‘दरवळ’मधील मागच्या आठवड्यातला लेख वाचून नांदेडहून एका वाचकाचा फोन आला. त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही ग्रामीण लेखकांसाठी काय करता?’’ त्यांना मी सांगितले, ‘‘लेखक हा लेखक असतो. तो ग्रामीण, नागरी असा भेद करता येत नाही. लेखकाची जात, धर्म, प्रांत, लिंग हे व असे फुटकळ निकष पाहून आम्ही साहित्य स्वीकारत नाही. तरी ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने पुण्या-मुंबईच्या वर्तुळाबाहेरील अनेक लेखकांची पुस्तके आम्ही मोठ्या संख्येने प्रकाशित केलीत. आमच्या वेबसाईटवर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकेल.’’
इतके सांगूनही त्यांचे समाधान होईना! त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही समाजसुधारणेसाठी काय लिहिलेय?’’
आता मात्र माझी सटकली. मी त्यांना विचारले, ‘‘मी समाजसुधारणेसाठी लिहितो हे तुम्हाला कोणी सांगितले? मी त्यातला ठेकेदार नाही.’’
त्यावर त्यांनी विचारले, ‘‘मग तुम्ही लिहिता कशासाठी?’’
क्षणाचाही विलंब न करता मी सांगितले, ‘‘मी माझ्या आनंदासाठी लिहितो.’’
त्यावर ते दुखावले गेले. त्यांनी सांगितले, ‘‘असे करू नकात! समाजसुधारणेसाठी लिहा.’’
त्यांचा सल्ला ऐकून मी फोन बंद केला.
खरंच लेखक कशासाठी लिहितात? त्यांनी लिहिल्याने समाज सुधारतो? गीता, कुराण, बायबल, गुरूग्रंथसाहिबा यापासून ते आपल्याकडील ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, भागवत अशा धार्मिक ग्रंथाच्या वाचनाने कोणी फारसे सुधारत नाही. अनेक नामवंत तत्त्ववेत्यांची चिंतनशील, वैचारिक पुस्तके वाचून कोणी सुधारत नाही. धर्मग्रंथावर हात ठेवून न्यायालयात धडधडीत खोटे बोलणार्यांचा आपला देश! तो वाचनाने सुधारेल? मग लेखक लिहितात कशासाठी? जागतिक साहित्याचा विचार करता रोज एक-दोन नव्हे तर हजारो पुस्तके प्रकाशित होत आहेत. त्याची तडाखेबंद विक्रीही होतेय. या साहित्यातून समाज खरंच सुधारतोय का, हा मात्र चिंतनाचा विषय आहे.
कोणीतरी म्हटलंय, ‘‘आपला देश तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही.’’ मग लिहायचे कशासाठी? प्रत्येकाची त्यामागची कारणे वेगळी असू शकतात.
संस्कृत काव्यशास्त्राचे सर्वश्रेष्ठ विद्वान आचार्य मम्मटांनी सांगितल्याप्रमाणे लेखन हे स्वान्तसुखाय आहे का? त्यातून अर्थप्राप्ती होते का? मानसिक समाधान मिळते का? या निर्मितीच्या कळा सहन करून काय साध्य होते? ‘का लिहितो?’ याप्रश्नाची प्रत्येकाची उत्तरे आणि कारणे वेगवेगळी असू शकतात.
वाचक हे सारे का वाचतात? हा त्याहून वेगळा प्रश्न!
कोणी समाधानासाठी वाचतं. कोणी माहिती मिळवण्यासाठी वाचतं. कोणी ज्ञान मिळवण्यासाठी वाचतं. (होय, माहिती आणि ज्ञान यात खूप फरक आहे.) माझी एक मैत्रिण तर झोप येण्यासाठी वाचते. तिचे म्हणणे आहे, ‘‘चार बोजड पाने वाचली की झोप कधी येते कळतच नाही.’’
त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे, लिहिणार्यांची आणि वाचणार्यांची संख्या सुदैवाने दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाचनाची प्रत्येकाची अभिरूची वेगळी असू शकते पण वाचक झपाट्याने वाढत आहेत. लिहिते हातही आपल्या सर्जनाचा आविष्कार सातत्याने दाखवून देत आहेत. जागतिक प्रवाह बदलत चालले असतानाचा नवी पिढी कसदार लेखन करतेय.
आम्ही ‘चपराक’कडून अनेकांची पुस्तके प्रकाशित केली. त्यात नवोदितांचे प्रमाण लक्षवेधी आहे. (‘चपराक’ने पुस्तक प्रकाशित केले की खरंतर कोणी ‘नवोदित’ राहत नाही.) त्यातही आम्ही अनेक पत्रकारांची पुस्तके प्रकाशित केलीत. सुधीर गाडगीळ, भाऊ तोरसेकर, श्रीराम पचिंद्रे, संजय वाघ, सुभाष धुमे, श्रीपाद ब्रह्मे, सुभाषचंद्र वैष्णव, रमेश पडवळ अशा कितीतरी पत्रकारांची नावे उदाहरण म्हणून सांगता येतील.
