कणेरी मठाचे प्रमुख प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची ‘चपराक’चे संस्थापक संपादक घनश्याम पाटील यांनी ‘चपराक दिवाळी अंक 2020’साठी घेतलेली विशेष मुलाखत. चपराक मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमच्या अन्य पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी संपर्क - 7057292092
मराठवाड्यातील श्रीरामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या श्रीसमर्थ जांब येथे चैतन्य ज्ञानपीठाने 7, 8, 9 डिसेेंबर 2019 ला आयोजित केलेले ‘समर्थ महासंगम’ अतिशय उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. भय्याजी जोशी, कणेरी मठाचे प्रमुख प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, प. पू. स्वामी गोविंददेव गिरी अशा ऋषितुल्य माणसांच्या उपस्थितीत हा महासंगम झाला. यावेळी श्रीसमर्थभक्त असलेले आमच्या ‘चपराक’ परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. दिलीपजी कस्तुरेकाका यांच्या पुढाकारातून ‘चपराक’चा एक विशेषांक प्रकाशित करण्यात आला. जांबमध्ये त्याचे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रकाशन झाले. अर्थात, इतक्यावरच न थांबता पुढे या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत देणारा आणखी एक विशेषांकही ‘चपराक’ने प्रकाशित केला.
जांब येथे या महासंगमासाठी आम्ही ‘चपराक’ परिवाराचे सर्व सदस्य पोहोचलो तेव्हा आधी आम्हाला श्री. काडसिद्धेश्वर स्वामींना भेटायचे होते. गोविंददेव गिरी अर्थात किशोरजी व्यास पुण्यात भेटत असल्याने त्यांचा कृपालोभ कायम असतो. काडसिद्धेश्वर महाराजांविषयी मात्र बरेचसे ऐकून होतो.
‘त्यांची निवासाची व्यवस्था जालन्यात केलीय की संभाजी नगरला?’ हे जाणून घेण्यासाठी कस्तुरेकाकांकडे विचारणा केली. त्यांनी सांगितलं, ‘‘या परिसरातील आर्थिक दुर्बल घटकांतील पाच गरीब शेतकर्यांची निवड त्यासाठी केली आहे. स्वामीजी रोज एकाच्या घरी वास्तव्यास आहेत. इथल्या सामान्य माणसाची दिनचर्या, त्याच्या कष्टाची, परिश्रमाची दखल, या भागातील शेतकर्यांचं जगणं, काहींनी त्यांच्या पद्धतीनं केलेले वेगळे प्रयोग हे सगळं जाणून घेण्यासाठी स्वामीजींनी तशी इच्छा व्यक्त केली आणि ते अशा शेतकर्यांकडं राहत आहेत...’’
पुढे अधिक माहिती घेतली असता हेही कळलं की ते ज्यांच्या ज्यांच्या घरी होते त्यांनाही त्यांनी यथाशक्ती सहकार्य केलं होतं.
धर्म आणि आध्यात्माच्या चाकावर आपल्या संस्कृतीचा गाडा धावतोय. कोणत्याही धर्माची भूमिका ही द्वेषमूलक नाही. त्यात आपण ‘कट्टरता’वादाचं जे विष टाकलंय त्यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्यात. माणूस माणसापासून वेगळा होतोय. अशा सगळ्या परिस्थितीत धर्मप्रमुख म्हणून काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यासारखे सत्पुरूष नेमका काय विचार करतात?, धर्माविषयी, देशाविषयी, सध्याच्या परिस्थितीविषयी त्यांच्या काय धारणा आहेत?, सामान्य माणसाच्या जीवनात धर्म काही परिवर्तन घडवतो का?, ‘धर्म म्हणजे अफूची गोळी’ असा अपप्रचार गेली अनेक वर्षे सुरू असूनही धर्माचा पाया इतका भक्कम कसा? असे अनेक प्रश्न मनात होते आणि त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करायची होती. हा योग या अंकाच्या निमित्तानं जुळून आला. कणेरी मठाचे काम आणि सामान्य माणसाच्या मनातील काही महत्त्वाचे प्रश्न यानिमित्तानं त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली आणि कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठात बोलावलं.
‘चपराक’च्या टीमसह मनात असंख्य प्रश्नांचं मोहोळ घेऊन आम्ही तिथं पोहोचलो आणि तिथून निघताना मात्र कृतार्थभावानं परतलो. अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरं मिळाली होती. काही प्रश्नांचा पाठपुरावा आपण भविष्यातही करणार आहोत. कोणताही धर्म हा जोडण्याचंच काम करतो, तो माणसाला माणसापासून तोडत नाही हे मात्र नक्की. धर्मदंड हातात असलेली माणसं लोककल्याणासाठी नेमकं काय करतात हे जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...
कोरोनाच्या काळात उद्भवलेल्या समस्येमुळं प्रवासाला मर्यादा असतानाही आम्ही पुण्यातून थेट कणेरीला निघालो. कोल्हापूर ओलांडल्यावर मनात धाकधूक होती. धर्मशास्त्रातल्या एका कृतिशील विद्वानांशी बोलताना कसलाही आडपडदा न बाळगता काही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं होतं. ते करतानाच त्यांचा कुठंही अनावधानानंदेखील उपमर्द होऊ नये याची काळजी घ्यायची होती. सध्याच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचं रूप पाहता मुलाखतीसाठी येणार्या पत्रकाराविषयी अनेकांच्या मनात आकसच असतो. सत्य जाणून घेणं, चांगले विचार पोहोचवणं, त्यांच्या कामाची यथायोग्य दखल घेणं यापेक्षा समोरच्याला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित करून आपण कसा तीर मारला यातच धन्यता मानणारे अनेक महाभाग असल्यानं माध्यमांविषयी अनेकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाल्यात.
मुलाखतीसाठी मठात बोलावल्यानं तिथल्या वातावरणाविषयी काही कल्पना रंगवल्या होत्या. प्रत्यक्षात तिथं पोहोचल्यावरचं चित्र मात्र वेगळंच होतं. त्या अतिभव्य मठातील आवारात गेल्यावर एक वेगळीच चैतन्यदायी शक्ती आम्हाला जाणवत होती. आम्ही स्वामीजींची विचारणा करताच तिथल्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आलं. आम्ही कार्यालयात पोहोचलो तर ते एक प्रशासकीय कार्यालय वाटावं असं चित्र होतं. त्याठिकाणी अनेक विभाग केले होतेे. शिक्षण, आरोग्य, कृषी, धर्मादाय अशी विभागणी आणि प्रत्येक ठिकाणी त्या काम पाहणार्या संबंधितांची नावं. त्यातही अनेक निवृत्त मान्यवर प्रशासकीय अधिकार्यांची नावं पाहून या सगळ्यांविषयी जिज्ञासा वाढली. ‘स्वामीजी कुठं आहेत? त्यांनी मुलाखतीसाठी बोलावलंय...’ असं सांगताच त्यांनी आम्हाला हॉस्पिटलला जायला सांगितलं. इथून काही अंतरावर मठाच्या वतीनं एक हॉस्पिटल चालवण्यात येतं आणि स्वामीजी रूग्णसेवेसाठी तिकडंच असतात असं कळलं.
आम्ही आमचा मोर्चा तिकडं वळवला. तिथून जाताना रस्त्यात सगळीकडं मठाच्या कामाच्या खुणा दिसत होत्या. अनेक शाळा, व्यायामशाळा, गोशाळा, ज्येष्ठ नागरिकांचे संघ, उद्यानं, पतपेढी, कामागारांसाठीच्या वसाहती असं सगळं चित्र पाहून आम्ही एखाद्या प्रख्यात औद्योगिक वसाहतीत तर नाही ना? असा भास निर्माण होत होता. हे सगळं पाहत आम्ही हॉस्पिटलजवळ पोहोचलो. ती चौदा मजली भव्य वास्तू. सध्या तिथं कोविड उपचार केंद्र करण्यात आलंय आणि कोरोनाच्या रूग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. स्वामीजींविषयी चौकशी करताच त्यांनी सांगितलं, मागच्या बाजूला ज्या खोल्या आहेत त्यातील एका खोलीसमोर ‘जॅग्वार’ गाडी असेल. त्या खोलीत जा...
आम्ही तिथं पोहोचलो. आम्हाला वाटलं इथं आमची चौकशी होईल, विचारणा होईल...
प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र होतं.
एक डॉक्टर दांपत्य कोरोनामुळं तिथंच उपचार घेऊन बरे झाले होते. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो आणि तोही डॉक्टर आहे. सध्या तो भारतात, कोल्हापूरात आहे आणि त्यालाही काही काळ या रूग्णसेवेच्या कार्यात सहभागी करून घ्यावे म्हणून ते विनवणी करत होते...
आम्ही विनाअडथळा तिथं पोहोचलो. ‘पुण्याहून आलोय’ हे कळताच स्वामीजींनी आम्हाला ‘आधी भोजन करून घ्या’ असा प्रेमळ आदेश दिला. कोरोनाच्या काळातही ही मंडळी इथपर्यंत आलीत याचं त्यांच्या डोळ्यात कौतुक दिसत होतं. ‘थोड्या वेळापूर्वीच आमचं लखन जाधव यांच्या ‘सव्यासाची गुरूकुलम’मध्ये जेवण झालंय’ हे सांगितल्यावर त्यांचं समाधान झालं.
