Saturday, April 29, 2017

खरा वीर वैरी पराधीनतेचा


महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा!
मुंबईसह अखंड महाराष्ट्राचे सेनानी सेनापती बापट यांच्या या ओळी! सेनापती बापट, आचार्य अत्रे अशा धुरिणांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असे म्हणणारे यशवंतराव चव्हाण स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि अखंड महाराष्ट्राचा मंगलकलश त्यांनी वाजत गाजत आणला. त्यावेळी आचार्य अत्रे यांच्यासारख्या या लढ्यातील प्रमुख सेनानीला साधे बोलवायचे सौजन्यही तेव्हाच्या नेतृत्वाने दाखवले नाही. 1 मे 1960 नंतर आता 2017 पर्यंत महाराष्ट्र ज्या स्थित्यंतरातून जातोय त्यामुळेच ते पाहणे मोठे मनोरंजक आहे.
‘हे राज्य मराठ्यांचे की मराठीचे?’ असा सवाल ग. त्र्यं. माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाण यांना केला. त्यावेळी त्यांनी हे राज्य ‘मराठी’चेच असल्याचे सांगितले होते. त्यांच्यानंतर ‘मराठा’ नेते अशीच प्रतिमा असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीर्घकाळ महाराष्ट्राचे नेतृत्व केले. प्रारंभीच्या काळात यशवंतरावांचा सुसंस्कृतपणा पवारांनी घेतला; मात्र पुढे पुढे त्यांची दिशा बदलत गेली. अफाट महत्त्वाकांक्षेने ग्रासलेल्या या नेत्याने देशाच्या राजकारणात आपली छाप उमटवली; पण राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांना विश्‍वासार्हता निर्माण करता आली नाही. त्यांच्या जवळपासही फिरकू शकणार नाही अशी अनेकांची गत असतानाही शरद पवार काळाच्या कसोटीवर पिछाडीवर पडले. अन्यथा त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला पंतप्रधान मिळाला असता; पण ते होणे नव्हते!
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या परीने महाराष्ट्राचा गाडा हाकला! पण अनेक ‘खुरट्या’ नेत्यांनी महाराष्ट्राला बरेचसे मागे नेले. नारायण राणे, अशोक चव्हाण अशांची ‘आदर्श’ कारकिर्द आपण बघितली आहेच. वसंतदादा पाटील यांच्यासारखा साधा नेता या राज्याचे कधीकाळी नेतृत्व करायचा ही गोष्ट आता अविश्‍वसनीय वाटावी इतकी राजकारणाची पातळी घसरली आहे.
महाराष्ट्रासाठी या सर्व नेत्यांनी, सत्ताधार्‍यांनी जे काही बरेवाईट करायचे ते केले! पण आज महाराष्ट्राची नेमकी काय गत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणारे आहे. सर्व समाजातील वाढलेला कट्टरतावाद, जातीय अस्मितेचे ओंगळवाणे प्रदर्शन, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, श्रमाची प्रतिष्ठा धुळीस मिळणे, प्रामाणिक आणि कर्तबगार लोकांवर आणि त्यांच्या गुणवत्तेवर केलेला अन्याय, स्त्रियांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी, अजूनही मुलभूत सेवासुविधांपासून अनेकजण कोसो मैल दूर असणे, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचेही बाजारीकरण, बेरोजगारी, गुन्हेगारी, वाढती महागाई, या सर्वांतून निर्माण झालेली असुरक्षितता या व अशा असंख्य गोष्टींमुळे महाराष्ट्र ‘महान राष्ट्र’ होऊ शकले नाही.
मुलगी झाली म्हणून तिला विष खाऊ घालून मारणारा बाप आणि आपल्या लग्नासाठी बापाकडे पैसे नाहीत, तो कर्जबाजारी असल्याने अजून त्याच्या दुःखात भर नको म्हणून आत्महत्या करणारी मुलगी हे दुर्दैवी चित्र अजूनही महाराष्ट्रात आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा यासाठी काही गंभीर प्रयत्न होताना दिसत नाहीत. या सगळ्या परिस्थितीला कंटाळलेल्या जनतेने देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठे परिवर्तन घडवले. कॉंग्रेसची राजवट जाऊन भाजपचे सरकार स्थिरावले आहे. हे परिवर्तन मात्र केवळ ‘खांदेपालट’ इतक्याच स्वरूपाचे होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कॉंग्रेस मुक्त भारत’ची घोषणा दिली होती. प्रत्यक्षात आज मात्र ‘कॉंग्रेसयुक्त भाजप’ अशी परिस्थिती निर्माण झालीय. निवडणुकीच्या आधी चार-दोन दिवस भाजपमध्ये दाखल झालेले अनेकजण आज सत्तेत आहेत. म्हणूनच एकीकडे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये धडाकेबाज निर्णय घेऊन आपली कृतीशिलता दाखवून देत असताना इथले सरकार मात्र ढीम्म आहे. विरोधकांना वेगवेगळ्या प्रकारे धमकावून पक्षात सामावून घेतल्याची चर्चा सर्वत्र जोरकसपणे सुरू आहे. ‘इनकमिंग फ्री’ ही पद्धत इतक्या टोकाला गेली की विचारता सोय नाही.
राज्यात नुकत्याच काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. पुण्यासारख्या शहरात एका मताचा भाव होता पाच ते आठ हजार रूपये! कोणी कितीही संतपणाचा आव आणला तरी ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून जे भाजपमध्ये आले त्यांच्यावर त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन सहकारी उमेदवारांच्या प्रचाराचीही जबाबदारी देण्यात आली होती. म्हणजे एका मतदारसंघात कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून आयात केलेला एक उमेदवार असेल तर त्याने त्यांच्यासोबत असलेल्या तीन भाजपायींचा पूर्ण खर्च करायचा. अशापद्धतीने पैशाचा पाऊस पाडल्याने अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल आले आहेत.
मध्यंतरी मराठा मूक मोर्चाची हवा जोरात होती. कोपर्डीतील अत्याचारित मुलीला न्याय मिळावा या मागणीपासून सुरू झालेला हा मोर्चा मराठा आरक्षणापर्यंत आला. यातून साध्य काय झाले हे अजून तरी दिसून येत नाही; पण यामुळे अनेक जातीत असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय हे मात्र नक्की! सर्वच जातीत वाढलेला कमालीचा कट्टरतावाद हे आपल्या राष्ट्राला लागलेले मोठे ग्रहण आहे. या मराठा मोर्चानंतर दलित आणि इतर बांधवांचे प्रतिमोर्चेही निघाले. प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्याने असे प्रतिमोर्चे काढू नयेत असे आवाहन केले होते; अर्थात नेहमीप्रमाणे त्यांना कोणी जुमानले नाही. ‘हम भी किसी से कम नही’ हे दाखवून देण्याची अहमहमीका सर्वच जातीत निर्माण झालीय. त्यातूनच जातीजातींत दुफळी निर्माण झाली आहे.
‘मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले’ असे सेनापती बापटांनी सांगितले होते. मात्र हा ‘मराठा’ त्यांना ‘मराठी’ या न्यायाने अपेक्षित होता. जो कोणी महाराष्ट्रात राहतो तो ‘मराठा’ इतकी त्यांची साधी सोपी व्याख्या होती. आपण मात्र ‘मराठा’ हा शब्दच जातीयवाचक करून टाकला. अशोक चव्हाणांनी ‘आदर्श‘ हा शब्द जसा बदनाम केला तसेच काहीसे ‘मराठा’चे झाले आहे. ‘महाराष्ट्रगीत’ लिहिणार्‍या राम गणेश गडकरी यांचा पुतळाही आता महाराष्ट्रात, तेही पुण्यासारख्या शहरात सुरक्षित नाही यातच सारे काही आले.
संभाजी ब्रिगेडसारख्या काही संस्थांनी मराठ्यांना पुढे करत टोकाचा जातीय द्वेष निर्माण केला. ‘ब्राह्मणांना मारा, कापा, त्यांच्या बायका पळवून आणा’ इथपासूनची भाषा पुरूषोत्तम खेडेकर नावाच्या या संघटनेच्या टोळीप्रमुखाने केली. राष्ट्रद्रोहापासूनचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. जातीजातीत सूडभावना निर्माण करण्याचे काम यांनी नेटाने केले. वेळ आल्यावर मात्र न्यायालयात माफी मागून ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ अशी भूमिका घेतली. संस्काराचा टेंभा मिरवणार्‍या भाजपसारख्या पक्षानेही मग अशा सगळ्या प्याद्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. त्यातूनच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनाग भाजपमधून उमेदवारी मिळाली. हेच शिवीश्री खेडेकर उगवत्या सूर्याला नमस्कार करावा याप्रमाणे आता भाजपची भलावण करताना दिसतात. ‘मराठा मोर्चा हा मराठ्यांचा सर्वात अविवेकी निर्णय होता’, ‘ब्राह्मण समाजात सगळेच वाईट नसतात’, ‘मुख्यमंत्री ब्राह्मण असले तरी कर्तबगारीच्या पातळीवर त्यांचा हात कुणी धरू शकत नाही’, ‘शरद पवार हे कट्टर जातीयवादी नेते आहेत’ अशी विधाने खेडेकरांनी सुरू केली आहेत. सरड्यालाही लाज वाटावी इतके रंग ही माणसे बदलतात.
सेनापती बापट यांनी दिलेला महत्त्वाचा संदेश म्हणजे ‘खरा वीर वैरी पराधीनतेचा!’ आपल्याला नेमका याचाच विसर पडत चाललाय. पराधीनता रक्तात भिनलीय. स्वावलंबन हरवलेय. त्यामुळेच नवी ऊर्जा निर्माण होताना दिसत नाही. पराधीनतेच्या मानसिकतेतून आपण पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय. हा पराभव आपल्या संस्कारांचा आहे. आदर्शांचा आहे. मूल्यात्मकतेचा आहे. ज्यावर राष्ट्र उभे राहते तो कणखर माणूस नैराश्याने ग्रासत चाललाय. त्यातून बाहेर पडायचे तर ही पराधीनता दूर सारायला हवी. स्वार्थ साधताना स्व-अर्थ ध्यानात घ्यायला हवा. तो ज्याला कळेल तोच भविष्यात यशस्वी होईल! अन्यथा ये रे माझ्या मागल्या आहेच!

