Saturday, June 9, 2018

समर्थ ऊर्जाकेंद्र!


देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्‍चात्य राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 50 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्‍या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील संशोधक करत नाहीत.

10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या शक्यता संपुष्टात आल्या. त्यांनी जे राजकीय डावपेच आणि प्रसंगी तडजोडी केल्या त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांची विश्‍वासार्हता संपुष्टात आली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात, ‘साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो’ असे ठासून सांगतात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.

नियती न मानणारे पवार साहेब आजवर नियतीच्या अनेक तडाख्यातून सहीसलामत सुटले आहेत! सध्या मोदी लाटेमुळे अनेक प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेले असताना ‘मी प्रचंड आशावादी’ म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा राहण्याची धडपड करतोय. जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे ही नेतेमंडळी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पूर्ण क्षमतेने लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील पाळेमुळे त्यांनी भक्कम केलीत. एक मोठा वर्ग ‘अच्छे दिन’च्या मोहजालात अडकलेला असतानाच खेड्यापाड्यातील धास्तावलेल्या लोकांना धीर देण्याचे काम राष्ट्रवादीची नेतेमंडळी करत आहेत.

10 जून हा राष्ट्रवादीचा वर्धापनदिन! त्यामुळे सिंहावलोकन करताना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याला आणि त्यांच्या कारकिर्दीला नेमक्या शब्दात आणि नेमकेपणे टिपणे हे काम तसे जिकिरीचेच. पवारांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ‘तोंडओळख’ करून घेेतली तरी कुणालाही अचंबा वाटेल. कोणत्याही नेत्यावर, संस्थेवर टीका करायला फार काही लागत नाही; मात्र त्यांची सकारात्मक बाजू पाहणेही तितकेच गरजेचे आहे. ती पाहताना ‘शरद पवार’ या ऊर्जाकेंद्राची पुसटशी कल्पना येऊ शकते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय पटाची त्यांची व्याप्ती अफाट आहे.

‘राजकारण हा आपला व्यवसाय नाही तर ते आपले नैसर्गिक कर्तव्य आहे’ ही पवार साहेबांची नीतिमूल्ये समजून घ्यायला  हवीत. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ असे म्हणत संगमा, तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल अशा सहकार्‍यांना सोबत घेऊन त्यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ या ‘राष्ट्रीय’ पक्षाची स्थापना केली. देशाचे कृषीमंत्री असतानाही त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या. हीच त्यांची ‘राष्ट्रीय’ कामगिरी का? असा सवाल काहीजण उपहासाने विचारत असले तरी कार्यकर्त्यांशी जोडलेली त्यांची नाळ, ‘साहेब’ या नावाची जादू महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवली आहे. आज भारतभर कोणत्याही निवडणुकीत फुटकळ उमेदवारांसाठी सातत्याने सभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला कौतुकास्पद वाटतात; पण हीच कर्तव्ये पार पाडणार्‍या शरदराव पवार यांची आपण टवाळी करतो हे आपले दुर्दैव आहे.

वाजपेयींनी पंतप्रधान असताना गुजरातच्या भूकंपावेळी त्यांनी साहेबांची मदत घेतली होती. साहेबांनी किल्लारी भूकंपात केलेल्या निस्वार्थ कामाची ती पावती होती. राजकारणात टीका-टिपण्या कायम सुरूच असतात; मात्र आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीत येऊन साहेबांचा जो गौरव केला त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा आवाका ध्यानात येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांच्या अनेक विरोधकांपर्यंत त्यांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या महानेत्याचे मोठेपण सिद्ध करतात.

गोपीनाथ मुंडे यांनी एकदा सांगितले होते की, ‘‘जो माणूस शरद पवार यांच्यावर टीका करतो तोच मोठा होतो. त्यामुळे आम्हाला आमचे भवितव्य सुधारण्यासाठी त्यांच्यावर टीका करावी लागते.’’ 

म्हणूनच महाराष्ट्रातील आणि भारतातील कोणताही विषय निघाला की त्याच्याशी पवार साहेबांचे नाव जोडले जाते. ‘‘या आरोपांचे तुम्हाला काहीच वाटत नाही का?’’ असे विचारल्यानंतर त्यांनी एकदा फारच मार्मिक उत्तर दिले होते. 

ते म्हणाले, ‘‘जोपर्यंत तुम्ही किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय असे म्हणत नाही तोपर्यंत मी या आरोपांचा विचार करणार नाही.’’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना फलोत्पादनाला त्यांनी दिलेले प्रोत्साहन असेल, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असेल, स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असेल या सगळ्यात त्यांची दूरदृष्टी दिसते.

शरद पवार यांचे राजकीय मूल्यमापन करताना स्वाभाविकपणे स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांची तुलना होते आणि ती रास्तही आहे. छत्रपती शिवरायानंतर यशवंतराव आणि त्यांच्यानंतर पवार साहेब यांनीच महाराष्ट्रावर खर्‍याअर्थी छाप टाकलीय. लोककल्याणकारी असे नेतृत्व या नेत्यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात असेल.

पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात एकही पराभव स्वीकारला नाही. त्यांना कोणत्याही विधानावरून कधी माफी मागावी लागली नाही; मात्र पक्षातील इतर नेत्यांनी काही चुकीचे विधान केल्यास पक्षाध्यक्ष या नात्याने साहेबांनी माफी मागितली. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. 

शरद पवार हे फक्त नाव नाही! हा शब्द नाही! हा आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मंत्र झालाय. इतक्या दीर्घकाळ राजकारण करताना त्यांच्यावर असंख्य आरोप झाले; मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ज्या झाडाला भरपूर फळे लगडलेली असतात त्यालाच पोरंसोरं दगडं मारतात, हा निसर्गनियम सर्वज्ञात आहेच.

भारतीय राजकारणावर प्रभाव पाडणार्‍या या बलाढ्य नेत्याने ‘कर्णधार’ बनून आपल्या कामाची छाप समाजमनावर उमटवलेली आहे. आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, ह. भ. प. बबनराव पाचपुते (पूर्वाश्रमीचे), छगन भुजबळ, सुनील तटकरे असे अनेक नेते साहेबांनी त्यांच्या मुशीत घडवले. या सर्व नेत्यांनी त्यांच्या ‘गुणदोषांसकट’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा प्रभावीपणे हाकला आणि त्याचे सारे श्रेय या लोकनेत्याकडे जाते.

या महिन्यात राष्ट्रवादीचा वर्धापनदिन! तो साजरा करताना या पक्षाने जे काही विधायक केलेय त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी. त्यांच्या चुकीच्या धोरणांवर, निर्णयावर आपण कायम तुटून पडू! पण देशातील एक लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पवार साहेबांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. महाराष्ट्रातील असंख्य लोकांसाठी हे एक सकारात्मक ‘ऊर्जाकेंद्र’ आहे हे मान्य करावेच लागेल. जहाज बुडायला लागलं की उंदरं आधी बाहेर उड्या मारतात असं म्हणतात. अगदी त्याप्रमाणंच मध्यंतरीच्या एका लाटेत इतर अनेकांप्रमाणेच राष्ट्रवादीची नौका थोडी डळमळीत झाली असता अनेकांनी त्यांचे रंग दाखवले.  या कशालाही न जुमानता राष्ट्रवादी कॉंग्रेस येणार्‍या संग्रामासाठी सज्ज असेल आणि आपली विजयपताका डौलात फडकवत ठेवेल यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा! 
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२

Friday, May 25, 2018

सोसण्याचं बळ देणारी ‘काळीजकाटा!’


सांगोला हा महाराष्ट्रातील एक दुष्काळी तालुका. या भागात मनाची, विचारांची श्रीमंती मात्र जागोजागी अनुभवायला मिळते. पुण्या-मुंबईचा सांस्कृतिक केंद्रबिंदू ग्रामीण महाराष्ट्राकडे वळला असताना सांगोला तालुक्यातील चोपडीसारख्या एका छोट्याशा गावातील एक लेखक मोठ्या ताकतीने पुढे आला आहे. सुनील जवंजाळ हे त्याचे नाव. पेशाने शिक्षक असलेल्या या माणसाने आधी कवितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. ‘वेदनेच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहानंतर आपला मोर्चा कादंबरीकडे वळवला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकावा याप्रमाणाने त्यांनी इतिहास घडवला. ‘काळीजकाटा’ ही त्यांची कादंबरी आम्ही ‘चपराक’तर्फे प्रकाशित केली आणि पंधरा दिवसातच ती ‘बेस्ट सेलर’ ठरली. अवघ्या तीन महिन्यात या कादंबरीची पहिली आवृत्ती संपत आलीय हे प्रकाशक या नात्यानं सांगताना मला आनंद होतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण साहित्यासाठी आज (दि. 26) या कादंबरीला ‘ग. ल. ठोकळ पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात येत आहे.

प्रेम हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रेमाशिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही. ही भावना थोड्याफार फरकाने प्रत्येकात असतेच असते. प्रेमाची प्रत्येकाची संकल्पना न्यारी! ती व्यक्त करण्याची पद्धतही निराळी! तरुण वयात मात्र अनेकांना विभिन्नलिंगी आकर्षण म्हणजेच प्रेम वाटू लागते. इथेच अनेकांची गल्लत होते. त्यातूनच पुढे अनेक गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी कृत्ये घडतात. एकतर्फी प्रेमातून, वासनेतून, अनैतिक संबंधातून घडत असलेल्या गुन्ह्यांची संख्या मोठी आहे. आपल्याला आवडणारा किंवा आवडणारी आपल्या आयुष्यात आला अथवा आली नाही तर अनेकजण सूडाच्या भावनेने पेटतात. काहीजण त्या विरहात झुरत राहतात. प्रसंगी दु:खातिरेकाने मनोरुग्णही होतात. प्रेमामुळे माणूस घडतो तसाच बिघडतोही! प्रत्येकालाच त्याचे प्रेम मिळेलच असे नाही. अशावेळी त्यातून सावरणे, समोरच्याच्या भावनेचा आदर करणे अत्यावश्यक असते. ती समज अनेकांत असतेच असे नाही. नेमका हाच धागा पकडून सुनील जवंजाळ यांनी ‘काळीजकाटा’ ही कलाकृती साकारली. प्रेमात अपयश आलेल्या बहुसंख्याकांचे प्रतिनिधित्व करणारी ही कादंबरी जीवनाचे अनेक रंग दाखवून देते. संकटांना न जुमानता त्यातून उभारी घेण्याचे बळ देते. नैराश्य झुगारून लावते. संस्कारांचा धागा भक्कम करते.

‘आत्मिक प्रेमाचे सुंदर मंदीर म्हणजे काळीजकाटा’ या शब्दात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी या कादंबरीचा गौरव केला. सुनील जवंजाळ हे कवी मनाचे लेखक असल्याने ही कादंबरी अतिशय काव्यात्म शैलीत साकारली आहे. यातील सुभाषितवजा वाक्ये, जागोजागी केलेली कवितांची पेरणी वाचकांना खिळवून ठेवतात. आपण एखादा चित्रपट पाहतोय की काय असे चित्र जवंजाळ यांच्या समर्थ लेखणीतून उभे राहते. वाचक त्यात आपलीच कथा शोधू लागतात आणि त्यात एकरूप होतात. सावली आणि वसंत ही या कादंबरीतील प्रमुख पात्रे असली तरी यात अनेकांचे ‘जगणे’ आलेय, ‘वागणे’ आलेय. ‘सोसणे’ आलेय. सावलीचे आई-बाबा, मावशी, सरपंच, स्त्रियांचं शोषण, शेतकरी बांधवांची अगतिकता, साहित्यातलं ‘गटार’ राजकारण हे सगळेच मुळातून वाचण्यासारखे आहे.