मुलाखत सुरू होण्यापूर्वी आम्ही जांबच्या कार्यक्रमाविषयी बोललो. तेव्हापासून त्यांना भेटण्याची इच्छा होती हेही आवर्जून सांगितलं. मी त्यांना म्हणालो, ‘‘आमच्या पिढीच्या मनात काही प्रश्न आहेत. कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. धर्मपीठाचे प्रमुख म्हणून तुम्ही आम्हाला भारतातल्या शेवटच्या मोजक्या आशास्थानापैकी एक वाटता. आपला धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, धर्मसंस्था, रूढी-परंपरा अशा सगळ्यांविषयी कुणासोबत बोलायची सोय राहिली नाही आणि बोललेच तर अभ्यासपूर्ण उत्तरंही मिळत नाहीत. त्यामुळं कदाचित काही प्रश्न तुम्हाला आवडणार नाहीत. त्यामुळं एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तरी चालेल पण ते उपस्थित करणं मला माझं कर्तव्य वाटतं. कणेरी मठाची चैतन्यमय माहिती आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवणं आणि वर्तमान परिस्थितीवरील तुमची मतं जाणून घेणं हा या संवादाचा उद्देश आहे.’’
त्यावर त्यांनी समाधानानं एक स्मित केलं आणि जे वाटेल ते मोकळेपणाने विचारण्याची, बोलण्याची परवानगी दिली. त्याचा हा सारांश खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.
नमस्कार स्वामीजी.
आपल्या मठाचा लौकिक मोठा आहे. आपण या माध्यमातून जे उभं केलंय ते प्रचंड आहे. आधी आपण या सगळ्याविषयी बोलूया. आपला मठ नक्की काय आहे? इथं कोणकोणते उपक्रम चालतात? मठाच्या परंपरेविषयी काय सांगाल?
- हा मठ जवळजवळ चौदाशे ते पंधराशे वर्षांपूर्वीचा आहे. या मठाला आत्तापर्यंत 48 मठाधिपती होऊन गेलेत. या मठाच्या कार्याची व्याप्ती महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यात आहे. सध्या मात्र भारतभर कार्य सुरू आहे. हे कार्य एकतर धार्मिक आहे. मठाचे कोट्यवधी अनुयायी आहेत. ज्या त्या गावात जाणं-येणं होतं. प्रवचन, कीर्तन, भजन, पूजन हे तर नेहमीप्रमाणं विनाअडथळा सुरूच राहतं.
हो... ही एक चैतन्यभूमी आहे. एक प्रेरणादायी, ऊर्जादायी केंद्र म्हणून तुम्ही मोठे कार्य करीत आहात. मठ म्हणून होणार्या या नियमित उपक्रमाशिवाय नव्या भारताच्या पुनरूत्थानासाठी इथं आणखी काय होतं?
- होय. या उपक्रमासह आता भारतीय संस्कृतीच्या रक्षण आणि संवर्धनासाठी आम्ही एक पाऊल पुढं टाकलंय. भारतीय सभ्यता किंवा संस्कृती काय आहे याचं दर्शन घडविण्यासाठी आपण मठात एक वस्तुसंग्रहालय बनवलंय. ते सगळं एका ठिकाणी पहायला मिळावं हा उद्देश आहे. आज खेड्यातला ‘गाव’ हरवलाय. तिथली संस्कृती काय होती इकडं आपलं अक्षम्य दुर्लक्ष होतंय. मग ते कुठंतरी दाखवता येईल काय म्हणून आम्ही मूर्तिरूपात एक आभासी गाव उभं केलंय. जवळपास एक हजार मूर्ती आम्ही तयार केल्यात. इथं सुरूवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहासदृश्य भागातून आत जाताना प्राचीन भारतातील ऋषिमुनींचे कोरीव पुतळे बनवले आहेत. बलुतेदार म्हणजे काय याची शिल्पे इथे पहायला मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पे त्यांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवितात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर याच्या हुबेहुब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.
सगळे आबालवृद्ध हे कुतूहलानं पाहतात. आम्ही कुठं होतो, कुठं आहोत आणि कुठं जातोय हे त्यातून कळतं. युवकांनाही काय करू शकतो याची प्रेरणा मिळते. कारागिराच्या माध्यमातून पूर्वी आपल्याकडं काय काय व्हायचं हे त्यांना कळतं. सध्या फक्त साधनं बदललीत, तंत्रज्ञान-सुविधा बदलल्यात. कामं मात्र तीच आहेत. त्याची किमान ओळख त्यांना होते. आपल्या देशात ‘कामगार’ पद्धत नव्हती. ‘कारागीर’ पद्धत होती. कामगार हा मोबदला घेऊन काम करतो. कारागीर मात्र छोटा असेल किंवा मोठा असेल तो मालक असतो. समाधानासाठी आणि व्यवसायवृद्धिसाठी तो काम करतो. आपला देश कारागिरांचा होता. त्यामुळं जगात सर्वात चांगला जीडीपी आपला होता. प्रत्येकजण मालक होता. आपली शिक्षणव्यवस्थाही त्यावरच अवलंबून होती. गुरूकुल शिक्षणपद्धती कशी होती, सणवार कसे होते, क्रियाकलाप कसे चालायचे हे सगळं इथं दाखवलंय. आमचे प्राचीन-प्रतिभावान लोक कसे होते हे कळावे म्हणून 28-30 लोकाचं चरित्र इथं मूर्तितून दाखवलंय. भारताबाहेर किंवा जगात ज्यांनी मोठं योगदान दिलंय आणि ज्याला भारतीय संस्कृतीचा सुगंध आहे अशा साहित्य, कृषी, वैद्यकीय, राजकीय, नृत्य, गायन, वादन, तर्कशास्त्र, योगशास्त्र अशा सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या जीवनपटाचा त्यात समावेश आहे. सगळे शोध, सगळी कामं विदेशी संधोधकांनीच केली असा जो अपप्रचार केला जातो त्याला हे उत्तर आहे. आपल्या संस्कृतीची आणि कर्मकुशलतेची दखल याठिकाणी घेतली आहे. आपला वैभवशाली समृद्ध वारसा आजच्या पिढीला कळायला हवा. हे पाहून अनेकजण प्रभावीत होतात. आपल्या संस्कृतीचं रक्षण-संवर्धन त्यातून होतं. त्यांना प्रेरणा मिळते. शिवाय यातून पर्यटनालाही चालना मिळते. रोजगार मिळतो.
तुम्ही कृषीक्षेत्रात मोठं योगदान दिलंय. शेतकर्यांविषयी तुम्हाला अपार जिव्हाळा वाटतो हे आम्ही जांबमध्ये अनुभवलंय. आपल्या मठाची बरीच शेती आहे. तिथं काय प्रयोग केले जातात? धर्मक्षेत्रात कार्यरत असूनही सगळी कर्मकांडं बाजूला सारत तुम्ही शेतकर्यांच्या प्रश्नासाठी काम करता. त्याविषयी काय सांगाल...
- हो. आपल्या मठाची दोन-तीनशे एकर शेती आहे. त्यात गेली 25-30 वर्षे आम्ही सेंद्रिय शेती करतो. प्राचीन काळापासून ऋषी आणि कृषी संस्कृती सर्वश्रेष्ठ आहेत. धर्मसंस्था ही कृषीक्षेत्राशी सबंधित आहे. कालांतराने त्यात काही बदल झाले. मठाची गोशाळा आहे, जिथं हजारएक देशी गायी आहेत. देशातल्या वीस-बावीस प्रजाती तिथं तुम्हाला पहायला मिळतील. ‘आज मरणार्या गायी उद्या मरतील’ म्हणून ठेवायच्या असं आम्ही केलं नाही. आमच्या सगळ्या गायी धष्टपुष्ट आहेत. त्यांची आम्ही योग्य ती काळजी घेतो. कत्तलखान्यात जाणार्या गायी, काही कारणानं शेतकर्यांना सांभाळता न येणार्या गायी आम्ही स्वीकारल्या. त्यांचा सांभाळही आम्ही चांगल्या पद्धतीनं करतो. त्यामुळं त्याही धष्टपुष्ट झाल्यात. आम्ही चांगलं दूध, तूप उपलब्ध करून देतो. शेतकर्यांनी गायींचं संवर्धन करावं म्हणून आम्ही दरवर्षी जिल्ह्यात दहा दिवस पदयात्रा काढून त्यांचं प्रबोधन करतो. पन्नास ते सत्तर गावात जाऊन देशी गायींचं महत्त्व, सेंद्रीय शेती याची माहिती देतो. माणसाचं आणि जमिनीचंही आरोग्य कसं पोषक राहील हे ग्रामस्थांना समजावून सांगतो. त्यामुळं आमच्या आजूबाजूच्या गावात दोन लाखाहून अधिक देशी गायींची संख्या वाढलीय. सेंद्रीय पद्धतीनं शेती करण्याचं प्रमाण वाढलंय.
कमीतकमी आपल्या कुटुंबापुरतं तरी चांगलं पिकवावं याचं भान लोकाना आलंय. त्यासाठी आम्ही तिथं एक मॉडेल केलंय. एक एकरमध्ये शेती, एक एकरचा गोठा, तिथंच गोबर गॅस, खतनिर्मिती, सोलरची वीज, जवळपास शंभर प्रकारची पिकं आम्ही त्या एक एकरमध्ये घेतो. तसं बघितलं तर दोनशे प्रकारच्या वनस्पती त्या शेतात आहेत. बांधावर चंदन आणि अन्य झाडं लावलीत. ती दहा-पंधरा वर्षात कोट्यवधी रूपये मिळवून देतात. शेतकर्यांचं हे ‘फिक्स डिपॉझिट’ आहे याची जाण त्यांना आली. तिथंली फळं-फुलं विकली तरी रोज किमान चार-पाचशे रूपये त्या परिवाराला मिळतात. त्यांना बाहेर मजुरीला जावं लागू नये आणि त्यांना बाहेरच्या मजुराची गरजही भासू नये असं आमचं नियोजन असतं. तशी व्यवस्था निर्माण केलीय. कपडे, काडेपेटी, मीठ, साबण अशा काही गोष्टी सोडल्या तर त्या परिवारानं काहीही विकत आणू नये, त्याला लागणार्या सर्व अत्यावश्यक गोष्टींची निर्मिती त्यानंच करावी असा आमचा प्रयत्न असतो. सात-आठ वर्षापासून आम्ही हा प्रयोग केलाय. त्याची देशभर दखल घेतली गेली.
