Sunday, July 9, 2017

चांगुलपणा वृद्धिंगत व्हावा!



देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची एक गोष्ट सांगितली जाते. ते तेव्हा कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सेक्रेटरी होते. त्यावेळी त्यांना साठ रूपये महिना मानधन मिळायचे. यावरच त्यांचे घर चालायचे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्याकडे आला. तो म्हणाला, ‘‘माझ्या बायकोची तब्येत अचानक खूप बिघडलीय. तिला दवाखान्यात न्यायचे आहे. त्यासाठी पन्नास रूपये तातडीने उसने द्या!’’

शास्त्रीजींनी ते ऐकल्यावर हतबलता दाखवली. ते म्हणाले, ‘‘मला जे मानधन मिळते त्यात आमचे घर कसेबसे चालते. आम्ही वेगळा धनसंचय केला नाही. तरी तुम्ही घाबरू नकात. आपण आणखी कुणाला विचारू! मी त्याची व्यवस्था करतो.’’

त्यांचे हे बोलणे ऐकून शास्त्रीजींच्या पत्नी ललिताजी आत गेल्या. त्यांनी पन्नास रूपये आणले आणि त्या सद्ग्रहस्थांना  दिले. ते आनंदाने निघून गेले.

ते जाताच शास्त्रीजींनी विचारले, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’
ललिताजींनी सांगितले, ‘‘तुम्ही मला घरखर्चासाठी दर महिन्याला जे साठ रूपये देता त्यातून मी पाच रूपयांची बचत करते. 55 रूपयात काटकसरीने घर चालवल्यावर जे पाच रूपये उरतात त्या बचतीतून मी हे पैसे दिले. जर ते एखाद्याच्या गरजेला कामाला येणार नसतील तर त्या बचतीचा उपयोग काय?’’

ते ऐकून शास्त्रीजींनी त्यांच्या पत्नीचे कौतुक केले. त्या घरात जाताच त्यांनी कागद पेन घेतला आणि कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिले. ‘‘माझे घर दरमहा 55 रूपयात चालत असल्याने पुढच्या महिन्यापासून माझ्या मानधनातील पाच रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूला द्यावेत....’’

असे होते शास्त्रीजी! आज हा किस्सा ऐकून अनेकजण त्यांनाच वेड्यात काढतात. हा विनोद वाटावा इतक्या आपल्या संवेदना बधीर झाल्यात. एखादा अधिकारी ‘प्रामाणिक’ आहे हे आपल्याला वारंवार सांगावे लागते. म्हणजे प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चाललेल्या काळात आपल्याला या गोष्टीचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे मुुंबई उच्च न्यायालयातील एक घटना! 

जळगाव येथील रहिवासी असलेल्या वैभव पाटील या विद्यार्थ्याने 2011 साली अभियांत्रिकीतून पदवी पूर्ण केली. त्याने अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर मित्राच्या सांगण्यावरून वीस हजार रूपयांना विकत घेतला होता. त्यानंतर त्याचा त्याला पश्चाताप झाला आणि अपराधीपणाची भावना निर्माण झाली. हा मानसिक त्रास असह्य झाल्याने त्याने मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचारही घेतले. आपल्या हातून चूक घडलीय म्हणून त्याने कुठे नोकरीही स्वीकारली नाही. शेवटी त्याने ‘आपली पदवी मुंबई विद्यापीठाने काढून घ्यावी’ म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सत्याची कास धरण्याची शिकवण देणार्‍या न्यायव्यवस्थेने त्याची ही प्रांजळ मागणी मात्र फेटाळून लावली. इतकेच नाही तर ‘तुझ्याप्रती आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. जे झाले ते विसरून आयुष्यात पुढे जा’ असा सल्लाही वैभव पाटीलला दिला.

‘फसवूणक करून शैक्षणिक पदवी मिळवल्याच्या मुद्यावरून ती रद्द करण्याची वा काढून घेण्याची तरतूद कायद्यात नाही’ असे स्पष्टपणे सांगत न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या प्रकरणात पेपर फोडण्यासाठी कुणाला पैसे दिले हे मात्र वैभव सांगायला तयार नाही. ‘आपल्यामुळे त्यांना त्रास नको’ असे त्याचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयही हे मान्य करतेय. त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतानाच शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य संपुष्टात आणून त्याचा बाजार मांडणार्‍यांना मात्र सगळेजण पाठिशी घालत आहेत. पेपर फोडण्यासाठी त्याने कोणाला पैसे दिले हे उघड व्हायला हवे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कारवाईही व्हायला हवी. यात वैभवची भूमिका फक्त ‘माफीच्या साक्षीदाराची’ असू शकते. अशा कामासाठी पैसे देणे आणि घेणे हा गुन्हा असताना केवळ तो स्वतःहून पुढे आल्यामुळे त्याच्याविषयी सहानुभूती दाखवणे,  अन्य गुन्हेगारांना पाठिशी घालणे हे सगळेच शंकास्पद आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र एका निरपराध्याला शिक्षा होऊ नये’ हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मूलतत्त्व आहे. निरपराध्याला शिक्षा होऊ नये हे तर खरंच! मात्र ‘शंभर गुन्हेगार’ सुटण्याची खात्री असल्यामुळेच आपली कायदेव्यवस्था, न्यायव्यवस्था अक्षरशः काही धनाड्यांच्या हातातील बाहुलं बनली आहे. समोर आलेल्या साक्षी, पुराव्याच्या आधारे गुन्हेगाराला कठोर शासन करणे हे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिने आवश्यक आहे. कायद्याविषयीचा धाक कमी झाल्यानेच अनेक गंभीर घटना आपल्याकडे सर्रासपणे घडताना दिसतात. 

पूर्वी हाणामारी किंवा खूनासारखी घटना घडल्यास अनेकांचा थरकाप उडायचा. तपास यंत्रणा कसून कामाला लागायच्या. लोकात भीतिचे वातावरण असायचे. सध्या मात्र मोठ्यात मोठे गुन्हेही किरकोळ वाटू लागले आहेत. आजूबाजूला खून किंवा त्यापेक्षा मोठे हत्याकांड घडले तरी लोक चहा-कॉफीचे घोट घेत हसर्‍या चेहर्‍याने त्यावर चर्चा करताना दिसतात.

‘वकील, पोलीस हे व असे घटक आपल्याला कोणत्याही गुन्ह्यातून सोडवण्यासाठीच असतात! आपल्याकडे त्यांच्या तोंडावर फेकण्याएवढे पैसे असले की सगळे झाले’ अशी मानसिकता तयार झाली आहे. सामान्य माणसांना चिरडणारा सलमान खान किंवा देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याबद्दल शिक्षा भोगून बाहेर पडलेला संजय दत्त म्हणूनच आजच्या पिढीचा आदर्श असतो. रस्त्यावरचा सिग्नल मोडल्यावर किंवा नो एंट्रीत घुसल्यावर शे-दोनशे रूपये चिरीमिरी दिली की आपली सहज सुटका होते हे माहीत असल्याने अनेकजण  वाहतूकीचे नियम पाळत नाहीत. 

आपला देश बदलतोय हे तर खरेच! पण जोपर्यंत मूलभूत सुधारणा होत नाहीत तोपर्यंत वरवर झालेल्या बदलांना फारसा अर्थ नसतो. मागे एकदा एका तत्त्ववेत्याने बोलताना सांगितले होते की, ‘आपल्याकडे एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर जेव्हा दुसर्‍या बाजूला न पाहता एखादा पादचारी बिनधास्तपणे रस्ता ओलांडू लागेल त्यावेळी लोकशाहीच्या दृष्टिने आपण एक पाऊल पुढे टाकले असे समजावे.’ जे नियम आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी केलेत त्याचेही पालन आपण करत नाही. काहींना अतिरेकी विधान वाटेल पण सिग्नल मोडल्यावर त्याच्यावर तातडीने 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण एखाद्याच्या बेशिस्तीमुळे आणि नियमबाह्य वर्तनाने समोरच्या निरपराध्याचा जीव अकारण जातो. सीमेवर आपले जेवढे जवान दरवर्षी मारले जातात त्याच्या कितीतरी पट माणसे आपल्याकडे रस्ते अपघातात मरतात, असे एक सर्व्हेक्षण मध्यंतरी प्रकाशित झाले होते. या गोष्टी मात्र आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. 

