Sunday, July 30, 2017

पुस्तक हेच मस्तक



कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही त्या देशात किती कारखाने आहेत, किती धरणे आहेत, किती प्रयोयशाळा आहेत, किती संशोधन केंद्रे आहेत, त्या देशात किती वनसंपत्ती, खनिजसंपत्ती आहे यावर ठरते असे म्हणतात. त्याचबरोबर त्या राष्ट्रात अफाट प्रतिभेचे किती कवी आहेत, किती चित्रकार आहेत, किती संगीतकार आहेत या व अशा गोष्टीही महत्त्वपूर्ण ठरतात. ज्ञानोबा-तुकोबांसारख्या अनेक वैश्विक तत्त्वचिंतकांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र त्यादृष्टिने खरोखरच समृद्ध आणि भाग्यवान आहे, असे म्हणावे लागेल.

‘तरणे बॉण्ड’ कवी रमेश गोविंद वैद्य म्हणतात की, विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे मराठीचे पंचप्राण आहेत. जोपर्यंत मराठी माणूस आहे तोपर्यंत हा प्राण आपल्या श्वासाश्वासात, नसानसात राहील; आणि जोपर्यंत आपला श्वास सुरू आहे तोपर्यंत मराठीला आणि मराठी भाषेला मरण नाही. त्यामुळे ‘मराठी भाषा संपेल’ अशी कोल्हेकुई करणार्‍यांनी मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याऐवजी ही भाषा, ही संस्कृती आणखी समृद्ध कशी होईल याचे चिंतन करावे. मराठी भाषा लयाला जात असल्याची चर्चा अनेक वर्षापासून होते. एकेकाळी पुण्यात ‘मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे का?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इतिहासाचार्य राजवाडे व्यासपीठावर आले आणि म्हणाले, ‘‘अरे, या विषयावर चर्चा कसली करताय. जर मराठी भाषा मृत्युपंथाला लागली असेल तर तिची तिरडी बांधा आणि स्मशानात नेऊन अंत्यसंस्कार करा. तसे नसेल आणि या भाषेत थोडी जरी धुगधुगी असेल तर असल्या वांझोट्या विषयावर चर्चा करण्याऐवजी सगळ्यांनी एकत्र या आणि मराठी भाषेत प्राण फुंका.’’

रामायण-महाभारतापासून ते ज्ञानेश्वरी-गाथेपर्यंत अनेक ग्रंथांनी मराठी माणसाला वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवले आहे. मातृभाषा असलेली संस्कृत आणि राजभाषा असलेली मराठी ही आपली अस्मिता आहे. या भाषांच्या संरक्षणाचा ठेका जणू आपणच घेतलाय अशा तोर्‍यात जाहिरातबाजी करणार्‍या महाराष्ट्र शासनाकडून मात्र मराठीची गळचेपी होतेय. भाषेच्या विकासासाठी, समृद्धीसाठी काय प्रयत्न सुरू आहेत, याचा आढावा घेतल्यास पदरात नैराश्यच येते.

स्वतंत्र भारतात आजही साक्षरता अभियान राबवावे लागते आणि तरीही निम्म्याच्या आसपास जनता अडाणी आहे. हे चित्र बदलणे सहज शक्य आहे. मात्र तसे झाले तर वर्षानुवर्षे याच मराठी माणसांच्या जिवावर सत्ता उपभोगणार्‍या आणि अंदाधुंदी माजवणार्‍यांच्या खुर्चीखाली सुरूंग पेटतील. भ्रष्टाचार, महागाई आणि गुन्हेगारी यामुळे मस्तवाल बनलेल्यांना चाप बसेल. शिकलेल्या लोकांची स्वयंप्रज्ञा जागृत झाली तर यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळेच यांना अडाणी जनता हवीय. मराठी भाषा सक्तीची न करणे, ग्रंथालयांना-प्रकाशकांना सहकार्य न करणे, मराठी शाळांना परवानगी नाकारणे, शासकीय स्तरावर भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न न करणे हे कशाचे द्योतक आहे? सहिष्णू वृत्तीच्या मराठी लोकांच्या जिवावर बेगुमानपणे निवडून येऊन सत्ता आणि संपत्तीची फळे उपभोगणार्‍यांची कारस्थाने आमच्या लक्षात का येत नाहीत?

अशा बिकट परिस्थितीतही चांगले मराठी वाचक तयार होत असताना शासनस्तरावर कोणते विशेष उपक्रम राबवले जातात? काही साहित्यिकांना, कलाकारांना तुटपुंजे मानधन, अनुदान मिळतेही; पण ते पुरेसे नाही. कलाकारांना, साहित्यिकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी काही विशेष उपक्रम राबवावेत. ब्रिटिश लोक म्हणतात की, ‘‘एकवेळ आम्ही आमचे साम्राज्य देऊन टाकू, पण आमचा शेक्सपिअर आणि आमचे क्रिकेट आम्ही कोणालाही देणार नाही.’’ आपल्या मातीचे खेळ, आपल्या मातीतले साहित्यिक यांच्याविषयी आपल्या मनात असा उदात्त दृष्टिकोन केव्हा तयार होणार?     

