Tuesday, March 9, 2021

आवाजाची नव्हे, सभागृहाची ‘उंची’ वाढवा!



महाराष्ट्राच्या विधिमंडळात आजपर्यंत खूप मोठे वक्ते होऊन गेलेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शेकापचे एन. डी. पाटील, केशवराव धोंडगे, आचार्य अत्रे, डॉ. बापूसाहेब काळदाते, रामभाऊ म्हाळगी, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, आर. आर. पाटील, मृणाल गोरे, विलासराव देशमुख, शालिनीताई पाटील, पतंगराव कदम अशा अनेकांनी महाराष्ट्राचं विधिमंडळ गाजवलेलं आहे. शरद पवार यांची स्वतःची विधिमंडळातली भाषणं अतिशय अप्रतिम आणि गाजलेली आहेत. 

विधिमंडळाचं समालोचन वाचणं हा अभ्यासाचा विषय असायचा. वृत्तपत्रांतून सविस्तर भाषणं छापून यायची आणि त्यावर गावागावात चर्चाही व्हायची. सध्या मात्र विधिमंडळाच्या सभागृहाचा दर्जा एवढा खालावलाय की लाईव्ह भाषणं सुरू झाली तरी अनेकजण लगेच चॅनल बदलतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं अपयश म्हणावं लागेल.

राज्यासमोरील विविध प्रश्नांचा अभ्यास असेल, पोटतिडिक असेल, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीविषयी आत्मियता असेल, मांडणार्‍या प्रश्नांविषयी कळवळा असेल तर संबंधितांचं भाषण आपोआप एका वेगळ्या उंचीला जाऊ शकतं. दुर्दैवानं विविध वक्तृत्व स्पर्धेतून पुढे आलेल्या काहींनी हवी तशी पोपटपंची करून सभागृहाची शान घालवली आहे. शालेय वक्तृत्व स्पर्धेतून पाठ केलेली भाषणं द्यावीत असं त्यांचं बोलणं असतं. आक्रस्ताळेपणा करत विषय भरकटत न्यायचा, पदाचा आणि अधिकारांचा वापर करत त्यावर आपल्या गटात चर्चा घडवून आणायची, यू ट्यूबसारख्या बिनखर्ची माध्यमांचा वापर करत आपापल्या वर्तुळात ते फिरवायचं आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची असा काहीसा प्रकार सध्या रूढ होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही ‘मोले घातले रडाया, नाही आंसू आणि माया, तैसा भक्तिवाद काय, रंगबेगडीचा न्याय’ अशा पद्धतीनं सभागृहात बोलत असतात. त्यामुळं त्यांची भाषणं अतिशय सुमार दर्जाची होताहेत.

विधिमंडळात कागदपत्रं हातात घेऊन चर्चा करायची असते, प्रतिपक्षांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं द्यायची असतात, शाब्दिक कोट्या करून टाळ्या घेणं यासाठी विधिमंडळाची जागा नाही हे उद्धव ठाकरे यांना मनोहरपंतांसारख्या अनुभवी नेत्यानं समजावून सांगणं गरजेचं आहे. पंत नाराज असले तरी ते उद्धवरावांना इतकं समजावून सांगू शकतील. मुळात ते ‘सर’ असल्यानं इतरांना शिकवण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. ते तुम्हाला शिकवतील, फक्त तुमची शिकायची तयारी असायला हवी. हे काम अजितदादाही चांगल्या पद्धतीनं करू शकतात. सध्याच्या काळात ते सर्वाधिक आनंदी दिसताहेत. त्यांच्याकडं भरपूर वेळ आहे. विरोधीपक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडत आहे आणि ठाकरे त्यांच्यावर नको नको ते आरोप करत आहेत, हे पाहत अजितदादा शांतपणे बसून आहेत. अजितदादा सध्या अजिबातच व्यक्त होत नाहीत आणि विरोधीपक्षही त्यांच्यावर काही टीका करत नाही. साडेतीन दिवसाच्या मधुचंद्राच्या आठवणी दोघंही जपताहेत की काय असं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळं अजितदादांनी किमान मुख्यमंत्र्यांना चार अनुभवाचे बोल सांगायला हवेत. महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना वारंवार सांगणारे, पश्चिम बंगालमध्ये काय झालं पाहिजे, अयोध्येत काय केलं पाहिजे याबाबत अखिल विश्वाला मार्गदर्शन करणार्‍या संजय राऊतांनी तरी हे मनावर घ्यायला हवं. त्यांनी विधिमंडळातील यापूर्वीची काही गाजलेली भाषणं मुख्यमंत्र्यांना वाचायला दिली तरी थोडाफार फरक पडू शकतो.

छगनराव भुजबळ यांचीही सुरूवातीची भाषणं अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू आहेत. तीही त्यांनी स्वतः काढून वाचायला हवीत. नवीन पिढीतल्या आमदारांची भाषणं तर वक्तृत्व कसं नसावं याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. त्यांची शैली हा एक भाग आहे आणि लोकांच्या प्रश्नांचं प्रतिबिंब त्यात किती प्रमाणात उमटलंय हा दुसरा भाग आहे. दुसर्‍या भागात हे सुमार आमदार काठावरही पास होत नाहीत, हे रोहित पवार यांनी सभागृहात वाचलेली कविता पाहता कोणीही मान्य करेल. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात युक्तिवाद काय केला जाणार असा खुळचट प्रश्न विधानपरिषदेच्या सभागृहात केला गेला. शेवटी लॉ कॉलेजचे प्राचार्य राहिलेल्या विधिज्ञ रामराजे निंबाळकरांना सभागृहात सांगावं लागलं की ‘‘हे असे विषय मांडता येत नाहीत, खाली बसा!’’ सभागृहाचं कामकाज कसं चालतं याचं प्राथमिक ज्ञानही नसलेले आपले सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत. हे पाहता विधिमंडळ हे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या प्रश्नांचं आणि आशा-आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे की नाही असा प्रश्न पडतो. यांना मुद्देसूद भाषणं करायची असतात की अभ्यासाचा दिखाऊ शो करायचा असतो हेच कळत नाही. हा कसला व्हरायटी शो आहे का? त्यासाठी भाषणाचे स्टंट केले जातात? लोकांच्या प्रश्नांशी यांना काही देणंघेणं आहे की नाही? अनेक आमदार सभागृहात आपलं तोंड बंद करून समाजमाध्यमातून कायम टिवटिव करत राहतात. ट्विटरवर व्यक्त होण्यापेक्षा तुमच्या बुद्धिचा पसारा काय आहे हे विधिमंडळात दिसू द्या ना! त्यासाठीच तुमच्या मतदारांनी तुम्हाला या सभागृहात पाठवलंय.

या सगळ्यात मला वाईट ते फडणवीसांचं. त्यांनी जी टीम तयार केलीय ती अत्यंत होपलेस आहे. त्यांच्यासोबतच्या बोलघेवड्यांमुळं फडणवीस विनोदाचा विषय ठरताहेत. राधाकृष्ण विखे-पाटील, राणाजगजितसिंह पाटील असे काँग्रेस-राष्ट्रवादीतून जे भाजपात आले त्यांची तर तोंडं बंदच आहेत. त्यांना काहीच बोलू द्यायचं नाही असं भाजपचं धोरण दिसतंय. ‘त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये आल्यावर आता त्यांना काय वाटतं?’ या विषयावर चर्चा ठेवली तरी ती रंजक होईल.  


सरकारनं अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांना भरीव मदत केली नाही. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना जो वीज पुरवठा करताय तो किमान दिवसा करा. महानगरातल्या फ्लेक्सवर, फलकांवर जी वीज वाया जाते तिथं बचत करता आली तर बघा. शेतकर्‍यांना पुरेशी आणि वेळेत वीज मिळावी यावर एकही आमदार बोलत नाही. एकमेकांवर टीका करणं, प्रसिद्धीच्या झोतात राहणं हेच अनेक आमदारांचं ध्येय दिसतं. ‘आम्ही पाच रूपयात शिवभोजन थाळी देतोय, थाळी वाजवायची का थाळी घ्यायची...’ हे सभागृहातलं भाषण होऊ शकतं का? विरोधीपक्षनेत्यांनी जे प्रश्न त्यांच्या भाषणातून उपस्थित केलेत त्यांना उत्तरं द्या. राजकीय सभेत काहीही बोललं तरी चालतं. तिथं टाळ्या वाजवायला, रेकॉर्डिंग करायला, ते भाषण व्हायरल करायलाही तुमचीच माणसं असतात. प्रत्येक चॅनलमध्ये तुमचा एखादा अर्णव गोस्वामी तुमची बाजू घ्यायला असतोच असतो. मग सभागृहाचे संकेत कोण पाळणार? तुमच्या भाषणानं तुमचं स्वतःचं तरी समाधान होतं का?

