कुणी हल्ला केला नाही. दाभोलकर, पानसरे हेसुद्धा समाजातील कुप्रवृत्तींविरूद्ध संघर्ष करत होते. त्यांचा संघर्ष द्वेषमूलक नव्हता, हे त्यांच्या अनुयायांनी लक्षात घ्यावे. अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी समाजानेही दक्षता घ्यायला हवी. आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे, ते जागरूकपणे पहावे आणि कुप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. विचारांची लढाई विचारानेच लढली गेली तर ती खरी अशा विचारवंतांना श्रद्धांजली ठरेल.
घनश्याम पाटील,
संपादक, प्रकाशक, ‘चपराक‘, पुणे
7057292092

Thursday, February 19, 2015

‘झुळूक आणि झळा’ - सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांची प्रस्तावना

‘झुळूक आणि झळा’ हा घनश्याम पाटील यांच्या साप्ताहिक ‘चपराक’मधील झंझावाती अग्रलेखांचा संग्रह. संग्रहाच्या नावात जरी झुळूक हा शब्द असला तरी ही झुळूक झंझावातातील समाजाबद्दलच्या प्रेमाची, अनुकंपेची ग्वाही देते. झळा या प्रखर विचारांच्या आहेत. झोपी गेलेल्यांना जागवण्यासाठी आहेत. अग्रलेखांचे, अगदी मोठमोठ्या वृत्तपत्रांतूनही घसरत चाललेले महात्म्य पाहता, पुस्तक व्हावे, त्याबद्दल प्रकाशनाआधीच लोकांच्या मनात उत्सुकता असावी, पुन्हा पुन्हा एकत्र वाचण्याचा आनंद मिळावा अशी भावना असावी यातच पाटील यांच्या खंद्या विचारशैलीची ताकद आहे. मला वाटते, या अग्रलेख संग्रहाचे तेच महत्व आहे.
घनश्याम पाटील यांच्या अग्रलेखांचे संग्रहित हे पहिलेच पुस्तक नाही. पुर्वीच त्यांचे ‘दखलपात्र’ हे एक ‘चपराक’मधील अग्रलेखांच्या संग्रहाचे पुस्तक निघाले होते. त्याचे प्रचंड स्वागतही झाले. अनेक नामवंत माध्यमांनी त्याची दखल घेतली. एकेकाळी आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे आणि नीलकंठ खाडीलकरांच्या धारदार अग्रलेखांनी महाराष्ट्रीय वृत्तपत्रांना समाजप्रबोधक, राजकीय तसेच मराठी अस्मितेची दिशा दिली. काळ बदलत असतो तसे सामाजिक प्रश्नही बदलत जातात. प्रश्नांचे संदर्भही बदलत जातात. प्रासंगिक घटनांवर नुसते वरकरणी भाष्य वाचकांच्या बौद्धिक गरजा पूर्ण करायला असमर्थ ठरत जाते. प्रश्नाचे सर्व पैलू पाहिले जाणे, त्यातील धागेदोरे उलगडत समाजजीवनाशी ते कसे परिणाम करणारे ठरणार आहेत यावर वैचारिक भाष्य करणे अभिप्रेत असते. श्री. पाटील ते करण्यात यशस्वी होतात, आणि म्हणूनच त्यांचे अग्रलेख वाचनीय व संग्राह्य होतात, कारण ते वाचकाच्या विचारविश्वावरही परिणाम करण्यात यशस्वी होतात.
पाटील यांच्या अग्रलेखातील सर्वच मते मान्य व्हायला हवीत असा त्यांचाही आग्रह नसावा. काही अग्रलेखांतून, सामाजिक घटनांतून आलेला संताप, उद्वेग प्रखर भाषेत प्रकटताना दिसतात पण त्यात व्यक्तिगत राग-लोभ नसतात, उलट बदल घडावा ही आर्त भावना दिसते.
या संग्रहात अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, भाषिक, धार्मिक व साहित्यिक विषय हाताळले गेलेले आहेत. अग्रलेख लिहिण्याचे कारण तात्कालिक प्रसंगात असले तरी त्यावरील पाटलांचे भाष्य हे त्या-त्या क्षेत्रातील समुदायांना विचार करायला भाग पाडणारे आहे यात शंका नाही. उदा. ‘लोकसंख्यावाढीची मुक्ताफळे’ या अग्रलेखात ते अलीकडेच ‘शंकराचार्यांनी हिंदुंनी दहा-दहा मुले प्रसवावीत’ अशा केलेल्या विधानावर सडकून टीका करताना ‘स्त्री हे फक्त प्रजननाचे साधन नाही, तिच्याकडे केवळ मादी म्हणून पाहू नये’ असा स्त्रीवादी विचार मांडताना मुस्लिम स्त्रियांच्याही आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन ‘त्यांचे प्रबोधन का केले जात नाही?’ असा मुलभूत प्रश्नही उपस्थित करतात. खरे तर मुस्लिम द्वेषाची एक लाट निर्माण होऊ पाहत असताना समन्वयवादी आणि प्रबोधनवादी भूमिका घेणारे पाटील नक्कीच अभिनंदनीय ठरतात.
