Saturday, July 18, 2020

कृतघ्न नव्हे कृतज्ञच!

प्रसन्न जोशी यांच्यासारखा निवेदक आपल्या ब्लॉगवरील लेख वाचून प्रतिक्रिया देतो, त्या विषयावरील ‘एबीपी माझा’सारख्या वाहिनीवर चर्चेला निमंत्रण देतो, चर्चेतही आपल्या लेखाचा गौरवानं उल्लेख करतो, आपल्या काही फेसबुक पोस्ट लाईक करतो, काहीवर मतेही मांडतो हे सगळंच सुखावणारं. त्याचं कारण म्हणजे रोज विविध विषयांवर चर्चा घेणार्‍या निवेदकाचा त्या त्या विषयातला गरजेपुरता अभ्यास असेल, नवनवीन लोकाशी वेगवेगळ्या विषयावर बोलून थोडं फार ज्ञान आलेलं असेल, स्वतःला ‘अपडेट’ ठेवण्यासाठी त्याचं अवांतर वाचन, चिंतन आणि मनन असेल असं मला वाटतं. खरंतर वाहिन्यांवरील झळकणारे असे अनेक निवेदक याला अपवादही ठरतात. 

त्यांची भाषा, शब्दांचे उच्चार, त्यांचा उद्धटपणा, त्यांचं अघोर अज्ञान हेही वेळोवेळी उघडं पडत असतं. तरीही प्रसन्न जोशी यांच्यासारखे निवेदक जाणीवपूर्वक स्वतःचं वेगळेपण जपतात. काहीवेळा ‘आपण कसे खरे पुरोगामी आहोत?’ हे दाखवण्यासाठी विदेशात जाऊन गोमांस भक्षण करतानाचे फोटोही समाजमाध्यमांवर अभिमानानं टाकतात. ‘हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य’ म्हणून आमच्यासारखे मित्र तिकडं दुर्लक्ष करतात मात्र त्यातून त्यांच्याविषयीचं ‘समाजमत’ बनत जातं.

तर या प्रसन्न जोशी यांचे आज मी आभार मानतो. आजच्या विषयावर त्यांनी मला लिहायला प्रवृत्त केलं. खरंतर हा विषय अनेकांच्या मनात असेल मात्र त्यावर यथायोग्य चर्चा होत नाही.

औरंगाबाद येथील माझे मित्र सुशील कुलकर्णी यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर आज माझ्या आणि अर्थातच ‘चपराक’च्या कामगिरीविषयी एक व्हिडिओ पोस्ट केला. ‘पाटील, लई भारी करूलालाव’ अशा मराठवाडी शीर्षकाच्या या व्हिडिओत ‘चपराक’च्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कामाविषयी आणि माझ्या पुस्तकाविषयी सुशील कुलकर्णी यांनी त्यांच्या खास शैलीत दखल घेतली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी आणि स्वामी गोविंददेव गिरीमहाराज यांचीही मतं त्यात त्यांनी प्रसारित केलीत. जेमतेम पाच मिनिटाच्या या व्हिडिओत माझा स्वतःचा एकही शब्द नाही. मराठवाड्यातला एक मुलगा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुण्यात येतो, आपली वेगळी ओळख निर्माण करतो म्हणून सुशील कुलकर्णी यांनी अभिमान व्यक्त केलाय. पुण्याच्या पत्रकारितेत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल वीस वर्षे काम करत असताना आजोळच्या माणसांनी माझी घेतलेली ही पहिलीच दखल आहे. त्यामुळं माझ्यासाठी हा अभिमानाचा विषय आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर सामायिक केला.

