Wednesday, February 18, 2015

‘चपराक साहित्य महोत्सवा’त एकाचवेळी 12 पुस्तकांचे प्रकाशन

लिहा! लिहा! लिहा! वाचक निश्‍चित भेटतील
‘चपराक साहित्य महोत्सवा’त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी): बाबासाहेब म्हणाले, ’’आजच्या काळात लेखन करणं आवश्यक आहे, असं ज्या व्यक्तिला वाटतं त्या व्यक्तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. शेतकरी असो, मजूर असो वा उद्योजक असो; प्रत्येकाची अंगभूत प्रतिभा बाहेर आलीच पाहिजे. आजही समाजाची वाचनाची भूक कमी झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक लेखक, कवीने थांबता कामा नये.’’ समाजातातील महापुरूषांची ओळख सर्वसामान्यांना करून देण्यासाठी लेखक, कवींनी लिहावं असा वडिलकीचा सल्ला देत असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. या प्रकाशन सोहळ्यात सदानंद भणगे यांचा ‘ओविली फुले मोकळी’ हा ललित संग्रह, घनश्याम पाटील यांचा ‘झुळूक आणि झळा’ हा निवडक अग्रलेखांचा संग्रह, संजय वाघ यांचा ‘गंध माणसांचा’ हा व्यक्तिचित्रण संग्रह, सौ. चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘सत्यापितम्’ हा कथासंग्रह, प्रभाकर तुंगार लिखित ‘शांतिदूत - लालबहादूर शास्त्री’ हे चरित्र, सागर सुरवसे यांचे ‘एकनाथजी रानडे - जीवन आणि कार्य’ हे चरित्र, विनोद पंचभाई यांचा ‘मुलांच्या मनातलं’ हा बालकथासंग्रह, हणमंत कुराडे यांची ’दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ ही कादंबरी तर माधव गिर यांचा ‘नवं तांबडं फुटेल’, संदिपान पवार यांचा ‘अक्षरगाणी’, प्रभाकर चव्हाण यांचा ‘सुंबरान’ आणि शांताराम हिवराळे यांच्या ‘दाटून येताहे काळोखी काहूर’ या काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. 
‘‘ज्या बिटिशांच्या प्रत्येक वाईट गोष्टींचा आपण भारतीयांनी प्रचार केला त्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले. मात्र आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या महापुरूषांची आपण चेष्टा करतो. आपण फक्त गप्पा मारतो; थोर पुरूषांचे अनुकरण करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुरूंगात असताना त्यांना लेखन करायला कागद उपलब्ध करून दिले जात नव्हते. अशावेळी त्यांनी भिंतीवर लेखन केले. ते पाठ केले आणि आपल्यासोबत असणार्‍या परंतु दोन महिन्यानंतर सुटका होणार असलेल्या कैद्याला ते पाठ करायला लावले आणि बाहेर जाऊन ते लिखाण मुर्तरूपात आणायला त्यांनी सांगितले. ते प्रतिकूल परिस्थितीत लिहू शकत असतील तर आपण का लिहू शकत नाही?’’ असा सवालही बाबासाहेबांनी केला. 
प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘घनश्याम पाटील यांची धडपड बघितल्यावर माझ्या उमेदीचा काळ आठवतो. कालांतराने माझ्या लेखणीची धार कमी होत गेली तरी घनश्याम पाटील यांच्या लेखणीची धार कायम आहे. घनश्याम पाटील हे गावाकडच्या लेखक, कवींचं प्रतिनिधीत्व करतात. चॅनेल, मोठी वृत्तपत्रे सोडून पत्रकार ‘चपराक’कडे येत आहेत.’’ 
‘शिवप्रताप’कार उमेश सणस म्हणाले, ‘‘आज तानाजी मालुसरे यांना सिंहगड कसा जिंकला हे विचारायला जाल तर ते ‘‘आधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास विचारा; नंतर काही शंका असतील तर आमच्याकडे या’’ असे ते म्हणाले असते. अशा बाबासाहेबांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणे हे या लेखक, कवींचे भाग्य आहे. आज दिल्लीत भाजप आणि कॉंग्रेसची जशी अवस्था आहे तशी अवस्था मराठी कवितांची झाली आहे. कवींचं नाव मोठं नसेल तर प्रकाशक त्याला उभंही करत नाहीत. अशा स्थितीत चार कवितासंग्रहांचे प्रकाशन होणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे घनश्याम पाटील हे प्रकाशनविश्‍वातले ‘केजरीवाल’ आहेत. माणसाचा माणुसपणाकडे प्रवास सुरू राहणे हे सदानंद भणगे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे’’ असेही ते म्हणाले.
विनायक लिमये म्हणाले, ’’तंत्रज्ञान बदललं तरी पुस्तकांचं महत्त्व अबाधित राहणार आहे. आज मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत पुस्तकं आली आहेत. ‘चपराक’च्या या 12 पुस्तकांमध्ये माणुसकीचा ओलावा, सत्याचा वास आहे. ही सर्व पुस्तके काळाशी सुसंगत आहेत. घनश्याम पाटील यांच्या ‘झुळूक आणि झळा’ या  अग्रलेखांचा संग्रह असलेल्या पुस्तकात संपादकांची परखड आणि रास्त भूमिका दिसून येते. तर कॉन्व्हेंटमध्ये शिकणार्‍या मराठी मुलांना मराठीची ओळख होण्यासाठी संदिपान पवार यांचा ‘अक्षरगाणी’ हा काव्यसंग्रह उपयुक्त ठरणार आहे.  चांगुलपणा शोधणारी नजर असली की चांगलंच होतं’’ असेही लिमये यावेळी म्हणाले.
सदानंद भणगे म्हणाले, ‘‘वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे असे बोलले जात आहे. मात्र, अशा स्थितीत एकाचवेळी 12 पुस्तकांचे प्रकाशन ही असे बोलणार्‍यांना सणसणीत ‘चपराक’ आहे. घनश्याम पाटील हे एक धाडसी संपादक, प्रकाशक आहेत. इतर सर्व प्रकाशकांनी बहिष्कार टाकला असताना ‘घुमानलाच काय अफ्रिकेच्या जंगलात जरी मराठी साहित्य संमेलन असलं तरी जाणार’ हे सांगणारे घनश्याम पाटील एकमेव प्रकाशक आहेत. त्यांच्या लेखणातून ते आपली ठाम भूमिका मांडतात.’’
प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन माधव गिर यांनी तर शुभांगी गिरमे यांनी आभार मानले. 