पुरस्काराच्या निमित्ताने संयोजकाकडून बलात्कार वाट्याला आलेली कवयित्री सावली बंड करून का उठत नाही? असा प्रश्न काहींना पडला. खरेतर ही कादंबरी म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आहे. समाजाची बंधनं झुगारून देता न येणारी पात्रं अनेकदा जे बोलू शकत नाहीत तेच तर लेखक आपल्या कलाकृतीद्वारे मांडत असतो. सबंधित पात्रांच्या त्या भावना समजून न घेण्याइतके वाचक दूधखुळे नसतात. आपल्या आजूबाजूच्या अशा घटना उघड्या डोळ्याने बघण्याचे, त्या थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे धाडस ‘काळीजकाटा’सारख्या कलाकृती देतात. ही कादंबरी वाचून कुणाचे डोळे पाणावले नाहीत, कुणाला रुखरुख लागली नाही, हळहळ वाटली नाही तरच नवल!

सावली आणि वसंतच्या व्यापक, उदात्त आणि तरीही शोकात्म प्रेमकथेबरोबरच या कादंबरीत आणखी एका लेखकाची उपकथा आहे. त्याने त्याच्या जगण्यातील विद्रोह नेमकेपणाने मांडलाय. तोही वाचकांच्या मनाचा ठाव घेतो, अनेकांना गुंतवून ठेवतो. ‘काळीजकाटा’मधील ‘त्या’ लेखकाचीच एक वेगळी कादंबरी प्रकाशित करा, असाही आग्रह काही वाचकांनी प्रकाशक म्हणून माझ्याकडे धरलाय. ‘‘वसंताचे पुढे काय झाले?’’ हा प्रश्न विचारून तर अनेकांनी भंडावून सोडले. हे या कादंबरीचे यश तर आहेच पण या कादंबरीचा पुढचा भागही लवकरच येईल हे यानिमित्ताने आनंदपूर्वक जाहीर करतो.

या कादंबरीचे उत्तम नाट्यरुपांतर होऊ शकते, यावर दमदार चित्रपट निर्माण होऊ शकतो आणि प्रिंट आणि ऑडिओ स्वरूपात ही कादंबरी अनेक भाषांत जाऊ शकते. ‘चपराक’तर्फे आम्ही त्यादृष्टीने नक्की सकारात्मक प्रयत्न करू! या कादंबरीचा काही भाग एखाद्या विद्यापीठाने त्यांच्या अभ्यासक्रमासाठी लावला तर आजच्या तरुणाईसाठी तो निश्चितपणे दिशादर्शक ठरेल.

वाचनसंस्कृती कमी होतेय आणि ग्रामीण भागातून नव्याने कोणी काही दर्जेदार लिहित नाही या ‘अंधश्रद्धा’ सुनील जवंजाळ या लेखकाने त्याच्या कसदार लेखणीतून सप्रमाण दूर केल्या आहेत. या भरीव साहित्यिक योगदानाबद्दल आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मिळत असलेल्या पारितोषिकाबद्दल प्रकाशक या नात्याने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देतो!
दैनिक 'पुण्य नगरी'
२६ मे २०१८ 
-घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक प्रकाशन’, पुणे
7057292092

Wednesday, April 18, 2018

प्रज्ञावंत इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे

ही गोष्ट आहे 2006 ची. त्यावेळी आम्ही ‘चपराक’तर्फे उमेश सणस यांची ‘शिवप्रताप’ ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित केली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि अफजलखान यांच्यातील संघर्षावर ही अत्यंत रोमहर्षक कादंबरी आहे. या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. शिवदिग्विजयाची रोमांचकारी कहाणी म्हणून ती वाचकप्रिय होत होती. या कादंबरीचे पहिले सविस्तर परीक्षण डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले. ते दैनिक ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ पुरवणीत प्रकाशित झाले. त्यावेळी त्यांच्याशी माझी जुजबी ओळख होती. लेखकाला तर ते ओळखतच नव्हते. 

या परीक्षणानंतर त्यांनी मला घरी भेटायला बोलावले. ‘चपराक’च्या मासिकाविषयीही तोपर्यंत त्यांना पुरेशी कल्पना नव्हती. आमच्या बराच वेळ गप्पा झाल्या. नंतर मी त्यांना ‘चपराक’चे अंक दिले आणि त्यासाठी लेखन करण्याची विनंतीही केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ‘चपराक’ हे नाव त्यांना आवडले नाही. मी त्यांच्या मताचा आदर केला आणि बाहेर पडलो. 

रात्री दीडच्या दरम्यान त्यांचा फोन आला. इतक्या उशिरा फोन केल्याबद्दल प्रथम त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाले, ‘‘तुम्ही गेल्यापासून मी ‘चपराक’चे अंक वाचतोय. ही फक्त चुकीच्या प्रवृत्तीला ‘चपराक’ नाही; हा तर आई तुळजाभवानीने तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. ‘चपराक’ ही मला आद्याक्षरे वाटली. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष! गजांतलक्ष्मी कायम तुमच्याकडे पाणी भरेल. या क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी व्हाल. ‘चपराक’चा अंक हातात येईपर्यंत नाव विचित्र वाटते; पण एकदा अंक वाचला की वाचणारा प्रेमात पडतो. अशा चपराकीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. आजपासून मला तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून मान्यता द्या!’’

त्यानंतर त्यांनी अंकावर सविस्तर लेखी अभिप्राय पाठवला. एक मोठा लेखक आमच्या परिवाराचा महत्त्वाचा घटक बनला. पुढे शिवदे सरांशी घनिष्ट संबंध आले. सातत्याने भेटी होऊ लागल्या. आम्ही एकत्र प्रवास केला. ‘आकाशवाणी’ सारख्या माध्यमातून एकत्र कार्यक्रमही केले. ‘चपराक’च्या अनेक कार्यक्रमांना ते अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. ‘चपराक’साठी त्यांनी विपुल लेखन केले. आमच्या काही ग्रंथांना प्रस्तावनाही लिहिल्या. 

डॉ. सदाशिव शिवदे हे मुळचे जावळी तालुक्यातील कुडाळचे. पेशाने गुरांचे डॉक्टर. त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि ते इतिहास संशोधनाकडे वळले. 

ही साधारण तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पाचगणी जवळच्या हुमगावची. या गावात जत्रा भरली होती. पहिल्या दिवशी छबीना निघाला. दुसर्‍या दिवशी कुस्तीचा आणि तमाशाचा फड रंगला. या फडात एकाने छत्रपती संभाजीराजांचा इतिहास सांगितला. गर्दीतले लोक ऐकत होते. त्यात डॉक्टर सदाशिव शिवदेही होते. तरूण वयातल्या शिवदेंनी महाराजांचे ते चरित्र ऐकले आणि ते अस्वस्थ झाले. ते तो फड अर्धवट सोडून निघाले. कुडाळी नदीवरून जाताना ते बेचैन झाले. राजांचे असे अय्याशी, रंगेल वर्णन त्यांच्या डोक्यातून काही जाईना! मग ते परत फिरले. फडावरील मंडळींची आवराआवर सुरू होती. त्यांनी विचारले, ‘‘मगाशी संभाजीराजांची भूमिका कोणी केली?’’ त्यांनी सांगितले ते त्या तमाशा कंपनीचे मालकच होते. शिवदे त्यांना भेटले आणि रागाच्या भरात त्यांनी त्याच्या कानाखाली जाळ काढला. ‘‘संभाजीराजांचे हे विकृत चित्रण का रंगवता?’’ असे त्यांनी दरडावून विचारले.

त्याने सांगितले, ‘‘साहेब आम्हाला माफ करा. आम्ही वर्षानुवर्षे जे ऐकतोय तेच सादर करतो. महाराजांची आम्हाला खरी माहिती नाही. कुणाचा अभ्यासच नसल्याने आम्हाला पोटासाठी हे ऐकीव लोकांपुढे मांडावं लागतं.’’ त्यावर तेही चमकले. आपल्याला तरी महाराजांचा पूर्ण अभ्यास कुठे आहे, असा विचार करत ते बाहेर पडले. ही घटना मात्र त्यांच्या मनावर कोरली गेली.

सदाशिव शिवदे यांना बालपणापासून कवितांची आवड. अधूनमधून ते वृत्तपत्रातून लिहित असत. गुरांचे डॉक्टर असल्याने शेती, शेतकरी, गुरं हेच त्यांचं विश्‍व. 1995 ला ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले आणि पुण्यात दाखल झाले. इथे आल्यावर सर्वप्रथम ते अखिल भारतीय इतिहास परिषदेत गेले. ललित साहित्याबरोबरच त्यांनी इतिहासाचा अभ्यास सुरू केला. भरपूर वाचन करणं, असंख्य संदर्भ तपासून पाहणं, भाषेचा अभ्यास करणं यात त्यांनी स्वतःला गाडून घेतलं. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम. ए. मराठी केलं होतंच. पुण्यात त्यांनी इतिहास आणि संस्कृतचा अभ्यास केला. ‘मराठ्यांच्या इतिहासाची संस्कृत साधने’ या विषयावर पीएच. डी. केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने तो प्रबंधही प्रकाशित केला.

कोणी न केलेलं काम आपण करायचं असा चंग त्यांनी बांधला. हुमगावची घटना डोक्यातून गेली नव्हतीच. त्यामुळे आधी त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या चरित्राचा अभ्यास सुरू केला. त्यातून ‘ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’ हा संशोधनात्मक ग्रंथ साकार झाला. या चरित्रग्रंथाने छत्रपती संभाजीराजांविषयीचे अनेक गैरसमज दूर सारले. विश्वाास पाटील यांनाही ‘संभाजी’ ही कादंबरी लिहिताना या ग्रंथाचा संदर्भ घ्यावा लागला.
महाभारतात व्यास मुनींनी इतिहासाची जी व्याख्या केलीय तशी व्याख्या जगात आजवर कोणत्याच इतिहासकाराने केली नाही. ते म्हणतात,

इतिहास प्रदीपेन मोहावरणघातिना ।
लोकगर्भगृहं कृत्स्नं यथावत् संप्रकाशितम्॥

याचा अर्थ आहे, ‘‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे. या ज्योतीने अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश होऊन आपल्या नगरीचे, पूर्वजांचे व राजाचे सत्य स्वरूप आपल्या नजरेसमोर उभे राहते.’’

त्यामुळे राष्ट्राची ही ज्योत काळवंडू नये यासाठी गेल्या वीस वर्षात जे सातत्याने झिजत आहेत, देहाची काडं करत आहेत त्यापैकी डॉ. सदाशिव शिवदे हे आजच्या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नाव होतं. ‘महाराणी येसूबाई’, ‘रणरागिणी ताराराणी’, ‘दर्याराज कान्होजी आंग्रे’, ‘सेनापती हंबीरराव मोहिते’, ‘शिवपत्नी सईबाई’, ‘छत्रपती राजाराम-महाराणी ताराराणी’ हे संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी अभ्यासपूर्णरित्या साकारून आपला वैभवशाली इतिहास नव्या पिढीपुढे सशक्तपणे मांडला आहे. ‘परमानन्द् काव्यम्’चा अनुवाद त्यांनी केला. ‘मराठ्यांचे लष्करी प्रशासन’ हा त्यांचा अनुवादित ग्रंथही सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.  ‘युद्धभूमीवर श्रीशंभूराजे’, ‘स्वराज्याचे पंतप्रधान - मोरोपंत पिंगळे’ हे ग्रंथ इतिहासाच्या अभ्यासकांसाठी संजीवनी देणारे ठरलेत.