संजय राठोडच्या राजीनाम्यानंतर त्याचं पुढं काय करणार? सुशांतसिंह प्रकरणाचं पुढं काय झालं? गॅस-पेट्रोलचे दर वाढल्यानं सामान्य माणूस मेटाकुटीला आलाय. त्यावर काय करता येईल? केंद्रातले रोजगार कमी झालेत, त्यावर चर्चा करा. राज्यातले रोजगार किती वाढलेत ते सांगा. पोलीस भरती कधी करताय ते कळू द्या. स्पर्धा परीक्षातल्या भ्रष्टाचारावर बोला. सध्याच्या सत्ताधार्‍यांनी वेगळं काय केलंय? हे सांगायला हवं. फडणवीसांनी भ्रष्टाचार केलाय असं म्हणणं असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी. या सगळ्या विषयांवर विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही काही चमक दाखवायला हवी. भंडार्‍यात जी मुलं होरपळून गेली त्याचं पुढे काय झालं हा विषय अंबानीपेक्षा नक्कीच महत्त्वाचा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा आधुनिक महाराष्ट्र म्हणताना असे विषय फक्त श्रद्धांजली वाहून संपवू नका. ‘सामान्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करणारे निर्लज्ज राजकारणी’ अशी तुमची ओळख कृपा करून होऊ देऊ नका. तुमच्याविषयीच्या जिव्हाळ्यातून नाही तर सभागृहाच्या पावित्र्याची जपणूक म्हणून ही अपेक्षा व्यक्त करतोय.  

विधिमंडळ हे जर लोकशाहीचं मंदिर असेल तर इथं चांगले वक्ते येणं, त्यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करणं अपेक्षित आहे. या विधिमंडळात आजवर अनेक चांगली, वाङ्मयीन, गुणात्मक भाषणं केली गेलीत. लोकांचे प्रश्न जसे रस्त्यावर मांडले जातात तसे सभागृहात मांडले गेलेत. ज्या ताकतीनं शरद पवार बाहेर बोलायचे तसंच ते विधिमंडळात बोलायचे. चंद्रशेखर यांचा जो घणाघात संसदेच्या बाहेर असायचा तसाच तो सभागृहात दिसायचा. अटलजींचं जे विलक्षण काव्यात्मक वक्तृत्व त्यांच्या मतदारसंघात असायचं तसंच ते संसदेत बोलायचे. प्रमोद महाजन हे सभेत बोलताना लोक जसे मंत्रमुग्ध व्हायचे तशीच त्यांची तोफ सभागृहात धडधडत असायची. असं आपल्या आमदारांचं वक्तृत्व आहे का? ते सामान्य माणसांचे प्रश्न सभागृहात मांडत आहेत का? दोन-तीन टर्म आमदार असलेले काहीजण सभागृहात तोंडही उघडत नाहीत. त्यांची यादीही जाहीर करायला हवी. त्यांचे मतदार त्यांचं काय करायचं ते ठरवतील.

काही हितसंबंधी गटांचं संरक्षण करणं यापेक्षा सध्या कोणी काही विचार मांडताना दिसत नाही. लाचार आणि निष्ठावंतांच्या टोळ्या दिसतात पण स्वाभिमानी नेते सध्या दिसत नाहीत. लोकांच्या प्रश्नांना दिशा देणं, नवे कायदे करणं हे तुम्हाला जमत नसेल तर सभागृहाचा दर्जा आणखी खालावण्याऐवजी अशी अधिवेशनं बंद करा आणि काही नाचगाण्याचे, तमाशाचे कार्यक्रम करा. त्यामुळं तरी महाराष्ट्रातल्या जनतेचं निखळ मनोरंजन होईल आणि तुमच्याकडूनच्या अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येणार नाही.
- घनश्याम पाटील
7057292092


Monday, March 8, 2021

बाईच्या ‘भाईगिरी’चा अचूक वेध


काठियावाड हे गुजरातमधलं एक ठिकाण. तेथील ख्यातनाम वकील, शिक्षणतज्ज्ञ असलेल्या हरजीवनदास काठीयावाडी यांची गंगा ही लाडकी कन्या. गंगाला चित्रपट, नाटक, अभिनयाची आवड. चौदा वर्षाची असताना एका मैत्रिणीकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्यात हरवून गेली. अशातच मुंबईत काही काळ वास्तव्य करून आलेला रमणिकलाल हा तरूण तिच्या वडिलांकडं हिशेबनीस म्हणून कामाला लागला. त्याच्याकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्याच्याकडं आकर्षित झाली. परिणामी गंगानं तिच्या आईचे दागिने, काही रोकड उचलली आणि दोघेही मुंबईला पळून आले...

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी गंगाची कहाणी. पुढे रमणिकलालनं फसवून तिला पाचशे रूपयात एका कुंटणखान्यात विकलं आणि गंगाचा गंगूबाईकडचा प्रवास सुरू झाला. तिथं तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. शौकतखान या पठाणानं तर तिचे हाल हाल केले. त्याच्या मनात येईल तेव्हा तो यायचा, तिला ओरबाडून निघून जायचा. या जुलूमाचा कहर झाल्यावर गंगूबाईनं थोडं धाडस दाखवलं आणि ती तडक करीम लालाकडं गेली. त्याला आपली आपबिती सांगतानाच तिनं त्याला प्रेमानं जिंकून घेतलं आणि ती त्याची ‘राखी बहीण’ झाली.

या घटनेनंतर मात्र तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ग्राहकांच्या शरीराची भूक भागविणारी गंगूबाई ‘घरवाली’च्या निवडणुकीसाठी उभी राहिली आणि निवडुनही आली. नंतर ती ‘बडे घरवाली’ही झाली. तिचा राजकारणातला वावर वाढला. कुंटणखाण्यातल्या स्त्रियांसाठी तिनं काम उभं केलं. ती इतकी पुढं गेली की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिला हा धंदा सोडायला सांगितल्यावर ती त्वेषानं म्हणाली, ‘‘तुम्ही मला तुमची पत्नी म्हणजे मिसेस नेहरू बनवायला तयार असाल तर मी एका पायावर हा धंदा सोडण्यास तयार आहे...’’

परिस्थितीला, आमिषाला बळी पडलेल्या, फसवून आणलेल्या, चंगळवादाची चटक लागलेल्या, सूडानं पेटलेल्या, अन्याय-अत्याचारानं ज्यांचं जगणं नरक करून सोडलं अशा अकरा लेडी डॉनची करूण, रोमांचकारी, धाडसी, हतबल, क्रूर जीवनकथा मांडलीय नाशिक येथील लेखिका सुरेखा बोर्‍हाडे यांनी. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या ‘बाईची भाईगिरी’ या पुस्तकातून स्त्री जीवनाची अशी कितीतरी रूपं आपल्याला वाचता येतील, अनुभवता येतील. प्रत्येक क्षेत्रात पुरूषांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध केलेलं असताना गुन्हेगारी जगतातही त्या मागं नाहीत याची झलक दाखवणारं हे पुस्तक. अर्थात यातून त्यांचं उदात्तीकरण केलं नाही तर त्यांच्या मनोवृत्तीचा अचूक वेध घेऊन समाजाला जागं करण्याचं काम सुरेखा बोर्‍हाडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केलंय. ही सर्व शब्दचित्रं वाचताना वाफ फार काळ कोंडून ठेवली तर त्याचा स्फोट अटळ असतो याची जाणीव वाचकांना होते.

