आज जर संत ज्ञानेश्वर महाराज असते तर?
तर कदाचित त्यांनाही आजच्या प्रकाशकांनी, समीक्षकांनी सांगितलं असतं, ‘‘बाबा रे! ही असली पुस्तकं लिहिण्याचं तुझं वय नाही. काहीतरी हलकफुलकं लिही!’’
असं वाटण्याचं कारण म्हणजे आमचे राजगुरूनगर येथील प्राध्यापक मित्र दादासाहेब मारकड!
मारकडांनी एक अचाट काम केलंय. त्याबद्दल खरंतर त्यांना डोक्यावर घेऊन नाचायला हवं; पण त्यांच्या नशिबीही उपेक्षाच येतेय. कलावंतांची उपेक्षा हा युगानुयुगे चालत आलेला विषय असल्यानं त्याचं मारकडांना फारसं वैषम्य वाटत नाही पण आपल्या मुर्दाड मानसिकतेचं प्रतिबिंब मात्र ठळकपणे दिसून येतं.
वाचकमित्रांना वाटत असेल कोण हे मारकड? आणि त्यांनी असा कोणता पराक्रम केलाय...?
व्यवस्थेच्या नकारात्मक मानसिकतेमुळंच मारकडांचा ‘पराक्रम’ वाचकांपर्यंत गेला नाही आणि त्यामुळं त्याचा दोष त्यांना देता येणार नाही.
दादासाहेब मारकड या अवलियानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं तब्बल 1104 पानांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय. त्यात एकूण 82 अध्याय आहेत.
याचं फलित काय हे सांगितल्यास कोणताही माणूस हादरून जाईल.
काही कीर्तनकारांनी त्यांच्यावर आक्षेप घेतले की, ओवी हा साहित्यप्रकार केवळ संतांनी वापरलाय. यात लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
काहींनी सांगितलं, आजच्या काळात ओव्या कोण वाचणार? हा साहित्यप्रकार केव्हाच कालबाह्य झालाय...
त्यांना ओळखणारे काहीजण म्हणाले, तुम्ही भुगोलाचे प्राध्यापक आहात. चांगलं शिकवता. मग घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचे असे उद्योग करण्यापेक्षा अभ्यासक्रमाची पुस्तकं लिहा. निदान चार पैसे तरी मिळतील!
मात्र ज्यानं काळावर मोहोर उमटवणार्या छत्रपती शिवरायांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय तो हरहुन्नरी लेखक अशा प्रवृत्तीला काय भीक घालणार? त्यांनी पदरचे जवळपास अडीच लाख रूपये खर्च करून हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणार्या संस्था, संघटनांनी, राजकीय पक्षांनी आणि सामान्य मराठी माणसानं मात्र त्यांची कदर केली नाही. वारंवार प्रती पाठवूनही कोणत्याही वृत्तपत्रांनी या पुस्तकाचा परिचय दिला नाही. विक्रेत्यांनी तर विक्रीसही नकार दिला.
इतकं सारं होऊनही दादासाहेब डगमगले नाहीत.
त्यांनी खेड्यापाड्यापर्यंत हे पुस्तक स्वतः पोहचवलं. त्याचा परिणाम असा झाला की, अनेक ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताहात या ‘शिवायन’चं पारायण करण्यात आलं. भजनी मंडळातल्या लोकांनी त्याला चाली लावल्या. ज्या कीर्तनकारांनी सांगितलं की, दादा मारकडांना ओवीबद्ध ग्रंथ लिहिण्याचा अधिकार नाही त्याच ठिकाणी या ग्रंथाची सात-सात दिवसांची पारायणं झाली.
एकनाथ महाराजांच्या ‘भावार्थ रामाणण’पासून प्रेरणा घेऊन त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. त्यासाठी अहोरात्र अभ्यास केला. ‘ओवी छंद’ समजून घेण्यासाठी त्यांनी संत महिपती महाराजांपासून अनेकांचे अनेक ग्रंथ सातत्यानं अभ्यासले. ‘ओवी ही फक्त धार्मिक क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिली. इतिहासातील महापुरूषांचे जीवन आणि त्यांचे ऐहिक कार्य मांडण्यासाठी ओवीचा वापर झाला नाही’ याची खंत त्यांना वाटते. दादासाहेबांचे बंधू विनायकमहाराज मारकड यांनी त्यांना या लेखनासाठी उद्युक्त केले. मग त्यांची गाडी सुसाट सुटली.
