Sunday, October 9, 2016

विचारांचे कवडसे

एखाद्या राष्ट्राचे मूल्यमापन करायचे झाल्यास त्या राष्ट्रातील तरूणाईच्या मनाचा वेध घ्यायला हवा. तरूण काय वाचतात, काय लिहितात, काय बोलतात, काय खातात, काय घालतात याचे निरिक्षण केले तर राष्ट्राच्या प्रगतीची दशा आणि दिशा कोणाच्याही सहजपणे लक्षात येईल. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूर येथील स्वप्निल कुलकर्णी हा असाच एक धडपड्या युवक. आपल्या उपजिविकेचे साधन असलेली नोकरी सांभाळत स्वप्निल कुलकर्णी या तरूणाने राज्यातील आणि राष्ट्रातील विविध विषयांचा डोळसपणे धांडोळा घेतला आहे. विचारधारा, जात, पात, धर्म, प्रांत यापुढे जाऊन स्वप्निल यांनी चौफेर लेखन केले. त्यातील प्रासंगिक विषयावरील लेख काही नियतकालिकात प्रकाशित झाले. त्यामुळेच आजचा तरूण कसा व्यक्त होतोय हे पाहण्यासाठी स्वप्निल कुलकर्णी यांचे या पुस्तकातील एकवीस लेख वाचायला हवेत.
स्वप्निल यांच्या मनातील विचारांचे कवडसे या संग्रहात विखुरले आहे. संस्कार आणि संस्कृती जतन करावी यासाठीची त्यांची तळमळ दिसून येते. आजचे तरूण वाहवत चाललेत,  असा अपप्रचार सुरू असतानाच स्वप्निल यांच्यासारखे लेखक धडाडीने अन्याय, असत्यावर तुटून पडतात, लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक बाजू वाचकांसमोर आणतात ही कौतुकाची बाब आहे. स्वप्निल यांना लेखनासाठी स्थानिकपासून आंतरराष्ट्रीय घटनांपर्यंत कोणताही विषय वर्ज्य नाही. संवादी भाषा आणि तळमळ यामुळे हे लेख वाचताना वाचक अंतर्मुख होतो. एखाद्या विषयावर मांडलेली मते वाचताना आपल्या मनातील भावनाच व्यक्त झाल्यात असे वाचकांना वाटणे हीच तर लेखकाची मोठी उपलब्धी असते.
‘आई तू उन्हातली सावली’ या पहिल्याच लेखात स्वप्निल यांनी शब्दांची साखर पेरणी केली आहे. मातृत्वाची महती गाताना लेखक भावव्याकूळ होतो. जुलीया वार्डहो या अमेरिकन कवयित्रीपासून ते मराठमोळ्या फ. मु. शिंदे यांच्यापर्यंतच्या कवींचे ‘मातृत्व’ या विषयावरील दाखले या लेखात आले आहेत. स्वप्निल यांच्या वाचनाचा आवाका आणि त्यांची उपजत समज याची ही साक्ष ठरेल. ‘आई हा परमेश्‍वर, आई माझा गुरू आणि आईच माझा प्राण. त्यापलीकडं कुणी खूप वेगळा, मोठा, श्रेष्ठ असा परमेश्‍वर असलाच तर त्यालासुद्धा माझ्या आईची सर येणार नाही’, हे लेखकाचे विचार वाचताना त्याची मातृभक्ती दिसून येते. आपले सांस्कृतिक संचित जपताना आजच्या तरूणाईची मातृत्वाच्या गौरवाची ही भाषा म्हणूनच प्रत्येकाला प्रेरणादायी वाटावी.
असे म्हणतात की, ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो, तेथील माणसे मरतात. काहीवेळा जनावरेही मरतात; मात्र जिथे संस्कारांचा दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हे संस्कार जिवंत ठेवणे, ते वृद्धिंगत करणे हे काम आजच्या तरूणाईने करायला हवे स्वप्निल कुलकर्णी त्यासाठी लेखणीच्या माध्यमातून पुढाकार घेताना दिसतो. ‘टिळक आणि गणपती उत्सव’, ‘शिवाजी महाराज एक धिरोदत्त राजा’, ‘चेतनाप्रवाह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या व्यक्तिचित्रणात्मक लेखांच्या माध्यमातून स्वप्निल कुलकर्णी यांनी तरूणांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे. ‘करावयास लागा म्हणजे कळून येईल की तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे’ हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य देताना लेखकातील सच्चेपणा दिसून येतो. ‘नवरात्र संकल्पना आणि महत्त्व’ या विषयावरही लेखकाने उत्तम मांडणी केली आहे. आपल्याकडील सण, उत्सव, चालीरिती, रूढी परंपरा यापासून आपण दूर जात असताना स्वप्निल यांनी त्यांच्या नजरेतून याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. उत्सवांना ‘इव्हेंट’ म्हणून बाजारू स्वरूप दिले जात असताना स्वप्निल यांनी त्यामागील संकल्पना नेटकेपणे मांडली आहे. ‘नवरात्र केवळ साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीची गाथाच नाही, येथे साधनाक्रमाचे निर्देशही दिले आहेत. प्रथम मनशुद्धी झाल्याशिवाय कोणीही ज्ञानप्राप्ती करू शकत नाही’ हे लेखकाने नोंदवलेले निरिक्षण खूप काही सांगून जाते.