आपल्याकडं इतक्या गायी आहेत. मग त्याआधारे दूध-तूप विक्रीशिवाय आणखी कोणते जोडव्यवसाय केले? त्याला कसा प्रतिसाद मिळतोय? शेतकर्यांनी आणखी कोणते प्रयोग करावेत असं तुम्हाला वाटतं?
याच गायीपासून आमचं पंचगव्य केंद्र आहे. त्यात गोमूत्राचा अर्क आहे. वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे अर्क आम्ही निर्माण करतो. मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, महिलांच्या अंगावरून जाणे, हृदयविकार अशा विविध आजारांसाठी आम्ही विविध अर्क तयार करतो. त्यापासून गुडघेदुखीसाठी आता आम्ही औषध तयार केलंय. गोशाळा स्वावलंबी बनेल आणि विविध रूग्णांना उपचाराला मदत होईल अशी चाळीस-पंचेचाळीस प्रकारची औषधं आम्ही तयार केलीत. आमची कंपोष्टाची कंपनी आहे. त्यातून विविध प्रयोग केले जातात. शेतकर्यांना हे सगळं करता यावं म्हणून कार्यशाळा होतात. दोन दिवस इथं त्यांची राहण्याची-खाण्याची व्यवस्था केली जाते. त्यांना हे सगळं समजावून सांगितलं जातं. त्यांनी आपापल्या गावात हे प्रयोग करावेत असा त्यामागचा उद्देश असतो. तसं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं.
शिवाय इथं प्रशिक्षित होऊन गेलेल्या शेतकर्यांनी त्यांच्याकडं हे प्रयोग केले की त्यानं पिकवलेल्या मालाच्या मार्केटिंगचीही व्यवस्था करतो. त्याच्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या भाजीला किमान चाळीस रूपये किलो बाजारभावाची हमी आम्ही त्यांना देतो. दुसरीकडं हा माल साठ रूपये किलोने विकत घेणारे उद्योजकही आम्ही तयार केलेत. त्या दोघांत योग्य तो समन्वय साधला जातो. या दोन्हीत वीस रूपयांचा जो नफा होतो त्यातून असंख्य गरजूंना रोजगार मिळतो. लोकाना विषमुक्त अन्न मिळावं आणि शेतकर्यांच्या मालाला भाव मिळावा असा आमचा प्रयत्न असतो.
या शेतकर्यांसाठी आमचे कृषी विज्ञान केंद्रही कार्यरत आहे. तिथं याच शेतकर्यांच्या घरातील महिलांना विविध प्रशिक्षणं दिली जातात. त्यांचे बचत गट तयार केलेत. त्याही चांगल्या पद्धतीनं काम करून पैसे मिळवतात. वेगवेगळ्या शहरात, गावात हे विषमुक्त अन्न पाठवलं जातं. या शेतकर्यांच्या अनुभवाचा लाभ इतरांना होतो. त्यांनी केलेल्या प्रयोगावर प्रकल्प उभारले जातात. चांगल्या गोष्टी पुढे जातात. त्यांना लागणारे बी-बियाणे, खते, कंपोष्ट आम्ही पुरवतो. सध्या करोनामुळे थोडा व्यत्यय येतोय पण आजूबाजूच्या गावात आम्ही काम करत आहोतच. आपली गोशाळा बघून निदान शंभर-दोनशे गोशाळा तयार झाल्यात. आयटीतले अनेक तरूण हा प्रयोग बघून शेतीकडं वळलेत. आमच्या कृषीविज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ गावोगाव जाऊन काम करतात. देशी गायींचे आम्ही प्रदर्शन भरवतो. जे कोणी चांगल्या देशी गायी सांभाळतात त्यांना दहा हजार-वीस हजार-पन्नास हजार-एक लाख अशी प्रोत्साहन बक्षीसंही देतो. मठाच्या वतीनं त्यांना शाबासकीचं प्रशस्तीपत्रही दिलं जातं.
या कोविडच्या काळात तुम्ही हॉस्पिटलची चौदा मजली इमारत ‘कोरोना उपचार केंद्र’ म्हणून चालवताय. त्याविषयी काय सांगाल? आरोग्यक्षेत्रात तुम्ही कोणते प्रयोग केले? इथं उपचार घेणार्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात?
- सामान्य लोकाना कॉर्पोरेटच्या सुविधा उपलब्ध करून देणं हा आमच्या हॉस्पिटलचा उद्देश आहे. दहा वर्षांपूर्वी आम्ही हे सुरू केलं. 130 बेडचं अॅलोेपॅथी हॉस्पिटल आहे आणि पन्नास बेडचं आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र इथं आहे. दोन्हीत अत्यंत माफक दरात उपचार केले जातात. बाहेर लाख-दीड लाख खर्च येत असेल तर आमच्याकडे ते पन्नास हजारात होते. तेही नसतील तर ते उपचाराअभावी राहू नयेत म्हणून त्यांना वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पैसे मिळवून दिले जातात. त्यातून त्यांचे उपचार केले जातात. आमच्याकडं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथं उपचार होत नाही असा एकही आजार नाही. सगळे विभाग अत्याधुनिक सुविधांसह सज्ज आहेत. आमचे इथले आधीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तीन-चार कोटींची साधनं आम्हाला मिळवून दिली. बेळगाव ‘तरूण भारत’चे संपादक किरण ठाकूर यांनी एक कोटी रूपये ऑपरेशन थिएटरसाठी दिले. इतरही काही दानशूरांनी मदत केली. अनेक अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी इथं मोफत होतात. सर्व आजारांवर माफक दरात उपचार इथं होतात. उपचारांअभावी कोणीही राहू नये असा आमचा प्रयत्न असतो. भारतातले ‘द बेस्ट डॉक्टर’ आमच्याकडं आहेत. ते इथं मोठं योगदान देतात. तशी यंत्रणा उभी केलीय. आम्ही उपचार तर करतोच पण इतरांनाही असे कमी पैशात उपचार करायला आम्ही प्रवृत्त करतो.
ज्या गोष्टी अॅलोपॅथीने होत नाहीत त्यांच्यासाठी आयुर्वेद केंद्र आहे. तिथं या ज्या पाच प्रकारची कर्म केली जातात त्यावरून सगळ्या आजारावर उपचार होतात. टेस्ट ट्युब बेबीसाठी बाहेर तीन-चार लाख रूपये खर्च येतो. इथं ते तीस हजारात होतं. ज्यांच्याकडं उपचारासाठी पैसे नाहीत त्यांनी मठासाठी त्यांच्या रानातील भाजी, शेंगा असं काही वर्षभरात त्यांच्या सोयीनं थोडं थोडं दिलं तरी चालेल अशीही योजना केली. मोफत उपचार करताना त्यांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये आणि त्यांनी आजार अंगावर काढू नयेत असं आम्हाला वाटतं. बलुतेदार पद्धतीत जे चालायचं ते आमच्याकडं होतं. लग्नानंतर ज्यांना पंधरा-पंधरा वर्षे मूलबाळ होत नव्हतं त्यांना आयुर्वेदशास्त्रामुळं मुलं झालीय. अनेकांचे त्वचारोग आठ-दहा दिवसात बरे झालेत.
आजारच होऊ नये यासाठी एक दिवसापासून सात वर्षांपर्यंतच्या बाळाला सुवर्णबिंदू प्राशन करण्यास दिले जाते. बुद्धी तल्लख होण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदात हे उपचार सांगितलेत. त्यामुळं आठवड्यात-पंधरा दिवसात एकदा तरी दवाखान्यात जाणारे अनेकजण पूर्ण बरे झालेत. महिन्यात किमान दहा हजार बालकांना ही गुटी दिली जाते.
अनेकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया गावोगाव जाऊन केल्या जातात. त्यांना तिथंच योग्य ते उपचार मिळावेत असाही आमचा प्रयत्न असतो.
कृषी, वैद्यकिय क्षेत्राबरोबरच मठाच्या माध्यमातून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातही दखलपात्र योगदान दिलंय. त्याविषयी काय सांगाल...
- शिक्षणासाठी आमच्या मठात आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जी गरीब, मागासलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी तीन केंद्रं आहेत. तिथं आत्ता दोनशे मुलं आहेत. नॉर्थ इस्टची शंभर आणि लोकलची शंभर. त्यांना आपण पाचवीच्या वर्गात दत्तक घेतो. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचं शिक्षण, जेवणं-खाणं कपडेलत्ते हे सगळं आपण पाहतो. मेघालय, आसाम, त्रिपुरा इथली शंभर मुलं आहेत. वर्षातले आठ-दहा दिवस मी तिकडे जात असतो. अशी गरीब मुलं भेटली की मी त्यांना इकडे आणून शिक्षण देतो. आपल्याकडील ज्या मुलांना आई नाही, वडील नाहीत, दोघेही नाहीत किंवा दोघेही आहेत पण आजारी आहेत, विकलांग आहेत अशा मुलांना इथं शिक्षण दिलं जातं.
