आपल्याकडे अखिल भारतीय साहित्य महामंडळ नावाची एक संस्था आहे. या संस्थेचं काम काय? तर नको तिथं लुडबुड करत राहणं आणि साहित्यिक व्यासपीठावरून मिरवून घेणं. याचं अध्यक्षपदही ‘फिरतं’ असतं. म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद इकडं तीन-तीन वर्षासाठी हे पद दिलं जातं. तिथल्या घटक संस्थांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष महामंडळाचे अध्यक्ष होतात. म्हणजे हे त्या द्रौपदीसारखं! तिला पाच नवर्यांसोबत संसार करावा लागायचा. या महामंडळाचे बदलते अध्यक्ष तीन-तीन वर्षे कारभार पाहतात. देशाच्या राजकारणात राष्ट्रपतींचं जे स्थान असतं तेच स्थान साहित्य संस्थात महामंडळाच्या अध्यक्षांचं असतं. फक्त रबरी शिक्का! नाही म्हणायला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात यांना थोडंफार डोकावता येतं पण ते तितक्यापुरंतच! इतर वेळी यांना कुणी विचारत नाही.
सध्या नागपूरचे श्रीपाद भालचंद्र जोशी या साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जोशींचं चरित्र आणि चारित्र्य स्वच्छ आहे. राहणीमान साधं आहे. सगळ्यात मिळून मिसळून असतात. दलित, वंचित, उपेक्षित, शोषित वर्गासाठी त्यांच्या मनात कळवळा आहे. ‘जोशी’ असूनही त्यांनी बहुजनांसाठी योगदान दिलंय. श्रीपाद जोशी काय किंवा आमचे पत्रकार मित्र प्रसन्न जोशी काय! या लोकांनी सातत्यानं सर्वसमावेशक भूमिका घेतलीय! पण यांचं ‘जोशी’ आडनाव मध्ये येतं. अनेकांना ते खुपतं. तरीही ही मंडळी निराश झाली नाहीत. त्यांचं काम त्यांनी सुरूच ठेवलंय. असं जरी असलं तरी काहीवेळा खुर्चिचं पाणी लागतंच असं म्हणतात. श्रीपाद जोशी यांच्याबाबतही असंच काहीसं झालं असावं. सध्या गडी लयीच बेफाट सुटलाय. वाटेल ती विधानं करणं आणि चर्चेत राहणं हा यांचा धंदा झालाय.
नागपूरमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात नुकताच एक बहुभाषिक मेळावा झाला. या मेळाव्यात किती भाषिक आले होते माहीत नाही पण उपस्थिती जेमतेमच! त्यामुळं जोशींचा पारा चढला. तो राग त्यांनी मराठी प्राध्यापकांवर काढला. ते म्हणाले, ‘‘मराठी भाषेसंदर्भात परिसंवाद, चर्चासत्र वारंवार होतात पण मराठीचे प्राध्यापक तिकडे फिरकत नाहीत. मराठी भाषेबद्दल त्यांना आत्मियता राहिली नसून लाख-दीड लाख रूपये पगार मिळत असल्यामुळे गरजा संपलेल्या आहेत. त्यांचे पगार तीस-चाळीस हजारांवर आणले तर हे सगळे मराठी भाषेच्या प्रचारासाठी कंबर कसतील...’’
जोशी प्राध्यापकांच्या पगारावर घसरल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. प्राध्यापकांना पगार शिकवण्याचा मिळतो की साहित्यिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा? अशा कार्यक्रमांना त्यांनी उपस्थित रहावं ही अपेक्षा आहे की दंडक? विविध महाविद्यालयांनी, शिक्षणसंस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना साहित्य संस्थांचे पदाधिकारी मानधन न घेता उपस्थित राहतात का? बरं, ते राहू द्या! प्राध्यापकांच्या उपस्थितीचं नंतर बघू... या अशा भुक्कड साहित्य संस्थांचे जे सभासद आहेत ते तरी या कार्यक्रमाला येतात का? किमान या कार्यक्रमांची माहिती सदस्यांपर्यंत तरी जाते का? त्यांच्याच संस्थांचे साहित्यिक असलेले किंवा म्हणवून घेणारे सदस्य जर अशा कार्यक्रमांना येत नसतील तर यांनी प्राध्यापकांकडून का अपेक्षा ठेवाव्यात? प्राध्यापकांच्या बौद्धिक विकासासाठी, त्यांच्या साहित्यिक अभिरूचीसाठी साहित्य महामंडळाने आजवर काही उपक्रम राबवलेत का? मग केवळ ते तुमच्या कार्यक्रमाला येत नाहीत म्हणून त्यांचे पगार कमी करा असे फर्मान काढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
श्रीपाद जोशी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून महामंडळाच्या कोषासाठी अनेकांकडे पदर पसरत आहेत. दहा रूपयांपासून कितीही रक्कम मदत म्हणून द्या, अशी गळ घालत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्राध्यापकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसावा! म्हणून तर हा पोटशूळ नाही ना? नाहीतर यांच्या पगारावर घसरण्याचं काय कारण?