- घनश्याम पाटील, 7057292092

Saturday, April 22, 2017

साहित्यिक जीवनव्रती निर्माण व्हावेत!

‘योद्धा संन्याशी’ अशी ओळख असलेल्या युगपुरूष स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही..’’ महापुरूषांच्या विचारधारांवरून वाद आणि वितंडवाद घालताना आपण त्यांच्या अशा मतांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतो.
सध्याचा जमाना विज्ञानाचा आहे, तंत्रज्ञानाचा आहे. आपण सर्व क्षेत्रात लक्षवेधी प्रगती करतोय. पुण्यामुंबईसारख्या महानगरातील तर घरटी एक मुलगा विदेशात आहे. असे सारे असताना दुर्दैवाने आपल्या संस्कृतीशी असलेली त्याची नाळ मात्र कायमची तोडली जातेय. ‘एनआरआय’ मुलांचे वृद्ध आईबाबा ‘येणाराय येणाराय’ म्हणत दिवस कंठतात. बाहेर गेलेली मुले आणि आपल्या देशात असणारे तरूण यांच्यापैकी काही अपवाद वगळता बहुतेकजण पाश्‍चात्य विचारधारांचे पालन करताना दिसतात. अगदी योगापासून ते गुरूकुल शिक्षणपद्धतीपर्यंत इतर प्रगत राष्ट्रे आपले अनुकरण करत असताना आपण मात्र त्यांनी फेकून दिलेल्या इहवादी परंपरांचे अंधानुकरण करतोय. नात्यातील दुरावा, उदासीनता, नैराश्य, भौतिक सुखसुविधा असूनही निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना हे सर्व त्यातूनच येत आहे. आपल्या राष्ट्रापुढील ही मोठी समस्या आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात एका नव्या राजकीय, सामाजिक पर्वाची नांदी सुरू झाली. ‘या देशात माझ्या गुणवत्तेची कदर केली जात नाही, येथे माझ्या क्षमता सिद्ध करण्याची संधी नाही, हा देश माझ्यासाठी सुरक्षित नाही, इथे उद्योग-व्यवसायासाठी पुरक वातावरण नाही, चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत’ ही व अशी कारणे मागे पडत चालल्याने आपला देशही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. या परिवर्तनात जे सहभागी होत आहेत ते देशाच्या विकासात हातभार लावत आहेत. ‘यथा राजा तथा प्रजा’ असे म्हटले जाते ते उगीच नाही. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फ़डणवीस, मनोहर पर्रीकर अशी नेतेमंडळी एक ध्येय घेऊन देशाला पुढे नेत आहेत. हा बदल निश्‍चितच सुखावह आहे.
आपल्या देशातील तरूण दिशाहीन आहेत, असा आरोप सातत्याने केला जातो. त्यात काही तथ्य नाही; असे चित्र लख्खपणे दिसून येते. दिशाहीन तरूणांपेक्षा आपल्याकडे सध्या ध्येयवादी तरूणांची संख्या मोठी आहे. या तरूणाईला स्वतःबरोबर देशाचा विकास घडवायचाय. त्यांची सामाजिक बांधिलकी कमालीची आहे. विविध ठिकाणी एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम निस्पृहपणे राबवणारे तरूण त्याची साक्ष पटवून देतात. मात्र ‘आमच्यावेळी असे नव्हते’ असे खोटे खोटे सांगत आजच्या तरूणाईला दुषणे देणार्‍या आणि बोल लावणार्‍यांनी एकदा त्यांच्या जीवनाच्या आरशात नीट न्याहाळून पहायला हवे. भारतात कदाचित आजवर जितक्या पिढ्या झाल्या त्यातील सर्वात कर्तबगार आणि व्यापक, सर्वसमावेशक दृष्टिकोन असणारी आजची पिढी आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये! या तरूणाईच्या ऊर्जास्त्रोतांचा, त्यांच्या उन्मेषाचा उपयोग राष्ट्रासाठी करून घेता येत नसेल तर हा दोष त्यांचा नाही तर इथल्या व्यवस्थेचा आहे. तरूण त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने उत्तमरित्या करीत आहेत. स्वतःला सिद्ध करताना दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करत आहेत. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बौद्धिक क्षत्रियांची निर्मिती करायची असेल तर ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या वाढायला हवी. हे ज्ञान म्हणजे फक्त विज्ञान-तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाही. त्याला संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प अशा ललित कलांत आणखी मोठे व्यासपीठ द्यायला हवे. अनेक नामवंत डॉक्टर, अभियंते, वित्तीय अधिकारी यांच्यापेक्षा अनेक कलाकार प्रचंड पैसा कमावतात आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही आहे, हे सत्य आता ठळकपणे अधोरेखित केले पाहिजे. गलेलठ्ठ शूल्क भरून केवळ विज्ञान आणि वाणिज्य शाखांत प्रवेश घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होतात. संबंधित संस्थांना हवा तितका निधी देणगी म्हणून देण्यापासून ते राजकीय हस्तक्षेपापर्यंत अनेक उद्योग केले जातात. अशा परिस्थितीत अनेक महाविद्यालयांतील कला शाखांचे वर्ग मात्र ओस पडत आहेत.
या देशातील प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी, राज्यकर्ते, विरोधी पक्ष नेते, वकील, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, इतर खाजगी उद्योगातील कर्मचारी असे कित्येकजण कला शाखांतून जातात. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांत मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण करून आपले इप्सित साध्य करतात. आपल्याकडे प्राध्यापकांना पगारही लाखोंच्या घरात आहे. तितकी कमाई तर अनेक डॉक्टरांचीही होत नाही. शिवाय प्राध्यापकांना, कलाकारांना समाजात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे कला शाखांकडे  अक्षम्य दुर्लक्ष करण्याचा अविचार मुलांनी आणि पालकांनी मुळीच करू नये. विद्यार्थ्याच्या कलागुणांनुसार जर कुणाला डॉक्टर, अभियंता व्हावे वाटले तर त्यात गैर काही नाही; मात्र काही खुळचट कल्पना मनाशी बाळगून त्यांच्यावर पालकांनी सक्ती करू नये; किंवा माझा अमुक नातेवाईक, तमुक मित्र तिकडे गेलाय म्हणून त्याचे अनुकरणही विद्यार्थ्यांनी करू नये!
सध्या अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वात दुर्लक्षित राहिलेले क्षेत्र म्हणजे साहित्य! मराठी आणि अन्य भाषांत लेखन करणार्‍या तरूणांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. आपली पिढी जागतिकिकरण अनुभवतेय, मोठमोठे सत्तांतर पाहतेय, देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा अनुभव घेतेय. आपले अनुभवविश्‍व इतके समृद्ध असतानाही ते अपवादानेच कागदावर उतरते. जे लिहिते हात आहेत त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. आजच्या तरूणाईचे लेखन अव्वल आहे आणि त्याला गुणात्मकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. कुणाच्याही प्रभावाखाली दडपून न जाता ते त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार घडवत आहेत. प्रस्थापित यंत्रणेला चपराक देत त्यांची निश्‍चित ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. हे चांगले चित्र आणखी चांगले व्हावे यासाठी मात्र काही प्रयत्न जाणिवपूर्वक करावे लागतील.