दुसरा आपला एक प्रकल्प आहे तो ‘विद्या चेतना’ नावाचा. आमच्याकडे बंद पडत चाललेल्या 335 सरकारी शाळा आम्ही दत्तक घेतल्यात. त्यामागं एकच हेतू आहे की आपली मराठी ही प्रादेशिक भाषा संपू नये. सरकारी शाळांतच मराठी चांगलं शिकवलं जातं. त्यामुळं आम्ही त्या शाळा दत्तक घेतल्या. सेमी किंवा इंग्लिश माध्यमामुळं मराठी भाषा संपत चाललीय. भाषा ही संस्कृतीची चावी असते. ती चावी लावल्याशिवाय आपल्या संस्कृतीची गोडाऊन उघडी होत नाहीत. दुसरं म्हणजे, या मराठी शाळा बंद पडल्या तर या भाषेत निर्माण झालेले लाखो ग्रंथ संपुष्टात येतील. तिसरं म्हणजे गोरगरिबांची मुलं सरकारी शाळांशिवाय शिकू शकणार नाहीत. त्यांना खाजगी शाळा परवडणार्या नाहीत. त्यामुळं त्याच दत्तक घेऊन तिथं खाजगी शाळांप्रमाणे सर्वोत्तम शिक्षण द्यायचं आम्ही ठरवलं. आमचा हा प्रयोग पाहून अनेकजण पुढं येत आहेत.
ज्या सरकारी शाळेतील दुसरी ते सातवीपर्यंतच्या मुलांना वाचता येत नाही अशी मुलं बाजूला काढून त्यांच्यासाठी आम्ही आमचे शिक्षक नेमतो. त्यांना आम्ही ‘शिक्षण मित्र’ म्हणतो. त्याच गावातील डी. एड. झालेली मुलगी किंवा मुलगा त्यांना शिक्षण मित्र म्हणून नेमतो. ते त्यांना शिकवून इतर मुलांच्या बरोबर आणतात. प्रत्येक दहा शाळांसाठी एक क्रीडा शिक्षक आम्ही नेमतो. ही मुलं जिल्हा किंवा राज्य स्तरापर्यंत जावीत यासाठी त्यांना टार्गेट देतो. प्रत्येक शाळेत आम्ही वर्षातून एकदा आईवडिलांसाठी ‘पाद्यपूजा’ हा उपक्रम राबवतो. रोज या मुलांना आम्ही सांगत असतो की सकाळी उठल्यावर आईवडिलांच्या पाया पडा. मग वर्षातून एकदा शाळेत मुलांकरवी पालकांचे पाद्यपूजन केले जाते. हा एक भावपूर्ण समारंभ होतो. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. यावेळी आईवडील म्हणजे मुलांसाठी कसे देव आहेत हे आम्ही त्यांना समजावतो. आईवडिलांनाही ही देवाघरची फुले तुमच्यासाठी कसे देव आहेत हेही सांगतो. आईवडील मुलांच्या मस्तकारवर हात ठेवतात आणि मुलं आईवडिलांच्या पायावर त्यांचा हात ठेवतात. तेव्हा आम्ही दोघांकडूनही एक प्रतिज्ञा करून घेतो. मुलांकडून वदवून घेतो की आम्ही कधीही आईवडिलांची अवहेलना करणार नाही. त्यांना त्रास देणार नाही. उपेक्षा करणार नाही. त्यांच्या इच्छा पूर्ण करणार, उद्धटपणे वागणार नाही. त्याचवेळी आईवडिलांनीही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून संकल्प करायचा की किमान मुलांच्या समोर आम्ही कधी व्यसन करणार नाही. मुलं घरी असताना टीव्ही-रेडिओ मोठ्या आवाजात लावणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या समोर आम्ही कधीच भांडणार नाही. एकवेळ मुलं समोर नसताना काय बडबड करायची ती करून घ्या पण मुलांच्या समोर चुकूनही आम्ही भांडणार नाही. हे करतानाच मुलांना शिक्षणात मध्येच रोखणार नाही. त्यांना पूर्ण शिक्षण देणार.
या उपक्रमाचे आज जबरदस्त परिणाम दिसून येत आहेत. आमच्या शिक्षण मित्रांमुळे त्या सरकारी शाळेतील शिक्षकांचे वर्तनही सुधारले. ते कामचुकारपणा करत नाहीत. आज तर परिस्थिती अशी आहे की इंग्रजी माध्यमात भरमसाठ फी देणारे विद्यार्थीही त्या शाळा सोडून या सरकारी शाळांत प्रवेश घेत आहेत. आमच्या अभियानाचा नाराच आहे, ‘चलो झेडपी स्कूल’. आमची एक सायन्स व्हॅनही आहे. विज्ञानवाहिनी म्हणूया तिला. तिच्यात अडीचशे प्रयोग आहेत. ती केंद्रशाळेत जाऊन थांबते. आजूबाजूच्या आठ-दहा शाळेतील मुलांना तिथं बोलावलं जातं. दिवसभर तिथं विज्ञानाचे अनेक प्रयोग होतात. मुलं हसतखेळत सर्व शास्त्रांचा अभ्यास करतात. तो पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. आमचा बीएससी बीएड झालेला एक शिक्षक या वाहिनीवर असतो. तो स्वतःच गाडी चालवत जातो. तो एकदा गाडी घेऊन गेला की आठ-आठ दिवस परत येत नाही. या गावातून त्या गावात अशी त्याची भ्रमंती सुरू असते. चंद्रकांतदादा पाटील यांनीच आम्हाला ही व्हॅन उपलब्ध करून दिली आणि शाळांचाही बर्यापैकी खर्च ते उचलतात. आम्ही आमच्या मठाच्या वतीने शंभर शाळा पाहतो. बाकी शाळांसाठी चंद्रकांतदादा कुणाकुणाकडून निधी मिळवून देतात.
‘गुरूकुल’ हा तुमचा नेमका काय उपक्रम आहे? तिथल्या मुलांचे अनेक किस्से ऐकलेत. त्यांच्यासाठी नेमकं काय करता?
‘गुरूकुल’ हा आमचा एक शैक्षणिक उपक्रम आहे. तिथं तीनशे मुलं शिक्षण घेतात. जात-पात असा तिथं प्रश्न नाही. आठ ते दहा वयोगटातील मुलं आम्ही त्यासाठी घेतो. ते बारा वर्षे इथं राहतात. हे सगळं शिक्षण नि:शुल्क आहे. त्यांच्याकडून आपण काही घेत नाही. त्यांच्यासाठी कोणतेही सरकारी शिक्षण नाही. हे शिक्षण नि:शुल्क, शासनमुक्त आणि स्वावलंबी जीवन जगण्याचं आनंदकेंद्री शिक्षण आहे. कोणत्याही प्रमाणपत्रावर आधारित किंवा कोणते पॅकेज मिळावे म्हणून हे शिक्षण नाही. आम्ही येथे चौदा विद्या, चौसष्ट कला त्यांना शिकवतो. त्यांचा सर्वांगिण विकास हे ध्येय असतं. त्याला आपण ‘युनिव्हर्सल एज्युकेशन’ म्हणू शकता.
