आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या मातीचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. महापुरूषांची अवहेलना हाही युगानुयुगे चालत आलेला विषय! म्हणूनच अनेक प्रतिभावंत कायम दुर्लक्षित राहतात. त्याउलट ज्यांची काहीच योग्यता नाही त्यांना मात्र आपण अनेकदा अकारण डोक्यावर घेऊन नाचतो. लोककवी मनमोहन यांच्या भाषेत सांगायचे तर,
‘‘येथे स्मारके बांधली जातात
कालच्या गझल-कव्वालीवाल्यांसाठी
आणि त्याच डांबरी रस्त्याने
उद्याचा कालिदास असलेला मनमोहन जातो
अनवाणी पायाने
आणि म्हणतो भुरट्या संपादकाला
घेतोस का पाच रूपयांना कविता?
शरम तुला हवी समाजा,
जन्माचे कौतुक
ताटीवर पाय ताणल्यावर का तू करणार?’’
हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी!
कोण आहे हा माणूस? काय केले नाही या माणसाने?
ते मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की, ज्यांची पुस्तके अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये ‘संदर्भ पुस्तक’ म्हणून ठेवण्यात आली. त्यांनी पुस्तकांची शंभरी गाठलीय. त्यात जवळपास 85 कादंबर्या आहेत. जातीसंस्थेचा इतिहास आहे. हे झाले प्रकाशित पुस्तकांचे! अप्रकाशित असलेल्या, अर्धवट लिहिलेल्या अशा कादंबर्या तर त्यांच्या घरात किती मिळतील हे त्यांनाही सांगता येणार नाही. साहित्याची थोडीफार आवड असणार्यांनी त्यांच्या घरी जाऊन एकदा खोदकाम केले पाहिजे.
संजय सोनवणी यांच्याविषयी अनेकांचे मतभेद असतील. ते असावेत. किंबहुना माझेही आहेत. मात्र हा माणूस अतिशय निरागस आहे. निरागसता आणि बुद्धिमत्ता यांचा संगम त्यांच्या ठायी असल्याने त्यांचे माणूस म्हणून असलेले चांगूलपण आपण नाकारू शकत नाही.
त्यांच्या कादंबरीचा नायक चिनी पंतप्रधानांच्या मुलीशी प्रेम जुळवतो, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करतो, मृत्युनंतर ‘कल्की’ बनून जगावर लक्ष ठेवतो, संपूर्ण महाभारत उलटे करतो, छत्रपती संभाजीराजांच्या अटकेपासून हत्येपर्यंतच्या 39 दिवसांचे प्रभावीपणे वर्णन करतो, पानिपतच्या लढाईचे ‘संजया’प्रमाणे वर्णन करतो, अखेरचा हिंदू सम्राट कुमारपालच्या इतिहासाची दखल घेतो, मराठीत प्रथमच ‘क्लिओपात्रा’ ठामपणे मांडतो आणि राजीव गांधींच्या हत्याकांडाची ‘मृत्युरेखा’ही उलगडून दाखवतो. एक-दोन नाही तर तब्बल 85 कादंबर्या त्यांनी लिहिल्या. त्या कादंबर्यांच्या विषयांचा आवाका जरी बघितला तरी सोनवणी यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास वेगळे काही सांगावे लागणार नाही.
या महान कादंबरीकाराने अनेक कथाही तितक्याच ताकदीने लिहिल्या. त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा कथासंग्रह आणि भाषेचे संशोधन आणि अभ्यास करणार्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणारे ‘भाषेचे मूळ’ ही पुस्तके आम्ही ‘चपराक’ तर्फे प्रकाशित केली आहेत. आता त्यांच्या काही कादंबर्या आम्ही पुन्हा वाचकांच्या भेटीस आणत आहोत.
त्यांनी ‘दहशतवादाची रूपे’, ‘भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य’, ‘कार्पोरेट व्हिलेज’, ‘महार कोण होते?’ अशा वेगळ्या विषयांवरील पुस्तकेही लिहिली. महाराजा यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्यावर विपुल लेखन केले. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची ओळख मराठी माणसाला करून दिली. सिंधू संस्कृतीचा इतिहास मांडला. घग्गर नदीवर संशोधनात्मक लेखन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले. इतक्यावर थांबतील तर ते संजय सोनवणी कसले? त्यांनी ‘पुष्प प्रकाशन’ची स्थापना करून अनेक अस्सल पुस्तके प्रकाशित केली. कित्येकांना लिहिते केले आणि लेखक म्हणून सन्मानही प्राप्त करून दिला.