‘यशाचे हजार बाप’ या अग्रलेखात ते म्हणतात, ‘...मात्र इतर धर्मांचा द्वेष करणे, त्यांना कमी लेखणे आणि त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करणे यातच मोठमोठी साम्राज्ये भुईसपाट झाली आहेत.’ ते एका अग्रलेखात ‘परभाषेचाही द्वेष करू नका’ असे सुचवतात. मला वाटते हे विधान भारतात तरी सार्वकालिक आहे. मुळात द्वेषाची भूमिका वाईटच. त्या द्वेषाला धर्मांधतेचे किंवा अंध भाषिक अस्मितेचे स्वरुप आले तर, धर्म कोणताही असो, त्यातून राष्ट्र कधीही उभे राहू शकत नाही हे वास्तव भारतीयांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. बोकाळत्या असहिष्णुतेला तिलांजली दिली पाहिजे व द्वेषाची ऊर्जा सकारात्मकतेत बदलत एकमेकांचा विकास कसा होईल, अनिष्ट प्रथा-परंपरांचा त्याग करत हातात हात घालून वाटचाल केली पाहिजे. असे सार्थ विवेचन करत असताना ते भाजपाला, मोदींना व अमित शहांनाही आपल्या टीकास्त्रातून सवलत देत नाहीत. ‘कट्टरतावादाचा अतिरेक’ या अग्रलेखात ते मोदींनी केजरीवालांना ‘नक्षली चळवळीत जावे’ असा सल्ला दिल्याबद्दल धारेवर धरतात व ‘हा सत्तेतून आलेला मस्तवालपणा आहे’ असे सुनवायलाही कमी करत नाहीत.
मराठी भाषेबद्दल पाटलांना अर्थातच आत्मियता आहे. मराठी माध्यमांच्या शाळा धडाधड बंद पडत आहेत हे वास्तव आहे आणि ते संतापजनक वास्तव ते ‘मराठीच्या मारेकर्‍यांना मारा’ या अग्रलेखात प्रखरपणे मांडतात. मराठीच्या प्रचाराला वाहून घेतलेले आमचे सन्मित्र प्रा. अनिल गोरे उर्फ मराठी काका यांच्या कार्याचे व त्यांनी घडवून आणलेल्या परिणामांची (आणि त्यांचे श्रेय लाटलेल्या गणंग पुढार्‍यांचे) सार्थ दखल घेत त्यांनी या अग्रलेखात मराठीच्या भवितव्याबद्दल आपले विचार मांडले आहेत. ते नक्कीच मननीय आहेत.
पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्राच्या माथ्यावरील कलंक म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांची दिवसाउजेडी झालेली हत्या आणि अद्यापही त्यांचे खुनी पकडता आलेले नसणे. ‘दुर्दैवीच!’ या अग्रलेखात त्या निंद्य घटनेची दखल घेत असतानाच मरणोत्तर दाभोळकरांवरच शाब्दिक बाण चालवणार्‍यांवर त्यांनी खरपूस टीका केली आहे. अर्थात दाभोळकरांच्या अज्ञात हत्यार्‍यांना ‘पंडित नथुराम गोडसेच्या यादीत नेवून बसवू पाहणारे चूक करत आहेत’ असे विधान करत त्यावर विवेचन करताना गांधीजींच्या हत्येमागील कारणांचे जे स्पष्टीकरण दिले आहे ते अनेकांना, मलाही, रुचणारे नाही.
पाटील मराठवाड्यातील असल्याने त्यांचा मराठवाड्याबद्दलचा जिव्हाळा, तेथील विकासाचे तुंबलेले प्रश्न व त्यावरील खेद व उपाययोजनांची त्यांनी केलेली शिफारस महत्वाची आहे. हे खरेच आहे की मराठवाडा हा अत्यंत दुर्लक्षित भाग आहे. सपाट भाग असल्याने तेथे रेल्वेचे जाळे करायला हवे होते, त्यामुळे विकासाचा वेग आपोआप वाढला असता हे त्यांचे मत महत्वाचे आहे. खरे तर मुळात महाराष्ट्राचाच विकास अत्यंत विषम पद्धतीने झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रालाच पाणी ते उद्योगधंदे याबाबत झुकते माप दिले गेल्याने इतर भाग आजही पडीक राहिलेले आहेत. आता नवीन सरकार आले आहे. त्याने तरी प्रादेशिक समतेचे तत्व अंमलात आणत पश्चिम महाराष्ट्रावर वाढवलेले नको तेवढे उद्योगांचे ओझे कमी करत मराठवाड्याकडे वळवले पाहिजे. संतुलित विकासाचे धोरण अंगिकारत, तेथील बेरोजगारीचे प्रश्न सोडवत पुणे-मुंबईवर विस्थापितांचा येणारा ताणही कमी केला पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक समस्यांचे मूळ हे असंतुलित विकासात आहे हे आता तरी राज्यकर्त्यांच्या लक्षात यावे.