लेखकाचा जन्म पंढरपूरचा असल्याने त्यात या शहराची गौरवगाथा, वारकरी संप्रदायाचे महात्म्य येणे स्वाभाविकच म्हणायला हवे. आपले पहिलेच पुस्तक वाचकांच्या हाती देताना ‘पंढरपूर आणि वारकरी संप्रदाय’, ‘पंढरीची वारी ः इतिहास, परंपरा व वैशिष्ट्ये’ असे दोन अभ्यासपूर्ण लेख लिहून त्यांचा या पुस्तकात समावेश केला आहे. वाढती अराजकता लक्षात घेऊन लेखक अस्वस्थ होतो आणि ‘कधी होशील रे माणूस?’ असा सवाल करतो. ‘लेक वाचवा, भविष्य वाचवा’ या लेखातूनही स्वप्निल कुलकर्णी सामाजिक प्रश्‍नांबाबत किती गंभीर आहेत याची प्रचिती येते. लेखकाच्या अभ्यासाची कुवत मोठी असल्याने पानिपत युद्धापासून ते ‘आपला देश महासत्ता कधी होईल?’ इथपर्यंत सर्व विषय त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. परदेशातील स्वच्छतेचे तोंड भरून कौतुक करताना आपल्या फलाटावरील पूलावर पानाच्या मारलेल्या पिचकार्‍या पाहून लेखकाला ही विसंगती खटकते आणि ‘हे देशप्रेम आहे का?’ असा रोकडा सवाल तो उद्विग्न होऊन करतो.
सरकारच्या दलालधार्जिण्या धोरणांमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. स्वप्निल कुलकर्णी यांनी या विषयावर जळजळीत भाष्य केले आहे. विकासाची गंगोत्री केवळ पश्‍चिम महाराष्ट्राकडेच वळवल्याचे वास्तव पाहून लेखक पेटून उठतो. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या पाहून त्याचे हृदय द्रवते. त्यांच्याविषयी वाटणार्‍या तळमळीमुळेच तो पेटून उठतो आणि राज्यकर्त्यांविरूद्धचा हा उद्रेक लेखणीतून धाडसाने मांडतो. तत्कालीन सरकारची अनागोंदी पाहून हा लेख लिहिला असला तरी आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचे दुःख स्वप्निल कुलकर्णी यांनी नेमकेपणे मांडले आहे. शेतकरी, कष्टकरी यांचा कैवार घेणारी लेखणी कोणत्याही परिस्थितीत गौरवास पात्र ठरते. स्वप्निल यांचे त्यासाठी विशेष अभिनंदन.
‘पर्यावरण संतुलन आणि वृक्षसंवर्धन’, ‘भ्रष्टाचाराचा भस्मासूर’, ‘मोबाईल शाप की वरदान’, ‘दहशतवाद आणि मानसिक आरोग्य’, ‘तरूणाईची दिशा आणि दशा’, अशा वैविध्यपूर्ण विषयांवर स्वप्निल कुलकर्णी यांनी आपली मते मांडली आहेत. मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचे लेखकाचे चिंतन दखल घेण्याजोगे आहे.
रोजच्या रहाटगाड्यातून वेळ काढून वाचन, लेखन, चिंतन करणार्‍या स्वप्निल कुलकर्णी यांच्यासारख्या युवकांची आज आपल्या राष्ट्राला गरज आहे. स्वप्निल यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे लेखनात काही ठिकाणी नवखेपणाच्या खूणा स्पष्टपणे दिसून येतात. वृत्तपत्रातील लेख, पूरक बातम्या वाचून भाष्य केल्याने काही लेख निबंधाच्या अंगाने गेले आहेत. मात्र तरीही त्याचे संदर्भमूल्य आणि वाचनीयता कमी होत नाही. तरूणांची अभिव्यक्ती ही स्वागतार्हच म्हणायला हवी. भविष्यात स्वप्निल यांच्याकडून आणखी ताकतीचे लेखन व्हावे, स्वतंत्रपणे त्यांनी नवनवीन विषय आणि साहित्य प्रकार हाताळावेत यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.
पाने - 112
किंमत - 110
प्रकाशक - ‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)



No comments:

Post a Comment