Monday, September 19, 2016

कविता काही करा चला तर...!

मानवी स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींची किंमतच कळत नाही. अनेक अनमोल गोष्टी आपल्या जवळच असूनही आपण त्यांची कदर न करता ‘आणखी हवे’ चा हव्यास धरतो. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या शरीराच्या विविध अवयवांचे देता येईल. शरीराच्या कोणत्याही अवयवात बिघाड झाली तर आपण पुरते त्रासून जातो; मात्र याच अवयवांची निगा राखणे आपल्या गावीही नसते. आपण क्षणाक्षणाला श्‍वासोच्छ्वास घेतो पण या श्‍वासाचे महत्त्व आपल्या ध्यानात येत नाही. जेव्हा आपण शेवटचा श्‍वास घेतो तेव्हा आप्तेष्ट, मित्रमंडळी हळहळतात; मात्र आपल्याला त्याची पुसटशीही जाणीव नसते. शेवटचा श्‍वास घेईपर्यंत श्‍वासाचे महत्त्व कळू नये, हे दुर्दैवच खरे! 

हे वैश्‍विक सत्य अधोरेखित करण्याचे कारण म्हणजे कविता! माणसाच्या बारशापासून बाराव्यापर्यंत साथ देणारी कविता आपल्या खिजगणतीतही नसते. जन्मापासून मृत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर कविता आपल्याला साथ देते. ती अंगाईच्या माध्यमातून असेल, व्रतबंधाच्या श्‍लोकातून असेल, मंगलाष्टकाच्या माध्यमातून असेल किंवा अंत्येष्टीच्या मंत्राच्या माध्यमातून असेल! कविता आपली साथ सोडत नाही. देशभक्तीच्या गीतातून, पोवाड्यातून जसे क्रांतीचे अंगार फुलतात तशीच अनेक प्रेमगीतातून प्रीतही फुलून येते. प्रेमाचा आविष्कार व्यक्त करायचा असले किंवा विरहाच्या वेदना थोड्याशा हलक्या करायच्या असतील; प्रत्येक ठिकाणी कविताच गीत आणि संगीताची साथ घेऊन आपल्या मदतीसाठी धावून येते. 

ज्यांनी समाजाची मानसिक, बौद्धिक जडणघडण केली त्यातील बहुतांश काव्यग्रंथ आहेत. महाराष्ट्रातील कवितेचा मागोवा घेतला तर आपल्याकडे काव्याचे प्रमुख तीन टप्पे आढळून येतात. संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य हे ते तीन प्रकार आहेत. संत काव्यात संत ज्ञानेश्‍वर, जगद्गुरू तुकोबा, रामदास स्वामी अशा असंख्य विभुतींचा समावेश होतो. वामन पंडित, कवी मोरोपंत अशा महान कवींचा पंत काव्यात समावेश होतो; तर शाहीर राम जोशी, होनाजी बाळा अशांच्या कविता तंतकाव्यात मोडतात. यानंतर आपला ज्याच्याशी सर्वाधिक संपर्क येतो त्या आधुनिक मराठी काव्याचा टप्पा सुरू होतो. आधुनिक मराठी कवितेने कवितेला अध्यात्म, ईश्‍वरचिंतन अशा विषयांतून बाहेर काढले आणि निसर्ग, सामाजिक सुधारणा, संसारातील वैयक्तिक सुखदुःखे या व अशा विषयांचा अचूक वेध आधुनिक कविता घेऊ लागली. यासंदर्भात आधुनिक मराठी कवितेत काही ठिकाणी बदल झालेला दिसतो. काही कवींनी छंद, वृत्त, मात्रा यांच्या बेड्या तोडून अधिक मोकळ्या शैलीत म्हणजे मुक्तछंदात आपल्या मानसिक, बौद्धिक गोष्टींच प्रगटीकरण केलं. यात केशवसूत, राम गणेश गडकरी, बा. सी. मर्ढेकर आदींची कारकिर्द पाहता येईल. 