मध्यप्रदेशच्या चंबळ खोर्‍यात परिस्थितीमुळं पायात चाळ बांधून सुंदर रात्री सजवण्याऐवजी पुतळाबाई नावाची एक बहादूर डाकू दुसर्‍यांना फक्त धमकावत असते आणि कुणापुढंही हतबल न होता गोळीबार करत असते. तिचा एक हात कापण्यात आला. तिची निर्दोष बहीण आणि भाऊ, नवरा सुल्ताना हे सगळे पोलिसांच्या गोळीला बळी पडले. इतकं होऊनही तिच्या टोळीची जी दहशत होती ती पुरूषी अहंकार चेपून काढणारी होती. ‘क्वीन ऑफ मुंबई’ असं जिचं वर्णन केलं जातं ती ‘जुर्म की हसीना’ म्हणजेच हसीना पारकर हिच्यावर मध्यंतरी चित्रपटही आला. परिस्थितीला बळी पडलेल्या हसीनाला नाईलाजानं गुन्हेगारीत यावं लागलं. 2014 ला तिची संपत्ती पाच हजार काटींची होती असं सांगितलं जातं. या हसीना पारकरचे अनेक पदर सुरेखा बोर्‍हाडे यांनी त्यांच्या लेखणीतून नेमकेपणानं उलगडून दाखवलेत.

भारतातलं सर्वात मोठं सेक्स रॅकेट चालवणारी आणि ‘सेक्सरॅकेटची मल्लिका’ अशीच ओळख असणारी सोनू पंजाबन उर्फ गीता अरोडा, मुंबईची पहिली माफिया क्वीन म्हणून प्रसिद्धीस आलेली जेनाबाई दारूवाला, गोरगरीब तमिळ लोकांचं आदरस्थान असलेली, मादक पदार्थांचा व्यापार करणारी मुंबईतील सर्वात श्रीमंत महाराणी महालक्ष्मी पापामणी, 1989 ते 1994 मध्ये पोरबंदर विभागातून मेहर समाजाची पहिली आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम करणारी आणि 103 गुंड सदस्यांची टोळी चालवणारी ‘गॉडमदर’ संतोकबेन जडेजा, अवघ्या अडतीस वर्षांच्या आयुष्यात जीवनाचे अनेक रंग अनुभवणारी, पुरूषी विकृतीला बळी पडलेली आणि नंतर रणरागिणी होत व्यवस्थेच्या विरूद्ध बंड पुकारणारी द बैंडिट क्वीन फुलनदेवी, ‘प्रेममूर्ती डाकुराणी’ अशी ओळख असलेली सीमा परिहार, आपल्या डोळ्यादेखत आपल्या नवर्‍याचा बनावट एन्काउंटर पाहून सूडाच्या भावनेनं पेटून उठलेली अशरफ उर्फ सपना आणि कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र घालणारी पतीपरायण आशा गवळी अशा खलनायिकांचं चित्रण या पुस्तकात करण्यात आलं आहे.

यातील प्रत्येकीच्या जीवनाचा आढावा घेताना सुरेखा बोर्‍हाडे यांनी त्यांचा आधी ‘स्त्री’ म्हणून विचार केलाय. समाजानं त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारला, या लेडी डॉननी त्यांच्या परीनं त्यांचा बदलाही घेतला मात्र या दलदलीत त्या कशा अडकल्या, त्यांचं जगणं नेमकं कसं होतं, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, त्यांची झालेली फसवणूक-पिळवणूक, त्यांची हतबलता, शस्त्र हातात घेण्यापूर्वी आणि ते घेतल्यावरची मानसिकता, समाजाचा दृष्टिकोन अशा सगळ्या अंगानी अतिशय नेमक्या शब्दात, सुस्पष्टपणे मांडणी केल्यानं हे पुस्तक या महिला गुन्हेगारांचा जीवन परिचय करून देण्याबरोबरच अनेकांच्या डोळ्यांवरील झापडं बाजूला सारणारं आहे.

उत्तम ललित लेखिका असलेल्या सुरेखा बोर्‍हाडे यांनी या पुस्तकात कुठंही भाषेचा फुलोरा फुलवला नाही. जे आहे, जसं आहे तसं मांडण्याची आणि त्यातून त्यांचं जीवन वाचकांसमोर उभं करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मैत्रेयी-गार्गीपासूनचा वारसा सांगताना आणि दुर्गा-कालिका म्हणून तिची पूजा करताना आपण समाज म्हणून किती नालायक आहोत हे सातत्यानं दिसून आलंय. यातील अकरा व्यक्तिरेखा या आपल्या मुर्दाड मानसिकतेच्या वेलीवर आलेली फळं आहेत. हे असं भविष्यात व्हायचं नसेल तर अजूनही आपला दृष्टिकोन बदलायला हवा याचं भान देणारं हे पुस्तक आहे. महिला दिनाचे, स्त्री शक्तिच्या गौरवाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरू असताना स्त्रियांचं हे रूपही जरूर अभ्यासावं. त्यातून काही बोध घेता आला तर उत्तम! अन्यथा ‘बाईची भाईगिरी’ पुरूषी अहंकाराची मक्तेदारी नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही हे तर खरंच.
- घनश्याम पाटील
7057292092

‘चपराक’चे हे आणि इतरही पुस्तके घरपोहच मागविण्यासाठी आमच्या  www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. आमच्या 7057292092 या क्रमांकावरूनही आपण आपली मागणी नोंदवू शकाल.





Saturday, March 6, 2021

भारतीय संस्कृतीचे संवर्धक

कणेरी मठाचे प्रमुख प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची ‘चपराक’चे संस्थापक संपादक घनश्याम पाटील यांनी ‘चपराक दिवाळी अंक 2020’साठी घेतलेली विशेष मुलाखत. चपराक मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमच्या अन्य पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी संपर्क - 7057292092
 


मराठवाड्यातील
श्रीरामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या श्रीसमर्थ जांब येथे चैतन्य ज्ञानपीठाने 7, 8, 9 डिसेेंबर 2019 ला आयोजित केलेले ‘समर्थ महासंगम’ अतिशय उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. भय्याजी जोशी, कणेरी मठाचे प्रमुख प. पू.  अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, प. पू. स्वामी गोविंददेव गिरी अशा ऋषितुल्य माणसांच्या उपस्थितीत हा महासंगम झाला. यावेळी श्रीसमर्थभक्त असलेले आमच्या ‘चपराक’ परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. दिलीपजी कस्तुरेकाका यांच्या पुढाकारातून ‘चपराक’चा एक विशेषांक प्रकाशित करण्यात आला. जांबमध्ये त्याचे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रकाशन झाले. अर्थात, इतक्यावरच न थांबता पुढे या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत देणारा आणखी एक विशेषांकही ‘चपराक’ने प्रकाशित केला.

जांब येथे या महासंगमासाठी आम्ही ‘चपराक’ परिवाराचे सर्व सदस्य पोहोचलो तेव्हा आधी आम्हाला श्री. काडसिद्धेश्वर स्वामींना भेटायचे होते. गोविंददेव गिरी अर्थात किशोरजी व्यास पुण्यात भेटत असल्याने त्यांचा कृपालोभ कायम असतो. काडसिद्धेश्वर महाराजांविषयी मात्र बरेचसे ऐकून होतो.

‘त्यांची निवासाची व्यवस्था जालन्यात केलीय की संभाजी नगरला?’ हे जाणून घेण्यासाठी कस्तुरेकाकांकडे विचारणा केली. त्यांनी सांगितलं, ‘‘या परिसरातील आर्थिक दुर्बल घटकांतील पाच गरीब शेतकर्‍यांची निवड त्यासाठी केली आहे. स्वामीजी रोज एकाच्या घरी वास्तव्यास आहेत. इथल्या सामान्य माणसाची दिनचर्या, त्याच्या कष्टाची, परिश्रमाची दखल, या भागातील शेतकर्‍यांचं जगणं, काहींनी त्यांच्या पद्धतीनं केलेले वेगळे प्रयोग हे सगळं जाणून घेण्यासाठी स्वामीजींनी तशी इच्छा व्यक्त केली आणि ते अशा शेतकर्‍यांकडं राहत आहेत...’’

पुढे अधिक माहिती घेतली असता हेही कळलं की ते ज्यांच्या ज्यांच्या घरी होते त्यांनाही त्यांनी यथाशक्ती सहकार्य केलं होतं.

धर्म आणि आध्यात्माच्या चाकावर आपल्या संस्कृतीचा गाडा धावतोय. कोणत्याही धर्माची भूमिका ही द्वेषमूलक नाही. त्यात आपण ‘कट्टरता’वादाचं जे विष टाकलंय त्यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्यात. माणूस माणसापासून वेगळा होतोय. अशा सगळ्या परिस्थितीत धर्मप्रमुख म्हणून काडसिद्धेश्वर स्वामी यांच्यासारखे सत्पुरूष नेमका काय विचार करतात?, धर्माविषयी, देशाविषयी, सध्याच्या परिस्थितीविषयी त्यांच्या काय धारणा आहेत?, सामान्य माणसाच्या जीवनात धर्म काही परिवर्तन घडवतो का?, ‘धर्म म्हणजे अफूची गोळी’ असा अपप्रचार गेली अनेक वर्षे सुरू असूनही धर्माचा पाया इतका भक्कम कसा? असे अनेक प्रश्न मनात होते आणि त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करायची होती. हा योग या अंकाच्या निमित्तानं जुळून आला. कणेरी मठाचे काम आणि सामान्य माणसाच्या मनातील काही महत्त्वाचे प्रश्न यानिमित्तानं त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली आणि कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठात बोलावलं.