‘लोक बदललेत’ असे म्हणताना त्या ‘लोकात’ आपणही येतो याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. व्यवस्था भ्रष्ट झाल्याने प्रामाणिकपणे जगणे हीच अनेकांसाठी शिक्षा ठरते. जोपर्यंत चांगुलपणावर विश्वास आहे तोपर्यंत आपली संस्कृती भक्कमपणे तग धरून आहे असे समजावे. हे चांगुलपण किंवा त्यावरील विश्वास संपला तर आपण संपलो. म्हणून चांगल्या गोष्टींची कदर करायलाच हवी. ते करताना जे काही चुकीचे घडतेय त्यावरही अंकुश लावायला हवा. 

वैभव पाटील या विद्यार्थ्याने पैसे देऊन पेपर विकत घेतला आणि अभियांत्रिकीची पदवी मिळवली ही घटना आपल्या शिक्षणव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. वैभव संबंधित गुन्हेगारांची नावे सांगत नसल्याने त्याच्या हेतूबाबतही शंका घ्यायला वाव आहे. मात्र तो जर पश्चातापाने खरोखर त्रस्त असेल आणि त्याच्या चांगुलपणाने त्याला साद दिली असेल तर यापेक्षा मोठी आनंदाची बातमी असू शकत नाही. आपल्या हातून घडलेली चूक, घडलेला गुन्हा मान्य करायला, तो स्वीकारून त्यात सुधारणा करायला धाडस लागते. 

वैभव त्याचा पेपर वीस हजार रूपयात घेतल्याचे सांगतो. अशा घटना सर्वत्र आणि सर्रासपणे आढळून येतात. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या घरीच काही विद्यार्थी आदल्या दिवशीचा पेपर दुसर्‍या दिवशी सोडवताना जागीच सापडले होते. त्याचे पुढे काय झाले हे आम्हास कळले नाही. मात्र आपल्याकडे राज्यकर्त्यांचे जे होते तेच त्या नगरसवेकाचे, संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे आणि विद्यार्थ्यांचे झाले असणार!
माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये असे म्हणतात! आपण त्याच त्या चुका वर्षानुवर्षे करीत आहोत. म्हणूनच इतिहासाची माहिती नाही, वर्तमानाचे ज्ञान नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही अशी गत आजच्या तरूणाईची झाली आहे. यातून बाहेर पडायचे तर कायद्याच्या कठोर अंमलबजावणीबरोबरच आपल्यातील वाईट प्रवृत्ती, अप्रामाणिकपणा दूर सारून चांगुलपणा वाढविण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याकडील व्यवस्था, यंत्रणा, सामाजिक संस्था, माध्यमे आणि ‘ज्ञानकेंद्रं’ ठरतील अशा अन्य व्यक्ती आणि संस्थांनी यापुढे यासाठीच काम करणे गरजेचे आहे.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Tuesday, July 4, 2017

पुस्तक प्रकाशनाला खर्च किती येतो?



पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतून प्रकाशन संस्था चालवताना अनेक गमतीशीर अनुभव येतात. कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य, नाटक अशा सगळ्या प्रकारची पुस्तकं आम्ही ‘चपराक’ तर्फे प्रकाशित केलीत. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ अशी आवई सर्वत्र दिली जात असतानाच आमची सातत्याने येणारी पुस्तकं पाहून अनेकजण आमच्याकडे पुस्तक प्रकाशनाविषयी विचारणा करत असतात. त्यात ‘पुस्तक प्रकाशनाला खर्च किती येतो?’ हा एक प्रश्न अटळ असतो. 

ज्यांच्या कधी चार ओळीही वाचल्या नाहीत, जे कधी कुठे भेटलेही नाहीत ते फोन करतात आणि पहिलाच प्रश्न विचारतात, ‘‘आम्हाला पुस्तक काढायचंय... खर्च किती येतो?’’

त्यांना मी सांगतो, ‘‘बाबा रे! अजून मुलगी बघितलीही नाही. तिची आधी गाठ घाल. आम्ही एकमेकांना बघू आणि पुढचे ठरवू! स्थळ आहे इतकंच कळल्यावर थेट बारशाच्या कार्यक्रमाचीच विचारपूस कशाला करतोस?’’ त्यावर ते जरा थांबतात आणि मग संहिता पाठवतात.  

सध्या बहुतेक लेखकांना प्रकाशक म्हणजे ‘प्रिंटर’ वाटतो. त्याला द्या पैसे आणि हवे ते पुस्तक घ्या छापून! 

हे असे का व्हावे? मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेच्या नावे गळे काढणारे यावर शांत का? अनेक प्रकाशकांचा हा ‘धंदा’ असतो म्हणून ते बोलत नाहीत. मग याची नेमकी सुरूवात कशी झाली? हे लोन इतके का वाढले? त्यामुळे मराठी भाषेचे काही नुकसान झाले की फायदाही झाला? या सगळ्याचा मुळातूनच विचार करणे गरजेचे आहे.

काही प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक त्यांच्या वेळेनुसार आणि हौस म्हणून अधूनमधून ‘काहीबाही’ लिहित असतात. ते पुस्तक स्वरूपात यावे असे त्यांना किंवा त्यांच्या खुशम्हस्कर्‍या चमच्यांना वाटत असते. पुस्तक आले की सगळीकडे लेखक म्हणून ‘मिरवता’ येते. चार ठिकाणी प्रकाशन सोेहळ्याच्या बातम्या येतात. पुस्तकांची परीक्षणं छापून येतात. संबंधित विभागात बढतीचीही शक्यता असते. गेला बाजार चार-दोन सटरफटर पुरस्कारही मिळतात. मग ही संधी का सोडायची असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी एखादा प्रकाशक गाठला जातो. पाच-पन्नास हजार रूपये देऊन त्याच्याकडून पुस्तक प्रकाशित करून घेतले जाते आणि मग त्यांचे ‘साहित्यिक योगदान’ विविध माध्यमांद्वारे सातत्याने ‘ठसवले’ जाते. त्यासाठी काही प्रकाशकांनी चक्क ‘रेट कार्ड’ छापून घेतलेय आणि प्रकाशन समारंभापासून ते त्याची निर्मिती, जाहिरात याबाबतचे दर त्यात दिलेत.

यापुढे जाऊन काही प्रशासकीय अधिकारी तर विविध सरकारी योजनांना ही पुस्तके लावतात. आपल्या अधिकारांचा वापर करून अनेकांना ती विकतही घ्यायला लावतात. थेट ‘लाच’ स्वीकारण्याऐवजी आपण ‘वाचनसंस्कृतीचा’ कसा प्रसार करतोय हे सांगितले जाते. मग त्यांच्या आवृत्यावर आवृत्या निघतात. काहीवेळा त्यातील निवडक भाग शालेय अभ्यासक्रमातही समाविष्ट केला जातो. आजच्या अभ्यासक्रमातील बराचसा रद्दाड मजकूर बघितल्यावर कुणाचीही त्याची खात्री पटेल. कवी म. भा. चव्हाण म्हणतात,

कोण लेकाची कोणाची देशसेवा पाहतो
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो! 

वाचकांच्या हाती त्यातून काय येते? तर मराठी साहित्याविषयी उदासीनता आणि आपल्या साहित्य क्षेत्राविषयीचा राग! त्यामुळे अशा प्रसिद्धीची चटक लागलेल्या लेखकांनी आणि गल्लाभरू प्रकाशकांनी मराठी साहित्याचे मोठे नुकसान केलेय, हे वास्तव मान्य करण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे ‘पुस्तकासाठी खर्च किती येतो?’ असा प्रश्न आला की व्यक्तिशः मला त्यांच्या साहित्यिक दर्जाविषयी शंका येते. अर्थात अनेकदा नवलेखकांना याविषयीची माहितीही नसते, त्यामुळेही हा प्रश्न विचारला जात असावा.