प्रकाशनादिवशीच आवृत्ती संपली

या सोहळ्यात प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीची हातोहात विक्री झाली. यात ‘झुळूक आणि झळा’, ‘नवं तांबडं फुटेल’, ‘एकनाथजी रानडे-जीवन आणि कार्य’, ‘गंध माणसांचा’, ‘सुंबरान’,  ‘शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री‘ या पुस्तकांचा समावेश आहे. बाणेर येथील योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर तापकीर, सुप्रसिद्ध उद्योजक आणि स्प्रेजा इंडस्ट्रिजचे संचालक एस. डी. सोनवणे, आरंभिनी इंडस्ट्रिजचे श्रीपाद भिवराव, तळेगाव नाट्य परिषद यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

मराठी प्रकाशनविश्‍वातले केजरीवाल

या प्रकाशन सोहळ्यात ‘शिवप्रताप’कार उमेश सणस यांनी दिल्लीत भाजप, कॉंग्रेसची जशी अवस्था आहे तशी अवस्था मराठी कवितांची झाली आहे. मात्र, घनश्याम पाटील हे मराठी प्रकाशनविश्‍वातले केजरीवाल असल्याची कोटी केली.




Saturday, January 18, 2014

अंतरंगात घर करणा-या अंतरीच्या कविता - स्वप्निल पोरे

  1. अंतरंगात घर करणा-या अंतरीच्या कविता - स्वप्निल पोरे

'अंतरीच्या कविता' हा कवी संजय ऐलवाड यांचा पहिलाच कविता संग्रह! नवथरपणाच्या  खुणा ब-याच कवींच्या पहिल्या संग्रहात हमखास दिसतात; पण संजय ऐलवाड यांचा 'अंतरीच्या कविता' हा संग्रह याला अपवाद आहे. यात काव्य रचनेतील नवथरपणा नाही पण शब्दांचा ताजेपणा आहे. त्यात काळजाला भिडणारे वास्तव आहे.
अस्सल मराठी बाजाची कविता आजकाल दुर्मिळ झाली आहे. 'अंतरीच्या कविता' मधून ख-याखु-या मराठी बाजाची कविता रसिकांना भेटते. मराठी भाषेत लिहिली गेलेली प्रत्येक कलाकृती 'मराठी' असतेच असे नाही. म्हणायला मराठी भाषा, पण कसदार पणापासून कोसो योजने दूर! शब्दांची कृतिम सजावट आणि त्या सजावटीसाठी धडपड करताना कलाकृतीतून हरवून गेलेला आत्मा! 'अंतरीच्या कविता' त्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या अस्सल सौंदर्याचे दर्शन घडवतात. ऐलवाड यांची कविता मातीमधून रुजून आलेली कविता आहे. म्हणूनच या कवितेचे तरारुन आलेले पाते अनोख्या हिरवाईचा अनुभव देते.
ही कविता मातीची महती गाते, मातीची वेदना सांगते. भूमिपुत्रांची अर्थात शेतक-यांची व्यथा मांडते.
काळ गेला दुष्काळात
ह्रदयी हुंदका दाटतो
हा आक्रोश कवींच्या शब्दामधून उमटतो पण तो मांडतानाही कविने शब्दांचा संयम राखला आहे. आक्रंदनाला आक्रस्ताळेपणाचे रूप येणार नाही, याची काळजी घेतली आहे.
तोंड वासली जमीन
कळ पोटात दाटली
काळीकुट्ट ढग बघून