प्रत्येक मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषाविषयक,  संस्कृतीविषयक धोरणांचा जाणीवपूर्वक व आवर्जून अभ्यास करावा. महाराज भाषेविषयी किती आग्रही होते हे अनेक घटनांवरून दिसून येते. त्यांनी कलावंतांची कधीही उपेक्षा केली नाही. कवी भूषण यांचा त्यांनी केलेला गौरव आपणास ज्ञात आहेच. छत्रपती संभाजीराजांनीही हा वारसा चालवला. ते स्वतः उत्तम कवी होते. अनेक कवी, लेखक त्यांच्या सानिध्यात होते. हाच आदर्श आजच्या राजकारण्यांनीही ठेवावा. 

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री असतानाचा एक किस्सा! एक जवळचा मित्र त्यांना भेटायला दिल्लीला गेला. त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि यथायोग्य स्वागत केले. त्यांच्या घरातील आतल्या तीन चार खोल्या एकदम साध्या होत्या. जमिनीवर एक चटई अंथरलेली. एक पाण्याचा माठ आणि काही पुस्तके असे गरजेइतकेच सामान त्या खोल्यातं होते आणि बाहेरच्या तीन चार खोल्या मात्र एकदम आलीशान होत्या. उत्तम रंगरंगोटी, शोभेच्या वस्तू, महागडे फर्निचर, घराबाहेरील मैदानात बाग आणि त्यात तयार केलेले सुंदर कारंजे असे वैभव पाहून बघणार्‍यांचे डोळे दिपून जात. याबाबतचे कुतूहल वाटल्याने मित्राने त्याबाबतची विचारणा केल्यानंतर बाबासाहेबांनी केलेला उलगडा फारच मार्मिक होता. ते म्हणाले की, ‘‘आतील साध्या खोल्या माझ्या वापरासाठीच्या आहेत. मात्र देशभरातून मला भेटायला येणार्‍या माझ्या लाखो बांधवांसाठी बाहेरचा दिखाऊ डोलारा उभारलाय. त्यांना कळायला हवे की, शिक्षणाने माणसाची प्रगती होते. असे ऐश्‍वर्य वाट्याला येते. सर्व दुःख, दारिद्य्र आणि दैना दूर पळते.’’  

बाबासाहेबांसारख्या महापुरूषांच्या नावावर राजकारण करणार्‍यांनी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

एका सम्राटाची कथा सांगितली जाते. त्याने मोठा प्रदेश जिंकला. भरपूर संपत्ती मिळवली. शेवटी मरताना त्याने काही आप्त-स्वकीय आणि मित्रांना जवळ बोलावून सांगितले की,‘‘माझ्या प्रचंड धकाधकीच्या आयुष्यात मी अनेक उठाठेवी केल्या. भरपूर पैसा, संपत्ती मिळवली. मात्र या क्षणी माझ्या हयातीत मी वाचलेली सात-आठ पुस्तकेच मला आठवतात. वाचनानंदाच्या या समाधानामुळेच मी सुखाने मरणाला सामोरा जातोय.’’ 

चांगले संस्कार रूजवून समाजस्वास्थ्य राखण्यासाठी आणखी दर्जेदार पुस्तके प्रकाशित व्हायला हवीत. लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते आदींना शासनाने विशेष सोयी-सवलती द्यायला हव्यात. अज्ञान दूर सारून सुसंस्कृत आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी राजकारणातील चांगल्या नेत्यांनी लक्ष द्यायला हवे. असे झाले तर राजकारणाचा धंदा करणार्‍यांना कात्रजचा घाट दिसेल.

असे म्हणतात की, ज्या प्रदेशात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरे मरतात. काहीवेळा माणसेही मरतात. मात्र जिथे संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते.
म्हणूनच संस्कारांचा दुष्काळ पडू नये, यासाठी वाचनसंस्कृती वाढायला हवी. आपल्या देवघराप्रमाणेच प्रत्येकाच्या घरात सकस आणि दर्जेदार पुस्तकांचा संग्रह असायलाच हवा. जीवनात आनंद निर्माण करणार्‍या आणि जगणं समृद्ध करणार्‍या पुस्तकांसारखा मित्र नाही. शेवटी पुस्तकच विचारी माणसाचं मस्तक असतं हेच खरं! 
 - घनश्याम पाटील 
7057292092

6 comments:

  1. खूपच मार्मिक लेख!

    ReplyDelete
  2. सर, खूप मस्त लेख

    ReplyDelete
  3. अगदी खर आहे हे. वाचाल तर वाचाल.
    कालच महाबळेश्वर जवळील पुस्तकांचे गावं भिलारला भेट दिली आणि धन्य झालो. साधारण एक ते दीड किलोमीटर परिसरात निसर्गाच्या कुशीत विसावलेले हे गावं आणि त्यातल्या काही घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उभारलेली ग्रंथालये म्हणजे वाचकांसाठी वैचारिक नजराणाच वाटला. असे उपक्रम आजही राबवले जातात हे विशेष आहे आणि म्हणूनच माझ्या माय मराठीली मरण नाही हे ही खर आहे. माणसे मरतात पण भाषा कधीच मरत नाही.
    खूप छान लेख सर.

    ReplyDelete
  4. आपल्या लेखा मधून नेहमीच मराठी भाषेच्या ज्ञानात भर पडत असते.
    सुंदर लेख

    ReplyDelete
  5. आपल्या लेखा मधून नेहमीच मराठी भाषेच्या ज्ञानात भर पडत असते.
    सुंदर लेख

    ReplyDelete