‘शिवायन’नंतर त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती संभाजीमहाराज यांचेही ओविबद्ध चरित्र साकारले आहे. जयसिंगराव पवारांनी त्यांना जगद्गुरू तुकाराम महाराजांचे असेच चरित्र लिहिण्यास सुचवले आहे आणि त्याची तयारी त्यांनी सुरू केलीय.
दादासाहेब सांगतात, ‘शिवायन’ हा ग्रंथ लिहिताना मी त्यात एकरूप झालो होतो. त्यावेळी संभाजीराजांच्या नावानं राजकारण करणार्या एका संघटनेनं सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. तेे त्यांनी पूर्ण तर केलं नाहीच पण मला अडचणीत सोडून एकटं पाडलं. या ग्रंथाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरीवर प्रकाशन होणार होतं पण तो योग काही आला नाही.
ओवीसारखे साहित्यप्रकार संपले असं म्हणणार्यांना ग्रामीण महाराष्ट्र कळलाच नाही. आजही खेड्यापाड्यात ओवीबद्ध ग्रंथाविषयी लोकांच्या मनात श्रद्धाभाव आहे. त्यामुळं उलट या साहित्यप्रकाराचं पुनरूज्जीवन करायला हवं. ते काम दादासाहेब मारकड मोठ्या नेटानं करीत आहेत. त्यांच्या पत्नी आणि उत्तम कथाकार जयश्री मारकड यांची त्यांना समर्थ साथ मिळत आहे. त्यामुळं जमाना काय म्हणतोय यापेक्षा आपली माणसं आपल्यासोबत असल्यानं काहीतरी भव्यदिव्य साकारू असं त्यांना वाटतं.
हा अद्वितीय ग्रंथ सिद्धीस नेताना त्यांना अनंत अडचणी आल्या. बरंच हलाहल पचवावं लागलं. मराठ्यांच्या मुलखातलं अमर महाकाव्य साकारताना हे होणारच हे त्यांनी गृहित धरलं होतं.
विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे तर मराठी माणसाचे पंचप्राण! दादासाहेबांचं विश्वही याभोवतीच फिरतं. अत्यंत चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्ती असल्यानं त्यांनी सत्याची कास सोडली नाही. लेखन करताना काहीजणांकडून दिशाभूल झाली, चुकीची माहिती मिळाली मात्र मी त्याच्या खोलात जाऊन सत्याचा तळ गाठतोय असं ते सांगतात. माणसानं हजार चुका कराव्यात पण एकच चूक हजारवेळा करू नये यावर त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच अनावधानानं काही गोष्टी उशिरा कळल्या तरी ते सत्य स्वीकारण्याचं धाडस त्यांच्याकडं आहे.
ज्यांना छत्रपती शिवरायांच्या जीवन आणि चरित्राचा अभ्यास करायचाय त्यांनी हा ग्रंथ अवश्य वाचावा. दादासाहेब मारकड यांची त्यामागची साधना मोठी आहे.
सध्या लोककवी, रानकवी, प्रेमकवी, महाकवी अशी बिरूदं लावायची एक ‘फॅशन’ झालीय. म. भा. चव्हाण म्हणतात त्याप्रमाणं
कोण लेकाची कोणाची देशसेवा पाहतो!
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो!
असा काहीसा प्रकार सुरू आहे. साहित्यिकांचे कळप झाल्यानं त्यात जो सहभागी होत नाही तो जाणिवपूर्वक उपेक्षित ठेवला जातो. त्याला अनुल्लेखानं मारण्यात अनेकजण वाकबगार आहेत. ही कंपूशाही भेदून मराठी साहित्यातील सकस काही स्वीकारायचं असेल तर दादासाहेब मारकड यांच्यासारख्या धडपडणार्या प्रतिभावंतांची कदर करायला हवी.
मुख्य म्हणजे त्यांचा ‘मी कोणी फार मोठा लागून गेलोय’ असा आविर्भाव अजिबात नाही. त्यांचा सतत अभ्यास सुरू असतो.
बहुजन समाजातला एक माणूस पुढे येऊन ‘शिवायन’सारखं ओवीबद्ध महाकाव्य लिहितो याची इतिहासात सुवर्णाक्षरात नोंद घेतली जाईल. ती घेताना मराठी माणसाच्या कद्रूपणाचं दर्शन घडू नये इतकंच! म्हणूनच दादासाहेब मारकड यांच्या या अवाढव्य कार्याची दखल घेतानाच त्यांच्या भावी उज्ज्वल लेखन कारकिर्दीस शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
7057292092
(दैनिक पुण्य नगरी, ८ जुलै २०१८)