मराठीतील प्रकाशक या नात्याने मी कायम सांगत असतो की, नव्याने लिहिणार्‍यांची, बोलणार्‍यांची एक मोठी फळी आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. विविध समाजमाध्यमांद्वारे सातत्याने व्यक्त होणार्‍या तरूणाईला थोडी दिशा दिली तर प्रतिभेचे अनेक कवडसे गवसू शकतात. आपल्याकडे ‘पूर्णवेळ लेखन’ ही कल्पना आजही अनेकांना ‘भिकेचे डोहाळे’ वाटते; कारण त्यादृष्टिने काही प्रयत्नच होताना दिसत नाहीत. ‘साहित्य’ आपल्याला आत्मभान देते, स्वओळख देते, अर्थकारण साधते हे सांगितले तर तो विनोद ठरावा अशी परिस्थिती काहींनी निर्माण केलीय. मात्र हे सत्य आहे. फक्त त्यासाठी लेखकांनी सजग असायला हवे. त्यांचा दृष्टिकोन व्यापक आणि निकोप असावा. अभ्यासाची आणि कठोर परिश्रमाची तयारी असावी. वाचन असावे. गुणात्मकतेचा ध्यास हवा आणि महत्त्वाचे म्हणजे त्याने सातत्याने लिहिते असायला हवे. एक ठराविक वर्ग सातत्याने लिहिणार्‍यांना ‘बहुप्रसवा’ म्हणून कुचेष्टेने हिणवतो. आपाल्याकडे गाणार्‍याने रोज रियाज केला पाहिजे. खेळाडूने, संगीतकाराने, चित्रकाराने, नृत्यकाराने रोज सराव केला पाहिजे. पैलवानाने रोज व्यायाम केला पाहिजे, वक्त्याने सातत्याने बोलले पाहिजे! मग लेखकाने रोज काहीतरी लिहिले पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय? लेखकाने सातत्याने दर्जेदार वाचले पाहिजे, उत्तमोत्तम लिहिले पाहिजे, जिथे जिथे सद्गुणांचा स्फोट आहे तिथे जाऊन चांगले ऐकले पाहिजे. असे झाले तरच सर्जनशीलतेला वाव मिळेल. रामदास स्वामींनी ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ असे सांगितलेय; त्यात ‘दिसामाजी काहीतरी ‘चांगले’ लिहावे’ असे त्यांना अभिप्रेत होते. ‘काहीतरीच’ लिहिणार्‍यांनी याचे भान ठेवले तर आपल्याकडील साहित्य व्यवहाराला मोठी गती मिळू शकेल. एखादी गृहिणी रोज स्वयंपाक करते म्हणून तो उत्तम होतो. ती कधीतरीच चपात्या लाटायला गेली तर जगाचा नकाशा तयार झालाच म्हणून समजा! लेखनाचेही तसेच आहे. तुम्ही रोज काहीतरी लिहिले, काहीतरी वाचले तरच तुम्हाला त्यात प्रगती करता येईल.
सध्या लेखनासाठी खूप चांगला काळ आहे. विविध मालिकांसाठी संहिता, चित्रपटासाठी पटकथा, लघुचित्रफितीसाठी लेखन, विविध जाहिरातींसाठी अर्थपूर्ण मजकूर तयार करून देणे, आकाशवाणी-दूरचित्रवाणीसाठी संहिता लेखन करणार्‍यांना चांगले पैसे मिळतात.  चित्रपटात आणि मालिकांत गाणे लिहिणार्‍यांनाही बरे मानधन मिळते. नवीन लेखकांच्या पुस्तकांना चांगली मागणी येतेय. आधीच्या पिढीतील बायकोचा किंवा प्रेयसीचा हात हातात घेतल्यास फार मोठा तीर मारल्याचे दिवस कधीच संपलेत. नव्या युगाच्या गरजा लक्षात घेऊन, नव्या पिढीचा हुंकार समजून घेऊन लेखन केल्यास त्याला हमखास यश येते. चेतन भगतसारखा लेखक ‘हाफ गर्लफ्रेंड’ सारखी कादंबरी लिहितो आणि त्याची पहिलीच आवृत्ती सत्तर लाख प्रतींची छापतो व ती खपवतो हे केवढे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. आमचा सागर कळसाईत आज असंख्य तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनलाय.
मराठीत एक झालेय! लेखन हा ‘अर्धवेळ’ उद्योग झालाय. आपापल्या नोकर्‍या, व्यवसाय सांभाळून लिहिणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी, इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या हुद्यावर असणारी मंडळी प्रतिष्ठेसाठी वाटेल तेवढी गुंतवणूक करून सुमार दर्जाची पुस्तके प्रकाशित करतात. त्यामुळे नवसाहित्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदललाय. इतकेच काय अनेक चुकीच्या संकल्पना, अविचारी आणि समाजद्रोही ‘नायक’ आपल्या माथी मारले जातात. पद आणि प्रतिष्ठेचा वापर करत अशा कलाकृती गाजवल्या जातात, खपवल्या जातात. याबाबत नरेंद्र जाधव यांचे नाव उदाहरण म्हणून घेता येईल. त्यांच्या ‘आमचा बाप आन् आम्ही’च्या अनेक आवृत्या गेल्यात. जाधव आरबीआयचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. त्याचा वापर करत त्यांनी असंख्य पुस्तके खपवलीत हे सत्य नाकारण्याचे धाडस कोणात आहे? त्या पुस्तकाचा गाभा म्हणून त्यांच्या वडिलांचे उदाहरण सातत्याने सांगितले जाते. त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितले, ‘जे काही करशील त्यात टापला जा; भलेही गुंड झालास तरी बी चालल पर टापचा गुंड हो!’ काहीही करून यश मिळवायचेच अशी शिकवण त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली. ‘एकवेळ टापला गेला नाहीस तरी चालेल पण आधी एक चांगला माणूस हो’ अशी शिकवण मात्र त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली नाही! तरीही या पुस्तकाच्या इतक्या आवृत्त्या जात असतील  तर आनंदच आहे.
नवीन लेखक आणखी लिहिते व्हावेत, त्यांना प्रस्थापित यंत्रणेकडून डावलले जाऊ नये, विविध विषयांवर त्यांनी सातत्याने गुणवत्तापूर्ण लिहावे, जुन्या-नव्या लेखकांचा आणि त्यांच्या साहित्यकृतींचा त्यांचा अभ्यास व्हावा, त्यांना व्यासपीठ मिळावे आणि मुख्य म्हणजे त्यांना लेखनाच्या समाधानाबरोबरच आर्थिक लाभही व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लेखनाची न आवरण्याइतकी हौस असेल, साहित्यविषयक जीवननिष्ठा प्रबळ असतील, अखंडपणे अभ्यासाची आणि सतत नव्याचा ध्यास घ्यायची तयारी असेल तर त्यांनी माझ्याशी 7057292092 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. मराठी साहित्याला फार मोठा वारसा आहे आणि तो अधिक सशक्त करणे, जागतिक साहित्यविश्‍वात माय मराठीचा विजयध्वज फ़डकवत ठेवणे यासाठी आता साहित्यिक जीवनव्रतींची गरज आहे. ते पुढे आले तर आणि तरच स्वामीजींना अपेक्षित असलेले ‘बौद्धिक क्षत्रिय’ निर्माण होऊ शकतील.
- घनश्याम पाटील
7057292092