परवा इंदूरचे लेखक विश्वनाथ शिरढोणकर आमच्याकडे आले होते. त्यांचे ‘मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता’ हे वेगळ्या धाटणीचे पुस्तक आम्ही प्रकाशित केलेय. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या पत्रकारांच्या पुस्तकांचे प्रमाण पाहून त्यांनी विचारले, ‘‘लेखकांची भाषा आणि पत्रकारांची भाषा यात काय फरक असतो?’’
त्यांना सांगितले, ‘‘पत्रकार हा फक्त घडलेली घटना सांगण्याचे काम करतो. क्वचितप्रसंगी त्यावर भाष्य करून समाजाला बर्यावाईटाची जाणिवही करून देतो. लेखक त्याचे विचार लालित्यपूर्ण शब्दात मांडतो. पत्रकार माहिती देतात, लेखक निर्मिती घडवतात. अर्थात आम्ही ज्या पत्रकारांची पुस्तके प्रकाशित केलीत ते सर्व उत्तम लेखक आहेत.’’
यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही प्रकाशक आहात. मग लेखक आणि पत्रकार यांच्या भाषेत नेमका काय फरक असतो हे एखाद्या उदाहरणासह सांगा.’’
त्यांना म्हणालो, ‘‘सोपे आहे. पत्रकार लिहिल, ‘आठ वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठापर्यंत आमचे वाचक आहेत.’ हेच वाक्य एखादा चांगला लेखक लिहिल, ‘‘वदनी कवळ घेताच्या वयापासून ते वदनी कवळी घेताच्या वयापर्यंत सर्व वाचक आम्ही जोडलेत!’’
मी अनेक स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रासाठी लेखन करतो. त्यावर माझ्या एका मैत्रिणीने उपहासाने सांगितले, ‘‘तुझे मोठ्या वृत्तपत्रातील लेखन अभिमानाची बाब आहे; पण छोट्या वृत्तपत्रांसाठी तू का लिहितोस? ते असे कितीसे लोक वाचतात?’’
तिला सांगितले, ‘‘सत्य सांगण्याचे काम छोटी वृत्तपत्रेच करू शकतात. उलट त्यांना आपण बळ द्यायला हवे. राहिला विषय वाचकांचा, तर माझे लेखन त्या वृत्तपत्राचे एकमेव वाचक असलेले संपादक वाचतात की हजारो, लाखो वाचक वाचतात याच्याशी मला कर्तव्य नाही. मी माझ्या आनंदासाठी लिहितो.’’
त्यावर तिचे समाधान झाले नाही. मीही विषय सोडून दिला.
एकदा मी तिला एक भयंकर एसएमएस केला. ती पळतच माझ्याकडे आली. मी शांतपणे म्हणालो, ‘‘जास्त त्रास करून घेऊ नकोस! तुझ्याशिवाय आणखी कोणी वाचले नाही ना ते? मग आता विसर आणि ते डिलीट कर. अशा छोट्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही.’’
ती म्हणाली, ‘‘अरे कसे विसरायचे? मी अस्वस्थ झालेय त्यामुळे.’’
तिला म्हणालो, ‘‘हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर! जो संदेश फक्त तुझ्याशिवाय आणखी कोणी वाचला नाही, वाचणारही नाही त्यामुळे तू इतकी अस्वस्थ झालीस. मग वृत्तपत्र भलेही छोटे असेल, तुलनेने त्याचे वाचक खूप कमी असतील, पण त्यांच्यावर माझ्या लेखनाचा परिणाम होतो ना? मी समाजसुधारणेचा ठेका घेतला नाही. समाज बदलूही शकत नाही. मात्र एखाद्या वाचकाला माझे लेखन आवडले, त्याच्या अडचणीत मार्ग मिळाला, त्याचे नैराश्य दूर झाले तरी तो माझ्या लेखणीचा विजय आहे. त्या एकमेव वाचकांसाठी म्हणून मी लिहितो.’’
पोरींना असे वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले की पटते हा माझा अनुभव. तिलाही हे पटले. तेव्हापासून ती मला ‘कुठे लिहितो आणि का लिहितो’ असे अविवेकी प्रश्न विचारत नाही.
अनेक लेखकांचा समज असतो की, आपले साहित्य प्रकाशित झाले की त्यावर वाचकांच्या उड्या पडणार, पुस्तके हातोहात खपणार, प्रकाशक मालामाल होणार! बाबांनो, असे काही नसते! तुमच्याकडे सांगण्यासारखे, मांडण्यासारखे काही असेल तर जरूर लिहा. परिणामांचा विचार न करता विचारांचा परिणाम घडवा. शब्दांच्या, अक्षरांच्या प्रेमात पडलात तर सुखी व्हाल. उत्तम आणि कसदार वाचनाने मन एकाग्र होते. लेखनाने मन मोकळे होते. मनात खूप काही साठवून त्याचे डबके होऊ द्यायचे नसेल तर लिहित रहा. प्रवाही राहिलात तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरूस्त राहाल. वाचन, लेखन ही साधना आहे. त्याचे फळ मधुरच मिळते!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092