माती गालात हसली!
असे कवी सहजपणे लिहून जातो. त्यावेळी मातीशी असलेले त्यांचे ऋणानुबंध उलगडतात. 'पीक सुकल्या रानात, कशी वाचावी गाथा?' हा या कवीचा सवाल अंतर्मुख करणारा आहे. ग्रामीण जीवन शेतीशी जोडले गेले आहे आणि शेती आकाशाच्या कृपेवर! पाऊस झाला तर ठीक; नाहीतर दुष्काळाचे भेसूर संकट. शेतक-याच्या वाट्याला मग कायमच अनिश्चितता! ते दाहक चित्र 'अंतरीच्या कविता' मधील अनेक रचनामधून सजीवपणे  उमटते आणि काव्यरसिक अस्वस्थ होतात.
ढगालाही होती जाण
काळ्या भू-या ढेकळांची
पाणी कृतिम, काडी भिजेना गवताची
अशी व्यथा जीवनाची
बेईमानी बेईमानी
फांदी राखते आजही
लोंबणा-याशी इमानी 
या 'व्यथा' कवितेतील ओळी म्हणजे जणू कृषी संस्कृतीचा लख्ख आरसा.  'तुझ्याविना पावसा' ही कविता देखील शेतक-याच्या मनातील आर्त सांगून जाणारी आहे.
असा पाहू नको अंत
जीव कंठात दाटला
तुझ्याविना रे पावसा
गाव गावातून उठला
असे कविने लिहिले आहे.  गाव गावातून उठला, यापेक्षा अधिक परिणामकारक भाष्य कुठले असू शकेल? अवघ्या तीन शब्दात कवी ते करून जातो, यातच ऐलवाड यांच्या कवितेची ताकद दिसते. 'अंतरीच्या कविता' विविध विषयांवरील आहेत. कधी कवी सामाजिक वास्तव अधोरेखित करीत 'आजचा राम', 'बदल' या कविता लिहून जातो, त्याच क्षमतेने 'विरह' सारखी कविता लिहित आत्ममग्नतेत हरवून जातो. कविता कधी एकांगी असू शकत नाही. कवितेचे क्षितिज सागराला कवेत घेणारे असते. ठराविक विषयात कविता अडकून पडली तर कवितेचा खरा अर्थ साध्य होत नाही. हे भान सुदैवाने संजय ऐलवाड यांना आहे. त्यामुळे काव्यक्षेत्रात मोठी मजल गाठण्याच्या सर्व शक्यता 'अंतरीच्या कविता' मध्ये दिसतात. ऐलवाड यांच्या अभिव्यक्तीत नैसर्गिक सहजता आहे. या सहजतेमुळे ती मनाला भावते. 'मनात तरंगणारे कोरडे ढगही, भरायला लागतात हळूहळू …' ही तरलता त्यांच्या कवितेचे वैशिष्ठय आहे. कठोर वास्तव मांडताना देखील ती तरलता हरवत नाही, हे उल्लेखनीय! कवितेची लय या कविला सापडली आहे. 'जाऊ नको दूर सई, जवळ जरा थांब गं' अशा त्यांच्या ओळी म्हणजे जणू लयींचे मुर्तीमंत रूप! ते रूप वेधक आहेच, शिवाय ते ऐलवाड यांच्या काव्यरचनांना आणखी प्रगल्भ करते. संजय ऐलवाड यांच्या 'अंतरीच्या कविता' केवळ भोलताल जिवंत करतात असे नाही, तर मनाचा गाभाराही जिवंत करतात. आनंद, दु;ख, व्यथा, वेदना अशा भावछटांचे रंग घेवून आलेले त्यांचे शब्द त्यांच्या कवितेचे इंद्रधनु खुलवतात. 'अंतरीच्या कविता' वाचकांच्या अंतरंगात घर करतील यात शंका नाही!
- स्वप्निल पोरे,
वृत्त संपादक, केसरी, पुणे