Saturday, April 15, 2017

इंदौरचा मराठी साहित्य महोत्सव

महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटींहून अधिक आहे. त्यांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगाराच्या समस्या मोठ्या आहेत. एका विशिष्ट वर्गाची आर्थिक सुबत्ता चांगली असताना दुसरीकडे मात्र एकवेळच्या जेवणासाठीही मोताद असणारे आपल्याकडे कमी नाहीत. अशावेळी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा हे व असे विषय फारच दूर राहतात. इथे प्राध्यापकांचे एक मोठे टोळके साहित्यात उचापत्या करत असते. त्यांना वाटते की, प्राध्यापक म्हणजेच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. या अंधश्रद्धेतून ते बाहेरच पडायला तयार नाहीत. विशिष्ट विषयात विद्यावाचस्पती होण्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासातून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सुटतो. एकदा का नावामागे साहित्यातील ‘डॉक्टर’ लागले की यांचे घोडे गंगेत न्हाते. मग त्यांना अवांतर वाचनाची गरज राहत नाही. गरजेपुरत्या माहितीतून मिळालेली छटाकभर अक्कल पुढे त्यांना साहित्यिक आणि समीक्षक म्हणून मिरवण्यास पुरेशी ठरते. अर्थात, याला काही अपवाद निश्‍चितच आहेत; पण अपवाद म्हणजे नियम नव्हे!
महाराष्ट्रात ज्ञानाच्या क्षेत्रात अशी दूरवस्था असताना महाराष्ट्राबाहेर मराठीचे काय होत असावे, झाले असावे असा प्रश्‍न आपल्याला नक्की पडत असेल. तो पडायला हवा! कारण थोडे थोडके नव्हे तर तब्बल चार-साडेचार कोटी मराठी लोक महाराष्ट्राबाहेर राहतात. तिथे राहून ते त्यांचे मराठीपण जपतात. चार-चार, पाच-पाच पिढ्या अमराठी भागात वास्तव्यास असूनही त्यांची आपल्या साहित्य आणि संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे. आपणही आपले मराठीपण जपण्यासाठी जितके प्रयत्न करत नाही, तितके प्रयत्न ही मंडळी करतात! मात्र त्यांच्याकडे ना आपले लक्ष आहे, ना आपल्या राज्यकर्त्यांचे! इथे आपलीच खायची मारामार तिथे तिकडे कधी लक्ष देणार? अशी संकुचित मनोवृत्ती तयार झालीय!
आपल्याकडे म्हणजे मराठीत अनुवादित पुस्तके मोठ्या संख्येत येतात. त्यातही इंग्रजीतून मराठीत येणारी पुस्तके लक्षवेधी आहेत. मग आपल्या भारतीय भाषा भगिनीची काय अवस्था आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. बंगाली, कानडी, तमीळ, गुजराती, उर्दू, हिंदी, पंजाबी अशा भारतीय भाषात उत्तमोत्तम पुस्तके असताना फक्त इंग्रजीतूनच येणार्‍या अनुवादाला प्रतिष्ठा प्राप्त होते. त्याचे हे कारण आहे की, इतर भारतीय भाषांचा आपला अभ्यास कमी पडतो. इंग्रजी ही परकीय भाषा असली तरी बालपणापासून या भाषेचा आपला अभ्यास झालेला असतो.
मराठी पुस्तके खपत नाहीत, अशी खोटी आवई सातत्याने दिली जात असताना अनुवादित पुस्तके मात्र मोठ्या प्रमाणात खपतात. अनुवादित पुस्तके छापणारे प्रकाशकही गब्बर असतात. याचा एक अर्थ असा आहे की, मराठीत गुणवत्तापूर्ण आणि अस्सल साहित्य येणे कमी झाले असावे! नाविण्यपूर्ण विषयांची कमतरता, अनुभवविश्‍व समृद्ध नसणे, जागतिकीकरणाचा आणि नव्या बदलांचा अंदाज न येणे, एखाद्या विषयासाठी झोकून देऊन अभ्यास करण्याची तयारी नसणे ही त्यापैकी काही कारणे असू शकतात!
हे सारे दुर्दैवी चित्र असताना आम्ही मात्र इतर भारतीय भाषात काम करण्याचा निर्णय घेतला. ‘आम्हाला कोणता कीडा चावला?’ असा प्रश्‍न काहींना पडला; मात्र मराठीतील साहित्य इतर भारतीय भाषात जावे आणि इतर भारतीय भाषेतले साहित्य मोठ्या प्रमाणात मराठीत यावे असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात ‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने आम्ही ही घोषणा केली आणि अनेकजण आश्‍चर्यचकित झाले. त्या स्वप्नपूर्तीची सुरूवात आम्ही नुकतीच केली आहे.
मध्यप्रदेशची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून इंदौर शहर सर्वांना सुपरिचित आहे. जवळपास पाच हजार औद्योगिक कंपन्या या शहरात असल्याने इंदौरचा आर्थिक विकास झालाय. नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या स्मार्ट सिटीत इंदौरचा समावेश आहे. येथील साहित्य आणि संस्कृतीचा वारसा पुण्यासारखाच संपन्न आहे. त्यामुळे या शहरापासून आम्ही हिंदी भाषा साहित्य निर्मितीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. आमच्या परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अभिजात’ हा काव्यसंग्रह आणि उज्जैन येथील लेखक सुधीर आनन्द यांची ‘लव-कुश’ ही किशोर कादंबरी या दोन पुस्तकांपासून आम्ही हिंदी साहित्य निर्मितीचा यज्ञ आरंभिला. या निमित्ताने इंदौरमधील कवींचा गझल मुशायरा, तिकडच्या मराठी लोकांचे आणि महाराष्ट्रातून गेलेल्या कवींचे मराठी कवी संमेलन असे कार्यक्रम ठेवून दि. 8 व 9 एप्रिल 2017 रोजी आम्ही इंदौरमधील श्री मध्य भारत साहित्य अकादमीच्या शिवाजी सभागृहात ‘चपराक’चा पाचवा साहित्य महोत्सव घेतला. ‘लिवा क्लब’चे आमचे स्नेही विश्‍वनाथ शिरढोणकर, मध्यप्रदेश साहित्य अकादमीचे निदेशक अश्‍विन खरे, मराठी भाषेच्या वैभवात भर घालणारे इंदौर स्थित प्रा. डॉ. श्रीकांत तारे, हिंदी साहित्यिक हरेराम वाजपेयी, सूर्यकांत चतुर्वेदी, लेखक सुधीर आनन्द आणि त्यांच्या पत्नी सौ. संध्या या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील मराठी बांधवांना जोडणारा सेतू आम्ही तयार केला आहे. अश्‍विन खरे यांच्यासारखे साहित्यिक नेतृत्व मध्यप्रदेशला लाभले असल्याने गेल्या अठरा वर्षापासून ते हे कार्य अव्याहतपणे करतच आहेत; पण आम्ही त्यांच्या या कार्यात खारीचा वाटा उचलून या भाषा भगिनींना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला आहे.
इंदौरमध्ये ‘लिवा क्लब’ अनेक मराठी उपक्रम सातत्याने राबवते. आपल्याकडील अनेक मान्यवरांना त्यांनी वेळोवेळी निमंत्रित केले आहे. ‘लिवा’ ही आद्याक्षरे आहेत. म्हणजे ‘लिहावे-वाचावे क्लब!’ किती अर्थपूर्ण आणि थेट उद्देश स्पष्ट करणारे नाव! शिरढोणकर, खरे, शोभा तेेलंग अशा मंडळींनी ही चळवळ सुरू ठेवलीय. ज्या श्री मध्य भारत हिंदी साहित्य समितिच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला तिथे 1918 साली महात्मा गांधी आले होते. त्यावेळी त्यांनी ‘हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी’ अशी आग्रही मागणी केली होती. मात्र आजतागायत हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. भारताला अजूनही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही केवळ ‘संपर्क भाषा’ आहे.
हाच मुद्दा उपस्थित करत आम्ही सांगितले की, हिंदीला राष्ट्रभाषेचा आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. या चळवळीत आपणही सहभागी व्हावे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच लाख पत्रे पाठविण्याचा उपक्रम सुरू आहे. त्यातील जवळपास एक लाख पत्रे एव्हाना पाठवली गेलीत. महाराष्ट्र सरकारही अमराठी भागातील उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे. त्याचा थेट लाभ लवकरच इंदौरमधील चळवळीलाही होईल. आपण आपले मराठीपण जपत आहात ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच ‘चपराक’च्या माध्यमातून तुमचे साहित्य जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
पुण्यातून आमच्यासोबत सुप्रसिद्ध लेखक भारत सासणे हेही आले होते. मुंबईतून नामवंत गझलकार ए. के. शेख सहभागी होते. शिवाय ‘चपराक’ परिवारातील शुभांगी गिरमे, चंद्रलेखा बेलसरे, माधव गिर, सरिता आणि अरूण कमळापूरकर, सागर कळसाईत, समीर नेर्लेकर, तुषार उथळे पाटील, प्रमोद येवले, मोरेश्‍वर ब्रह्मे, सचिन सुंबे, विनोद पंचभाई ही भक्कम टीम सहभागी झाली होती. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक दुवा साधण्यासाठी ‘चपराक’ने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विश्‍वनाथ शिरढोणकर यांनी लिहिलेले ‘मध्यप्रदेशातील मराठी माणसे’ हे पुस्तक लवकरच ‘चपराक’कडून वाचकांच्या भेटीस येत आहे. गेल्या काही पिढ्यातील मराठी बांधवांनी तिकडे जे अतुलनीय योगदान दिले त्याची माहिती या निमित्ताने सर्वांना होईल.
मराठी वाचकांना जोडून घेण्यासाठी आमचे विविध राज्यात सातत्याने दौरे चाललेले असतात. अमराठी भागात कृतीशील असणार्‍या मराठी बांधवांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. मागच्या वर्षी हैदराबाद येथील मराठी साहित्य परिषदेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जाण्याचा योग आला. डॉ. विद्या देवधर यांच्या नेतृत्वाखाली हैदराबादमध्ये ख्ूप मोठे काम सुरू आहे. त्याची आठवण इंदौरमध्ये आमच्या सहकार्‍यांनी काढली. हैदराबादप्रमाणेच इंदौरमध्येही उन्हाचा कडाका असेल असे वाटले होते; मात्र इथे तर महाबळेश्‍वरपेक्षाही थंड वातावरण होते. इंदौरचे सांस्कृतिक वातावरणही पुण्यासारखेच वाटले. शनिवार, रविवारी इथे किमान पंधरा-वीस सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शनिवार दि. 8 रोजी ज्या संस्थेत आमचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी त्याच वास्तुतील तिन्ही मजल्यावर तीन स्वतंत्र कार्यक्रम सुरू होते आणि एकाही कार्यक्रमात एकही खुर्ची रिकामी नव्हती. असे रसिक आणि श्रोते सध्या पुण्यासारख्या महानगरातही दुर्मीळ झाले आहेत. म्हणूनच इंदौर आम्हाला आपलेसे वाटत होते. माझ्या सहकारी मित्रांना मी सहजपणे बोलून गेलो की, हैदराबादमध्ये निजामांची राजवट होती. इंदौरमध्ये होळकरांनी राज्य केले. मराठी माणसांनी अमराठी भागात येऊन एक देदीप्यमान इतिहास निर्माण केला. होळकरांच्या राजवाड्यासह येथील वास्तू, संस्कृती त्याची साक्ष पटवून देतात. म्हणूनच इंदौरविषयी आंतरिक आत्मियता वाटत असावी.
साहित्यिक चमू सोबत असल्याने रेल्वेत केलेली धमाल, इंदौरमधील हिंदी साहित्यिक, 90 वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेली ‘वीणा’ ही सांस्कृतिक पत्रिका, श्री मध्य भारत हिंदी साहित्य समिती, लिवा क्लब, मराठी साहित्य अकादमी, होळकरांचा ऐतिहासिक राजवाडा, जगप्रसिद्ध खाऊगल्ली, तिथली मिठाई, इंदौरकरांचे आदरातिथ्य, नेटाने साहित्यसेवा करणारी मराठी मंडळी अशा सर्वांचा जवळून परिचय झाल्याने आमचा इंदौर दौरा अविस्मरणीय झाला. महाराष्ट्राबाहेर राहणारे आणि आपले मराठीपण जपणारे सर्वजन आपले बांधवच आहेत, याची जाणीव आपल्याला कायम असावी एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. 