ते म्हणतात, ‘‘मी दहा घटक संस्थांचा ‘क्षीण’ अध्यक्ष आहे. मला कोणतेच अधिकार नाहीत!’’ असं जर आहे तर मग अशी विधानं का करता? तुम्हाला तुमचे अधिकार मिळावेत यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. सातत्यानं मागणी होऊनही अखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक होत नाही. साहित्य संस्थांच्या सदस्यांनाही संमेलनात मतदानाचा अधिकार मिळत नाही. महामंडळानं जे उपक्रम प्रयत्नपूर्वक तडीस नेले ते रसिक-वाचकांपर्यंत पोहचवता येत नाहीत. मग तुम्ही असे तारे का तोडताय?
डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात हेच जोशी म्हणाले होते की, ‘‘साहित्य संमेलनात प्रकाशकांनी पुस्तक विक्रीची अपेक्षा ठेवू नये. हे केवळ प्रदर्शन असते. त्यामुळे प्रकाशकांनी एक-एक प्रत आणावी, ती दाखवावी आणि परत न्यावी...’’ अरे फोकणीच्या, हे जर फक्त ‘प्रदर्शन’ आहे तर ‘ग्रंथ विक्री आणि प्रदर्शन’ असे सांगून आमच्यासारख्या प्रकाशकांकडून ग्रंथ दालनाचं अवाच्या सव्वा भाडं कशाला घेता? केवळ तुमच्या तुंबड्या भरायच्या? आमच्याकडून जमलेल्या पैशातून तुम्ही पंचतारांकित हॉटेलात वास्तव्य करायचे, सगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण करून घ्याायच्या, प्रसंगी आयोजकांना मेटाकुटीला आणायचे आणि वर अशी विधानं करायची? जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा रे!
श्रीपाद जोशी यांनी मराठीच्या प्राध्यापकांच्या घसरत चाललेल्या सांस्कृतिक अभिरूचीविषयी, त्यांच्या राजकीय सहभागाविषयी, विद्यार्थ्यांवर विविध विचारधारा लादण्याविषयी, त्यांनी हातात घेतलेल्या संशोधन कार्याविषयी, पीएच.डीच्या बाजाराविषयी, पैसे भरून भरती झालेल्या प्राध्यापकांविषयी, त्यांच्या वाचनाविषयी, लेखनाविषयी काही भाष्य केलं असतं तर त्यावर एकवेळ चर्चा होऊ शकली असती. इथं मात्र ते थेट त्यांच्या पगारावरच जातात आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचं समर्थन करता येणार नाही. अशा कुण्या जोश्यानं सांगितलं म्हणून प्राध्यापकांचे पगारही कमी होणार नाहीत. तो अधिकार अशा लोकांकडं नाही; पण यातून त्यांची द्वेषमूलक भूमिका मात्र दिसून येते.
आज प्राध्यापकांना कितीतरी अशैक्षणिक कामं करावी लागतात. ‘रात्र थोडी आणि सोंगं फार’ अशी त्यांची अवस्था झालीय. विविध कमिट्या, सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम यात ते व्यग्र असतातच. केवळ साहित्य महामंडळासारख्या संस्थाकडं ते फिरकत नाहीत म्हणून त्यांचं साहित्यिक योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. अनेक ठिकाणी तर महाविद्यालयं राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि त्या त्या नेत्यासाठी प्राध्यापकांना सगळी कामं सोडून जीवाचं रान करावं लागतं. हे चित्र थांबवण्यासाठी जोशीबुवांकडं काही योजना आहेत का? विनाअनुदानीत तत्त्वावरील प्राध्यापकांची अवस्था तर ‘भीक नको, कुत्रा आवर’ अशी झालीय. त्यांच्या पोटापाण्यासाठी महामंडळ काही करू शकेल का?
एक प्रातिनिधिक उदाहरण द्यावंसं वाटतंय. उदगीर येथील आमचा मित्र प्रा. रामदास केदार! अत्यंत गुणवान कवी, लेखक, समीक्षक! त्याच्या कवितांची दखल दस्तुरखुद्द विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर अशा दिग्गजांनी घेतलीय. विंदा रूग्णालयात असताना म्हणाले होते, ‘‘आता या वयात माझी आई माझ्याजवळ नाही. ती कधीच देवाघरी गेलीय; पण रामदासची ‘मराठवाड्याची आई’माझ्या उशाला आहे. त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो.’’ रामदास केदारनं मराठवाड्यातील कवींच्या ‘आई’विषयक कवितांचं संकलन केलं होतं आणि विंदांनी त्याची अशी दखल घेतली होती. हा गुणी लेखक उपेक्षेचं आयुष्य जगतोय. विनाअनुदानीत तत्त्वावर गेली कित्येक वर्षे प्राध्यापक म्हणून काम करतोय. त्याच्या महाविद्यालयातल्या शिपायालाही त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळतोय... श्रीपाद जोशी यांच्याविषयी काही बोलणार आहेत का?
