कालच जागतिक महिला दिन झाला. प्रत्येक दिवसाप्रमाणे हा दिवसही ‘साजरा’ करण्याची पद्धत रूढ होऊ पाहत आहे. महिलांच्या आरोग्य शिबिरापासून ते चर्चासत्र, व्याख्याने, पुरस्कार सोहळे असे कार्यक्रम या निमित्ताने पार पडतात. आज बर्याच ठिकाणी स्त्री सन्मानाचे चित्र रंगवले जात असले तरी महिला या ‘दीन’च असल्याचे चित्र दुर्दैवाने पहायला मिळते. एकीकडे ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत, राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेल्याचे वास्तव असताना दुसरीकडे मात्र गावागावात, वस्त्यांवस्त्यांवर महिला अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे.
यंदाच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर दोन घटना प्रामुख्याने चर्चेत आल्या. पहिली म्हणजे, दिल्लीतील निर्भयाच्या बलात्कार प्रकरणात जो आरोपी आहे त्याची बीबीसीने तिहार तुरूंगात जाऊन मुलाखत घेतली. त्याबदल्यात त्याला चाळीस हजार रूपयेही दिले. स्त्रियांनी कसे कपडे घालावेत, येथपासूनची मुक्ताफळे त्याने उधळली आणि आपण किती ‘दिव्य ज्ञान’ लोकापर्यंत पोहोचवतोय या आविर्भावात बीबीसीने ते प्रेक्षकापर्यंत आणले. ‘चेहराच खराब असेल तर आरशाला दोष देण्यात अर्थ नाही’ असा युक्तीवादही त्यावर काहींनी केला; मात्र कवडीचीही नैतिकता शिल्लक नसलेल्या प्रसारमाध्यमांचे हे हिडीस आणि ओंगळवाणे रूप आहे. आसारामसारख्या भोंदूने किंवा तरूण तेजपालसारख्या लिंगपिसाटाने चारित्र्यावर प्रवचने झोडणे जितके हास्यास्पद आहे तितकेच प्रसारमाध्यमांनी ‘आपण फक्त सत्य समोर आणतोय’ असे म्हणणे हास्यास्पद आहे. समाजाला ज्ञान देणे, मार्गदर्शन करणे, त्यांचे रंजन करणे ही वृत्तपत्रांची उद्दिष्टे केव्हाच मागे पडलीत आणि त्यांना ‘धंदेवाईक’ रूप आलेय. त्यामुळे अशा माध्यमांनी आपण समाजमन कसे घडवतोय, याचा डांगोरा पिटणे म्हणजे ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ असा प्रकार आहे.
दुसरी घटना नागालँडमधील दिमापूर शहरातील आहे. येथील सईद फरिद खान या 35 वर्षाच्या नराधमाने एका महाविद्यालयीन युवतीवर धमकावून सातत्याने अत्याचार केले. तो दिमापूर जिल्हा तुरूंगात होता. तेथील जमावाने एकत्र येऊन सईदला आपल्या ताब्यात देण्याची मागणी तुरूंग प्रशासनाकडे केली. त्याला नकार मिळाल्याने जमावाने तुरूंगावर हल्लाबोल केला. पोलिसांनी त्यांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार केला पण त्यांचे काही चालले नाही. तेथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या चौकापर्यंत सईदला फरफटत नेऊन जाहीर फाशी द्यायची असा जमावाचा बेत होता. त्यांनी त्याला नग्न करून गाडीला अडकवले आणि फटकारत चौकापर्यंत नेले. मात्र त्याआधीच या माराने त्याचा मृत्यू झाला. जनक्षोभ उसळल्यानंतर काय होते याचे हे उदाहरण आहे.
गुन्हेगाराला ठेचून मारण्याच्या घटना यापुर्वीही आपल्याकडे घडल्या आहेत. 13 ऑगस्ट 2004 ला नागपूर जिल्हा न्यायालयात बलात्कार प्रकरणातीलच अक्कू यादव नावाच्या गुन्हेगारास संतप्त झालेल्या दोनशे महिलांनी एकत्र येऊन न्यायालयाच्या आवारातच मारले होते. त्याच्यावर लाल तिखट टाकून आणि दगडांचा मारा करून या रणरागिणींनी त्याला ठेचून काढले. बलात्काराचा आरोप सिद्ध होऊनही त्याला वेळेत शिक्षा होत नसल्याने या महिलांनी कायदा हातात घेतला. आपली न्यायप्रक्रिया संथ गतीने चालते आणि बर्याच प्रकरणात सत्य प्रभावीपणे मांडूनही न्याय मिळेलच याची खात्री नसल्याने महिला असे करायला धजावतात. ही टोकाची प्रतिक्रिया असली तरी हा उद्रेक आपण समजून घेतला पाहिजे. एखादी गोष्ट आपण जितकी दाबून ठेऊ तितकी ती उफाळून येणार, हे सर्वमान्य सत्य आहे. त्यामुळे महिला अत्याचारांचा अतिरेक झाल्याने भविष्यात अशा घटना वाढल्या तर आश्चर्य वाटायला नको!