‘चपराक’च्या टीमसह मनात असंख्य प्रश्नांचं मोहोळ घेऊन आम्ही तिथं पोहोचलो आणि तिथून निघताना मात्र कृतार्थभावानं परतलो. अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरं मिळाली होती. काही प्रश्नांचा पाठपुरावा आपण भविष्यातही करणार आहोत. कोणताही धर्म हा जोडण्याचंच काम करतो, तो माणसाला माणसापासून तोडत नाही हे मात्र नक्की. धर्मदंड हातात असलेली माणसं लोककल्याणासाठी नेमकं काय करतात हे जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न...

कोरोनाच्या काळात उद्भवलेल्या समस्येमुळं प्रवासाला मर्यादा असतानाही आम्ही पुण्यातून थेट कणेरीला निघालो. कोल्हापूर ओलांडल्यावर मनात धाकधूक होती. धर्मशास्त्रातल्या एका कृतिशील विद्वानांशी बोलताना कसलाही आडपडदा न बाळगता काही प्रश्न उपस्थित करणं गरजेचं होतं. ते करतानाच त्यांचा कुठंही अनावधानानंदेखील उपमर्द होऊ नये याची काळजी घ्यायची होती. सध्याच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचं रूप पाहता मुलाखतीसाठी येणार्‍या पत्रकाराविषयी अनेकांच्या मनात आकसच असतो. सत्य जाणून घेणं, चांगले विचार पोहोचवणं, त्यांच्या कामाची यथायोग्य दखल घेणं यापेक्षा समोरच्याला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित करून आपण कसा तीर मारला यातच धन्यता मानणारे अनेक महाभाग असल्यानं माध्यमांविषयी अनेकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाल्यात.

मुलाखतीसाठी मठात बोलावल्यानं तिथल्या वातावरणाविषयी काही कल्पना रंगवल्या होत्या. प्रत्यक्षात तिथं पोहोचल्यावरचं चित्र मात्र वेगळंच होतं. त्या अतिभव्य मठातील आवारात गेल्यावर एक वेगळीच चैतन्यदायी शक्ती आम्हाला जाणवत होती. आम्ही स्वामीजींची विचारणा करताच तिथल्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आलं. आम्ही कार्यालयात पोहोचलो तर ते एक प्रशासकीय कार्यालय वाटावं असं चित्र होतं. त्याठिकाणी अनेक विभाग केले होतेे. शिक्षण, आरोग्य, कृषी, धर्मादाय अशी विभागणी आणि प्रत्येक ठिकाणी त्या काम पाहणार्‍या संबंधितांची नावं. त्यातही अनेक निवृत्त मान्यवर प्रशासकीय अधिकार्‍यांची नावं पाहून या सगळ्यांविषयी जिज्ञासा वाढली. ‘स्वामीजी कुठं आहेत? त्यांनी मुलाखतीसाठी बोलावलंय...’ असं सांगताच त्यांनी आम्हाला हॉस्पिटलला जायला सांगितलं. इथून काही अंतरावर मठाच्या वतीनं एक हॉस्पिटल चालवण्यात येतं आणि स्वामीजी रूग्णसेवेसाठी तिकडंच असतात असं कळलं.

आम्ही आमचा मोर्चा तिकडं वळवला. तिथून जाताना रस्त्यात सगळीकडं मठाच्या कामाच्या खुणा दिसत होत्या. अनेक शाळा, व्यायामशाळा, गोशाळा, ज्येष्ठ नागरिकांचे संघ, उद्यानं, पतपेढी, कामागारांसाठीच्या वसाहती असं सगळं चित्र पाहून आम्ही एखाद्या प्रख्यात औद्योगिक वसाहतीत तर नाही ना? असा भास निर्माण होत होता. हे सगळं पाहत आम्ही हॉस्पिटलजवळ पोहोचलो. ती चौदा मजली भव्य वास्तू. सध्या तिथं कोविड उपचार केंद्र करण्यात आलंय आणि कोरोनाच्या रूग्णांवर मोफत उपचार सुरू आहेत. स्वामीजींविषयी चौकशी करताच त्यांनी सांगितलं, मागच्या बाजूला ज्या खोल्या आहेत त्यातील एका खोलीसमोर ‘जॅग्वार’ गाडी असेल. त्या खोलीत जा...
आम्ही तिथं पोहोचलो. आम्हाला वाटलं इथं आमची चौकशी होईल, विचारणा होईल...

प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र होतं.

एक डॉक्टर दांपत्य कोरोनामुळं तिथंच उपचार घेऊन बरे झाले होते. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो आणि तोही डॉक्टर आहे. सध्या तो भारतात, कोल्हापूरात आहे आणि त्यालाही काही काळ या रूग्णसेवेच्या कार्यात सहभागी करून घ्यावे म्हणून ते विनवणी करत होते...

आम्ही विनाअडथळा तिथं पोहोचलो. ‘पुण्याहून आलोय’ हे कळताच स्वामीजींनी आम्हाला ‘आधी भोजन करून घ्या’ असा प्रेमळ आदेश दिला. कोरोनाच्या काळातही ही मंडळी इथपर्यंत आलीत याचं त्यांच्या डोळ्यात कौतुक दिसत होतं. ‘थोड्या वेळापूर्वीच आमचं लखन जाधव यांच्या ‘सव्यासाची गुरूकुलम’मध्ये जेवण झालंय’ हे सांगितल्यावर त्यांचं समाधान झालं.

मुलाखत सुरू होण्यापूर्वी आम्ही जांबच्या कार्यक्रमाविषयी बोललो. तेव्हापासून त्यांना भेटण्याची इच्छा होती हेही आवर्जून सांगितलं.  मी त्यांना म्हणालो, ‘‘आमच्या पिढीच्या मनात काही प्रश्न आहेत. कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत. धर्मपीठाचे प्रमुख म्हणून तुम्ही आम्हाला भारतातल्या शेवटच्या मोजक्या आशास्थानापैकी एक वाटता. आपला धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, धर्मसंस्था, रूढी-परंपरा अशा सगळ्यांविषयी कुणासोबत बोलायची सोय राहिली नाही आणि बोललेच तर अभ्यासपूर्ण उत्तरंही मिळत नाहीत. त्यामुळं कदाचित काही प्रश्न तुम्हाला आवडणार नाहीत. त्यामुळं एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तरी चालेल पण ते उपस्थित करणं मला माझं कर्तव्य वाटतं. कणेरी मठाची चैतन्यमय माहिती आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवणं आणि वर्तमान परिस्थितीवरील तुमची मतं जाणून घेणं हा या संवादाचा उद्देश आहे.’’

त्यावर त्यांनी समाधानानं एक स्मित केलं आणि जे वाटेल ते मोकळेपणाने विचारण्याची, बोलण्याची परवानगी दिली. त्याचा हा सारांश खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.

नमस्कार स्वामीजी.
आपल्या मठाचा लौकिक मोठा आहे. आपण या माध्यमातून जे उभं केलंय ते प्रचंड आहे. आधी आपण या सगळ्याविषयी बोलूया. आपला मठ नक्की काय आहे? इथं कोणकोणते उपक्रम चालतात? मठाच्या परंपरेविषयी काय सांगाल?


- हा मठ जवळजवळ चौदाशे ते पंधराशे वर्षांपूर्वीचा आहे. या मठाला आत्तापर्यंत 48 मठाधिपती होऊन गेलेत. या मठाच्या कार्याची व्याप्ती महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यात आहे. सध्या मात्र भारतभर कार्य सुरू आहे. हे कार्य एकतर धार्मिक आहे. मठाचे कोट्यवधी अनुयायी आहेत. ज्या त्या गावात जाणं-येणं होतं. प्रवचन, कीर्तन, भजन, पूजन हे तर नेहमीप्रमाणं विनाअडथळा सुरूच राहतं.