मराठीच्या प्राध्यापकांचं अवांतर वाचन, त्यांची साहित्यिक अभिरूची कमी झालीय हे तर खरंच. काही अपवाद वगळता अनेक प्राध्यापकांनी सातत्यानं भाषेचे खूनच केलेत. या लोकांकडं किमान दोन मराठी मासिकं येत नाहीत, यातच सगळं आलं... पण म्हणून त्यांचे पगार काढू नयेत. हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे आणि तो आपण मान्य करायला हवा. साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या ‘गुळाच्या गणपती’ला एवढं भान तरी असावंच असावं!
जोशी, तुमचा हा पाद दुर्गंधीयुक्त आहे. यामुळं वातावरण कलुषित होतंय. साहित्य संस्थांविषयी लोकांच्या मनात जिव्हाळा निर्माण होण्याऐवजी ते आणखी दूर जात आहेत. मराठीच्या आणि इतरही प्राध्यापकांनी साहित्य संस्थाकडं, साहित्याकडं फिरकावं असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर अशी अविवेकी, द्वेषपूर्ण, संकुचित विधानं करू नकात. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. साहित्य संस्थांची गमावलेली प्रतिष्ठा, त्यांची विश्वासार्हता परत मिळवायचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. गेल्या चाळीस वर्षात अनेकांनी तुमची धडपड बघितलीय. तुमची जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष भूमिका, तुमच्यातला हाडाचा सच्चा कार्यकर्ता, पत्रकार, कवी वाखाणण्याजोगा आहे. शरद पवारांसारखा महानेताही उतारवयात जशी बेताल विधानं करतो तसं तुमचं होऊ देऊ नकात. तुम्ही साहित्यिक आहात. त्यामुळं आयुष्यभराची साधना असं वाटेल ते बोलून घालवू नकात.
मागं श्री-पाल नावाचे एक संमेलनाध्यक्ष म्हणाले होते, ‘‘मोदी तिकडं पाकिस्तानात कशाला बोंबलत फिरतोय?’’ आणखीही बरीचशी आक्रस्ताळी विधानं त्यांनी केली होती. यंदाचे संमेलनाध्यक्ष देशमुख म्हणाले, ‘‘राजा, तू चुकतोस रे...’’ आणि महामंडळाचे अध्यक्ष म्हणतात, ‘‘प्राध्यापकांचे पगार कमी करा...’’ मराठी माणूस हे सगळं अजूनही खपवून घेतोय पण त्याचा अंत पाहू नकात. तुम्ही साहित्यिक आहात तर साहित्यावर बोला. तुमच्यामुळं चार लेखक जरी नव्यानं पुढं आले तर तेच तुमचं ‘सांस्कृतिक संचित’ असणार आहे. तिकडं लक्ष न देता अशी दर्पोक्ती करत राहिलात तर तुम्हाला कुणी ढुंकूनही विचारणार नाही. कितीतरी आले, गेले... त्यातले तुम्ही एक होऊ नकात म्हणजे झाले. सूज्ञास अधिक सांगणे न लगे!!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092
मस्त .. नेमकी चपराक .. नेमक्या जागी... चपराकचा आवाज घुमणारच...
ReplyDeleteधन्यवाद सर.
Deleteआपला लेख आणि सल्ला दोन्ही आवडले.
ReplyDeleteआपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शक्य तितका प्रयत्न करेन.आपले सहकार्य देखील त्यासाठी अपेक्षित आहे.
आपल्या भावना व सद्भावना दोन्ही बद्दल आदर व्यक्त करीत आपला आभारी आहे.
आपण उपस्थित केलेल्या साहित्य संस्था व त्यांच्या व्यवहाराबद्दल गेली चार दशके व्यापक अर्थाने खरे तर आपलीच भूमिका घेऊन उभा आहे. मात्र ती भूमिका इकडे मान्य असते असे समजण्याचे कारण नाही.
महामंडळ व्यापक व्हायला हवे म्हणून विचाराधीन असलेली घटनादुरूस्ती सर्वांना मान्य होईस्तो ते केवळ मी, आपण व आपल्यासारखे लोक म्हणतात एवढ्याने
होणार नाही. दुरुस्ती मांडली म्हणून ती मान्य होईलच या भ्रमात मी स्वत:ही नाही.