या वानग्यांवरून वाचकांच्या लक्षात आले असेलच की पाटील यांनी हाताळलेल्या विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे. तरूण वयातच एक प्रकारची वैचारिक प्रगल्भता त्यांना लाभली आहे. पुण्यासारख्या शहरात कोवळ्या वयातच, परांगदा म्हणता येईल असा आलेला हा तरुण पुण्याच्या साहित्यिक आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करतो हीच गोष्ट मुळात सर्वच तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
घनश्याम पाटील यांच्या अग्रलेख लेखनाची शैली वेगळी आहे. कधी खेळकर, कधी किस्से सांगत सुरुवात करत तर कधी पहिल्या शब्दापासून आक्रमक होत ते विषयाच्या अंतर्गर्भापर्यंत जावून पोहोचतात. एका अर्थाने ही अन्यत्र दिसणार्‍या रुक्ष अग्रलेखीय शैली नव्हे तर तिला लालित्याचा लोभस स्पर्श आहे. त्यामुळे काही मते पटली नाहीत तरी अग्रलेख वाचनीयच होतो आणि माझ्या मते हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे.
खरे तर एकूणातच, अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर वैचारिकतेचाही र्‍हास होत असलेल्या काळात, विकल्या गेलेल्या पत्रकारितेचे रोज वाभाडे निघण्याच्या काळात, कोणाची तरी तळी उचलत नामघोष करण्याच्या काळात पाटलांची पत्रकारिय वाटचाल ही दिशादर्शक आहे. महाराष्ट्राची वैचारिकता मेलेली नाही, आजही ती तेवढ्याच समर्थपणे उभी आहे, राहू शकते व येणार्‍या पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकते, लोभसवाणी झुळूक ठरु शकते याचे दमदार चिन्ह म्हणजे हा झुळूक आणि झळा अग्रलेखांचा संग्रह वाचायलाच हवा!
  संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक

महाराजांचा पराक्रम समजून घ्यायचाय? मग शिवशाहीरांना भेटा!

महाराजांचा पराक्रम समजून घ्यायचाय? मग शिवशाहीरांना भेटा!


