शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेताना घनश्याम पाटील |
ज्यांच्या श्वासाश्वासात शिवचरित्र आहे अशा ऋषितुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयाला उशीर झाला हे जरी खरे असले तरी फडणवीस आणि त्यांच्या चमूला यासाठी धन्यवादच द्यायला हवेत. ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात आणि मनामनात पोहोचले त्या वंदनीय बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ देणे ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
माझे 'दखलपात्र' हे पुस्तक आपुलकीने पाहाताना महाराष्ट्र भूषण बाबासाहेब. |
11 फेब्रुवारी 2015 रोजी श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा ‘चपराक साहित्य महोत्सव’ मोठ्या उत्साहात पार पडला. ‘शिवप्रतापकार’ उमेश सणस यावेळी बोलताना म्हणाले होते की, ‘‘इतिहासकाळातील कोणत्याही व्यक्तिमत्त्वाला आज भेटण्याची संधी मिळाली असती तरी आपण त्यांना शिवाजीराजांविषयी विचारले असते. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, मदारी मेहतर, राजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणीही किंवा राजांच्यासोबत असणारे कोणीही भेटले असते आणि त्यांना आपण राजांविषयी विचारले असते तर ते निश्चितपणे म्हणाले असते की आधी तुम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटा. त्यांच्याकडून शिवरायांविषयी माहिती घेतल्यानंतर जर तुमची काही शंका राहिलीच तर आम्हाला भेटा...’’
सणस यांचे हे विधान अगदी खरे आहे. शिवरायांच्या सहकार्यांनी त्यांचे वर्णन केले नसते इतक्या जिवंतपणे महाराज डोळ्यांसमोर आणण्याचे अभूतपूर्व काम बाबासाहेब करतात. गडकोट, किल्ले, संशोधन हेच ज्यांचे आयुष्य बनून राहिले त्यांनी कायम शिवचरित्राचाच ध्यास घेतला. याठिकाणी गोनी दांडेकरांची एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. गोनी तथा अप्पा दांडेकर एसटी बसने महाबळेश्वरहून पुण्याकडे येत होते. मुसळधार पाऊस सुरू होता. त्यांनी पाहिले की एक तरूण इतक्या पावसात सायकल चालवत जात आहे. त्यांना जवळून या तरूणाचा चेहरा दिसला आणि ते लगबगीने गाडीतून उतरून त्याच्या जवळ गेले. ‘‘इतक्या पावसात कुठे निघालात?’’ अशी त्यांनी चौकशी केली. त्या तरूणाने सांगितले, ‘‘प्रतापगडावरून हाडपांचा निरोप आलाय. एक शिवकालीन पत्र त्यांना मिळाले आहे. ताबडतोब या. त्यामुळे पुण्यातून निघालो. तिकिटाला पैसे नसल्याने सायकल काढली...’’ हा तरूण म्हणजे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे!
बाबासाहेबांनी शिवसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला आणि महत प्रयासाने तो पूर्णत्वासही आणला. ‘जाणता राजा’ या भव्यदिव्य नाटकाचे प्रयोग त्यांनी जगभर केले. त्यासाठी घोडे, हत्ती त्यांनी रंगमंचावर आणले. भारत इतिहास संशोधक मंडळातून इतिहास संशोधनाची दिशा मिळाल्यानंतर त्यांनी शिवकार्यासाठी त्यांचे आयुष्य समर्पित केेले. कशाचीही तमा न बाळगता त्यांनी सातत्याने राजांची महती लोकापर्यंत जावी, यासाठीच प्रयत्न केले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची जाहीर मुलाखत घेतली. त्यावेळी राज यांनी त्यांना शिवजयंतीवरून प्रश्न विचारला. ‘‘शिवजयंतीची नक्की तारीख कोणती?’’ असे विचारताच या शिवशाहीराने जे उत्तर दिले ते प्रत्येकाला विचार करायला लावणारेच आहे. ते म्हणाले, ‘‘हा प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने तुम्हाला शिवाजीराजे आठवले ना! मग तुमच्या मनात शिवरायांचा जन्म झाला. अरे, शिवजयंतीवरून वाद कसला घालता? शिवरायांचे रूप आठवा, त्यांचा प्रताप आठवा. रयतेसाठी त्यांनी जे अमाप काम केले ते आठवा. ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.’’ इतके छान आणि तात्त्विक उत्तर बाबासाहेब त्यांच्या जीवनसाधनेच्या बळावर देऊ शकतात.
वंदनीय बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच काही पूर्वग्रहदूषित लोकानी कोल्हेकुई सुरू केली आहे. स्वयंघोषित शिवश्रींनी आपली ‘शिवीश्री’ वृत्ती दाखवून देत कायम जातीय तेढ निर्माण केली आहे. त्याबद्दल त्यांनी न्यायालयात माफीही मागितली आहे. अशा लोकानी बाबासाहेबांवर लिहिणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. यावर बाबासाहेबांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी दिलेले उत्तरही नेहमीप्रमाणे मार्मिकच होते. ते म्हणाले, ‘’मला शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचावे यासाठी आणखी बरेच काम करायचे आहे. अशा प्रवृत्तींना उत्तर देण्यात वेळ घालवणे मला परवडणारे नाही...’’ ज्यांनी सातत्याने शिवाजीराजांची पूजा बांधण्यात, त्यांचा आदर्श नव्या पिढीपुढे ठेवण्यात आपल्या देहाची काडे केली त्यांना अशा थिल्लरबाजांची दखल घेण्याएवढी उसंत नसणे हे रास्तच आहे.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असला तरी या पुरस्कार निवड समितीत सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर, दिलीप वेंगसरकर, कीर्तनकार मंगल कांबळे, सांस्कृतिक कार्यसचिव वल्सा नायरसिंह, सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर, नामवंत चित्रकार वासुदेव कामत अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या मनात ज्यांच्याविषयी अत्यंत आदराचे स्थान आहे आणि ज्यांचे आयुष्य शिवसेवेसाठी समर्पित आहे अशा एका महान विभुतीची निवड या सदस्यांनी केली आहे. बाबासाहेबांच्या महाराष्ट्र भूषणला विरोध करणे म्हणजे या सर्वांच्या निवडीला आव्हान देण्यासारखेच आहे. तटस्थ वृत्तीच्या आणि आपापल्या क्षेत्रात मानदंड ठरलेल्या या विचारवंतांनी बाबासाहेबांची निवड करणे हे आपले सांस्कृतिक संचित आहे. त्यामुळे त्यांच्यावर चिखलफेक करणे म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्रावर आरोप डागण्यासारखे आहे. केवळ द्वेषमूलक, जातीच्या चष्म्यातून असे करंटेपण कोणी करत असेल तर करू देत बापूडे!
बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य यापूर्वीच जागतिक स्तरावर गेले आहे. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणजे आपण आपल्या बाजूने कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे आहे. अशा पुरस्काराचा सोस त्यांना नक्कीच नाही; मात्र मराठी माणूस त्यांच्या ऋणातून कधीही उतराई होऊ शकत नसताना हे एक निमित्त आहे.
इतरांना सतत प्रोत्साहन देणारे, कार्यक्रमांपेक्षा कार्याला महत्त्व देणारे शिवशाहीर बाबासाहेब यांचे आयुष्य सुयोग्य ध्येयाने प्रेरीत आहे. नव्या पिढीसाठी त्यांचे चरित्र निश्चितपणे प्रेरणादायी आहे. या बलाढ्य शिवशाहीरास 'चपराक' परिवारातर्फे मानाचा मुजरा!
- घनश्याम पाटील
संपादक, 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२