गेल्या तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत कविता हा दुर्लक्षित आणि उपेक्षित प्रकार होता. अधूनमधून कवी संमेलने होत; पण गर्दी रोडावलेली! ‘कवितेला मानधन द्यायच असतं’ ही संकल्पनाच त्यावेळी रूजलेली नव्हती. अशा प्रतिकूल काळातही लोककवी मनमोहन नातू, रॉय किणीकर अशा कविंनी असंख्य हालअपेष्टा सहन करत कवितेचा झेंडा डौलात फडकावला. लोककवी मनमोहनांचा एक किस्सा याठिकाणी आवर्जून नमूद करावासा वाटतो. अफाट प्रतिभेचे किमयागार असलेले मनमोहन समाजाकडून आणि राज्यकर्त्यांकडून कायम उपेक्षित राहिले. ‘उद्याचा कालीदास अनवाणी जात असेल तर त्यात अब्रु त्याची नाही, राजा भोजाची जाते’ असे ठणकावून सांगणारे मनमोहन कधीही धनप्राप्तीच्या मागे लागले नाहीत. एकेदिवशी सकाळी ते त्यांच्या घराबाहेर आंघोळीसाठी पाणी तापवत बसले होते. त्यांच्या अंगावर त्यावेळी मोजकेच कपडे होते. त्यांच्या घरासमोरून तेथील स्थानिक नगरसेवक त्यांच्या बगलबच्यासह चालले होते. उघडेबंब बसलेल्या मनमोहनांना पाहून त्यांची चेष्टा करायची लहर नगरसेवकाला आली. ते म्हणाले, ‘‘काय कवीराज? अंगावर कपडे का घातले नाहीत?’’ मनमोहन म्हणाले, ‘‘घालावेसे वाटले नाहीत, म्हणून घातले नाहीत.’’ नगरसेवकाने चेष्टेने विचारले, ‘‘घालावेसे वाटले नाहीत, की घालण्यासाठी कपडेच नाहीत?’’ त्याचा अहंकाराचा सूर ध्यानात आलेल्या मनमोहनांनी तिथल्या तिथे चार ओळी ऐकवल्या. ते म्हणाले, ‘‘राजकीय पुरूषांची कीर्ती 
मुळीच मजला मत्सर नाही 
आज हुमायू बाबरपेक्षा 
गालिब हृदय वेधित राही’’ 
याला म्हणतात प्रतिभेचा स्फोट! हुमायू आणि बाबराचे दाखले आदर्श 
म्हणून कोणीही देत नाही मात्र कलावंत असलेले गालिबमियॉं त्यांच्या काव्यातून अजरामर झाले, ही वस्तुस्थिती आहे. 

प्रतिभेलाच आपले सामर्थ्य मानणार्‍या या कवींनी मराठी कविता जगवली; मात्र व्यवहाराच्या पातळीवर ते सपशेल अपयशी ठरले. आर्थिक चणचण असल्याने आलेला दिवस कसाबसा ढकलत कुटुंबाचा गाडा ओढणे त्यांच्यासाठी कष्टप्रद आणि प्रचंड आव्हानात्मक होते. मात्र आधुनिक मराठी कवितेने हे दिवस बदलले. आता कविंनाही सुगीचे दिवस आले आहेत. अनेक कवींच्या कवितासंग्रहाची गावपातळीवरही चांगली विक्री होऊ लागली आहे. या विक्रमी विक्रीतून आणि शहराबरोबरच खेड्यापाड्यातही होणार्‍या विविध काव्यविषयक उपक्रमातून चांगली अर्थप्राप्ती होऊ लागली आहे. प्रवीण दवणे, आमचे मराठवाड्यातील प्रा. इंद्रजित भालेराव, अशोक नायगावकर, विसुभाऊ बापट, संदीप खरे यांच्यासारखे अनेक कवी, गीतकार हजारो रूपये मानधन घेतात आणि लोकही त्यांना सन्मानाने काव्यविषयक उपक्रमांना सातत्याने बोलावतात. इंद्रजित भालेरावांनी कवितेच्या मानधनातून परभणीत हक्काचे घर बांधल्याचे आदर्श उदाहरण आम्हास ठाऊक आहे. 