मागच्या आठवड्यात पुण्यात ‘चपराक साहित्य महोत्सव’ दणक्यात झाला. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, इतिहासलेखक उमेश सणस आणि सुप्रसिद्ध पत्रकार विनायक लिमये हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना शिवशाहीरांनी सांगितले की, ‘शिवाजीराजांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करा. शिवजयंतीवरून भांडणे कसली करता? ज्याक्षणी कोणत्याही निमित्ताने शिवाजीराजांचे नाव तुमच्या ओठावर येईल, त्यांचा पराक्रम आठवेल, हृदयात शिवरायांविषयींचे प्रेम जागे होईल, त्या क्षणी शिवाजीमहाराजांचा जन्म तुमच्या मनात झालेला असेल. शिवजयंतीवरून भांडणे करण्याऐवजी शिवाजीमहाराजांनी घालून दिलेल्या नैतिक मूल्यांचे पालन करा. त्यांच्यासारखा पराक्रम गाजवा.’ 
‘महापुरूषांचे केवळ पुतळे उभारून काही होत नाही. त्यांचा विचारांचा वारसा पुढे चालवा. अद्वितीय सामर्थ्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे शिवराय. त्यांचा पराक्रम आठवा. तो स्वतःत बाणवा आणि मग बघा, जगातील कोणत्याही संकटाला तुम्ही कसे सहजपणे सामोरे जाऊ शकाल,‘ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ‘शिवप्रतापकार’ उमेश सणस म्हणाले, ‘चपराक’च्या माध्यमातून आज ज्या बारा पुस्तकांचे प्रकाशन होत आहे ते लेखक खरोखरी नशीबवान आहेत; कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या अभ्यासू महापुरूषाच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. ‘आज जर आपल्याला शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सहकार्‍यांची भेट झाली तर आपण त्यांना शिवचरित्राविषयी विचारू शकू! शिवाजी महाराज किंवा त्यांचे सहकारी हंबीरराव मोहिते, हिरोजी फर्जन, तानाजी मालुसरे, मदारी मेहतर अशा कुणाचीही आपली भेट झाली आणि आपण त्यांना आग्य्राहून सुटका, प्रतापगडची भेट, शाहिस्तेखान अशा कोणत्याही प्रसंगाविषयी विचारले तर ते सांगतील, आधी तुम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटा, त्यांना या सर्व प्रसंगाविषयी विचारा. ते तुम्हाला सारे काही सांगतील; आणि त्यातूनही काही राहिलेच तर आम्हाला विचारायला या!’ 
‘चपराक’च्या पहिल्या साहित्स महोत्सवाला ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे उपस्थित होते तर दुसर्‍या ‘चपराक साहित्य महोत्सवा’च्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. या दोन्ही अफाट प्रतिभेच्या बेफाट माणसांचे आशीर्वाद आम्हास लाभले. यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते?  
आज सर्वत्र शिवजयंती उत्सव साजरा होत असताना आपण महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यात खारीचा वाटा उचलतोय याचा आनंद वाटतोय. एका कवीने म्हटलंय, ‘पुतळे उभारून स्फूर्ती कधी मिळते का?, सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का?’ अगदी हाच संदेश शिवशाहीरांनी ‘चपराक’ च्या व्यासपीठावरून दिला. महाराजांचे विचार आमच्या अल्प कुवतीप्रमाणे आचरणात आणण्यासाठी, ते समाजात रूजवण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलू, हेच या निमित्ताने नम्रपणे सांगावेसे वाटते. 
आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! शिवरायांना मानाचा मुजरा!!



