Sunday, May 23, 2021

वावटळ निर्माण करणारा दरवळ


सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी सरांसारख्या प्रतिभावंतानं आपल्या पुस्तकाची दखल घेणं ही भावनाच खूप सुखद आहे. 'दरवळ'चे हे अनमोल परीक्षण प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक पुण्य नगरी चेही विशेष आभार. 
 
चपराक प्रकाशनचे संपादक, प्रकाशक आणि उत्साही तरूण लेखक घनश्याम पाटील यांचा ‘दरवळ’ हा पंचवीस लेखांचा वैचारिक संग्रह वाचनीय तर आहेच पण विचारांची वावटळ वाचकांच्या मनात निर्माण करणारा संग्रह आहे. वृत्तपत्रांतून केलेले हे प्रासंगिक लेखन असले तरी लेखकाचे दीर्घकालिन पूर्वचिंतन आणि त्याची तर्कशुद्ध विचारसरणी याचा प्रत्यय या लेखनातून येतो. 
 
पुलंनी एका प्रवासवर्णनात असे लिहिले आहे की, फ्रेंच संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे तर भारतीय संस्कृती ही रूद्राक्ष संस्कृती आहे. या रूद्राक्ष संस्कृतीची चिरंतन मूल्ये, तिचे वेधघटक आणि त्यामध्ये काळानुरूप घडलेली चांगली-वाईट परिवर्तने याचे भेदक दर्शन या सर्व लेखांतून होते. यातील काही लेखांची शीर्षकेच किती अर्थगर्भ आहेत ती बघा - स्वतःपासूनची सुरूवात महत्त्वाची,  दुर्बल सबल व्हावेत, उमलत्या अंकुरांना बळ द्या. मी का लिहितो या शेवटच्या लेखात लेखकाने आपली लेखनविषयक भूमिका अनुभवसिद्ध उदाहरणे देऊन स्पष्ट केली आहेत. मी माझ्या आनंदासाठी लिहितो असं उत्तर लेखकानं एका प्राश्निकाला दिलेलं असून उर्वरित चोवीस लेखातून त्याला मिळणार्‍या या आनंदाचे स्वरूप स्पष्ट होते आणि हा आनंद नवरसात्मक आनंद असतो. दुसर्‍याचे दुःख वाचून आकलन होण्याचाही आत्मिक आनंद असतो. लेखकाने अनेक ठिकाणी परखड विवेचनही केले आहे. एकांगी विचार करणार्‍यांच्या ते जिव्हारी झोंबेल पण खर्‍या वैचारिकाला हे परखड विचार आनंदच देतील. उदाहरणार्थ - शाकाहाराची चळवळ राबवा (पृष्ठ 68) या लेखात अभिनिवेशी गोरक्षकाबद्दल लेखकाने आसूडच उगारला आहे. गाय मारू नका म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे माणसे कशी मारू धजावतात असा खडा सवाल लेखक करतात. अगम्य आणि अतर्क्य या लेखात स्त्रीवादी संघटनांच्या चळवळींचा परामर्श घेताना त्यातील एकांगी अपूर्णता ते लक्षात आणून देतात. तेव्हा ते असे विचारतात, की तृप्ती देसाई शनीशिंगणापूरला आंदोलन करतात पण स्त्री देहाचे प्रदर्शन करणार्‍या बड्या कंपन्यांच्या उत्पादनाविरूद्ध ब्र काढण्याचे धाडस कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यात नाही. 
 
साहित्य संमेलन आणि त्याला पुढेमागे लटकून येणारे विविध वाद आता नेहमीचेच झालेत. त्याचा परामर्श घेताना लेखकाने सोदाहरण विवेचन केले आहे. यवतमाळचे नयनतारा सेहगल प्रकरण, महाबळेश्वरचे अध्यक्षाविना पार पडलेले संमेलन, लक्ष्मीकांत देशमुख आणि श्रीपाल सबनीस या माजी संमेलनाध्यक्षांची नावे न घेता त्यांच्या विधानांचीही स्फोटक दखल लेखकाने घेतली आहे. ‘राहिलेलं राहू द्या’ हा लेख म्हणजे लेखकाच्या आत्मचरित्राचे एक प्रकरणच आहे. आपण कसे घडत गेलो हे सांगताना शेवटी वैयक्तिक संदर्भाच्या बाहेर पडून लेखकाने एक तात्त्विक निष्कर्ष सांगितला आहे की काही प्रश्न सोडले की सुटतात आणि त्याच न्यायानं राहुन गेलेल्या काही गोष्टी तशाच राहू द्याव्यात यातच सगळ्यांचं भल असतं. 
 
‘दरवळ’मध्ये अनेक घटना, प्रसंग वाचायला मिळतात. गावे आणि शहरे आपण वाचता-वाचता फिरतो. कितीतरी लहानमोठ्या व्यक्ती त्यांच्या एरवी न दिसणार्‍या अंतरंगासह भेटतात आणि वाचक या दरवळीत रमून जातो. दरवळीची इतकी सारी बलस्थाने कौतुकास्पद आहेतच पण आता एकच शबलस्थान दाखवण्याची गरज आहे. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये प्रासंगिक लेखन करताना येणार्‍या स्थळकालमर्यादा सांभाळूनच हे लेखन करावे लागते, तसे हे लेखन आहे. याला ग्रंथरूप देताना याच लेखांची अभ्यासपूर्ण पुनर्बांधणी करून साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचे योग्य संदर्भ देऊन हे लेख मुद्रित केले असते तर त्यांना अधिक वजन प्राप्त झाले असते. पुढील आवृत्तीत लेखकाने असा प्रयत्न करावा म्हणजे अक्षरवाङ्मयाच्या दालनात या पुस्तकाला आतापेक्षा अधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल. 
दरवळ
लेखक - घनश्याम पाटील
प्रकाशक - चपराक (7057292092)
पाने - 128, मूल्य - 200

- डॉ. न. म. जोशी, पुणे

5 comments:

  1. दरवळ माझ्या संग्रही आहेच! परीक्षणाविषयी बोलायला मी पात्र नाही! तरीही वाचनीयता आणि परखडता याची योग्य दखल परीक्षणात घेतली आहे !

    ReplyDelete
  2. घनश्यामजी....
    खूप छान लिहलंय सरांनी.
    दरवळ आहेच तसं.
    त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षाही रास्त आहे.
    वृत्तपत्रीय लेखनाला जागेची मर्यादा येतेच हा माझाही अनुभव आहे.

    ReplyDelete
  3. खूपच छान समीक्षण.

    ReplyDelete
  4. न. म. सरांनी खूप छान पध्दतीने दरवळ'चा आढावा घेतला आहे.

    ReplyDelete
  5. न म जोशी सरांसारख्या व्यासंगी लेखकाने एवढं संदर्भासह समीक्षण करणं हेच दरवळ च्या यशाचं खरं गमक आहे असे मला वाटते...!
    दरवळ मी वाचलं असून ते माझ्या संग्रही आहे याचा अभिमान आहे...!👏💐

    ReplyDelete