'अंतरीच्या कविता'
कवी : संजय ऐलवाड
प्रकाशन : चपराक प्रकाशन, पुणे
संपर्क ९२२ ६२२ ४१ ३२

Tuesday, September 24, 2013

शरद कारखानीस यांच्याशी गप्पा!

शरद कारखानीस यांच्याशी गप्पा!

 
काल आमचे अर्थमंत्री दादाराजे तथा श्रीपाद भिवराव आणि  'चपराक' चे लेखक संदिपान पवार यांच्यासह  ज्येष्ठ संपादक श्री. शरद कारखानीस यांची भेट घेतली. त्यांनी त्यांचे 'लोकसत्ता', 'गोमन्तक' आणि 'एकमत'चे अनेक रंजक अनुभव सांगितले.  ते म्हणाले, "महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. ना. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर प्रसिद्धी माध्यमांना द्यायला सरकारकडे त्यांचा एखादा चांगला फोटोच नव्हता; किंवा मोहमद रफ़ी साहेब गेले तेव्हा 'लोकसत्ता' कडे त्यांचा फोटो नसल्याने पहिल्या दिवशी बातमी फोटो न देताच द्यावी लागली."
त्यांचे हे अनुभव ऐकून वाटले, आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, सर्व काही एका क्लिकवर मिळते. तरीही आजचे माझे व्यवसाय बंधू पूर्वीसारखी निर्भिड पत्रकारिता करू शकत नाहीत, हे वास्तव कोणीही नाकारण्याचे कारण नाही. 
"काही हजार करोडची संपत्ती बाळगुन असलेल्या नेत्यांना आणि पत्रकारांनाही गरीब कसे म्हणावे?" असा बिनतोड सवालही  त्यांनी केला. वृत्तपत्रे कशासाठी चालवली जातात? हे सांगताना त्यांनी अनेक किस्से सांगितले. "काही वृत्तपत्रे केवळ छोट्या जाहिराती आणि नोटीसा छापण्यासाठी काढली जातात. त्यांना अंकाचा खप वाढवायचाच  नसतो कारण या जाहिराती कमीत कमी लोकांपर्यंत जाण्यासाठीच दिल्या जातात. मुंबईत काही स्थानकावर रात्री १० नंतर मोठी वृत्तपत्रे मोठ्या प्रमाणात विकली जातात. कारण उशीराची गाडी गेल्याने रात्री मुक्काम स्थानकावर करावा लागतो. मग कमी पैशात जास्त पाने असलेली  वृत्तपत्रे  विकत घेवून ती  झोपण्यासाठी 'अंथरुण' म्हणून वापरली जातात…!"
"आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजची मुले फारसे वाचत नाहीत. जे वाचायचे ते संगणक किंवा भ्रमणध्वनिवर! त्यावर हवी ती माहितीही त्यांना सहज मिळत असल्याने वृत्तपत्र विकत घेवून, त्यासाठी वेळ काढून वाचणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी  होत चालली आहे," असे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. 'पर्यावरण' या विषयावर वृत्तपत्रांनी लिहिणे हा तर मोठा विनोद आहे कारण वृत्तपत्रांच्या कागदासाठीच सर्वाधिक वृक्षतोड होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एकंदर अडीच-तीन तासांत त्यांनी अनेक नवनवीन माहिती दिली. त्यातील बरीचशी माहिती ही गोपनीय असल्याने ती मित्रांसाठी देता येत नाही; मात्र या भेटीतून बरेच काही मिळाल्याचे समाधान मात्र नक्की आहे.

