Friday, March 5, 2021

‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’

‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ या रमेश वाघलिखित पुस्तकाला ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही पुस्तके घरपोच मागविण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. आमच्या 7057292092 या क्रमांकावरही आपण आपली मागणी नोंदवू शकाल.

महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या धमन्यातून संतविचारांचा प्रवाह अखंडितपणे वाहत असल्याने आपल्यातील चांगुलपण शिल्लक आहे. विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत ते त्यामुळेच. महाराष्ट्रातील अनेक बुलंद दुर्ग आपल्याला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि धैर्याची साक्ष देतात त्याचप्रमाणे इथल्या मातीत रूजलेला संतविचार आपल्याला जगण्याचे बळ देतो. वारकरी संप्रदायाची पताका डोक्यावर घेऊन ती डौलाने मिरवताना अनेक आक्रमणांना, मानसिक द्वंदांना आपण सहजपणे सामोरे जाऊ शकलो. कोणतीही गोष्ट नेमकेपणाने सांगताना संतांनी समाजमनाचा अचूक वेध घेतला.

आपली पंढरीची वारी, आपला गणेशोत्सव आणि आपल्या दिवाळी अंकांची परंपरा या तीन गोष्टी माझ्या मनाला कायम भुरळ घालतात. आपल्या संस्कृतीची ओळख ठरणार्‍या या तीन गोष्टी जगभर पसरल्या. ‘मराठी संस्कृतीचे वैभव काय?’ असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी अभिमानाने या तीनही गोष्टींची महती जोरकसपणे मांडेन. काळाच्या ओघात यात काही दुष्प्रवृत्ती घुसल्या असल्या तरी त्यांना हुसकावून लावत आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे ही गोष्ट मुळीच अवघड नाही. या तीनही गोष्टींचा पाईक होण्याचे भाग्य मला मिळाले याबद्दल मी विधात्याच्या कायम ऋणात आहे.

सोवळेपणाची व्याख्या सांगताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, 

‘विटाळ तो परद्रव्य परनारी । त्यापासूनि दुरी तो सोवळा॥’

सोवळेपणाची ही व्याख्या माझ्या मनात जाऊन ठसली, बिंबली. ‘सदा नामघोष। करू हरिकथा । तेणे सदा चित्ता। समाधान॥’ हा संदेश माझ्या मनात बालपणीच रूजला आणि माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. संतांनी त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या, आचरणाच्या माध्यमातून जो संदेश दिलाय त्याचा अभ्यास केला आणि त्यांचा एखादा विचार जरी अंमलात आणला तरी आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असेच म्हणावे लागेल.

युवा कीर्तनकार, शिक्षक आणि अभ्यासक असलेल्या रमेश वाघ यांनी घरकोंडीच्या काळात दहा संतांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि त्यातून अतिशय साध्या-सोप्या भाषेत त्यांचे शब्दचित्र वाचकांसमोर उभे केले आहे. बालकुमारांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांनी वाचावे, अभ्यासावे आणि आचरणात आणावे अशी मांडणी या पुस्तकात केली आहे.

खरेतर प्रत्येक संतांच्या आयुष्यात अनेक आख्यायिका जोडल्या आहेत, चमत्कार जोडले आहेत. ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ असे म्हणतात ते उगीच नाही. त्यामुळे त्या त्या संतांच्या अनुयायांनी हे उद्योग केलेले असावेत. ज्या गोष्टी, घटना वैचारिक, वैज्ञानिक तर्काच्या कसोटीवर पटत नाहीत त्या निदान माझ्यासारखा बुद्धिप्रामाण्यवादी माणूस कधीही स्वीकारणार नाही! पण म्हणून संतांचे योगदानच नाकारायचे किंवा त्यांच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी उडवून लावायच्या असा करंटेपणा कोणीही आणि कधीही करू नये. यातील काही लेखात भगवंताची अगाध लीला वर्णन करताना परंपरागत ऐकत आलेले जे चमत्कार मांडले आहेत ते अमान्य करूनही या पुस्तकाचे श्रेष्ठत्व स्वीकारावेच लागेल. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे म्हणतात त्याप्रमाणे एक तरी संत समजून घ्यावा आणि तो समजून घेण्यास, किमान त्यांच्याविषयी जिज्ञासा निर्माण करण्यात हे पुस्तक यशस्वी ठरते. लेखकाचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी त्यांची शैली वाचकांना भुरळ घालते आणि या सर्व संतांविषयी आदर आणि श्रद्धाभाव जपण्यास, तो अधिक वृद्धिंगत करण्यास हातभार लावते. ‘अजानवृक्षाची मुळी मला टोचते आहे, ती तू दूर कर’ असा दृष्टांत योगीराज ज्ञानेश्वरमाउलींनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना दिला होता. या क्षेत्रातील थोड्याफार अनुभवाचा फायदा घेत मला माझे सन्मित्र रमेश वाघ यांना अधिकाराने सांगावेसे वाटतेय की भविष्यात तुम्ही संतांच्या जीवनाशी जोडलेले चमत्कार आणि त्यातून निर्माण झालेल्या अंधश्रद्धा दूर करा आणि संतविचारांचा तात्त्विक गाभा समर्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवा. हे कार्य करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला उदंड बळ देईल याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही.