15 मे 1915 साली भारत इतिहास संशोधक परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते, ‘‘जर तुमच्या पूर्वजांच्या यशोदुंदुभीचा तुम्हास आदर असेल, जर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या रक्तामांसाचे असाल, जर त्यांची स्मृती तुम्हाला कायम ठेवावी वाटत असेल तर तुम्ही इतिहास संशोधनाच्या या कार्यास मदत करा.’’ 

‘केसरी’तील लोकमान्यांचे हे भाषण वाचून प्रभावित झालेल्या डॉ. सदाशिव शिवदे यांनी निवृत्तीनंतर हा वेगळा मार्ग चोखंदळपणे निवडला आणि आज ते या क्षेत्रातील ‘मनोरा’ बनले आहेत. प्रताप दुर्गा महात्म्य (1749), सईदाकेकदी नोंदी नाटकम् (तमिळ नाटकातील ऐतिहासिक उल्लेख), मोरोपंत पिंगळे पंतप्रधान यांच्या वंशजांचा ब्रिटिश सरकारकडे अर्ज, भुईंजकर जाधवराव घराण्यातील एक महजर, तुळजाभवानीची भोपे यांना निजामाने दिलेली पर्शियन सनद, डोंगरगाव-जोरी पाटील घराण्याची हकिकत व महजर यावर त्यांनी संशोधन केले.

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सभासद ते अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. महाराष्ट्रातील युवा इतिहासकारांची त्यांनी एक फळी निर्माण केलीय. वृत्तपत्रातून, विविध नियतकालिकातून सातत्याने लेखन, अनेक इतिहास परिषदांत सहभाग, शोधनिबंध वाचन आणि मार्गदर्शन यामुळे त्यांची सुकीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वाडे त्यांनी उजेडात आणले. पुणे सोडून महाराष्ट्रातील शंभर वाड्यांना त्यांनी भेटी दिल्या आणि लेखमाला चालवली. ‘महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे’ हा त्यांचा ग्रंथ दोन खंडात प्रकाशित झालाय. गुरांचे डॉक्टर असल्याने त्यांचे शेती जीवनाशी संबंधित अनुभवविश्व समृद्ध आहे. गुरं कसा लळा लावतात हे त्यांनी अनुभवलं. त्यातूनच त्यांनी ‘माझी गुरं, माझी माणसं’ हा अस्सल ग्रामीण कथासंग्रह लिहिला. तोही वाचकप्रिय ठरला. त्यांनी जी ऐतिहासिक काव्ये लिहिली त्यातील निवडक गीतांची ‘महाराष्ट्राचे महामेरू’ ही सीडीही प्रसिद्ध झाली आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मानपत्रे त्यांनी अस्सल ऐतिहासिक भाषेत लिहिली आहेत. लवकरच या मानपत्रांचे पुस्तक प्रकाशित करायचा त्यांचा मानस होता. ‘मानपत्र’ हा स्वतंत्र साहित्य प्रकार होऊ शकतो हे केवळ डॉ. सदाशिव शिवदे यांच्यामुळेच महाराष्ट्राला कळले.

छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत विवेकशील व प्रज्ञावंत असल्यामुळे त्यांचे अत्यंत विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी यांचा वंश त्यांच्या कारकिर्दीत वर आला. रियासतकार सरदेसाई यांनी लिहिले आहे -
‘‘शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेत पेशवा मोरोपंत किंवा सेनापती प्रतापराव गुजर यांजप्रमाणे, किंबहुना त्यांच्याहून जास्त बाळाजी आवजी चिटणीस यांचा उपयोग झाला आहे. 32 वर्षे शिवाजी महाराजांचा हा विश्वासू लेखक असल्यामुळे तो त्यांचा केवळ द्वितीय अंतःकरण होता असे म्हटले तरी चालेल.’’
बाळाजी आवजी चिटणीसांचे सुपूत्र खंडो बल्लाळ चिटणीस या व्यक्तीचे कर्तृत्व हे मराठेशाहीच्या स्थैर्यास कारणीभूत आहे. त्यामुळेच बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस’ पुरस्कार दिला जातो. गेल्यावर्षी तो डॉ. सदाशिव शिवदे यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्त एका सच्च्या इतिहासकाराचा गौरव झाला. संभाजीराजांचे कर्तृत्व संशोधनातून वाचकांपुढे आणणार्‍या डॉ. शिवदे यांची कामगिरी मोलाची आहे. संभाजीराजांवर त्यांनी आजवर 750 हून अधिक व्याख्याने दिली असून शेवटपर्यंत त्यांचे अग्निहोत्र सुरूच होते. पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता ते अव्याहतपणे कार्यरत होते. पूर्वी घरी गेल्यावर मायी जसे स्वागत करायच्या त्यात शिवदे सरांनी कधीही खंड पडू दिला नाही. म्हणूनच त्यांच्याकडे माणसांचा राबता असायचा.

इतिहास संशोधनाचे कार्य कसे असावे? असे विचारल्यावर डॉ. सदाशिव शिवदे काश्मीरचे कवी कल्हण यांच्या भाषेत सांगायचे,

श्लाणघ्यः स एव गुणवान्रागद्वेषबहिष्कृतः ।
भूतार्थकथने यस्स स्थेयस्येव सरस्वती ॥

(ज्याची वाणी राग-द्वेषांपासून अलिप्त होऊन ऐतिहासिक घटनांचे वर्णन करण्याच्या कामी दृढ राहते (कुठेही पक्षपात करीत नाही) तोच गुणवान पुरूष (अर्थात इतिहासलेखक) प्रशंसनीय समजावा.)

आजच्या वातावरणात इतिहास संशोधन म्हणजे मोठी शिक्षा वाटावी असे चित्र आहे. या द्वेषमूलक वातावरणात डॉ. शिवदे यांच्यासारखे अभ्यासक ठामपणे भूमिका मांडत होते. नवनवीन संशोधन पुढे आणत होते. म्हणूनच त्यांच्या या कार्याचे मोल शब्दातित आहे. 

मध्यंतरी मी फेसबुकला एक पोस्ट टाकली होती. ‘‘वा. सी. बेंद्रे यांच्यानंतर संभाजीराजांना जर कोणी खरा न्याय दिला असेल तर तो डॉक्टर सदाशिव शिवद्यांनी! बाकी विश्वास पाटलांसारख्या लेखकांनी यू ट्यूबसारख्या माध्यमांसाठी मनोरंजक ‘क्लिप’चे लेखन करावे.’’

आपण ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मोडी या भाषा, लिपींचा अभ्यास, तर्कशुद्ध विवेचन, पुराव्यासह मांडणी, स्पष्ट भूमिका यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. 

सेवानिवृतीनंतर अविरत ध्यास घेऊन इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे डॉ. सदाशिव शिवदे हे खरे आजच्या पिढीचे आदर्श आहेत. त्यांच्या जाण्याने व्यक्तिशः माझे मोठे नुकसान झाले आहे. खरंतर मी त्यांच्या नातवंडाच्या वयाचा! पण त्यांनी माझ्याशी ‘मैत्री’ केली. ‘चपराक’साठी त्यांनी अनेकांना लिहिते केले. नवनवीन लेखकांना ते आमच्याकडे आवर्जून पाठवायचे. सर्वत्र ‘चपराक’विषयी भरभरून बोलायचे. सातत्याने फोन करून चर्चा करायचे. भेटायला बोलवायचे. त्यांनी मोडी लिपीत लफ्फेदार सही करून मला भेट दिलेली अनेक पुस्तके माझ्या संग्रहात आहेत.

मध्यंतरी त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी त्यांचा फोन आला की ‘‘आधी भेटायला या..’’ नेमके त्याचवेळी माझी आईही रुग्णालयात दाखल होती. प्रथमच त्यांनी बोलवूनही भेटायला गेलो नाही. त्यामुळे पुन्हा आता आमची भेट होणारच नाही ही कल्पनाही करवत नाही. 

डॉ. सदाशिव शिवदे यांच्यासारखे प्रज्ञावंत संशोधक त्यांच्या अभ्यासातून, कृतीशील विचारातून कायम जिवंत राहतात. त्यांच्या अनेक स्मृती आमच्याकडे आहेत आणि त्या आम्हाला प्रेरणा देत राहतील. एक अफाट ताकतीचा व्यासंगी इतिहासकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

Sunday, April 1, 2018

जोशींचा श्री-पाद!



     आपल्याकडे अखिल भारतीय साहित्य महामंडळ नावाची एक संस्था आहे. या संस्थेचं काम काय? तर नको तिथं लुडबुड करत राहणं आणि साहित्यिक व्यासपीठावरून मिरवून घेणं. याचं अध्यक्षपदही ‘फिरतं’ असतं. म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद इकडं तीन-तीन वर्षासाठी हे पद दिलं जातं. तिथल्या घटक संस्थांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष महामंडळाचे अध्यक्ष होतात. म्हणजे हे त्या द्रौपदीसारखं! तिला पाच नवर्‍यांसोबत संसार करावा लागायचा. या महामंडळाचे बदलते अध्यक्ष तीन-तीन वर्षे कारभार पाहतात. देशाच्या राजकारणात राष्ट्रपतींचं जे स्थान असतं तेच स्थान साहित्य संस्थात महामंडळाच्या अध्यक्षांचं असतं. फक्त रबरी शिक्का! नाही म्हणायला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात यांना थोडंफार डोकावता येतं पण ते तितक्यापुरंतच! इतर वेळी यांना कुणी विचारत नाही.

     सध्या नागपूरचे श्रीपाद भालचंद्र जोशी या साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जोशींचं चरित्र आणि चारित्र्य स्वच्छ आहे. राहणीमान साधं आहे. सगळ्यात मिळून मिसळून असतात. दलित, वंचित, उपेक्षित, शोषित वर्गासाठी त्यांच्या मनात कळवळा आहे. ‘जोशी’ असूनही त्यांनी बहुजनांसाठी योगदान दिलंय. श्रीपाद जोशी काय किंवा आमचे पत्रकार मित्र प्रसन्न जोशी काय! या लोकांनी सातत्यानं सर्वसमावेशक भूमिका घेतलीय! पण यांचं ‘जोशी’ आडनाव मध्ये येतं. अनेकांना ते खुपतं. तरीही ही मंडळी निराश झाली नाहीत. त्यांचं काम त्यांनी सुरूच ठेवलंय. असं जरी असलं तरी काहीवेळा खुर्चिचं पाणी लागतंच असं म्हणतात. श्रीपाद जोशी यांच्याबाबतही असंच काहीसं झालं असावं. सध्या गडी लयीच बेफाट सुटलाय. वाटेल ती विधानं करणं आणि चर्चेत राहणं हा यांचा धंदा झालाय.

     नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात नुकताच एक बहुभाषिक मेळावा झाला. या मेळाव्यात किती भाषिक आले होते माहीत नाही पण उपस्थिती जेमतेमच! त्यामुळं जोशींचा पारा चढला. तो राग त्यांनी मराठी प्राध्यापकांवर काढला. ते म्हणाले, ‘‘मराठी भाषेसंदर्भात परिसंवाद, चर्चासत्र वारंवार होतात पण मराठीचे प्राध्यापक तिकडे फिरकत नाहीत. मराठी भाषेबद्दल त्यांना आत्मियता राहिली नसून लाख-दीड लाख रूपये पगार मिळत असल्यामुळे गरजा संपलेल्या आहेत. त्यांचे पगार तीस-चाळीस हजारांवर आणले तर हे सगळे मराठी भाषेच्या प्रचारासाठी कंबर कसतील...’’

