Saturday, April 15, 2017

इंदौरचा मराठी साहित्य महोत्सव

महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटींहून अधिक आहे. त्यांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या समस्या मोठ्या आहेत. एका विशिष्ट वर्गाची आर्थिक सुबत्ता चांगली असताना दुसरीकडे मात्र एकवेळच्या जेवणासाठीही मोताद असणारे आपल्याकडे कमी नाहीत. अशावेळी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा हे व असे विषय फारच दूर राहतात. इथे प्राध्यापकांचे एक मोठे टोळके साहित्यात उचापत्या करत असते. त्यांना वाटते की, प्राध्यापक म्हणजेच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. या अंधश्रद्धेतून ते बाहेरच पडायला तयार नाहीत. विशिष्ट विषयात विद्यावाचस्पती होण्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासातून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सुटतो. एकदा का नावामागे साहित्यातील ‘डॉक्टर’ लागले की यांचे घोडे गंगेत न्हाते. मग त्यांना अवांतर वाचनाची गरज राहत नाही. गरजेपुरत्या माहितीतून मिळालेली छटाकभर अक्कल पुढे त्यांना साहित्यिक आणि समीक्षक म्हणून मिरवण्यास पुरेशी ठरते. अर्थात, याला काही अपवाद निश्‍चितच आहेत; पण अपवाद म्हणजे नियम नव्हे!
महाराष्ट्रात ज्ञानाच्या क्षेत्रात अशी दूरवस्था असताना महाराष्ट्राबाहेर मराठीचे काय होत असावे, झाले असावे असा प्रश्‍न आपल्याला नक्की पडत असेल. तो पडायला हवा! कारण थोडे थोडके नव्हे तर तब्बल चार-साडेचार कोटी मराठी लोक महाराष्ट्राबाहेर राहतात. तिथे राहून ते त्यांचे मराठीपण जपतात. चार-चार, पाच-पाच पिढ्या अमराठी भागात वास्तव्यास असूनही त्यांची आपल्या साहित्य आणि संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे. आपणही आपले मराठीपण जपण्यासाठी जितके प्रयत्न करत नाही, तितके प्रयत्न ही मंडळी करतात! मात्र त्यांच्याकडे ना आपले लक्ष आहे, ना आपल्या राज्यकर्त्यांचे! इथे आपलीच खायची मारामार तिथे तिकडे कधी लक्ष देणार? अशी संकुचित मनोवृत्ती तयार झालीय!
आपल्याकडे म्हणजे मराठीत अनुवादित पुस्तके मोठ्या संख्येत येतात. त्यातही इंग्रजीतून मराठीत येणारी पुस्तके लक्षवेधी आहेत. मग आपल्या भारतीय भाषा भगिनीची काय अवस्था आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. बंगाली, कानडी, तमीळ, गुजराती, उर्दू, हिंदी, पंजाबी अशा भारतीय भाषात उत्तमोत्तम पुस्तके असताना फक्त इंग्रजीतूनच येणार्‍या अनुवादाला प्रतिष्ठा प्राप्त होते. त्याचे हे कारण आहे की, इतर भारतीय भाषांचा आपला अभ्यास कमी पडतो. इंग्रजी ही परकीय भाषा असली तरी बालपणापासून या भाषेचा आपला अभ्यास झालेला असतो.
मराठी पुस्तके खपत नाहीत, अशी खोटी आवई सातत्याने दिली जात असताना अनुवादित पुस्तके मात्र मोठ्या प्रमाणात खपतात. अनुवादित पुस्तके छापणारे प्रकाशकही गब्बर असतात. याचा एक अर्थ असा आहे की, मराठीत गुणवत्तापूर्ण आणि अस्सल साहित्य येणे कमी झाले असावे! नाविण्यपूर्ण विषयांची कमतरता, अनुभवविश्‍व समृद्ध नसणे, जागतिकीकरणाचा आणि नव्या बदलांचा अंदाज न येणे, एखाद्या विषयासाठी झोकून देऊन अभ्यास करण्याची तयारी नसणे ही त्यापैकी काही कारणे असू शकतात!
हे सारे दुर्दैवी चित्र असताना आम्ही मात्र इतर भारतीय भाषात काम करण्याचा निर्णय घेतला. ‘आम्हाला कोणता कीडा चावला?’ असा प्रश्‍न काहींना पडला; मात्र मराठीतील साहित्य इतर भारतीय भाषात जावे आणि इतर भारतीय भाषेतले साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीत यावे असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात ‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने आम्ही ही घोषणा केली आणि अनेकजण आश्‍चर्यचकित झाले. त्या स्वप्नपूर्तीची सुरूवात आम्ही नुकतीच केली आहे.