इथं उभं राहिल्यानंतर क्षितिजापर्यंत दिसणारं काहीही ‘हे मला माहीत नाही’, ‘यातलं मला कळत नाही’ असं त्यांनी म्हणू नये असं त्यांना तयार केलं जातं. त्यांना भूगोल, देशाचा खरा इतिहास शिकवतो. वैदिक गणित शिकवतो. बेरीज-वजाबाकी तर ते कॅलक्युटरपेक्षा वेगात करतात पण सेव्हन डिजिट, फाईव्ह डिजिट काहीही त्यांना विचारा. लगेच ते ती अडचण सोडवतील. सूर्यसिद्धांतातले भास्कराचार्यांचे लीलावती आम्ही त्यांना शिकवतो. अबॅकस शिकवतो, अंकगणित शिकवतो, पाणिनी अष्टाध्यायी शिकवतो, काही संस्कृत ग्रंथही त्यांना आम्ही शिकवतो, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र शिकवतो, स्मृतीशास्त्र म्हणजे नीतिशास्त्र शिकवतो, आयुर्वेद शिकवतो, काही वेगवेगळी शास्त्रंही शिकवतो, धनुर्विद्या शिकवतो. म्हणजे पन्नास-साठ प्रकारच्या युद्धकला त्यांना शिकवतो. प्रशासन आणि युद्धनीतिचं ज्ञान त्यांना दिलं जातं. संगीत, नाट्य, नृत्य, गायन, वादन अशा सगळ्या कला त्यांना दिल्या जातात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यासही त्यांना दिला जातो. आमच्याकडची मुलं चप्पल बनवण्यापासून ते डोक्याचे केस कापण्यापर्यंत कोणतंही काम करू शकतात. प्लंबिंगपासून इलेक्ट्रिसीटीपर्यंत सर्व गोष्टी तर त्यांना शिकवल्या जातातच पण घोडसवारीही शिकवली जाते. त्यात ते तरबेज आहेत. त्यांच्यात साहसी प्रवृत्ती निर्माण व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न असतात. शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत आणि नंतर मार्केटिंगपर्यंत सर्वप्रकारचे ज्ञान आम्ही त्यांना देतो. आमच्याकडची मुलं-मुली हे सगळं करतात. ते स्वतः शेतात काम करतात आणि स्वतःसाठी लागणारं धान्य पिकवतात. देशी गायीचं तूप खाण्यास वापरतात. पीक पिकवणं, त्या धान्यापासून स्वयंपाक बनवणं, सूतकताई करून स्वतःचे कपडे तयार करणं हे सगळं ते करतात. शिल्पशास्त्र, मूर्तिशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे. लाकडापासून-मातीपासून ते मूर्ती बनवतात. योगाचं शिक्षण दिलं जातं. चित्रकला शिकवली जाते. दूरदर्शन आणि दूरश्रवण यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
तुम्ही त्यांच्या समोर बसलात तर तुमच्या घरात काय आहे याचा अंदाज ते बांधू शकतात. एखाद्या व्यक्तिचं वर्णन केलं तर त्याचं चित्र तर काढतातच पण तो आत्ता कुठं असेल, काय करत असेल हेही जाणू शकतात. या गोष्टी अनेकांना अविश्वसनीय वाटतील पण शास्त्राच्या आधारे या सिद्ध होण्यासारख्या आहेत. ध्यानयोगात हे सगळं येतं. ती व्यक्ती अमेरिकेत, ऑस्टे्रलियात, मलेशियात कुठंही असू द्या, तिथं नेमकं काय चालू आहे, तिथं त्याच्याकडे कोणत्या वस्तू आहेत हे पाहता येतं. विदेशातल्या गुप्तहेरी किंवा गुन्हेगारी शोधण्यासाठी या कलांचा उपयोग होतो. त्यांच्या डोळ्यावर तुम्ही पट्टी बांधा आणि त्यांच्या हातात एखादा ग्रंथ द्या. ते तो ग्रंथ तुम्हाला वाचून दाखवतील. आता त्यांना आम्ही शब्दवेधी शिकवणार आहोत. तंत्रशास्त्राचा लुप्त झालेला भाग पुनरूज्जीवित करून त्यांना या गुरूकुलात शिकवायचा आमचा मानस आहे. ही मुलं बारा वर्षे आमच्याकडे राहून साधना करतात. पहाटे चार-साडेचारला उठून रात्री साडेआठला झोपतात. इथं कुणी शिपाई नाही. त्यांची कामं ते स्वतःच करतात. तक्षशीला, नालंदा इथं पूर्वी काय चालायचं याचा अंदाज तुम्ही आमच्या या मुलांकडं पाहून बांधू शकाल. यासाठी आचार्य निर्माण करणं, अभ्यासक्रम ठरवणं हे सोपं नाही पण इथली मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडली की एकेक विद्यार्थी म्हणजे एकेक गुरूकुल असेल.
हे सगळं ऐकून, पाहून भारावून गेल्यासारखं होतं. तुमचा व्यासंग मला माहीत आहे, तुमची अमृतमय व्याख्यानं मी ऐकलीत. कोणत्याही आचार्याला हा प्रश्न विचारू नये पण आमच्या वाचकांना आपली शैक्षणिक पार्श्वभूमी सांगाल का?
- मी फारसा काही शिकलो नाही. माझा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये डिप्लोमा इन मार्केटिंग अॅन्ड सेल्स मॅनेजर झालेय. परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी शिकत गेलो. कोणतीही गोष्ट मला अस्वीकारार्ह वाटत नाही. अण्णा गवंडी बांधकाम करतोय तर त्याचं माझ्याशी काय काम असं मला वाटत नाही. ते मलाही कसं शिकता येईल असा माझा ध्यास असतो. तिथं जाऊन मी थांबतो. तो दगड कसे रचतोय, विटा कशा लावतोय, पाणी कसं मारतोय, त्याचं बांधकामाचं तंत्र काय, त्याचा मंत्र काय, मग मी का करू नये असं वाटून मी त्यांच्याकडून शिकत असतो. पुढे ते इतरांनाही शिकवतो.
आपल्या मठात आणखी कोणते उपक्रम आहेत?
- असे छोटेमोठे असंख्य उपक्रम आहेत. आमच्याकडे नैसर्गिक आपत्ती विभाग आहे. किल्लारी, गुजरात, नेपाळ अशा भूकंपात आम्ही मदतकार्यासाठी गेलो होतो. 2005 चा किंवा मागच्या वर्षीचा केरळचा, आमच्या कोल्हापूरचा महापूर असेल, त्यात आम्ही मदतकार्य केलं होतं. त्यासाठी आमची टीम सज्ज असते. परवाच्या कोकणच्या निसर्ग चक्रीवादळात आम्ही मदतकार्यात होतो. शंभर-दोनशे लोक त्यासाठी कार्यरत आहेत. कारपेंटर, वेल्डरपासून आवश्यक ती सर्व कामं करणारे लोक या टीममध्ये आहेत. वैद्यकीय टीम आहे. नेपाळला जवळजवळ 130 गावात आम्ही कम्युनिटी किचन चालवत होतो. तिथं जेवण दिलं, वैद्यकीय सुविधा दिल्या. केरळला चारशे टन मटेरिअल पोहोचवलं. कणेरी मठ योग्य माणसाला मदत पोहोचवतो म्हणून अनेकजण मदत इकडं पाठवतात. प्रशासनही सहकार्य करतं. हे आम्हाला समाजऋण फेडणं वाटतं. त्यामुळं मठाच्या माध्यमातून जे काही करता येईल ते आम्ही करत असतो.
गेल्यावर्षी पुरानंतर जे नुकसान झाले अशा शंभर-सव्वाशे जणांना आम्ही घरं बांधून दिली. ज्या कोणत्या पक्षाचं सरकार असेल ते आम्हाला आमच्या या कामात मदत करतं. या कोरोनाच्या काळातही आम्ही कोरोना होऊ नये किंवा झाला असेल तर त्याची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून 75 लाख लोकाना ह्युमिनिटी बूस्टर दिले. देणारा देत असतो. ते लोकापर्यंत पोहोवण्याचे आम्ही फक्त हमालरूपी मध्यस्त आहोत.
स्वामीजी, हे सगळं ऐकून, वाचून कोणीही प्रभावीत होईल. त्याच्या अंगात सकारात्मक ऊर्जेचे लोळ निर्माण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आत्मनिर्भर व्हा’ असं जे काही सांगत आहेत तेच तुम्ही प्रत्यक्षात आणत आहात. त्यामुळं तुमच्या कार्याला वंदन करतानाच प्रारंभी मी म्हटल्याप्रमाणं काही विषयांवर प्रश्न उपस्थित करणं, चर्चा करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण आता थोडं तिकडं वळूया. सध्या देशातला सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणजे राममंदिर. नुकतंच मंदिराच्या भूमिपूजनाचं काम झालंय. अनेक वर्षाचा संघर्ष त्यामुळं संपुष्टात आलाय. असं असतानाही काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत की आपल्या देशाला मंदिराची गरज आहे की ‘एम्स’सारख्या रूग्णालयाची? अशा वाचाळवीरांना आपल्या मठाच्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे ते कृतिशील उत्तर आहे. एक मठ इतकं मोठं काम उभं करू शकतो तर राममंदिराच्या माध्यमातून काय काय होईल याची अनेकांना कल्पनाही येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? राममंदिर की एम्ससारखी रूग्णालये?
- हे बघा, माणसाच्या तीन प्रमुख गरजा आहेत. एक पोटाची गरज, दुसरी मनाची. तिसरी तितकीच एक महत्त्वाची गरज म्हणजे ज्ञानाची. ज्ञानाची गरज भागविण्यासाठी असंख्य ज्ञानमंदिरं आपल्याकडं आहेत. शाळा-कॉलेज याची मोठी गरज आहे आणि सगळीकडे ती उभी आहेत. पोटासाठी औद्योगिक विकास, शेती महत्त्वाची आहे. हाताला काम असेल तर पोट भरेल. तेही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे सोडून मनाची भूक मोठी आहे. ती ना पैशाने भागेल, ना अन्नपदार्थांनी भागेल, ना औद्योगिक वसाहतींनी. भुकेच्या वेळी ज्याचे त्याचे खाद्य ज्याला त्याला द्यायला हवे. पोटाचे औषध डोळ्याला किंवा डोळ्याचे औषध पोटाला असे चालणार नाही. तसंच मनाची भूक मंदिरात भागते. त्यासाठी भक्तिची गरज आहे. त्यामुळं विद्यामंदिराइतकीच देवमंदिराचीही गरज आहे.
आजपर्यंत आपला देश केवळ मंदिरांमुळं अखंड राहिला. आमचे बारा ज्योतिर्लिंग असतील, वैष्णव क्षेत्र असतील किंवा आमची शक्तीपीठं असतील, गाणपत्य पीठं असतील किंवा साधूसत्पुरूषांची समाधीस्थळं असतील... इथं माणसं कुठंलीही जात, पात, प्रांत हे सगळं विसरून येतात. देश अखंडित ठेवण्याचा आणि भावैक्य साधण्याचा हा मार्ग आहे. देवळाकडे फक्त एक मूर्ती म्हणून पाहू नका. अनेक भावनांची, अनेक प्रांताची मंडळी तिथं एकत्र येतात. मंदिरात आलेला माणूस भक्तिभावानंच येतो. ज्याची त्याची मनोकामना, श्रद्धा यानुसार फळ मिळतं असं आपला धर्म सांगतो. आपला अहंकार अर्पण करण्यासाठीसुद्धा एक श्रद्धेची जागा लागते. ती मंदिराच्या माध्यमातून निर्माण होते. श्रद्धेनं मस्तक टेकवलं की एक वेगळंच समाधान लाभतं. शिवाय धर्मप्रबोधन करायचं असेल, आपल्या कलांचं प्रदर्शन करायचं असेल, संस्कृतीचं दर्शन घडवायचं असेल तर एक जागा लागते. मी या जातीचा, मी त्या जातीचा हा अहंकारही मंदिरात संपतो. म्हणून सगळे खांद्याला खांदा लावून दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी उभे असतात.