     जोशी प्राध्यापकांच्या पगारावर घसरल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. प्राध्यापकांना पगार शिकवण्याचा मिळतो की साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा? अशा कार्यक्रमांना त्यांनी उपस्थित रहावं ही अपेक्षा आहे की दंडक? विविध महाविद्यालयांनी, शिक्षणसंस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना साहित्य संस्थांचे पदाधिकारी मानधन न घेता उपस्थित राहतात का? बरं, ते राहू द्या! प्राध्यापकांच्या उपस्थितीचं नंतर बघू... या अशा भुक्कड साहित्य संस्थांचे जे सभासद आहेत ते तरी या कार्यक्रमाला येतात का? किमान या कार्यक्रमांची माहिती सदस्यांपर्यंत तरी जाते का? त्यांच्याच संस्थांचे साहित्यिक असलेले किंवा म्हणवून घेणारे सदस्य जर अशा कार्यक्रमांना येत नसतील तर यांनी प्राध्यापकांकडून का अपेक्षा ठेवाव्यात? प्राध्यापकांच्या बौद्धिक विकासासाठी, त्यांच्या साहित्यिक अभिरूचीसाठी साहित्य महामंडळाने आजवर काही उपक्रम राबवलेत का? मग केवळ ते तुमच्या कार्यक्रमाला येत नाहीत म्हणून त्यांचे पगार कमी करा असे फर्मान काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?

     श्रीपाद जोशी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून महामंडळाच्या कोषासाठी अनेकांकडे पदर पसरत आहेत. दहा रूपयांपासून कितीही रक्कम मदत म्हणून द्या, अशी गळ घालत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्राध्यापकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसावा! म्हणून तर हा पोटशूळ नाही ना? नाहीतर यांच्या पगारावर घसरण्याचं काय कारण? 

     ते म्हणतात, ‘‘मी दहा घटक संस्थांचा ‘क्षीण’ अध्यक्ष आहे. मला कोणतेच अधिकार नाहीत!’’ असं जर आहे तर मग अशी विधानं का करता? तुम्हाला तुमचे अधिकार मिळावेत यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. सातत्यानं मागणी होऊनही अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक होत नाही. साहित्य संस्थांच्या सदस्यांनाही संमेलनात मतदानाचा अधिकार मिळत नाही. महामंडळानं जे उपक्रम प्रयत्नपूर्वक तडीस नेले ते रसिक-वाचकांपर्यंत पोहचवता येत नाहीत. मग तुम्ही असे तारे का तोडताय? 

     डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात हेच जोशी म्हणाले होते की, ‘‘साहित्य संमेलनात प्रकाशकांनी पुस्तक विक्रीची अपेक्षा ठेवू नये. हे केवळ प्रदर्शन असते. त्यामुळे प्रकाशकांनी एक-एक प्रत आणावी, ती दाखवावी आणि परत न्यावी...’’ अरे फोकणीच्या, हे जर फक्त ‘प्रदर्शन’ आहे तर ‘ग्रंथ विक्री आणि प्रदर्शन’ असे सांगून आमच्यासारख्या प्रकाशकांकडून ग्रंथ दालनाचं अवाच्या सव्वा भाडं कशाला घेता? केवळ तुमच्या तुंबड्या भरायच्या? आमच्याकडून जमलेल्या पैशातून तुम्ही पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य करायचे, सगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण करून घ्याायच्या, प्रसंगी आयोजकांना मेटाकुटीला आणायचे आणि वर अशी विधानं करायची? जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा रे!

     श्रीपाद जोशी यांनी मराठीच्या प्राध्यापकांच्या घसरत चाललेल्या सांस्कृतिक अभिरूचीविषयी, त्यांच्या राजकीय सहभागाविषयी, विद्यार्थ्यांवर विविध विचारधारा लादण्याविषयी, त्यांनी हातात घेतलेल्या संशोधन कार्याविषयी, पीएच.डीच्या बाजाराविषयी, पैसे भरून भरती झालेल्या प्राध्यापकांविषयी, त्यांच्या वाचनाविषयी, लेखनाविषयी काही भाष्य केलं असतं तर त्यावर एकवेळ चर्चा होऊ शकली असती. इथं मात्र ते थेट त्यांच्या पगारावरच जातात आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचं समर्थन करता येणार नाही. अशा कुण्या जोश्यानं सांगितलं म्हणून प्राध्यापकांचे पगारही कमी होणार नाहीत. तो अधिकार अशा लोकांकडं नाही; पण यातून त्यांची द्वेषमूलक भूमिका मात्र दिसून येते.

     आज प्राध्यापकांना कितीतरी अशैक्षणिक कामं करावी लागतात. ‘रात्र थोडी आणि सोंगं फार’ अशी त्यांची अवस्था झालीय. विविध कमिट्या, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम यात ते व्यग्र असतातच. केवळ साहित्य महामंडळासारख्या संस्थाकडं ते फिरकत नाहीत म्हणून त्यांचं साहित्यिक योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. अनेक ठिकाणी तर महाविद्यालयं राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि त्या त्या नेत्यासाठी प्राध्यापकांना सगळी कामं सोडून जीवाचं रान करावं लागतं. हे चित्र थांबवण्यासाठी जोशीबुवांकडं काही योजना आहेत का? विनाअनुदानीत तत्त्वावरील प्राध्यापकांची अवस्था तर ‘भीक नको, कुत्रा आवर’ अशी झालीय. त्यांच्या पोटापाण्यासाठी महामंडळ काही करू शकेल का? 

     एक प्रातिनिधिक उदाहरण द्यावंसं वाटतंय. उदगीर येथील आमचा मित्र प्रा. रामदास केदार! अत्यंत गुणवान कवी, लेखक, समीक्षक! त्याच्या कवितांची दखल दस्तुरखुद्द विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर अशा दिग्गजांनी घेतलीय. विंदा रूग्णालयात असताना म्हणाले होते, ‘‘आता या वयात माझी आई माझ्याजवळ नाही. ती कधीच देवाघरी गेलीय; पण रामदासची ‘मराठवाड्याची आई’माझ्या उशाला आहे. त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो.’’ रामदास केदारनं मराठवाड्यातील कवींच्या ‘आई’विषयक कवितांचं संकलन केलं होतं आणि विंदांनी त्याची अशी दखल घेतली होती. हा गुणी लेखक उपेक्षेचं आयुष्य जगतोय. विनाअनुदानीत तत्त्वावर गेली कित्येक वर्षे प्राध्यापक म्हणून काम करतोय. त्याच्या महाविद्यालयातल्या शिपायालाही त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळतोय... श्रीपाद जोशी यांच्याविषयी काही बोलणार आहेत का?

     मराठीच्या प्राध्यापकांचं अवांतर वाचन, त्यांची साहित्यिक अभिरूची कमी झालीय हे तर खरंच. काही अपवाद वगळता अनेक प्राध्यापकांनी सातत्यानं भाषेचे खूनच केलेत. या लोकांकडं किमान दोन मराठी मासिकं येत नाहीत, यातच सगळं आलं... पण म्हणून त्यांचे पगार काढू नयेत. हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे आणि तो आपण मान्य करायला हवा. साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या ‘गुळाच्या गणपती’ला एवढं भान तरी असावंच असावं! 

     जोशी, तुमचा हा पाद दुर्गंधीयुक्त आहे. यामुळं वातावरण कलुषित होतंय. साहित्य संस्थांविषयी लोकांच्या मनात जिव्हाळा निर्माण होण्याऐवजी ते आणखी दूर जात आहेत. मराठीच्या आणि इतरही प्राध्यापकांनी साहित्य संस्थाकडं, साहित्याकडं फिरकावं असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर अशी अविवेकी, द्वेषपूर्ण, संकुचित विधानं करू नकात. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. साहित्य संस्थांची गमावलेली प्रतिष्ठा, त्यांची विश्‍वासार्हता परत मिळवायचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. गेल्या चाळीस वर्षात अनेकांनी तुमची धडपड बघितलीय. तुमची जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष भूमिका, तुमच्यातला हाडाचा सच्चा कार्यकर्ता, पत्रकार, कवी वाखाणण्याजोगा आहे. शरद पवारांसारखा महानेताही उतारवयात जशी बेताल विधानं करतो तसं तुमचं होऊ देऊ नकात. तुम्ही साहित्यिक आहात. त्यामुळं आयुष्यभराची साधना असं वाटेल ते बोलून घालवू नकात. 

     मागं श्री-पाल नावाचे एक संमेलनाध्यक्ष म्हणाले होते, ‘‘मोदी तिकडं पाकिस्तानात कशाला बोंबलत फिरतोय?’’ आणखीही बरीचशी आक्रस्ताळी विधानं त्यांनी केली होती. यंदाचे संमेलनाध्यक्ष देशमुख म्हणाले, ‘‘राजा, तू चुकतोस रे...’’ आणि महामंडळाचे अध्यक्ष म्हणतात, ‘‘प्राध्यापकांचे पगार कमी करा...’’ मराठी माणूस हे सगळं अजूनही खपवून घेतोय पण त्याचा अंत पाहू नकात. तुम्ही साहित्यिक आहात तर साहित्यावर बोला. तुमच्यामुळं चार लेखक जरी नव्यानं पुढं आले तर तेच तुमचं ‘सांस्कृतिक संचित’ असणार आहे. तिकडं लक्ष न देता अशी दर्पोक्ती करत राहिलात तर तुम्हाला कुणी ढुंकूनही विचारणार नाही. कितीतरी आले, गेले... त्यातले तुम्ही एक होऊ नकात म्हणजे झाले. सूज्ञास अधिक सांगणे न लगे!!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Wednesday, March 7, 2018

प्राप्त काळ हा विशाल भूधर!

गुरूवर्य राम शेवाळकर म्हणायचे, ‘‘रामाचा आदर्श ठेवायचा तो सत्यवचनासाठी; बायकोच्या त्यागासाठी नव्हे!’’

सध्या मात्र याउलट परिस्थिती निर्माण झालीय. प्रत्येकजण सोयीस्कर भूमिका घेतो. प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक विधानाचे आपल्याला हवे तसे अर्थ लावतो. आपले म्हणणे रेटून नेण्यासाठी वाद आणि वितंडवादही घालतो; पण सत्याच्या तळाशी जाण्यात कोणालाच रस नसतो. ऐकीव माहितीवर मते मांडणे, समोरच्याचे मूल्यमापन करणे यातच यांना धन्यता वाटते. आपल्या सारासार बुद्धिचा वापर करायचाच नाही असा अलिखित करार आपल्याकडच्या विचारवंतांनी केलाय की काय अशी शंका येण्याइतपत बिनडोकपणा ही मंडळी करतात. 

परवा भाऊ तोरसेकर यांच्याशी चर्चा करत होतो. माझ्या एका सहकार्‍याने त्यांना विचारले, ‘‘भाऊ, हिंदुंनी किमान दहा मुलांना जन्म द्यावा’’ असे विधान करणार्‍या भाजप नेत्यांना मोदी आवरत का नाहीत? त्यांना वेळीच दाबले नाही तर ही मंडळीच पक्ष संपवतील असे वाटत नाही का?’’

भाऊंनी छान उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘एकीकडे तुम्हीच ओरडता की, मोदी सगळ्यांची गळचेपी करतात. कुणालाच बोलू देत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपून देतात. मग त्यांनी कुणाला समज का द्यावी? कुणाचे आवाज का दाबावेत? पंतप्रधान म्हणून हे त्यांचे काम आहे का? रोज किती वाचाळवीरांना त्यांनी समज द्यावी? त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कुणाला समज द्यावी आणि कुणाला मोकळीक हे सांगणारे आपण कोण? आपल्या सल्ल्यानुसार आणि आपल्याला हवे तसेच त्यांनी इतरांशी सोयीस्करपणे वागावे का?’’