मध्यप्रदेशची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून इंदौर शहर सर्वांना सुपरिचित आहे. जवळपास पाच हजार औद्योगिक कंपन्या या शहरात असल्याने इंदौरचा आर्थिक विकास झालाय. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या स्मार्ट सिटीत इंदौरचा समावेश आहे. येथील साहित्य आणि संस्कृतीचा वारसा पुण्यासारखाच संपन्न आहे. त्यामुळे या शहरापासून आम्ही हिंदी भाषा साहित्य निर्मितीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. आमच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अभिजात’ हा काव्यसंग्रह आणि उज्जैन येथील लेखक सुधीर आनन्द यांची ‘लव-कुश’ ही किशोर कादंबरी या दोन पुस्तकांपासून आम्ही हिंदी साहित्य निर्मितीचा यज्ञ आरंभिला. या निमित्ताने इंदौरमधील कवींचा गझल मुशायरा, तिकडच्या मराठी लोकांचे आणि महाराष्ट्रातून गेलेल्या कवींचे मराठी कवी संमेलन असे कार्यक्रम ठेवून दि. 8 व 9 एप्रिल 2017 रोजी आम्ही इंदौरमधील श्री मध्य भारत साहित्य अकादमीच्या शिवाजी सभागृहात ‘चपराक’चा पाचवा साहित्य महोत्सव घेतला. ‘लिवा क्लब’चे आमचे स्नेही विश्‍वनाथ शिरढोणकर, मध्यप्रदेश साहित्य अकादमीचे निदेशक अश्‍विन खरे, मराठी भाषेच्या वैभवात भर घालणारे इंदौर स्थित प्रा. डॉ. श्रीकांत तारे, हिंदी साहित्यिक हरेराम वाजपेयी, सूर्यकांत चतुर्वेदी, लेखक सुधीर आनन्द आणि त्यांच्या पत्नी सौ. संध्या या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील मराठी बांधवांना जोडणारा सेतू आम्ही तयार केला आहे. अश्‍विन खरे यांच्यासारखे साहित्यिक नेतृत्व मध्यप्रदेशला लाभले असल्याने गेल्या अठरा वर्षापासून ते हे कार्य अव्याहतपणे करतच आहेत; पण आम्ही त्यांच्या या कार्यात खारीचा वाटा उचलून या भाषा भगिनींना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला आहे.
इंदौरमध्ये ‘लिवा क्लब’ अनेक मराठी उपक्रम सातत्याने राबवते. आपल्याकडील अनेक मान्यवरांना त्यांनी वेळोवेळी निमंत्रित केले आहे. ‘लिवा’ ही आद्याक्षरे आहेत. म्हणजे ‘लिहावे-वाचावे क्लब!’ किती अर्थपूर्ण आणि थेट उद्देश स्पष्ट करणारे नाव! शिरढोणकर, खरे, शोभा तेेलंग अशा मंडळींनी ही चळवळ सुरू ठेवलीय. ज्या श्री मध्य भारत हिंदी साहित्य समितिच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला तिथे 1918 साली महात्मा गांधी आले होते. त्यावेळी त्यांनी ‘हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी’ अशी आग्रही मागणी केली होती. मात्र आजतागायत हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. भारताला अजूनही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही केवळ ‘संपर्क भाषा’ आहे.
हाच मुद्दा उपस्थित करत आम्ही सांगितले की, हिंदीला राष्ट्रभाषेचा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. या चळवळीत आपणही सहभागी व्हावे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच लाख पत्रे पाठविण्याचा उपक्रम सुरू आहे. त्यातील जवळपास एक लाख पत्रे एव्हाना पाठवली गेलीत. महाराष्ट्र सरकारही अमराठी भागातील उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे. त्याचा थेट लाभ लवकरच इंदौरमधील चळवळीलाही होईल. आपण आपले मराठीपण जपत आहात ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच ‘चपराक’च्या माध्यमातून तुमचे साहित्य जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