गेली चार दशके ते व्यापक करण्याची भूमिका सातत्याने मांडत आलो आहे.
काय होईल वा नाही ते कोणत्याही संस्थेत एकट्याच्या हाती नसतेच.
आपण ते निष्ठेने मांडतो की नाही हे महत्वाचे.
साहित्य संस्था, साहित्य व्यवहार या बद्दल गांभीर्याने चर्चा सातत्याने व्हायलाच हव्यात.मुळात
आपणासारख्यांनी या संस्थांचे मोठ्या प्रमाणावर सदस्य व्हायला हवे, तरच आपल्या मतांचा दबाव तिथे वाढेल.
या संस्थांच्या व्यवहारात बदल अपेक्षित असल्यास त्यात परिवर्तनाचा तोच एकमेव मार्ग आहे.
आपोआप आपल्या अपेक्षांची पूर्ती होणारच नाही.
आपण उपस्थित केलेले अन्य मुद्देही तितकेच महत्वाचे आहेत व त्याबद्दलही माझी भूमिका आपणासोबत व्यापक सहमतीचीच आहे.
त्या मुद्द्यांवरही खरेतर गांभीर्याने एखादे चर्चासत्र होउ शकते.
आपल्या साप्तहिकाने ते घ्यावे, महामंडळ देखील घेऊ शकेल, मसाप ला सोबत घेऊन संयुक्तपणेही घेता येईल.
भाषा, साहित्य ,संस्कृती कार्यात साऱ्याच घटकांनी सारख्याच उत्साहाने समरसून सहभागी होणे एवढेच उद्दिष्ट आहे.
----श्रीपाद भालचंद्र जोशी
मनःपूर्वक धन्यवाद सर.
Deleteआपण खूपच सकारात्मक घेतले याचा आनंद वाटला.
काहीतरी विधायक आणि भरीव घडायला हवे यासाठी आम्ही आग्रही असतो. महामंडळाने पुढाकार घेतल्यास खूप काही करता येईल. पूर्वग्रह आणि नकारात्मकता दूर सारली तर अनेक उमलते अंकुर सशक्तपणे पुढे येऊ शकतात.
आपण जो प्राध्यापकांच्या पगाराचा उल्लेख केला आहे, त्या बद्दल थोडे लिहायला हवे होते असे मला वाटते.
Deleteलेख उत्तम .... पण भावनेच्या लेखन ओघात आपणही कांही असंस्कृत शब्द वापरले . त्त्यामुळे या लेखाची उंची कमी झाली .
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Deleteमी कोणतेही लेखन भावनेच्या भरात करत नाही. त्यामुळे त्याची उंची, लांबीही मोजत बसत नाही.
महत्त्वपूर्ण लेख !
ReplyDeleteधन्यवाद सर!
Deleteसाक्षेपी लेख आणि तेव्हढेच सकारात्मक उत्तर !
ReplyDeleteदोहोंचा समन्वय साधला गेला आणि सक्रिय मंथन झाले तर निश्चितच साहित्य-अमृत बाहेर पडेल.
धन्यवाद नानासाहेब.
Deleteआपण परखड आणि वास्तव भूमिका मांडली. एका महत्त्वाच्या पदावर बसून आपण केले, करत आहोत आणि करणार आहोत हे सांगणे महत्त्वाचे.आपल्या व्याख्यानाला किंवा महामंडळाच्या उपक्रमांना लोक येत नाहीत, याचेही आत्मचिंतन आवश्यक आहे.इतरांच्या पगारावर बोलण्याचा हक्क नाही हो तुम्हाला... कोण किती कष्टातून आलाय, किती प्रामाणिक काम करतोय, शिक्षणव्यवस्थेत सध्या काय घडतंय याचं भान आपणास नाही म्हणून आपण असं म्हणालात जे पूर्णतः चूक आहे. आपल्यासारखे सर्वज्ञ,तज्ज्ञ आहेत तोपर्यंत महामंडळाचे काही खरं नाही असं दिसतंय. चांगले नावीन्यपूर्ण व सर्वसमावेशक उपक्रम घ्या अन् बघा मराठीचे प्राध्यापक तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे असतील.
ReplyDeleteसाहित्यिकानी फक्त साहित्यावरच बोलावे का? शिक्षणाचा घसरत चाललेला दर्जा यावरही आपण लिहायला हवे.
ReplyDeleteसणसणीत चपराक
ReplyDeleteमा. घन:श्याम पाटील साहेब,
ReplyDeleteआपण योग्य व नेमक्या शब्दात अतिशय संयमाने लिहिले आहे. आपले हार्दीक अभिनंदन!
मा.शरद पवार, डॉ.श्रीपाल सबनीस व देशमुख यांच्या बद्दल ओझरता उल्लेख करुन आपली भूमिका प्रभावी केलीत. पुन:श्च अभिनंदन ! 💐💐💐