त्यांच्या या बोलण्यावर मित्र अर्थातच निरूत्तर झाला. 

आपले असेच होतेय. प्रत्येक गोष्टीतले आपल्यालाच खूप कळते अशा आविर्भावात आपण मते मांडत असतो. कुणाला चुकीचे ठरवतो तर कुणाला बरोबर! आपल्या मनासारखेच सगळे झाले पाहिजे अशी आपली भाबडी भावना असते. राज्य आणि देश चालवताना काय काय कसरती कराव्या लागतात? कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं याचा मात्र आपण विचार करत नाही. व्हाट्स ऍप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून जे वाचायला, पहायला मिळतं त्यावर आपण आपली मतं ठरवतो. सोबतीला प्रसारमाध्यमं आहेतच.

माध्यम क्षेत्राशी संबंधित एक वाक्य वाचलं होतं. बहुतेक मार्क ट्वेन यांचं असावं. ते म्हणाले होते, ‘‘वृत्तपत्रं वाचली तर तुम्हाला जगाची माहिती मिळेल! आणि नाही वाचली तर चुकीची माहिती मिळणार नाही.’’ सध्या दुर्दैवानं असंच झालंय. दृकश्राव्य माध्यमं असतील किंवा मुद्रित माध्यमं! बातमीसाठी वाटेल ते! मग श्रीदेवीचं निधन कसं झालं हे सांगण्यासाठी आजच्या वार्ताहरांना ‘बाथरूम टब’मध्येही उतरावं लागतं. मस्जिदीत जाऊन वार्तांकन करावं लागतं. हरतर्‍हेच्या वेशभूषा करून वार्तांकन करावं लागतं. बातमीदार कमी आणि सोेंगाड्या जास्त अशी यांची गत!

दुर्योधन हा अत्यंत कपटी, स्वार्थी, आतल्या गाठीचा होता. कोणत्याही परिस्थितीत पांडवांना संपवायचं असा चंग त्यानं बांधला. पांडव हे भाऊ असूनही तो इतक्या टोकाला का आला? कारण भीमासारख्या बलवानानं बालपणापासून कौरवांचा छळ केला होता. म्हणजे हे शंभर भाऊ एखाद्या जलाशयात खेळत असतील तर भीम यायचा आणि त्यांची शेंडी धरून त्यांना पाण्यात बुडवायचा. ही पोरं गटांगळ्या खायची. जर ते झाडावर खेळत असतील तर भीम यायचा आणि ते झाड गदगदा हलवायचा. पिकलेली पाडं टपाटप पडावीत तसं सगळे झाडावरून खाली पडायचे. या बलदंडापुढं कुणाचंच काही चालायचं नाही. यातूनच दुर्योधनाच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण झाला. त्यातून पराकोटीची सूडभावना निर्माण झाली. इतकं करूनही पांडव पराभूत होत नाहीत हे पाहून त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. एकप्रकारची हतबलता निर्माण झाली. हतबलतेची जागा द्वेषानं, मत्सरानं, सूड भावनेनं घेतली. त्यातून पुढं इतका मोठा विध्वंस घडला. सगळे भाऊ मारले गेले. हस्तिनापूरनगरी बेचिराख झाली.

आपलंही असंच होतंय. आपल्या मनातील शत्रूला आपण सातत्यानं डिवचतोय. त्याला कमी लेखतोय. यातूनच नैराश्य येतंय आणि आपण त्यांनाच बळ देतोय! त्यामुळं त्यांच्याकडूनच आपला खात्मा सहजशक्य आहे. त्यासाठी वेगळ्या शत्रूंची मुळात गरजच नाही. आपल्या मनातील विकार आपल्याला स्वस्थ बसू देतच नाहीत मुळी! त्यातून काय काय प्रसंग ओढवतात याचंही गांभीर्य आपणास नाही.

‘चपराक’ परिवाराचे सदस्य आणि सुप्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांच्याकडं परवा खेड तालुक्यातल्या पूर या गावातली काही मंडळी आली होती. ते सांगत होते, पूर हे कवी नामदेव ढसाळ यांचं गाव! या गावात पद्मश्री ढसाळांचं यथोचित स्मारक व्हावं, त्यांच्या नावे अद्ययावत ग्रंथालय उभारावं यासाठी राज्य शासनाकडून काही कोटींचा निधी मंजूर झालाय. असं असलं तरी गावकर्‍यांचा मात्र येथे स्मारक उभारणीस विरोध आहे. हा विरोध आता-आता सुरू झालाय. किंबहुना येथे पद्मश्री नामदेव ढसाळांचं स्मारक व्हावं म्हणून जे प्रयत्न करत होते त्यांनीच या विरोधाचं शस्त्र उगारलंय.

आपल्या बंडखोरीनं मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून देणार्‍या या ‘निळ्या पँथर’ने वाङमयविश्‍व समृद्ध केलं. त्यामुळं त्यांच्या स्मारकाला विरोध का होतोय हे जाणून घेतल्यास आपली मान शरमेनं खाली जाईल. किंबहुना आधी ‘पद्मश्री ढसाळांच्या स्मारकाला गावकर्‍यांचा विरोध’ ही बातमी ऐकूनच संताप आला होता; मात्र त्यांची बाजू समजून घेतल्यास संतापाऐवजी मनात वैषम्य दाटून आलं.

स्पष्टच लिहायचं तर संबंधित ग्रामस्थ म्हणाले, ‘‘आमच्या गावकर्‍यांना भीती आहे की दुर्दैवानं उद्या आमच्या गावात दुसरे ‘कोरेगाव भीमा’ उसळले तर काय घ्या! ते आरिष्ट्य येण्याऐवजी हे स्मारकच नको! आम्ही ढसाळ साहित्यातून जिवंत ठेवू!’’

मला वाटतं यावर आणखी वेगळं काही भाष्य करण्याची गरज नाही.

महाराष्ट्रातल्या गावागावात गेलात तर सध्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. प्रत्येक गोष्टीला जातीय, राजकीय रंग द्यायचे! कोणतीही विचारधारा अशा ‘कट्टरतावादा’पासून दूर नाही. ही ‘जिवंत प्रेतं’ पाहून कोणत्याही विचारी माणसाच्या मनाचा थरकाप उडेल. मुख्य म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे असंख्यजण रोज कित्येकदा मरतात. 

असं म्हणतात की, मृत्यू हे शाश्वत सत्य असतं! पण हे असं इतकं सहजपणे मरण येणं बरं नाही. खरं सांगतो, मी माझ्या उभ्या आयुष्यात एकदाही मेलो नाही. आजूबाजूला अनेकांना रोजच मरताना मात्र पाहतोय!

मोठी स्वप्नं न पाहणं, त्याच्या पूर्तीसाठी अहोरात्र परिश्रम न घेणं म्हणजे मरण!

स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून लाचारीनं जगणं म्हणजे मरण!

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा निमुटपणं भोगत राहणं, आपल्यावरील अन्यायाविरूद्ध आवाज न उठवणं म्हणजे मरण!

परिस्थितीपुढं हतबल होत तडजोडी करणं, त्यातून न्यूनगंड आणि नैराश्य येणं म्हणजे मरण!

त्यामुळं आपलं आयुष्य आपण बेदरकारपणे जगायला हवं. अगदी कशाचीच तमा न बाळगता... पावलापावलाला संघर्ष करावा लागला, दुःखाचे डोंगर फोडावे लागले, सगळी आमिषं लाथाडावी लागली तरी आपण आपलं इप्सित गाठायलाच हवं. त्यासाठी अंगी थोडंसं ‘माणूसपण’ येणं गरजेचं आहे. 

परवा आणखी एक अत्यंत दुर्दैवी बातमी कळली. ही बातमी बातमीदारांचीच आहे. आजूबाजूचं सत्य तटस्थपणे वाचकांसमोर आणणारे, इतरांना न्याय मिळावा म्हणून धडपडणारे, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे अनेक पत्रकार आजही आहेत. भांडवलदार वृत्तपत्रांच्या मालकशाहीपुढं त्यांचं फारसं काही चालत नसलं तरी अनेकांनी या क्षेत्रासाठी सर्वस्व पणाला लावलंय. असो. मुख्य विषयाकडं वळतो.

मराठीतल्या एका बड्या वृत्तपत्रानं सध्या कामगार कपतीचं धोरण स्वीकारलंय. त्यांना जास्तीत जास्त जुनी लोकं कमी करायचीत आणि कमी पगारावर नवख्यांना राबवून घ्यायचंय. मग त्यांनी एक ‘ऑफर’ दिली... त्यांनी फर्मानच काढलं की, ‘ज्यांची नोकरी दहा वर्षे राहिलीय त्यांनी पुढच्या वीस महिन्यांचा पगार घ्या आणि घरी बसा!’

त्यांचं म्हणणं कोणी ऐकलं नाही तर त्यांच्या दूरदूरवर बदल्या केल्या. त्यांच्यावर सातत्यानं काही ना काही आरोप करून मग त्यांना अपमानास्पदरित्या काढलं जातंय. याहून गंभीर बातमी पुढं आहे. खरंतर ती ऐकल्यापासून हृदयाचं पाणी पाणी होतंय. इतरांसाठी हिरिरीनं भांडणारे पत्रकार आपल्या रोजीरोटीचा विचार करून गप्पगार आहेत.

ज्या संस्थेनं ही जुलूमशाही चालवलीय त्यांनी एका वरिष्ठ पत्रकाराला सांगितलं की, ‘तुम्हीही घरी बसा.’ हे पत्रकार अर्धी चड्डी घालायचे तेव्हापासून या वृत्तपत्रात कार्यरत होते. सगळ्या विभागात त्यांनी काम केलं. ‘आपण भले आणि आपले काम भले’ असा त्यांचा बाणा! रात्री साडेदहाला ‘शिफ्ट’ संपूनही ते सर्व पाने छपाईला जाईपर्यंत म्हणजे रात्री एक-दीड पर्यंत काम करायचे. अर्थात, कार्यालयात यायला पंधरा मिनिटं उशीर झाला तरी ‘हाफ डे’ पडायचा; मात्र रोज रात्री तीन-साडेतीन तास जादा काम करणं (विनातक्रार आणि विनामानधन) हा संस्थेचा शिरस्ताच! त्यामुळं त्यांचाही नाईलाज होता. या पत्रकाराची संस्थेप्रतीची ही निष्ठा पाहून इतर काही बड्या वृत्तपत्रांनी त्यांना नोकरीची ‘ऑफर’ दिली होती. असे असले तरी प्रत्येक ध्येयवान माणसात एक कीडा असतो. तो त्यांच्यातही होता. आता वेळ आणि सोबतच वयही निघून गेल्यानं इतर वृत्तपत्रंही विचारत नव्हती आणि ते ज्या वृत्तपत्राला ‘मातृसंस्था’ मानायचे त्यांनी तर त्यांना घरी बसण्याचा हुकूम दिला. मुलाचं शिक्षण चालू. मुलगी लग्नाला आलेली. या वयात ‘नोकरी गेली’ हे घरी तरी कसं सांगणार?

मग ते रोज घरून डबा घेऊन यायचे. एका बागेत बसून खायचे आणि इकडं तिकडं भटकून रात्री घरी जायचे. महिनाभर त्यांचा हाच दिनक्रम! आणि तो काळा दिवस उगवला. नैराश्य आणि हतबलतेतून त्यांनी आत्महत्या केली...

इतरांसाठी कायम संघर्ष करणार्‍याचा असा दुर्दैवी आणि करूणामय अंत झाला; मात्र संबंधित वृत्तपत्रातील महत्त्वाचे संपादक किंवा मालक अंत्यविधीलाही फिरकले नाहीत. 