Monday, September 23, 2013

किल्लारी : बीस साल बाद!

  1. किल्लारी : बीस साल बाद!

गणेश उत्सव संपला …  आम्हा मराठवाड्यातील लोकांना हे दिवस विसरणे अजूनही खूप अवघड जाते.  ३० सप्टेम्बर १९९३ च्या काळरात्री मराठवाड्यात एकच हाहाकार उडाला. धरणी मातेचा कोप झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावांना भूकंपाचा तडाखा बसला. सर्वत्र अंधार! अनेक आप्त, मित्र या विनाशात दुरावले गेले.
माझे शिक्षण किल्लारीतील महाराष्ट्र महाविद्यालयात झाले. किल्लारी बस स्थानकाजवळ माझा वृत्तपत्र विक्रीचा गाळा होता. किल्लारी आणि परिसरात यानिमित्ताने फिरताना मी वाचकपत्र लिहू लागलो. काही कविता आणि लेख प्रकाशित झाले. पुढे पत्रकारितेची सुरवातही किल्लारीतून झाली आणि आज पुण्यासारख्या शहरात माझे स्वत:चे नियतकालिक आहे. लोकांची दुभंगलेली मने एक करताना जे अनुभव यायचे तेच माझ्या लेखणीतून कागदावर उतरायचे. त्यामुळे भूकंपाने माझ्यातील पत्रकार घडवला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
भूकंपानंतर या ५२ गावांचे पुनर्वसन झाले. काही युवकांना सरकारी खात्यात नोक-या मिळाल्या. काहीजण अजूनही त्या प्रयत्नात आहेत. ज्याच्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले त्यांना आर्थिक मदत मिळाली. लोकांनी दुःख विसरून त्या पैशाचा कसा विनियोग केला त्यावर लवकरच एक पुस्तक लिहितोय. ते जितके दुःखद आहे तितकेच रंजकही आहे. व्यसनाच्या, बायकांच्या आहारी गेलेल्या अनेकांची मात्र फारच वाताहात झाली.
मराठवाड्यातील लोकांत माणुसकी मात्र कायम जिवंत आहे. काही ठराविक अपवाद आहेत; मात्र सुखद अनुभव जास्त आढळतील. किल्लारीचे ग्रामदैवत असलेल्या निळकंठेश्वराच्या दर्शनाला जाताना आजही अंगावर काटा येतो. जुन्या आठवणी मनात येताच थरकाप होतो.
वृत्तपत्र विक्रेता ते संपादक असा माझा प्रवास किल्लारीच्या साक्षीने झाला आहे. लहानपणीच निसर्गाचे तांडव बघिल्याने कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. यापेक्षा मोठे संकट, दुःख, येवूच शकणार नाही याची खात्री आहे. निसर्ग एकदा परीक्षा बघतो मात्र त्यातून बरेच धडेही देतो. आज २० वर्षानंतर हा परिसर झपाट्याने बदलला आहे. परिवर्तन हा निसर्गाचा अटळ नियम असतो. त्याचे स्वागत करायला हवे. मात्र हे परिवर्तन कशा पद्धतीने होते हॆ पाहणेही औत्सुक्याचे असते. हा बदल कसा घडला, काय घडला, कोणी घडवला याविषयी लवकरच एक दीर्घ लेख 'चपराक' मध्ये लिहितोय. 