हो... ही एक चैतन्यभूमी आहे. एक प्रेरणादायी, ऊर्जादायी केंद्र म्हणून तुम्ही मोठे कार्य करीत आहात. मठ म्हणून होणार्‍या या नियमित उपक्रमाशिवाय नव्या भारताच्या पुनरूत्थानासाठी इथं आणखी काय होतं?

- होय. या उपक्रमासह आता भारतीय संस्कृतीच्या रक्षण आणि संवर्धनासाठी आम्ही एक पाऊल पुढं टाकलंय. भारतीय सभ्यता किंवा संस्कृती काय आहे याचं दर्शन घडविण्यासाठी आपण मठात एक वस्तुसंग्रहालय बनवलंय. ते सगळं एका ठिकाणी पहायला मिळावं हा उद्देश आहे. आज खेड्यातला ‘गाव’ हरवलाय. तिथली संस्कृती काय होती इकडं आपलं अक्षम्य दुर्लक्ष होतंय. मग ते कुठंतरी दाखवता येईल काय म्हणून आम्ही मूर्तिरूपात एक आभासी गाव उभं केलंय. जवळपास एक हजार मूर्ती आम्ही तयार केल्यात. इथं सुरूवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहासदृश्य भागातून आत जाताना प्राचीन भारतातील ऋषिमुनींचे कोरीव पुतळे बनवले आहेत. बलुतेदार म्हणजे काय याची शिल्पे इथे पहायला मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पे त्यांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवितात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर याच्या हुबेहुब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.

सगळे आबालवृद्ध हे कुतूहलानं पाहतात. आम्ही कुठं होतो, कुठं आहोत आणि कुठं जातोय हे त्यातून कळतं. युवकांनाही काय करू शकतो याची प्रेरणा मिळते. कारागिराच्या माध्यमातून पूर्वी आपल्याकडं काय काय व्हायचं हे त्यांना कळतं. सध्या फक्त साधनं बदललीत, तंत्रज्ञान-सुविधा बदलल्यात. कामं मात्र तीच आहेत. त्याची किमान ओळख त्यांना होते. आपल्या देशात ‘कामगार’ पद्धत नव्हती. ‘कारागीर’ पद्धत होती. कामगार हा मोबदला घेऊन काम करतो. कारागीर मात्र छोटा असेल किंवा मोठा असेल तो मालक असतो. समाधानासाठी आणि व्यवसायवृद्धिसाठी तो काम करतो. आपला देश कारागिरांचा होता. त्यामुळं जगात सर्वात चांगला जीडीपी आपला होता. प्रत्येकजण मालक होता. आपली शिक्षणव्यवस्थाही त्यावरच अवलंबून होती. गुरूकुल शिक्षणपद्धती कशी होती, सणवार कसे होते, क्रियाकलाप कसे चालायचे हे सगळं इथं दाखवलंय. आमचे प्राचीन-प्रतिभावान लोक कसे होते हे कळावे म्हणून 28-30 लोकाचं चरित्र इथं मूर्तितून दाखवलंय. भारताबाहेर किंवा जगात ज्यांनी मोठं योगदान दिलंय आणि ज्याला भारतीय संस्कृतीचा सुगंध आहे अशा साहित्य, कृषी, वैद्यकीय, राजकीय, नृत्य, गायन, वादन, तर्कशास्त्र, योगशास्त्र अशा सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या जीवनपटाचा त्यात समावेश आहे. सगळे शोध, सगळी कामं विदेशी संधोधकांनीच केली असा जो अपप्रचार केला जातो त्याला हे उत्तर आहे. आपल्या संस्कृतीची आणि कर्मकुशलतेची दखल याठिकाणी घेतली आहे. आपला वैभवशाली समृद्ध वारसा आजच्या पिढीला कळायला हवा. हे पाहून अनेकजण प्रभावीत होतात. आपल्या संस्कृतीचं रक्षण-संवर्धन त्यातून होतं. त्यांना प्रेरणा मिळते. शिवाय यातून पर्यटनालाही चालना मिळते. रोजगार मिळतो.

तुम्ही कृषीक्षेत्रात मोठं योगदान दिलंय. शेतकर्‍यांविषयी तुम्हाला अपार जिव्हाळा वाटतो हे आम्ही जांबमध्ये अनुभवलंय. आपल्या मठाची बरीच शेती आहे. तिथं काय प्रयोग केले जातात? धर्मक्षेत्रात कार्यरत असूनही सगळी कर्मकांडं बाजूला सारत तुम्ही शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी काम करता. त्याविषयी काय सांगाल...

- हो. आपल्या मठाची दोन-तीनशे एकर शेती आहे. त्यात गेली 25-30 वर्षे आम्ही सेंद्रिय शेती करतो. प्राचीन काळापासून ऋषी आणि कृषी संस्कृती सर्वश्रेष्ठ आहेत. धर्मसंस्था ही कृषीक्षेत्राशी सबंधित आहे. कालांतराने त्यात काही बदल झाले. मठाची गोशाळा आहे, जिथं हजारएक देशी गायी आहेत. देशातल्या वीस-बावीस प्रजाती तिथं तुम्हाला पहायला मिळतील. ‘आज मरणार्‍या गायी उद्या मरतील’ म्हणून ठेवायच्या असं आम्ही केलं नाही. आमच्या सगळ्या गायी धष्टपुष्ट आहेत. त्यांची आम्ही योग्य ती काळजी घेतो. कत्तलखान्यात जाणार्‍या गायी, काही कारणानं शेतकर्‍यांना सांभाळता न येणार्‍या गायी आम्ही स्वीकारल्या. त्यांचा सांभाळही आम्ही चांगल्या पद्धतीनं करतो. त्यामुळं त्याही धष्टपुष्ट झाल्यात. आम्ही चांगलं दूध, तूप उपलब्ध करून देतो. शेतकर्‍यांनी गायींचं संवर्धन करावं म्हणून आम्ही दरवर्षी जिल्ह्यात दहा दिवस पदयात्रा काढून त्यांचं प्रबोधन करतो. पन्नास ते सत्तर गावात जाऊन देशी गायींचं महत्त्व, सेंद्रीय शेती याची माहिती देतो. माणसाचं आणि जमिनीचंही आरोग्य कसं पोषक राहील हे ग्रामस्थांना समजावून सांगतो. त्यामुळं आमच्या आजूबाजूच्या गावात दोन लाखाहून अधिक देशी गायींची संख्या वाढलीय. सेंद्रीय पद्धतीनं शेती करण्याचं प्रमाण वाढलंय.

कमीतकमी आपल्या कुटुंबापुरतं तरी चांगलं पिकवावं याचं भान लोकाना आलंय. त्यासाठी आम्ही तिथं एक मॉडेल केलंय. एक एकरमध्ये शेती, एक एकरचा गोठा, तिथंच गोबर गॅस, खतनिर्मिती, सोलरची वीज, जवळपास शंभर प्रकारची पिकं आम्ही त्या एक एकरमध्ये घेतो. तसं बघितलं तर दोनशे प्रकारच्या वनस्पती त्या शेतात आहेत. बांधावर चंदन आणि अन्य झाडं लावलीत. ती दहा-पंधरा वर्षात कोट्यवधी रूपये मिळवून देतात. शेतकर्‍यांचं हे ‘फिक्स डिपॉझिट’ आहे याची जाण त्यांना आली. तिथंली फळं-फुलं विकली तरी रोज किमान चार-पाचशे रूपये त्या परिवाराला मिळतात. त्यांना बाहेर मजुरीला जावं लागू नये आणि त्यांना बाहेरच्या मजुराची गरजही भासू नये असं आमचं नियोजन असतं. तशी व्यवस्था निर्माण केलीय. कपडे, काडेपेटी, मीठ, साबण अशा काही गोष्टी सोडल्या तर त्या परिवारानं काहीही विकत आणू नये, त्याला लागणार्‍या सर्व अत्यावश्यक गोष्टींची निर्मिती त्यानंच करावी असा आमचा प्रयत्न असतो. सात-आठ वर्षापासून आम्ही हा प्रयोग केलाय. त्याची देशभर दखल घेतली गेली.

आपल्याकडं इतक्या गायी आहेत. मग त्याआधारे दूध-तूप विक्रीशिवाय आणखी कोणते जोडव्यवसाय केले? त्याला कसा प्रतिसाद मिळतोय? शेतकर्‍यांनी आणखी कोणते प्रयोग करावेत असं तुम्हाला वाटतं?