काही लेखक ‘तुम्ही मानधन देता का?’ असाही प्रश्न विचारतात. त्यांचे मला कौतुक वाटते. चांगल्या साहित्याला मानधन देणे हे प्रकाशकांचे कर्तव्यच आहे आणि ते आम्ही देतो! आमचे अनेक लेखक याबाबतची साक्ष देतील! 

आता आमच्या कामकाजाविषयी थोडक्यात सांगणे गरजेचे आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय पुस्तके प्रकाशित करताना त्याचा ‘गुणात्मक दर्जा’ हा एकमेव निकष आम्ही बघतो. नवोदित-प्रस्थापित, जात-धर्म, प्रांत, लेखकाचे वय, लिंग अशा बाबीही बघण्याची कुप्रथा या पवित्र क्षेत्रात सुरू झालीय. त्यामुळे हे सांगणे आवश्यक वाटते. वेगळ्या विषयांवरील, सांस्कृतिक संचित पेरणारी पुस्तके आम्ही चोखंदळपणे निवडलीत आणि लेखकांचा पूर्ण सन्मान राखत, आकर्षक स्वरूपात ती प्रकाशित केलीत. त्याची जाहिरात आणि वितरण यासाठी प्रचंड कष्ट उपसलेत. म्हणूनच नवोदितांच्या पुस्तकांच्याही चार-चार, पाच-पाच आवृत्या अल्पावधितच प्रकाशित होण्याचा विक्रम घडला. अशी पुस्तके लेखकांना आणि आम्हाला पैसा व प्रतिष्ठा मिळवून देणारी ठरली.
काही कवितासंग्रह, नाटके आम्ही पदरमोड करून प्रकाशित केली. त्यांचे निर्मितीमूल्य सोडाच मात्र प्रकाशन समारंभाचाही खर्च निघाला नाही. अशा पुस्तकांचे कर्ज फेडत राहिल्याने हातातील अन्य दर्जेदार कलाकृतींवर निश्चितच अन्याय झाला. 

मग व्यावसायिक तडजोडी स्वीकारत आम्हीही यातून मध्यममार्ग काढला. आम्हाला आवडलेल्या आणि आम्ही निवडलेल्या विषयांवरील पुस्तके आम्ही आमच्यातर्फे प्रकाशित करतो. त्यातून लेखकांचेही समाधान होईल याला प्राधान्य देतो. मात्र काही पुस्तके दर्जेदार असूनही ती बाजारात कितपत चालतील याची खात्री नसते. साहित्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या कवितांचा क्रम तर विक्री व्यवस्थेत गृहितच धरला जात नाही. त्यामुळे ज्या लेखकांची पुस्तके आम्हाला प्रकाशनयोग्य वाटली आणि त्यांची काही गुंतवणूकीची क्षमता आहे त्यांच्याकडून माफक निर्मितीमूल्य घेऊन त्याबदल्यात तितक्या रकमेची पुस्तके त्यांना द्यायची व पुस्तक प्रकाशित करायचे. यातील काही प्रती लेखकांनी विकत घेतल्याने होणार्‍या नुकसानीचा भाग तुलनेने कमी होतो. हे करतानाही पुस्तकाचा दर्जा, व्याकरण, मांडणी, मुखपृष्ठ, कागद, छपाई, बाईंडिंग आणि नंतर त्याचे वितरण यात कसलीही तडजोड केली जात नाही. पुस्तकाचा आशय आणि विषय आम्हाला आवडला तरच ते प्रकाशनासाठी निवडले जाते आणि आवश्यक तिथे संपादकीय संस्कार करून  ते पुस्तक जास्तीत जास्त परिपूर्ण कसे होईल यासाठी आमचे प्रयत्न असतात.

या माध्यमातून एकच सांगावेसे वाटतेय, तुम्ही जर उत्तम लिहित असाल तर प्रकाशक मिळत नाहीत, प्रकाशनासाठी पैसे नाहीत अशा गोष्टींचा विचार करू नकात! तुमचे साहित्य आमच्यापर्यंत पाठवा. ते योग्य वाटले तर त्याला न्याय देणे ही आमची जबाबदारी! मराठीत सर्वाधिक पुस्तके प्रकाशित होत असताना ती केवळ ‘संख्यात्मक’ न ठरता ‘गुणात्मक’ही ठरावेत यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करूयात! 

त्यामुळे ‘पुस्तक प्रकाशनाला खर्च किती येतो?’ याची  अनाठायी भीती न बाळगता आधी तुम्ही जास्तीत जास्त चिंतनशील, प्रबोधनपर, रंजक, अभ्यासपूर्ण लिहा आणि ते आमच्यापर्यंत पाठवा. 

त्यासाठी संपर्क - ‘चपराक प्रकाशन’, 617, साईकृपा, पहिला मजला, शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ,  पुणे 411 002. दूर. 020-24460909.
websait : www.chaprak.com

Saturday, July 1, 2017

धडाकेबाज महेश भागवत


स्वातंत्र्यानंतर खाकी आणि खादी हीच आपल्या देशाची ओळख झाली. मात्र हे दोन्ही घटक इतके बदनाम झाले की लोक खाकी आणि खादीवाल्यांचा सर्वाधिक तिरस्कार करू लागले. त्यांना शिव्या घालू लागले. यांच्यातीलच काहींनी हे क्षेत्र पुरते बदनाम केले. असे असले तरी या क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोकानी या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सगळंच काही संपलेलं नाही हा विश्वास निर्माण केला आणि चांगुलपणाच्या जोरावर सामान्य माणसाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. खाकीतला माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या भल्यासाठी अहोरात्र एक करतो तेव्हा व्यवस्थेवरचा, यंत्रणेवरचा विश्वास दृढ होतो. वर्दी अंगावर असतानाही एखादा माणूस सामान्य माणसात मिसळून काय करू शकतो हे पहायचे असेल तर राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याकडे पहावे. हैदराबादच्या जवळच असलेल्या तीन पोलीस आयुक्तालयांमध्ये राचकोंडाचा समावेश होतो.

महेश भागवत 1995 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे. त्यांचे आईवडील शिक्षक. पाथर्डीच्या विद्यामंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवतांनी पुण्यातून सिव्हील इंजिनिअरींग केलं. सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील अनेक अधिका-यांचे ‘आयडॉल’ ठरलेले मराठमोळे भागवत त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे जगभर दखलपात्र ठरले आहेत. त्यांनी मानवी तस्करीच्या विरूद्ध जो लढा उभारला त्याची दखल अमेरिकेलाही घ्यावी लागली. अमेरिकेच्या गृहखात्याने नुकतेच त्यांना ‘2017 ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज ऍवार्ड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला आहे. भारतात विविध क्षेत्रातील सात जणांना हा पुरस्कार दिला गेलाय. गोव्याचे पोलीस आयुक्त आमोद खान यांना 2005 साली, 2009 साली आंध्रप्रदेशच्या एस. उमापती यांना, मुंबईतील पीटा न्यायालयाच्या न्यायधीश स्वाती चव्हाण, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यर्थी, पद्मश्री डॉ. सुनिता कृष्णन यांना हा सन्मान देण्यात आला होता. भागवत यांच्यासह जगभरातील सात पोलीस अधिका-यांचा यंदा या सन्मानाने गौरव करण्यात येणार असून हा सन्मान मिळवणारे ते भारतातील तिसरे पोलीस अधिकारी ठरले आहेत.

वॉशिंग्टन येथे 2017 चा ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन्स’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. अमेरिका हा अहवाल प्रकाशित करते. त्या अहवालात भागवत यांनी मानवी तस्करी विरोधात केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला. अमेरिकेची यंत्रणा या विषयावर सर्वेक्षण करते. जे देश मागे आहेत त्यांना याबाबतचा अहवाल देऊन सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात येतात. यंदा अमेरिकेचे सेक्रेटरी आणि राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार युवांका ट्रम्प यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले व त्यांनी स्वतः हे पुरस्कार दिले. 