ज्ञानियांचा राजा माउली, त्या काळातही भक्तिचा महिमा भारतभर पोहचविणारे संत नामदेव, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी असे म्हणत श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे संत सावता महाराज, सर्व संतांचे काका गोरोबाकाका, देवादेवांत भेद करू नका असा संदेश देणारे संत नरहरी सोनार, कुविचारांची हजामत करणारे संत सेना न्हावी महाराज, सर्वांगी चोखळा असलेले संत चोखामेळा, आपल्या गवळणी आणि भारूडांच्या माध्यमातून अलौकिक कार्य करणारे शांतिब्रह्म एकनाथ महाराज, मेणाहून मऊ असूनही गरज पडल्यास कठीण वज्रासही भेदण्याचा दुर्दम्य आशावाद पेरणारे, मायबापांपेक्षाही अधिक प्रेम करणारे आणि प्रसंगी शत्रूपेक्षाही अधिक घातपात करण्याचे सामर्थ्य बाळगणारे माझे आणि अर्थातच असंख्यांचे प्रातःस्मरणीय जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्यांच्या मनाच्या श्लोकाने प्रचंड क्रांती केली, ज्यांनी शक्ती आणि भक्तिची उपसना केली, ‘गुणवंतांची उपेक्षा करू नका’, ‘सत्कर्म करण्यात वय घालवा’ असा कृतिशील संदेश दिला ते समर्थ रामदास स्वामी अशा दहा संतांच्या जीवनावर आधारित असलेले हे दहा लेख म्हणजे दाही दिशांचा वेध घेणारे आणि आपल्या अंतःकरणातील भक्तीचे, प्रेरणेचे, प्रेमाचे, करूणेचे, मानवतेचे दिवे प्रज्वलित करणारे अस्सल साहित्य आहे.

मुख्य म्हणजे प्रत्येक जाती-धर्मातील, प्रांतातील या संतांनी माणसामाणसांत भेदाभेद करू नका असाच संदेश दिला. आजच्या अतिरेकी कट्टरतावादाच्या काळात संतसाहित्य हे फक्त दाखले देण्यापुरते आणि अनेकांसाठी पोटार्थी साधने उपलब्ध करून देण्याइतके सीमित झाले आहे. हे चित्र बदलून एका उदात्त, व्यापक आणि मानवी कल्याणाच्या चिरंतन सुत्रांचा अभ्यास करायचा असेल तर संतचरित्राच्या अभ्यासाला पर्याय नाही. रमेश वाघ यांच्यासारखे कोणतेही पूर्वग्रह नसलेले तरूण अभ्यासाच्या दृष्टीने या वाटेवरून चालत असतील आणि इतरांनाही इकडे आणण्यासाठी प्रेरित करत असतील तर हे खरे देवाचे काम आहे.

संतसाहित्य हाच माणसाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढू शकणारा शाश्वत पर्याय आहे. त्यामुळे या अस्थिरतेच्या, धकाधकीच्या, आपल्या संस्कार आणि संस्कृतीचे अधःपतन सुरू असलेल्या काळात कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञापेक्षा संतविचारांचे टॉनिकच अधिक प्रभावी ठरणार आहे. ती गुटी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अविरतपणे धडपडणार्या रमेश वाघ यांना भविष्यातील वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो.

घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक
‘चपराक’, पुणे
चलभाष-7057292092

10 comments:

  1. अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहिलेले मर्मस्पर्शी आणि प्रेरणादायी पुस्तक असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय व वाचनीय ठरले आहे.

    ReplyDelete
  2. लेखातून करून दिलेला पुस्तक परिचय पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करणारा आहे, वाचक वाचण्याची जिज्ञासा जागृत झाली आहे, मस्त...

    ReplyDelete
  3. लाॅकडाऊन चा इतका उत्कृष्ट वापर कोणी केला नसेल ! खूप खूप हार्दिक अभिनंदन !

    ReplyDelete
  4. सर , खूपच छान प्रस्तावना

    ReplyDelete
  5. संताचिये गावी प्रेमाचा सुकाळ , लेख वाचून पुस्तकविषयीची उत्सुकता वाढली दा

    ReplyDelete