याच गायीपासून आमचं पंचगव्य केंद्र आहे. त्यात गोमूत्राचा अर्क आहे. वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे अर्क आम्ही निर्माण करतो. मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, महिलांच्या अंगावरून जाणे, हृदयविकार अशा विविध आजारांसाठी आम्ही विविध अर्क तयार करतो. त्यापासून गुडघेदुखीसाठी आता आम्ही औषध तयार केलंय. गोशाळा स्वावलंबी बनेल आणि विविध रूग्णांना उपचाराला मदत होईल अशी चाळीस-पंचेचाळीस प्रकारची औषधं आम्ही तयार केलीत. आमची कंपोष्टाची कंपनी आहे. त्यातून विविध प्रयोग केले जातात. शेतकर्‍यांना हे सगळं करता यावं म्हणून कार्यशाळा होतात. दोन दिवस इथं त्यांची राहण्याची-खाण्याची व्यवस्था केली जाते. त्यांना हे सगळं समजावून सांगितलं जातं. त्यांनी आपापल्या गावात हे प्रयोग करावेत असा त्यामागचा उद्देश असतो. तसं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं.

शिवाय इथं प्रशिक्षित होऊन गेलेल्या शेतकर्‍यांनी त्यांच्याकडं हे प्रयोग केले की त्यानं पिकवलेल्या मालाच्या मार्केटिंगचीही व्यवस्था करतो. त्याच्या सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या भाजीला किमान चाळीस रूपये किलो बाजारभावाची हमी आम्ही त्यांना देतो. दुसरीकडं हा माल  साठ रूपये किलोने विकत घेणारे उद्योजकही आम्ही तयार केलेत. त्या दोघांत योग्य तो समन्वय साधला जातो. या दोन्हीत वीस रूपयांचा जो नफा होतो त्यातून असंख्य गरजूंना रोजगार मिळतो. लोकाना विषमुक्त अन्न मिळावं आणि शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावा असा आमचा प्रयत्न असतो.

या शेतकर्‍यांसाठी आमचे कृषी विज्ञान केंद्रही कार्यरत आहे. तिथं याच शेतकर्‍यांच्या घरातील महिलांना विविध प्रशिक्षणं दिली जातात. त्यांचे बचत गट तयार केलेत. त्याही चांगल्या पद्धतीनं काम करून पैसे मिळवतात. वेगवेगळ्या शहरात, गावात हे विषमुक्त अन्न पाठवलं जातं. या शेतकर्‍यांच्या अनुभवाचा लाभ इतरांना होतो. त्यांनी केलेल्या प्रयोगावर प्रकल्प उभारले जातात. चांगल्या गोष्टी पुढे जातात. त्यांना लागणारे बी-बियाणे, खते, कंपोष्ट आम्ही पुरवतो. सध्या करोनामुळे थोडा व्यत्यय येतोय पण आजूबाजूच्या गावात आम्ही काम करत आहोतच. आपली गोशाळा बघून निदान शंभर-दोनशे गोशाळा तयार झाल्यात. आयटीतले अनेक तरूण हा प्रयोग बघून शेतीकडं वळलेत. आमच्या कृषीविज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ गावोगाव जाऊन काम करतात. देशी गायींचे आम्ही प्रदर्शन भरवतो. जे कोणी चांगल्या देशी गायी सांभाळतात त्यांना दहा हजार-वीस हजार-पन्नास हजार-एक लाख अशी प्रोत्साहन बक्षीसंही देतो. मठाच्या वतीनं त्यांना शाबासकीचं प्रशस्तीपत्रही दिलं जातं.

या कोविडच्या काळात तुम्ही हॉस्पिटलची चौदा मजली इमारत ‘कोरोना उपचार केंद्र’ म्हणून चालवताय. त्याविषयी काय सांगाल? आरोग्यक्षेत्रात तुम्ही कोणते प्रयोग केले? इथं उपचार घेणार्‍यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात?

- सामान्य लोकाना कॉर्पोरेटच्या सुविधा उपलब्ध करून देणं हा आमच्या हॉस्पिटलचा उद्देश आहे. दहा वर्षांपूर्वी आम्ही हे सुरू केलं. 130 बेडचं अ‍ॅलोेपॅथी हॉस्पिटल आहे आणि पन्नास बेडचं आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र इथं आहे. दोन्हीत अत्यंत माफक दरात उपचार केले जातात. बाहेर लाख-दीड लाख खर्च येत असेल तर आमच्याकडे ते पन्नास हजारात होते. तेही नसतील तर ते उपचाराअभावी राहू नयेत म्हणून त्यांना वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पैसे मिळवून दिले जातात. त्यातून त्यांचे उपचार केले जातात. आमच्याकडं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथं उपचार होत नाही असा एकही आजार नाही. सगळे विभाग अत्याधुनिक सुविधांसह सज्ज आहेत. आमचे इथले आधीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तीन-चार कोटींची साधनं आम्हाला मिळवून दिली. बेळगाव ‘तरूण भारत’चे संपादक किरण ठाकूर यांनी एक कोटी रूपये ऑपरेशन थिएटरसाठी दिले. इतरही काही दानशूरांनी मदत केली. अनेक अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी इथं मोफत होतात. सर्व आजारांवर माफक दरात उपचार इथं होतात. उपचारांअभावी कोणीही राहू नये असा आमचा प्रयत्न असतो. भारतातले ‘द बेस्ट डॉक्टर’ आमच्याकडं आहेत. ते इथं मोठं योगदान देतात. तशी यंत्रणा उभी केलीय. आम्ही उपचार तर करतोच पण इतरांनाही असे कमी पैशात उपचार करायला आम्ही प्रवृत्त करतो.

ज्या गोष्टी अ‍ॅलोपॅथीने होत नाहीत त्यांच्यासाठी आयुर्वेद केंद्र आहे. तिथं या ज्या पाच प्रकारची कर्म केली जातात त्यावरून सगळ्या आजारावर उपचार होतात. टेस्ट ट्युब बेबीसाठी बाहेर तीन-चार लाख रूपये खर्च येतो. इथं ते तीस हजारात होतं. ज्यांच्याकडं उपचारासाठी पैसे नाहीत त्यांनी मठासाठी त्यांच्या रानातील भाजी, शेंगा असं काही वर्षभरात त्यांच्या सोयीनं थोडं थोडं दिलं तरी चालेल अशीही योजना केली. मोफत उपचार करताना त्यांचा स्वाभिमान दुखावला जाऊ नये आणि त्यांनी आजार अंगावर काढू नयेत असं आम्हाला वाटतं. बलुतेदार पद्धतीत जे चालायचं ते आमच्याकडं होतं. लग्नानंतर ज्यांना पंधरा-पंधरा वर्षे मूलबाळ होत नव्हतं त्यांना आयुर्वेदशास्त्रामुळं मुलं झालीय. अनेकांचे त्वचारोग आठ-दहा दिवसात बरे झालेत.

आजारच होऊ नये यासाठी एक दिवसापासून सात वर्षांपर्यंतच्या बाळाला सुवर्णबिंदू प्राशन करण्यास दिले जाते. बुद्धी तल्लख होण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुर्वेदात हे उपचार सांगितलेत. त्यामुळं आठवड्यात-पंधरा दिवसात एकदा तरी दवाखान्यात जाणारे अनेकजण पूर्ण बरे झालेत. महिन्यात किमान दहा हजार बालकांना ही गुटी दिली जाते.

अनेकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया गावोगाव जाऊन केल्या जातात. त्यांना तिथंच योग्य ते उपचार मिळावेत असाही आमचा प्रयत्न असतो.

कृषी, वैद्यकिय क्षेत्राबरोबरच मठाच्या माध्यमातून तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातही दखलपात्र योगदान दिलंय. त्याविषयी काय सांगाल...

- शिक्षणासाठी आमच्या मठात आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जी गरीब, मागासलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी तीन केंद्रं आहेत. तिथं आत्ता दोनशे मुलं आहेत. नॉर्थ इस्टची शंभर आणि लोकलची शंभर. त्यांना आपण पाचवीच्या वर्गात दत्तक घेतो. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचं शिक्षण, जेवणं-खाणं कपडेलत्ते हे सगळं आपण पाहतो. मेघालय, आसाम, त्रिपुरा इथली शंभर मुलं आहेत. वर्षातले आठ-दहा दिवस मी तिकडे जात असतो. अशी गरीब मुलं भेटली की मी त्यांना इकडे आणून शिक्षण देतो. आपल्याकडील ज्या मुलांना आई नाही, वडील नाहीत, दोघेही नाहीत किंवा दोघेही आहेत पण आजारी आहेत, विकलांग आहेत अशा मुलांना इथं शिक्षण दिलं जातं.