इथे दिसतो माध्यमांचा फक्त व्यवसाय! त्यांना मिळणारा अघोरी नफा आणि नफा! बस्स!! 

इथं सर्वच क्षेत्र बरबटलीत! आभाळच फाटलं तर ठिगळं कुठं कुठं घालणार?

तरीही आपण खचता कामा नये. 

हे दिवस बदलण्याचं सामर्थ्य आपल्यातच आहे. 

कोणतीही क्रांती अशीच होत असते. त्यासाठी कुण्या ‘अवताराची’ गरज 
पडत नाही. ते फक्त आपल्या मनाचे समाधान!

जे जे चुकीचं वाटतं त्याला प्राणपणानं विरोध करूया. पूर्वग्रह बाजूला ठेवून जे जे चांगले आहे ते सर्व मोठ्या मनानं स्वीकारूया!  मुख्य म्हणजे अल्पसंतुष्ट न राहता सतत नव्याचा ध्यास घेऊया! 

गुढीपाडवा म्हणजे आपलं नववर्ष! त्यानिमित्त निर्भय आणि निर्मळ होण्याचा प्रयत्न करूया!

शेवटी कवीवर्य केशवसुतांच्या भाषेत सांगतो,

प्राप्त काळ हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा!
निजनामे त्यावरती गोंदा
विक्रम करा चला उठा तर....!
- घनश्याम पाटील 
संपादक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Tuesday, February 6, 2018

संमेलनाची शंभरी!

यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होत आहे. हे 91 वं संमेलन असल्यानं त्याची वाटचाल शंभरीकडं सुरू आहे. दरवर्षी असं साहित्य संमेलन घेणारी मराठी ही जगातली एकमेव भाषा असावी. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर बडोद्यात होणारं हे पहिलंच संमेलन आहे. यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात बडोद्यात तीन साहित्य संमेलनं झाली होती. 1909, 1921 आणि 1934 साली झालेल्या या संमेलनांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि बडोद्याचे सुपूत्र चिं. वि. जोशी हे होते. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत लक्ष्मीकांत देशमुख. पहिल्या तीन नावांची आणि देशमुखांची तुलना कुणीही करू नये! अशी तुलना अप्रस्तुत आहे. ‘खांडेकर-शिरवाडकरांच्या तुलनेचे साहित्यिक आज नाहीत,’ असं काही संपादक सांगत असले तरी ‘आज अत्रे-भावेंच्या तुलनेचे संपादकही नाहीत’ हेही सत्य आपण ध्यानात घ्यायला हवं. सगळ्याच क्षेत्रातला कस हरवत जाणं हा तर काळाचा महिमा आहे. त्यामुळं ‘आलिया भोगासी असावे सादर...’ म्हणत नव्या आव्हानांना सामोरं जायला हवं. 

कोणती आहेत ही आव्हानं? नव्या पिढीवर त्याचा काय परिणाम होईल? मराठी भाषेच्या अस्तित्वाची गेल्या काही काळात होणारी चर्चा कशाचं द्योतक आहे? या व अशा सगळ्या प्रश्नांचा आपण गांभिर्यानं विचार केला पाहिजे.

आपण आधी साहित्य संमेलनांचा विचार करूया! आपल्याकडं आधी ‘ग्रंथकारांचं संमेलन’ होतं. 1909 साली बडोद्यात झालेलं सातवं साहित्य संमेलन ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ म्हणून ओळखलं गेलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1954 साली दिल्लीत झालेल्या या संमेलनाची ही प्रादेशिक ओळखही पुसली गेली आणि ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झालं. या नावाचा असा व्यापक विस्तार करण्यामागं त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मराठी ही जगातील प्रमुख वीस भाषांपैकी एक भाषा आहे. त्यामुळं ते अखिल भारतीय व्हावं असं त्यांना वाटणं रास्तच आहे. आजची परिस्थिती मात्र फारच वेगळी आहे. आज या संमेलनाचं शब्दशः डबकं झालंय.

गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनांची झालेली घसरण हा चिंतेचा विषय आहे. कोणीही उठतंय आणि समंलनाध्यक्ष होतंय. बरं, त्यांना दुषणं द्यावीत तर ते साहित्य महामंडळाच्या घटनेकडं बोट दाखवतात. जेमतेम हजार लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरवतात. त्यात काय राजकारण होतं? कोणत्या खटपटी-लटपटी केल्या जातात, त्यांचा चेहरा आणि मुखवटा कसा असतो? हे सर्व यापूर्वी आम्ही ‘चपराक’च्या वाचकांसमोर आणलंच आहे. 

औरंगाबादला कौतुकराव ठाले पाटील नावाचे एक गृहस्थ आहेत. या माणसाच्या नावापासूनच मला कौतुक वाटतं. साहित्यिक राजकारणातला हा ‘ढाण्या वाघ’ आहे. आजवर त्यांनी अनेक ‘चिरकुटांना’ संमेलनाध्यक्ष केलं आहे. त्यांनी ठरवलं तर शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अजित पवार असतील! तसं झालं तर आयोजकांना निधी गोळा करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. संमेलनात मद्याचे पाट वाहतील. सहभागी साहित्यिकांना उत्तम प्रतीचं शाकाहारी-मांसाहारी जेवण मिळेल. निवासाची पंचतारांकित व्यवस्था होईल. प्रसारमाध्यमांना वेगळे ‘प्रायोजक’ शोधावे लागणार नाहीत. संमेलनात नाचवण्यासाठी जगभरातील ‘हव्या त्या’ देखण्या ‘मॉडेल्स’ बोलावल्या जातील. सनी लिओनी किंवा पुनम पांडेसारख्या तेव्हाच्या ज्या कोणी ‘स्टार’ असतील त्या त्यांची ‘कला’ सादर करण्यासाठी निमंत्रित केल्या जातील. आयोजकांपुढचा गर्दी गोळा करण्याचा प्रश्‍न सुटेल आणि अशा निमंत्रितांमुळं ती नियंत्रित कशी करावी? असा काहीसा प्रश्‍न पडेल. गेल्या काही वर्षातले अध्यक्ष, साहित्यिक आणि साहित्य संस्थांचं राजकारण, संमेलनातील साहित्यिक कार्यक्रम हे सर्व पाहता वरचं ‘चित्र’ सहजपणे सत्यात येऊ शकतं. म्हणूनच संमेलनाची शंभरी भरत चाललीय असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये!

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले उमेदवार शरद पवारांपासून नितिन गडकरीपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवतात. काही बड्या वृत्तपत्राचे संपादक एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांचं अस्तित्व पणाला लावतात. काही संपादक थेट निवडणुकीला सामोरं जात त्यांच्या त्या त्या भागातील वार्ताहरांना मतदारांची यादी देऊन मतपत्रिका हातात घेण्यासाठी पिटाळतात. काहीजण समीक्षकांना-प्रकाशकांना मेजवान्या देतात आणि त्यांचे त्यांचे ‘मतदार लेखक’ गाठण्याचा प्रयत्न करतात. काही प्रकाशकही आपापले लेखक संमेलनाध्यक्ष व्हावेत आणि आपली पुस्तकं खपावीत यासाठी प्रयत्नशील असतात. इच्छुक उमेदवार तयारीला लागल्यापासून आधी पाच-दहा वर्षे पेरणीही उत्तम करतात. साहित्य वर्तुळातील महत्त्वाच्या लोकांचे सातत्यानं दिवे ओवाळणं, त्यांच्या पुस्तकांवर गौरवपूर्ण परीक्षणं लिहिणं, त्यांचे सत्कार-सोहळे घडवून आणणं, त्यांची जितकी तळी उचलता येतील तितकी उचलणं हे सारं काही करतात. किंबहुना कोणते साहित्यिक प्रांतवाद जपतात, कोणाची कोणती विचारधारा असते, कोण कोणत्या जातीचा अभिमान बाळगणारे आहे, कोणाचे कुणाशी हितसंबंध आहेत, कोण कुणासोबत ‘मधुर’ संबंध जोपासतोय या सर्वांचा त्यांचा कमालीचा अभ्यास असतो. म्हणूनच संमेलनाध्यक्षाची प्रतिभा, त्याचा साहित्यिक वकुब, त्याचं वाचन, भाषेचं ज्ञान, सामाजिक आणि साहित्यिक भान, त्याचं व्याकरण, त्याचं निर्मळ अंतःकरण या व असल्या मूल्यांना या बाजारात काही किंमत नाही.

येनेकेनप्रकारे संमेलनाध्यक्ष होणं, सगळीकडं मिरवून घेणं, नंतर वर्षभर वाटेल ती उथळ विधानं करून चर्चेत राहणं हेच या लोकांचं जीवितकर्म झालंय. आपल्याकडं ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ म्हटलं जायचं; पण या बिनडोक लोकांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचे कौतुकसोहळे पाहता समाजाचीही कीव कराविशी वाटते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रसिद्धीची जबाबदारी पाहणारे, त्यांच्या मतपत्रिका घरोघरी जाऊन गोळा करणारे दलाल हमखास साहित्य संमेलनात ‘निमंत्रित’ म्हणून सहभागी असतात. गेल्या काही काळातल्या निमंत्रणपत्रिका पाहता ही नावं सहजपणे कुणाच्याही लक्षात येतील. 

बरं, संमेलनाध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची मजल कुठपर्यंत जावी? तर.. ‘‘मी निवडून आल्यास इतक्या कोटीचा प्रायोजक संमेलनासाठी मिळवून देतो’’ अशी हमी ते आयोजकांना देतात. मग त्यांच्या मतांचा ‘कोटा’ कुणाच्या पारड्यात पडेल हे सांगायलाच नको. पिंपरीत झालेल्या साहित्य संमेलनाचे आयोजक ‘गब्बर’ होते. त्यांनी मात्र साहित्यक्षेत्रावर पैशांची खैरात केली. पी. डी. पाटील नावाच्या एका धनदांडग्याचा आर्थिक उन्माद प्रत्येकाला दिसत होता. तेव्हाचे अध्यक्ष तर सोडाच पण माजी अध्यक्षांनाही त्यांनी लाखोंच्या थैल्या दिल्या. बाकीच्यांचे सोडा, पण सदानंद मोरे, नागनाथ कोत्तापल्ले अशा ज्येष्ठांनीही हे पैसे स्वीकारले. ‘शिक्षणसम्राट’ म्हणून मिरवणार्‍यांकडून असे पैसे घेताना आम्हाला संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ‘भाट’ झालेले दिसत होते. सरकारकडून निधी स्वरूपात मिळणारे पंचवीस लाख रूपयेही परत करणारे पाटील हे  कदाचित एकमेव आयोजक असावेत. जे ‘लक्ष्मीपूत्र’ म्हणूनच कुविख्यात आहेत त्यांच्याकडं तथाकथित ‘सरस्वती मातेचे उपासक’ पाणी भरत होते.

यंदाची परिस्थिती याउलट आहे. ‘सहभागी लेखकांनी प्रवासखर्च आणि मानधनाचीही अपेक्षा ठेऊ नये’ असं आयोजकांनी जाहीर केलं आहे. हाही सगळा काळाचा महिमा! आमचे उस्मानाबादवाले गेली कित्येक वर्षे साहित्य संमेलन घ्यायची तयारी करत आहेत. ‘आमच्याकडे या, साधी चटणी-भाकरी खा आणि साहित्यिक कार्यक्रम करा’ असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना मात्र ती संधी दिली जात नाही. कारण यांच्या ‘हरतर्‍हेच्या’ मागण्या कशा पूर्ण होतील?