2004 ला महेश भागवत सायबराबाद क्षेत्राचे पोलीस उपायुक्त होते. सायबराबाद हा हैदराबाद येथील अत्यंत संवेदनशील भाग. चारमिनारही याच परिसरात येतो. त्यावेळी त्यांची रात्रपाळी असायची. एकदा त्यांना एका रिसॉर्टची माहिती मिळाली. मुंबई आणि कोलकत्याच्या मुली तिथे वेश्या व्यवसायासाठी यायच्या. भागवतांनी तिथे छापे मारले. कुणाला संशय येऊ नये म्हणून 15 दिवस त्या मुली हैदराबादला  स्कूल बसने यायच्या. रात्री हा उद्योग चालायचा. जुन्या आंध्रातून मुली भारतातल्या ब-याच शहरात पाठवल्या जायच्या. 

2004 साली त्यांची नलगोंडा पोलीस अधिक्षकपदी बदली झाली. तिथे असताना त्यांना एक भयंकर प्रकार कळला. डोंबारा  (डोंबारी) या जातीत जन्मलेल्या प्रत्येक मुलीने आणि महिलांनी  वेश्या व्यवसायच करायचा अशी तिथे प्रथा होती. त्याठिकाणी यादगिरीगुट्टा नावाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. तिथे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो. भागवतांनी सुरूवातीला छापे टाकून मुली पकडल्या. कुंटणखाने बंद केले. मग त्या पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं, ‘‘आम्हाला पर्यायी काम द्या... आम्ही हे थांबवतो.’’ 

या महिलांसाठी त्यांची मुलंच ग्राहक शोधून आणायचे. त्या मुलांना त्यांचा बाप कोण हेही माहीत नसायचं. ही मुलं इतर मुलींनाही या व्यवसायात आणायची. त्यावर भागवतांनी कठोर कारवाई केली. ‘आसरा’ नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यात जिल्हाधिकारी, महसूल खातं, शिक्षण खातं, ग्रामीण विकास यंत्रणा, ओबीसी कॉर्पोरेशन, अशासकीय सदस्य म्हणून स्वयंसेवी संस्था, इंडियन रेडक्रॉस आणि जवळपासचे उद्योग यांचा सहभाग करून घेतला. या प्रकल्पाची दोन सूत्रं होती. एक तर या बायकांची सुटका करणं आणि दुसरं त्यांना जे प्रवृत्त करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणं. मग त्यातून बाहेर पडलेल्या बायकांचे बचत गट तयार केले. त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं. तीन-तीन महिन्यांचे उद्योग प्रशिक्षण दिले. जवळपासच्या उद्योगात काहींना रोजगार मिळाला. यांची चार-पाच वर्षापासून ते पंधरा वर्षांपर्यंतची मुलं होती. ती शाळेत जात नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा सुरू केली. निवासी शाळा होती ती! त्यात 65 मुलं होती. एक वर्ष ती शाळा चालल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना रेग्युलर शाळेत टाकले. 

या महिलांची 10-15 तरूण मुलेही होती. त्यांना पोलीस हेड क्वॉर्टरमध्ये प्रशिक्षण देऊन खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून नोक-या मिळवून दिल्या. यांचे पुनर्वसन केल्यानंतर 90 टक्के वेश्या व्यवसाय थांबला. मुख्य म्हणजे त्यांच्या हद्दीतील गुन्हे कमी झाले. 2006 साली त्यांच्या या प्रकल्पाला अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे दोन पुरस्कार मिळाले. त्यासाठी  महेश भागवत आणि त्यांचे एक पोलीस निरीक्षक बॉस्टनलाही जाऊन आले. 

त्यानंतर सीआयडीला पोलीस अधिक्षक म्हणून बदली झाली. तिथं आल्यावर एक प्रकल्प आला. यू. एन. ओ. डी. सी आणि भारताचं गृहमंत्रालय या दोघांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी पाच राज्यं निवडली. त्यात पोलिसांना प्रशिक्षित करणं, स्वयंसेवी संस्था, पोलीस यांना एका छत्राखाली आणणं, त्या व्यवसायातून सोडवलेल्या महिलांना स्वावलंबी करणं, त्यांना त्रास न देता त्यांना उद्युक्त करणा-यांवर, त्यांच्या जीवावर जगणा-यांवर कठोर कारवाई करणं असा तो प्रकल्प होता. हा पहिला प्रकल्प हैदराबादला सुरू झाला. मग त्यांनी नियोजनबद्ध काम केलं. हैदराबाद येथून मुली मुंबई, भिवंडी, पुणे, गोवा, बंगलोर, दिल्ली इथं कुंटणखान्यात नेल्या जात होत्या. चंद्रपूर, यवतमाळ, वनी इथं चालणार्‍या वेश्या व्यवसायावर भागवतांनी छापे मारले. पहिली कारवाई जानेवारी 2007 मध्ये भिवंडीला हनुमान टेकडी परिसरात केली. त्यात अनेक बायकांची सुटका झाली. त्यातील अल्पवयीन मुलींना स्वयंसेवी संस्थांकडे दिले. त्यावेळी  एका राज्यातून दुस-या राज्यात काम करताना कसे करायचे, एकमेकांना कशी मदत करायची, गुन्हेगारी कमी होण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याचा त्यांनी अभ्यास केला. पुरावे कसे गोळा करायचे, नंतर सर्वत्र छापे कसे मारायचे याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. महिलांचे पुनर्वसन केले. त्यातून लेखनही सुरू केले. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या मानवी तस्करीच्या अभ्यासक्रमात महेश भागवत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा समावेश आहे. 

 2009 साली त्यांची पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली. तिथं त्यांच्या हद्दीत चार जिल्हे होते. तिथून सगळ्यात मोठा वेश्या व्यवसाय चालायचा. सिंगापूर, मलेशिया, दुबई मद्रास, बंगलोर, दिल्ली इकडं महिला पाठवल्या जायच्या. म्हणून पुन्हा तिथं तेच काम सुरू केलं. त्यावेळी त्यांनी दुबईहून दोन मुलींची सुटका केली. एका मुलीला सिंगापूरला पाठवलं जात होतं. त्यावर वेळीच कारवाई करून तिची सुटका केली आणि संबंधितांना दहा वर्षांची शिक्षाही झाली. कुंटणखाने बंद केले. ‘पीटा’चा कायदा 1956 पासून आहे. 1986 पासून तो अंमलात आला. हा पीटाचा कायदा खूप प्रभावी आहे. त्यात  लहान मुलींना घेऊन कुणीकुंटणखाना चालवत असेल तर तीन वर्षासाठी तो सील करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांना दिलेत. ते सील केल्यावर कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही. दुर्दैवानं हा कायदा वापरण्याची इच्छाशक्ती आपल्याकडे नसते. तो कायदा वापरायला आणि कुंटणखाने सील करायला भागवत आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुरूवात केली. 

तेलंगणातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात चद्दापूरम् नावाचे गाव आहे. या गावाचा दोनशे ते तीनशे वर्षाचा कुंटणखान्याचा इतिहास आहे. ते कुंटणखाने भागवतांनी बंद केले. लॉजेस, ब्युटी पार्लर येथील वेश्या व्यवसायावर कठोर कारवाई केली. त्यानंतर 1 जुलै 2016 ला त्यांची पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली तेव्हा लक्षात आलं की या व्यवसायाचंही स्वरूप आता बदललंय. इकडंही ऑनलाईन सुरू झालंय. वेश्या व्यवसायाठी वेबसाईट वापरल्या जातात. त्यावर नंबर दिले जातात. मागणी असेल त्याप्रमाणे मुली पाठवल्या जातात. मग त्यांनी त्यावर लक्ष ठेवलं. शंभरएक मुलींची त्यातून सुटका केली. दोनशे-अडीचशे ठिकाणी कारवाई केली. इतक्या मोठ्या स्वरूपात प्रथमच कारवाई झाली.