Wednesday, February 18, 2015

‘चपराक साहित्य महोत्सवा’त एकाचवेळी 12 पुस्तकांचे प्रकाशन

लिहा! लिहा! लिहा! वाचक निश्‍चित भेटतील
‘चपराक साहित्य महोत्सवा’त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी): बाबासाहेब म्हणाले, ’’आजच्या काळात लेखन करणं आवश्यक आहे, असं ज्या व्यक्तिला वाटतं त्या व्यक्तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. शेतकरी असो, मजूर असो वा उद्योजक असो; प्रत्येकाची अंगभूत प्रतिभा बाहेर आलीच पाहिजे. आजही समाजाची वाचनाची भूक कमी झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक लेखक, कवीने थांबता कामा नये.’’ समाजातातील महापुरूषांची ओळख सर्वसामान्यांना करून देण्यासाठी लेखक, कवींनी लिहावं असा वडिलकीचा सल्ला देत असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. या प्रकाशन सोहळ्यात सदानंद भणगे यांचा ‘ओविली फुले मोकळी’ हा ललित संग्रह, घनश्याम पाटील यांचा ‘झुळूक आणि झळा’ हा निवडक अग्रलेखांचा संग्रह, संजय वाघ यांचा ‘गंध माणसांचा’ हा व्यक्तिचित्रण संग्रह, सौ. चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘सत्यापितम्’ हा कथासंग्रह, प्रभाकर तुंगार लिखित ‘शांतिदूत - लालबहादूर शास्त्री’ हे चरित्र, सागर सुरवसे यांचे ‘एकनाथजी रानडे - जीवन आणि कार्य’ हे चरित्र, विनोद पंचभाई यांचा ‘मुलांच्या मनातलं’ हा बालकथासंग्रह, हणमंत कुराडे यांची ’दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ ही कादंबरी तर माधव गिर यांचा ‘नवं तांबडं फुटेल’, संदिपान पवार यांचा ‘अक्षरगाणी’, प्रभाकर चव्हाण यांचा ‘सुंबरान’ आणि शांताराम हिवराळे यांच्या ‘दाटून येताहे काळोखी काहूर’ या काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. 
‘‘ज्या बिटिशांच्या प्रत्येक वाईट गोष्टींचा आपण भारतीयांनी प्रचार केला त्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले. मात्र आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या महापुरूषांची आपण चेष्टा करतो. आपण फक्त गप्पा मारतो; थोर पुरूषांचे अनुकरण करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुरूंगात असताना त्यांना लेखन करायला कागद उपलब्ध करून दिले जात नव्हते. अशावेळी त्यांनी भिंतीवर लेखन केले. ते पाठ केले आणि आपल्यासोबत असणार्‍या परंतु दोन महिन्यानंतर सुटका होणार असलेल्या कैद्याला ते पाठ करायला लावले आणि बाहेर जाऊन ते लिखाण मुर्तरूपात आणायला त्यांनी सांगितले. ते प्रतिकूल परिस्थितीत लिहू शकत असतील तर आपण का लिहू शकत नाही?’’ असा सवालही बाबासाहेबांनी केला. 
प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘घनश्याम पाटील यांची धडपड बघितल्यावर माझ्या उमेदीचा काळ आठवतो. कालांतराने माझ्या लेखणीची धार कमी होत गेली तरी घनश्याम पाटील यांच्या लेखणीची धार कायम आहे. घनश्याम पाटील हे गावाकडच्या लेखक, कवींचं प्रतिनिधीत्व करतात. चॅनेल, मोठी वृत्तपत्रे सोडून पत्रकार ‘चपराक’कडे येत आहेत.’’ 
‘शिवप्रताप’कार उमेश सणस म्हणाले, ‘‘आज तानाजी मालुसरे यांना सिंहगड कसा जिंकला हे विचारायला जाल तर ते ‘‘आधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास विचारा; नंतर काही शंका असतील तर आमच्याकडे या’’ असे ते म्हणाले असते. अशा बाबासाहेबांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणे हे या लेखक, कवींचे भाग्य आहे. आज दिल्लीत भाजप आणि कॉंग्रेसची जशी अवस्था आहे तशी अवस्था मराठी कवितांची झाली आहे. कवींचं नाव मोठं नसेल तर प्रकाशक त्याला उभंही करत नाहीत. अशा स्थितीत चार कवितासंग्रहांचे प्रकाशन होणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे घनश्याम पाटील हे प्रकाशनविश्‍वातले ‘केजरीवाल’ आहेत. माणसाचा माणुसपणाकडे प्रवास सुरू राहणे हे सदानंद भणगे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे’’ असेही ते म्हणाले.
विनायक लिमये म्हणाले, ’’तंत्रज्ञान बदललं तरी पुस्तकांचं महत्त्व अबाधित राहणार आहे. आज मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत पुस्तकं आली आहेत. ‘चपराक’च्या या 12 पुस्तकांमध्ये माणुसकीचा ओलावा, सत्याचा वास आहे. ही सर्व पुस्तके काळाशी सुसंगत आहेत. घनश्याम पाटील यांच्या ‘झुळूक आणि झळा’ या  अग्रलेखांचा संग्रह असलेल्या पुस्तकात संपादकांची परखड आणि रास्त भूमिका दिसून येते. तर कॉन्व्हेंटमध्ये शिकणार्‍या मराठी मुलांना मराठीची ओळख होण्यासाठी संदिपान पवार यांचा ‘अक्षरगाणी’ हा काव्यसंग्रह उपयुक्त ठरणार आहे.  चांगुलपणा शोधणारी नजर असली की चांगलंच होतं’’ असेही लिमये यावेळी म्हणाले.
सदानंद भणगे म्हणाले, ‘‘वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे असे बोलले जात आहे. मात्र, अशा स्थितीत एकाचवेळी 12 पुस्तकांचे प्रकाशन ही असे बोलणार्‍यांना सणसणीत ‘चपराक’ आहे. घनश्याम पाटील हे एक धाडसी संपादक, प्रकाशक आहेत. इतर सर्व प्रकाशकांनी बहिष्कार टाकला असताना ‘घुमानलाच काय अफ्रिकेच्या जंगलात जरी मराठी साहित्य संमेलन असलं तरी जाणार’ हे सांगणारे घनश्याम पाटील एकमेव प्रकाशक आहेत. त्यांच्या लेखणातून ते आपली ठाम भूमिका मांडतात.’’
प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन माधव गिर यांनी तर शुभांगी गिरमे यांनी आभार मानले. 