Wednesday, August 28, 2013

शरदमियाँ सुभानअल्ला !

शरदमियाँ सुभानअल्ला !





वय वाढले की भय वाढते. मात्र काही लोक जसजशी वयाने वाढतात तसतशी बिनधास्त होत जातात. त्यांना फ़क्त आपला स्वार्थ दिसत असतो. शरदमियाँनी आता ऐन नागपंचमीच्या मुहुर्तावर आपण किती भयमुक्त आहोत हे दाखवून दिले आहे. हिंजवडी येथे झालेल्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या  त्रैमासिक अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की, " अन्याय झालेल्या मुस्लिम तरुणांनी बदला घेतला तर त्यांचा काय दोष?"
पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे अजित पवारांचा 'प्रभाव' त्यांच्यावर पडलाय असे कोणी समजू नये.  त्यांच्या प्रत्येक कृतिमागे राजकारण असते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीने पवारांनी हे व्यक्तव्य केले आहे. त्याचे काय आणि किती गंभीर परिणाम पडतील याची त्यांना कल्पना नाही, असे म्हणता येणार नाही. तरीही त्यांनी हे व्यक्तव्य केले; कारण हिंदुना विकत घेणे सहजशक्य  आहे, हे त्यांना पुरते ठावूक आहे. अल्पसंख्यांकांची मते मिळवण्यासाठी मात्र अधूनमधून असे बोलावे लागते. हिंदूंकड़े ना कसला स्वाभिमान, ना कसला विवेक. त्यांना काहीही बोला फरक पडत नाही. सारेच निऱढावलेले! त्यामुळे  मुस्लिमांचे लांगुलचालन महत्वाचे!
पाकधार्जिण्या वृत्तीच्या शरदमियाँनी सांगितले की, "शुक्रवारी मुस्लिम समाजातील मुले मस्जिदीत स्फोट घडवतील असे मला वाटत नाही. ते इतर कोठेही स्फोट करतील मात्र मस्जिदीत करणार नाहीत. मालेगावातील स्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असण्याची शक्यता आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांचा यात हात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांकांविषयीची आपली मते बदलली पाहिजेत. या प्रकरणातील मुस्लिम समाजातील १९ मुले ३ वर्षे तुरुंगात पडली होती, त्यांच्या आयुष्याचे काय? या देशाकडे त्यांनी काय म्हणून बघायचे? मग त्यातल्याच एखाद्याच्या डोक्यात राग शिरून त्याने बदला घेतला तर त्याला दोष कसा देणार?"
पवार ज्येष्ठ नेते आहेत. आमच्यासारख्या पामराने त्यांना काय सांगावे? मात्र विशिष्ठ दिवशी, विशिष्ठ जातीतील, धर्मातील लोक देशद्रोही, समाजद्रोही कृत्य करणार नाहीत, असे गृहीत धरण्यामागचे तत्त्वज्ञान काही आम्हांस कळत नाही.  न्यायालयात भगवतगीतेवर हात ठेवून धडधडित खोटे बोलणा-या व्यक्तिंनाही  यापुढे निरपराध ठरवले पाहिजे; कारण 'आपल्या धर्मग्रंथावर हात ठेवून कोण कशाला खोटे बोलेल?' असेही उद्या नरेन्द्र मोदींसारख्या कुण्या नेत्याला वाटणे शक्य आहे.
विधीमंडळात जलसिंचन प्रकल्पातील घोटाळ्यांवर होणारी चर्चा थांबवण्यासाठी त्यांनी ते प्रकरण 'न्यायप्रविष्ठ' असल्याचे सांगितले. मग मालेगांव स्फोटाचे प्रकरणही  'न्यायप्रविष्ठ' असताना पवारांनी फुत्कार सोडण्याचे कारण नव्हते. तपास यंत्रणांच्या माध्यमातून आज ना उद्या त्यातील सत्य बाहेर आलेच असते. मग अशापद्धतीने गंभीर विधान करून त्यांना पोलिसांना काही संदेश तर द्यायचा नाही ना? 'मते नाही मिळाली तरी चालेल' असे सांगणारे पवार मतांसाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे पुन्हा एकदा जनतेसमोर आले आहे.
या व  अशा प्रकरणांतील सत्य जनतेसमोर यावे. यातील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. मात्र आयुष्यभर 'जातीय तेढ निर्माण करू नका' असे सांगणा-या पवारांनी दोन समाजात फूट पाढण्याची भाषा करून अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. ज्या गोष्ठी पवार पडद्याआड, खाजगीत करतात, असा अनेकांचा ठाम समज आहे ते पवारांनी जाहीरपणे करण्याचे  धाडस दाखवले आहे. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला मूठमाती देत त्यांनी एकप्रकारे सुडाने  पेटून उठलेल्यांचे बळ वाढवण्याचा उद्योग केला आहे. 'त्यांनी बदला घेतल्यास दोष कुणाचा?' असा सवाल उपस्थित करून त्यांनी मुस्लिम समाजाचा रोष वाढवला आहे. अनेक देशभक्त मुस्लिमांनीही पवारांच्या या विधानाचा निषेधच केला आहे.