भागवतांनी बालकामगार विरोधी अभियानही सुरू केलं. विटभट्ट्यावर ओडिसाची मुलं येतात. त्यांना सहा महिन्यासाठी हजार-दोन हजार रूपये दिले जातात आणि त्यांच्याकडून दिवसरात्र काम करून घेतलं जातं. त्यांचे काही पालक सोबत असतात. काहीवेळा बोगस पालकही या मुलांबरोबर येतात. त्या विटभट्ट्यावर छापे मारून आजवर 498 मुलांची सुटका केली. नंतर त्यांना शाळेत घातले. ‘ओडिया’ ही यांची मातृभाषा. म्हणून ओडिसातून शिक्षक आणले आणि त्यांना शिक्षण दिले. हे सगळं काम पुढं आल्यानं त्यांना हा पुरस्कार मिळाला. ‘‘तेलंगण सरकार आणि पोलीस दलाने मानवी तस्करी संपुष्टात आणण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचा हा गौरव आहे,’’ असं महेश भागवत सांगतात.

प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंच व्हावी अशी त्यांची कर्तबगारी आहे. त्यांच्या अचाट कर्तृत्वाला, धाडसाला, जिंदादिलपणाला सलाम! 
- घनश्याम पाटील, 
संपादक, प्रकाशक, 'चपराक', पुणे
7057292092
ghanshyam@chaprak.com

इतरही दर्जेदार लेख वाचण्यासाठी भेट द्या - www.chaprak.com

Tuesday, June 27, 2017

उमलत्या अंकुरांना बळ द्या!

मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाहीत असं म्हटलं जातं. मात्र या मोठ्या झाडांमुळेच नवनवीन झाडे तयार होतात आणि सृष्टीत नवचैतन्य फुलवतात. साहित्याचंही तसंच आहे. (फार तर होतं असं म्हणूया!) अफाट ताकदीच्या बेफाट लेखकांनी नव्या पिढीला ‘विचार’ दिला. चांगलं लिहिणार्‍यांना हेरून त्यांच्या प्रतिभेला खतपाणी घातलं. सध्याच्या काळात मराठीला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण लागलेलं असताना एकेकाळी मात्र या लेखकांनी अनेक उमलते अंकुर पुढे आणले.
शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’ लिहिली; मात्र त्यांना प्रकाशकच मिळत नव्हता. अनेकांचे उंबरठे झिजवूनही निराशाच वाट्याला येत होती. त्यावेळी त्यांनी गदिमांना त्यातील काही प्रकरणं पाठवली. गदिमांनी ती वाचली आणि ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’च्या कुलकर्णींना फोन केला. गदिमा कुलकर्णींना म्हणाले, ‘मुलगी नाकीडोळी नीटस आहे. तुम्ही करून घ्यायला हरकत नाही...’ त्यानंतर शिवाजी सावंत यांच्यासारखा बलाढ्य लेखक मराठीला मिळाला.
कुसुमाग्रजांचंही तसंच! कविता हा साहित्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कार असला तरी कवितासंग्रह छापण्याचे धाडस फारसे कोणी करत नाही. त्यातही नवोदित कविंच्या वाट्याला तर प्रचंड उपेक्षा आणि अवहेलना येते. तात्यासाहेबही याला अपवाद ठरले नाहीत. या कविता भाऊसाहेब खांडेकरांच्या वाचण्यात आल्या. त्यांनी पदरमोड करून कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. यातूनच मराठीला ‘ज्ञानपीठ’विजेता कवी मिळाला.
ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांनी एक किस्सा सांगितला. म. दा. भट नावाचे एक विख्यात ज्योतिषी होते. वैद्य त्यांच्या घरी बसले होते. त्याचवेळी तिथे गझलसम्राट सुरेश भट आले. मदा आणि सुरेश भट यांच्यात चर्चा झाली. नंतर मदांनी सुरेश भटांना सांगितले, ‘हे रमेश गोविंद. उत्तम कविता करतात.’ सुरेश भटांनी लगेच त्यांना कविता म्हणायला लावल्या. त्या ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘माझ्यासाठी रिक्षा घेऊन ये...’
वैद्यांनी त्यांना ‘कुठं जायचंय?’ असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘तुम्ही रिक्षा तर आणा.’
वैद्यांनी रिक्षा आणली. सुरेश भट घराबाहेर आले आणि वैद्यांना म्हणाले, ‘बसा रिक्षात.’ ते निमुटपणे रिक्षात बसले. भटांनी पहाडी आवाजात फर्मावले, ‘आकाशवाणीकडे घ्या...’
त्यानंतर ते दोघे पुणे आकाशवाणी केंद्रात पोहोचले. भटांनी तेथील प्रमुखांकडे रमेश वैद्यांना नेले आणि सांगितले, ‘मगाशी जी काही बडबड केली ती इथे करा...’
वैद्यांनी कविता ऐकवल्या. त्यानंतर भट आकाशवाणीतील अधिकार्‍याला म्हणाले, ‘वाट कसली पाहताय? यांच्या कविता आपल्या रसिकांपर्यंत जायला हव्यात...’ खुद्द सुरेश भट एका कविला घेऊन आल्याने त्यांना नकार देण्याची कुणाची बिशाद? रमेश गोविंद वैद्य हे नाव त्यावेळी सर्वप्रथम आकाशवाणीच्या श्रोत्यांपर्यंत गेले.
एकेकाळी बालभारतीत प्रमुख असलेल्या आणि आता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह असलेल्या माधव राजगुरू यांनाही असाच एक सुखद अनुभव आला. त्यांनी त्यांची एक कविता राम शेवाळकर यांना वाचायला दिली. ती वाचल्यावर शेवाळकरांनी सांगितले, ‘जेवायला बोलवून हातावर बडीसोप ठेऊ नकात. मला तुमच्या सगळ्या कविता वाचायला द्या.’ राजगुरू यांनी त्यांची कवितांची डायरी शेवाळकरांकडे सुपूर्द केली. त्यानंतर काही दिवस गेले. राजगुरूंना शेवाळकरांना प्रतिक्रिया विचारण्याचे धाडस झाले नाही. शेवाळकरांनीही काही कळवले नाही. राजगुरूंनी विषय सोडून दिला आणि एकेदिवशी अचानक पुण्यातल्या एका प्रकाशकांचा त्यांना फोन आला. ते म्हणाले, ‘शेवाळकर सरांनी तुमच्या कविता माझ्याकडे पाठवल्यात. त्याची प्रस्तावनाही त्यांनीच लिहिलीय. त्या प्रकाशित करायच्या आहेत. एकदा येऊन भेटा.’ आणि माधव राजगुरू यांचा कवितासंग्रह वाचकांच्या भेटीस आला.
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याबाबतही मी अनेकवेळा हा अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रातील लिहित्या हातांना ते कायम बळ देतात. प्रकाशक या नात्याने त्यांनी अनेक कवी, लेखकांना माझ्याकडे पाठवले आहे. व्याख्यानाच्या निमित्ताने फिरताना कुणी उपेक्षित कवी भेटला तर त्याचे साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी त्यांची धडपड असते. इतकेच नाही तर काहींना त्यांच्या योग्यतेनुसार कुठे नोकरी मिळेल काय यासाठीही ते प्रयत्नशील असतात.
दुर्दैवाने सध्या अशा लेखकांची कमतरता जाणवत आहे. ‘एकवेळ माझं साहित्य बाजूला ठेवा पण या नवोदितांचं वाचा’ असं सांगणारे लेखक दुर्मीळ झालेत आणि हीच मराठीची शोकांतिका आहे. जोपर्यंत उमलत्या अंकुरांना आपण बळ देणार नाही तोपर्यंत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेला बहर येणार नाही. त्यासाठी प्रस्थापितांनी पुढाकार घेणे, संकुचितपणा बाजूला सारून नव्याचे कौतुक करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकार आपल्याकडील महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ सक्तीचे करतेय. मराठीसाठी ‘सक्ती’ करावी लागते हे आपल्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. मायमराठीचे जतन आणि संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त मराठीत बोलायला  हवे. मराठी वाचायला हवे. प्रस्थापितांबरोबरच नवोदितांचे साहित्य वाचून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. चांगले वाचक तयार झाले तरच चांगले लेखक निर्माण होतील. त्यामुळे लेखकांनी समाजाभिमुख होणे जितके गरजेचे आहे त्याहून समाजाने साहित्याभिमुख होणे जास्त आवश्यक आहे. तसे झाले तर मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी लक्षात घेऊन खारीचा वाटा उचलला तरी मराठी ही जगातली प्रमुख भाषा होऊ शकेल.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Tuesday, June 20, 2017

इतिहासाचे भीष्माचार्य!

असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!
13 फेब्रुवारी 1894 ला पेण येथे जन्मलेल्या बेंद्रे यांनी 1918 ला प्रथम भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकले आणि नंतर हयातभर स्वतःला महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा ‘17 व्या शतकाचा इतिहास’ हे संशोधनाचे क्षेत्र निवडले. एक साधन-संग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार अशा भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सन 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड ‘साधन चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याद्वारे त्यांनी नवीन अभ्यासक आणि संशोधकांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. बेंद्रे यांचे अफाट कार्य, चिकाटी व इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून 1938 मध्ये त्यांना खास शिष्यवृत्ती मिळाली व ते हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला गेले. पेशवे दप्तरातील सुमारे चार कोटी विस्कळीत कागदपत्रांचे कॅटलॉगिंग व विषयवार मांडणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यावेळी इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छ. शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित होते. ते योग्य नाही हे बेंद्रेंच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिवरायांच्या मूळ चित्राच्या संशोधनासाठी ते पुढे सरसावले. मॅकेनझीच्या ग्रंथाचे अवलोकन करताना त्यांना व्हलेंटाईन या डच चित्रकाराने काढलेले सुरतेच्या वखारीतील तिथल्या गव्हर्नराच्या भेटीचे महाराजांचे चित्र मिळाले. ज्यावेळी ते इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांनी प्रथम या चित्राची खात्री केली. हे चित्र पुढे आणण्यासाठी ‘इंडिया हाऊस’कडून परवानगी मिळवली आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ते प्रसिद्ध केले. आज आपल्या सरकारी कार्यालयात लावले जाणारे छत्रपती शिवरायांचे हेच ते चित्र! वा. सी. बेंद्रे यांची ही कामगिरी इतिहास संशोधन क्षेत्रात उत्तुंग ठरली.
त्याकाळी संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली. त्यातील बहुतेक नाटकात संभाजीराजे व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी असेच चित्र नाटककारांनी उभे केले होते. सोनाबाई केरकर या पहिल्या महिला नाटककार. 1886 साली त्यांनी संभाजीराजांचे चरित्र लिहिले होते. त्यातही राजांचे असेच वर्णन होते. इतिहास संशोधनाच्या अपुर्‍या साधनांमुळे छ. संभाजीराजांची मलिन झालेली प्रतिमा प्रथम धुवून काढण्याचे प्रचंड मेहनती काम बेंेद्रे यांनी केले. त्यासाठी त्यांनी चाळीस वर्षे संशोधन केले. परदेशात जाऊन साधने मिळवली. इंग्लंडहून त्यांनी 25 खंड होतील इतकी कागदपत्रे भारतात आणली. पुढे सन 1958 साली ‘छ. संभाजीराजांचे चरित्र’ हा 650 पानांचा चिकित्सक ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला. त्यामुळे संभाजीराजांची युद्धनीती, त्यांची धर्मप्रवणवृत्ती, त्यांचा तेजस्वी पराक्रम लोकांना ज्ञात झाला. मराठ्यांची अस्मिता ठरणार्‍या या राजांच्या बदनामीचा कलंक पुसून काढण्याचे काम करणार्‍या या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सात हजार रूपयांचे अनुदान दिले होते. छत्रपती संभाजीराजांची समाधी वढू ब्रुद्रुक येथे आहे हे सर्वप्रमथ त्यांच्याच लक्षात आले. त्यासाठीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचेही चरित्र लिहिले. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग, साठहून अधिक ग्रंथांचे लेखन, वयाच्या ऐंशीव्या वर्षी लिहिलेला ‘राजाराम चरित्रम्’ हा ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना अशा अफाट कार्यामुळे ते इतिहास संशोधन क्षेत्रातील भीष्माचार्य ठरतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे हे अफाट कार्य उभे करतानाच त्यांनी हुंडाविरोधी चळवळही उभी केली. ब्रदरहुड स्काऊट संघटना काढली. वयाच्या 90 व्या वर्षी म्हणजे 16 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी उभ्या केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला त्यांची नात साधना डहाणूकर यांनी दीड लाख रूपये देणगी दिली. त्यातून दरवर्षी एका इतिहास संशोधकाला कै. वा. सी. बेंद्रे पुरस्कार दिला जातो. यंदाचा (2017) पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात आला.
जाता जाता एक गोष्ट मात्र प्रांजळपणे सांगाविशी वाटते. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास लेखन जिथे संपते तिथूनच त्याला खर्‍याअर्थी फाटे फुटतात. बेंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजांचे ‘चंपा’ नावाच्या एका रजपूत मुलीशी लग्न झाल्याचे लिहिले आहे. या विवाहाचे सविस्तर वर्णनही त्यांनी केले आहे. वस्तुतः त्यावर पी. आर. गोडे या संशोधकाने शोधनिबंध लिहून ही घटना नंदुरबारच्या शंभूराजे देसाई यांच्याबाबत घडल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तरीही नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतून हा मजकूर काढून टाकण्यात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551, (19 फेब्रुवारी, सन 1630) ही नक्की करण्याचे अभूतपूर्व कामही वा. सी. बेंद्रे यांनीच केले. या महान इतिहास संशोधकाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता जपली जावी यासाठी त्यांचे महाराष्ट्रात यथोचित स्मारक होणे गरजेचे आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Tuesday, June 13, 2017

अफाट प्रतिभेचे धनी!

लोककवी मनमोहन नातू आणि रॉय किणीकर या अफाट प्रतिभेच्या बेफाट अवलियांनी आपल्या कुटुंबाची होणारी परवड लक्षात न घेता केवळ साहित्यासाठीच स्वतःला वाहून घेतले. दोघेही स्वच्छंदी आणि बेफिकीर मनोवृत्तीचे; मात्र सरस्वती मातेच्या दरबारातले सच्चे पुजारी! एकेठिकाणी मनमोहनांनी लिहून ठेवले आहे, ‘‘भविष्यात जेव्हा कधी दगडाचे भाव स्वस्त होतील, तेव्हा, पुतळा माझा उभारणार्‍यांनो, आधी किणीकर खोदा!’’
मराठीत रूबाई हा प्रकार माधव जुलियन यांनी आणला हे त्रिकालबाधीत सत्य असले तरी त्यात ‘प्राण’ फुंकण्याचे काम मात्र रॉय किणीकर नावाच्या एका कलंदर माणसाने केले. कथा, कविता, नाटक अशा सर्वच साहित्यप्रकारात लीलया संचार करणारे रॉयसाहेब हे संपादन क्षेत्रात मैलाचा दगड ठरावेत. आपल्या संपादकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग करून मराठी वाचकांची दर्जेदार वाचनाची भूक भागवली.
एका ध्येयाने झपाटून त्यांनी आपली कलासाधना अविरत सुरूच ठेवली. नियतीने त्यांची पदोपदी परीक्षा बघितली; मात्र अशा गोष्टींना न जुमानता त्यांनी आपल्या चेहर्‍यावरील स्मितरेषा कधीही ढळू दिली नाही. प्रचंड विद्वान असणारे रॉयसाहेब विनोदी वृत्तीचे होते. त्यांच्याबाबतचा एक भन्नाट किस्सा याठिकाणी आवर्जून सांगावासा वाटतो.
दत्तगुरूवरील एका चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते. श्री दत्त त्यांचे भगवे कपडे परिधान करून शिष्यांच्या लवाजम्यासह चाललेत आणि त्यांच्यामागे काही कुत्री येताहेत असा प्रसंग चित्रीत करायचा होता. मात्र कॅमेर्‍यात हा ताफा येत नव्हता. कुत्री काही दत्ताच्या मागे येईनात. काहीवेळा कुत्री पुढे तर दत्तगुरू मागे आणि काहीवेळा दत्तगुरू पुढे तर कुत्री मागे, अशी कवायत चालली होती. हा सगळा गमतीशीर प्रकार पाहून किणीकर पुढे सरसावले आणि दिग्दर्शकाला सांगितले की, ‘‘हा प्रसंग मी पाच मिनिटात पूर्ण करतो.’’ आधीच वैतागलेल्या दिग्दर्शकाने त्यांना अनुमती दिली.
किणीकरांनी हुकूम सोडला, ‘‘अरे, जरा पाव किलो मटण आणा.’’   एकतर श्रीदत्तावरील चित्रपट; त्यात बहुतेक कलाकार अस्सल सदाशिवपेठी! त्यामुळे सगळ्यांनाच हा काय प्रकार ते कळेना. शेवटी त्यांच्या आदेशाप्रमाणे मटण आणले गेले. त्यांनी सांगितले, ‘‘ते टाका आता दत्ताच्या झोळीत!’’
दत्ताच्या झोळीत मटण टाकले आणि त्या वासाने कुत्र्यांनी त्यांचा पिच्छा पुरवला. खरोखरच पाच मिनिटात तो प्रसंग चित्रीत झाला.
त्यांच्या ‘उत्तररात्र’ च्या पहिल्या पानावर एक रूबाई आहे. ती अशी-
पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते
आणि उत्तररात्र म्हणजे
जागर... यात्रेचे पुन्हा प्रस्थान!