प्रारंभी म्हटल्याप्रमाणे या माणसाने काय केले यापेक्षा काय केले नाही? असा प्रश्न होऊ शकतो. त्यांनी अमेरिकेत कंपनी सुरू केली. जम्मू काश्मीरला जाऊन उद्योग केला. गडचिरोलीत आठ वर्षे पूर्ण तोट्यात कारखाना चालवला. का चालवला? तर त्यांना वाटले, नक्षलवादाला समर्थपणे उत्तर द्यायचे तर आधी त्या लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले पाहिजे. अमेरिकन रेडीओवर मुलाखत दिली. त्यात त्यांना विचारले गेले, ‘जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी देश कोणता?’ भारतीय माणूस या नात्याने त्यांना ‘पाकिस्तान’ असे उत्तर अपेक्षित होते. मात्र यांनी ठामपणे सांगितले की, ‘जगातल्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी देशातून तर मी आता तुम्हाला मुलाखत देतोय.’
अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा वेगवेगळ्या राष्ट्रांवर आजवर मराठीत किती जणांनी असे विपूल लेखन करण्याचे धाडस केलेय? तितका आवाका आणि अभ्यास केवळ संजय सोनवणी यांनी दाखवून दिलाय. म्हणूनच त्यांची पुस्तके इंग्रजीतही ‘बेस्ट सेलर’ ठरली.
संजय सोनवणी यांनी ‘प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी’सुद्धा चालवली. त्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांचा तपास केला. तो लेखनीत उतरवला. मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. अभिनय केला. गाणी लिहिली. संगीत दिले. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरूंगवासही भोगला. व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त होऊनही पुन्हा नव्याने हसत उभे राहिले. जिद्द सोडली नाही.
भूमिका घेणारे लेखक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांनी वाघ्याचे आंदोलन पेटवले. तो पुतळा पुन्हा तिथे बसवायला भाग पाडले.
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर द्वेषातून आरोप सुरू झाले तेव्हा त्यांच्या बाजूने सशक्तपणे लढणारे एकमेव संजय सोनवणी होते. हिंदुत्त्वावादी विचारधारेला विरोध असूनही जे न्याय वाटते तिथे कसलीही अपेक्षा न ठेवता केवळ योग्यायोग्यतेचा विचार करून तटस्थपणे स्वतःला झोकून देणारे संजय सोनवणी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
सोलापूर येथे झालेल्या पहिल्या आदिवासी-धनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी असंख्य व्याख्याने दिलीत. जमेल त्या पद्धतीने सर्वांचे संघटन केले. शेतकरी प्रश्नावर ते तुटून पडतात. ‘ऍट्रॉसिटी कायदा रद्द केला पाहिजे’ म्हणून त्यांनी लढा उभारला. कसलीही पर्वा न करता ते विविध नियतकालिकातून आणि वृत्तवाहिन्यांवरून ठाम भूमिका घेत असतात. आजवर त्यांनी पुस्तकांसाठी म्हणून एकही पुरस्कार स्वीकारला नाही.
एकेकाळी पुण्यात ‘मराठी भाषा मृत्युपंथाला लागलीय का?’ या विषयावर परिसंवाद झाला होता. अजूनही अशी चर्चा सातत्याने होते! पण त्याकाळी इतिहासाचार्य राजवाडे यांनी या चर्चेच्या व्यासपीठावर येऊन ठणकावले, ‘‘अरे, मराठी भाषा मेलीय असे वाटत असेल तर चर्चा कसली करता? तिची तिरडी बांधा आणि स्माशानात नेऊन तिला जाळून टाका! मात्र त्यात थोडीजरी धुगधुगी दिसत असेल तर असे नामर्दासारखे गळे काढत बसू नका. तिच्यात जिद्दीने प्राण फुंका...’’
संजय सोनवणी यांचीही भूमिका अशीच आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांवर फोडले की आपल्याला पापमुक्त झाल्यासारखे वाटते. त्यामुळे संजय सोनवणी कृतिशील आहेत. ते काही बोलत बसत नाहीत. यातच त्यांचे मोठेपण आहे. चांगला विचार देण्यासाठी सत्तेची गरज नसते. नाहीतर स्वामी विवेकानंद सत्तेत गेले नसते का? तसेच काम सोनवणी करत आहेत.
लोककवी मनमोहन यांचा केवळ एक शब्द बदलून त्यांच्याच भाषेत सांगतो,
भविष्यात,
जेव्हा कधी दगडाचे भाव कमी होतील,
तेव्हा,
पुतळा माझा उभारणार्यांनो,
आधी संजय सोनवणी खोदा!!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092