त्याखाली प्रसन्न जोशी यांनी जे मत माडलं ते असं - 

‘‘पुण्या-मुंबईचं एक दुःख आहे. इथे बाहेरून आलेले आणि मोठे झालेले स्वतःला पुणेकर मानत नाहीत. ज्या शहरांमध्ये स्थान मिळवलं, मोठे झालो त्यावर दुगाण्या झाडायच्या, आपली मुलं-मुली इथंच मोठी होणार मात्र तरीही नाळ वगैरे (मूर्खपणा) आमचे आम्ही सोडून आलेल्या गावाशीच राहणार, याला मी तरी कृतघ्नपणा म्हणतो.’’

मगाशी निवेदकाचे जे दोन प्रकार सांगितले त्यात प्रसन्न जोशी ‘अभ्यासू’ या कॅटेगिरीतले असावेत असा निदान माझा समज आहे. त्यामुळं त्यांना वैयक्तिकरित्या मी सभ्यपणे उत्तर दिलं. या सभ्यपणावरही त्यांनी ‘असभ्यपणे’ काही प्रश्न उपस्थित केले. जोशी म्हणतात, 

‘‘तुम्ही पुण्याबद्दल एका शब्दाने कृतज्ञता व्यक्त करावी, तुम्ही उलट तुमचे कसे हाल झाले, लातूरचे पाटील वगैरे म्हणवून घेताय... पुण्याने असा काय अन्याय केला? असं काय पुण्यात वाईट घडतं? मी बाहेरून आलो, तुम्ही बाहेरून आलात, तुम्हाला त्या पोस्टवाल्यांना असं का सांगावं वाटलं नाही की बाबा रे, पुण्याने मला मोठे केले, संजय सोनवणीसारखे मित्र दिले...’’

प्रसन्न जोशी मद्यपान करत नसावेत. केले तरी मद्यपान केल्यावर माझ्यासारख्या प्रकाशकांवर असे बेताल आरोप करत नसावेत. 

ते म्हणतात त्याप्रमाणं मी पुणे शहराविषयी काहीही चुकीचं वक्तव्य कधीही केलं नाही. माझे कसे हाल झाले हेही सांगितलं नाही. उलट पुण्याविषयी कायम कृतज्ञताच व्यक्त केलीय. जोशींनी निवेदकाबरोबरच आपण ‘पत्रकार’ही आहोत याचं भान ठेवलं तर त्यांना त्याबाबतचे माझे अनेक लेख, व्हिडिओ, बातम्या सापडतील. ते म्हणतात त्याप्रमाणे मी या शहराला कधीही दुगाण्या झाडल्या नाहीत. स्वप्नातही तसा विचार कधी आला नाही. किंबहुना तितकं  धाडस कुणातच नाही आणि ते असूही नये. ‘आपली मुलं-मुली इथंच मोठी होणार’ या वाक्याशीही माझ्यासारख्या ब्रह्मचार्‍याला काही देणंघेणं नाही. गावाविषयी नाळ असणं हा त्यांना कृतघ्नपणा वाटतोय. ही मात्र गंभीर बाब आहे.

आपल्या कर्मभूमीविषयी प्रत्येकाच्या मनात अभिमान असतो. तो असायलाच हवा. मात्र जन्मभूमीशी जोडून असलेली नाळ म्हणजे ‘कृतघ्नपणा’ वाटत असेल तर प्रसन्न जोशी यांच्यासारख्या लोकामुळे आजची पत्रकारिता तिरडीवर झोपलीय असे म्हणायला हरकत नाही. आजही ‘गांधींचा गुजरात’ हे सांगताना गुजरात्यांना अभिमान वाटतो. रत्नागिरीकरांना टिळकांचा तर भगूर-नाशिकवासीयांना सावरकरांचा अभिमान वाटतो. विदेशात कोणी भारतीय भेटला तरी किती कौतुक वाटतं. त्यातही तो ‘महाराष्ट्रीयन’ असेल तर आणखीनच अभिमान वाटतो. त्यात त्या देशाला, प्रदेशाला, शहराला, गावाला कमी लेखण्याची भावना नसते. जिथं आपला जन्म झालाय त्या प्रदेशाविषयी नाळ जोडलेली असते. काही भावनिक ऋणानुबंध असतात. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखा नेता सिंध प्रांताविषयी, लाहोरविषयी बोलताना अजूनही भावूक होतो कारण त्यामागे त्यांच्या असंख्य आठवणी असतात. आपल्या आजोळच्या आठवणी निघाल्या की अजूनही आपण शहारतो. काही सुखद प्रसंग आठवले की रोमांच उभे राहतात. आपलं जन्मगाव असेल, आपल्या कुलदैवतेचं ठिकाण असेल, आपली शाळा असेल त्याविषयी बहुतेकांच्या मनात श्रद्धा असते, जिव्हाळा असतो, आपलेपणा असतो. माणूस कितीही लहान किंवा कितीही मोठा असला तरी त्याच्या मनात हे हळवे कप्पे असतात. त्यात गैर ते काय? तो ‘कृतघ्नपणा’ कसा बरं ठरेल?
  