जे मनाने कमकुवत आहेत, जे आक्रमक वृत्तीचे आहेत, ज्यांच्या मनात हिंदुस्तानविषयी द्वेष आहे , जे खरोखरीच सुडाच्या भावनेने पेटलेले आहेत, जे चुकीच्या धार्मिक संकल्पनांना बळी पडले आहेत, ज्यांनी हिंदुना संपवण्याचा विडाच उचलला आहे त्यांचा उत्साह पवारांनी वाढवला आहे. ते आज पवारांना धन्यवाद देताना फक्र महसूस करत आहेत.
मालेगाव स्फोट प्रकरणातील पोलिसांनी त्याबत घेतलेली १९ मुस्लिम मुले खरेच निरपराध आहेत, असे आपण गृहीत धरु.  त्यांनी सूड उगवला तर त्यांना दोष देता येणार नाही, असे नामदार पवारांना वाटते. मग शरदमियाँनी लोकांना हेही स्पष्टपणे सांगावे की, इथल्या व्यवस्थेचे बळी ठरलेल्या असंख्य लोकांनी सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांना, नेत्यांना किमान जोड्याने हाणावे का? सुडाच्या भावनेने स्फोट घडवणे, कुणाचा खून करणे हे सहिष्णू बांधवांना मान्य नाही. मात्र किमान या हरामखोरांचे  कपडे फाडून, त्यांना काळे फासून, मुळामुठेचे 'तीर्थ' पाजून त्यांची गाढवावरून धिंड काढली तर पवारांना चालेल का? तीन वर्षेच नाही तर आख्खे आयुष्य उध्वस्त झालेल्या अनेकांची या व्यवस्थेवर सूड उगवण्याची तीव्र इच्छा आहे. नामदार पवारांनी त्यास अनुमोदन दिले तर 'चपराक'च्या वतीने आम्ही अशा असंख्य तरुणांचे प्रतिनिधित्व करू! मुळातच भडकलेल्या माथ्यांना शांत करण्यासाठी अनेकांना बांबूने सटकवण्याची आमची तीव्र इच्छा पवारांच्या या 'उदारमतवादी' धोरणांमुळे  पूर्ण होऊ शकते.
विदर्भातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दलालशाही, सरकारी धोरणे, लाचलुचपत यामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. त्यांच्या कुटुंबीयांना आजही वाटते हे कसले स्वातंत्र्य? आजही त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा द्यावा वाटतो. आपल्या कुटुंबाची वाताहत करणा-या अनेक प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांना सुळावर चढवावे अशी त्यांची भावना आहे. पवारांच्या 'नव्या धोरणां'नुसार त्यांना एवढी 'संधी' तरी मिळायलाच हवी ना! तिकडे आर. आर. पाटील म्हणताहेत, 'पोलिसांना पगार परवडत नसल्याने त्यांना लाच घ्यावी लागते. इकडे थोरले पवार विचारताहेत 'मुसलमानांनी बदला घेतला तर त्यांचा काय दोष?' या सगळ्या राजकीय स्वार्थगिरित दोष फक्त सामान्य माणसाचा आहे जो यांना खपवून घेतो.
जात, धर्म याचे आज कुणालाही फारसे काही वाटत नाही. मात्र राजकारणी त्याला खतपाणी घालतात. लोकांत फुट पाडतात. स्वत:ला 'जाणता राजा' म्हणवून घेणा-यानेही असे उद्योग करणे हे खरोखरी लाजीरवाणे आहे. अशावेळी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या जागृत ज्वालामुखीची आठवण आल्यावाचून राहत नाही. बाळासाहेबांनंतर महाराष्ट्र पोरका कसा झाला, हे पाहण्यासाठी पवारांचे हे विधान ध्यानात घ्यावे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी यांची चांगलीच फाडली असती.
जनतेला आता सुडच घ्यायचा असेल तर अशा पृव्रत्तिचा घ्यावा. राजकारणाला बळी पडून आपापसात भांडत राहणे, सुडाची भाषा करणे हे शर्मनाक आहे. समाजच मुर्दाड झाल्याने काही गिधाडं घिरट्या घालतात. मात्र त्यांना जुमानण्याची आवश्यकता नाही. समाजात शांती प्रस्थापित होईल आणि सर्वजण गुण्यागोंविंदाने राहतील यासाठी सामान्य माणसांनी आता जाणीवपूर्वक कार्यरत राहणे गरजेचे आहे. कुणाच्याही चिथावणीला बळी न पडता बंधुभाव टिकवणे, वाढवणे हीच काळाची खरी गरज आहे.
(संपादकीय लेख - साप्ताहिक 'चपराक - १२ ते १८ ऑगस्ट २०१३ )