- घनश्याम पाटील
7057292092

दहशतवाद निर्मिती कारखान्याचे काय?

कुलभूषण जाधव यांना भारतीय हेर असल्याचा व विध्वंसक हालचालींमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानने ताब्यात घेतले. अतिशय गुप्तपणे एकतर्फी खटला चालवला. त्याची भारतीय दुतावासालाही कुणकुण लागू दिली नाही आणि त्यांनी थेट फाशीची शिक्षा सुनावली. कुलभूषण जाधव या मराठी माणसास सोडविण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी यानिमित्ताने पाकचे पाप जगासमोर आले आहे. कुलभूषण यांना इराणमधून त्यांनी पाकिस्तानात कसे नेले, खटला कसा चालवला, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी का देण्यात आली नाही, भारत सरकारला त्याची माहिती का दिली गेली नाही, कुलभूषण हे हेर असल्याचे कसे ठरवले गेले हे व असे सर्वच प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताझ अझिज यांनीही कुलभूषण जाधव यांच्याविरूद्ध काही ठोस पुरावे नसल्याचे उघडपणे सांगितले आहे.
मुळात कुलभूषण हे इराणमध्ये सातत्याने मराठी बोलत असल्याने त्यांच्यावर संशय बळावल्याचे सांगितले जाते. कोणताही गुप्तहेर इतकी मोठी चूक कधीही करणार नाही. जर त्यांना गुप्तहेर म्हणून पाठवले असते तर ते इतक्या साधेपणे वावरले नसतेच. त्यांच्याकडे भारतीय पारपत्रही नसते आणि त्यांना इतर काही भाषा अवगत असत्या. किंबहुना संशय येऊ नये यासाठी कानाची छिद्रे बुजवण्यापासून त्यांची सुन्ताही केली गेली असती. त्यातही कौटुंबिक जबाबदारी असणार्‍या माणसाला हेर म्हणून पाठवण्याचे धाडस कोणतेही सरकार करणार नाही. कुलभूषण जाधव हे इराणमध्ये त्यांच्या कंपनीच्या कामानिमित्त गेले होते आणि सातत्याने भारताशी, त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांशी संपर्क ठेऊन होते. त्यांचा हेर नसल्याचा यापेक्षा मोठा पुरावा कोणता असू शकेल? केवळ द्वेषाच्या भावनेतून सूड उगवण्यासाठी पाकिस्तानने केलेली ही खेळी आहे.
कसाबसारख्या दहशतवाद्याला सुळावर चढवताना आपण लोकशाही मार्गाने त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली होती. त्याच्यासाठी वकिलही दिला होता. कसाबसारखे क्रूरकर्मे दहशतवादी सातत्याने आपल्याकडे चालून येतात आणि आपण माणुसकी दाखवत त्यांचा संपूर्ण विचार करतो. त्याउलट आपले काही निराधार बांधव चुकून त्यांच्या तावडीत सापडतात आणि त्यांना हाल हाल करून मारले जाते. आपल्याकडील प्रसारमाध्यमे, तथाकथित विचारवंत, अभिनेते अशा अनेकांना पाकिस्तानप्रेमाचा पुळका येतो. त्यातूनच अफजल गुरूसारख्या दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी गळे काढले जातात. इशरत जहॉं कशी देशभक्त होती याचे पाढे वाचले जातात. रात्री दोन-दोन वाजता न्यायालयात येऊन कामकाज सुरू ठेवले जाते. कुलभूषण यांच्यासारख्या भारतीयाला फाशीची शिक्षा जाहीर झाली असताना यांचे देशप्रेम कुठे जाते?
आपल्याकडील नसरूद्दिन शहा, जतीन देसाई, बरखा दत्त, सुधींद्र कुलकर्णी, मणिशंकर अय्यर अशी मंडळी पाकिस्तानची हस्तक आहेत की काय असे वाटण्याइतपत पाकिस्तानधार्जिणे आहेत. जनमत तयार करण्यात अशा तथाकथित विचारवंतांचा प्रभाव नक्कीच असतो. कुलभूषण जाधव हे हेर होते की नाही, याचा कोणताही पुरावा पाकिस्तानकडे नाही; मात्र ते एक भारतीय आहेत आणि निवृत्त अधिकारी आहेत हे सत्य महत्त्वाचे आहे. त्यामुळेच त्यांना सोडविण्यासाठी संपूर्ण भारतीयांनी आवाज उठवला पाहिजे. 1990 साली पाकिस्तानात बंदी झालेल्या सरबजित सिंगला वाचवण्यात आपल्याला अपयश आले. आता कुलभूषण जाधव यांच्याबाबत मात्र आपण संघटित व्हायला हवे. केंद्र सरकारने पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढवला पाहिजे.
अनेक राष्ट्रे संरक्षण, परराष्ट्र धोरण यात आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत. रवींद्र कौशिक या पाकिस्तानातील बंदी असलेल्या आणि पुढे खंगून, टीबीने मेलेल्या आपल्या एका हेराने पत्राद्वारे विचारले होते की, ‘भारत जैसे बडे मुल्क के लिए काम करने का यही अंजाम होता है क्या?’ खरंतर ज्यावेळी ते गुप्तहेर म्हणून काम सुरू करतात त्यावेळी त्यांचे वैयक्तिक आयुष्य संपलेले असते. सापडल्यास ‘राष्ट्रद्रोही’ असाच शिक्का त्यांना मिरवावा लागतो. शत्रू राष्ट्राकडून दिला जाणारा प्रचंड त्रास, वेदना सहन करताना आपले देशबांधव आणि सरकारही त्यांना ‘आपले’ म्हणून स्वीकारत नाही. पाकिस्तानसारखे पापराष्ट्र तर आपल्या कोणत्याही कारणाने कैद केलेल्या नागरिकास हाल हाल करून मारते. इतक्या गंभीर आरोपांवरून ताब्यात घेतलेल्याबाबत त्यामुळेच तुरूंगातील कैद्यांच्या अंतर्गत मारामारीत मरण पावला किंवा त्याला वेड लागल्याने आम्ही तुमच्या ताब्यात देऊ शकत नाही, अशी उत्तरे ऐकावी लागतात.
आपल्याला पाकिस्तानपासून जेवढा धोका आहे त्याहून जास्त धोका आपल्याकडील बेगडी लोकांचा आहे. त्यात ‘पुरोगामी विचारवंत’ म्हणून मिरवणारे जसे आघाडीवर आहेत तसेच ‘देशभक्ती’चे बिरूद लावून मिरवणारेही! ‘माझ्या बापाला पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले’ असा टाहो फोडणारी गुरमेहर कौर आणि तिची पाठराखण करणारे आता कोणत्या बिळात दडून बसलेत? करण जोहर, शाहरूख खान यांच्यासोबत काम करणार्‍या पाकिस्तानी कलाकारांचा पुळका येणारे आता कुठं गेले? कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात अशांना पाकिस्तानात पाठवायला काय हरकत आहे?
आपल्याकडे जातीधर्मासाठी आपण एकत्र येतो; मात्र राष्ट्रभक्तीसाठी कधी एकत्र येताना दिसत नाही. खैरलांजीच्या घटनेनंतर रस्त्यावर उतरणार्‍यांची संख्या पाहता कुलभूषण जाधव यांच्या पाठिशी कोणीच दिसत नाही. मराठा मोर्चासाठी रस्त्यावर उतरून मूक निदर्शने करणारे कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी काहीच करत नाहीत. कुलभूषण जाधव यांचे वडील भारतीय पोलीस दलात होते. त्यांचा मुलगा देशाच्या नौदलात कार्यरत होता. 2002 मध्येच भारतीय नौदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने स्वतःचा उद्योग सुरू केला आणि पाकिस्तानने इराणमधून त्यांचे अपहरण करून खोटा खटला चालवला, असे स्पष्टपणे दिसून येत आहे. कुलभूषण यांच्या मुंबईतील निवासस्थानी लॉन्ड्रीचे काम करणार्‍या एका मुलाने सांगितले की, मला उच्च शिक्षित करण्याचे काम कुलभूषण यांनी केले. त्यांच्या घरी रात्री माझ्यासाठी जेवणाचे ताट वाढून ठेवलेले असायचे. घरच्या सदस्यांप्रमाणे त्यांनी माझी सर्वप्रकारची  काळजी घेतली. त्यांचे प्रोत्साहन आणि त्यांचे सहकार्य यामुळेच मी शिक्षण घेऊ शकलो आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकलो...
अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. पाकिस्तान मात्र आपल्या निरपराध माणसांना कोंडीत पकडून त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार करत आहे. ‘आपला एक माणूस शत्रूने मारला तर त्याची किमान पन्नास माणसे मारा’ असे सांगणारे चाणक्य यावेळी आठवतात. कारण असे कठोर झाल्याशिवाय हे निर्ढावलेले मस्तवाल लोक जागेवर येणार नाहीत. पाकिस्तानातून भारतात येणार्‍या कोणत्याही खेळाडूवर, कलाकारावर, उद्योजकावर, प्रवाशावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करणे आपल्याला सहज शक्य आहे. आपल्याकडे मुलभूत असलेली माणुसकी, करूणा, आपली सर्वसमावेशक संस्कृती यामुळे आपल्या उदारमतवादी धोरणाचा फायदा पाकसारखे नापाक घेतात.
पाक म्हणजे पवित्र! पाकिस्तान म्हणजे पवित्र जागा! मात्र या संकल्पनेच्या पूर्णपणे विरूद्ध काम या राष्ट्राने सातत्याने केले आहे. ‘राजकीय धोरण सोडले तर भारत आणि पाकिस्तान येथील सामान्य माणसे फारशी वेगळी नाहीत’, अशी मखलाशी आपल्याकडीलच काही कंटकांकडून सातत्याने केली जाते. त्यातील फोलपणा वेळोवेळी दिसून येतो. तरीही आपण धाडसाने निर्णय घेत नाही.
कसाबला फाशी दिल्यानंतर आम्ही प्रश्‍न उपस्थित केला होता की, ‘कसाब निर्मिती कारखान्याचे काय?’ असे एक नाही तर अनेक कसाब येतील, त्यांना आपण पुराव्यासह फासावर लटकवू; मात्र त्याचा निर्मिती कारखाना सुसाट आहे. तो उद्ध्वस्त केल्याशिवाय शांती प्रस्थापित होणार नाही. पाकप्रेमाचा सातत्याने उबाळा येणारी आपल्याकडील थोतांड मंडळी आणि कुलभूषण जाधव यांना फासावर लटकवण्यासाठी कटकारस्थान रचणारी मंडळी वेगळी नाहीत. त्यांना जागेवर आणले पाहिजे. अफजल गुरू, कसाब यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे, त्यांना देशभक्त ठरवणारे, त्यांच्या शिक्षेत सूट मिळावी यासाठी धडपडणारे, देशभक्तीच्या नावावर खोटे गळे काढणारे, इशरत जहॉंच्या नावाने रूग्णवाहिका चालू करून तिला देशभक्त ठरवणारे आणि सर्जिकल स्ट्राईकनंतर आनंदोत्सव साजरा करणारे हे सगळेच आज एक हजार किलो मूग गिळून गप्प आहेत. अशावेळी सामान्य माणूस संघटित झाला तरच काहीतरी वेगळे घडू शकेल. अन्यथा पाकिस्तान नावाची ही खरूज आपले अंग पोखरल्याशिवाय राहणार नाही. कुलभूषण जाधव हे निरपराध आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते एक भारतीय आहेत, मराठी आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायलाच हवे!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Wednesday, April 12, 2017

शाकाहाराची चळवळ राबवा!

