‘झुळूक आणि झळा’ हा घनश्याम पाटील यांच्या साप्ताहिक ‘चपराक’मधील झंझावाती अग्रलेखांचा संग्रह. संग्रहाच्या नावात जरी झुळूक हा शब्द असला तरी ही झुळूक झंझावातातील समाजाबद्दलच्या प्रेमाची, अनुकंपेची ग्वाही देते. झळा या प्रखर विचारांच्या आहेत. झोपी गेलेल्यांना जागवण्यासाठी आहेत. अग्रलेखांचे, अगदी मोठमोठ्या वृत्तपत्रांतूनही घसरत चाललेले महात्म्य पाहता, पुस्तक व्हावे, त्याबद्दल प्रकाशनाआधीच लोकांच्या मनात उत्सुकता असावी, पुन्हा पुन्हा एकत्र वाचण्याचा आनंद मिळावा अशी भावना असावी यातच पाटील यांच्या खंद्या विचारशैलीची ताकद आहे. मला वाटते, या अग्रलेख संग्रहाचे तेच महत्व आहे.
घनश्याम पाटील यांच्या अग्रलेखांचे संग्रहित हे पहिलेच पुस्तक नाही. पुर्वीच त्यांचे ‘दखलपात्र’ हे एक ‘चपराक’मधील अग्रलेखांच्या संग्रहाचे पुस्तक निघाले होते. त्याचे प्रचंड स्वागतही झाले. अनेक नामवंत माध्यमांनी त्याची दखल घेतली. एकेकाळी आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे आणि नीलकंठ खाडीलकरांच्या धारदार अग्रलेखांनी महाराष्ट्रीय वृत्तपत्रांना समाजप्रबोधक, राजकीय तसेच मराठी अस्मितेची दिशा दिली. काळ बदलत असतो तसे सामाजिक प्रश्नही बदलत जातात. प्रश्नांचे संदर्भही बदलत जातात. प्रासंगिक घटनांवर नुसते वरकरणी भाष्य वाचकांच्या बौद्धिक गरजा पूर्ण करायला असमर्थ ठरत जाते. प्रश्नाचे सर्व पैलू पाहिले जाणे, त्यातील धागेदोरे उलगडत समाजजीवनाशी ते कसे परिणाम करणारे ठरणार आहेत यावर वैचारिक भाष्य करणे अभिप्रेत असते. श्री. पाटील ते करण्यात यशस्वी होतात, आणि म्हणूनच त्यांचे अग्रलेख वाचनीय व संग्राह्य होतात, कारण ते वाचकाच्या विचारविश्वावरही परिणाम करण्यात यशस्वी होतात.
पाटील यांच्या अग्रलेखातील सर्वच मते मान्य व्हायला हवीत असा त्यांचाही आग्रह नसावा. काही अग्रलेखांतून, सामाजिक घटनांतून आलेला संताप, उद्वेग प्रखर भाषेत प्रकटताना दिसतात पण त्यात व्यक्तिगत राग-लोभ नसतात, उलट बदल घडावा ही आर्त भावना दिसते.
या संग्रहात अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, भाषिक, धार्मिक व साहित्यिक विषय हाताळले गेलेले आहेत. अग्रलेख लिहिण्याचे कारण तात्कालिक प्रसंगात असले तरी त्यावरील पाटलांचे भाष्य हे त्या-त्या क्षेत्रातील समुदायांना विचार करायला भाग पाडणारे आहे यात शंका नाही. उदा. ‘लोकसंख्यावाढीची मुक्ताफळे’ या अग्रलेखात ते अलीकडेच ‘शंकराचार्यांनी हिंदुंनी दहा-दहा मुले प्रसवावीत’ अशा केलेल्या विधानावर सडकून टीका करताना ‘स्त्री हे फक्त प्रजननाचे साधन नाही, तिच्याकडे केवळ मादी म्हणून पाहू नये’ असा स्त्रीवादी विचार मांडताना मुस्लिम स्त्रियांच्याही आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन ‘त्यांचे प्रबोधन का केले जात नाही?’ असा मुलभूत प्रश्नही उपस्थित करतात. खरे तर मुस्लिम द्वेषाची एक लाट निर्माण होऊ पाहत असताना समन्वयवादी आणि प्रबोधनवादी भूमिका घेणारे पाटील नक्कीच अभिनंदनीय ठरतात.
‘यशाचे हजार बाप’ या अग्रलेखात ते म्हणतात, ‘...मात्र इतर धर्मांचा द्वेष करणे, त्यांना कमी लेखणे आणि त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करणे यातच मोठमोठी साम्राज्ये भुईसपाट झाली आहेत.’ ते एका अग्रलेखात ‘परभाषेचाही द्वेष करू नका’ असे सुचवतात. मला वाटते हे विधान भारतात तरी सार्वकालिक आहे. मुळात द्वेषाची भूमिका वाईटच. त्या द्वेषाला धर्मांधतेचे किंवा अंध भाषिक अस्मितेचे स्वरुप आले तर, धर्म कोणताही असो, त्यातून राष्ट्र कधीही उभे राहू शकत नाही हे वास्तव भारतीयांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. बोकाळत्या असहिष्णुतेला तिलांजली दिली पाहिजे व द्वेषाची ऊर्जा सकारात्मकतेत बदलत एकमेकांचा विकास कसा होईल, अनिष्ट प्रथा-परंपरांचा त्याग करत हातात हात घालून वाटचाल केली पाहिजे. असे सार्थ विवेचन करत असताना ते भाजपाला, मोदींना व अमित शहांनाही आपल्या टीकास्त्रातून सवलत देत नाहीत. ‘कट्टरतावादाचा अतिरेक’ या अग्रलेखात ते मोदींनी केजरीवालांना ‘नक्षली चळवळीत जावे’ असा सल्ला दिल्याबद्दल धारेवर धरतात व ‘हा सत्तेतून आलेला मस्तवालपणा आहे’ असे सुनवायलाही कमी करत नाहीत.