प्रसन्न जोशी म्हणतात, कुलकर्णींनी माझ्यावर व्हिडिओ करताना पुण्याला दूषणं दिलीत. असं काय म्हणतात बरं सुशील कुलकर्णी की प्रसन्न यांच्या तळपायाची आग मस्तकात जावी. कुलकर्णी म्हणतात, 

‘पुण्यात मराठवाड्यातली माणसं टिकत नाहीत, त्यांच्या ‘काय करलालाव, आल्ताव का, गेल्ताव का’ अशा भाषेमुळं त्यांना स्वीकारलं जात नाही. असं सगळं असताना घनश्याम पाटील यांच्यासारखा एक तरूण या शहरात येतो आणि साहित्याच्या प्रांतात आपली मोहोर उमटवतो हे आम्हा मराठवाड्यातील लोकासाठी अभिमानास्पद आहे.’

यात गैर वाटण्यासारखं काय? पुण्यात वावरताना आम्हाला भाषेची अडचण येतेच. ती प्रयत्नपूर्वक आत्मसात करणं आणि टिकून राहणं हे खरंच जिकिरीचं काम आहे. सुशील कुलकर्णी यांनी यात कुठंही पुणेकरांना दोष दिला नाही. उलट या सांस्कृतिक नगरीत वावरताना ‘समृद्ध’ता जपावी लागते अन्यथा निभाव लागत नाही हेच तर सुचित केलंय.

मी ‘लातुरचा पाटील’ वगैरे म्हणवून घेतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. माझा जन्म कुठे व्हावा हे माझ्या हातात तर नक्कीच नाही. मी जर लातूरमध्ये जन्मलोय तर सुशील कुलकर्णी यांनी मला ‘इराकमधला बगदादचा पाटील’ म्हणावं काय? ‘पुण्यात वाईटच घडतं’ असं मी म्हणाल्याचा शोध जोशींनी कसा आणि कुठं लावला? 

पुण्यात राहणार्‍या पंढरपूरच्या माणसाला आषाढीच्या दिवशी तिथलं वातावरण आठवतं. तापी नदी भरून वाहतेय म्हटलं की पुण्यातला खान्देशी माणूस खूश होतो. उन्हाळ्याच्या दिवसात पुण्यातील वैदर्भीय माणूस ‘आमच्याकडं हे उन काहीच नाही’ असं सहजपणे सांगून जातो. पुण्यातला माणूस मुंबईत असेल तर ‘आमच्या पुण्यात लोकलची अशी गर्दी नाही’ हे कितीदा तरी सांगतो. हे असं सांगताना तो ज्या शहरात राहतोय त्याला कमीपणा आणण्याचा त्याचा उद्देश नक्कीच नसतो.

प्रसन्न जोशी यांना ‘आजोेळ’चं प्रेम मिळालं नाही की संजय सोनवणी यांच्यासारख्या विचारवंताशी असलेली माझी मैत्री खुपतेय हे कळायला मार्ग नाही. प्रसन्नजी, पुण्यानं मला फक्त सोनवणी यांच्यासारखेच मित्र दिले नाहीत तर तुमचे संपादक राजीवजी खांडेकर यांच्यासारखे वाचकही दिलेत. परवाच खांडेकर सरांनी मला फोन करून सांगितलं की, ‘‘गेल्या कित्येक वर्षात मी तुमच्या ‘दरवळ’सारखं सुंदर पुस्तक वाचलं नाही. आजवर तुमच्याविषयी कौतुक वाटत होतं पण आता आदर वाटतोय. माझ्या महाविद्यालयीन जीवनानंतर आज मी तुम्हाला चक्क पत्र लिहून माझ्या भावना कळवल्यात. त्यातूनही रहावलं नाही म्हणून समक्ष फोनवर कळवतोय.’’ 

राजीव खांडेकर यांच्यासारख्या ‘इलेक्ट्रॉनिक’ माध्यमातील दिग्गजाच्या या प्रतिक्रिया माझ्यासारख्या ‘प्रिंट’मधील पत्रकाराच्या ‘मुद्रित’ माध्यमांवरील श्रद्धा वाढवणार्‍या आहेत. हे सगळं मला माझ्या पुण्यानंच दिलंय प्रसन्नजी. 

घरकोंडीच्या या काळात तुमच्यासारख्या पत्रकारांवर लोक जो राग व्यक्त करतात तो उघड्या डोळ्यानं बघा. ‘आजची महत्त्वाची ब्रेकिंग’ म्हणत तुमचे लोक भाषेचा जो खून पाडतात ते बघा. भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचे व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक कोटीच्या घरात जातात, माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचे व्हिडिओ पाहणारे, लेख वाचणारे लाखोंच्या घरात जातात आणि दुसरीकडे अनेकजण घरातील वृत्तवाहिन्या बंद करत आहेत इकडं लक्ष द्या. एखाद्यानं एखाद्याची प्रेमानं दखल घेताना काय विधानं केलीत यावरून मतं मांडायला अभ्यास लागत नाही. त्यामुळं तुम्ही उपाशीही मरणार नाही पण ‘सावरकर खलनायक की नायक?’ अशी उथळ चर्चा घेतल्यावर तुमच्या जाहिरातीही थांबू शकतात, त्यावरून माफीही मागावी लागते आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षकही दुरावू शकतात. 

या निमित्तानं प्रत्येकानं आपल्या गावाविषयीचा अभिमान जरूर व्यक्त करावा, जिथं जिथं सद्गुणांचा स्फोट आहे तिथं तिथं उपस्थिती लावून त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि माध्यमातल्या उपटसुंभांनी थोडंसं आत्मचिंतन करावं इतकंच सांगावंसं वाटतं.
- घनश्याम पाटील
7057292092  

21 comments:

  1. खरं तर प्रसन्न म्हणजे सोयीचे विचारवंत आहेत, जितकी माहिती त्यांना आहे त्यालाच ते शेवटचं मानत असावेत.. आपला विचार रेटून हानायचा.. सेलेब्रिटी पत्रकार

    ReplyDelete
  2. खरेतर अजून सणसणीत 'चपराक'बसू शकली असती पण आपण संयम बाळगला तरीही प्रसन्न जोशी यांच्यापर्यंत मराठवाड्यातील मातीचा सुगंध दरवळत गेला असेल.

    ReplyDelete
  3. सर,जबरदस्त ऊत्तर दिले आहे.प्रत्येक शब्द खरा आहे. दुसऱ्याची झालेली प्रगती सहन न झाली की, असेच होणार.

    ReplyDelete
  4. सर,जबरदस्त ऊत्तर दिले आहे.प्रत्येक शब्द खरा आहे.दुसऱ्याची झालेली प्रगती सहन न झाली की,असेच होणार.