- घनश्याम पाटील

 राजस्थानातील अलवार मार्गावर काही गोरक्षकांनी गाय वाहून नेणार्‍या मुस्लिम बांधवांना जबर मारहाण केली आणि त्यात हरियाणातील पेहलू खान यांचा जीव गेल्याचे वास्तव पुढे येत आहे. खान कुटुंबिय हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुख्य म्हणजे ते गायींची तस्करी करत नव्हते तर त्यांचा दूध डेअरीचा व्यवसाय होता आणि पेहलू खान म्हैस खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. तिथे एका शेतकर्‍याने या गाईचे बारा लिटर दूध काढून दाखवल्याने त्यांनी त्यांचा इरादा बदलला आणि म्हशीऐवजी ही गाय खरेदी केली! मात्र ती त्यांच्या गावाकडे आणत असताना काही तथाकथित गोरक्षकांनी त्यांना आडवले. या उन्मादी लोकांना त्यांनी गाय खरेदीची पावतीही दाखवली; मात्र त्या सर्वांनी पेहलू खान आणि त्यांच्या सहकार्‍यांना जबरदस्त मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ‘दूध व्यवसायासाठी गाय खरेदी करणे ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती’ अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने या दुर्दैवी घटनेनंतर दिली आहे. कायदा हातात घेणार्‍या आपल्याकडील अशा काही लोकांमुळे सातत्याने अराजक माजवले जात आहे. धर्माच्या नावावर केल्या जाणार्‍या या विवेकहीन कृत्यामुळे आपले धार्मिक ऐक्य धोक्यात आले आहे.
गोवंश हत्या प्रतिबंद कायदा 1995 नुसार कत्तलीसाठी गोवंशातील गायी वाहून नेता येत नाहीत; मात्र शेतीच्या कामासाठी किंवा दुधदुभत्या व्यवसायासाठी ही जनावरे पूर्वपरवानगी घेऊन नेता येतात. पेहलू खान यांनी दूध व्यवसायासाठी म्हणून ही गाय खरेदी केली होती आणि त्याची रितसर पावतीही त्यांच्याकडे होती. मात्र टेम्पोतून गाय वाहून नेताना त्यांचे ‘मुस्लिम’ असणे त्यांच्या जीवावर बेतले. पेहलू हे ही गाय कत्तलीसाठी कत्तलखान्यात नेत होते असा दावा संबधितांनी केला असला तरी या हत्येचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. गायीसाठी माणूस मारणारे धर्मरक्षक नसून धर्मासाठी कलंक आहेत. ज्यांच्याकडे किमान माणुसकी, करूणा नाही आणि जे निरपराध माणसे मारण्याइतके निष्ठूर होऊ शकतात अशांना धर्म कधी कळणार?
उत्तर प्रदेशचे नवे कार्यक्षम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये गो तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांवर बंदी घातली. त्यांच्या आदेशानुसार तेथील अवैध कत्तलखान्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाईही होत आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा पद्घतीने नियम आणि कायदे राबवले जाऊ शकतात. गुजरातमध्येही गोवंश हत्या करणार्‍याला दहा वर्षांची शिक्षा व्हायची! त्या कायद्यात सुधारणा करून आता जन्मठेप देण्यात येते. मात्र गोरक्षकांनी परस्पर अशा कारवाया करणे आणि संबधितांना मृत्युपर्यंतची शिक्षा देणे हे कोणत्या अधिकारात बसते? त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे. अशा प्रवृत्ती सर्वत्र मोठ्या प्रमाणात बोकाळल्या असून त्यांना चाप लावणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
गोहत्येच्या नावाखाली देशात गुंडगिरी सुरू असून अखलाखनंतर ही सहावी हत्या असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. पेहलू खान यांच्या हत्येमुळे ओवेसी यांच्या विधानावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातूनच त्यांनी ‘‘उत्तर प्रदेशमध्ये गाय ही ‘मम्मी’ असून ईशान्य भारतात ती ‘यम्मी’ आहे’’ असे म्हटले आहे. हिंदू-मुस्लिमांत भाईचारा प्रस्थापित करण्याऐवजी अशा घटनांमुळे राज्यकर्ते त्यात तेल ओतत राहतात आणि द्वेषाचा हा वणवा आणखी विस्तारत जातो.
खरंतर आपल्याकडे गवालंब, गोमेध, शूलगव अशा यज्ञात गायीची आहूती दिली जायची. इतकेच नाही तर नंतर प्रसाद म्हणून गाईचा कोणता भाग कोणी खायचा याचीही वर्णने आढळतात. पूर्वी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ‘मधुपर्क’ हा प्रकार सर्रासपणे दिला जायचा. त्यात गायीच्या वासराचे कोवळे मांस असायचे. आपली पशूपालक संस्कृती असल्याने असे मांस खाणे हे गैर नव्हते. पुढे या गायीत तेहतीस कोटी देव असल्याची खुळी कल्पना रूढ झाली आणि गोमूत्रासह तिचे शेणही अनेकजण आनंदाने खाऊ लागले. त्यासाठी त्यातील रोगप्रतिकारक उपयोगीता मूल्याचे महत्त्व सांगितले जाऊ लागले. ज्यांना शेण खायचे त्यांनी ते अवश्य खावे पण माणसे मारण्याचे पातक कोणत्याही परिस्थितीत करू नये! स्वामी रामदेव बाबा यांच्यासारखा उद्योजक गोमूत्र आणि गायीचे शेण विकून कोट्यधीश होतो आणि गाय खाणारे मात्र कुठेतरी पंक्चर काढत बसतात हे वास्तव लक्षात घ्यायला हवे! गायीसारख्या उपयुक्त पशुचा सर्वच तथाकथित धर्मपंडितांनी आणि राजकारण्यांनी बाजार मांडलाय. स्वामी विवेकानंदही मांस भक्षण करायचे हे सत्य त्यामुळेच त्यांना पचणारे नाही. इतिहास, धर्मग्रंथ सोयीस्करपणे घ्यायचे आणि भेदनीतिचा वापर करत द्वेषाचे, सूडाचे राजकारण करायचे हा काहींचा धंदाच झालाय.
जनावरे वाचवा असे सांगणार्‍या काही रानटी टोळ्या त्यासाठी निर्दयीपणे माणसे मारत आहेत. शाकाहारी-मांसाहारी या संकल्पना धार्मिक आहेत, वैज्ञानिक नाहीत. त्यातून अशी अविचारी कृत्ये घडतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर त्याकाळात लिहिले होते, ‘गोपालन हवे, गोपूजन नव्हे!’ त्यात त्यांनी लिहिले होते, ‘गाय ही फक्त एक उपयुक्त पशू आहे, तिच्याकडे पशू म्हणूनच बघा. ती माणसाची माता होऊ शकत नाही. असलीच तर ती बैलाची माता आहे. उपयुक्त पशू म्हणून गाय रक्षणीय आहे. गोरक्षणाचे धार्मिक स्वरूप सोडून, त्यास आर्थिक स्वरूप दिले की झाले!’
आपण नेमके त्याच्या उलट करतोय! गायीला आई समजून जो अतिरेक केला जातोय तो समाजात फूट पाडणारा आहे. मध्यंतरी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गोरक्षकांना सुनावले होते. गोरक्षणाच्या नावावर अनेक व्यक्ती आणि संस्था राजकारण करत असल्याने त्यांचा सुळसुळाट आवरला पाहिजे असेही पंतप्रधान म्हणाले होते. त्यात त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले, ‘आपल्याकडे गायींच्या जितक्या कत्तली केल्या जातात त्याहून अधिक गायींचे मृत्यू प्लॅस्टिक कागद खाल्ल्याने होतात. त्यामुळे रस्त्यात किमान प्लॅस्टिक टाकू नका; कुणी टाकलेच तर ते आधी उचला. तुम्ही इतके काम जरी केले तरी अनेक गायींचे प्राण वाचू शकतील!’ मात्र त्यांच्या या सूचनेकडे कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही.
कृषी व्यवस्थेत गाय आणि गोवंश याला सर्वाधिक महत्त्व आहे. त्याशिवाय हा गाडा चालूच शकत नाही. शेतकरी जनावरांवर अपत्याप्रमाणे प्रेम करतात. त्यामुळे तेे त्यांना मारायचा विचारही करत नाहीत. मात्र अनेकदा अल्पभूधारक शेतकर्‍यांकडे जनावरे विकण्याशिवाय पर्यायही नसतो. त्यातून काही भाकड जनावरे हृदयावर दगड ठेवून कसायाच्या दावणीला बांधली जातात. या सगळ्या समस्यांचा शोध घेऊन उपाययोजना करण्याऐवजी स्वयंघोषित गोरक्षकांनी उच्छाद मांडलाय. कायदा हातात घेऊन संबधितांना शिक्षा देण्याचे काम तेच करतात. आता तर माणसे ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेलीय.
गोमांस भक्षणामुळे कर्करोगापासून अनेक गंभीर आजार होतात, त्यातून प्रचंड उष्णता वाढते आणि पोटाशी संबंधित सर्व व्याधी तत्काळ सुरू होतात असे जगभरातील अनेक नामवंत वैद्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. या माहितीचा प्रचार व्हायला हवा. कत्तलखान्यांना दुषणे देताना तेथून गोमांस विकत घेणार्‍यांचे प्रबोधन करणे जास्त महत्त्वाचे आहे. ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने त्यांची दुकानदारी सुरू असेल तर तो दोष कुणाचा? इतर काही राष्ट्रात गोमांस हे सररासपणे विक्रीस उपलब्ध असते. त्यांच्याकडे ते विकण्याची किंवा विकत घेऊन खाण्याची बंदी नाही. उलट गायी, बैलं यांचे संगोपण त्या हेतूनेच केले जाते. त्या त्या भौगोलिक परिसरानुसात तिथला आहार असतो. त्यामुळे ज्याला वाटते त्यांनी खावे, ज्यांना नको वाटते त्यांनी खाऊ नये इतका साधा नियम पाळला तर अनेक प्रश्‍न सहज सुटण्यास मदत होईल.
कोंबड्या, बकर्‍या, मासे हादडणारे गोमांस खाऊ नका म्हणून वाद घालतात. कोणतीही हत्या ही वाईटच हे एकदा ठरवले तर मग असे विभाजन कसे करता येईल? ही विसंगती आहे! एक तर  मांसाहार पूर्ण वर्ज्य करा, शाकाहाराची चळवळ राबवा आणि कोणत्याही हत्येचा निषेधच करा! गाय मारू नका म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे माणसे कशी मारू धजावतात? त्याचाही तीव्र निषेधच व्हायला हवा आणि प्रगल्भ लोकशाहीत तो होताना दितस नाही, ही खरी चिंतेची बाब आहे.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Saturday, April 1, 2017

गेली पत्रकारिता कुणीकडे?

भाऊ तोरसेकर हे मराठीतील एक ध्येयनिष्ठ पत्रकार आहेत.  आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मधून त्यांच्या पत्रकारितेचा आरंभ झाला. सातत्यपूर्ण आणि दर्जेदार लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या भाऊंनी कधीही आपली लेखणी गहाण ठेवली नाही. म्हणूनच त्यांच्यासारखे पत्रकार आजच्या जमान्यात दुर्मीळ आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर हे भाऊ सांगत होते, ‘यापुढचा काळ असा येईल की, रस्त्यावर पत्रकार दिसला रे दिसला की लोक त्याला बदडायला सुरू करतील. त्यासाठी काही कारणही लागणार नाही! तो पत्रकार आहे ना! मग ठोकायला इतकेच कारण पुरेसे आहे! बडवा! अशी लोकभावना तयार होतेय...’
बारकाईने पाहिल्यास भाऊंच्या या निरीक्षणातील तथ्य कोणीही नाकारू शकणार नाही. भ्रष्टाचाराने वैतागलेले लोक एकेकाळी खाकी आणि खादीला शिव्या घालायचे. राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याविषयी त्यांच्या मनात तीव्र नाराजी होती. ही जागा आता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी घेतलीय. हातात ‘बूम’ आला की आपण जगाचे राजे झालो, ब्रह्मदेवाचे बाप झालो अशा आविर्भावात अनेकजण वावरत असतात. मग त्यासाठी लागणारा अभ्यास, परिश्रम, सातत्य, निष्ठा हे सगळे गौण ठरते.
रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे एक खासदार आहेत. या आठवड्यात त्यांनी ‘एअर इंडिया’च्या एका अधिकार्‍याला चप्पलने मारण्याचा पराक्रम केला. हातातील ‘शिवबंधन’ दाखवत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्याची कबुलीही दिली. हा प्रकार का घडला, तो योग्य की अयोग्य या विषयावर थेट न्यायाधीशांप्रमाणे न्यायनिवाडा करणार्‍या माध्यम प्रतिनिधींनी ‘चप्पलमार खासदार’ असेच त्यांचे नामकरण केले. खरेतर गायकवाड हे प्राध्यापक आहेत. प्रवचनकार आहेत. किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ते बराच काळ अध्यक्ष होते. उमरगा मतदार संघाचे आमदार होते आणि मुख्य म्हणजे ते सध्या खासदार आहेत. ‘अंदर ले के मारते है साले को, यहॉं कोई देखने नही आएगा’ असे विमान तळावरील अधिकार्‍याने म्हटल्यावर साहजिकच त्यांच्यातील ‘शिवसैनिक’ जागा झाला. त्यांनी त्या अधिकार्‍याला चप्पलने बदडून काढले. लोकशाही व्यवस्थेत या घटनेचे समर्थन करणे शक्य नसले तरी अधिकार्‍यांचा मुजोरपणाही दुर्लक्षून चालणार नाही. ‘ग्राहकांशी’ असे वागणे सरकारी विमानसेवेतल्या लोकांना सोडा पण खासगी उद्योगातील लोकांनाही शोभत नाही; मात्र त्यावर काहीच न बोलता रवींद्र गायकवाड यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. विमान कंपन्यांकडून त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली. राज्यातील आणि देशातील सर्व समस्या सुटल्या असे वाटल्याने सलग त्यांच्यावरच बातमीपत्रे करण्यात आली.
मुख्य म्हणजे एका दूरचित्रवाणी वाहिनीने तर कहरच केला. त्यांच्या उमरग्यातील घरी जाऊन या प्रतिनिधीने त्यांच्या घरी येण्याची विचारपूस केली. ते नसल्याने यांनी त्यांच्या घरच्यांची मुलाखत केली. ते करताना खासदार गायकवाड यांच्या दोन पाळीव कुत्र्यांवर बातमी केली. ‘खासदार साहेब तर आपल्याला भेटू शकले नाहीत, मात्र त्यांची ही दोन परदेशी कुत्री याठिकाणी आहेत. आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊ...’ असे म्हणत त्यांनी ती कुत्री कुठून आणली, कशी आणली, खातात काय, खासदारांचे त्यांच्यावर किती प्रेम आहे, ती चावत कशी नाहीत, त्यांनाही खासदार साहेबांच्या येण्याची कशी प्रतिक्षा आहे यावर विशेष कार्यक्रम केला. वर ‘यातून लोकांना माहिती मिळते आणि त्यांचे मनोरंजनही होते’ असा दावा या वृत्तवाहिनीने केला. हा आजच्या पत्रकारितेचा ‘चेहरा’ आहे. यांना कोणताही विषय बातमी ‘चालवण्यासाठी’ पुरतो!
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या नाव्ह्याकडून केस कापतात, ते किती छोटे कापतात, त्यांची जात कोणती इथपासूनच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यातल्या त्यात वृत्तवाहिन्यांच्या आणि हिंदी वृत्तपत्रांच्या ‘ऑनलाईन आवृत्ती’ म्हणजे तर एक भयंकर प्रकरण असते. लैंगिकतेशी संबधित असलेल्या चटकदार बातम्या म्हणजेच त्यांना लोकांची आवड वाटते. मग त्यावर तुम्हाला कितीही विकृत आणि किळसवाणे वाचणे भाग पडते.
ग्रामीण भागातील मुलं मोठ्या आशेनं या क्षेत्रात येतात. त्यांना वाटते आपण काहीतरी सत्यशोधन करू शकू! लेखणीच्या माध्यमातून थोडासा काळोख दूर करू! काहीजण नेटाने या क्षेत्रातील पदवी मिळवून काम सुरू करतात; पण त्यांचा अपेक्षाभंग होतो. सध्या सर्वाधिक बदनाम हे क्षेत्र झाले आहे. ‘पेडन्यूज’चा सुळसुळाट झालाय. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची विश्‍वासार्हता कधीच लयास गेलीय. संपादकांवर व्यवस्थापनाचा दबाव असतो. त्यातूनच आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघार घेण्यापर्यंतचे प्रकार घडताना दिसून येतात. ‘तहलका’च्या तरूण निस्‘तेजपाल’चे गोव्यातील प्रकरण आपणास ज्ञातच आहे. काही पत्रकार संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढताना दिसतात तर तालुका स्तरावरील अनेक पत्रकार संघ म्हणजे चक्क ‘संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्या’ झाल्यात हे कोण नाकारणार? ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या माध्यमांचे हे रूप कुणालाही अस्वस्थ करणारे आहे.
सध्या माध्यमांत अनेक मुली जिद्दीने काम करताना दिसतात. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमात हे प्रमाण मोठे आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे! मात्र महाराष्ट्रात वृत्तवाहिनी अथवा वृत्तपत्रांच्या मुख्य संपादकपदी महिला किती? असा प्रश्‍न केला तर त्याचेही उत्तर निराशाजनकच येते. शिरीष पै, जयश्रीताई खाडिलकर-पांडे, राही भिडे अशा काही अपवाद वगळता एकाही स्त्रिला दैनिकाची संपादक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करता आली नाही. (त्यातही स्वतंत्र मालक आणि संपादक तर नाहीच नाही.) त्यांच्याकडे कुटुंबाची जबाबदारी असते, त्यांना अनुल्लेखाने मारले जाते अशी फुटकळ कारणे देऊन त्यावर कोणीही बोलत नाही.
सत्य मांडण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या पत्रकारांचे भवितव्य काय, याचाही विचार झाला पाहिजे. मोठ्या शहरात किमान त्यांच्या गरजेपुरते मानधन मिळते; मात्र ग्रामीण वार्ताहरांचे मानधन विचारल्यावर आणि ते ऐकल्यावर कुणालाही धक्का बसेल. मोठमोठ्या वृत्तपत्रांसाठी आणि वाहिन्यांसाठी काम करणार्‍या ग्रामीण वार्ताहरांना शब्दशः अडीचतीन हजार रूपये महिना इतक्या मानधनात काम करावे लागते. तेही कधी वेळेवर मिळते असे नाही. मग यातील काहीजण विमा पॉलिसी चालवतात, काहीजण भाजीपाला विकतात, काहीजण वृत्तपत्र विक्रीचे गाळे चालवतात तर काहीजण शिक्षकीसारख्या पेशात काम करून उरलेल्या वेळेत पत्रकारिता करतात. त्यांच्याकडून मग ‘पत्रकार’ म्हणून आपण काय अपेक्षा ठेऊ शकतो? त्यांनी इमाने इतबारे काम केले तरी त्यांना या क्षेत्रात खरेच न्याय मिळतो का? एखाद्या वृत्तपत्राचे ओळखपत्र खिशात ठेऊन केवळ ‘प्रतिष्ठे’साठी वार्ताहर म्हणून मिरवणारे अनेकजण तुम्हाला गावागावात भेटतील.
पुण्या-मुंबईसारख्या शहरात तर काही पत्रकार ‘ठेकेदार’ झालेत. क्षेत्र पत्रकारिता (बीट रिपोर्टींग) या प्रकारामुळे ते संबंधितांना वेठीस धरतात. आपण म्हणू त्याप्रमाणेच सगळे काही घडायला हवे असा यांचा आविर्भाव असतो. आपण कुणावरही वाटेल तशी टीका करू शकतो, त्याचे भवितव्य धोक्यात आणू शकतो, त्याला उद्ध्वस्त करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्यातूनच अनेकदा दुसरी बाजू न पाहता सत्याचा विपर्यास केला जातो. एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला सावरण्याऐवजी आणखी गाळात ढकलले जाते. विरोधकावर त्याने बेछुट आरोप करावेत, सतत वादग्रस्त विधाने करावीत, यांना खाद्य पुरवावे याची दक्षता घेतली जाते. त्या मंथनातून हातात काही सकारात्मक येणार का हे न पाहताच विषय चर्चेला आणले जातात. वृत्तवाहिन्यांवर रोज होणार्‍या चर्चा या प्रवृत्तीमुळेच हास्यास्पद ठरल्यात.
मालकशाही आणि व्यवस्थापनाचा दबाव यामुळे या क्षेत्रातील प्रामाणिक लोकांची होणारी कुचंबना व्यवस्था संपवायला निघणार्‍यांच्या इराद्याला खतपाणी घालणारी आहे. सध्याचे भीषण वास्तव लक्षात घेतले तरी निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणार्‍या पत्रकारांची संख्याही कमी नाही. त्यांच्याचमुळे या क्षेत्राचा गाडा चालतोय; मात्र त्यांना प्रतिष्ठा राहिला नाही. असण्यापेक्षा दिसण्यालाच अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने गुणवत्तेची, परिश्रमाची कदर केली जात नाही. आलेल्या प्रेसनोटवरून बातम्या करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही राहिले नाही.
असे सारे चित्र असताना छोटी वृत्तपत्रे मात्र सर्व प्रकारचे धोके स्वीकारत, धाडसाने सत्य मांडण्याचे काम करताना दिसतात. त्यांना वाचकांकडून बळ मिळाले तरच हे चित्र बदलू शकेल. जिल्हा वृत्तपत्रे आणि स्थानिक वृत्तपत्रे जगायला हवीत. जाहिरात पत्रे आणि मतपत्रे यामध्ये वृत्तपत्रे शोधायची झाल्यास अशा नियतकालिकांशिवाय पर्याय नाही.
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२

मुजोरपणाला चपराक

 घनश्याम पाटील  
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यात एक सभा होती. त्यावेळी एका शिवसैनिकानं जोरकस भाषण दिलं. बाळासाहेबांना ते आवडलं. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याप्रमाणं लगेच त्यांनी त्याला शिवसेनेचं एक महत्त्वाचं पद दिलं. त्यानंतर हा शिवसैनिक उमरगा विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आला. किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याची कॉंग्रेसची राजवट त्याने उलथून लावली आणि तो अध्यक्ष झाला. आमदारकीनंतर खासदार होण्याचे भाग्यही त्यांना लाभले. मुळात हा माणूस शिक्षण क्षेत्रातला! प्राध्यापकी करणारा! त्यामुळे ‘सर’ या नावानेच त्यांची ख्याती! एअर इंडियाच्या एका अधिकार्‍याला मारहाण केल्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. रवींद्र गायकवाड असं या नेत्याचं नाव! अधिकार्‍याला केवळ बदडणेच नव्हे तर हातातील शिवबंधन दाखवत आपण कोणाला घाबरत नाही या अविर्भावात त्यांनी संबंधित अधिकार्‍याला चप्पलने नव्हे तर सँडलने पंचवीस वेळा मारल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यावरून सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली आहे.
जबाबदार लोकप्रतिनिधीने विमान अधिकार्‍यालाच काय तर कुणालाही मारणे गैर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे; मात्र हे का घडले याचाही विचार केला पाहिजे. गायकवाडांच्या कृत्याचा निषेध करताना त्यांची कारकिर्द कलंकित करणे योग्य नाही. रवींद्र गायकवाड जसे प्राध्यापक होते तसेच प्रवचनकारही होते. अध्यात्मात आणि कृषी संस्कृतीत रमणारा हा माणूस! उमरग्यातील त्यांच्या घराजवळ एका बाजूला मस्जिद आहे तर दुसर्‍या बाजूला दर्गा! सगळ्यांशी त्यांचे सामंजस्याचे संबंध आहेत. येथील मुस्लीम बांधवांच्या सर्व सुखदु:खात, कार्यक्रमात, उपक्रमात ते सहभागी होतात. मुस्लीम बांधवही त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करतात. हा कट्टर शिवसैनिक म्हणूनच धार्मिक ऐक्याचे प्रतीक आहे.
संबंधित विमान कंपनीत त्या अधिकार्‍याने मुजोरपणा केल्याचे वास्तव पुढे येत आहे. तेथील हवाईसुंदरीने प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की ‘‘खासदार रवींद्र गायकवाड यांचे वर्तन इतर सहप्रवाशांप्रमाणेच सभ्यतेचे होते. आमच्या अधिकार्‍यांनीच त्यांच्याशी मग्रुरी केली. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे न देता ‘साले को अंदर ले के मारते है, इसे छुडाने यहॉं कोई नहीं आयेगा’ असे म्हटले. त्यावरून त्यांनी त्या अधिकार्‍याला यथेच्छ बदडले’’
गायकवाड मुळात शिवसैनिक, त्यात मराठवाड्यातले! असा उर्मटपणा कुणी करत असेल तर त्याला सोलपटून काढणे हा इथल्या मातीचाच गुणधर्म. ‘जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर  मला त्यांचा अभिमानच वाटेल’ असे सांगणारे बाळासाहेब यावेळी आठवतात. आज ते असते तर खासदार रवींद्र गायकवाड यांना त्यांनी सन्मानाने ‘मातोश्री’वर बोलवून कौतुकाची थाप दिली असती. नेभळटपणा म्हणजेच सभ्यपणा नव्हे, हे शिवसैनिकांना चांगलेच कळते. रवींद्र गावकवाडांनी ते कृतीतून दाखवून दिले इतकेच.
एअर इंडिया म्हणजे इतर खासगी कंपन्यांपुढे डबडेच! वातानुकुलीत वोल्वोपुढे लाल डबडे दिसावे तशी यांची गत! सातत्याने सरकारी मदत घेतल्याने ही कंपनी अजूनही श्‍वास घेतेय. मुळात, सरकारी सेवेतील अधिकार्‍यानेच काय तर कोणत्याही अस्थापनातील कोणत्याही व्यक्तिने प्रत्येकाला चांगली सेवा देणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. किंबहुना तसा कायदाही आहे; मात्र त्या कायद्याचे उल्लंघन करीत प्रवाशांशी जी अरेरावी केली जाते तीही निषेधार्ह आहे. रवी गायकवाड यांनी अधिकार्‍याला मारणे जितके चुकीचे आहे त्याहून मोठा गुन्हा या मस्तवाल कर्मचार्‍याने केलाय. शिवाय त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणून मराठी अस्मितेचाही अवमान केलाय. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांना जी वागणूक दिली गेली ती म्हणूनच निंदनीय आहे. बड्या उद्योजकांसाठी पायघड्या घालणारे हे लोक मराठीचा सातत्याने द्वेषच करताना दिसतात. लातूरचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांनाही केवळ त्यांच्या ‘गायकवाड’ या मराठी आडनावामुळे तीन तास विमानतळावर थांबवून ठेवण्यात आले आणि त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. अनेक गुंड, पुंड, वस्ताद आणि पठ्ठे कायम राजरोसपणे विमानप्रवास करत असताना, अनेक अवैध पदार्थांची तस्करी करत असताना, विजय मल्ल्या, दाऊद इब्राहिम सारखे लोक देश सोडून पळून जात असताना त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही; मात्र येथील खासदाराला विमान प्रवासापासून वंचित ठेवण्यात येते, ही खरी लोकशाहीची चेष्ठा आहे.
आमदार असताना उमरग्याहून मुंबईला एसटी महामंडळाच्या बसने जाणारे रवींद्र गायकवाड अतिशय साधेपणाने जगतात. दिखावा, डामडौल त्यांच्या स्वभावात नाही. उस्मानाबादमधील डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या साम्राज्याला त्यांनी तडा दिलाय. शरद पवार यांचे नातेवाईक असलेल्या पाटलांचे वर्चस्व झुगारून देणार्‍या रवी गावकवाड यांच्याविषयी म्हणूनच अनेकांच्या मनात आकस आहे. ते अनेकांना दूरध्वनीवर उपलब्ध होत नाहीत अशी तक्रार करत उस्मानाबाद जिल्ह्यात ‘नॉट रिचेबल’ असे त्यांचे नामकरणही करण्यात आले आहे. मागच्या निवडणुकीत ‘खासदार दाखवा आणि हजार रूपये मिळवा’ असाही प्रचार त्यांच्याविरूद्ध करण्यात आला. मात्र मोदी लाटेतही या सर्वांना पुरून उरत ते यशस्वी ठरले आहेत. त्यांच्यावर केलेले आरोप खरे असते तर या वातावरणात त्यांना हे यश मिळाले नसते.
खरेतर एअर इंडिया ही घाट्यातील कंपनी चालवणे हे काही सरकारचे काम नाही. टाटा सारख्या उद्योजकाने सरकारला याविषयी यापूर्वीच सुनावले आहे. समाजवादाच्या नावाने गळे काढताना हे व असे सर्व उद्योग खासगी करायला हवेत. सगळ्या सरकारी सुविधा घ्यायच्या, शासनाकडून अर्थिक मदत घेऊन तूट भरून काढायची आणि लोकप्रतिनिधींना प्रवासास मज्जाव करायचा हे कशाचे लक्षण? मराठमोळ्या शिवसैनिक खासदाराने संसदेत हा प्रश्‍न उपस्थित केला. कामकाज सुरू असतानाच लोकप्रतिनिधीला दिली गेली जाणारी वागणूक म्हणूनच खटकते. रवींद्र गायकवाड यांनी सँडलने पंचवीस वेळा संबंधिताला मारले याची कबुलीही त्यांनी जाहीरपणे दिली. मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या प्रवासावर निर्बंध लादणे योग्य नाही.
सर्वात वाईट म्हणजे या घटनेनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दाखवलेला उथळपणा आणि उताविळपणा! ‘चप्पलमार खासदार’ अशा शब्दात त्यांची हेटाळणी करताना माध्यम प्रतिनिधी विशेषत: वृत्तवाहिन्या त्यांची सूडभावना दाखवून देत होत्या. हातात बुम घेऊन विमानतळावर थांबलेले प्रतिनिधी त्यांना न्यायाधीशासारखे वाटत होते. यांनीच बातम्या करायच्या, यांनीच न्यायनिवाडा करायचा आणि यांनीच शिक्षाही देऊन मोकळे व्हायचे. वा रे लोकशाही! आणीबाणी प्रमाणेच पुन्हा जर प्रसार माध्यमांवर निर्बंध लादले गेले तर हे पोटभरू बातमीदारच त्याला जबाबदार असतील.
उमरग्यातील रवींद्र गायकवाड यांच्या घरी गेलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने त्यांच्या दोन कुत्र्यांवर कार्यक्रम केला. ‘खासदार साहेब तर आपल्याला भेटू शकले नाहीत. उद्या गुढीपाडव्यानिमित्त कदाचित घरी येतील. तोपर्यंत त्यांच्या या दोन विदेशी पाहुण्यांना भेटूया. तेही खासदार घरी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत.’ असे म्हणत या प्रतिनिधीने ही कुत्री कोणत्या जातीची आहेत, कुठून आणली, किती रूपयांना आणली, ती खातात काय, त्यांना हा प्रदेश मानवतो का, ती भुंकतात का, चावतात का, खासदारावर किती प्रेम करतात हे व असे प्रश्‍न संबंधितांना विचारून रसिकांना आपल्या ‘विद्वत्ते’चे दर्शन घडवले. खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमान अधिकार्‍याला सँडलने मारले. ते चूक की बरोबर याबाबत मतभेद असू शकतात; मात्र अशा बातम्या पाहताना आपल्या हातात हंटर असावा आणि तो पत्रकार आपल्या समोर असावा असे माझ्यासारख्या सहनशील प्रेक्षकाला नेहमी वाटते.
सध्या देश बदलतोय. नव्या राजकीय पर्वाची नांदी झालीय. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, गाडुनि किंवा पुरूनि टाका’ या कवितेप्रमाणे नवी व्यवस्था गुन्हेगारी, दहशत, भ्रष्टाचार, महागाई संपवू पाहतेय. त्यांचे हात बळकट करायला हवेत. अर्थात सरकारमध्येही अनेक भ्रष्ट नेते नक्की आहेत. देशाचा गाडा चालवताना ‘उडदामाजी काळे गोरे’ होणारच. चुकीच्या गोष्टींना विरोध करत आपल्याला एकेक पाऊल पुढे टाकायचे आहे. त्यामुळेच इथल्या प्रसारमाध्यमांची जबाबदारीही मोठी आहे. सबसे तेज, उघडा डोळे बघा नीट अशी घोषवाक्ये करताना कुणीही पत्रकारितेच्या मूळ तत्त्वांना तीलांजली देऊ नये. रवींद्र गायकवाड यांच्या निमित्ताने सरकारी यंत्रणेतील असे अनेक प्रश्‍न चव्हाट्यावर आले आहेत. त्याचा सोक्षमोक्ष लावायला हवा. दुष्काळाच्या खाईत मराठवाडा होरपळत असताना रवींद्र गायकवाड यांनी व्यवस्थेविरूद्धचे बंड पुकारले आहे. ‘गुंडगिरी’ म्हणत त्यांच्यावर टिकास्त्र सोडायचे की ‘मुजोरपणाला चपराक’ म्हणून त्यांचे समर्थन करायचे हे ज्याने त्याने ठरवावे. तूर्तास अशा सर्व यंत्रणातील गैरव्यवहार, त्यांची सेवा, कर्मचारी अधिकार्‍यांकडून दिली जाणारी वागणूक हे सारे बदलायला हवे आणि लोकांनाही त्यांच्याविषयी आस्था वाटावी असे आम्हास वाटते.  

- घनश्याम पाटील
7057292092