पिंपरीतील थाटामाटाचं दडपण आल्यानं मागच्या वर्षी डोंबिवलीच्या  साहित्य संमेलनाकडं अनेक साहित्यरसिकांनी पाठ फिरवली. आमचा सुनील जवंजाळ सांगोला तालुक्यातील चोपडीसारख्या दुष्काळी गावात त्याच्या कादंबरीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम घेतो; तरी हजार-पाचशे लोक सहजपणे जमतात; मात्र डोंबिवलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनाला जेमतेम शे-दीडशे लोक उपस्थित असणं हे कशाचं लक्षण आहे? वर्षानुवर्षे निष्ठेनं साहित्य संमेलनाला येणारे साहित्यरसिकही संमेलनाकडं का पाठ फिरवत आहेत याचा विचार झाला नाही तर संमेलन म्हणजे केवळ एक सोपस्कार उरेल.

साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रमांचीच अधिक चर्चा होते. कोणत्या नट-नट्या सहभागी झाल्यात, उद्धाटनाला कोण येणार, राजकीय नेते काय गंमतीजमती करणार, कोण कुणाची खेचणार, कोणते नवे वाद उद्भवणार, इतकेच काय तर जेवणाचे ‘मेन्यू’ काय असणार यावरच आमच्याकडे अधिक चर्चा होते. संमेलनात वर्षानुवर्षे तेच ते ठराव मांडले जातात. बेळगावसारख्या विषयावर ठराव मांडणे हा केवळ सोपस्कारच झालाय का? त्यांच्या वेदना आपल्याला खरंच कळल्यात का? कळल्या असतील तर संमेलनाध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष, आयोजक आणि अर्थातच पर्यायानं सरकार त्यावर वर्षभर काय विचार करतं, काय कारवाई करतं? हे तपासलं तर आपल्याला नैराश्यच येईल. मग साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा गुळाचा गणपती, संमेलन म्हणजे बैलबाजार किंवा संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग अशी टीका झाली तर त्यात गैर ते काय?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर केली आणि तो कवी महाराष्ट्रापुढं ताकतीनं आला अशी उदाहरणं मोजकीच आहेत. संमेलनाध्यक्ष, आयोजक आणि साहित्य संस्थांच्या पदाधिकार्‍यापुढं लाळघोटेपणा करणारे तेच ते कवी मराठीला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी काय घंटा योगदान देणार? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? म्हणून हे ग्रहण सुटलं पाहिजे. आज खेड्यापाड्यात जी छोटी संमेलनं होतात ती या अखिल भारतीयच्या तुलनेत अधिक दमदार होतात. सातारा ग्रंथ महोत्सवाला जी प्रतिष्ठा प्राप्त झालीय तितकीही प्रतिष्ठा अखिल भारतीयला राहिली नाही. उलट महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणतात, ‘‘हे फक्त प्रदर्शन आहे, विक्री केंद्र नाही. त्यामुळं इथं या, तुमच्या पुस्तकाची एक एक प्रत दाखवा आणि निघा....’’ मग साहित्य संमेलनात ‘ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री’ या कारणासाठी विक्रेत्यांकडून आणि प्रकाशकांकडून भाडं वसूल करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? ‘साहित्य महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. प्रत्येकानं किमान एक-एक रूपया द्यावा’ अशी अपेक्षा व्यक्त करूनही तुमच्या आवाहनाला कोणी भीक घालत नाही त्याची हीच कारणं आहेत. साहित्याविषयी, साहित्य संस्थांविषयी, साहित्यिकांविषयी नव्या पिढीला आदर नसण्याचं द्योतक अशा लोकांच्या मानसिकतेत आहे. 

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या पुस्तकांविषयी नव्या पिढीला विचारा. त्यांची चार-दोन पुस्तकं सांगता आली तरी खूप झालं. सदानंद मोरेंना राजकीय पाठबळ असल्यानं किंवा उत्तम कांबळे बर्‍याच काळ एका बड्या वृत्तपत्राचे संपादक राहिल्यानं ‘साहित्यिक चर्चेत’ तरी आहेत. सबनीसांसारखा वाचाळवीर मात्र रोज नवनवे वाद आणि वितंडवाद घालत असताना त्यांची किती पुस्तकं आजच्या तरूणाईपर्यंत गेलीत? अक्षयकुमार काळेसारखा ‘विद्वान’ अनेक विषयांवर ‘संशोधन’ करून लिहितो पण ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचतं का? फ. मु. शिंदेसारख्या मंचीय कवीच्या त्याच त्या कविता किती काळ ऐकणार? लक्ष्मीकांत देशमुख त्यांच्या ‘प्रशासकीय’ मानसिकतेतून बाहेर पडलेत का? रा. ग. जाधव, द. भि. कुलकर्णी अशा दिग्गजांची समीक्षा सामान्य वाचकांपर्यंत पोहोचलीय का? नसेल तर यासाठी साहित्य संमेलनांनी, साहित्य संस्थांनी किंवा आपल्या सरकारनं काही भरीव केलंय का? 

एखाद्या वर्षी साहित्य संमेलन रद्द करा आणि काही चांगली पुस्तकं प्रकाशित करा. भले, इथंही कमिशनबाजी केली तरी चालेल पण काही प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं विकत घेऊन ती शाळा, महाविद्यालयांपर्यंत, खेड्यापाड्यातील ग्रंथालयांपर्यंत पोहोचवा. काही पुस्तकांवर चर्चा घडवून आणा. लेखक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवा. तुमची संमेलनातील अय्याशी आणि मिरवून घेण्याची हौस यापेक्षा हे निश्चितच महत्त्वाचं आहे. 

एकीकडं परंपरा-परंपरा म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडं आपणच भाषेचा, साहित्याचा खून करायचा हे काही बरं नाही. आजच्या पिढीनं सकस साहित्य वाचावं, त्यांच्यात ‘विचार’ करण्याची क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. साहित्य संमेलनाचं जत्रा-यात्रांचं स्वरूप भाषेची धुगधुगी जिवंत ठेवतं हे जरी खरं असलं तरी ‘अशा जगण्यापेक्षा मरण परवडलं’ असं वाटायला नको. 

मुळात आपण ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ या संदेशाप्रमाणे खूप अल्पसंतुष्ट आहोत. म्हणजे एखाद्याला महिना चाळीस हजार रूपये पगार असेल तर तो म्हणेल, ‘मला देवानं भरपूर दिलंय. मी आहे त्यात समाधानी आहे.’ पण वस्तुस्थिती ही असते की साल्या यापेक्षा जास्त कमावण्याची तुझी लायकीच नाही! तू ना कुठला चांगला व्यवसाय करून यशस्वी होणार ना तुझा पगार चाळीस हजारांवरून दहा लाखावर जाणार! मग तुला ‘समाधान’ मानण्यावाचून पर्यायच नाही. तशी आपलीच फसवणूक आपणच करू नये! साहित्य संमेलनं किती महत्त्वाची आहेत, ती कसा साहित्यिक झरा पाझरत ठेवतात, त्यांचं साहित्यिक योगदान किती मोठं आणि श्रेष्ठ आहे हे सांगताना यात आणखी काय विधायक आणि सकारात्मक बदल घडवता येतील, ते जास्तीत जास्त सर्वसमावेशक कसे होईल, इथं केवळ आणि केवळ निखळ साहित्यालाच कशी प्रतिष्ठा मिळेल, सर्व राजकारण बाजूला सारून गुणवंतांना संमेलनं कसा न्याय देतील या दृष्टिनं विचार झाला पाहिजे. 

असं झालं तरच संमेलनाध्यक्ष तीन दिवसाचा गुळाचा गणपती वाटणार नाही. साहित्य संस्थांविषयी लोकांच्या मनात प्रेमभाव निर्माण होईल. साहित्यिकांविषयी आदर वाटेल! आणि नाही झाले तर शंभरीकडं वाटचाल करणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शंभरी भरेल हे नक्की!
घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
चलभाष - 7057292092

Monday, January 8, 2018

चला, माणूस होऊ या!