ही चांगली परिस्थिती अधिक चांगली होण्यासाठी मात्र काही गोष्टी अधिकाराने मांडाव्याशा वाटतात. डार्विनने सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे ‘जो लायक आहे तोच जगतो.’ त्यामुळे या स्पर्धेच्या युगात कवींनी आपल्या कवितेचा कस आणि सादरीकरणाचा दर्जा उत्तम असावा याची काळजी घ्यावी. लेखन आणि सादरीकरण या दोन्ही निकषांवर अव्वल उतरणार्‍या कविता मोजक्याच असतात. काही कविता वृत्तपत्रातून, मासिकातून, दिवाळी अंकातून किंवा संग्रहातून वाचायलाच चांगल्या वाटतात; तर काही कविता प्रभावी सादरीकरणाने रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवता येतात. मात्र या कविता छापील स्वरूपात वाचताना त्या अगदीच सामान्य वाटतात. असे का होते आणि अशा परिस्थितीत काय करावे, हे ज्याने त्याने आपापल्या बुद्धिप्रमाणे ठरवावे. कवींचे विविध विषयांवर भरपूर वाचन असणे हे तर आवश्यकच आहे. आपले शब्दसामर्थ्य वाढविण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. सध्या अनेक छोटीमोठी काव्यसंमेलने, कवितांचे एकपात्री आणि समूह कार्यक्रमही मोठ्या संख्येने होतात. अशा संमेलनांना हजेरी लावून अन्य कवींच्या कविता ऐकणे, त्यांना दाद देणे, त्यांच्या कवितेचे आणि सादरीकरणाचे बारकावे समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. कवींनी इतरांच्या काव्यवाचनाला हजेरी न लावणे ही व्यक्तिशः आम्हाला मोठी नैतिक विकृती वाटते. 

गटबाजी आणि तटबाजीला थारा न देता जिथे जिथे सद्गुणांचा स्फोट आहे तिथे तिथे हजर राहून अन्य कवींना मोठ्या मनाने दाद ही दिलीच पाहिजे. ‘चपराक’च्या वतीने आम्ही गेल्या दहाबारा वर्षात अनेक काव्यविषयक उपक्रम राबवले. त्यात प्रामुख्याने अनेक कवी संमेलनांचे आयोजन, राज्यस्तरीय काव्यस्पर्धा, नवोदित कवींचे काव्यसंग्रह प्रकाशित करणे आणि त्यांचे समारंभपूर्वक प्रकाशन सोहळे घेणे, कवीवर, कवितेवर चर्चा घडवणे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कवींनाही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक वातावरण सुदृढ, पोषक ठेवणे आदींचा समावेश आहे. आम्हाला तर असेही वाटते की, सध्या नवोदित कवींनी स्वतःचे व्यासपीठ स्वतःच निर्माण करावे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजार आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी पथनाट्याच्या धर्तीवर कविता वाचनाचे कार्यक्रम व्हावेत. या कवितांचे एखादे कडवे कानावर पडल्यानंतर संपूर्ण कविता ऐकल्याशिवाय ऐकणार्‍याचे पाऊल पुढे पडणार नाही, इतक्या ताकतीच्या त्या ओळी असाव्यात. ब्लॉग, वदनपुस्तिका (फेसबूक), ट्विटर अशा माध्यमातून उगीच काहीतरी रतीब टाकून लोकांचे कवितेविषयीचे मत आणखी कलुषित करण्याऐवजी दर्जेदार कविता द्याव्यात. लोकांना कविता या साहित्याच्या सर्वोत्कृष्ट प्रकाराविषयी आणखी जिव्हाळा वाटायला हवा. कवी आणि कवितांविषयी आदराची भावना निर्माण व्हावी, यासाठी सर्व कवींनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 

आपल्या रचना विविध नियतकालिकांना आणि वृत्तपत्रांना पाठवूनही प्रकाशित न झाल्याने उदास असलेले अनेकजण आम्हास भेटतात. मात्र गुणात्मक दर्जा उत्तम असूनही जागेची मर्यादा असल्याने अनेक संपादकांना इच्छा असूनही अनेकवेळा काही चांगले साहित्य देता येत नाही. त्यामुळे कविता छापून आली नाही, याचे शल्य उराशी न कवटाळता आणखी चांगले काव्यलेखन करावे. गुणवत्ता आणि दर्जा असेल तर कुणाचाही बळी जाणार नाही, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. प्रकाशमार्गावरच्या सर्व शब्दयात्रींकडून भविष्यात आणखी चांगल्या, आशयसंपन्न, अर्थपूर्ण कविता ऐकायला, वाचायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो! 

-घनश्याम पाटील
संपादक 'चपराक', पुणे 
 ७०५७२९२०९२

No comments:

Post a Comment