मराठी भाषेबद्दल पाटलांना अर्थातच आत्मियता आहे. मराठी माध्यमांच्या शाळा धडाधड बंद पडत आहेत हे वास्तव आहे आणि ते संतापजनक वास्तव ते ‘मराठीच्या मारेकर्यांना मारा’ या अग्रलेखात प्रखरपणे मांडतात. मराठीच्या प्रचाराला वाहून घेतलेले आमचे सन्मित्र प्रा. अनिल गोरे उर्फ मराठी काका यांच्या कार्याचे व त्यांनी घडवून आणलेल्या परिणामांची (आणि त्यांचे श्रेय लाटलेल्या गणंग पुढार्यांचे) सार्थ दखल घेत त्यांनी या अग्रलेखात मराठीच्या भवितव्याबद्दल आपले विचार मांडले आहेत. ते नक्कीच मननीय आहेत.
पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्राच्या माथ्यावरील कलंक म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांची दिवसाउजेडी झालेली हत्या आणि अद्यापही त्यांचे खुनी पकडता आलेले नसणे. ‘दुर्दैवीच!’ या अग्रलेखात त्या निंद्य घटनेची दखल घेत असतानाच मरणोत्तर दाभोळकरांवरच शाब्दिक बाण चालवणार्यांवर त्यांनी खरपूस टीका केली आहे. अर्थात दाभोळकरांच्या अज्ञात हत्यार्यांना ‘पंडित नथुराम गोडसेच्या यादीत नेवून बसवू पाहणारे चूक करत आहेत’ असे विधान करत त्यावर विवेचन करताना गांधीजींच्या हत्येमागील कारणांचे जे स्पष्टीकरण दिले आहे ते अनेकांना, मलाही, रुचणारे नाही.
पाटील मराठवाड्यातील असल्याने त्यांचा मराठवाड्याबद्दलचा जिव्हाळा, तेथील विकासाचे तुंबलेले प्रश्न व त्यावरील खेद व उपाययोजनांची त्यांनी केलेली शिफारस महत्वाची आहे. हे खरेच आहे की मराठवाडा हा अत्यंत दुर्लक्षित भाग आहे. सपाट भाग असल्याने तेथे रेल्वेचे जाळे करायला हवे होते, त्यामुळे विकासाचा वेग आपोआप वाढला असता हे त्यांचे मत महत्वाचे आहे. खरे तर मुळात महाराष्ट्राचाच विकास अत्यंत विषम पद्धतीने झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रालाच पाणी ते उद्योगधंदे याबाबत झुकते माप दिले गेल्याने इतर भाग आजही पडीक राहिलेले आहेत. आता नवीन सरकार आले आहे. त्याने तरी प्रादेशिक समतेचे तत्व अंमलात आणत पश्चिम महाराष्ट्रावर वाढवलेले नको तेवढे उद्योगांचे ओझे कमी करत मराठवाड्याकडे वळवले पाहिजे. संतुलित विकासाचे धोरण अंगिकारत, तेथील बेरोजगारीचे प्रश्न सोडवत पुणे-मुंबईवर विस्थापितांचा येणारा ताणही कमी केला पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक समस्यांचे मूळ हे असंतुलित विकासात आहे हे आता तरी राज्यकर्त्यांच्या लक्षात यावे.
या वानग्यांवरून वाचकांच्या लक्षात आले असेलच की पाटील यांनी हाताळलेल्या विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे. तरूण वयातच एक प्रकारची वैचारिक प्रगल्भता त्यांना लाभली आहे. पुण्यासारख्या शहरात कोवळ्या वयातच, परांगदा म्हणता येईल असा आलेला हा तरुण पुण्याच्या साहित्यिक आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करतो हीच गोष्ट मुळात सर्वच तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
घनश्याम पाटील यांच्या अग्रलेख लेखनाची शैली वेगळी आहे. कधी खेळकर, कधी किस्से सांगत सुरुवात करत तर कधी पहिल्या शब्दापासून आक्रमक होत ते विषयाच्या अंतर्गर्भापर्यंत जावून पोहोचतात. एका अर्थाने ही अन्यत्र दिसणार्या रुक्ष अग्रलेखीय शैली नव्हे तर तिला लालित्याचा लोभस स्पर्श आहे. त्यामुळे काही मते पटली नाहीत तरी अग्रलेख वाचनीयच होतो आणि माझ्या मते हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे.
खरे तर एकूणातच, अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर वैचारिकतेचाही र्हास होत असलेल्या काळात, विकल्या गेलेल्या पत्रकारितेचे रोज वाभाडे निघण्याच्या काळात, कोणाची तरी तळी उचलत नामघोष करण्याच्या काळात पाटलांची पत्रकारिय वाटचाल ही दिशादर्शक आहे. महाराष्ट्राची वैचारिकता मेलेली नाही, आजही ती तेवढ्याच समर्थपणे उभी आहे, राहू शकते व येणार्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकते, लोभसवाणी झुळूक ठरु शकते याचे दमदार चिन्ह म्हणजे हा झुळूक आणि झळा अग्रलेखांचा संग्रह वाचायलाच हवा!
- संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक