Monday, May 24, 2021

मलमपट्टी नको, माणूस उभा करा


कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळं भयप्रद परिस्थिती निर्माण झालेली असतानाच विविध प्रांतात निसर्गाचं तांडवही अनुभवायला येत आहे. मागच्या वर्षी कोकण भागात निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार उडवला. यंदाही तौैक्ते वादळानं होत्याचं नव्हतं झालं आहे. गेल्या वर्षी निसर्गाच्या तडाख्यानं कोकणवासीयांचं अतोनात नुकसान झालं. नारळ, पोफळी, फणस, कोकम, जायफळाच्या बागा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. शेकडो वर्षांची झाडं उन्मळून पडली. डोळ्यादेखत सगळं भुईसपाट होऊनही कोकणी माणसानं धीर सोडला नाही. न खचता, न डगमगता तो पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होता.

घनश्याम पाटील यांचे 'दरवळ' हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी येथे क्लीक करा 

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही अनेक नेत्यांनी कोकणचे दौरे केले. आपदग्रस्तांना मदत करायची म्हणून हे दौरे होते की या संकटाच्या काळातही त्यांना पर्यटन दौरे करायचे होते हे कळलं नाही. सरकारकडून तुटपुंजी मदत मिळूनही कोकणी माणूस डगमगला नाही. यंदा पुन्हा त्याला तौक्ते वादळास सामोरं जावं लागल्यानं मात्र तो हवालदील झाला आहे. कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यानंतर महाराष्ट्रात एकाच माणसानं कटाक्षानं घरकोंडीचे नियम पाळले. काहीही झालं तरी घर सोडायचं नाही असा प्रण केल्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून राहिले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोमट पाणी पिण्याचा सल्ला त्यांनी सातत्यानं जनतेला दिला. यंदा तौैक्ते वादळात मात्र ते चक्क घराबाहेर पडले आणि अवघ्या चार तासात कोकण दौरा उरकून परत त्यांच्या निवासस्थानी आले. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी याबाबत उपहासानं त्यांना सुनावलं की, तौैैक्ते वादळापेक्षा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अधिक वादळी होता.

खरंतर अशा दौर्‍यांचा फार्स हा फक्त देखावा ठरतो हे यापूर्वीही अनेकदा दिसून आलं आहे. सांगली-सातारा-कोल्हापूर भागात आलेल्या महापूराच्या वेळी तेव्हाचे मुख्यमंत्री असाच देखावा करत इकडं फिरत होते. गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यानं तर तिकडं जाऊन सेल्फी काढल्या म्हणून वाद ओढवून घेतला होता. सत्ता नसतानाही शरद पवार यांनी त्या भागातला दौरा काढून लोकांना धीर दिला होता. आता ते आणि त्यांचा पक्ष सत्तेत असूनही आपदग्रस्तांसाठी भरीव असं काहीच करताना दिसत नाहीत.

‘पंचधारा’ या मुखपृष्ठात परभणी येथील सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांनी ‘दरवळ’ या पुस्तकाची लिहिलेली समीक्षा.

शरद पवारांच्या आपत्ती निवारणाच्या कार्याचं नेहमी कौतुक केलं जातं. त्यासाठी 1993 च्या किल्लारी भूकंपाच्या वेळचं उदाहरण आवर्जून दिलं जातं. तेव्हा संपर्काची साधनं उपलब्ध नव्हती. प्रसारमाध्यमांची इतकी स्पर्धा नव्हती. तरीही शरद पवार किल्लारीला पोहोचले. किल्लारी, लामजना, कवठा, नारंगवाडी, रेबे चिंचोली, सास्तूर, लोहारा, माकणी, उमरगा, बलसूर, बाबळसूर, नाईचाकूर अशा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावांचा त्यांनी आढावा घेतला. स्वतः त्यांनी किल्लारीत तळ ठोकला. लगोलग निर्णय घेत भरीव मदत जाहीर केली. जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री स्वतः भूकंपग्रस्तांची दुभंगलेली मनं सांधण्याचा, त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हटल्यावर प्रशासनही खडबडून जागं झालं. मदत कार्यात कसलीच उणीव भासू दिली गेली नाही.

त्यानंतर या भागातील 52 गावांचं पुनर्वसन झालं. त्यासाठी जमिनीचं संकलन करताना अनेक अनास्था प्रसंग उद्भवले. दोन घरातील अंतर, कामाचा दर्जा यावरून चर्चा झडल्या. भूकंपग्रस्तांसाठी आलेल्या मदतीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. ज्या कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी पडले होते त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली. त्यातही लक्षवेधी घोटाळे झाले. तरूणांना सरकारी नोकर्‍यांचं आश्वासन देण्यात आलं होतं. ते आजतागायत पूर्ण झालेलं नाही. भूकंपग्रस्तांच्या मदतीच्या बहाण्यानं जी लूट करण्यात आली, फसवणूक करण्यात आली त्याची दखल कोणीही आणि कधीही घेतली नाही. स्वभावानं कणखर असलेला मराठवाडी माणूस तशा परिस्थितीतही स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याचं आक्रंदणं कुणाच्या लक्षातच आलं नाही. अनेकांनी त्यानंतर गाव सोडलं. मिळेल तिथं आणि मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजिविका केली. आजही त्यांच्या मनावर जे ओरखडे उमटलेत ते दूर झाले नाहीत. दुसरीकडं शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानं मात्र किल्लारी भूकंपात किती मोठं योगदान दिलं याचा डांगोरा कायम पिटला जातो. इतकंच काय अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना गुजरातच्या कच्छ येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी त्यांनी आपत्ती आणि व्यवस्थापनाच्या कामासाठी शरद पवार यांची मदत घेतली. किल्लारी भूकंपग्रस्तांच्या व्यथा-वेदना मात्र आजतागायत कुणाच्याही लक्षात आल्याचं दिसत नाही.

  माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ

कोकणच्या आपत्तीत जे नुकसान झालंय ते अशा दौर्‍यांनी भरून निघणार नाही. त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायला हव्यात. नरेंद्र मोदी यांनी कोरोनापूर्व काळात जगभराचे दौरे केले. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. हे सरकारी पैशानं जग फिरत आहेत, मौजमजा करत आहेत असे आरोप झाले. आज मात्र करोनाच्या काळात जगभरातून जी मदत येत आहे, ती पाहता मोदींनी सर्व देशांशी जे संबंध निर्माण केले त्याचं महत्त्व लक्षात येतं. मोदींच्या अनेक धोरणांवर टीका होऊ शकते मात्र त्यांचं हे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही.

मोदी-शहांनीही वादळाच्या वेळी, महापूराच्या वेळी किमान हेलिकॉप्टरनं गुजरात-महाराष्ट्रात असे धावते दौरे केले. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौर्‍यावरून राजकारण करत आहेत. आम्ही तीन दिवस या भागाच्या दौर्‍यावर होतो, तुम्ही चार तासात दौरा आटोपता घेतला, असा आरोपही भाजपकडून केला जातोय. सगळं जग बेचिराख होत असतानाही हे महाभाग आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात मश्गुल आहेत. मेलेल्यांच्या टाळेवरचं लोणी खाणं हा काय प्रकार असतो हे यातून दिसून येतं. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही या बिकट परिस्थितीचं भान आहे की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडतोय. त्याच्यापुढं जगण्या-मरण्याचं आव्हान असताना कोणी कसे दौरे केले यावरच चर्चा झडताहेत. मदतीच्या नावावर मात्र तोंडाला पानं पुसली जात आहेत. आपदग्रस्तांना तात्पुरती मदत करणं, त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचवणं आणि आम्हीच कसे या संकटाच्या वेळी तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देणं असले घाणेरडे राजकारण सुरू आहे.

जोपर्यंत मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत नाही, दीर्घकालिन योजना आखत नाही, मोडून पडणार्‍या सामान्य माणसाला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करत नाही तोपर्यंत अशा वरवरच्या मदतीला काहीच अर्थ उरत नाही. कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग असताना इथला भोळा-भाबडा आणि प्रामाणिक कोकणी माणूस आर्थिकदृष्या सक्षम कसा होईल याचे दीर्घकालिन नियोजन व्हायला हवे. त्याला तात्पुरत्या कुबड्या न देता, वरवरच्या मदतीचं ढोंग करून सहानुभूती न मिळवता त्याला भरीव मदत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवायला हवा.

एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांच्यासारखं रांगडं नेतृत्व कोकणी माणसाला मिळालं होतं. त्यांचा कोकणवर एकहाती पगडा होता. आता राज्याच्या राजकारणातही कोकणसाठी संघर्ष करणारा नेता दिसत नाही. जे आहेत ते नेत्यांच्या आशीर्वादाखाली दबले गेलेत. स्वाभिमानी कोकणी माणसाची ही परवड पाहूनही कुणाच्याही हृदयाला पाझर फुटू नये ही शोकांतिका आहे. पश्चिमी किनारपट्टीवरील गेल्या काही काळात सातत्यानं येणारी ही अरिष्टं पाहता काहीतरी ठोस काम करणं गरजेचं आहे. वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा अशा प्रांतिक मागण्यांना अधूनमधून जोर येत असतानाच ज्या सामान्य कोकणी माणसाच्या जिवावर मुंबई उभी आहे त्याचा आत्मसन्मान कोणीही दुखावू नये. मुख्यमंत्र्यांनी चार तासांचा दौरा केला, की विरोधी पक्षनेत्यांनी तीन दिवस कोकणात तळ ठोकला यापेक्षा त्यांना या अडचणीच्या काळात कोणी काय मदत केली हे महत्त्वाचं आहे. सामान्य माणूसही तितकंच लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी ज्याला त्याला ज्याची त्याची पायरी दाखवून देतो हे ध्यानात घ्यायला हवं.
- घनश्याम पाटील
7057292092

दैनिक ‘पुण्य नगरी’, मंगळवार, दि. 25 मे 2021


Sunday, May 23, 2021

वावटळ निर्माण करणारा दरवळ


सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी सरांसारख्या प्रतिभावंतानं आपल्या पुस्तकाची दखल घेणं ही भावनाच खूप सुखद आहे. 'दरवळ'चे हे अनमोल परीक्षण प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक पुण्य नगरी चेही विशेष आभार. 
 
चपराक प्रकाशनचे संपादक, प्रकाशक आणि उत्साही तरूण लेखक घनश्याम पाटील यांचा ‘दरवळ’ हा पंचवीस लेखांचा वैचारिक संग्रह वाचनीय तर आहेच पण विचारांची वावटळ वाचकांच्या मनात निर्माण करणारा संग्रह आहे. वृत्तपत्रांतून केलेले हे प्रासंगिक लेखन असले तरी लेखकाचे दीर्घकालिन पूर्वचिंतन आणि त्याची तर्कशुद्ध विचारसरणी याचा प्रत्यय या लेखनातून येतो. 
 
पुलंनी एका प्रवासवर्णनात असे लिहिले आहे की, फ्रेंच संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे तर भारतीय संस्कृती ही रूद्राक्ष संस्कृती आहे. या रूद्राक्ष संस्कृतीची चिरंतन मूल्ये, तिचे वेधघटक आणि त्यामध्ये काळानुरूप घडलेली चांगली-वाईट परिवर्तने याचे भेदक दर्शन या सर्व लेखांतून होते. यातील काही लेखांची शीर्षकेच किती अर्थगर्भ आहेत ती बघा - स्वतःपासूनची सुरूवात महत्त्वाची,  दुर्बल सबल व्हावेत, उमलत्या अंकुरांना बळ द्या. मी का लिहितो या शेवटच्या लेखात लेखकाने आपली लेखनविषयक भूमिका अनुभवसिद्ध उदाहरणे देऊन स्पष्ट केली आहेत. मी माझ्या आनंदासाठी लिहितो असं उत्तर लेखकानं एका प्राश्निकाला दिलेलं असून उर्वरित चोवीस लेखातून त्याला मिळणार्‍या या आनंदाचे स्वरूप स्पष्ट होते आणि हा आनंद नवरसात्मक आनंद असतो. दुसर्‍याचे दुःख वाचून आकलन होण्याचाही आत्मिक आनंद असतो. लेखकाने अनेक ठिकाणी परखड विवेचनही केले आहे. एकांगी विचार करणार्‍यांच्या ते जिव्हारी झोंबेल पण खर्‍या वैचारिकाला हे परखड विचार आनंदच देतील. उदाहरणार्थ - शाकाहाराची चळवळ राबवा (पृष्ठ 68) या लेखात अभिनिवेशी गोरक्षकाबद्दल लेखकाने आसूडच उगारला आहे. गाय मारू नका म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे माणसे कशी मारू धजावतात असा खडा सवाल लेखक करतात. अगम्य आणि अतर्क्य या लेखात स्त्रीवादी संघटनांच्या चळवळींचा परामर्श घेताना त्यातील एकांगी अपूर्णता ते लक्षात आणून देतात. तेव्हा ते असे विचारतात, की तृप्ती देसाई शनीशिंगणापूरला आंदोलन करतात पण स्त्री देहाचे प्रदर्शन करणार्‍या बड्या कंपन्यांच्या उत्पादनाविरूद्ध ब्र काढण्याचे धाडस कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यात नाही. 
 
साहित्य संमेलन आणि त्याला पुढेमागे लटकून येणारे विविध वाद आता नेहमीचेच झालेत. त्याचा परामर्श घेताना लेखकाने सोदाहरण विवेचन केले आहे. यवतमाळचे नयनतारा सेहगल प्रकरण, महाबळेश्वरचे अध्यक्षाविना पार पडलेले संमेलन, लक्ष्मीकांत देशमुख आणि श्रीपाल सबनीस या माजी संमेलनाध्यक्षांची नावे न घेता त्यांच्या विधानांचीही स्फोटक दखल लेखकाने घेतली आहे. ‘राहिलेलं राहू द्या’ हा लेख म्हणजे लेखकाच्या आत्मचरित्राचे एक प्रकरणच आहे. आपण कसे घडत गेलो हे सांगताना शेवटी वैयक्तिक संदर्भाच्या बाहेर पडून लेखकाने एक तात्त्विक निष्कर्ष सांगितला आहे की काही प्रश्न सोडले की सुटतात आणि त्याच न्यायानं राहुन गेलेल्या काही गोष्टी तशाच राहू द्याव्यात यातच सगळ्यांचं भल असतं. 
 
‘दरवळ’मध्ये अनेक घटना, प्रसंग वाचायला मिळतात. गावे आणि शहरे आपण वाचता-वाचता फिरतो. कितीतरी लहानमोठ्या व्यक्ती त्यांच्या एरवी न दिसणार्‍या अंतरंगासह भेटतात आणि वाचक या दरवळीत रमून जातो. दरवळीची इतकी सारी बलस्थाने कौतुकास्पद आहेतच पण आता एकच शबलस्थान दाखवण्याची गरज आहे. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये प्रासंगिक लेखन करताना येणार्‍या स्थळकालमर्यादा सांभाळूनच हे लेखन करावे लागते, तसे हे लेखन आहे. याला ग्रंथरूप देताना याच लेखांची अभ्यासपूर्ण पुनर्बांधणी करून साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचे योग्य संदर्भ देऊन हे लेख मुद्रित केले असते तर त्यांना अधिक वजन प्राप्त झाले असते. पुढील आवृत्तीत लेखकाने असा प्रयत्न करावा म्हणजे अक्षरवाङ्मयाच्या दालनात या पुस्तकाला आतापेक्षा अधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल. 
दरवळ
लेखक - घनश्याम पाटील
प्रकाशक - चपराक (7057292092)
पाने - 128, मूल्य - 200

- डॉ. न. म. जोशी, पुणे

Saturday, May 22, 2021

अलीबाबा आणि चाळीस चोर

 

- घनश्याम पाटील
संस्थापक, संपादक ‘चपराक’, पुणे
7057292092

शरद पवार यांच्या संसदीय राजकारणाला 54 वर्षे पूर्ण होताहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे. 54 वर्षाचा काळ हा एका राष्ट्रासाठी छोटा असला तरी एका व्यक्तिच्या दृष्टीने तो त्याचे आयुष्य व्यापून टाकणारा कालखंड असतो. वयाच्या ऐंशीत असलेले पवार इतकी वर्षे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत ही गोष्ट म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पवार भारताचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि आणि भविष्यात आता परत कधी ती शक्यता नाही हेही स्पष्टपणाने दिसतंय. त्यांचं वय, आरोग्य, प्रकृती आणि प्रवृत्तीचा विचार करता त्यांच्याबाबत ‘न झालेले सर्वोत्तम पंतप्रधान’ म्हटलं जातं ते खरंच आहे.


भाऊ तोरसेकर यांचे 'अर्धशतकातला अधांतर - इंदिरा ते मोदी  हे पुस्तक घरपोच मागवा
 

शरद पवार काँगे्रसच्या मूळ प्रवाहात राहिले आणि वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी केंद्रात संरक्षण, कृषी अशी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करताच देशातही स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी केलेल्या सकारात्मक गोष्टीत काही गोष्टींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यातली पहिली महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात स्त्रियांना सर्वप्रथम संधी मिळवून दिली. हे त्यांचं विलक्षण कर्तृत्व आहे. जर पवार भाजपसारख्या पक्षात असते तर याची प्रचंड जाहिरात करून  त्यांनी उर्वरित आयुष्यात या एकाच मुद्यावर राजकारण केलं असतं आणि पुढच्या सगळ्या निवडणुका यशस्वीपणे लढल्या असत्या. मात्र याबाबत त्यांना प्रसिद्धीचं तंत्र जमलं नाही. 

'अणीबाणी लोकशाहीला कलंक' हे पुस्तक घरपोच मागवा

त्यांचं दुसरं महत्त्वाचं योगदान म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची जी जमिन लागवड योग्य नव्हती तिथला अभ्यास करून फळबागा लावायला लावल्या. अतिशय दूरदृष्टीनं त्यांनी ही जी फळक्रांती घडवली त्याला तोड नाही. राज्यातल्या आणि देशातल्या शेतकर्‍यांना याचा बर्‍यापैकी फायदा झाला. पवार सुरूवातीपासून स्वतःला शेतकरी आणि शेतकर्‍यांचे नेते समजतात. शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करणं ही आपली जबाबदारीच आहे असं त्यांना वाटायचं. ही जबाबदारी त्यांनी बराच काळ चांगल्या पद्धतीनं पार पाडली.

पंचायत राज व्यवस्थेत स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीनं, समान अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, निर्णय घेतले, कायदे करून घेतले ते महत्त्चाचे आहेत. ग्रामपंचायत रेकॉर्डला पतीच्या नावानं असलेल्या घरातही पत्नीची नोंद करणं इथपासूनचे बदल त्यांच्या दूरदृष्टीनं झाले. स्त्रियांच्या हितासाठी त्यांनी जे योगदान दिलं ते कधीही विसरता न येण्यासारखं आहे. स्त्रियांविषयीचा व्यापक विचार पवारांनी कायम केला हे कोणीही नाकारू शकणार नाही.
 
शरद पवार यांनी क्रीडा क्षेत्रातही भरीव योगदान दिलं. अनेक संस्था-संघटनांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांना पैसा उपलब्ध करून दिला. कुस्तीगीर परिषद, कबड्डी संघटना, खो-खो संघटना आणि क्रिकेटमध्ये बीसीसीआयपर्यंत त्यांनी जे काही उभं केलं ते आपण बघितलंच आहे. अशा प्रत्येक संघटनांत त्यांनी चांगले कार्यकर्ते दिले आणि त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे अधिकारही दिले. अशा कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्याबरोबरच पैसा आणि अन्य ताकतही त्यांनी उभी करून दिली. कुस्तीगीर परिषदेत बाळासाहेब लांडगे यांना घेतलं किंवा बीसीसीआयमध्ये सौरव गांगुलीला घेतलं तरी त्यांच्या कामात त्यांनी फारसे हस्तक्षेप केले नाहीत. त्यांच्या कामात लुडबूड न करता आपल्याला अपेक्षित आहे ते साध्य करायचं हे पवारांचं कौशल्य अभूतपूर्व आहे. या सर्व सकारात्मक बाबींसाठी शरद पवारांचं नाव भविष्यातही कायम घेतलं जाईल.

घनश्याम पाटील यांचे 'दरवळ' हे पुस्तक घरपोच मागवा 

 शरद पवार यांच्या राजकारणाचा विचार केला तर पवारांनी राजकारणातून काय मिळवलं आणि त्यांच्या राजकारणानं महाराष्ट्राला काय दिलं याचं मूल्यमापण झालं पाहिजे. ते करताना पवारांच्या बाबत नकारात्मक गोष्टी सर्वाधिक आहेत. पवार यशवंतराव चव्हाण यांचे सहकारी म्हणून राजकारणात आले. असं असूनही ते शेवटपर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत राहिले नाहीत. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे...’ असं आवाहन केल्यावर ‘आता परतीचे सगळे दोर कापून टाकले आहेत’ असं त्यांनी बजावलं. यशवंतराव चव्हाण पुन्हा इंदिरा गांधी यांच्यासोबत गेल्यानं ते न पटलेल्या पवारांनी यशवंतरावांच्या हयातीतच त्यांना सोडून जाण्याचा पराक्रम केला.

यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर मात्र त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुन्हा मुख्य प्रवाहात जायचं म्हणून पवार बाईंसोबत गेले. शरद पवार यांच्यावर यशवंतरावांचा खूप मोठा प्रभाव होता. राज ठाकरे यांना जसं वाटतं की बाळासाहेबांसारखं वागायचं, त्यांची नक्कल करायची तसंच काहीसं पवारांच्या बाबतीत झालं. यशवंरावांसारखाच आयुष्याचा प्रवास करायचा हे त्यांनी पक्कं ठरवलं असावं. यशवंतरावांसारखं बोलायचं, त्यांच्यासारखंच वागायचं, त्यांच्यासारखीच भाषणं करायची आणि यशवंतरावांसारखंच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक वर्ष टिकून रहायचं अशी कामाची पद्धत पवारांनी सुरू केली. अर्थात त्यातूनच यशवंतरावांच्या राजकारणाचे सगळे दोषही शरदरावांच्या आयुष्यात निर्माण झाले.
 

संजय गोराडे यांची 'तीर्थरूप'  ही कादंबरी घरपोच मागवा
 

यशवंतराव चव्हाण हे अती सावध राजकारणी होते. तो अती सावधपणा पवारांकडे आला. यशवंतरावांच्या कार्यपद्धतीला त्यावेळी अनेकजण ‘कुंपणनीती’ असं म्हणत. जेव्हा राजकारणात दोन गट पडतात तेव्हा कुणाचीही बाजू न घेता कुंपणावर बसून रहायचं आणि जो विजयी होईल त्याच्या बाजूनं उडी मारायची. याला अनेक राजकीय अभ्यासक ‘यशवंतनीती’ किंवा ‘कुंपणनीती’ म्हणतात. पवारांचंही तसंच आहे. राजकारणात ‘सर्व काही किंवा काहीही’ म्हणून रिस्क घ्यावी लागते. धाडस करावं लागतं. अशी मोठी रिस्क घेणं, असं मोठं धाडस करणं हे यशवंतनीतीचा अनुयायी असल्यामुळं पवारांना कधी जमलंच नाही. त्यामुळंच ते कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत.


सुरेखा बो-हाडे यांचे 'बाईची भाईगिरी' हे पुस्तक घरपोच मागवा


पप्पू कलानी, भाई ठाकूर या आणि अशा गुंडांना स्वतःच्या पक्षात आणायचं आणि पवित्र करायचं हा फॉर्म्युला पवारांनी राजकारणात आणला. आज अनेकजण या फॉर्म्युल्याचे श्रेय भाजपला देत असले तरी ती वस्तुस्थिती नाही. राजकारणातल्या या अभद्र पद्धतीचं जनकत्व पवारांकडं जातं. त्यांनी हे प्रकार केले. ज्याच्यावर प्रचंड टीका केली तो आपल्या पक्षात आला की पवित्र झाला म्हणायचं हे त्यांनी दाखवून दिलं. शरद पवारांनी स्वतःपुरता केलेला हा फॉर्म्युला आता अतिशय त्रासदायक आणि कटकटीचा ठरत आहे.
 
शरद पवारांनी राजकारणात अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यावेळी ते मुख्य प्रवाहात पुन्हा सहभागी झाले. व्ही. पी. सिंगांनी त्यावेळी बोफोर्स प्रकरणानंतर जी राळ उठवली त्यानंतरचं पुढचं पाच-दहा वर्षाचं जे राजकारण होतं त्यात राजकारणात पवारांना खूप मोठं स्थान मिळालं असतं. शरद पवारांनी मात्र मूळ काँग्रेस पक्षात जाण्याची घाई केली. सोनिया गांधींना राजकारणात आणण्याचं काम पवारांनी केलं. ज्या पद्धतीनं ते सोनिया गांधींच्या जवळ गेले तसंच त्यांच्यापासून दूर जाण्यातही त्यांनी घाई गरबड केली. चाचा केसरींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा घाट घातला आणि 10 जून 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना केली. काही निर्णय घेण्यासाठी खूप गरबड करणं आणि आणि निर्णय घेताना खूप उशीर करून ते ताटकळत ठेवणं या दोन्ही चुका त्यांच्या कार्यपद्धतीत दिसतात. या चुका त्यांनी सातत्यानं केल्यात. 


रमेश वाघ यांचे 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' हे पुस्तक घरपोच मागवा
 

कोणी काहीही म्हटलं तरी शरद पवारांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातल्या पाच-दहा जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं आणि आहे. ‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा मोठी’ या प्रमाणे ते जसे नाहीत तसेच दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागाचा अपवाद वगळता पवारांचं नेतृत्व नाही. खान्देशात त्यांचं नेतृत्व कधी दिसलं नाही. विदर्भात त्यांचं नेतृत्व टिकलं नाही. मुंबईसारख्या अनेक महानगरांतही त्यांचं नेतृत्व आणि त्यांचा पक्ष कधी सामर्थ्यानं उभा राहिलाय हे दिसलं नाही. ग्रामीण महाराष्ट्रातलं विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन प्रांतापुरतं हे मर्यादित नेतृत्व आहे. 10 जून 1999 ला शरद पवारांनी काँग्रेसमधील असंतुष्ठांचा एक वेगळा गट निर्माण केला आणि त्याला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असं व्यापक नाव दिलं. त्याचा राष्ट्रीय दर्जा टिकवण्यासाठी अनेक खटपटी-लटपटी करून इतर प्रांतात काही मतं मिळवण्यात ते यशस्वी झाले. सुरूवातीच्या काळात पी. ए. संगमा यांच्या सारख्या अमराठी भागातील नेत्यांनीही त्यासाठी त्यांना साथ दिली. मात्र हा करिष्मा ते कधीही निर्माण करू शकले नाहीत, टिकवू शकले नाहीत.

शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वात एक चातुर्य आहे. खरंतर ‘चातुर्य’ हा शब्द समर्थ रामदास स्वामींनी वेगळ्या अर्थांनी वापरलाय. त्यामुळं आपण याला चातुर्य नाही तर आजच्या विरोधकांच्या भाषेत लबाडी म्हणूया, खोटारडेपणा म्हणूया! या लबाडीच्या बळावर त्यांनी कायम पाच-पन्नास आमदार निवडून आणले आणि त्या बळावरच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपली नसलेली प्रतिमा निर्माण केली. प्रत्येक विषयात स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यात ते माहीर आहेत. 2014 ला त्यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसचा महाराष्ट्रात संपूर्ण पराभव झाला. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. इतके आमदार निवडून येऊनही तेव्हा भाजपची चर्चा झाली नाही, शिवसेनेची चर्चा झाली नाही, काँग्रेसची तर नाहीच नाही. कुठल्याही अटी आणि शर्थीशिवाय शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्यासाठी बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्या पवारांच्या निर्णयाचीच सगळीकडं जोरदार चर्चा झाली. कामय चर्चेत कसं रहायचं आणि सगळी चर्चा आपल्याभोवतीच कशी फिरवायची हे वयाच्या ऐंशीव्या वर्षीही पवारांना जसं जमतं तसं अन्य कुणालाच जमत नाही. अशा पद्धतीनं सतत चर्चेत राहून त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला.

त्यांच्या राजकारणातला घराणेशाहीचा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवार हे त्यांच्या घराण्यातून पुढं आलेले नेते आहेत. यांचा वकुब, यांची ताकद, यांची क्षमता आणि शरद पवारांची क्षमता याचा विचार केल्यास यातला कोणीही लोकनेता नाही किंवा कुणाला सामाजिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नांची काही जाण नाही. यातला कोणीही पवारानंतर फार मोठं राजकारण करून त्यांच्याप्रमाणे राजकारणात फार काळ टिकू शकेल अशी तीळमात्रही शक्यता नाही.
 

विनोद पंचभाई यांचे 'मेवाडनरेश महाराणा प्रताप' हे पुस्तक घरपोच मागवा
 

शरद पवारांनी त्यांचं राजकारण करताना काँग्रेसमधील आयात नेते उचचले. त्यांनी स्वतः किती नेते तयार केले? असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर कुणालाही देता येणार नाही. आर. आर. पाटील यांचा अपवाद वगळला तर पवारांनी प्रस्थापित राजकीय घराण्यातील मुलंच नेते म्हणून पुढं आणले. राजेश टोपे, तनपुरे, जयंत पाटील, वळसे पाटील असे सगळे नेते पाहता त्या प्रत्येकांची राजकीय पार्श्वभूमी आहे. पवार नेहमी म्हणतात की ‘महाराष्ट्रात नवं नेतृत्व निर्माण करणार, युवकांना संधी देणार...’ मात्र हे काम त्यांना आजपर्यंत करता आलं नाही. एखाद्या सामान्य कुटुंबातून आलेला आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेला नेता पवारांनी मोठ्या पदावर बसवलाय असं आर. आर. आबांचा अपवाद वगळता दिसत नाही.

उलट हे काम बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवलं. भायखळ्यात भाजीपाला विकणार्‍या छगन भुजबळ यांना त्यांनी मुंबईचा महापौर केलं. कुठंतरी एखादी ‘कोहिनूर’सारखी छोटी इन्स्टिट्यूट चालवणार्‍या मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं, सभापती केलं. नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं. सामान्य कुटुंबातून आलेल्या अशा सामान्य मुलांना ताकद देऊन त्यांना एक राजकीय शक्ती बनवण्याची अशी जी ताकद बाळासाहेबांकडे होती ती पवारांकडे नाही. पवारांनी तयार केलेले असे राजकारणी कोण? याचं उत्तर मिळायला हवं. ज्याला राजकीय पार्श्वभूमी आहे अशा कुटुंबातली चार मुलं सोबत घ्यायची आणि राजकारण करायचं हा काही फार मोठा पराक्रम नाही.

शरद पवारांच्या भोवती कधी चांगले लोक जमलेत असंही चित्र नाही. चांगली टीम गोळा करायची, त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्यायचं हे त्यांना कधीच साधलं नाही. महाराष्ट्रात पुलोद आघाडीचा प्रयोग त्यांनी केला. संपूर्ण वेगळी विचारधारा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घ्यायला ते कचरले नाहीत. पवारांची नेमकी विचारधारा कोणती? स्वार्थ आणि स्वतःला काय मिळेल, जास्तीत जास्त कसं मिळेल यासाठी वाट्टेल ते करणं हीच त्यांची विचारधारा! त्यांचा विचार कुठला? गांधी-नेहरूंचा विचार की आणखी कोणाचा विचार? आपल्याला जिथून आणि जे काही ओरबडा येईल तीच त्यांची स्वतःची विचारधारा!
 
शरद पवारांचं सार्वजनिक जीवनातलं कार्य काय? साठ वर्षे ते महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. या साठ वर्षात त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी काय केलं? त्यांच्या हातात इथली साखर कारखानदारी आली. त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी ती खिळखिळी केली आणि सहकारी साखर कारखाने मोडकळीला आणून ते विकत घेतले. साखर कारखाने चालवणार्‍या त्यांच्याच टग्यांनी ते कवडीमोल भावात विकत घेतले. साखर कारखानदारी टिकवली नाही, सहकार टिकवला नाही. सगळे धनदांडगे आणि टगे त्यांच्या सोबत असतात आणि ते सगळे मिळून नफेखोरी करत असतात.

आता नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील गेल्या आठ वर्षांतील संबंधाकडं पाहूया. हे दोन्ही नेते निवडणुकींचा अपवाद वगळता शक्यतो एकमेकांवर टीका करत नाहीत. आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटीनंतर नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली त्यावर जगभरातील प्रसारमाध्यमं टिकेचा आसूड ओढत आहेत. सामान्य माणसाची वाताहत होऊन देश म्हणजेच एक स्मशानभूमी होत असतानाही पवारांनी मोदींवर काहीच टीका केली नाही, भूमिका घेतली नाही. जेव्हा तिबेटमध्ये चीननं भारतीय भूमिवर अतिक्रमण केलं आणि भारताचा काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला तेव्हाही पवार शांतच होते. चीननं नेमकं काय केलंय हे नेमकं पवारांनाच चांगलं माहीत आहे. हे आकलन त्यांना असण्याचं कारण म्हणजे ते देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांनीही त्यावेळी सुनावलं होतं की ‘चीन तो चीन है, लेकिन हम प्राचीन है.’ तिबेट, लद्दाखमधले अनेक स्थानिक मोदींवर चिडलेले असतानाही त्यांना विरोध करणार्‍या पवारांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. भारताचे माजी संरक्षण मंत्री असलेले पवार यावर काहीतरी बोलतील  आणि देशहीताची भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र पवारांनी सांगितलं, ‘अडचणीचा प्रसंग आहे, अडचणीची वेळ आहे, कठीण काळ आहे, आपण देश म्हणून मोदींच्या पाठिशी उभं रहायला हवं.’ म्हणजे नेमकं काय करायचं साहेब? तुमच्या राजकारणापोटी देशाची वाट लागत असताना आम्ही सामान्य माणसांनी फक्त बघत बसायचं? मोदींना अडचणीत आणायचं नाही आणि प्रसंगी स्वतःची ‘व्होट बँक’ सांभाळायची हेच तर शरद पवार करत आहेत. त्यामुळे मोदीही पवारांवर कधीच काही बोलत नाहीत. पवारांचे मतदार मोदींकडे जात नाहीत आणि मोदींचे मतदार पवारांना कधीही जवळ करू इच्छित नाहीत. त्यामुळे हे दोन्ही नेते परस्सरपूरक भूमिका घेतात. याला साधनशुचिता म्हणत नाहीत.
 

वैद्य ज्योति शिरोडकर यांचे 'आरोग्य तरंग' हे पुस्तक घरपोच मागवा
 

पवारांची विश्वासार्हता हा सदैव चर्चेचा भाग राहिला आहे. पवारांनी काँग्रेस फोडून पुलोद सरकार स्थापन केलं. ते असं वागतील असं वसंतदादा पाटील यांना कधीच वाटलं नव्हतं. वसंतदादा म्हणजे कृष्णाकाठचा काळ्या मातीचा रांगडा शिपाई होता. त्यांनी जर ‘शरद काय करतोय?’ म्हणून अन्य नेत्यांप्रमाणे पवारांचे फोन ट्रॅप केले असते तर त्यांना हे सूडाचं राजकारण कळलं असतं! पण दादांचा त्यांच्या शरदवर विश्वास होता. त्यामुळं त्यांच्याकडून हताश उद्गार काढले गेले की, ‘शरदनं माझ्या पाठीत खंजीर खुपसला!’ शरद असं करणार नाही, असा त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणजे ज्युलियस सीझरच्या बाबत जो प्रकार केला गेला आणि त्यानं ‘यू टू ब्रूटस्?’ असे उद्गार काढले तीच अवस्था वसंतदादांची होती. ज्युलियस सीझर वेगळं वाक्य बोलला, वसंतदादा वेगळं वाक्य बोलले पण दोघांच्याही वाक्यातला सारांश एकच होता. दादांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, ‘शरदनं माझ्या पाठीत खंजीर खुपसला...’ त्यानंतर पवारांची विश्वासार्हता जी लयाला गेली ती अजूनही त्यांना मिळवता आली नाही.

सीतारामचाचा केसरी असताना पवारांनी सोनियाबाईंना राजकारणात यायला भाग पाडलं. त्यांच्या घरी जाऊन ‘तुम्ही राजकारणात आलंच पाहिजे’ असं सांगणं आणि त्यांना राष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करणं हे काम पवारांनी केलं. त्याच सोनिया गांधीच्या विरूद्ध ‘परदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ म्हणत त्यांनी दंड थोपटले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ‘परदेशी बाई देशाच्या सर्वोच्चपदी नको’ असं म्हणत बाहेर पडलेल्या पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि लगेचच महाराष्ट्रात त्यांच्यासोबत आघाडी करून सत्तेत सहभाग नोंदवला. हे सगळं पाहता पवारांच्या जगण्यात, वागण्यात कोणती नैतिकता दिसते? असं वागणं म्हणजेच राजकारण करणं अशी आजच्या अनेक नेत्यांची त्यामुळं समजूत झालीय. म्हणूनच अजित पवार यांच्यासारखे नेते कुणालाही काहीही न सांगता सकाळी सकाळी भाजपच्या बरोबरीनं सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडं पोहोचतात. हा सगळा पवारांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्याच संस्काराचा भाग आहे.
 
दुसर्‍यांचे पक्ष फोडणं आणि स्वतःची ताकद वाढवणं हा संस्कार शरद पवारांनी राजकारण्यांना दिला. छगन भुजबळांना पुढं करून पवारांनी पहिल्यांदा शिवसेनेला भगदाड पाडलं. भुजबळांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं काम काही सुधाकरराव नाईकांनी केलं नव्हतं. पक्ष फोडणं, घरं फोडणं, कुटुंबाकुटुंबात वाद लावणं असे प्रकार शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा केल्याचं दिसतं. त्यामागं त्यांचा स्वतःचा स्वार्थ सोडला तर कोणतीही विचारधारा, नैतिकता दिसत नाही. आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ते स्वतःचा पक्ष एकखांबी तंबुसारखा चालवतात. ते कोणालाही, कोणतीही संधी देत नाहीत. पक्षीय निर्णय घ्यायला, पक्षात अंतर्गत लोकशाही ठेवायला ते अजूनही तयार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परवडला. ते जाहीरपणे सांगतात की ‘आमच्याकडं हुकूमशाहीच आहे, आम्ही लोकशाही मानत नाही.’ त्याउलट ‘मी लोकशाहीचा उपासक आहे, लोकशाहीचा पूजारी आहे, संसदीय लोकशाहीत लोकशाही मार्गानं सलग निवडून आलोय’ असं एका बाजूला म्हणायचं आणि दुसरीकडं मात्र स्वतःच्या पक्षातही कोणतीही लोकशाही ठेवायची नाही, मी म्हणेन तेच आणि तसंच अशी भूमिका घेत स्वतःच्या पुतण्यालाही संधी द्यायची नाही हे त्यांनी दाखवून दिलं आहे. सगळी सत्ता स्वतःच्या हातात केंद्रीत ठेवायची, सगळे निर्णय स्वतःच घ्यायचे हा प्रकार शरद पवार पुन्हा पुन्हा करत असल्याचं दिसून येतं.
 
उद्योगपतींशी प्रेमाचे संबध ठेवायचे, त्यांच्याकडून पैसा मिळवायचा, त्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे, त्यांना फायदा करून द्यायचा ही गोष्ट राजकारण्यांना करावीच लागते. पवारांचे राज्यातल्या, देशातल्या आणि जगातल्या अनेक उद्योजकांशी घरोब्याचे संबंध आहेत. त्यांच्या मित्रांत सायरस पूनावाला हे नाव आत्ता सामान्य लोकांना कोरोना लसीमुळं माहीत झालंय. पूनावाला, राहुल बजाज अशा अनेकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. अशा अनेक उद्योजक कुटुंबीयांशी चांगले संबंध असताना ‘मी समाजवादी विचारसरणीचा आहे’ असं पवार एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान, पु. ल. देशपांडे अशा अनेकांना सहजी पटवून द्यायचे. या सगळ्यांच्या शरद पवार भविष्यात खूप चांगलं आणि मोठं काम करतील अशा अपेक्षा होत्या. पुलंसारखा लेखकही पवारांवर इतकं प्रेम करायचा. मात्र त्या सर्वांना महाराष्ट्राच्या विकासाचं जे काम अभिप्रेत होतं तसं पवारांनी काहीही केलेलं नाही हे आज दिसून येतंय.

पुणे आणि पिंपरी चिंचवडचा अपवाद वगळता महानगरांशी आपला काही संबंधच नाही, इथली लोकं आपल्याला थारा देणार नाहीत, आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रातच आपला पक्ष वाढवावा लागेल असा समज किंवा गैरसमज पवारांनी करून घेतलेला दिसतोय. महाराष्ट्राचे नेते, देशाचे नेते असा त्यांचा उल्लेख सतत होत असला तरी यात तथ्य नाही हे कुणाच्याही सहजी लक्षात येईल. पवारांचा प्रत्येक प्रश्न सोडविण्याचा वेगळा दृष्टीकोन असायचा. मराठवाड्यातल्या एका मोठ्या वर्गाला वाटायचं की आमच्या मराठवाड्याच्या नावानं विद्यापीठ आहे तर त्याची ओळख बदलू नका. आंबेडकरांच्या नावाबद्दल, त्यांच्या कर्तृृत्वाबद्दल आमच्या मनात शंका किंवा कसला वाद नाही. इथं आंबेडकरांचं मोठं स्मारक करा, त्यांच्या नावानं काही योजना सुरू करा पण विद्यापीठाचं नाव बदलू नका. त्यावेळच्या महाराष्ट्रातल्या सर्व दलित संघटनांचा मात्र एकच कार्यक्रम होता. तो म्हणजे, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव द्या. या सगळ्यातून नामांतराची चळवळ उभी राहिली. ती हिंसकही झाली. अनेक प्रकारचं राजकारण झालं. पवारांची कार्यपद्धती मात्र अशी की दोघांचंही थोडं थोडं समाधान करायचं. मग त्यांनी त्यावर तोडगा काढत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असं त्याचं नामांतर केलं. ही प्रश्न सोडवायची पद्धत नाही. एकतर उजव्यांची बाजू घ्या किंवा डाव्यांची बाजू घ्या. त्यातून प्रश्नांची उकल होत नाही. हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग असल्यामुळं अनेक मूळ प्रश्न त्यांच्याकडून कधीही सोडवले गेले नाहीत.


शिरीष देशमुख यांचे 'बारीकसारीक गोष्टी' हे पुस्तक घरपोच मागवा
 

याबाबत सध्याचं उदाहरण द्यायचं तर मराठा आरक्षण. अनेक वर्षे सत्तेत असताना, मराठा समाजातील मुलं गरिबीत, उपेक्षेत जगत असताना त्यांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी कधीच काही केलं नाही. 2014 च्या कालखंडात भाजप आणि शिवसेनेचं सरकार आल्यावर मात्र त्यांनी हा विषय सुरू केला. या काळात त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं, ताकद दिली. हे बळ देतानाच पवारांनी स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःभोवती जमवलेले छगन भुजबळ, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे असे नेते मराठा आरक्षणाबाबत अनुकूल नव्हते. पवारांचंही मतलबी मराठा प्रेम पाहता त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायची इच्छा कधीच नव्हती. शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणाची भूमिका घेतलेली असताना पवारांनी तेव्हाही त्यांना विरोध केला होता. पवारांनी मराठा आरक्षणाचा हा विषय फक्त चिघळत ठेवला.

शरद पवार श्रीमंत कोकाटे यांच्या एका पुस्तक प्रकाशनासाठी आले. त्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्व आंतरराष्ट्रीय कीर्तीचं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी मानवतेला दिलासा दिला. त्यामुळं संपूर्ण मानवतेसाठी महाराज आदर्श आहेत. असं देदीप्यमान व्यक्तिमत्त्व वादापासून दूर रहावं यासाठी पवारांसारख्या साहित्याची जाण असलेल्या, भरपूर वाचन आणि वाचनाची अत्यंत आवड असलेल्या नेत्यानं काम करणं अपेक्षित होतं. पवारांनी शिवचरित्राबाबत सुद्धा शक्य होतील तितके वाद जाणीवपूर्वक तयार केले. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली का? प्रा. न. र. फाटकांच्या मते त्यांच्यात एकमेकांशी काहीही संबंध नव्हता आणि आचार्य अत्र्यांचं मत आहे की महाराजांचे आणि समर्थांचे अत्यंत स्नेहाचे, प्रेमाचे संबंध होते, दोघांचं कार्य एकमेकांना पुरक होतं. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज वादातित व्यक्तिमत्त्व व्हावं यासाठी काहीही प्रयत्न न करता स्वतःचा मतदार तयार करण्यासाठी शिवचरित्राचा वापर पवार करत राहिले. ‘महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान - शरद पवार, शरद पवार’ अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची घोषणा होती. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज-शरद पवार’ अशीही त्यांची टॅगलाईन होती.

प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यासारखे त्यांचे निष्ठावान अनुयायी जे भाषण करायचे ते अनेकांनी ऐकलेलं असेल. ते म्हणायचे, ‘‘आग्य्राच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथं महाराजांचा अपमान झाला. महाराजांनी तिथं स्वाभिमानाचं दर्शन घडवलं आणि आग्य्राचा दरबार सोडला. आग्रा आणि दिल्लीचा दरबार महाराष्ट्राला कायम सापत्नभावाची वागणूक देतो. या वागणुकीच्या विरूद्ध शिवाजी महाराजांनंतर जर कोण ताठ मानेनं उभा राहिला असेल तर ते पवार साहेब आहेत.’’ त्यांच्या या विधानानंतर उपस्थित कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.
 

सुनील जवंजाळ यांची 'काळीजकाटा'ही कादंबरी घरपोच मागवा
 

शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ढोबळे भाषणं देत फिरायचे. सुधा नरवणे या निवेदक आकाशवाणीवरून बातम्या द्यायच्या. ‘आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातत्या देंत आहेत. जोपर्यंत राजीव गांधींचे पाय माझ्या हातात आहेंत तोपर्यंत महाराष्ट्रांला लाथा मारल्या तरीं चालतील, याचा मुख्यमंत्री शिवाजीरांव पाटील यांनीं पुनरूच्चार केंला...’ नरवणेंची अशी नक्कल ढोबळे कार्यक्रमातून करायचे आणि टाळ्या मिळवायचे. सुधा नरवणेच बोलत आहेत अशी हुबेहूब नक्कल लक्ष्मण ढोबळे यांची असायची. अशा भाषणातून पवार हा बुलंद आवाज आहे आणि तोच स्वाभिमान आहे असा भास सर्वत्र निर्माण करण्यात आला. पवारांना हा आभास सुद्धा जपता आला नाही, सांभाळता आला नाही.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, आत्मसन्मानासाठी शरद पवारांनी एस काँग्रेस काढलीय म्हणून पवारांभोवती गोळा झालेल्या तरूणांचा औरंगाबादला पवारांनी पुन्हा मूळ प्रवाहात प्रवेश केल्यावर भ्रमनिरास झाला. ‘मी बिरोबाची शपथ घेऊन सांगतो की मी भाजपध्ये जाणार नाही’ अशी घोषणा गोपीचंद पडळकर यांनी केली होती. पवारही म्हणाले होते की, ‘मी जर इंदिरा काँग्रेसमध्ये गेलो तर माझ्या तोंडाला डांबर फासा.’ पडळकर भाजपमध्ये आले आणि त्यावेळी पवार राजीव गांधींच्या उपस्थितीत इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या विचारधारांत फार काही फरक नाही. पडळकरांच्या मागं जनसमूदाय नव्हता आणि पवारांच्या मागं मोठ्या प्रमाणात जनसमूदाय आहे इतकाच फरक. त्यामुळं उलट पवारांनी त्यांच्या सोबतच्या जनसमूदायाची कायम मोठी फसवणूक केली. पडळकरांना ती तशी फसवणूक करता आली नाही. पवारांची विश्वासार्हता राहिली नाही ती त्यामुळं.
 
देशाच्या राजकारणात जेव्हा विश्वासार्हतेचा प्रश्न येतो तेव्हा पवारांची विश्वासार्हता कधीच कोणी मान्य करत नाही. त्यांची बांधीलकी नेमकी कोणाशी हेही कळत नाही. त्यांची ना उद्योगपतींशी बांधीलकी, ना शेतकर्‍यांशी, ना सामान्य माणसांशी. त्यांची बांधीलकी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आत्मकेंद्री आहे. माझ्याभोवतीच सगळं फिरलं पाहिजे या एकात्मवृत्तीशी त्यांची बांधीलकी आहे. पवारांकडून नवा महाराष्ट्र उभा राहिल म्हणून दलित, वंचित, उपेक्षित, बहुजन, ब्राह्मण समाजाचे अनेक लोक त्यांच्या बरोबर उभे राहिले. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले सेक्रेटरीही गुरूनाथ कुलकर्णी होते. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, पु. ल. देशपांडे, ग. प्र. प्रधान या सर्व प्रेमळ लोकांचा पवारांनी जसा भ्रमनिरास केला तसाच महाराष्ट्रातल्या पिढ्या न पिढ्यांचा भ्रमनिरास त्यांनी केला.

‘एकवेळ हिमालयात जाईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही’ अशी पवारांची त्यावेळची भाषणं आहेत. शिवसेना महाराष्ट्रात मोठी होण्यातही पवारांचा मोठा वाटा आहे. पवारांचं हे रंगबदलूपण त्यांच्यावर प्रेम करणार्‍या अनेक तरूणांना आवडलं नाही. त्यामुळं त्यातले अनेकजण शिवसेनेत गेले. इंदिरा काँग्रेसमध्ये न गेलेल्या या तरूणांच्या बळावर शिवसेना मुंबईतून मराठवाडा, विदर्भापर्यंत पोहोचली. या तरूणांना गोळा करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे गावोगाव फिरले नाहीत. मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान याच्याविषयी काही संकल्पना असलेल्या मराठी माणसाचा भ्रमनिरास पवारांकडून झाल्यानं तो शिवसेनेकडं वळला. पवारांविषयी ज्यांनी ज्यांनी काही अपेक्षा बाळगल्या त्या सर्वांना खड्ड्यात घालण्याचंच काम पवारांनी केलंय.
 
शेतकर्‍यांना ‘वीज बिलं भरू नका’ असं फडणवीस सरकारच्या काळात सांगणारे शरद पवार आता करोना काळात अनेक शेतकर्‍यांची शेतातली, घरातली कनेक्शन तोडली गेल्यावर मात्र मुगाचं आख्खं पोतं गिळून शांत बसलेत. याला काय म्हणावं? सत्तेत नसताना ते कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौर्‍यास गेले. त्यांनी लोकांना दिलं काहीच नाही पण त्यांचं सांत्वन केलं. त्यांना धीर दिला, आधार दिला. ते सत्तेत नसल्यानं त्यांनी काही द्यावं अशी अपेक्षाही नव्हती. आता त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी असताना गेल्या वर्षी नीलम चक्रीवादळ आणि यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आलं. तौक्तेनं जनजीवन विस्कळीत झालं. लोकांची वाताहत झाली पण या लोकांसाठी पवारांनी काहीही भरीव मदत केली नाही.

पर्यटनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र जगाच्या व्यासपीठावर आला असता. साठ वर्षे इथं राजकारण करत असताना आणि त्यातील बहुतेक काळ सत्तेत असतानाही पवारांनी त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील एका चित्ररूप पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यावेळी पवारांचा आणि राज ठाकरे यांचा संबंध आला. लगोलग राज ठाकरे बाळासाहेबांना सोडून गेले. पवारांशी संबंध आल्यानंतर माणसं अशी का वागतात? या प्रश्नाचं उत्तरही पवारांनी कधीतरी द्यायला हवं. माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले जाहीरपणानं म्हणाले होते, ‘‘शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या मराठा घराण्यात घराघरात भांडणं लावली. त्यांच्यात त्यांनी वाद निर्माण केले.’’ पवारांनी त्यांच्या या आक्षेपांनाही आजवर तरी उत्तर दिलं नाही.
 
‘लोक माझे सांगाती’ नावाचं एक आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. ज्या आठवणी शरद पवार इतर वेळी सुधीर गाडगीळांना त्यांच्या मुलाखतीत सांगतात, केशवराव धोंडग्यांच्या वाढदिवसाला बोलतात तेही त्यांच्या आत्मचरित्रात आलं नाही. पवारांच्या राजकारणाविषयी वसंत साठे यांनी जे लिहून ठेवलंय ते वाचायला हवं म्हणजे पवार किती खूनशी राजकारणी आहेत ते ध्यानात येईल.

वसंत साठे लिहितात, मी यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात महाराष्ट्रात राजकारण सुरू केलं. त्यांचा मी कडवा विरोधक होतो. यशवंतराव मला विदर्भातून कधीही तिकिट द्यायचे नाहीत. महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आली की ते माझं तिकिट कापायचे आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणायचे, ‘‘वसंता, केंद्राच्या राजकारणात तुझा मोठा उपयोग होईल असं मला वाटतंय. त्यामुळं तुला मी केंद्रात पाठवायचा विचार करतोय.’’ केंंद्रीय राजकारणात लोकसभेच्या निवडणुका लागल्या की ते परत खांद्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे, ‘‘वसंता, मला असं वाटतंय की राज्याला तुझी सर्वाधिक गरज आहे.’’
 
वसंत साठे तरीही राजकारणात सक्रिय राहिले. ते इंदिरा गांधींच्या इतक्या जवळ गेले की अणीबाणीच्या काळात सर्वात महत्त्वाचं माहिती आणि नभोवाणी खातं वसंत साठे यांच्याकडं होतं. वसंत साठे वर्धा मतदार संघाचं नेतृत्व करायचे. त्यांनी लिहिलं, ‘‘यशवंतरावांनी मला त्रास दिला, माझ्याविरूद्ध कारवाया केल्या. अनेकदा मला तोंडघशी पाडलं परंतु मी यशवंतराव चव्हाण यांच्या विरूद्ध राजकारण करतच होतो त्यामुळं त्यांनी हा प्रकार केला तरी मला त्याचा त्रास झाला नाही किंवा वाईट वाटलं नाही. मी त्यांचा राजकीय विरोधक होतो. शरद पवार या व्यक्तिशी मात्र माझा कसलाही संबंध नव्हता. या माणसाच्या डोक्यात एकच होतं की मी यशवंतराव चव्हाण यांना त्रास दिला! म्हणून हा माणूस माझ्याशी खूनशीपणानं वागला. लोकसभेच्या निवडुकीवेळी माझी तब्येत खराब होती. त्यावेळी वर्धा मतदार संघातून मला तिकिट द्या म्हणून पवारांनी राजीवजींकडे आग्रह धरला आणि राजीव गांधी यांनी वर्ध्यातून मला तिकिट दिलं. मी जेव्हापासून राजकारण करतोय तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत मी निवडून आलोय. नंतर शरद पवार आणि त्यांना मानणार्‍या सर्वांनी माझ्या विरूद्ध जोरदार प्रचाराला सुरूवात केली. पवारांनी माझ्या मतदार संघात येऊन सभा घेतली पण भाषण एक करायचे आणि रात्री गेस्ट होऊसला बसून दुसराच उद्योग करायचे. वर्धा मतदार संघासाठी राजीवजींची सभा लावली. त्या सभेला नागपूरवरून राजीवजींना आणायचं होतं. दुपारी बाराची सभा होती. पवारांनी त्यांना परस्सर अमरावतीला नेलं. सकाळी दहा पासून लोक सभेत राजीवजींची वाट बघत बसले होते. आधी अमरावती उरकू म्हणून पवारांनी राजीवजींना नेलं आणि संध्याकाळी सहा वाजता ते त्यांना घेऊन सभेला आले. त्यात त्यांनी माझी वाट लावली आणि एकही संसदीय निवडणूक न पडणारा मी पहिल्यांदा पराभूत झालो. त्यानंतर  दीड वर्षांनी पुन्हा सगळे संदर्भ बदलले. पंतप्रधान बदलले. निवडणुका लागल्या. त्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्यावर पवारांनी स्वतः राजीव गांधींना सांगितलं की, ‘‘साठे साहेबांच्या बाबतीत माझ्याकडून चूक झालीय. ती चूक मला दुरूस्त करायचीय. ती संधी मला द्या.’’ मी थक्क होऊन या माणसाकडं बघत बसलो. राजीव गांधी माझ्यावरील प्रेमानं म्हणाले, ‘‘या माणसाला या वयात पुन्हा उभं करून पराभवाला सामोरं जायला लावणं योग्य नाही.’’ त्यावर पवार म्हणाले, ‘‘त्यांना निवडून आणणं ही माझी जबाबदारी.’’ त्यानंतर मला तिकिट दिलं गेलं. पुन्हा मागचीच पुनरावृत्ती झाली. झाडून सगळ्यांनी माझ्या विरूद्ध काम केलं. राजीव गांधी बॉम्बस्फोटात गेल्यावर तर पवारांनी कशाचीच भीती राहिली नाही. त्यांनी पुन्हा मला पाडलं.’’

पुन्हा नरसिंहराव पंतप्रधान असताना चाचा केसरीकडं पवारांनी आग्रह धरला की ‘‘साठेसाहेबांना संधी द्या, मी निवडून आणतो.’’ त्यावेळी वसंतराव साठे शब्दशः या सगळ्यांपासून पळून गेले. ही अतिखूनशीपणानं वागण्याची शरद पवारांची सवय आहे. त्याचा अनुभव अनेकांनी वेळोवेळी घेतलाय. वसंत साठे, बाळासाहेब विखे पाटील, शालिनीताई पाटील, बाबासाहेब भोसले अशा अनेकांनी हा अनुभव घेतलाय. शालिनीताईंनी वसंतदादांच्या पत्नी म्हणून यशंवतराव चव्हाण यांच्याविरूद्ध विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत दीड-दोन लाख मतांनी शालिनीताईंचा पराभव झाला परंतु त्या सातारा मतदारसंघात आल्या आणि त्यांनी अतिशय अर्वाच्य टीका यशवंतरावांवर केली. ज्यांनी ज्यांनी यशवंतरावांना त्रास दिला अशी माणसं हुडकून काढून त्यांना आयुष्यात उठवण्याचा खेळ पवारांनी केला.

यशवंतरावांच्या अनुयायांना आणि पवारांच्या अनुयायांना याचा आनंद वाटतो. मात्र ही काही फार मोठी अभिमान वाटावी अशी गोष्ट नाही. अजितदादांनी शालिनीताईंना हाताशी धरून कोरेगावमधून उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या. त्यांना मंत्रीमंडळात वगैरे काही स्थान मिळालं नाही. यशवंतराव चव्हाण त्यांना जी शिक्षा त्यांच्या हयातीत देऊ शकले नाहीत ती शिक्षा पवारांनी त्यांना दिली. आपल्या विरोधकांशी अत्यंत वाईट पातळीवर, शक्य तितक्या खालच्या पातळीवर जाऊन अतिशय साळसूदपणानं त्यांना त्रास द्यायचा ही एक वेगळी परंपरा पवारांनी राजकारणात सुरू केली.
 
यशवंतराव चव्हाण यांनी आणखी एक गोष्ट केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातून राजघराणी त्यांनी बाजूला टाकली होती. राजघराणी बाजूला सारून सामान्य माणसाच्या हातात सत्ता देण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. आपल्या राजकीय विरोधकांना शह देण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी या राजघराण्यांचं पुनरूज्जीवन शरद पवारांनी केलं. यशवंतराव चव्हाण राजघराण्यातल्या लोकांना निवडणुकीचं तिकिटही देत नसत. ‘राजगाद्या फाटल्यात’ असं यशवंतराव चव्हाण खासगीत म्हणायचे. शरद पवारांनी तोही प्रकार केला. स्वतःच्या राजकारणासाठी, स्वार्थासाठी, कुरघोड्या करण्यासाठी आणि दुसर्‍यांवर मात करण्यासाठी कसल्याही साधनशुचितेचा विचार न करता शरद पवारांनी त्रास दिला. आत्ताच्या निवडणुकीतीलही त्यांची भाषा बघा. ‘अजून लई लोकं घरी बसवायचीत...’ असं ते म्हणत. पवारांना लोकांना घरी बसवण्याची मोठी खुमखुमी. नवं नेतृत्व नाही, चांगले वक्ते तयार केले नाहीत, पक्षांतर्गत पातळीवर आपल्यापेक्षा मोठा नेता तयार होऊ नये याची पुरेेपूर काळजी त्यांनी घेतली. 


ज्योती भारती यांचा 'बोलावं म्हणतेय' हा कवितासंग्रह घरपोच मागवा
 

पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात बरीचशी साम्यस्थळे आहेत. आपल्यापेक्षा कुणीही मोठा नेता तयार होऊ नये असं यांना वाटत असावं. चांगले वक्ते तयार होण्यासाठी साध्या कार्यशाळाही या नेत्यांनी कधी घेतल्या नाहीत. तशा कार्यशाळा संघात होतात आणि वर्षानुवर्षे अनेक उत्तमोत्तम वक्ते त्यातून तयार होतात. असं काही पवारांनी किंवा ठाकरेंनी केलं नाही. आपण म्हणू तसंच पक्षात व्हायला हवं हे या दोन्ही मित्रांचं समान धोरण होतं. ‘मी सर्व संसदीय निवडणुका जिंकलेल्या आहेत, एकही निवडणूक हरलो नाही’ असा पवारांचा अहंकार आणि ‘संसदीय राजकारणापेक्षा मी मोठा आहे, मी कोणत्याही चिरकुटाला गादीवर बसवू शकतो’ असा बाळासाहेबांचा अहंकार हा कधीही लपून राहिलेला नाही.

आता माध्यमांवर मोदींनी वर्चस्व मिळवल्याचं सांगितलं जातं. मोदींनी माध्यमं ताब्यात घेतली म्हणून त्यांना उपहासानं ‘गोदी मीडिया’ही म्हटलं जातं. अशाच पद्धतीनं पवारांनी महाराष्ट्रातली माध्यमं तीस वर्षांपूर्वी खिशात टाकली होती. पवारांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले, ‘‘त्यावेळी मी एका वृत्तपत्रांसाठी व्यंगचित्रे काढायचो. माधव गडकरी हे संपादक होते. त्यांनी पूर्ण स्वतंत्र्य दिलं होतं की ‘हव्या त्या विषयावर व्यंगचित्रे काढ.’ मी दोन चित्रे पवारांवर काढली. ती अंकात लागली. तिसरंही व्यंगचित्र पवारांवरच काढलं. ते घेऊन गेल्यावर माधवराव गडकरींनी सांगितलं की, ‘‘बाबा रे, पवारांवरची व्यंगचित्रे थांबव. त्यांच्यावरची टीका आपल्याला नको.’’ त्याचवेळी, शरद पवार नावाचा एक अृदश्य हात सगळीकडं असतो याची मला जाणीव झाली!’’

माध्यमं मॅनेज करायची आणि आपल्याला जे हवं तेच आणि तसंच छापून आणायचं हा प्रकार पवारांनी अनेक वर्षे केला. या सगळ्या प्रकारांमुळं शरद पवार यांच्याभोवती गुंड, धनदांडगे, साधनशूचिता नसलेले लोकच गोळा झाले. नालायक लोक सांभाळायचे, त्यांच्याकडून आपल्या अडचणीच्या वेळी हवं ते काम करून घ्यायचं हा प्रकार त्यांनी केला. त्यांचं राजकरण बघतच अनेक नेते तयार झाले. आजच्या बरबटलेल्या परिस्थितीत आपण ते पाहतोच आहोत. आताच्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही पवारांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले. त्याचं त्यांना वाईट वाटणार नाही कारण या संस्कृतीचे जनकच ते आहेत. पवार यशवंतरावांना असेच सोडून गेले होते. सोनिया गांधी अडचणीत असताना त्यांनी असाच ठेंगा त्यांना दाखवला. अर्थात त्यावेळी त्यांनी स्वाभिमानानं काँग्रेस सोडली असंही नाही. या सगळ्या उचापत्या पाहून शरद पवारांची सोनिया गांधींनी पक्षातून हकालपट्टी केलीय हा इतिहास आहे.

सोनिया गांधी यांना काँग्रेस पक्षात आणताना, त्या काँग्रेसच्या अध्यक्षा होताना त्या परदेशी आहेत हे पवारांना माहीत नव्हतं का? मग याच मुद्यावरून राष्ट्रवादीचा एक वेगळा गट स्थापन करण्याचा त्यांना कोणता नैतिक अधिकार उरतो? उलट ज्या महिलेला त्यांनी देशाच्या राजकारणात आणलंय तिच्या पाठिशी त्यांनी खंबीरपणे उभं राहणं अपेक्षित होतं. तसं झालं असतं तर सरदार मनमोहन सिंगाच्या ऐवजी शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते. अप्रामाणिक वर्तनामुळं त्यांना देशाचं सर्वोच्च पद कधीच मिळू शकलं नाही. त्यांच्या निष्ठा बेगडी होत्या. यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, सोनिया गांधी या सर्वांशी त्यांनी गद्दारीच केली. स्वतःच्या स्वार्थावर सोडलं तर त्यांची बाकी कशावरच आणि कुणावरच निष्ठा नव्हती, नाही.

शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या लक्षात राहतील अशा कोणत्याही गोष्टी महाराष्ट्राला दिल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्यासाठी त्यांनी काही केलं नाही की महाराष्ट्राचा भविष्यकाळ घडविण्याचं व्हिजन त्यांनी कधी महाराष्ट्राला दिलं नाही. स्थानिक राजकारण, गावागावातील वाद यांची माहिती घेणं आणि त्याचा जास्तीतजास्त फायदा आपल्याला कसा होईल यासाठी प्रयत्न करत राहणं हेच त्यांनी केलं. इतकं करूनही सत्तर-पंचाहत्तर आमदाराच्या पुढं त्यांची कधी ताकद गेली नाही. पवार भारताचे पंतप्रधान व्हावेत असं त्यांच्या अनेक बगलबच्च्यांना वाटत होतं, अनेक मराठी माणसांचीही तशी इच्छा होती पण त्यासाठी लागणारं संख्याबळ त्यांना कधीच जमवता आलं नाही. 48 पैकी जेमतेम दहा खासदार निवडून आणणं हेही त्यांना साधलं नाही. या सगळ्या गोष्टीला त्यांची वर्तणुक आणि त्यांचं वागणं जबाबदार आहे.

सिंधू बॉर्डरवर असंख्य शेतकरी आंदोलनाला बसले पण त्यांच्याबाबत पवारांनी काहीच सक्रिय भूमिका घेतली नाही. यापूर्वीच्या कृषी कायद्याची सुरूवात कोणी केली याचा मागोवा घेताना त्यामागचा पवारांचा हात दिसून येतो. जे कृषी कायदे तयार केले गेले त्यामागची पार्श्वभूमी पवारांनी तयार केली होती. आपण शेतकर्‍यांचे नेते म्हणायचं आणि त्याचवेळी उद्योजकांच्या हिताचे निर्णय घ्यायचे हे पवारांनी केलं आहे. कलंकित माणसांना नेहमी आपल्या सोबत घ्यायचं, त्यांना उपकृत करायचं आणि आपल्याला जे हवं ते साध्य करायचं हा त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. हा अजेंडा त्यांनी वेळोवेळी राबवल्याचे दिसून येते. लाचारांच्या फौजा तयार करायच्या आणि त्यांचं नेतृत्व करायचं यातून एक सजग आणि चांगला समाज उभा राहत नाही. त्यातून उभी राहते ती अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी. यापेक्षा दुसरं यातून काहीच उभं राहत नाही.

घरकोंडीच्या काळात बारमालकांची वीज बिलं माफ करण्याची सूचना त्यांनी सरकारला केली. त्याचवेळी अजित पवार शेतकर्‍यांची वीज तोडत असतात. नेमका कोणता प्रकार आहे का?

 
किरण लोखंडे यांचे 'काळीज गोंदण' हे पुस्तक घरपोच मागवा
 

शरद पवारांनी त्यांच्या घरातली जी नवीन पिढी राजकारणात आणली त्या पिढीकडं ना वक्तृत्व आहे, ना कर्तृत्व आहे, ना कुठल्या जनसमूहाचं नेतृत्व करण्याची कुवत त्यांच्याकडं आहे. मागं एकदा राज ठाकरे अजित पवारांना उद्देशून म्हणाले होते की, ‘‘काकांचा हात डोक्यावर आहे म्हणून बाबा रे तुझं बरं चाललंय! एकदा तो हात निघाला तर पानटपरीवालाही तुला विचारणार नाही!’’ अजित पवारांना इतकं पांगळं करून ठेवण्याचं काम शरद पवारांनी केलंय. केंद्र, केंद्रातलं राजकारण, तिथले नेते, तिथली संस्कृती या कशाचीही आणि कसलीही माहिती अजित पवारांना नाही. अशा परिस्थितीत शरद पवार सोडून त्यांचा पक्ष चालणं हे अत्यंत अवघड आहे. आपल्यानंतर आपला पक्ष मोठा व्हावा, माणसं टिकावीत आणि आपली जी काही विचारधारा आहे ती पुढं जावी यासाठी लढणार्‍या तरूणांची एक फळी तयार व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. पवारांनी असं काहीच केलं नाही. त्यांनी फक्त प्रस्थापितांना संधी दिली, त्यांनाच मोठं केलं.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यानं तर त्यांना सातत्यानं अत्यंतिक साथ दिली. या जिल्ह्यासाठी सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही. महाराष्ट्राची साखर कारखानदारी मोडून खायचा उद्योग यांनी केला. कर्जबाजारी होऊन बंद पडलेले साखर कारखाने आणि आज ते चालवणारे साखर कारखान्यांचे मालक हे बघितल्यावर याचा अंदाज कुणालाही येईल. म्हणून वाटतं की, शरद पवार हे अलीबाबा आहेत आणि अशा चाळीस चोरांची त्यांची टोळी आहे. सगळे मिळून महाराष्ट्राची यथेच्छ लूट करत आहेत. महाराष्ट्रातले जितके साखर कारखाने मोडकळीस आले, मोडीत निघाले ते कोणी चालवायला घेतले हे एकदा पडताळून बघा. मग हे पाप कोणी केलं ते कळेल.

महाराष्ट्रातल्या युवकांच्या तीन पिढ्या शरद पवार नावाच्या या नेत्यानं अक्षरशः बदबाद केल्या. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांना त्यांनी कायम नख लावलंय. मराठा आरक्षण असेल किंवा सामान्य शेतकर्‍यांच्या कल्याणाची, हिताची भूमिका असेल यातून हे दिसून येतं. बाकी सगळं सोडा पण फक्त पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा निपक्षपणे पाणी सोडण्याचं काम या लोकांनी केलं नाही. ज्याप्रमाणे बारामतीत मोठ्या प्रमाणात कालवे आहेत, बंदारे आहेत तसं त्यांच्या मतदार संघात इतर ठिकाणीही दिसत नाही. इंदापूर आणि भोर या त्यांच्या जवळील तालुक्यातही त्यांनी न्यायानं पाणी सोडलं नाही. ‘महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे’ असं म्हणणं वेगळं आणि त्यासाठी काही भरीव योगदान देणं वेगळं.

यशवंतराव चव्हाण यांनी मराठी साहित्य क्षेत्रात योगदान दिलं. अनेक साहित्यिकांवर त्यांनी प्रेम केलं. साहित्यात एक चांगलं वातावरण त्यांनी निर्माण केलं. विश्वकोश निर्मिती मंडळाची त्यांनी स्थापना केली. मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी त्यांचे काही प्रयत्न होते. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी पवारांनी काय केलंय? यशवंतरावांना ज्यांनी त्रास दिला त्यांना ‘चुन चुन के’ संपवताना त्यांच्या चार चांगल्या योजना, चांगले विचार तरी पुढे न्यावेत. या सगळ्याचा लेखाजोखा पवार समर्थकांनी मांडण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात दुर्दैवानं पवारांकडून काहीही झालं नाही. अनेकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होऊनही त्यांनी भाषेसाठी काही योगदान दिलं नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे प्रयत्न असताना पवारांचं स्वतःचं तिकडंही लक्ष दिसत नाही. उलट साहित्य क्षेत्रात त्यांनी घाणेरडं राजकारण आणलं. त्यांच्या पाठिंब्यामुळं गेल्या काही काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अतिशय सुमार अध्यक्ष मिळाले. 


सुधीर गाडगीळ यांचे 'मानाचे पान' हे पुस्तक घरपोच मागवा
 

गेल्या साठ वर्षांचा विचार करता पवारांच्या राजकारणातले सर्व प्रकारचे दोष ठळकपणे दिसून येतात. लबाड, स्वार्थी, घराणेशाही निर्माण करणारं हे नेतृत्व आहे. त्याहीपेक्षा ते स्वकेंद्रित आहेत. त्यांच्यातील जातियवाद आणि विशेषतः ब्राह्मणद्वेषही अनेकदा दिसून येतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची आणि पेशव्यांच्या गादीची आठवण काढणं, शेंडी-जाणव्याचा उल्लेख करणं, बाकी सोडा राजू शेट्टी यांच्यासाख्या शेतकरी नेत्यालाही जातीवरून बोलणं हे महाराष्ट्रानं बघितलं आहे, अनुभवलं आहे. जातीनिर्मुलनाची, जातिअंताची भाषा बोलणारे शरद पवार अत्यंत जातीवादी आहेत हे अनेकदा दिसून आलं आहे.

आज वयाच्या ऐंशीतही ते पक्षसंघटनेचं विकेंद्रिकरण करत नाहीत. राज्य सरकारवर स्वतःचं जास्तीत जास्त नियंत्रण रहावं यासाठी ते धडपडत असतात. भाषणं करणं, नकला करणं आणि लोकांना बोलून गप्प करणं म्हणजे राजकारण नाही. महाराष्ट्रातल्या गावागावांची इत्यंभूत माहिती असलेला हा माणूस. त्यांच्याकडून अनेकांच्या केवढ्या अपेक्षा होत्या! सामान्य माणसांच्या अपेक्षांच्या लाटांवर स्वार झालेल्या या नेत्यानं चाळीस चोरांची एक टोळी तयार केली. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची मोठी लूट सुरू आहे. एकीकडं कमालीचा स्वार्थ, दुसरीकडं विलक्षण अहंकार, तिसरीकडं स्वतःचा मतदारसंघ आणि पक्षाचा मतदार सतत ‘प्रोटक्ट’ करण्याची अतियश केविलवाणी धडपड असंच पवारांच्या राजकारणाचं एकंदरीत स्वरूप राहिलेलं आहे.

सिस्टिम मॅनेज करणं आणि ती स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणं हा प्रकार महाराष्ट्रात पवारांनी वेळोवेळी केला. महाराष्ट्रात मोठे उद्योगधंदे यावेत यासाठी त्यांच्या राजकारणाचा उपयोग झाला नाही. आपल्या शेतकर्‍यांची अवस्था सुधारली नाही. कांद्याच्या दरासाठी शेतकर्‍यांना आजही आंदोलन करावं लागतं आणि अडचणीचे कृषी कायदे रद्द करा म्हणून त्यांना उपोषणाला बसावं लागतं. कापसाला, तूर डाळीला हमीभाव मिळावा म्हणून अजूनही शेतकर्‍याला रस्त्यावर यावं लागतं. शेतकर्‍याला पुरेशी वीज मिळत नाही, त्याची बीलं भरणं परवडत नाही. या सगळ्यांसाठी पवार नेमकं करतात तरी काय?

यशवंतराव चव्हाण यांच्याकडं एक विचार होता, एक संस्कार होता. त्यांचं ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र वाचताना त्यातला निरलसपणा, त्यांचा प्रामाणिकपणा मनावर बिंबतो. ‘लोक माझे सांगाती’ वाचताना पवारांच्या अशा असंख्य उठाठेवीच डोळ्यासमोर येतात. सध्या मराठी माणूस जगाच्या कानाकोपर्‍यात दिसतो. अशा परिस्थितीत पवारांचं राजकारण, त्यांचा पक्ष याचं भवितव्य काय? याचा विचार केला तर स्वार्थापोटी एकत्र असलेल्या अलीबाबाचे आणि त्याच्यासोबतच्या चाळीस चोरांचे कारनामे दिसतात. निवडक टग्यांचे हितसंबंध साधण्यासाठी तयार झालेली ही टोळी आहे. आपल्या पक्षात माणूस आला की तो स्वच्छ होतो याचा पहिला डेमो पवारांनी दिलाय. भाजपची वॉशिंग मशिन पाहताना पवारांचे त्याआधीचे कारनामेही बघायला हवेत.
 

सदानंद भणगे यांची भयकादंबरी 'अमानवी विनवणी' घरपोच मागवा
 

समाजवादाची भाषा बोलणारा, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारा, शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि तिथं काहीही वावगं आम्ही सहन करणार नाही असं म्हणणारा, वैचारिक आधार असलेला नेता म्हणून लोक पवारांकडं बघायचे. भ्रष्ट, गुंड, लबाड लोकांना संरक्षण आणि अधिकाराची पदे देऊन पवारांनी हा विश्वास गमावला. सामान्य माणसाच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी करण्याचा प्रकारच शरद पवारांनी वर्षानुवर्षे केलेला आहे. लोकांकडून, जनतेकडून जे जे देणं शक्य आहे ते लोकांनी पवारांना दिलं. आता पवारांनी लोकांना नेमकं काय दिलं याचा लेखाजोखा त्यांनी पडताळून बघितला पाहिजे.

नव्या पिढीला, नव्या महाराष्ट्राला पवारांचा विचार कोणता ते कळायला हवं. शेतकर्‍यांशी, महाराष्ट्राशी, इतकंच काय स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशीही ते प्रामाणिक नाहीत. विचारधारांशी प्रामाणिक नाहीत किंवा ज्या समाजाचे नेते म्हणून ते राजकारण करतात त्या मराठा समाजाशीही ते प्रामाणिक नाहीत. कुणाशीही तडजोड करत सगळं ओरबाडून घेणं हाच त्यांचा विचार आहे. असल्या विचारधारेवर पक्ष फार काळ टिकत नाही. आजही शरद पवार सामाजिक-राजकीय जीवनात सक्रिय आहेत. त्यांची बुद्धी शाबूत आहे. त्यामुळं त्यांनी सिंहावलोकन करावं. महाराष्ट्रानं आपल्याला इतकं दिलेलं असताना आपण महाराष्ट्राला नेमकं काय दिलंय याची जाणीव मनात ठेऊन त्यांना अजूनही काही करावं वाटलं, महाराष्ट्रासाठी योगदान द्यावं वाटलं तर महाराष्ट्रावर ते मोठे उपकार ठरतील अन्यथा हा अलीबाबा आणि त्याची चाळीस चोरांची टोळी महाराष्ट्राला अजून खायीत घातल्याशिवाय राहणार नाही.
- घनश्याम पाटील
संस्थापक, संपादक ‘चपराक’, पुणे
7057292092

Monday, May 17, 2021

आश्वासक नेतृत्वाचा अकाली अंत


काँग्रेसच्या मुख्य प्रवाहाचा विचार करता पंडित नेहरू यांची काँग्रेस वेगळी होती. इंदिरा गांधी यांची काँग्रेस त्याहून वेगळी होती. इंदिराजींकडे देशाचं नेतृत्व आल्यावर त्यांनी स्वतःचे सल्लागार निर्माण केले. कार्यकर्त्यांची फळी तयार केली. त्या इंदिरा काँग्रेसमध्ये संजय गांधी यांचा हस्तक्षेप झाल्यावर त्यातून निर्माण झालेली काँग्रेस वेगळी होती. राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व आल्यावर जी काँग्रेस उभी राहिली तीही वेगळी होती. पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे या देशाचं नेतृत्व आल्यावर सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी शरद पवार, प्रणव मुखर्जी हे महत्त्वाचे नेते मूळ काँग्रेसमध्ये होते. ती काँग्रेस आणि त्या काँगे्रसची संस्कृती वेगळी होती. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना सोनियांच्या नेतृत्वात जी काँग्रेस होती ती या सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँगे्रसचं जे स्वरूप आहे ते निराळं आहे.

राहुल गांधी उघडपणे, आक्रमकपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करतात, तुटून पडतात. राहुल गांधींच्या या काँग्रेसचा सर्वात बिनीचा शिलेदार म्हणजे राजीव सातव होते. राहुल गांधी यांच्या अगदी जवळच्या सहकार्‍यांपैकी ते एक होते. नव्या पिढीतले आक्रमक नेते काँग्रेसमध्ये आणणे, त्यांना जबाबदारी देणे हे काम राहुल गांधींनी आठ-दहा वर्षांपूर्वी सुरू केले होते. राजीव सातव यांना जेव्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष केले गेले त्यावेळच्या मुलाखतीचा एक प्रसंग आहे. सोनिया गांधी या मुलाखती घेत होत्या. त्यांना विचारलं गेलं की, तुमच्या आवडीचा नेता कोणता? त्यावर सातवांनी क्षणाचाही विचार न करता सांगितलं की, माझा आवडता नेता शरद पवार. हे उत्तर खरेपणानं दिल्यानं आपली युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणार नाही असंच त्यांना वाटत होतं परंतु हा स्वतंत्र विचारांचा तरूण आहे, स्वतःशी प्रामाणिक असलेला तरूण आहे म्हणून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली.

राजीव सातव हे काँगे्रसच्या आजच्या पिढीचे नेते होते. त्यांचं वक्तृत्व, बारीक भिंगाचा चष्मा, आकर्षक व्यक्तिमत्त्व, शांत, संयमी आणि संयत नेतृत्व हे वेगळं होतं. त्यांच्या अनेक गोष्टी या जुन्या काँग्रसच्या परंपरेला न शोभणार्‍या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचं राज्य म्हणजे गुजरात. इथं भगदाड पाडायचं म्हणून काँग्रेसचे सर्वतोपरी प्रयत्न होते, अजूनही आहेत. या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी म्हणून काँग्रेसने ही जबाबदारी राजीव सातव यांच्याकडे दिली होती. इथं काँग्रेसनं ‘कम बँक’ करावं म्हणून राजीव सातव यांना पुढे केलं असेल तर त्यातच त्यांचं मोठेपण दिसून येतं. मागच्या विधानसभा निवडणुकीतही काँगे्रसनं गुजरातमध्ये चांगली कामगिरी पार पाडली. त्याचं श्रेय उत्तम व्यवस्थापन कौशल्य असलेल्या आणि सर्वांशी सुसंवादी असलेल्या राजीव सातव यांच्याकडं जातं. राजीव सातव हे राष्ट्रीय पातळीवर पोहचलेलं महाराष्ट्राचं, त्यातही मराठवाड्यातलं उमदं नेतृत्व होतं. राष्ट्रीय पातळीवर पोहोचणं तसं सोपं नसतं. वयाच्या साधारण साठीनंतर काहींना अशी संधी मिळते; मात्र राजीव सातवांनी वयाच्या चाळीशीतच दिल्लीत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण केला होता. काँग्रेसमध्ये भविष्य असलेला असा हा नेता होता. राजीव सातव यांच्या रूपानं मराठवाड्याला, महाराष्ट्राला दिल्लीत खूप मोठं स्थान मिळण्याची शक्यता होती. काँग्रेसच्या संस्कृतीला वेगळं वळण देणारा हा नेता होता. त्यांनी एकाचवेळी जनसामान्यांशी संपर्क ठेवणं आणि त्याचवेळी भारतातल्या काँग्रेस नेत्यांशी मैत्रीचे संबंध निर्माण करणं हे कौशल्य साधलं होतं. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ज्या भावना व्यक्त केल्या त्या पाहता त्यांचा संपर्क किती अफाट होता याची पुसटशी कल्पना येते.

पक्ष सोडून, राजकारण सोडून इतर पक्षांतल्या नेत्यांशी असे मैत्रीपूर्ण आणि घरोब्याचे संबंध असणारे जुन्या पिढीतले दोनच नेते आहेत. पहिले शरदराव पवार आणि दुसरे नितीन गडकरी. या दोघांनाच ही किमया साधली होती. नव्या पिढीत हे कसब ज्याला जमलं होतं ते म्हणजे राजीव सातव. अनेकांची मनं जिंकण्याचं मोठं काम त्यांनी केलं. काँग्रेसनं मतं जिंकली असती तर अनेकांची मनं जिंकणार्‍या या नेत्याला देशाच्या राजकारणात खूप मोठी संधी मिळाली असती हे निर्विवाद सत्य आहे. घरात राजकीय पार्श्वभूमी होती. त्याचा फायदा त्यांनी राजकारणात येण्यासाठी घेतला. सुरूवातीच्या काळात राजकारणात स्थिरावण्यासाठी तो फायदा झाला पण दिल्लीत जाऊन केंंद्रीय नेतृत्वाबरोबर भारतभर काम करणं आणि स्वतःची एक उदयोन्मुख नेता म्हणून प्रतिमा तयार करणं याच्यासाठी अंगात स्वकर्तृत्व असावं लागतं. ते त्यांच्याकडं होतं. आज कोराना काळात युवक काँगे्रसचा अध्यक्ष असलेला श्रीनिवास नावाचा कर्नाटकचा नेता ही राजीव सातव यांचीच देण आहे. एक विश्वासू आणि जिद्दीनं काम करणारा युवा नेता सातवांच्या नजरेस पडला आणि मग त्याला पुढे आणण्यासाठी राजीव सातव यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. उत्तरांचलला जेव्हा ढगफुटी झाली त्यावेळी फ्रंटवर लढण्याचं काम आणि खूप मोठी मदत करण्याचं काम काँग्रेसनं केलं त्याचं सगळं नेतृत्व राजीव सातव करत होते. हा एकाचवेळी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होता आणि दुसरीकडे निवडणुकांचं राजकारण करणारा नेताही होता. ही किमया खूप कमी लोकांना जमते. जे संघटनेत काम करतात ते निवडणुकीच्या राजकारणात मागं पडतात आणि जे निवडणुकीच्या राजकारणात माहीर असतात ते पक्ष संघटनेच्या कामात मागं पडतात. राजीव सातव यांना या दोन्ही गोष्टी उत्तमपणे साधल्या होत्या. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जी जी जबाबदारी टाकली ती प्रत्येक जबाबदारी लीलया पार पाडणारा असा हा नेता होता.

एका भाषणात नितीन गडकरी म्हणाले होते, राजकारणात ज्याचा उदय असतो त्याचा अस्त असतो आणि जिथं प्रकाश असतो तिथं अंधारही येतो, हे सर्व राजकीय पक्षांनी नेहमी लक्षात ठेवावं. गडकरींच्या या विधानाचा अर्थ इतकाच की प्रत्येकाला सत्तेत येण्याची आणि विरोधी पक्षात बसण्याचीही संधी मिळते. भविष्यात जेव्हा कधी काँगे्रस पक्ष सत्तेत येईल तेव्हा राजीव सातव यांची मोठी उणीव जाणवेल. या नेत्यानं महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व केलं असतं आणि देशाच्या राजकारणातही मोठं योगदान दिलं असतं. सातव यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यात नुतन मराठी विद्यालयात आणि पुढचं महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसनसारख्या महत्त्वाच्या कॉलेजमध्ये झालं. त्यामुळं त्यांच्यावर भाषिक संस्कार होते. हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या या नेत्यानं देशभर आपली वेगळी ओळख निर्माण केली. तरूणांचं संघटन केलं. आज त्यांच्या निधनानंतर काँगे्रस संस्कृतीला कट्टर विरोध करणारेही अनेकजण हळहळत आहेत हेच त्यांच्या नेतृत्वाचं मोठं यश आहे.

मराठवाड्यातले शिवराज पाटील चाकुरकर यांच्यासारखे अपवाद वगळता मराठवाड्यातल्या नेत्यांना दिल्ली धार्जिणी नाही असंही अनेकांना वाटतं. अंबेजोगाईच्या प्रमोद महाजन यांची कौटुंबीक कलहातून हत्या झाली. विलासराव देशमुख यांच्यासारखं नेतृत्व अचानक गेलं. गोपीनाथराव मुंडे गेले आणि आता राजीव सातव यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मराठवाड्यानं गमावला आहे. सातव यांचं असं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबीयांचं मोठं नुकसान आहे, काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान आहे, मात्र त्याहून मोठं नुकसान महाराष्ट्राचं आहे, मराठवाड्याचं आहे. असं नेतृत्व तयार होणं, ते राष्ट्रीय पातळीवर पुढे येणं हे सोपं नसतं. आजच्या बरबटलेल्या राजकारणाची पातळी पाहता या परंपरेत, या संस्कृतीत राजीव सातव कुठंही बसत नव्हते. या परिस्थितीत हा राजहंस वेगळेपणाने उठून दिसायचा. त्यामुळंच त्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाही आपण खूप काही गमावल्याची भावना आहे.
- घनश्याम पाटील
7057292092

दै. पुण्य नगरी, मंगळवार, दि. 18 मे 2021

Tuesday, May 11, 2021

सेवाकुंड धगधगत राहावे


भारतातल्या
लोकांनाच नव्हे तर विदेशातले जे दुतावास आहेत त्यांनाही ऑक्सिजन पुरवण्याचं काम भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांनी केलं. सरकार नसतानाही कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार करून लोकांना त्यांनी मदत केली. काम करणारे असे जे लोक जिथं कुठं आहेत ते आजच्या काळात अत्यंत कष्टानं काम करत आहेत. नाव, मोठेपणा या गोष्टी बाजूला सारून, झोकून देऊन काम करावं लागतं. ते श्रीनिवास आणि त्यांची टीम करतेय. दुर्दैवानं सध्या असे काही अपवाद वगळता सवर्र्च राजकीय पक्षात बोलके शंखच अधिक दिसतात.

सत्ता मिळवणं, सत्ता राबवणं ही गोष्ट वेगळी आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावत जाणं ही गोष्ट वेगळी. पूर्वी राष्ट्रसेवा दल होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या काही संघटना आहेत ज्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत सेवाधर्म म्हणून पुढे येतात. ज्यांच्या हृदयात सेवेच्या, त्यागाच्या संस्काराचे झरे पाझरताहेत त्यातले अनेकजण आजही रस्त्यावर उतरून काम करत आहेत तर काहीजण फक्त फोटो काढून घेऊन चमकोगिरी करण्यात मग्न आहेत. डिबेट करणं, समोरच्याला त्यात हरवणं, भाषणं देणं, सोशल मीडियावरून मतं मांडणं, नेत्यांच्या समर्थनार्थ हिरीरीनं उतरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं हेच अनेकांना सध्या मोठं सामाजिक काम वाटतंय. एखाद्याचा जीव वाचवण्यापेक्षा ‘हा आमचा’, ‘हा परिवारातला’ अशी भावना अनेक ठिकाणी दिसतेय.

राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असे सर्वच राजकीय पक्ष सांगतात. मात्र या जागतिक महामारीच्या काळात समाजकारण महत्त्वाचे म्हणणारे पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसतात. युवा काँग्रेस आणि महाराष्ट्रात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहेत. इतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षात तसं दिसत नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर खूप मोठा त्रागा आणि चीड दिसतेय. आम्ही काम करतोय तरी आम्हाला मतं मिळत नाहीत हे ते सातत्यानं बोलून दाखवत आहेत. ज्यांच्याकडं काहीच नाही आणि आता आपण काम केलं तरच लोक भविष्यात आपल्याला विचारतील असं ज्यांना वाटतं तेच काम करताना दिसत आहेत.

खरंतर काम करणार्‍या माणसाला पक्ष, बॅनर, पोस्टर हवे अशा सगळ्या अंधश्रद्धा आहेत हेही दिसून आले. ज्यांचा राजकीय विचार नाही असे असंख्य लोक करोनाच्या काळात सेवाकार्यात आघाडीवर दिसत आहेत. ते आपापल्या पद्धतीनं जनसेवा करताना दिसतात. राजकीय कार्यकर्त्यांपेक्षाही हे प्रमाण सध्याच्या काळात मोठे आहे ही सकारात्मक बाब आहे. कुणाचं तरी चांगलं व्हावं, दुसर्‍याला मदत व्हावी ही भावना अंतःकरणात ठेऊन असे अनेक दीप प्रज्वलीत झालेले दिसत आहेत. घरकोंडीच्या काळात घरोघरी जाऊन किराणा सामानाचे वाटप करणे, जे गरीब उपाशी राहत आहेत त्यांना खायला घालणे, वर्गच्या वर्ग अस्थिर होत असताना त्यांच्यासाठी काही नियोजन करणे असे अनेक ठिकाणी दिसून आले. महाराष्ट्रात राजकीय कार्यकर्ता ही संज्ञा मात्र नामशेष होताना दिसतेय. सामाजिक कार्यात सक्रिय झाल्यावर बहुतेकांना नेता व्हायची आस लागलेली दियतेय. मंदिरं उघडा म्हणून आपल्याकडं राजकारण्यांनी आंदोलनं केली. पांडुरंगाचं मंदिर उघडा ही मागणी करण्यात डॉ. प्रकाश आंबेडकरांनीही पुढाकार घेतला. ही सामोपचाराची भूमिका घ्यायची वेळ असतानाही राजकारण्यांनी आपापसातील संघर्ष सुरूच ठेवला. या बिकट परिस्थितीत राष्ट्रवादीने किंवा भाजपने पंढरपूरची जागा सोडून दिली असती तर असा काय फरक पडला असता? पण तिथंही कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे वेठीस धरलं गेलं. त्याचे परिणाम आता वाढत्या कोरोना रूग्णाच्या माध्यमातून दिसून येत आहेत. पश्चिम बंगाल असेल किंवा आपले पंढरपूर... निवडणुका घेतल्या गेल्या, प्रचंड गर्दी केली गेली आणि कोरोना वाढतोय म्हणून नंतर डांगोराही पिटला गेला.

निस्वार्थ काम करणारी तरूणाई प्रत्येक पिढीत असते. त्या तरूणाईला दिशा देणारे, त्यांना आदर्श वाटणारे नेते मात्र तयार होताना दिसत नाहीत. जर कोणी आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेला तर तो गद्दार आणि दुसर्‍या पक्षातून कोणी आपल्या पक्षात आला तर ते त्याचं हृदयपरिवर्तन असं वाटत असताना निष्ठावान कार्यकर्ते मिळणं कठीणच. आजचे राजकारण फक्त जात, धर्म, पैसा, अस्मिता या भोवती फिरताना दिसते. पुढची चार-दोन वर्षे या सगळ्याचे गंभीर परिणाम दिसून येणार आहेत. त्यासाठी यापुढे रस्त्यावर उतरून काम करणार्‍या लोकांची नितांत गरज आहे. ‘आपदा में अवसर’ म्हणतात तसं काम करणार्‍यांसाठी ही मोठी संधी आहे. ‘सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना ही संघ आहे आणि सैन्यापेक्षा मोठं काम आम्ही करतोय’ अशी मोहनराव भागवतांची समजूत असेल तर ते सिद्ध करण्याची हीच अचूक वेळ आहे. मास्क घालून रस्त्यावर उतरणं, ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देणं, लोकांना योग्य उपचार मिळवून द्यायचे प्रयत्न करणं, अंत्यसंस्कारासाठी मदत करणं, भुकेल्याच्या तोंडात चार घास कसे जातील हे पाहणं असं काम करणार्‍यांची आता गरज आहे.

प्रत्येक महाविद्यालयाच्या एनएसएस, एनसीसीच्या संघटना आहेत. विद्यार्थी परिषदा आहेत. या काळात प्रत्येक कॉलेजने किमान शंभर मुलं मदतीसाठी रस्त्यावर उतरवणं गरजेचं आहे. घराघरात जाऊन लोकांच्या कोरोना टेस्ट करून घेणं, रूग्णालयांकडून होणारी लूट थांबविण्यास मदत करणं अशी अनेक कामं ही तरूणाई करू शकेल. देश पेटलेला असताना त्यांच्या अडचणीच्या वेळी कोणीही मदतीसाठी नसणं ही सर्वांसाठीच धोक्याची सूचना आहे. ज्या ज्या संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांची फळी तयार आहे त्यांनी यावेळी मदतीसाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. भिडे गुरूजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांची फौज तयार आहे पण त्यांनी काम काय केलं? तर कोरोना होणारे जगायच्या लायकीचे नाहीत हे सांगितलं. या आणि अशा गोष्टी अनेकांच्या मनात दीर्घकाळ राहतील. सध्या प्रत्येक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवेत. आम्ही सुरूवात कुठून करावी, कुणापासून करावी, कशापासून करावी असा विचार करण्याइतकीही उसंत नाही. इतर वेळी हवं तेवढं राजकारण करा पण या काळात ज्या कुणाला, जी काही मदत करता येईल ती करा. भविष्यात ती तुमच्याच फायद्याची ठरणारी आहे. संकटाच्या काळात केलेली मदत सहसा कोणीही विसरत नाही.


सध्या एक पिढीच्या पिढी बाद होईल की काय अशी भयावह परिस्थिती आहे. या परिस्थितीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांची वाणवा नाही. त्यांना उभं करणं, दिशा देणं हे काम मात्र नेतृत्वाला करावं लागेल. महाराष्ट्र दिनानिमित्त, पक्षाच्या वर्धापनदिनामित्त, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा प्रसंगी फक्त ध्वजारोहण करणं म्हणजेच पक्षकार्य किंवा समाजकार्य आहे हा काही नेत्यांचा गैरसमजही दूर व्हायला हवा. फोटो काढणं आणि माध्यमांपर्यंत ते पोहोचवणं म्हणजेच समाजकार्य नाही.

कुंभमेळ्याची परिस्थिती पाहता इतक्या वषार्र्ंची परंपरा असलेल्या वारकर्‍यांपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. त्यांनी वारीचा हट्ट धरला नाही, दुराग्रह केला नाही, आडगेपणा केला नाही की आठशे वर्षांची परंपरा खंडित होतेय म्हणून प्रशासनाला त्रास दिला नाही. प्रत्येक वारकर्‍याच्या हृदयात अंतस्थपणे पांडुरंग वास करीत असतो हे त्यांच्या समजूतदारपणातून दिसून आले. या वारकर्‍यांच्या पायाचं तीर्थ कुंभमेळा घेणार्‍यांनी आणि त्यात सहभागी होणार्‍यांनी घ्यायला हवं. या वारकर्‍यांचीही महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. त्यांचीही मदत यावेळी समाजकार्यात प्रशासनाला घेता येईल.

एकतर प्रत्येकाच्या घरात दुःखद घटना घडताहेत. आप्त, हितचिंतक संकटात आहेत. तरीही न खचता लोक सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहेत. एकीकडे राजकीय व्यवस्थेचं अपयश अधोरेखित होत असतानाच दुसरीकडे सामान्य माणूस सेवाकार्यासाठी पुढे येतोय आणि हेच निकोप संस्कृतीचे लक्षण आहे.
- घनश्याम पाटील
7057292092
(लेखक अ. भा. मराठी नियतकालिक परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.)

दै. पुण्य नगरी, मंगळवार, 11 मे 2021


Monday, April 26, 2021

‘वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा’

- घनश्याम पाटील

संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

‘प्रेस फ्रिडम’च्या यादीत भारताचा दुर्दैवाने 142 वा क्रमांक आहे. 150 देशात भारतात कोणत्याही प्रकारचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, असा जागतिक अहवाल आहे. निर्भिड आणि निपक्षपणे लिहिणार्‍या पत्रकारांना ट्रोलर्स शिव्या देऊन गप्प बसवतात हे त्यात त्यांनी मांडलंय. भारतात लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे तो संध्याकाळी सातनंतर झुलायला लागतो. तो काँग्रेसच्या काळातही झुलत होता आणि भाजपच्या काळातही झुलतो आहे. आता तर तो नुसता झुलत नाही तर त्याचा झोपाळा झालाय.

आपल्याकडे इंदिराबाईंनी या देशावर अणीबाणी लादली. तशी अणीबाणी न जाहीर करताही सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. रायबरेलीत राजनारायण निवडून आले हे त्याकाळी जाहीर करण्यात आलं. न्यायमंडळावर ताबा घेणं हे इंदिराबाईंना आयुष्यात कधी जमलं नाही परंतु भारताची न्यायव्यवस्था सध्या राज्यकर्त्यांनी ताब्यात घेतली आहे असे स्पष्टपणे दिसून येते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगई निवृत्त झाल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभेवर घेतलं जातं. मग निस्पृह न्याययंत्रणा राहिली कुठे? अनेक आरोपी वर्षानुवर्षे तुरूंगात राहतात आणि अर्णब गोस्वामी मात्र पाच-सात दिवसात बाहेर येतो. रूटीन केसमध्ये एखाद्या आरोपीनं जामिनासाठी अर्ज केला असता तर तो न्यायाधीशांपर्यंत पोहोचायलाच महिना गेला असता. इथं मात्र अर्णबच्या अर्जावर आदेश येऊन तो आठवडाभराच्या आत बाहेरही येतो. न्यायदानाची ही प्रक्रिया न्यायमंडळ स्वतंत्र राहिलं नसल्याचं द्योतक आहे. हे सगळं पाहता आपली प्रसारमाध्यमंही राज्यकर्ते जे म्हणताहेत तेच बोलताहेत. माध्यमं आणि न्यायव्यवस्था ताब्यात राहणं, त्यांच्यावर अंकुश ठेवणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांना पूर्णपणे जमलेलं दिसतंय.

उदाहरण घ्यायचे तर फिल्डवरचे लोक सांगतात की ममता बॅनर्जी यांचं बहुमत कमी झालं तरी त्या पुन्हा सत्तेत येतील. मात्र आपल्या केंद्रीय नेतृत्वाचं ‘मायक्रो प्लॅनिंग’ सातत्यानं दिसून येतं. सभा घेतल्या, तिथं प्रचंड गर्दी जमवली. समाजमाध्यमातून बातम्या पसरवल्या. ‘ममता बॅनर्जी यांचा पराभव अटळ’ हे त्यातून मांडण्यात आलं. जिथं शंभर टक्के विजय ठरलेला असतो तिथं तो उमेदवार कसा पडणार याचे आडाखे बांधून ते लेख समाजमाध्यमाद्वारे जबरदस्त व्हायरल करण्यात आले. अशा पद्धतीनं वातावरणनिर्मिती करण्यात येते. निवडणुकीचं शेवटचं मतदान झालं की एक्झिट पोल येतात, तेही हवे तसे मॅनेज करण्यात येतात, तिथं सगळे अंदाज आपल्या बाजूनं दाखवतात, इव्हीएममध्ये छेडछाड केली जाते असे अनेक आरोप 2019च्या निवडणुकीत करण्यात आले.

महाराष्ट्रात मात्र एक गोष्ट कळत नाही. शिरूर मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झालाच कसा? अतिशय चांगलं काम होतं त्यांचं. इथून अमोल कोल्हे यांच्यासारखा कलाकार कसा निवडून आला? औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले. तिथून हा संदेश द्यायचा होता का की औरंगाबादमध्ये हिंदू मताचं विभाजन झालं तर एमआयएमचा उमेदवार निवडून येतो! स्वतःला हवे तसे निकाल मिळवायचे, हवी तशी सत्ता घ्यायची आणि ती सत्ताही सामान्याच्या हातात ठेवायची नाही असं काही घडतंय का? राहुल गांधी म्हणतात की दोन-तीन उद्योजकांनीच देश ताब्यात घेतलाय आणि ते देश लूटताहेत! सध्याची परिस्थिती पाहता ती गोष्ट अक्षरशः खरी वाटतेय.  

परदेशातले कलाकार इथल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात आणि इथले ट्रोलर त्यांच्यावर तुटून पडतात. त्याचं इतकं भयंकर स्वरूप असतं की जगभर असा संदेश जातो की इथल्या प्रश्नांवर बोलल्यानंतर इथले ट्रोलर संबंधितांची ससेहोलपट करतात. अनधिकृत ट्विटर हँडलाचा अभ्यास करणार्‍यांचा अधिकृत अंदाज असा आहे की पंतप्रधानांचे चाळीस टक्के फॉलोअर्स हे फेक आणि बोगस आहेत. पंतप्रधान जे धोरण राबवत आहेत त्याचेच अनुसरण थोड्याफार फरकाने महाराष्ट्राचे आणि इतर राज्याचे मुख्यमंत्री व इतर छोटे-मोठे नेते करत आहेत. ‘हे असंच करायचं असतं, यालाच राजकारण म्हणतात’ असा या सर्वांचा समज झालाय. मोदी आणि शहा यांच्याप्रमाणेच वागण्याचा सर्वांचा प्रयत्न दिसतोय. माध्यमांवर दबाव आणणे, कुणालाही न जुमानणे, धाकदडपशाही करणे हे सगळे त्यात ओघाने आलेच.

हिटलर असो, मुसोलिनी किंवा आणखी कोणी! हुकूमशाही फार काळ टिकत नाही हाच इथला इतिहास आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीही बोललं, लिहिलं तर त्याला वैयक्तिक पातळीवर शिवीगाळ केली जाते, काही वेळा मारहाणही केली जाते आणि त्याचं तोंड बंद केलं जातं. आपल्या हौसेचं मोल आपण आपल्या देशाला किती चुकवायला लावतोय हे या लोकांच्या अजून लक्षात येत नाहीये. राम मंदिर व्हावं असं या देशातल्या प्रत्येकाला वाटत होतं. अनेक कट्टर काँग्रेसवाल्यांच्याही त्या भावना होत्या. पवारांवर प्रेम करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांनाही तसं वाटायचं. त्यांनी विटा देण्यापासून पैसे देण्यापर्यंत सर्वकाही उत्फूर्तपणे केलं होतं. आजही या देशात अत्यंविधीच्या वेळी ‘राम नाम सत्य है’ म्हणतच त्याला उचललं जातं. राम हे सगळ्यांचंच दैवत आहे पण संघाच्या खांद्यावर बंदुक ठेवत मोदी आणि शहा यांनी जे ओरबाडलंय त्याची कशातच मोजदाद करता येणार नाही. त्याची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागतेय. अनेक माणसांची, संस्थांची सध्याच्या काळात प्रचंड ससेहोलपट झालीय. 370 कलम रद्द झाल्यावर काश्मीरचा प्रश्न सुटेल असं श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून सगळ्यांनाच वाटत होतं. राममंदिर, 370 कलम हे अस्मितेचे मुद्दे बनले. यात सामान्य माणसाच्या जगण्याचे आणि आता तर मरणाचेही मुद्दे मागे पडलेत. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याने तुम्ही पाकिस्तानातच्या हिंदुनांही नागरिकत्व दिलंत. आज हिंदुंना मात्र तुम्ही ना ऑक्सिजन देऊ शकताय, ना रेमडेसिव्हिर. अशी सत्ता फार उपयोगाची नाही. ती आणखी पाच-दहा वर्षे टिकवून ठेऊ शकाल. काळ आणि इतिहास मात्र तुम्हाला क्षमा करणार नाही.

रोज दोन हजार माणसं भारतात कोरोनामुळे मरताहेत. अनलॉक करताना भाजपच्या कुण्यातरी तुषार भोसलेने मंदीर उघडण्याची जोरदार मागणी केली होती. हा त्यांना धार्मिक अधिकार वाटत होता. मग मंदिरं उघडली. कुणीतरी सुप्रिया सुळे यांच्याकडं गेलं. नाभिकांची दुकानं उघडण्याची मागणी केली. कुणी राज ठाकरे यांच्याकडे गेलं आणि जिम उघडण्याची मागणी केली. लगेच संबधितांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून असे निर्णय घ्यायला भाग पाडलं. या सगळ्या उद्योगामुळं कोरोनो जो वाढलाय त्याची जबाबदारी घेऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये समक्ष जाऊन काम करताय का? रूग्णांच्या नातेवाईकांना तुम्ही जेवणाचे डबे पुरवत आहात का? एखाद्या कोविड युनिटमध्ये पीपीई किट घालून जात तुम्ही तुमच्या चाहत्या रूग्णांना गोळ्या देत आहात का? ज्यांचं यात निधन झालं त्यांच्या कुटुंबीयांसाठी तुम्ही काही करताय का? स्वतःच्या घरात सुरक्षित राहत कॉन्फरन्स कॉल करणं सोपं असतं भाऊ!

आजच्या घडीचे सर्वपक्षिय राजकारणी त्या योग्यतेचे नाहीत असंच म्हणावं लागेल. राज्यसत्तेला जेव्हा व्यभिचार करायचा असतो तेव्हा ती नित्यनव्या ओठांना स्पर्श करत असते आणि नित्य नव्या लोकांबरोबर शय्यासोबत करत असते. ‘वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा’ इतक्या स्पष्ट शब्दात भर्तृहरींनी याचं वर्णन केलंय. कधी खरं तर कधी खोटं बोलणारी, कधी कठोर तर कधी गोड बो
णारी, कधी हिंसक तर कधी दयाळूपणे वागणारी, कधी पैशाचा हव्यास बाळगणारी तर कधी उदारता दाखवणारी, कधी उधळपट्टी करणारी तर कधी कंजुषीत रमणारी अशी राजसत्ता ही वारांगनेसारखी म्हणजे वेश्येसारखी असते असं ते म्हणतात. आजची परिस्थिती पाहता त्याचीच प्रचिती देशवासियांना येत आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

दै. पुण्य नगरी, मंगळवार, 27 एप्रिल 2021

Monday, April 19, 2021

विधानपरिषद बरखास्त करा

 - घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक,’ पुणे
7057292092

दैनिक 'पुण्य नगरी' - मंगळवार, 20 एप्रिल 2021.

गेल्या वर्ष-दीड वर्षापासून महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे दिसून आले. आपली आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. अशावेळी राज्याला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चाललेला असताना खर्च कमी करणे आणि तो टाळणे गरजेचे आहे. हे करायचे तर एक उपाय ताबडतोब करता येईल, तो म्हणजे विधानपरिषद बरखास्त करणे.

तसाही आजवर विधानपरिषदेचा राज्याला काही उपयोग झालाय असे चित्र नाही. ‘तुम्हाला पाहिजे असेल तर विधानपरिषद स्थापन करा’ असे घटनेने सांगितले आहे. केंद्रात मात्र संसद तयार करतानाच लोकसभा आणि राज्यसभा तयार करण्यात आली. त्या पार्श्वभूमिवर निवडून आलेल्या विधानसभेच्या सदस्यांच्या प्रमाणात विधानपरिषद तयार केली गेली. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे 288 आमदार असल्याने विधानपरिषदेचे 78 आमदार निवडले जातात. दक्षिणेतल्या काही राज्यांनी आपल्या विधानपरिषदा रद्द करून त्यावरील खर्च वाचवलेला आहे. मग अशावेळी विधानपरिषद ठेवून आपण तरी काय करायचे?

काही भुरट्या आणि भामट्या असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी
आजवर विधानपरिषदेचा वापर केला आहे. सर्वच राजकीय नेत्यांना त्यांच्या पक्षातील पडके वाडे बांधण्यासाठीचा हा एक पर्याय झाला आहे. मग असली विधानपरिषद काय कामाची? ती नसलेलीच बरी. शशिकांत शिंदे विधानसभेत पडले मात्र पवार साहेबांचे त्यांच्यावर विशेष प्रेम असल्याने त्यांना विधानपरिषदेवर घेतले. एकनाथ खडसे पडले आणि आता त्यांना विधानपरिषदेवर घेण्याचे आमिष दाखवले गेले. कंगना रानौतला विरोध करण्यासाठी म्हणून उर्मिला मातोंडकर काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या. अमोल मिटकरीसारखे नौटंकी करणारे इथे आले. विधानपरिषद नसती तर चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात दिसलेच नसते. प्रवीण दरेकर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा दर्जा लक्षात घ्यायला एवढे एकच उदाहरण पुरेसे आहे.

वर्षानुवर्षे जे शिक्षक आमदार विधानपरिषदेवर येतात त्यांनी शिक्षकांसाठी नेमके काय केले? विधानपरिषदेचा महाराष्ट्राच्या राजकारणाला कसलाही उपयोग नाही, हे सत्य आपण स्वीकारायला हवे. विद्यार्थी परिषदेच्या मतांवर नितीन गडकरी सतत विधानपरिषदेवर निवडून आले. महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांचा काय फायदा झाला? विधानसभेवर निवडून येणारे अभ्यासू आहेत की नाही, तज्ज्ञ आहेत की नाही माहीत नाही पण ते कामे तरी करतात. लोकांतून थेट निवडून येतात. विधानपरिषदेवर कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, कायदा, संशोधन अशा क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्य जाणे अपेक्षित होते. मात्र सर्व पक्षांकडून राज्यपालांकडे जी यादी दिली जाते ती त्यांच्याकडे दावणीला बांधलेल्या लोकांचीच असते.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर कोट्यवधी रूपये खर्च होतात. ते पैसे वाचवून जनतेच्या कोणत्याही कामासाठी वापरले तरी चालतील. राज्यातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके मोफत द्या, शिवचरित्राचे मोफत वाटप करा, शेतकर्‍यांना-कामगारांना मदत करा परंतु हा अनाठायी खर्च टाळा. विधानपरिषेवर निवडून येणारे तरी कोण आहेत? एकूण एक धनदांडगे! पैसेवाल्यांना लोकशाहीचा खेळ करण्यासाठीच विधानपरिषदेवर पाठवले जाते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांची खरेदी-व्रिकी करणे सहज सोपे होते हे सत्य आहे. परत म्हणायचे, ते राज्याचे वरिष्ठ सभागृह आहे. तिथे नेमके काय केले जाते? तिथे खरेच कोणी तज्ज्ञ आहेत का?

शिक्षकांचे, पदवीधरांचे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी विधानपरिषदेवर घेतले जातात. इथे गेलेल्या शिक्षक आमदारांनी शिक्षकांसाठी नेमके काय केले? पदवीधरांच्या आमदारांनी काय केले? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांविषयी कधी कोणी आवाज उठवला का? स्थानिक स्वराज्य संस्था आणखी मोठ्या, कार्यक्षम, सक्षम व्हाव्यात यासाठी या आमदारांनी काय केले? मंगळसूत्र चोरणारा जर महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत असेल तर यापेक्षा त्या सभागृहाचे अवमूल्यन कोणते असेल? कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांना इथे घेतले गेले असावे? अजितदादांचे लांगूनचालन सोडले तर मिटकरींनी नेमके काय केले? मग जनतेच्या खिशातून या सदस्यांसाठी खर्च का केला जातो? त्यांच्या अधिवेशनाचा तरी नेमका लाभ काय होतो? या सदस्यांना गलेलठ्ठ पगार आणि पुन्हा निवृत्तीवेतन काय म्हणून दिले जाते? विधानसभेच्या एका साध्या ठरावाने विधानपरिषद रद्द करता येईल. ती ताबडतोब रद्द करणे गरजेचे आहे. भाजपच्या आमदारांनी ‘राष्ट्रहित सर्वतोपरी’ हे दाखवले पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘अशा कठीण प्रसंगात आम्ही खर्च करायला जरासुद्धा कचरलो नाही, घाबरलो नाही,’ हे दाखवून दिले पाहिजे. राज्यपालांनी बारा आमदारांच्या निवडीचे घोंगडे भिजते का ठेवले? असा प्रश्न विचारण्याऐवजी विधानपरिषदच बरखास्त करून टाका.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत कुणी पाच-दहा नामवंत लेखक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, कायदेतज्ज्ञ आहेत, संपादक आहेत असे काही आहे का? आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ इथे येऊन कायदे करण्यासाठी काही मदत करत आहेत असे दिसत नाही. मग हा यांच्यासाठी होणारा कोट्यवधी रूपयांचा खर्च म्हणजे इथल्या सामान्य माणसाच्या डोक्यावर लादलेले ओझेच आहे. विधानपरिषदेच्या माध्यमातून होणारा खर्च म्हणजे जनतेच्या खिशाला लावलेली कातरी आहे. अलीकडच्या काही वर्षाचे चित्र बघितले तर विधानपरिषदेच्या निवडणुका हा चेष्ठेचा भाग झालाय. या करोनाच्या काळात ही मंडळी नेमके काय करत आहेत? आपल्याला पदवीधरांचा प्रतिनिधी नेमका कशाला हवाय? विधानपरिषेदेत डॉक्टरांचा प्रतिनिधी आहे का? प्रसारमाध्यमांचा प्रतिनिधी आहे का? शेतकर्‍यांचा, शेतमजुरांचा, कष्टकर्‍यांचा प्रतिनिधी आहे का? वकीलांचा-लेखकांचा, व्यापार्‍यांचा-उद्योजकांचा प्रतिनिधी आहे का? मग हे ठराविक वर्गाचे प्रतिनिधी तिथे जाऊन नेमके करतात तरी काय? गावगाड्यात अनेकदा ‘ए मास्तर, तुला खूप कळतंय’ असे म्हणत शिक्षकांना बैठकीत बाजूला बसवले जाते. तशीच अवस्था आपल्या शिक्षक आमदारांची झालीय का? मग त्यांनी इथे यावे तरी का? अत्यंत स्वाभिमानशून्य आणि लाचार शिक्षक त्या त्या ठिकाणच्या पुढार्‍यांपुढे जो लाळघोटेपणा करताना दिसतात ते अत्यंत वाईट आहे.

महाराष्ट्राची विधानपरिषद कायदे करण्यात, राज्यासमोरील गंभीर संकटात काही करताना दिसते अशातला भाग नाही. एखादी महानगरपालिका त्या त्या शहरात चिमुकल्यांसाठी एखादे क्रीडांगण बांधून देते तसेच राजकारण्यांनी त्यांच्या पक्षातील धनदांडग्यांना आणि खूशम्हस्कर्‍यांना सामावून घेण्यासाठी या सभागृहाची तजबीज केलीय. बिनकामाचे राजकारणी किंवा समाजातील कुचकामे गर्भश्रीमंत यांची इथे वर्णी लावली जाते. त्यासाठी जनतेच्या खिशातला पैसा वापरला जातोय आणि अक्षरशः कोट्यवधी रूपयांचा अकारण चुराडा होतोय. जीएसटीचे पैसे केंद्राकडून थोडे उशिरा आले तरी राज्यातील कर्मचार्‍यांचा पगार करणे अवघड झालेय. शेतकर्‍यांना आपण मदत करू शकत नाही. राज्यातून जे सदस्य विधानसभेवर निवडून येतात तेही या पदवीधरांचे आणि या विधानपरिषदेच्या सदस्यांचेही प्रतिनिधित्व करतातच की! आता अडाणी, अशिक्षित आमदार विधानसभेत निवडून येतात असे फारसे चित्र दिसत नाही. अपवादात्मक उदाहरण सोडले तर विधानसभेतील बहुतेक आमदार पदवीधर, द्विपदवीधर आहेत.

विधानपरिषदेवरील बहुतेक आमदारांच्या निष्ठाही पक्षावर, विचारधारेवर नसतात. तिथे सगळाच पैशांचा खेळ असतो. जर त्या त्या पक्षाला या लोकांविषयी सहानुभूती वाटत असेल तर त्यांनी यांना त्यांच्या पक्ष संघटनेत, पक्षाच्या कार्यकारणीत सामावून घ्यावे. पूर्वी कार्यकर्त्यांना विचारलं जायचं की तो कोणत्या पक्षात काम करतो? आता हा प्रश्न वाझेसारख्या अधिकार्‍यांना विचारला तर ते सांगतील मी शिवसेनेत आहे, परमबीरसारख्या अधिकार्‍याला विचारला तर ते सांगतील मी भाजपमध्ये आहे, कुमार केतकर यांच्यासारख्या पत्रकाराला विचारला तर ते म्हणतील मी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे विधानपरिषद म्हणजे केवळ पांढरा हत्ती पोसणे आहे. आपल्या राज्याला, इथल्या सामान्य माणसाला तो पोसणे यापुढे परवडणारे नाही.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक,’ पुणे
7057292092