आपल्याकडे शिक्षणाअभावी फार अनर्थ झाला नाही. पूर्वी मंडळी शिकलेली नसली तरी क्रूर नव्हती कारण त्यांच्या श्रद्धा मजबूत होत्या. देव, देश, धर्माचे संस्कार त्यांच्यावर होते. म्हणून शिक्षण आणि उद्योगाची जेवढी गरज आहे तितकीच गरज मंदिरांचीही आहे. उद्योगात तुम्हाला पैसा गुंतवावा लागतो. इथं भावना अर्पण कराव्या लागतात. मानसिक समाधानासाठी श्रद्धायुक्त अंतःकरणानं देवाकडं गेलं पाहिजे. केवळ भौतिक विकास, बौद्धिक विकास महत्त्वाचा नव्हे. भावनिक वाढही गरजेची आहे. औद्योगिक, शैक्षणिक विकास म्हणजे देशाची प्रगती नव्हे. त्यासाठी भावनिकदृष्ट्याही कणखर असायला हवं. असं कणखरपण श्रद्धेशिवाय मिळत नाही आणि या श्रद्धा जपण्याचं काम मंदिरं करतात. एका राममंदिराच्या माध्यमातून संपूर्ण देश एकत्र येतोय. त्यामुळं राममंदिर हे देश जोडण्याचं साधन आहे. त्यावरून टीका करणं अयोग्य आहे.
आपण राममंदिराविषयी बोलत आहोत. मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीराम आणि देवकीनंदन श्रीकृष्ण यांच्या चरित्राकडं आम्ही इतिहास म्हणून पाहायचं की त्यांच्या ग्रंथांचा महाकाव्य म्हणून अभ्यास करायचा? नेमकं हे काय आहे? इतिहास की महाकाव्य?
- ही महाकाव्ये तर आहेतच. रामायण हे जवळपास चोवीस हजार श्लोकांचे आहे. हा ग्रंथ छोटा नाही. प्रभू रामचंद्रांची जीवनकहाणी महर्षी वाल्मिकींनी काव्यमय शैलीत लिहिली. त्यामुळं हे महाकाव्य आहेच पण तो इतिहासही आहे. इतिहास का? तर त्या काव्यात ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केलाय ती सर्व ठिकाणं इथं आहेत. प्रत्येक घटनाक्रमाचं स्थानमहात्म्य आपण समजून घेऊ शकतो, अभ्यासू शकतो. आठ हजार वर्षांनीसुद्धा त्या नावाची माणसं आपल्याकडं आहेत. मग हा इतिहास हा इतिहास का होऊ नये? काही गोष्टी अलंकारिकपणे अतिशयोक्त करून लिहिल्या आहेत, त्यात वेळोवेळी अनेकांनी बदल केलेत हेही मान्य पण त्यामुळं आपण हे सत्य नाकारू शकत नाही. राम आणि कृष्णजीवनातील ही सर्व ठिकाणं आपल्याला त्याची प्रेरणा देतात, अनुभूती देतात. त्यामुळं ही महाकाव्ये तर आहेतच पण आपल्या संस्कृतीचा, आपल्या आदर्शांचा हा इतिहासही आहे. त्यापासून काही बोध घेतला तर नुकसान काहीच नाही. उलट जगावं कसं, वागावं कसं हेच त्यातून प्रत्येकाला शिकता येईल.
राम आणि कृष्ण ही दोन्ही आपली श्रद्धास्थानं आहेत. मात्र दोघांचंही तत्त्वज्ञान वेगळं आहे, जगणं वेगळं आहे. आम्ही नेमकं कुणाला आदर्श मानायचं? सत्यवादी, एकपत्नीत्व जपणार्या रामाला की सोळा हजार एकशे आठ बायका असलेल्या श्रीकृष्णाला?
- हे बघा, या दोन्ही वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या परिस्थितीत घडलेल्या घटना आहेत. त्यांचं आयुष्यही त्या काळानुसार होतं. त्यावेळचे ते महापुरूष होते. जगात ज्या ज्या वेळी ज्या गोष्टींची गरज असते त्याच्या पूर्ततेसाठी भगवंताची ही व्यवस्था असते. रामायणकाळ हा वेगळा होता, कृष्णकाळ वेगळा होता. ज्याला उत्तम प्रशासक बनायचंय त्यांना या दोन्ही नीतिंची गरज वेगवेगळ्या प्रसंगानं लागणार आहे. केवळ प्रभूरामाच्या तत्त्वज्ञानानं किंवा केवळ श्रीकृष्णाच्या नीतिनंच आपण चालतो असं नाही. या दोघांचेही आदर्श तर आपण जपायलाच हवेत पण आपल्या घराण्यातील वडिलधार्यांनी, पूर्वजांनीही काही आदर्श घालून दिलेत. तेही आपल्याला मान्य करायला हवेत. पूर्ण अभ्यासाअंती, अनुभवाअंती त्यांनी राम आणि कृष्णाला देव म्हणून स्वीकारलं असेल तर आपण ते मान्य करायला काय हरकत आहे? सार्वकालिक नीती आणि सकालिक नीती असे दोन प्रकार असतात. सार्वकालिक नीती कधीच बदलत नाही पण सकालिक नीती देश, वस्तू, काल, परिस्थितीनुसार बदलत असते आणि बदलत्या गोष्टीनुसार आपणही बदलत राहणं गरजेचं असतं. परिवर्तन हाच तर सृष्टिचा नियम असतो. प्रवाहाबरोबर चालताना जसा प्रदेश भेटेल तसा मार्ग काढत पुढं जायला हवं.
या सगळ्यात काही गोष्टी असतात ज्या कधीच बदलत नाहीत. त्याला सार्वकालिक नीती म्हणतात. म्हणजे प्रेम बदलत नाही, सत्य बदलत नाही, अहिंसा बदलत नाही, मित्रत्वाची भावना बदलत नाही... काही प्रासंगिक गोष्टी बदलतात. या सगळ्यातलं चांगलं ते आपण घेऊयात, बाकी सोडूयात.
आपल्याकडं धर्मांतरावर कायम चर्चा होते. हिंदू धर्मातून इतर धर्मात जाणार्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. अनेकजण ख्रिश्चन, बौद्ध धर्म स्वीकारतात, मुस्लिम धर्म स्वीकारतात. त्यांचे धर्मगुरूही धर्मांतर करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्याकडं मात्र असं काही होत नाही. हिंदू धर्मातून इतर धर्मात जाणार्यांचं प्रमाण लक्षवेधी असलं तरी ‘इनकमिंग’ मात्र कायम बंद असतं. या सगळ्याकडं तुम्ही कसं पाहता?
- काय झालंय की आपल्या धर्मात अशा पद्धतीचं शिक्षणच कधी दिलं गेलं नाही. तशी संस्कृतीही रूजवली नाही. धर्मांतर करून घेणं हे आपल्या लोकाच्या मनातच नाही. जे मुळचे हिंदू आहेत पण काही कारणाने इतर धर्मात गेलेत आणि आता त्यांना परत हिंदू व्हावंसं वाटतंय तर त्यांच्यासाठी आपल्या समाजबांधवांची मती आणखी विशाल होण्याची गरज आहे. त्यांना आपण आपलं म्हणून मोठ्या मनानं स्वीकारण्याची गरज आहे. काळाचीही ती हाक आहे. आपल्या देशाला जातीसाठी आणि मतभेदासाठी जी किंमत वेळोवेळी मोजावी लागली ती भयंकर आहे. आता तरी आपण सुधारायला हवं. जातीपातीमुळं व्हायचं तितकं नुकसान होऊन गेलं. आता आपण डोक्यातून जातीयवाद काढून टाकायला हवा.
हे कसं होईल? उच्चनीचतेची भावना कशी कमी होईल? ‘जी मेल्यावरही जात नाही ती जात’ असं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणायचे. जातीनिर्मुलनासाठी कोणते मार्ग तुम्हाला प्रभावी वाटतात?