दुसरा आपला एक प्रकल्प आहे तो ‘विद्या चेतना’ नावाचा. आमच्याकडे बंद पडत चाललेल्या 335 सरकारी शाळा आम्ही दत्तक घेतल्यात. त्यामागं एकच हेतू आहे की आपली मराठी ही प्रादेशिक भाषा संपू नये. सरकारी शाळांतच मराठी चांगलं शिकवलं जातं. त्यामुळं आम्ही त्या शाळा दत्तक घेतल्या. सेमी किंवा इंग्लिश माध्यमामुळं मराठी भाषा संपत चाललीय. भाषा ही संस्कृतीची चावी असते. ती चावी लावल्याशिवाय आपल्या संस्कृतीची गोडाऊन उघडी होत नाहीत. दुसरं म्हणजे, या मराठी शाळा बंद पडल्या तर या भाषेत निर्माण झालेले लाखो ग्रंथ संपुष्टात येतील. तिसरं म्हणजे गोरगरिबांची मुलं सरकारी शाळांशिवाय शिकू शकणार नाहीत. त्यांना खाजगी शाळा परवडणार्‍या नाहीत. त्यामुळं त्याच दत्तक घेऊन तिथं खाजगी शाळांप्रमाणे सर्वोत्तम शिक्षण द्यायचं आम्ही ठरवलं. आमचा हा प्रयोग पाहून अनेकजण पुढं येत आहेत.

ज्या सरकारी शाळेतील दुसरी ते सातवीपर्यंतच्या मुलांना वाचता येत नाही अशी मुलं बाजूला काढून त्यांच्यासाठी आम्ही आमचे शिक्षक नेमतो. त्यांना आम्ही ‘शिक्षण मित्र’ म्हणतो. त्याच गावातील डी. एड. झालेली मुलगी किंवा मुलगा त्यांना शिक्षण मित्र म्हणून नेमतो. ते त्यांना शिकवून इतर मुलांच्या बरोबर आणतात. प्रत्येक दहा शाळांसाठी एक क्रीडा शिक्षक आम्ही नेमतो. ही मुलं जिल्हा किंवा राज्य स्तरापर्यंत जावीत यासाठी त्यांना टार्गेट देतो. प्रत्येक शाळेत आम्ही वर्षातून एकदा आईवडिलांसाठी ‘पाद्यपूजा’ हा उपक्रम राबवतो. रोज या मुलांना आम्ही सांगत असतो की सकाळी उठल्यावर आईवडिलांच्या पाया पडा. मग वर्षातून एकदा शाळेत मुलांकरवी पालकांचे पाद्यपूजन केले जाते. हा एक भावपूर्ण समारंभ होतो. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. यावेळी आईवडील म्हणजे मुलांसाठी कसे देव आहेत हे आम्ही त्यांना समजावतो. आईवडिलांनाही ही देवाघरची फुले तुमच्यासाठी कसे देव आहेत हेही सांगतो. आईवडील मुलांच्या मस्तकारवर हात ठेवतात आणि मुलं आईवडिलांच्या पायावर त्यांचा हात ठेवतात. तेव्हा आम्ही दोघांकडूनही एक प्रतिज्ञा करून घेतो. मुलांकडून वदवून घेतो की आम्ही कधीही आईवडिलांची अवहेलना करणार नाही. त्यांना त्रास देणार नाही. उपेक्षा करणार नाही. त्यांच्या इच्छा पूर्ण करणार, उद्धटपणे वागणार नाही. त्याचवेळी आईवडिलांनीही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून संकल्प करायचा की किमान मुलांच्या समोर आम्ही कधी व्यसन करणार नाही. मुलं घरी असताना टीव्ही-रेडिओ मोठ्या आवाजात लावणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या समोर आम्ही कधीच भांडणार नाही. एकवेळ मुलं समोर नसताना काय बडबड करायची ती करून घ्या पण मुलांच्या समोर चुकूनही आम्ही भांडणार नाही. हे करतानाच मुलांना शिक्षणात मध्येच रोखणार नाही. त्यांना पूर्ण शिक्षण देणार.

या उपक्रमाचे आज जबरदस्त परिणाम दिसून येत आहेत. आमच्या शिक्षण मित्रांमुळे त्या सरकारी शाळेतील शिक्षकांचे वर्तनही सुधारले. ते कामचुकारपणा करत नाहीत. आज तर परिस्थिती अशी आहे की इंग्रजी माध्यमात भरमसाठ फी देणारे विद्यार्थीही त्या शाळा सोडून या सरकारी शाळांत प्रवेश घेत आहेत. आमच्या अभियानाचा नाराच आहे, ‘चलो झेडपी स्कूल’. आमची एक सायन्स व्हॅनही आहे. विज्ञानवाहिनी म्हणूया तिला. तिच्यात अडीचशे प्रयोग आहेत. ती केंद्रशाळेत जाऊन थांबते. आजूबाजूच्या आठ-दहा शाळेतील मुलांना तिथं बोलावलं जातं. दिवसभर तिथं विज्ञानाचे अनेक प्रयोग होतात. मुलं हसतखेळत सर्व शास्त्रांचा अभ्यास करतात. तो पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. आमचा बीएससी बीएड झालेला एक शिक्षक या वाहिनीवर असतो. तो स्वतःच गाडी चालवत जातो. तो एकदा गाडी घेऊन गेला की आठ-आठ दिवस परत येत नाही. या गावातून त्या गावात अशी त्याची भ्रमंती सुरू असते. चंद्रकांतदादा पाटील यांनीच आम्हाला ही व्हॅन उपलब्ध करून दिली आणि शाळांचाही बर्‍यापैकी खर्च ते उचलतात. आम्ही आमच्या मठाच्या वतीने शंभर शाळा पाहतो. बाकी शाळांसाठी चंद्रकांतदादा कुणाकुणाकडून निधी मिळवून देतात.

‘गुरूकुल’ हा तुमचा नेमका काय उपक्रम आहे? तिथल्या मुलांचे अनेक किस्से ऐकलेत. त्यांच्यासाठी नेमकं काय करता?

‘गुरूकुल’ हा आमचा एक शैक्षणिक उपक्रम आहे. तिथं तीनशे मुलं शिक्षण घेतात. जात-पात असा तिथं प्रश्न नाही. आठ ते दहा वयोगटातील मुलं आम्ही त्यासाठी घेतो. ते बारा वर्षे इथं राहतात. हे सगळं शिक्षण नि:शुल्क आहे. त्यांच्याकडून आपण काही घेत नाही. त्यांच्यासाठी कोणतेही सरकारी शिक्षण नाही. हे शिक्षण नि:शुल्क, शासनमुक्त आणि स्वावलंबी जीवन जगण्याचं आनंदकेंद्री शिक्षण आहे. कोणत्याही प्रमाणपत्रावर आधारित किंवा कोणते पॅकेज मिळावे म्हणून हे शिक्षण नाही. आम्ही येथे चौदा विद्या, चौसष्ट कला त्यांना शिकवतो. त्यांचा सर्वांगिण विकास हे ध्येय असतं. त्याला आपण ‘युनिव्हर्सल एज्युकेशन’ म्हणू शकता.