प्रकाशनादिवशीच आवृत्ती संपली

या सोहळ्यात प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीची हातोहात विक्री झाली. यात ‘झुळूक आणि झळा’, ‘नवं तांबडं फुटेल’, ‘एकनाथजी रानडे-जीवन आणि कार्य’, ‘गंध माणसांचा’, ‘सुंबरान’,  ‘शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री‘ या पुस्तकांचा समावेश आहे. बाणेर येथील योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर तापकीर, सुप्रसिद्ध उद्योजक आणि स्प्रेजा इंडस्ट्रिजचे संचालक एस. डी. सोनवणे, आरंभिनी इंडस्ट्रिजचे श्रीपाद भिवराव, तळेगाव नाट्य परिषद यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

मराठी प्रकाशनविश्‍वातले केजरीवाल

या प्रकाशन सोहळ्यात ‘शिवप्रताप’कार उमेश सणस यांनी दिल्लीत भाजप, कॉंग्रेसची जशी अवस्था आहे तशी अवस्था मराठी कवितांची झाली आहे. मात्र, घनश्याम पाटील हे मराठी प्रकाशनविश्‍वातले केजरीवाल असल्याची कोटी केली.




Saturday, January 18, 2014

अंतरंगात घर करणा-या अंतरीच्या कविता - स्वप्निल पोरे

  1. अंतरंगात घर करणा-या अंतरीच्या कविता - स्वप्निल पोरे

'अंतरीच्या कविता' हा कवी संजय ऐलवाड यांचा पहिलाच कविता संग्रह! नवथरपणाच्या  खुणा ब-याच कवींच्या पहिल्या संग्रहात हमखास दिसतात; पण संजय ऐलवाड यांचा 'अंतरीच्या कविता' हा संग्रह याला अपवाद आहे. यात काव्य रचनेतील नवथरपणा नाही पण शब्दांचा ताजेपणा आहे. त्यात काळजाला भिडणारे वास्तव आहे.
अस्सल मराठी बाजाची कविता आजकाल दुर्मिळ झाली आहे. 'अंतरीच्या कविता' मधून ख-याखु-या मराठी बाजाची कविता रसिकांना भेटते. मराठी भाषेत लिहिली गेलेली प्रत्येक कलाकृती 'मराठी' असतेच असे नाही. म्हणायला मराठी भाषा, पण कसदार पणापासून कोसो योजने दूर! शब्दांची कृतिम सजावट आणि त्या सजावटीसाठी धडपड करताना कलाकृतीतून हरवून गेलेला आत्मा! 'अंतरीच्या कविता' त्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या अस्सल सौंदर्याचे दर्शन घडवतात. ऐलवाड यांची कविता मातीमधून रुजून आलेली कविता आहे. म्हणूनच या कवितेचे तरारुन आलेले पाते अनोख्या हिरवाईचा अनुभव देते.
ही कविता मातीची महती गाते, मातीची वेदना सांगते. भूमिपुत्रांची अर्थात शेतक-यांची व्यथा मांडते.
काळ गेला दुष्काळात
ह्रदयी हुंदका दाटतो
हा आक्रोश कवींच्या शब्दामधून उमटतो पण तो मांडतानाही कविने शब्दांचा संयम राखला आहे. आक्रंदनाला आक्रस्ताळेपणाचे रूप येणार नाही, याची काळजी घेतली आहे.
तोंड वासली जमीन
कळ पोटात दाटली
काळीकुट्ट ढग बघून
माती गालात हसली!
असे कवी सहजपणे लिहून जातो. त्यावेळी मातीशी असलेले त्यांचे ऋणानुबंध उलगडतात. 'पीक सुकल्या रानात, कशी वाचावी गाथा?' हा या कवीचा सवाल अंतर्मुख करणारा आहे. ग्रामीण जीवन शेतीशी जोडले गेले आहे आणि शेती आकाशाच्या कृपेवर! पाऊस झाला तर ठीक; नाहीतर दुष्काळाचे भेसूर संकट. शेतक-याच्या वाट्याला मग कायमच अनिश्चितता! ते दाहक चित्र 'अंतरीच्या कविता' मधील अनेक रचनामधून सजीवपणे  उमटते आणि काव्यरसिक अस्वस्थ होतात.
ढगालाही होती जाण
काळ्या भू-या ढेकळांची
पाणी कृतिम, काडी भिजेना गवताची
अशी व्यथा जीवनाची
बेईमानी बेईमानी
फांदी राखते आजही
लोंबणा-याशी इमानी 
या 'व्यथा' कवितेतील ओळी म्हणजे जणू कृषी संस्कृतीचा लख्ख आरसा.  'तुझ्याविना पावसा' ही कविता देखील शेतक-याच्या मनातील आर्त सांगून जाणारी आहे.
असा पाहू नको अंत
जीव कंठात दाटला
तुझ्याविना रे पावसा
गाव गावातून उठला
असे कविने लिहिले आहे.  गाव गावातून उठला, यापेक्षा अधिक परिणामकारक भाष्य कुठले असू शकेल? अवघ्या तीन शब्दात कवी ते करून जातो, यातच ऐलवाड यांच्या कवितेची ताकद दिसते. 'अंतरीच्या कविता' विविध विषयांवरील आहेत. कधी कवी सामाजिक वास्तव अधोरेखित करीत 'आजचा राम', 'बदल' या कविता लिहून जातो, त्याच क्षमतेने 'विरह' सारखी कविता लिहित आत्ममग्नतेत हरवून जातो. कविता कधी एकांगी असू शकत नाही. कवितेचे क्षितिज सागराला कवेत घेणारे असते. ठराविक विषयात कविता अडकून पडली तर कवितेचा खरा अर्थ साध्य होत नाही. हे भान सुदैवाने संजय ऐलवाड यांना आहे. त्यामुळे काव्यक्षेत्रात मोठी मजल गाठण्याच्या सर्व शक्यता 'अंतरीच्या कविता' मध्ये दिसतात. ऐलवाड यांच्या अभिव्यक्तीत नैसर्गिक सहजता आहे. या सहजतेमुळे ती मनाला भावते. 'मनात तरंगणारे कोरडे ढगही, भरायला लागतात हळूहळू …' ही तरलता त्यांच्या कवितेचे वैशिष्ठय आहे. कठोर वास्तव मांडताना देखील ती तरलता हरवत नाही, हे उल्लेखनीय! कवितेची लय या कविला सापडली आहे. 'जाऊ नको दूर सई, जवळ जरा थांब गं' अशा त्यांच्या ओळी म्हणजे जणू लयींचे मुर्तीमंत रूप! ते रूप वेधक आहेच, शिवाय ते ऐलवाड यांच्या काव्यरचनांना आणखी प्रगल्भ करते. संजय ऐलवाड यांच्या 'अंतरीच्या कविता' केवळ भोलताल जिवंत करतात असे नाही, तर मनाचा गाभाराही जिवंत करतात. आनंद, दु;ख, व्यथा, वेदना अशा भावछटांचे रंग घेवून आलेले त्यांचे शब्द त्यांच्या कवितेचे इंद्रधनु खुलवतात. 'अंतरीच्या कविता' वाचकांच्या अंतरंगात घर करतील यात शंका नाही!
- स्वप्निल पोरे,
वृत्त संपादक, केसरी, पुणे