- यासाठी सर्वप्रथम धार्मिक क्षेत्रातील जे कोणी प्रबोधनपुरूष आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ असं म्हणतो आणि इतरांना सांगतो. वागायचं कसं याची प्रार्थना रोज करतो पण ते आचरणात आणत नाही. आपण रोटीपर्यंत आलोय पण बेटीपर्यंत कधी पोहोचणार? आपण एकमेकांच्या घरात जेवायला लागलो. प्रत्येकाकडं हवं ते काम करायला लागलो. एकाच आस्थापनेत सर्वजण एकत्र काम करायला लागतो. आता कोणत्याही जातीसमूहातील बेटी आपल्या घरात स्वीकारण्यासाठी आपण मन मोठं करायला हवं. माणूस माणूस वेगळा नाही हे दाखवून द्यायला हवं. मन विशाल करणं गरजेचं आहे. माणसात देवाचं रूप असतं, ते मोठ्या मनानं पहायला हवं. सगळ्यांच्या मनात भगवंत असतो असं भगवत्गीता सांगते. मग हा लहान, तो मोठा, तो शूद्र असे संकुचित दृष्टिकोन का बाळगावेत? ते आपण मानू नये. आपल्या पूर्वपुरूषांनी जे सांगितलं ते आचरणात आणायला हवं. त्यांच्यावेळी अशा जातीपाती प्रबळ नव्हत्या. काही प्रदेशामुळं, काही व्यवसायामुळं विशिष्ट समाजात अशी लग्नं व्हायची. आपल्या घरातील, आपल्या व्यवसायातील चालीरीती, रूढी परंपरा त्या मुलीला माहीत असल्यानं जुळवून घ्यायला त्रास होणार नाही असं आपल्या वडिलधार्यांना वाटायचं. अनेक ठिकाणी ते खरंही होतं. म्हणजे सोनाराच्या घरातली माणसं असतील तर अन्य व्यवसायाचं शिक्षण घेतलेली माणसं तिथं काय करणार? मग त्यांचं जुळवून घेणं शक्य नसायचं. त्यामुळं आपापल्या जातीत लग्न व्हायची. आजकाल तसं काही राह्यलं नाही. कोणीही कोणत्याही कामात तरबेज होतो. कोणतीही नोकरी-व्यवसाय करतो. त्यामुळं मन मोठं करून सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे. मनातली क्षुद्रता नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी धार्मिक क्षेत्रातील लोकानी आधी सुधारायला हवं. त्यांनी स्वतःत बदल करून इतरांचंही याबाबत प्रबोधन केलं पाहिजे.
खूप महत्त्वाचं विधान आहे तुमचं हे. असो. रामदास स्वामींनी महंत संप्रदाय सुरू केला. तशा पद्धतीचं आज आपल्या धर्मात काही राहिलं नाही. म्हणजे एखादे पोप आले तर त्यांची एक क्रेझ असते. मुस्लिम धर्मावर त्यांच्या धर्मगुरूंचा पगडा आहे. त्या त्या धर्माचे लोक त्यांच्या धर्मप्रमुखांचं ऐकतात. आपल्या चारही पीठांचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या त्या भागातील लोकाना मार्गदर्शन करावं, धार्मिक वर्चस्व ठेवावं असं अपेक्षित होतं. तसं काही होताना दिसत नाही. आपल्या धर्मशास्त्राच्या प्रमुखांना सामान्य माणूस फारसा महत्त्व देताना दिसत नाही. हे असं का झालं?
- ख्रिश्चन किंवा इतर धर्मात काय चालतं हे मला माहीत नाही पण आपल्या धर्मात धर्मगुरू आणि शिष्य यांच्यात अंतर खूप आहे. ते कमी होणं गरजेचं आहे. आधी गुरू लोकानी सामान्य माणसाला माणसासारखं वागवणं गरजेचं आहे. म्हणजे मला शिवू नकोस, माझ्या जवळ येऊ नकोस, मी तुझं अन्न खाणार नाही, माझ्याकडं फक्त व्हाईट कॉलरचीच माणसं चालतील, सामान्य माणूस चालणार नाही हे बंद झालं पाहिजे. आमच्या आणि समाजाच्या मधलं अंतर कमी झालं पाहिजे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, त्यांच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवणं हे गरजेचं आहे. मला तुमची दक्षिणा चालत असेल तर मग तुमच्या घरातील जेवण का चालणार नाही? धर्मशास्त्रांच्या प्रमुखांनी किती गरिबांच्या घरी जाऊन जेवण केलं? त्यांनी किती दलितांच्या घरी जाऊन वास्तव्य केलं? हे बघितलं पाहिजे. धर्मगुरू म्हणून आमच्यात असे काही दोष आहेत आणि ते आम्हाला मान्य करावेच लागतील. निदान ते आता सुधारायला हवेत. क्षुद्र भावना सोडून सामान्य माणसाला जवळ करायला हवं. शिवाय आपल्या धर्मात एकाधिकारशाही नाही. आपल्याकडं लोकशाही आहे. हुकूमशाही नाही. त्यामुळं कुणीही कुणावरही नियंत्रण ठेवत नाही. स्वयंनियंत्रणाचं, स्वयं मनःशासनाचं प्रशिक्षण नाही. इतर धर्मात तसं नाही. त्यांना त्यांच्या धर्मगुरूच्या, धर्माच्या, धर्मग्रंथांच्या विरूद्ध बोलण्याचा अधिकार नाही. आपल्याकडं प्रत्येकाला चिकित्सा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं ते अभ्यासाअभावी धर्मावर बोलतात, धर्मग्रंथावर बोलतात, धर्मगुरूवरही बोलतात. प्रत्येकाचं विवेचन करतात. ऐकण्याचं-न ऐकण्याचं, प्रबोधनाचं स्वातंत्र्य आपल्याकडं प्रत्येकाला आहे. आपल्या लोकाना हे सगळं ऐच्छिक ठेवलंय. त्यामुळं धर्मशास्त्रांच्या प्रमुखांपुढं मर्यादा आहेत.
हिंदू धर्माच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्यात? तुम्ही हिंदू धर्माची व्याख्या कशी कराल?
- पंचमहायज्ञ दरदिवशी आपल्या जीवनात जो करतो, आचरणात आणतो तो हिंदू. म्हणजे 1) देवयज्ञ. ज्या देवानं आपल्याला हवा, प्रकाश, उन, अन्न, पाणी असं सगळं दिलं त्या देवाविषयी कृतज्ञता म्हणून त्याचं केवळ स्मरण करणं म्हणजे देवयज्ञ. 2) मातृपितृ यज्ञ. ज्या आईवडिलांनी मला हे शरीर दिलं त्यांच्या उपकारांचं स्मरण करणं, त्यांची सेवा करणं, त्यांची आज्ञा पाळणं हा माझा मातृपितृ यज्ञ आहे. 3) ऋषियज्ञ. म्हणजे गुरूजनांविषयी कृतज्ञ राहणं. माझ्या उपजीविकेसाठी असेल किंवा आध्यात्मिक मोक्षदानासाठी असेल ज्या गुरूजनांकडून हे आले त्यांची सेवा करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणं हा माझा ऋषियज्ञ. 4) माझा भूतयज्ञ. या पृथ्वीवर मनुष्य स्वतंत्र नाही. एक जीव दुसर्या जिवावर अवलंबून आहे. म्हणून एक जीव अन्य जिवांसाठी नेहमी योगदान देत असतो. जमिनीच्या गर्भात सूक्ष्म जीवाणू काम करतात म्हणून अन्न येतं. अन्न नावाच्या जीवापासून आपली संतुष्टी होते आणि आपल्यासाठी जनावरं काम करतात, पक्षी काम करतात; कारण पिकांवरचे जीवजंतू खाण्याचं काम पक्षी करतात. परागीकरणाचं काम कीटपतंगादी करतात. हे सगळे आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीनं उपकार करतात. म्हणून सगळ्यांचे आभार मानणं, त्यांना मदत करणं हा माझा भूतयज्ञ आहे आणि शेवटचा 5) मनुष्ययज्ञ. मनुष्य स्वावलंबी नाही. एक परिवार आहे, त्यात माणसं आहेत. कोणत्याही कार्यासाठी तो एकटा काही करू शकत नाही. त्यामुळं माझ्या आत्म्याला जे जे प्रतिकूल वाटतं ते ते त्यानं इतरांबरोबर करू नये. माझ्यावर कुणी प्रेम करावं असं वाटत असेल तर त्यानं इतरांवर प्रेम करावं. माणसानं माणसाबरोबर सद्गुणसंपन्न होऊन व्यवहार करावा. म्हणून हे पंचमहायज्ञ जो नित्यनेमानं आचरणात आणतो तो हिंदू.
हिंदुत्त्वाची किती अर्थपूर्ण आणि व्यापक व्याख्या आपण केलीत... खूप आनंद वाटला. मगाशी आपण नालंदा, तक्षशीलाचा उल्लेख केलात. आजच्या पिढीला वेदशास्त्रांचा, धर्मग्रंथांचा असा अभ्यास करायचा असेल तर तो एकाही विद्यापीठात उपलब्ध नाही. हे चित्र कसं बदलता येईल?
- वेदांचं शिक्षण अनेक ठिकाणी दिलं जातंय. तिथं जाण्याची मानवाची इच्छा नाहीये. अनेक मठा-मंदिरात ही व्यवस्था आहे. मात्र अर्थकेंद्रित शिक्षणव्यवस्था आल्यानं लोकाचं लक्ष तिकडं नाही. ‘हे शिकल्यानं मला पैसे किती मिळणार? पॅकेज कितीचं मिळणार?’ याचाच विचार अनेकजण करतात. कोणत्याही वैदिक विद्यांनी ‘पॅकेज’ मिळणार नाही. आनंद मिळणार आहे. आनंदासाठी कुणाला शिकायचं नाही, ‘अर्था’साठी शिकायचंय. आजही आपल्याकडं देशात ठिकठिकाणी चार-आठ हजार गुरूकुलं आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं ते वेद शिकवतात. वेदांचा एकेक भाग शिकवणारेही आहेत. म्हणजे कुणी सामवेद शिकवत असेल, कुणी अथर्ववेद शिकवत असेल, ऋग्वेद शिकवणारे आहेत, अनेक मठात त्या त्या वेदांचाच भाग असणारे, शास्त्र असणारेही अभ्यासक्रम आहेत. तिकडं कुणी फारसं फिरकत नाही. तुम्ही म्हणता तसं विद्यापीठातून मात्र वेद-उपनिषदं दुर्लक्षित राहिलीत.
यात परिवर्तन कसं घडेल? समाज वेदविद्येकडं वळेल का?