पुण्यात नुकतीच ‘एल्गार’ परिषद झाली. 
‘एल्गार’ म्हणजे काय?
...तर ‘बेसावध क्षणी शत्रूवर केलेला आकस्मिक हल्ला’ म्हणजे ‘एल्गार’!
मग आता या परिषदेचं आयोजन नेमकं कोणी केलं होतं? त्यांचे शत्रू कोण? आणि त्यांच्याविरूद्ध एल्गार पुकारण्यासारखं काय घडलं?
तर याचंही उत्तर सोपं आहे.
आपल्या राज्यात आणि देशात मोठं सत्ता परिवर्तन घडलं. नव्या सत्ताधार्‍यांच्या विरूद्ध केलेला ‘हल्लाबोल’ म्हणजे हा ‘एल्गार!’
कोणी याला ‘हल्लाबोल’ म्हणतं तर कोणी ‘एल्गार!’
फक्त शब्दातच काय तो बदल! भावना मात्र त्याच! 
त्यात विरोध आला, द्वेष आला, सूड आला!!
मग हा सूड उगवण्यासाठी पुढाकार कोण घेणार?
युद्धात ‘मास्टर माईंड’ कोणीही असू द्यात; काही प्यादे मात्र पुढं करावे लागतात. 
ते लढतात, लढवतात, मरतात, मारतात! 
महाराष्ट्रातल्या या ‘रणभूमी’त यांनी पुढं केलं ते गुजराती आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांना! 
जिग्नेशला कॉंग्रेसचा जोरदार पाठिंबा! 
आणि हो! बरोबर ओळखलंत... खालीद तोच! 
त्यानंच वेळोवळी देशविघातक भूमिका घेऊन दहशतवाद्यांना, देशद्रोह्यांना सातत्यानं मदत केलीय. अफजल गुरूच्या समर्थनार्थ उभं असताना ‘भारत तेरे तुकडे होंगे...’ अशा घोषणा देणारा हा उमर!
जिग्नेशला निवडणुकीसाठी ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनांनी अर्थसाह्य केल्याचे फोटोही मध्यंतरी ‘व्हायरल’ झाले होते.
मग या मंडळींनी पुण्यात शनिवारवाड्यावर झालेल्या या परिषदेत सहभाग घेतला. त्यांना म्हणे ‘पेशवाई’ संपवायचीय.
यांची भूमिका म्हणे ‘धर्मनिरपेक्ष’ असते. 
ब्राह्मणांना झोडपणे म्हणजे यांचे पुरोगामित्व! 
आणि जात-पात न मानण्याचं आवाहन करत, मुख्यमंत्र्यांची जात काढत, त्यांच्या नेतृत्वाला ‘पेशवाई’ ठरवणं ही यांची जातीनिरपेक्ष भूमिका!
सध्या देश ‘गुजराती’ लोकांच्याच हातात आहे. मोदी असोत किंवा शहा! या नेत्यांसोबत संघर्ष करणं येरागबाळ्याचं काम नाही. 
पराक्रमाची परंपरा सांगणार्‍या अनेकांनी त्यांच्यापुढं नांग्या टाकून सपशेल शरणागती पत्करलीय.
मग यांना कन्हैयाकुमार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी असे ‘प्यादे’ लागतात! अल्पावधीत कॉंग्रेस गवतासारखे उगवलेेले हे कर्तृत्वशून्य लोक यांचे ‘नेते’ झाले. म्हणून त्यांची सर्वप्रकारची बडदास्त राखणं हे पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍यांचं कर्तव्यच! 
या जिग्नेशचा आवाका तो केवढासा?
परावलंबी बांडगुळाची वाढ तशी फारशी होत नसतेच! 
त्यामुळं शनिवारवाड्यावर होणार्‍या या एल्गार परिषदेकडं माध्यम प्रतिनिधींपैकी कोणी फारसं फिरकलं नाही.
आपापल्या विचारधारा पुढं दामटत सुरू असलेलं हे सरळसरळ राजकीय युद्ध आहे.
त्यातून चांगलं काही घडेल अशी अपेक्षा ठेवताही येणार नाही.
द्वेषाच्या पायरीवर उभारून कधी क्रांती घडत नसते. त्यामुळं एकमेकांशी संवाद साधायला हवा. 
मात्र असा संवाद साधला तर यांच्या स्वार्थाची पोळी भाजली जाणार नाही. त्यामुळं यांनी सुरू केलं द्वेषाचं राजकारण!
या जिग्नेशच्या विकृत मनोवृत्तीची आणि आगलाऊ स्वभावाची कल्पना असल्यानं एक युवक या परिषदेला गेला. 
अक्षय बिक्कड हे त्या विचारी तरूणाचं नाव! 
अक्षयचे काही लेख आपण यापूर्वी ‘चपराक’च्या अंकात वाचले आहेतच. मागच्या म्हणजे डिसेंबर 2017 च्या ‘चपराक’ मासिकाची मुखपृष्ठ कथाही त्याचीच होती. यापूर्वी त्यानं आणि त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन ‘पारंबी’ या दिवाळी अंकाचं संपादन केलं होतं.
अक्षयनं जिग्नेशचं सर्व भाषण ऐकलं. ते संपूर्ण भाषण रेकॉर्डही केलं. त्यात जिग्नेशने आणि एल्गार परिषदेच्या आयोजकांनी उपस्थितांची माथी भडकवली. अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरत ‘दोनशे वर्षापूर्वीच्या पेशवाईच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची’ अपेक्षा व्यक्त केली. 
गेली वर्षभर त्यांचं हे नियोजन सुरू होतं. 
1 तारखेला कोरेगाव भीमाला काहीतरी विध्वंसक घडणार हे अक्षयनं गेल्याच आठवड्यात त्याच्या फेसबुक पेजवर स्पष्टपणे नोंदवलं होतं. त्याविषयी एकानं लिहिलेल्या पुस्तकातील एका पानाची प्रतही त्यानं शेअर केली होती. मात्र तिकडं कोणीच लक्ष दिलं नाही.
धोक्याची पूर्वसूचना मिळूनही काहीच कारवाई न करणारे बघे हे सुद्धा आपल्यापुढचं मोठं संकटच आहे. 
अक्षय हे भाषण रेकॉर्ड करून थांबला नाही. त्यानं जिग्नेश आणि खालिद यांच्याविरूद्ध अधिकृत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला आणि अनेक माध्यमे खडबडून जागी झाली.
हे रेकॉर्डिंग कुणाकडंच नव्हतं. त्या परिषदेला माध्यम प्रतिनिधींपैकी कुणी उपस्थितही नव्हतं.
अशा गढूळ वातावरणात तडफडत राहण्याऐवजी अक्षयनं कृतिशिलता दाखवली. त्याची सर्वत्र दखल घेतली गेली. आंबेडकरी बांधवांपुढं भडक भाषणं देऊन ही सर्व गँग निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांच्या बंगल्यावर 31 डिसेंबरची पार्टी साजरी करत होती हे अक्षयनं मांडलं. 
कोरेगाव भीमाला जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. मात्र अशा ‘द्वेष निर्मिती कारखान्याचे’ काय? संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर ऍट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. खरेच यात त्यांची काही भूमिका होती का? किंबहुना असे काही घडविण्याची त्यांची क्षमता तरी आहे का? हे सर्व यानिमित्त पडताळून पाहिलं पाहिजे.
उमर खालिद म्हणाला, ‘‘1808 च्या लढाईचा इतिहास आपल्याला पुन्हा घडवायचा आहे. आजची लढाई ही संविधानिक मार्गाने होणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल...’’ म्हणजे तुम्हाला पुन्हा सशस्त्र लढाई करायची आहे का? कोरेगाव भीमाला जे घडले त्यात अशा वक्तव्याचा काहीच वाटा नाही?
या सर्व प्रकारानंतर अक्षयची जात शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर झाले. त्याची काहीच पाश्वर्भूमी न कळल्यानं अनेकजण बिथरले. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर आमदार कपिल पाटील यांनी अक्षयला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करत ‘भाजपनं योग्य माणसाची नेमणूक करावी’ अशी अक्कल पाजळली. अक्षयसारख्या तरूणाच्या सतर्कतेवर असे आक्षेप घेणं आणि त्याची कुणाकडून तरी ‘निवड’ झालीय म्हणणं हास्यास्पद आहे. अशी निवड फक्त कॉंग्रेसमध्ये होऊ शकते. राहुल गांधी यांच्या निवडीनं त्यांनी ते सिद्धही केलं आहे. अक्षय बिक्कड हा आमचा फक्कड मित्र अशा कुणाच्या ‘निवडी’तून पुढे येणार्‍यापैकी नाही.
महत्त्वाचं म्हणजे याच कार्यक्रमात समर महंमद खडस नावाच्या एका पत्रकारानं बराच आरडाओरडा केला. अक्षयचं धाडस त्यांना चांगलंच झोंबलं होतं. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी यापूर्वीच ‘स्मार्ट मित्र नव्हे; पिसाळलेलं कुत्रं’ असं ठामपणं लिहित खडस यांची ओळख करून दिली होतीच. ‘‘जिग्नेश यांचं भाषण ऐकून आंबेडकरी जनतेनं ही दंगल केली का?’’ असा एकच प्रश्‍न खडस विचारत होते. याचं उत्तर अक्षयनं नाही तर तपास यंत्रणांनी द्यावं. यात मेलेला मात्र दलित नव्हता इकडं आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही.
‘‘तुम्ही काय एकट्यानं भाषण ऐकलं का?, आम्ही तुमचं कीर्तन ऐकायला बसलोय का? आँ....!!, तुम्हाला इंटरप्रिटेशन काय कळतं?, तुमचं वय, अनुभव काय? तुम्ही बोलताय का?’’ असे अनेक बालीश प्रश्न विचारून खडस यांनी पुरोगामित्वाचे चेहरे आणि मुखवटे दाखवून दिले. जगातले सगळे प्रश्न केवळ आपल्यालाच कळतात आणि त्याची उत्तरंही आपणच देऊ शकतो अशा ढोंगी आविर्भावात ही मंडळी असतात.
‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे नारे देणारे आज देशभक्तीचा आव आणत आहेत आणि खर्‍या देशभक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. यांचे बुरखे फाडण्यासाठी अक्षयप्रमाणेच अनेक तरूणांनी पुढं येणं गरजेचं आहे. अक्षयसारख्या तरूणांचा आवाज दाबणं कुणाच्याही तीर्थरूपांना शक्य नाही; कारण ही तरूणाई कुणालाच बांधील नाही. त्यांचं सामाजिक भान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी असायला हवं. या सगळ्या प्रकारात अक्षय एकटाच असला तरी त्याच्या प्रामाणिकपणासोबत आपण सर्वांनी ठामपणं उभं रहायला हवं. त्यानं एकट्यानं जे पाऊल टाकलंय त्याला बळ देत आपण तो एकटा नाही हे सिद्ध करायला हवं. हे आपलं सामाजिक कर्तव्यच आहे.
कोरेगाव भीमाचा इतिहास या अंकात या विषयाचे अभ्यासक संजय क्षीरसागर यांनी दिला आहेच. ‘मिथकप्रियतेचे बळी’ या लेखातून संजय सोनवणी यांनीही भाष्य केलंय.
जातीपातीला खतपाणी घालणारे, त्यावर राजकारण करणारे इतर पक्षाला ‘जातीयवादी’, ‘हिंदुत्ववादी’, ‘धर्मवादी’ अशी बिरूदं लावून मोकळे होतात. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेता लेखक जातीसंस्थेचं समर्थन करतो तेव्हा त्यांच्या पाठिशी उभे राहणारे, विविध जातींच्या आरक्षणासाठी मागच्या कित्येक वर्षात समाजासमाजात फूट पाडणारे, जातीजातीचे मेळावे घेऊन द्वेष पेरणारे जातीअंताची भाषा करतात. इतरांना वेगळे ठरवून भांडणं लावतात, कोेरेगाव भीमासारख्या दंगलीही पेटवतात. 
महाराष्ट्रातले नेते शरद पवार यांनी ‘आधी पेशव्यांची निवड व्हायची, आता पेशवे निवड करतात’ असे भाष्य केलेच होते. ब्राह्मण समाजाविरूद्ध रोष निर्माण करून अशा नेत्यांनी मराठ्यांना भडकवले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही हे लक्षात आल्यावर दलितांना चिथावणी दिली. खरंतर ब्राह्मण, मराठा, दलित अशा वर्गवारीत न अडकता आपण माणूस म्हणून एकत्र यायला हवं. असं झालं तर यांचं पोट कसं भरणार? यांची दुकानदारी चालू ठेवायची तर द्वेषाला खतपाणी घालण्याला पर्याय नाही.
याच कोरेगाव भीमाला शरद पवारांच्या कारकिर्दीत कशी दंगल झाली होती? मुंबई बॉम्बस्फोटांची साखळी मालिका कशी झाली? पवारांसोबत विमानातून कोण कोण गुन्हेगार पळाले हे सारे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाही. संभाजी ब्रिगेडसारख्या विघातक संघटनांना कृतिशीलतेतून संपवण्यासाठी एक संभाजी भिडे गुरूजी पुढं आले आणि यांची सटकली. त्यांनाच ते ‘दहशतवादी’ ठरवून मोकळे! 
गेल्या काही वर्षात आपल्या जातीय अस्मिता कमालीच्या टोकदार झाल्यात. बरं, या कोणत्याही जातीतील बांधव एकत्र येऊन फार काही विधायक घडवतात, संघटित होऊन सकारात्मक पेरतात असेही नाही. केवळ इतरांचा द्वेष करणे आणि आपल्या नसलेल्या श्रेष्ठत्वाचे गोडवे गाणे हेच यांचे इतिकर्तव्य झाले आहे. 
शिक्षण, विज्ञान यातून सुसंस्कृत होण्याऐवजी आपण पुन्हा रानटी होत चाललो आहोत. हे थांबवायचं असेल तर स्वतःपासून सुरवात करायला हवी. जे झाले ते झाले. ते आपल्याला बदलता येणार नाही. यापुढं तरी आपण आपल्या भल्याचा विचार करायला हवा. नव्या पिढीपुढं काही चांगले आदर्श ठेवायला हवेत. त्यांच्या मनात प्रेम आणि बंधुत्वाची रूजवात करायला हवी. अनेक महापुरूषांनी, संतांनी आपल्या माणुसकीची जी शिकवण दिलीय त्याचा अंगिकार करायला हवा. ‘माणूस’ होण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी. वानराचा नर झालाय, आता नराचा नारायण व्हायला हवा. पुन्हा पशुत्वाकडं जाणं बरं नाही.
या प्रक्रियेत म्हणूनच अक्षय बिक्कडसारख्या धैर्यवान तरूणांची गरज आहे. असा बेडरपणा सगळ्यात आला पाहिजे. जे चांगले ते स्वीकारायला हवे. वाईट ते अव्हेरायला हवे. घटना कितीही लहान असू द्या किंवा मोठी! आपण नेहमी सत्याची कास धरायला हवी. किमान त्या वाटेनं जे कोणी जात आहेत त्यांच्या पाठिशी तरी भक्कमपणे उभं रहायला हवं. म्हणून अक्षय आम्ही तुझ्या सोबत होतो, आहोत आणि भविष्यातही राहू, इतकंच! सूज्ञास अधिक सांगणे न लगे!
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२