'अंतरीच्या कविता'
कवी : संजय ऐलवाड
प्रकाशन : चपराक प्रकाशन, पुणे
संपर्क ९२२ ६२२ ४१ ३२

Tuesday, September 24, 2013

शरद कारखानीस यांच्याशी गप्पा!

शरद कारखानीस यांच्याशी गप्पा!

 
काल आमचे अर्थमंत्री दादाराजे तथा श्रीपाद भिवराव आणि  'चपराक' चे लेखक संदिपान पवार यांच्यासह  ज्येष्ठ संपादक श्री. शरद कारखानीस यांची भेट घेतली. त्यांनी त्यांचे 'लोकसत्ता', 'गोमन्तक' आणि 'एकमत'चे अनेक रंजक अनुभव सांगितले.  ते म्हणाले, "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. ना. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर प्रसिद्धी माध्यमांना द्यायला सरकारकडे त्यांचा एखादा चांगला फोटोच नव्हता; किंवा मोहमद रफ़ी साहेब गेले तेव्हा 'लोकसत्ता' कडे त्यांचा फोटो नसल्याने पहिल्या दिवशी बातमी फोटो न देताच द्यावी लागली."
त्यांचे हे अनुभव ऐकून वाटले, आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, सर्व काही एका क्लिकवर मिळते. तरीही आजचे माझे व्यवसाय बंधू पूर्वीसारखी निर्भिड पत्रकारिता करू शकत नाहीत, हे वास्तव कोणीही नाकारण्याचे कारण नाही. 
"काही हजार करोडची संपत्ती बाळगुन असलेल्या नेत्यांना आणि पत्रकारांनाही गरीब कसे म्हणावे?" असा बिनतोड सवालही  त्यांनी केला. वृत्तपत्रे कशासाठी चालवली जातात? हे सांगताना त्यांनी अनेक किस्से सांगितले. "काही वृत्तपत्रे केवळ छोट्या जाहिराती आणि नोटीसा छापण्यासाठी काढली जातात. त्यांना अंकाचा खप वाढवायचाच  नसतो कारण या जाहिराती कमीत कमी लोकांपर्यंत जाण्यासाठीच दिल्या जातात. मुंबईत काही स्थानकावर रात्री १० नंतर मोठी वृत्तपत्रे मोठ्या प्रमाणात विकली जातात. कारण उशीराची गाडी गेल्याने रात्री मुक्काम स्थानकावर करावा लागतो. मग कमी पैशात जास्त पाने असलेली  वृत्तपत्रे  विकत घेवून ती  झोपण्यासाठी 'अंथरुण' म्हणून वापरली जातात…!"
"आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजची मुले फारसे वाचत नाहीत. जे वाचायचे ते संगणक किंवा भ्रमणध्वनिवर! त्यावर हवी ती माहितीही त्यांना सहज मिळत असल्याने वृत्तपत्र विकत घेवून, त्यासाठी वेळ काढून वाचणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी  होत चालली आहे," असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. 'पर्यावरण' या विषयावर वृत्तपत्रांनी लिहिणे हा तर मोठा विनोद आहे कारण वृत्तपत्रांच्या कागदासाठीच सर्वाधिक वृक्षतोड होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एकंदर अडीच-तीन तासांत त्यांनी अनेक नवनवीन माहिती दिली. त्यातील बरीचशी माहिती ही गोपनीय असल्याने ती मित्रांसाठी देता येत नाही; मात्र या भेटीतून बरेच काही मिळाल्याचे समाधान मात्र नक्की आहे.