त्याखाली नाव आहे ‘रवीन्द्रनाथ ठाकूर’ यांचे! मात्र गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्याच वाटाव्यात इतक्या या अर्थपूर्ण ओळी खुद्द किणीकर साहेबांच्याच आहेत.
सदाशिव पेठेतील दीड खोल्यात आपला संसारगाडा चालविणार्‍या किणीकरांनी ‘खजिन्याची विहीर’ हे नाटक लिहून नाट्य रसिकांना एक विलक्षण अनुभव मिळवून दिला.
रॉयसाहेबांच्या रूबाईतला टवटवीतपणा अजरामर आहे. मराठी साहित्यात या माणसाने जे भरीव योगदान दिले त्याला तोड नाही. त्यांच्या  जबरदस्त क्षमतेचा अंदाज येण्यासाठी त्यांच्या काही रूबाया सांगतो-

इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती
इतिहास तुडवला त्यांची देखील कीर्ती
गहिवरला अश्रू कीर्तिस्तंभावरला
पिंडास कावळा अजून नाही शिवला

येताना त्याने दार लावले नाही
जाताना त्याने वळून पाहिले नाही
येईन म्हणाला, पाहिन वाट म्हणाली
दारात अहिल्या शिळा होऊन बसली

पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगावयाचे सांगून झाले नाही
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही

खांद्यावर घेऊ नको सोन्याचा सूळ
चार्वाक म्हणाला, पुनर्जन्म हे खूळ
देहाला कसलें आहे पुण्य नि पाप
आत्म्यास भोगुं द्या अमरत्वाचा शाप

कलेचा ध्यास घेऊन मराठी मनावर अधिराज्य गाजवणार्‍या या महान साहित्यिकास आमची प्रेमाची मानवंदना!!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, May 28, 2017

भंपक ‘पू’रोगामी विश्‍व!

