Sunday, July 9, 2017

चांगुलपणा वृद्धिंगत व्हावा!



देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची एक गोष्ट सांगितली जाते. ते तेव्हा कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सेक्रेटरी होते. त्यावेळी त्यांना साठ रूपये महिना मानधन मिळायचे. यावरच त्यांचे घर चालायचे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्याकडे आला. तो म्हणाला, ‘‘माझ्या बायकोची तब्येत अचानक खूप बिघडलीय. तिला दवाखान्यात न्यायचे आहे. त्यासाठी पन्नास रूपये तातडीने उसने द्या!’’

शास्त्रीजींनी ते ऐकल्यावर हतबलता दाखवली. ते म्हणाले, ‘‘मला जे मानधन मिळते त्यात आमचे घर कसेबसे चालते. आम्ही वेगळा धनसंचय केला नाही. तरी तुम्ही घाबरू नकात. आपण आणखी कुणाला विचारू! मी त्याची व्यवस्था करतो.’’

त्यांचे हे बोलणे ऐकून शास्त्रीजींच्या पत्नी ललिताजी आत गेल्या. त्यांनी पन्नास रूपये आणले आणि त्या सद्ग्रहस्थांना  दिले. ते आनंदाने निघून गेले.

ते जाताच शास्त्रीजींनी विचारले, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’
ललिताजींनी सांगितले, ‘‘तुम्ही मला घरखर्चासाठी दर महिन्याला जे साठ रूपये देता त्यातून मी पाच रूपयांची बचत करते. 55 रूपयात काटकसरीने घर चालवल्यावर जे पाच रूपये उरतात त्या बचतीतून मी हे पैसे दिले. जर ते एखाद्याच्या गरजेला कामाला येणार नसतील तर त्या बचतीचा उपयोग काय?’’

ते ऐकून शास्त्रीजींनी त्यांच्या पत्नीचे कौतुक केले. त्या घरात जाताच त्यांनी कागद पेन घेतला आणि कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिले. ‘‘माझे घर दरमहा 55 रूपयात चालत असल्याने पुढच्या महिन्यापासून माझ्या मानधनातील पाच रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूला द्यावेत....’’

असे होते शास्त्रीजी! आज हा किस्सा ऐकून अनेकजण त्यांनाच वेड्यात काढतात. हा विनोद वाटावा इतक्या आपल्या संवेदना बधीर झाल्यात. एखादा अधिकारी ‘प्रामाणिक’ आहे हे आपल्याला वारंवार सांगावे लागते. म्हणजे प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चाललेल्या काळात आपल्याला या गोष्टीचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे मुुंबई उच्च न्यायालयातील एक घटना! 

जळगाव येथील रहिवासी असलेल्या वैभव पाटील या विद्यार्थ्याने 2011 साली अभियांत्रिकीतून पदवी पूर्ण केली. त्याने अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर मित्राच्या सांगण्यावरून वीस हजार रूपयांना विकत घेतला होता. त्यानंतर त्याचा त्याला पश्चाताप झाला आणि अपराधीपणाची भावना निर्माण झाली. हा मानसिक त्रास असह्य झाल्याने त्याने मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचारही घेतले. आपल्या हातून चूक घडलीय म्हणून त्याने कुठे नोकरीही स्वीकारली नाही. शेवटी त्याने ‘आपली पदवी मुंबई विद्यापीठाने काढून घ्यावी’ म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सत्याची कास धरण्याची शिकवण देणार्‍या न्यायव्यवस्थेने त्याची ही प्रांजळ मागणी मात्र फेटाळून लावली. इतकेच नाही तर ‘तुझ्याप्रती आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. जे झाले ते विसरून आयुष्यात पुढे जा’ असा सल्लाही वैभव पाटीलला दिला.