- माणसाला भौतिक गोष्टीची उब आली की तो आपोआप इकडं वळेल. मला समाधान पाहिजे असं वाटले की लोक इकडं वळतात. आजही लाखो लोक भजन-प्रवचनासाठी एकत्र येतात. गावात वारकरी सप्ताह चालतात, सात-सात दिवसाचे यज्ञ होतात. दासबोधाची-रामायण-भागवताची-अन्य ग्रंथांची पारायणं होतात. ही सुद्धा वेदविद्याच आहे. सगळ्या मार्गानं ती समाजमनावर झिरपत असते.
आपण सनातन वैदिक धर्मावर बोलतोय. हा वैदिक धर्म आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहेत असं काही विचारवंत सांगतात. हा नेमका काय प्रकार आहे?
- आपला सनातन धर्म कधी सुरू झाला हे सांगता येत नाही. म्हणूनच तो सनातन आहे. अमुक माणसानं, अमुक दिवशी आपला धर्म स्थापन केला असं आपण सांगू शकत नाही. हिंदू धर्म ही आपली जीवनपद्धती आहे. सिंधू नदीच्या तीरावरील राहणार्यांना बाहेरचे लोक सिंधू तीरावरील म्हणून ओळखायचे. भारतात प्रवेश करताना सिंधू नदी लागायची. त्यामुळं सिंधू तीरावरील हे सर्व हिंदू म्हणून ओळखले जाऊ लागले. आपला धर्म मात्र सनातनच. त्यामुळं यात काही मतभेद व्हावेत असा हा विषय नाही.
स्वामीजी मला एक विचारायचं होतं... पूर्वीपासून असं म्हणतात की राज्यसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्त्वाची असते. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्यांना गादीवर बसवून ते सिद्धही केलं. चंद्रगुप्तावर चाणक्यांचा अंकुश होता. आज आपल्या धर्मसत्तेचा राज्यसत्तेवरचा अंकुश कमी पडतोय का? आमच्या पुण्यातच आता कोरोनाचे दोन लाखाहून अधिक रूग्ण झालेत. मुख्यमंत्री मात्र काही ठोस करण्याऐवजी एकच सांगत आहेत की ‘कोमट पाणी प्या...’ असं असूनही एकही धर्मगुरू त्यांना काही सांगत नाहीत किंवा मोदी म्हणाले होते ‘मी दोन कोटी लोकाना रोजगार देईन.’ प्रत्यक्षात बेरोजगारांची संख्या वाढतच चाललीय. धर्मदंड हातात असलेले आपले कोणतेही धर्मगुरू त्यांना काहीच बोलत नाहीत. मग राज्यसत्तेपुढं आजची धर्मसत्ता क्षीण झालीय का?
- हा काळच असा आहे. आपण एकमेकांना भेटत नाही आहोत. कोरोनामुळं भेटण्याचीच मुभा राहिली नाही. माणसांनीच एकत्र यायचं नाही. तरी समाजमाध्यमातून धर्मगुरू किंवा अन्य लोक प्रबोधन करत आहेत. राज्यसत्ता मात्र आता एका विशिष्ट स्थितीतून जात आहे. पूर्वी धर्मसत्ता, राज्यसत्ता, समाजसत्ता होती. आता दुर्दैवानं राज्यसत्तेच्या डोक्यावर अर्थसत्ता बसलीय. म्हणजे राज्य कोण चालवतं? राज्य निर्माण कोण करतं? तर कॉर्पोरेटस् करतात. पैसा महत्त्वाचा झालाय. त्यामुळं राज्यसत्तेच्या वर अर्थसत्ता आहे. जो घटक खाली असायला हवा होता तो वर गेलाय आणि वरचा धर्मसत्तेचा घटक सगळ्यात खाली गेलाय. ही परिस्थिती काही फार चांगली नाही. धर्मसत्ता आपापल्या परीनं काम करतेय.
म्हणजे हे सगळं निराशाजनक वातावरण आहे तर...
- अगदी तसंही म्हणता येणार नाही. धर्मसत्तेवरची लोकाची श्रद्धा कमी झालीय. विश्वास कमी झालाय. त्यामागची कारणं कोणती याचा विचार झाला पाहिजे. हे बघा, धर्मसत्तेला कमी लेखण्यासाठी खूप लोकानी काम केलं. गेल्या साठ-सत्तर वर्षात सिनेमा नावाच्या माध्यमानं तर हेच रंगवलं. एकही चांगला साधू किंवा सन्याशी सिनेमात दाखवला गेला नाही. प्रत्येक सिनेमात अत्यंत विषयलंपट, चोर, दरोडेखोर अशाच पद्धतीनं त्यांचं चित्रण केलं गेलं. दुसरं म्हणजे समाजातील वृत्तपत्रं किंवा वृत्तवाहिन्या या माध्यमांनीही चुकीचीच प्रतिमा रंगवली. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राष्ट्रात 15 ते 20 लाख साधू राहतात. त्याच्यात एखाद-दुसर्यानं काही चूक केली की त्याचाच प्रपोगंडा केला जातो. दिवसरात्र तेच दाखवले जातं, छापलं जातं. दोष कुणात नसतात? अन्य क्षेत्रात असं काही होतच नाही का? एखादा तरूण तेजपाल नैतिकभ्रष्ट निघाला म्हणून सगळ्या संपादकांना दोष द्यायचा का? किंवा एक सत्तर-ऐंशी वर्षाचा राज्यपाल विषयलंपटता दाखवतो म्हणून सगळे राजकारणी तसेच असतात का? चांगले राजकारणी नाहीत का? एखाद्या व्यापार्यानं कुणाला बुडवलं म्हणून सगळे व्यापारी चोर कसे ठरतील? तसेच एखादा संत, एखादा साधू चुकला तर बुद्धिपूर्वक काही देशी आणि काही विदेशी समदुःखी लोक एकत्र येऊन धर्मक्षेत्र बदनाम करण्याचं काम गेली साठ-सत्तर वर्षे निरंतर करतात आणि तेही सत्तेत असलेले करत आलेत. पाठ्यपुस्तकात जे आदर्श पुरूष म्हणून धडे दिले जातात त्यात किती साधूंवर धडे असतात? आजही आपल्याकडे अनेक साधू शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत. सामाजिक, कृषी, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात मोठे काम करत आहेत. त्यांचा चांगुलपणा कधीही दाखवला जात नाही किंवा शिकवला जात नाही. त्यातल्या एखाद्याकडून काही चूक झाली तर मात्र सगळे पेटून उठतात. त्यामुळे समाजमन घडवलं गेलं. साधूबद्दलची समज बदलली गेली. पूर्वी राजा धर्मक्षेत्राची काळजी घ्यायचा, त्यांचा आदर करायचा, त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा निर्माण करायचा. आता राजा कोणत्याही धर्मप्रमुखांसाठी, धर्मासाठी काहीच करत नाही. आमच्यासाठी त्यांच्याकडे एकही रूपयाचे बजेट नसते. मग अनेक धर्मातील भानगडी करणारे मोठे झाले. राजकारण्यांनी त्यांचा फायदा घेतला. भानगडी न करणारे हिंदू धर्मप्रमुख मात्र मागे राहिले कारण हे त्यांना कोणी शिकवलेच नाही. आमच्याकडे चार आण्याचं काम करून बारा आणे वसूल करण्याची वृत्ती नाही. ‘नेकी कर और कुएँ में डाल’ हीच शिकवण आपल्याला मिळालीय. चांगलं करायचं आणि विसरून जायचं. त्यांच्यात असं नव्हतं. दहा पैशाचं काम करायचं आणि दहा हजार रूपयांचा प्रचार करायचा.
ही मदर तेरेसा नावाची म्हातारी... दोन-चारशे मुलं तिनं सांभाळली असतील. त्या मुलांच्या नावावर मात्र कोट्यवधी रूपये मिळवून आणले. स्वतःच्या खात्यावर युरोपियन राष्ट्रात ठेवले आणि त्या मुलांकरता हॉस्पिटल काढतो म्हणून जुन्या यंत्रणा आणून टाकल्या. त्यातून ती नोबेलपर्यंत गेली. आमच्या लोकाना हे कळत नाही. आपल्या असंख्य मठात हजार, दोन हजार, पाच हजार, दहा हजार मुलांना दरवर्षी मोफत शिक्षण दिले जाते आणि तेही वर्षानुवर्षे. केजी टू पीजी पर्यंत शिक्षण देणारे हिंदू संत त्याची जाहिरात करत नाहीत म्हणून मागे आहेत. शिवाय अनेक माध्यमंही त्यांच्या हातातले बाहुले बनलीत. गिरीश कुबेर नावाच्या ‘लोकसत्ते’च्या संपादकानं कधी नव्हे ते ‘असंताचे संत’ हा मदर तेरेसाचा बुरखा फाडणारा अग्रलेख लिहिला होता, मात्र त्यांच्यावर इतका दबाव आला की तो दुसर्याच दिवशी माघारी घ्यावा लागला. असा दबाव आणून मुस्कटदाबी करण्याचं काम आपला धर्म करीत नाही. अशा माध्यमांचा भविष्यात लोकाना वीट येईल. सामान्य माणसंही त्यांची छी-थू करतील. त्यांची विश्वासार्हता संपून ती नष्ट होतील. हे व्हायचं नसेल तर माध्यमांनी अजूनही सुधारणं गरजेचं आहे. चांगलं ते स्वीकारणं आणि वाईट ते अव्हेरणं ही भूमिका असेल तरच ते काळाच्या ओघात टिकू शकतील. ती टिकावीत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी - चपराक दिवाळी अंक 2020