प्रत्येक विचारधारेत, संस्थेत, पक्षात काही घरभेदी असतात. मूळ उद्दिष्टांपासून दूर जात ते त्याचा अतिरेक करतात. थोडक्यात काय तर ही ‘बांडगुळं’ असतात. झाडाच्या ज्या फांदीवर हे बसलेले असतात तीच फांदी हे महाभाग तोडतात. त्यांना त्याचं काही गांभीर्यच नसतं. गांभीर्य नसतं असं म्हणण्यापेक्षा मुळात तितकी अक्कलच नसते. मध्यंतरी काही कट्टरतावाद्यांनी हिंदू आणि हिंदुत्त्व हे शब्दही बदनाम केले होते. अशा वाचाळवीरांची पुरोगाम्यातील विकृत आवृत्ती म्हणजे विश्‍वंभर चौधरी!
पुरोगामी हा शब्द ‘ढोंगी’ या शब्दाला समानार्थी झालाय. त्यात पू भरल्याने हे रोगी झालेत. आपल्या भंपकपणामुळे वाटेल त्या थराला जायचे, वाटेल तसे तारे तोडायचे हेच त्यांचे जीवितकर्म झालेय. एखादी चांगली योजना पुढे फसावी तसे पुरोगामी विचारधारेचे झालेय. ‘पुरोगामी महाराष्ट्र’ ही व्यापक संकल्पना इतकी खुरटी झालीय की त्याला काही अर्थच नाही. पूर्वी धर्मावरून घसरणारे आता जातीवर उतरतात. त्यातूनही काही साध्य होत नाही म्हणून एखाद्या साहित्य संस्थेने एखाद्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीच्या लेखकाच्या कलाकृतीला पुरस्कार दिला म्हणून त्याचेही राजकारण करतात. कोणतेच मुद्दे नसल्याने यांचे सैरभैर होणे समजून घेण्यासारखे असले तरी यामुळे ‘पुरोगामी’ या संकल्पनेचे मात्र बारा वाजले आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. जवळपास 111 वर्षे अव्याहतपणे आणि साहित्यिक निष्ठेने ही संस्था काम करतेय. ही संस्था विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांना दरवर्षी पुरस्काराने सन्मानीत करते. यंदा ‘स्तंभलेखन’ या साहित्यप्रकारासाठी डॉ. सच्चिदानन्द शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’ या पुस्तकाची निवड झाली. पुरोगाम्यांच्या ढोंगीपणाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडलाय. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांची त्याला विवेचक प्रस्तावना आहे. शेवडे यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा उत्तम आविष्कार या पुस्तकात आहेच; पण केवळ भाऊंच्या या प्रस्तावनेसाठीही हे पुस्तक विकत घ्यायला हरकत नाही.
हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आणि विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्या तथाकथित पुरोगाम्यांची मळमळ, खदखद बाहेर पडली. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ती अशी होती -
‘‘मसाप या अतिशय सुमार दर्जाच्या साहित्यिक संस्थेनं ’सेक्युलर नव्हे, फेक्युलर’ नावाच्या (नावातच सुमारपण दाखवणार्‍या) पुस्तकाला पुरस्कार दिला म्हणून महाराष्ट्रातील पुरोगामी विश्वात खळबळ माजली आहे. ती खळबळ अप्रस्तुत आहे कारण मसाप नावाच्या धोतर्‍याच्या झाडाला हापूस आंबे लागतील अशी वृथा अपेक्षा पुरोगामी ठेवत आहेत! हा दोष सर्वस्वी पुरोगाम्यांचाच.
मुळात या ’मसाप’ मध्ये ’साहित्य’ शोधायला पुरोगाम्यांनी जावेच कशाला? ही संस्था एखाद्या गणपती मंडळासारखी किंवा दहीहंडी मंडळासारखी नाहीय का? वर्षाला एकदा 2500000 रुपयांचा शासकीय रमणा घेऊन संमेलनाचा ऊरूस भरवणे आणि शासनात कोणते वारे वाहते ते कुक्कुटयंत्राच्या संवेदनशीलतेनं बघून काही पुरस्कार देणे एवढंच या संस्थेचं सध्या जिवीतकार्य! माझा तर अगदी अलीकडे असा समज झाला आहे की साहित्य परिषद म्हणजे साहित्य संमेलनाला लागणारे साहित्य (तंबू, सतरंज्या, खुर्च्या आदि) बाळगून असलेली परिषद! मला तरी विंदा करंदीकर किंवा मंगेश पाडगावकर कधी टिळक रस्त्याला दिसलेले नाहीत. माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या मनात तरी या संस्थेची एवढीच प्रतिमा आहे.
तेंव्हा एवढ्या प्रतिष्ठीत संस्थेकडून कोणत्याही पुस्तकाला पुरस्कार दिला तरी पुरोगाम्यांना काय फरक पडतो? सुमारांच्या सद्दीत दुसरे काय अपेक्षित असते?’’
विश्‍वंभर चौधरी यांनी यात जी अक्कल पाजळली आहे ती त्यांच्या बिनडोकपणाचा पुरावा आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या संस्थेला ‘सुमार’ समजणे हे यांच्या सडलेल्या मेंदूचे लक्षण आहे. ‘पुरोगामी विश्‍वात खळबळ’ म्हणजे त्यांना काय अपेक्षित आहे? असे काही ‘पुरोगामी विश्‍व’ अस्तित्वात आहे का? म्हणजे घरातल्या सिलेंडरवर पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचे आणि ‘ज्वालामुखी खदखदू लागला’ असं म्हणायचं अशातला हा प्रकार झाला. गणपती मंडळ किंवा दहीहंडी मंडळाच्या माध्यमातून काय पुरोगामी विचार देता येतो हे जितेंद्र आव्हाडांनी दाखवून दिले आहेच. म्हणजे पुरोगामी म्हणून मिरवायचे आणि फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत दहीहंड्या लावायच्या, तिथे बायका नाचवायच्या!! असे गोरखधंदे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले नाहीत.
पंचवीस लाखाचा ‘रमणा’ घेणे हे त्यांना या संस्थेचे जीवितकार्य वाटते. यातली पहिली गोष्ट म्हणजे संमेलन भरवणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काम नाही. ते निमंत्रक संस्था आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही संस्था भरवते. त्यामुळे या निधीचा आणि मसापचा बादरायण संबंध नाही. आयुष्यभर रमणा घेऊनच जगणार्‍या विश्‍वंभरला असेच शब्द सुचणार. त्यांनी कष्टाने चार पैसे मिळवलेत हे कुणाला ठाऊक आहे का? ते जी तथाकथित एनजीओ चालवतात त्यासाठी कुणापुढे तरी वाडगा पसरून, खरीखोटी कागदपत्रे सादर करून, अंबानी-अदानीच्या मागे लागून, किंवा रस्त्यावरचा चोर, लुटारू, अगदी बेकायदा टपरी लावणारासुद्धा; अशा लोकांकडून पैसे घेऊन अशा एनजीओ चालतात. विश्‍वंभर चौधरींनी कोणत्या व्यवसायातून इतके पैसे मिळवले आणि सामाजिक काम केले, त्यांच्या संस्थेच्या या अमुक तमूक कामातून हे पैसे मिळाले हे त्यांनी जाहीर करावे! किंवा त्यांच्या या कामातून, विचारातून महाराष्ट्राला कोणता नवा पैलू मिळाला, कोणता प्रकल्प मार्गी लागला, बेरोजगारी संपली, साहित्यिक निर्माण झाले हे जाहीर करावे. त्यातून त्यांचे योगदान स्पष्ट होईल. माझ्यासारखा प्रकाशक कष्टाने चार पैसे मिळवतो. मसापचे पदाधिकारी अशा ‘रमण्या’वर पोट भरत नाहीत. त्यांच्या उत्पन्नाची वेगळी साधने आहेत. विश्‍वंभर चौधरी मात्र त्यांच्या ज्या काही पर्यावरणवादी संस्था आहेत त्यावर जगतात.
यांना टिळक रस्त्यावर कधी पाडगावकर, विंदा दिसले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. उद्या ते म्हणतील की, मला सेनापती बापट रस्त्यावर कधी सेनापती बापट किंवा टिळक रस्त्यावर लोकमान्य टिळक दिसलेच नाहीत! साहित्य संमेलनासाठी लागणारे तंबू, सतरंज्या, खुर्च्या बाळगणारी ही संस्था असा यांचा ‘समज’ आहे. मुळात ही मंडळी समजावर जगतात. ना त्यांचा अभ्यास असतो, ना जीवनानुभव समृद्ध असतात. ‘समजा’तच जगणारे काहीही विचार मांडू शकतात. त्यांना कोण आवरणार? यांचा वास्तव जगाशी काही संबंधच नाही. हेच वास्तव तर शेवडे यांच्या या पुस्तकात मांडले आहे. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांची या पुस्तकाची प्रस्तावना प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. पुस्तक सोडा, पण ही प्रस्तावना वाचूनच विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्यांचा जळफळाट होणे आणि ते मनोरूग्ण होणे अपेक्षित होते. घडलेही तसेच.
दलित चळवळीचे अभ्यासक रावसाहेब कसबे हे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. शिवाजीराव कदम, उल्हास पवार, यशवंतराव गडाख हे विश्‍वस्त मंडळावर आहेत. ही मंडळी हिंदुत्त्ववादी नाहीत. साहित्य परिषदेची एक यंत्रणा आहे. त्यांच्याकडे पुरस्कारासाठी पुस्तके पाठवावी लागतात. आलेल्या पुस्तकातून त्या त्या साहित्य प्रकारातील पुस्तके संबधित परीक्षक निवडतात. यंदा स्तंभलेखन या साहित्य प्रकारासाठी मी परीक्षक होतो आणि यातील सच्चिदानन्द शेवडे यांचे हे सर्वोत्तम पुस्तक आहे. या निवड प्रक्रियेत मसापच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. मुळात हा पुरस्कार ‘विचारधारेला’ नाही तर ‘साहित्यप्रकाराला’ दिलाय हे लक्षात घ्यायला हवे. मुख्य म्हणजे या पुस्तकातील लेख एका समाजवादी विचारधारेच्या वृत्तपत्रातूनच सदर स्वरूपात प्रकाशित झालेले आहेत.
दुसरे म्हणजे विश्‍वंभर चौधरी काही लेखक नाहीत. माझ्या माहितीनुसार ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासदही नाहीत. मग ही जळाऊ वृत्ती कशासाठी? मसापच्या पुरस्कारावर त्यांचे काही आक्षेप असतील तर त्यांनी त्यांच्या तीर्थरूपांच्या नावे एखादी साहित्यिक संस्था काढावी आणि पुरूषोत्तम खेडेकरांपासून श्रीमंत कोकाटेपर्यंत हवे त्यांना पुरस्कार द्यावेत. त्यांना अडवतंय कोण? स्वतः तर काही विधायक करायचे नाही आणि इतर कोणी केले तर त्रागा करायचा हे कसले लक्षण?
अण्णा हजारे, केजरीवाल, मेधा पाटकर अशा परजीवी लोकासोबत राहून विश्‍वंभर चौधरी यांच्यासारख्या अनेकांच्या डोक्याचा ‘केेमिकल लोच्या’ झालाय. द्वेष पसरवणं, वाद निर्माण करणं, आक्रस्ताळेपणा करणं आणि आपली असभ्य, उर्मट वृत्ती दाखवून देत येनकेनप्रकारे चर्चेत राहणं हा यांचा आवडता उद्योग. प्रत्येक घटनेबाबत आपले मत असलेच पाहिजे आणि ते ग्राह्य धरले पाहिजे या दुराग्रहामुळे त्यांचा अहंकार सातत्याने दुखावला जातो. ‘अभ्यासाविन प्रगटे तो एक मूर्ख’ हे रामदास स्वामींचे तत्त्वज्ञान यांच्याकडे पाहून पूर्णपणे पटते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने यंदा सर्व विचारधारांच्या सर्व लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव केलाय. अर्थात यात कुणाचीही विचारधारा बघितली नाही तर त्यांची साहित्यिक ‘कलाकृती’ बघितली. यांचा आक्षेप मात्र फक्त सच्चिदानन्द शेवडे यांच्या पुस्तकावरच आहे. मनाच्या या कोतेपणामुळेच महाराष्ट्र कधीही पुरोगामी राज्य होऊ शकले नाही आणि अशा चिरकुटांची बौद्धिक दिवाळखोरी पाहता भविष्यातही ते कधी होईल असे वाटत नाही, हेच यानिमित्ताने अधोरेखित करावे वाटते.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092