‘फसवूणक करून शैक्षणिक पदवी मिळवल्याच्या मुद्यावरून ती रद्द करण्याची वा काढून घेण्याची तरतूद कायद्यात नाही’ असे स्पष्टपणे सांगत न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या प्रकरणात पेपर फोडण्यासाठी कुणाला पैसे दिले हे मात्र वैभव सांगायला तयार नाही. ‘आपल्यामुळे त्यांना त्रास नको’ असे त्याचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयही हे मान्य करतेय. त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतानाच शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य संपुष्टात आणून त्याचा बाजार मांडणार्‍यांना मात्र सगळेजण पाठिशी घालत आहेत. पेपर फोडण्यासाठी त्याने कोणाला पैसे दिले हे उघड व्हायला हवे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कारवाईही व्हायला हवी. यात वैभवची भूमिका फक्त ‘माफीच्या साक्षीदाराची’ असू शकते. अशा कामासाठी पैसे देणे आणि घेणे हा गुन्हा असताना केवळ तो स्वतःहून पुढे आल्यामुळे त्याच्याविषयी सहानुभूती दाखवणे,  अन्य गुन्हेगारांना पाठिशी घालणे हे सगळेच शंकास्पद आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र एका निरपराध्याला शिक्षा होऊ नये’ हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मूलतत्त्व आहे. निरपराध्याला शिक्षा होऊ नये हे तर खरंच! मात्र ‘शंभर गुन्हेगार’ सुटण्याची खात्री असल्यामुळेच आपली कायदेव्यवस्था, न्यायव्यवस्था अक्षरशः काही धनाड्यांच्या हातातील बाहुलं बनली आहे. समोर आलेल्या साक्षी, पुराव्याच्या आधारे गुन्हेगाराला कठोर शासन करणे हे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिने आवश्यक आहे. कायद्याविषयीचा धाक कमी झाल्यानेच अनेक गंभीर घटना आपल्याकडे सर्रासपणे घडताना दिसतात. 

पूर्वी हाणामारी किंवा खूनासारखी घटना घडल्यास अनेकांचा थरकाप उडायचा. तपास यंत्रणा कसून कामाला लागायच्या. लोकात भीतिचे वातावरण असायचे. सध्या मात्र मोठ्यात मोठे गुन्हेही किरकोळ वाटू लागले आहेत. आजूबाजूला खून किंवा त्यापेक्षा मोठे हत्याकांड घडले तरी लोक चहा-कॉफीचे घोट घेत हसर्‍या चेहर्‍याने त्यावर चर्चा करताना दिसतात.

‘वकील, पोलीस हे व असे घटक आपल्याला कोणत्याही गुन्ह्यातून सोडवण्यासाठीच असतात! आपल्याकडे त्यांच्या तोंडावर फेकण्याएवढे पैसे असले की सगळे झाले’ अशी मानसिकता तयार झाली आहे. सामान्य माणसांना चिरडणारा सलमान खान किंवा देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याबद्दल शिक्षा भोगून बाहेर पडलेला संजय दत्त म्हणूनच आजच्या पिढीचा आदर्श असतो. रस्त्यावरचा सिग्नल मोडल्यावर किंवा नो एंट्रीत घुसल्यावर शे-दोनशे रूपये चिरीमिरी दिली की आपली सहज सुटका होते हे माहीत असल्याने अनेकजण  वाहतूकीचे नियम पाळत नाहीत. 

आपला देश बदलतोय हे तर खरेच! पण जोपर्यंत मूलभूत सुधारणा होत नाहीत तोपर्यंत वरवर झालेल्या बदलांना फारसा अर्थ नसतो. मागे एकदा एका तत्त्ववेत्याने बोलताना सांगितले होते की, ‘आपल्याकडे एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर जेव्हा दुसर्‍या बाजूला न पाहता एखादा पादचारी बिनधास्तपणे रस्ता ओलांडू लागेल त्यावेळी लोकशाहीच्या दृष्टिने आपण एक पाऊल पुढे टाकले असे समजावे.’ जे नियम आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी केलेत त्याचेही पालन आपण करत नाही. काहींना अतिरेकी विधान वाटेल पण सिग्नल मोडल्यावर त्याच्यावर तातडीने 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण एखाद्याच्या बेशिस्तीमुळे आणि नियमबाह्य वर्तनाने समोरच्या निरपराध्याचा जीव अकारण जातो. सीमेवर आपले जेवढे जवान दरवर्षी मारले जातात त्याच्या कितीतरी पट माणसे आपल्याकडे रस्ते अपघातात मरतात, असे एक सर्व्हेक्षण मध्यंतरी प्रकाशित झाले होते. या गोष्टी मात्र आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. 