पुरूषांची वाढत चाललेली विकृती आणि आधुनिकतेच्या, स्वातंत्र्याच्या नावावर स्त्रियांचा वाढलेला स्वैराचार या दोन्ही चिंतेच्या बाबी आहेत. जिथे पाच वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार होतो तिथे काय बोलावे? मोकाट जनावरातही अशी विकृत वासना नसते. आज भारतातील एकही शहर स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने योग्य नसेल तर हे आपले सर्वांचेच मोठे अपयश आहे. जिथे तिथे वखवखलेल्या नजरा! एखादे भुकेजलेले हिंस्त्र श्वापद शिकारीवर तुटून पडते तसे स्त्रियांना ओरबाडण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारेही यात मागे नाहीत. बायकोवरच्या ‘बलात्कारातून’च जन्माला येणारी ‘हायब्रिड’ पिढी पुढे स्त्रीकडे फक्त ‘मादी’म्हणूनच पाहते.
दुसरीकडे काही स्त्रियांही या प्रवृत्तीला खतपाणी घालताना दिसतात. फुटकळ आमिषाला, वैयक्तिक लाभाला बळी पडलेल्या स्त्रिया अशा घटनांच्या मोठ्या प्रमाणात शिकार होतात. ‘शरीर’ आणि ‘सौंदर्य’ या अनेकींच्या दृष्टिने त्यांच्या प्रगतीच्या पायर्या आहेत. ‘एकाच पुरूषासोबत अनेकवेळा झोपणे किंवा काही पुरूषांसोबत काहीवेळा झोपणे यात फरक तो काय? शेवटी आपली प्रगती महत्त्वाची नाही का?’ असा निर्लज्ज सवाल करणार्या काही करंट्या बायकाही आम्हाला भेटल्यात. त्यामुळे समाजात आज जे काही चालले आहे ते भविष्यात कोणत्या दिशेने जाणार याचा अंदाज बांधणेही अवघड आहे.
एकीकडे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळत नाही, त्यांच्यावर कायम अन्याय होतो, त्यांना नागवले-पिचवले जाते असे गळे काढायचे आणि दुसरीकडे स्त्रियांनी असे उद्योग करून समाजमन कलुषित करायचे याला काही अर्थ नाही. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही. स्त्री सक्षमीकरणाच्या गप्पा करताना ज्या दुर्बल आहेत त्यांच्या पाठिशी आपण उभे रहायला हवे. त्या स्वावलंबी होतील, कुटुंब आणि समाजात मानाने राहू शकतील, इतरांना दिशा देऊ शकतील, संस्काराची शिदोरी नव्या पिढीकढे हस्तांतरीत करू शकतील, असे पोषक वातावरण निर्माण व्हायला हवे. स्त्रियांकडे केवळ ‘भोगवस्तू’ म्हणून पाहणार्या, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणार्या पुरूषांना कठोर शासन व्हायला हवे. समाजमनावर वचक बसेल अशा जबर शिक्षा त्यांना न्यायव्यवस्थेने द्यायला हव्यात.
स्त्रीमुक्ती असेल किंवा पुरूषमुक्ती असेल! हे केवळ हवेचे बुडबुडे आहेत. आपण सध्या तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. ज्ञानाची, माहितीची कवाडे सर्वांसाठी खुली झालीत. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार संधी उपलब्ध झाल्यात. ग्रामीण भागातील ‘संधी’अभावी वंचित असलेले स्त्री-पुरूष आणि शहरी भागातील ‘अतिरेक’ करणारे स्त्री-पुरूष यांच्याकडे आता लक्ष दिले पाहिजे. सर्व असूनही त्यांच्यापर्यंत काहीच पोहोचले नाही असा वर्ग आणि सर्व असूनही त्याचा गैरवापरच करणारा वर्ग यातील फरक आपल्या ध्यानात आला तर बर्याचशा समस्या सुटतील. देशासमोर अनेक आव्हाने असताना किमान स्त्री-पुरूष असा भेद आता रोडावत जायला हवा. सर्वजण एकमेकांचा सन्मान उंचावत, निर्भयपणे जगतील अशी अपेक्षा बाळगूयात आणि ती पूर्णत्वास येईल यासाठी खारीचा वाटा उचलूयात!
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२