वटसावित्री पौर्णिमेची धामधूम सुरू असतानाच नेहमीप्रमाणे सगळीकडून विनोदांचा पाऊस पडत आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सणावर कोणत्याही थराला जाऊन ‘विनोद’ करणं आणि आपण ते गंभीरपणे न घेता उलट समाजमाध्यमांद्वारे पुढे पाठवत राहणं ही आता एक ‘फॅशन’ बनत चाललीय. आपल्या प्रत्येक सणांवर, रीतीरिवाजावर, देवदेवतांवर, प्रथा आणि पद्धतींवर केली जाणारी टिंगलबाजी आपण अगदी सहजतेने घेतो. यालाच अनेकजण ‘सहिष्णुता’ समजतात. आपल्या नेत्यांना मुस्लिम धर्मातील तलाक पद्धती त्यांच्या धर्माचा भाग आहे याची सोयीस्कर आठवण येते. रमजानच्या महिन्यात शत्रू पक्षांकडून घातपात आणि रक्तपात होणार नाही याची खात्री असते. दुसरीकडे मात्र ‘भगवा दहशतवाद,’ ‘हिंंदू दहशतवाद’ असा धोशा सुरूच असतो.
हे सर्व मांडण्याचं कारण म्हणजे वटसावित्रीची यथेच्छ टर उडवली जात असतानाच केरळमधील कोट्टायम शहरात घडलेली एक दुर्दैवी घटना. इथल्या एका महिलेचे लग्नापूर्वी एका पाद्रीसोबत लैंगिक संबंध होते. लग्नानंतर या गोष्टीचा मानसिक त्रास होऊ लागल्याने तिने तिच्या धर्मातील प्रथेप्रमाणे मन मोकळे करण्याच्या उद्देशाने ऑथोडॉक्स सीरियन चर्च गाठले. तिथल्या ‘कन्फेक्शन’च्या खोलीत तिने तिच्या या चुकीची कबूली दिली. या महिलेचे लग्नापूर्वीचे हे प्रेमसंबंध कळल्यावर तिथल्या पाद्रीनेही तिला धमकावले. या माहितीचा गैरवापर करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचे चित्रीकरण केले. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर त्या चित्रफितीचा आधार घेत तिथल्या पाच पाद्रींनी तिच्यावर अत्याचार केले. हे सगळेच असह्य झाल्यावर त्या महिलेने सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला. पतीने चर्चच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर या पाच पाद्रींच्या विरूद्ध चौकशी समिती नेमून त्यांना रजेवर पाठवण्यात आले आहे.
हिंदू मंदिरात पूजार्यांकडून बलात्कार झाला म्हणून आरडाओरडा करणारी आणि नंतर सत्य बाहेर येताच शेपूट घालून गप्प बसणारी प्रसारमाध्यमे या विषयावर काहीच बोलणार नाहीत. त्यांना ‘कन्फेक्शन’ची घटना ‘अंधश्रद्धा’ न वाटता धर्माची प्रथा वाटते. वडाची पूजा करणार्या महिलांची टवाळी करताना ते याबाबत मात्र चिडीचूप असतात. त्या अभागी भगिनीवर पाच पाद्रींनी अत्याचार करूनही ते ‘धर्मपंडित’ ठरतात. यालाच तर आपल्याकडे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात.
सध्या एक चित्रफित समाजमाध्यमांवर सर्वत्र फिरत आहे. त्यातील मुस्लिम धर्मगुरू त्यांच्या चेल्यांना मार्गदर्शन करताना सांगतात की, ‘‘तुम्ही हिंदुंना त्यांच्या सणाच्या शुभेच्छा देऊ नकात. तुम्ही जर त्यांना ‘हॅप्पी दसरा’ म्हणालात तर दसर्याचे महत्त्व मान्य केल्यासारखे होईल. जर एखाद्या हिंदुने तुम्हाला दसर्याच्या शुभेच्छा दिल्या तर तुम्ही ‘सेम टू यू’ असंही म्हणू नकात. कारण तुम्ही त्यालाही शुभेच्छा देता म्हणजे तुम्ही रामाचे अस्तित्व मान्य करता. रामाने रावणाचा वध केला ही घटना मान्य करून त्या शुभेच्छा असतात. उलट त्यांना त्या त्या सणांची माहिती विचारा. अनेकांना ती सांगता येणार नाही. मग या कशा अंधश्रद्धा आहेत म्हणून त्यांची टिंगल करा...’’