‘लोक बदललेत’ असे म्हणताना त्या ‘लोकात’ आपणही येतो याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. व्यवस्था भ्रष्ट झाल्याने प्रामाणिकपणे जगणे हीच अनेकांसाठी शिक्षा ठरते. जोपर्यंत चांगुलपणावर विश्वास आहे तोपर्यंत आपली संस्कृती भक्कमपणे तग धरून आहे असे समजावे. हे चांगुलपण किंवा त्यावरील विश्वास संपला तर आपण संपलो. म्हणून चांगल्या गोष्टींची कदर करायलाच हवी. ते करताना जे काही चुकीचे घडतेय त्यावरही अंकुश लावायला हवा. 

वैभव पाटील या विद्यार्थ्याने पैसे देऊन पेपर विकत घेतला आणि अभियांत्रिकीची पदवी मिळवली ही घटना आपल्या शिक्षणव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. वैभव संबंधित गुन्हेगारांची नावे सांगत नसल्याने त्याच्या हेतूबाबतही शंका घ्यायला वाव आहे. मात्र तो जर पश्चातापाने खरोखर त्रस्त असेल आणि त्याच्या चांगुलपणाने त्याला साद दिली असेल तर यापेक्षा मोठी आनंदाची बातमी असू शकत नाही. आपल्या हातून घडलेली चूक, घडलेला गुन्हा मान्य करायला, तो स्वीकारून त्यात सुधारणा करायला धाडस लागते. 

वैभव त्याचा पेपर वीस हजार रूपयात घेतल्याचे सांगतो. अशा घटना सर्वत्र आणि सर्रासपणे आढळून येतात. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या घरीच काही विद्यार्थी आदल्या दिवशीचा पेपर दुसर्‍या दिवशी सोडवताना जागीच सापडले होते. त्याचे पुढे काय झाले हे आम्हास कळले नाही. मात्र आपल्याकडे राज्यकर्त्यांचे जे होते तेच त्या नगरसवेकाचे, संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे आणि विद्यार्थ्यांचे झाले असणार!
माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये असे म्हणतात! आपण त्याच त्या चुका वर्षानुवर्षे करीत आहोत. म्हणूनच इतिहासाची माहिती नाही, वर्तमानाचे ज्ञान नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही अशी गत आजच्या तरूणाईची झाली आहे. यातून बाहेर पडायचे तर कायद्याच्या कठोर अंमलबजावणीबरोबरच आपल्यातील वाईट प्रवृत्ती, अप्रामाणिकपणा दूर सारून चांगुलपणा वाढविण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याकडील व्यवस्था, यंत्रणा, सामाजिक संस्था, माध्यमे आणि ‘ज्ञानकेंद्रं’ ठरतील अशा अन्य व्यक्ती आणि संस्थांनी यापुढे यासाठीच काम करणे गरजेचे आहे.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

3 comments:

  1. अतिशय परखडं विचार मांडलेत सर

    ReplyDelete
  2. भवतालच्या वास्तवाचे अतिशय भेदक चित्रण केलेत आपण. रोजच्या रोज नृशंस गुन्ह्यांच्या बातम्या वाचून आणि पाहून आमच्या संवेदना बधीर झाल्या आहेत . उज्ज्वल परंपरा आणि संस्कार असणाऱ्या या देशाचे आजचे चारित्र्य चिंता करण्याजोगेच आहे . रस्त्यावर वाहतूक पोलिसांचे अस्तित्त्व ही आमच्या असांकृतीकपणाचीच साक्ष आहे .

    ReplyDelete
  3. एकच चूक हजार वेळा करणारा माणूस ती चूक चुकून करत नाही. मुद्दाम करतो. त्यामुळे हजार वेळा केलेल्या त्या चुका नसून ते गुन्हे असतात. लेख मस्तच सर.

    ReplyDelete