    ReplyDelete
  5. व्वा,छानच चपराक.
    माध्यमातल्या उपटसुभांनी आत्मचिंतन करण्याची गरज मात्र नक्कीच आहे.

    ReplyDelete
  6. दादा, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या अनेक पत्रकारांचे प्रतिनिधीत्व प्रसन्नजी करत आहेत. मला खात्री आहे, जसे आजकाल देशातील गद्दारांना मोदीफोबिया झालेला आढळतो, तसाच या पत्रकार बंधुला सुद्धा कोणत्यातरी 'फोबिया'ने झपाटलं असावं. पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या शहराने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक चांगल्या व्यक्तिमत्त्वांना घडवले. आत्तापर्यंत त्यांपैकी कोणीही पुण्याविषयी शब्दानेही आगळीक केलेली ऐकिवात नाही, पाहण्यात नाही. त्याला तुम्ही तरी कसे अपवाद असणार? महत्त्वाचं म्हणजे ज्या शहराने रुजवले, घडवले, नाव दिले,ओळख दिली,अनेक चांगले मित्र दिले त्याच शहराविषयी कोणताही सुसंस्कृत मनुष्य अवाक्षर काढेल हे अविश्वसनीय आहे. याचे भान या बंधूला हवे होते. वैयक्तिक तुम्ही पुण्याविषयी अथवा तुम्ही सोसलेल्या कष्टाविषयी, त्रासाविषयी कोणत्याही प्रकारच्या दुगाण्या झाडलेल्या कधीही ऐकिवात नाही.यांना तो साक्षात्कार कुठे आणि कसा झाला, हे त्यांच्याकडूनच समजले तर आमच्यासारखे वाचक त्यांना लाख दुवा देतील. दादा, तुम्ही खूपच संयमी प्रतिक्रिया दिलीत. खरंतर तुमचा एवढा मवाळ भाषेतील बचावाचा पवित्रा माझ्यासारख्याला नवीन वाटला. न पटण्यासारखा वाटला. अर्थात त्यांनी तुम्हाला नसेल तरी तुम्ही मात्र त्यांना समजून घेतलेलं दिसतंय... हाच फरक असतो 'सुशिक्षित' आणि 'सुसंस्कारी' मधला! असो, तुम्ही खंबीर आहातच. अशा टिकटिपण्यांमुळे अधिक खंबीरपणा लाभेल.

    ReplyDelete
  7. कोत्या विचार सरणीची ही माणसे असतात...तुम्ही किती मोकळ्या मनाची व्यक्तीआहात हे मी अनुभवले आहे.यांना वाटते की माझा अनुभव,विचार तितकाच खरा..बाकीचे सगळे मूर्ख!! असे नसते .तेव्हा...**भुंकत राहणार, हत्ती होऊन तुम्ही चालत रहा, बास...तुमच्या प्रगती साठी शुभेच्छा....

    ReplyDelete
  8. *मी dr प्रमोद dhamangaonkar...वर प्रतिक्रिया दिली

    ReplyDelete
  9. प्रसन्न जोशीच्या आणि त्याच्यासारख्या अशाच घाण, मनोविकृत, इतरांना तुच्छ समजणाऱ्या मानसिकतेचा आम्हा मराठवाड्यातल्या लोकांना त्रास होतो. पुण्यात कित्येक वर्षांपासून बस्तान मांडलेल्या आमच्यासारख्याना पुणेकर आपलं समजत नाहीत. मग तो पुण्यातून मुंबईला गेलेला प्रसन्न सारखा माणूस का असत नाही. पुण्याबाहेरच्या घनश्याम यांचं दोन ओळीतील कौतुकही सहन होत नाही, तो पक्का पुणेकर... मुळात उथळ, बटबटीत पत्रकारिता करणारा माणूस त्याच्या मूळ स्वभावावर गेला. कारण म्हैस जेव्हा शेपटी उचलते, तेव्हा ती गाणं नक्कीच म्हणत नाही....

    ReplyDelete
  10. खूप संयमी लिहिलं आहे....