आपल्या धर्माविषयी, त्यातील प्रथांविषयी जागरूक असणारे हे लोक इतरांना कमी लेखतात. जे कोणी अल्लाचे अस्तित्व मान्य करत नाहीत ते सर्व ‘काफिर!’ आपण मात्र त्यांना रमजानच्या शुभेच्छा देताना त्यांचा शिरखुर्मा आनंदाने हादडत असतो. त्यांच्या दर्ग्यात जाऊन आदराने माथा टेकवत असतो. यालाच तर ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात... खरंतर हिंदुइतका कोणताही धर्म सहिष्णू नसताना आपल्यालाच धर्मवादी, जातीयवादी, प्रथावादी ठरवले जाते. रोज पाच वेळा नमाज पाडणारा मुस्लिम आपल्यासाठी ‘नमाजी’ असतो. त्याच्याविषयी आपल्या मनात आदराचे स्थान असते! पण एखादा भाविक मंदिरात गेला आणि देवाच्या पाया पडत असेल तर तो अंधश्रद्ध, बुरसटलेला ठरतो.
‘दहशतवादाला धर्म नसतो’ असे कायम म्हटले जाते. मग अतिरेकी कारवायांत पकडले जाणारे बहुसंख्य विशिष्ठ धर्माचेच का बरे असतात? कारण दहशतवादाला धर्म असतो! फक्त आपण तो समजून घेतला, मान्य केला तर आपण ‘धर्मवादी, प्रतिगामी’ ठरतो.
सध्या तर आपल्याकडे हिंदू धर्माला शिव्या घालणे, नावे ठेवणे म्हणजे पुरोगामीत्व ठरवले जाते. आपल्या धर्माचा, संस्कृतीचा, रूढी, परंपरांचा विचार न करता, अभ्यास न करता दुषणे देणे वाढत चालले आहे. त्यात आपण सर्वजण सहजपणे सहभागी होतो. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या सर्वांच्या दुर्दैवी हत्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री या सर्वांची काही मिनीटात पहिली प्रतिक्रिया होती की, ‘यामागे हिंदुत्त्ववादी शक्तींचा हात आहे.’ मग तो ‘हात’ अजून कुणाला का दिसत नाही? कोणत्या आधारावर त्यांनी ते विधान केले होते? म्हणजे गुन्हेगार कोण हे त्यांना माहीत होते का? त्यांच्यावर अजूनही कारवाई का झाली नाही? तेव्हाच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारकिर्दीत घडलेल्या या घटनेचे खापर आपण आजच्या सरकारवर फोडतो आणि त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करतो. गुन्हेगार, मग तो कुणीही असेल! त्याच्यावर कठोर दंडात्मक कारवाई व्हायलाच हवी. मग अशा घटनांत आरोपी इतके मोकाट कसे फिरू शकतात? की तेव्हाच्या सत्ताधार्यांना त्यांना पकडायचेेच नव्हते? तपास यंत्रणांची दिशाभूल करून वेळकाढूपणा करण्याचा उद्देश तर त्यांच्या विधानात नव्हता ना?
लॉर्ड मेकॉले हा एक शिक्षणतज्ज्ञ होता. त्याने त्यावेळी सांगितले होते की, ‘भारतावर राज्य करायचे असेल तर एकच पर्याय आहे. यांच्यात फूट पाडा. देवा-धर्मावरील त्यांच्या श्रद्धा कमकूवत करा. इथली आदर्श असलेली गुरूकूल शिक्षणपद्धती नष्ट करा. त्यांच्याकडील संस्कार, निष्ठा, त्याग यामुळे त्यांच्या श्रद्धा मजबूत आहेत. त्या जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण त्यांच्यावर राज्य करू शकत नाही...’
मेकॉलेचे हे तत्त्वज्ञान अजूनही आचरणात आणले जाते. आजही आपल्यात फूट पाडण्याचेच काम सुरू आहे. आपणही या षडयंत्राला बळी पडतो.
हिंदू धर्मासह सर्वच धर्मातील चुकीच्या प्रवृत्ती, परंपरा, अंधश्रद्धा दूर व्हायला हव्यात. आपण ‘माणूस’ म्हणून जगायला हवे. फक्त विशिष्ठ धर्माची तळी उचलताना कायम हिंदुना दुषणे देणे म्हणूनच अयोग्य आणि अन्यायकारकही आहे. केरळमध्ये पाद्रींकडून घडलेल्या दुर्वर्तनाचे पडसाद कुठेच न पडणे हा आपला ‘सोयीस्करपणा’ आहे. यातूनच ‘दहशतवादाला धर्म असतो’ हे सिद्ध होते.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092