Monday, September 23, 2013

किल्लारी : बीस साल बाद!

  1. किल्लारी : बीस साल बाद!

गणेश उत्सव संपला …  आम्हा मराठवाड्यातील लोकांना हे दिवस विसरणे अजूनही खूप अवघड जाते.  ३० सप्टेम्बर १९९३ च्या काळरात्री मराठवाड्यात एकच हाहाकार उडाला. धरणी मातेचा कोप झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावांना भूकंपाचा तडाखा बसला. सर्वत्र अंधार! अनेक आप्त, मित्र या विनाशात दुरावले गेले.
माझे शिक्षण किल्लारीतील महाराष्ट्र महाविद्यालयात झाले. किल्लारी बस स्थानकाजवळ माझा वृत्तपत्र विक्रीचा गाळा होता. किल्लारी आणि परिसरात यानिमित्ताने फिरताना मी वाचकपत्र लिहू लागलो. काही कविता आणि लेख प्रकाशित झाले. पुढे पत्रकारितेची सुरवातही किल्लारीतून झाली आणि आज पुण्यासारख्या शहरात माझे स्वत:चे नियतकालिक आहे. लोकांची दुभंगलेली मने एक करताना जे अनुभव यायचे तेच माझ्या लेखणीतून कागदावर उतरायचे. त्यामुळे भूकंपाने माझ्यातील पत्रकार घडवला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
भूकंपानंतर या ५२ गावांचे पुनर्वसन झाले. काही युवकांना सरकारी खात्यात नोक-या मिळाल्या. काहीजण अजूनही त्या प्रयत्नात आहेत. ज्याच्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले त्यांना आर्थिक मदत मिळाली. लोकांनी दुःख विसरून त्या पैशाचा कसा विनियोग केला त्यावर लवकरच एक पुस्तक लिहितोय. ते जितके दुःखद आहे तितकेच रंजकही आहे. व्यसनाच्या, बायकांच्या आहारी गेलेल्या अनेकांची मात्र फारच वाताहात झाली.
मराठवाड्यातील लोकांत माणुसकी मात्र कायम जिवंत आहे. काही ठराविक अपवाद आहेत; मात्र सुखद अनुभव जास्त आढळतील. किल्लारीचे ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वराच्या दर्शनाला जाताना आजही अंगावर काटा येतो. जुन्या आठवणी मनात येताच थरकाप होतो.
वृत्तपत्र विक्रेता ते संपादक असा माझा प्रवास किल्लारीच्या साक्षीने झाला आहे. लहानपणीच निसर्गाचे तांडव बघिल्याने कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. यापेक्षा मोठे संकट, दुःख, येवूच शकणार नाही याची खात्री आहे. निसर्ग एकदा परीक्षा बघतो मात्र त्यातून बरेच धडेही देतो. आज २० वर्षानंतर हा परिसर झपाट्याने बदलला आहे. परिवर्तन हा निसर्गाचा अटळ नियम असतो. त्याचे स्वागत करायला हवे. मात्र हे परिवर्तन कशा पद्धतीने होते हॆ पाहणेही औत्सुक्याचे असते. हा बदल कसा घडला, काय घडला, कोणी घडवला याविषयी लवकरच एक दीर्घ लेख 'चपराक' मध्ये लिहितोय.