    स्पष्ट आणि परखड!...

    ReplyDelete
  11. अतिशय संयमाने पण स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या! जबरदस्त !!

    ReplyDelete
  12. माय मराठीच्या मागे सच्चा, कणखर आणि समर्थ पर्याय उभा राहातो आहे। याचा विशेष आनंद वाटतो। बाकी 'अत्रेगिरी'ला सलाम।

    ReplyDelete
  13. प्रिय मित्र घनश्यामजी
    "वाचाळपणाला खळखळाट फार" अशा भंपक प्रतिक्रिया कडे लक्ष देऊ नका आपले काम चालू ठेवा.

    ReplyDelete
  14. घनश्यामजी नावातली प्रसन्न(?)ता जीवनात उतरायला तप करावं लागत तरच पत वाढण्याची शक्यता असते,वाढेलच याचिही शाश्वती देता येत नाही.जोशी या नावाची म्हणून कांहीं अब्रु असते याचेही भान ज्या महाभागाला उरले नाहीत्याची माता हे ओझे नऊ महिने पोटी वाढवून व्यर्थ शिणली.तुका म्हणे ऐश्या नरा(?) मोजून माराव्या‌ पैजारा .हा जगद्गुरु तुकोबारायांचा आदेश शिरसावंद्य मानून तुम्ही कर्तव्यदक्षतेने पेकाटात जी सणसणीत चपराक (की लाथ) घातलीय त्यामुळे 'ती' माताही कदाचित सुखावेल व आशा ठेवेल की हे अतीच वाहवलेल पोरं आता तरी वळणावर येईल? तुमचे मन:पूर्वक त्रिवार अभिनंदन!!!
    दिलीप कस्तुरे
    पूणे..

    ReplyDelete
  15. नमस्कार!
    अप्रसन्न मनानं जीवनाचं चिंतन केलं की कलुषित विचार जन्म घेतात. आपला गाव कळायला माणसानं गाव आणि भाव व्हावं लागतं तेंव्हाच मूळ गावच्या नाळाचं महत्व कळतं. उपटसुंभ गाव नसलेल्या माणसाला गावाच्या संस्कृतीचं महिमान काय कळणार? गावचा महिमा कळण्यासाठी माणसानं गाव जगलं पाहिजे. विचारवंतांनी जन्म भूमीला आईच महत्व दिलेलं असतांना असे दाईचे विचार कसे बरं जन्मले? कळायला मार्ग नाही. घनश्यामजी आपण उत्तम कार्य करत आहात! निंदकांचे आशिर्वाद घेऊनच आपण वाटचाल चालू राहू द्या! आम्ही आहोत ना!������

    ReplyDelete
  16. सणसणीत चपराक

    ReplyDelete
  17. चांगलीच चपराक दिलीत त्या अप्रसन्न ला.

    ReplyDelete
  18. चांगलीच चपराक दिलीत प्रसन्न ला!👌👍👍

    ReplyDelete
  19. चांगलीच चपराक दिलीत प्रसन्न ला!👌👍👍

    ReplyDelete
  20. आपण योग्य शब्दांत प्रसन्न जोशीला प्रतिक्रिया दिली आहे. पण प्रसन्न जोशी हा इसम इतका दाखलपात्र आहे का हा महत्वाचा प्रश्न. प्रसन्नचा आजवरचा इतिहास पाहता एकांगी आरोप करणे आणि प्रकरण आपल्या अंगाशी येत आहे असं दिसलं की सोयीस्कररित्या पळ काढणे हेच या महाशयांनी केलं आहे.
    आपल्या आजवरच्या दैदीप्यमान वाटचालीत आपण दोन शब्द मातृभूमीबद्दल अभिमानाने बोलला आणि तेच प्रसन्न जोशीला खटकत असतील तर हा इसम कोत्या मनोवृत्तीचा आहे हेच दर्शवते.

    ReplyDelete