पुण्यातून आमच्यासोबत सुप्रसिद्ध लेखक भारत सासणे हेही आले होते. मुंबईतून नामवंत गझलकार ए. के. शेख सहभागी होते. शिवाय ‘चपराक’ परिवारातील शुभांगी गिरमे, चंद्रलेखा बेलसरे, माधव गिर, सरिता आणि अरूण कमळापूरकर, सागर कळसाईत, समीर नेर्लेकर, तुषार उथळे पाटील, प्रमोद येवले, मोरेश्‍वर ब्रह्मे, सचिन सुंबे, विनोद पंचभाई ही भक्कम टीम सहभागी झाली होती. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक दुवा साधण्यासाठी ‘चपराक’ने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विश्‍वनाथ शिरढोणकर यांनी लिहिलेले ‘मध्यप्रदेशातील मराठी माणसे’ हे पुस्तक लवकरच ‘चपराक’कडून वाचकांच्या भेटीस येत आहे. गेल्या काही पिढ्यातील मराठी बांधवांनी तिकडे जे अतुलनीय योगदान दिले त्याची माहिती या निमित्ताने सर्वांना होईल.
मराठी वाचकांना जोडून घेण्यासाठी आमचे विविध राज्यात सातत्याने दौरे चाललेले असतात. अमराठी भागात कृतीशील असणार्‍या मराठी बांधवांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. मागच्या वर्षी हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषदेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जाण्याचा योग आला. डॉ. विद्या देवधर यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये ख्ूप मोठे काम सुरू आहे. त्याची आठवण इंदौरमध्ये आमच्या सहकार्‍यांनी काढली. हैदराबादप्रमाणेच इंदौरमध्येही उन्हाचा कडाका असेल असे वाटले होते; मात्र इथे तर महाबळेश्‍वरपेक्षाही थंड वातावरण होते. इंदौरचे सांस्कृतिक वातावरणही पुण्यासारखेच वाटले. शनिवार, रविवारी इथे किमान पंधरा-वीस सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शनिवार दि. 8 रोजी ज्या संस्थेत आमचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी त्याच वास्तुतील तिन्ही मजल्यावर तीन स्वतंत्र कार्यक्रम सुरू होते आणि एकाही कार्यक्रमात एकही खुर्ची रिकामी नव्हती. असे रसिक आणि श्रोते सध्या पुण्यासारख्या महानगरातही दुर्मीळ झाले आहेत. म्हणूनच इंदौर आम्हाला आपलेसे वाटत होते. माझ्या सहकारी मित्रांना मी सहजपणे बोलून गेलो की, हैदराबादमध्ये निजामांची राजवट होती. इंदौरमध्ये होळकरांनी राज्य केले. मराठी माणसांनी अमराठी भागात येऊन एक देदीप्यमान इतिहास निर्माण केला. होळकरांच्या राजवाड्यासह येथील वास्तू, संस्कृती त्याची साक्ष पटवून देतात. म्हणूनच इंदौरविषयी आंतरिक आत्मियता वाटत असावी.
साहित्यिक चमू सोबत असल्याने रेल्वेत केलेली धमाल, इंदौरमधील हिंदी साहित्यिक, 90 वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेली ‘वीणा’ ही सांस्कृतिक पत्रिका, श्री मध्य भारत हिंदी साहित्य समिती, लिवा क्लब, मराठी साहित्य अकादमी, होळकरांचा ऐतिहासिक राजवाडा, जगप्रसिद्ध खाऊगल्ली, तिथली मिठाई, इंदौरकरांचे आदरातिथ्य, नेटाने साहित्यसेवा करणारी मराठी मंडळी अशा सर्वांचा जवळून परिचय झाल्याने आमचा इंदौर दौरा अविस्मरणीय झाला. महाराष्ट्राबाहेर राहणारे आणि आपले मराठीपण जपणारे सर्वजन आपले बांधवच आहेत, याची जाणीव आपल्याला कायम असावी एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. 

- घनश्याम पाटील
7057292092

4 comments:

  1. एकदम संवेदनशीलतेने समाज जागृती करणारा जबरदस्त लेख सर 👍🏻👍🏻🙏👌🏻🙏🙏

    ReplyDelete
  2. महाराष्ट्राबाहेरिल मराठी समाज/साहित्यिक/कवि व श्रोते अन वाचकांची दखल घेणारा लेख

    ReplyDelete
  3. हिंदी -मराठी चा अपूर्व संगम.... उत्कृष्ट लेख!

    ReplyDelete
  4. हिंदी -मराठी चा अपूर्व संगम.... उत्कृष्ट लेख!

    ReplyDelete