Wednesday, May 1, 2013

'दखलपात्र' अग्रलेखसंग्रहाचे प्रकाशन

'दखलपात्र' अग्रलेखसंग्रहाचे प्रकाशन

नमस्कार मित्रांनो! २००२ सालापासून पुणे शहरातून 'चपराक' हे नियतकालिक सुरु आहे हे आपणास माहीत आहेच. 'सामान्य माणसाचा उंचावलेला स्वर' हे मूलतत्त्व घेवून आम्ही कार्यरत आहोत. संवाद आणि संघर्ष हीच 'चपराक'ची भूमिका राहिली आहे. या अंकातील काही निवडक अग्रलेखांचे 'दखलपात्र' हे पुस्तक मंगळवार, दिनांक ७ मे २०१३ रोजी सायं. ६ वाजता पुण्यातील केसरी वाड्यात असलेल्या 'लोकमान्य सभाग्रह' या ऐतिहासिक वास्तूत होत आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, लेखक आणि समीक्षक श्रीपाल सबनीस, कवी आणि संपादक श्रीराम पचिंद्रे, लातुरचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, लोकमंगल उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि माजी खासदार सुभाष देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. १७६ पानाच्या या पुस्तकात संपादक घनश्याम पाटील यांच्या ४६ अग्रलेखांचा समावेश असून १३० रुपये मूल्य आहे. प्रकाशन समारंभात हे पुस्तक अवघ्या १०० रुपयात मिळेल. याचवेळी आमच्या उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे यांच्या 'आर्यमा' या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशनही करण्याचे ठरले आहे. आपणा सर्वांना या प्रकाशन सोहळ्यासाठी सस्नेह निमंत्रण! अधिक माहिती आणि पुस्तकाच्या पूर्वनोंदणीसाठी संपर्क : ०२०-२४४६०९०९ / ९२२६२२४१३२