इथं उभं राहिल्यानंतर क्षितिजापर्यंत दिसणारं काहीही ‘हे मला माहीत नाही’, ‘यातलं मला कळत नाही’ असं त्यांनी म्हणू नये असं त्यांना तयार केलं जातं. त्यांना भूगोल, देशाचा खरा इतिहास शिकवतो. वैदिक गणित शिकवतो. बेरीज-वजाबाकी तर ते कॅलक्युटरपेक्षा वेगात करतात पण सेव्हन डिजिट, फाईव्ह डिजिट काहीही त्यांना विचारा. लगेच ते ती अडचण सोडवतील. सूर्यसिद्धांतातले भास्कराचार्यांचे लीलावती आम्ही त्यांना शिकवतो. अबॅकस शिकवतो, अंकगणित शिकवतो, पाणिनी अष्टाध्यायी शिकवतो, काही संस्कृत ग्रंथही त्यांना आम्ही शिकवतो, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र शिकवतो, स्मृतीशास्त्र म्हणजे नीतिशास्त्र शिकवतो, आयुर्वेद शिकवतो, काही वेगवेगळी शास्त्रंही शिकवतो, धनुर्विद्या शिकवतो. म्हणजे पन्नास-साठ प्रकारच्या युद्धकला त्यांना शिकवतो. प्रशासन आणि युद्धनीतिचं ज्ञान त्यांना दिलं जातं. संगीत, नाट्य, नृत्य, गायन, वादन अशा सगळ्या कला त्यांना दिल्या जातात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यासही त्यांना दिला जातो. आमच्याकडची मुलं चप्पल बनवण्यापासून ते डोक्याचे केस कापण्यापर्यंत कोणतंही काम करू शकतात. प्लंबिंगपासून इलेक्ट्रिसीटीपर्यंत सर्व गोष्टी तर त्यांना शिकवल्या जातातच पण घोडसवारीही शिकवली जाते. त्यात ते तरबेज आहेत. त्यांच्यात साहसी प्रवृत्ती निर्माण व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न असतात. शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत आणि नंतर मार्केटिंगपर्यंत सर्वप्रकारचे ज्ञान आम्ही त्यांना देतो. आमच्याकडची मुलं-मुली हे सगळं करतात. ते स्वतः शेतात काम करतात आणि स्वतःसाठी लागणारं धान्य पिकवतात. देशी गायीचं तूप खाण्यास वापरतात. पीक पिकवणं, त्या धान्यापासून स्वयंपाक बनवणं, सूतकताई करून स्वतःचे कपडे तयार करणं हे सगळं ते करतात. शिल्पशास्त्र, मूर्तिशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे. लाकडापासून-मातीपासून ते मूर्ती बनवतात. योगाचं शिक्षण दिलं जातं. चित्रकला शिकवली जाते. दूरदर्शन आणि दूरश्रवण यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

तुम्ही त्यांच्या समोर बसलात तर तुमच्या घरात काय आहे याचा अंदाज ते बांधू शकतात. एखाद्या व्यक्तिचं वर्णन केलं तर त्याचं चित्र तर काढतातच पण तो आत्ता कुठं असेल, काय करत असेल हेही जाणू शकतात. या गोष्टी अनेकांना अविश्वसनीय वाटतील पण शास्त्राच्या आधारे या सिद्ध होण्यासारख्या आहेत. ध्यानयोगात हे सगळं येतं. ती व्यक्ती अमेरिकेत, ऑस्टे्रलियात, मलेशियात कुठंही असू द्या, तिथं नेमकं काय चालू आहे, तिथं त्याच्याकडे कोणत्या वस्तू आहेत हे पाहता येतं. विदेशातल्या गुप्तहेरी किंवा गुन्हेगारी शोधण्यासाठी या कलांचा उपयोग होतो. त्यांच्या डोळ्यावर तुम्ही पट्टी बांधा आणि त्यांच्या हातात एखादा ग्रंथ द्या. ते तो ग्रंथ तुम्हाला वाचून दाखवतील. आता त्यांना आम्ही शब्दवेधी शिकवणार आहोत. तंत्रशास्त्राचा लुप्त झालेला भाग पुनरूज्जीवित करून त्यांना या गुरूकुलात शिकवायचा आमचा मानस आहे. ही मुलं बारा वर्षे आमच्याकडे राहून साधना करतात. पहाटे चार-साडेचारला उठून रात्री साडेआठला झोपतात. इथं कुणी शिपाई नाही. त्यांची कामं ते स्वतःच करतात. तक्षशीला, नालंदा इथं पूर्वी काय चालायचं याचा अंदाज तुम्ही आमच्या या मुलांकडं पाहून बांधू शकाल. यासाठी आचार्य निर्माण करणं, अभ्यासक्रम ठरवणं हे सोपं नाही पण इथली मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडली की एकेक विद्यार्थी म्हणजे एकेक गुरूकुल असेल.

हे सगळं ऐकून, पाहून भारावून गेल्यासारखं होतं. तुमचा व्यासंग मला माहीत आहे, तुमची अमृतमय व्याख्यानं मी ऐकलीत. कोणत्याही आचार्याला हा प्रश्न विचारू नये पण आमच्या वाचकांना आपली शैक्षणिक पार्श्वभूमी सांगाल का?

- मी फारसा काही शिकलो नाही. माझा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये डिप्लोमा इन मार्केटिंग अ‍ॅन्ड सेल्स मॅनेजर झालेय. परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी शिकत गेलो. कोणतीही गोष्ट मला अस्वीकारार्ह वाटत नाही. अण्णा गवंडी बांधकाम करतोय तर त्याचं माझ्याशी काय काम असं मला वाटत नाही. ते मलाही कसं शिकता येईल असा माझा ध्यास असतो. तिथं जाऊन मी थांबतो. तो दगड कसे रचतोय, विटा कशा लावतोय, पाणी कसं मारतोय, त्याचं बांधकामाचं तंत्र काय, त्याचा मंत्र काय, मग मी का करू नये असं वाटून मी त्यांच्याकडून शिकत असतो. पुढे ते इतरांनाही शिकवतो.

आपल्या मठात आणखी कोणते उपक्रम आहेत?

- असे छोटेमोठे असंख्य उपक्रम आहेत. आमच्याकडे नैसर्गिक आपत्ती विभाग आहे. किल्लारी, गुजरात, नेपाळ अशा भूकंपात आम्ही मदतकार्यासाठी गेलो होतो. 2005 चा किंवा मागच्या वर्षीचा केरळचा, आमच्या कोल्हापूरचा महापूर असेल, त्यात आम्ही मदतकार्य केलं होतं. त्यासाठी आमची टीम सज्ज असते. परवाच्या कोकणच्या निसर्ग चक्रीवादळात आम्ही मदतकार्यात होतो. शंभर-दोनशे लोक त्यासाठी कार्यरत आहेत. कारपेंटर, वेल्डरपासून आवश्यक ती सर्व कामं करणारे लोक या टीममध्ये आहेत. वैद्यकीय टीम आहे. नेपाळला जवळजवळ 130 गावात आम्ही कम्युनिटी किचन चालवत होतो. तिथं जेवण दिलं, वैद्यकीय सुविधा दिल्या. केरळला चारशे टन मटेरिअल पोहोचवलं. कणेरी मठ योग्य माणसाला मदत पोहोचवतो म्हणून अनेकजण मदत इकडं पाठवतात. प्रशासनही सहकार्य करतं. हे आम्हाला समाजऋण फेडणं वाटतं. त्यामुळं मठाच्या माध्यमातून जे काही करता येईल ते आम्ही करत असतो.

गेल्यावर्षी पुरानंतर जे नुकसान झाले अशा शंभर-सव्वाशे जणांना आम्ही घरं बांधून दिली. ज्या कोणत्या पक्षाचं सरकार असेल ते आम्हाला आमच्या या कामात मदत करतं. या कोरोनाच्या काळातही आम्ही कोरोना होऊ नये किंवा झाला असेल तर त्याची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून 75 लाख लोकाना ह्युमिनिटी बूस्टर दिले. देणारा देत असतो. ते लोकापर्यंत पोहोवण्याचे आम्ही फक्त हमालरूपी मध्यस्त आहोत.

स्वामीजी, हे सगळं ऐकून, वाचून कोणीही प्रभावीत होईल. त्याच्या अंगात सकारात्मक ऊर्जेचे लोळ निर्माण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आत्मनिर्भर व्हा’ असं जे काही सांगत आहेत तेच तुम्ही प्रत्यक्षात आणत आहात. त्यामुळं तुमच्या कार्याला वंदन करतानाच प्रारंभी मी म्हटल्याप्रमाणं काही विषयांवर प्रश्न उपस्थित करणं, चर्चा करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण आता थोडं तिकडं वळूया. सध्या देशातला सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणजे राममंदिर. नुकतंच मंदिराच्या भूमिपूजनाचं काम झालंय. अनेक वर्षाचा संघर्ष त्यामुळं संपुष्टात आलाय. असं असतानाही काहीजण प्रश्न उपस्थित करत आहेत की आपल्या देशाला मंदिराची गरज आहे की ‘एम्स’सारख्या रूग्णालयाची? अशा वाचाळवीरांना आपल्या मठाच्या माध्यमातून जे काही काम सुरू आहे ते कृतिशील उत्तर आहे. एक मठ इतकं मोठं काम उभं करू शकतो तर राममंदिराच्या माध्यमातून काय काय होईल याची अनेकांना कल्पनाही येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? राममंदिर की एम्ससारखी रूग्णालये?

- हे बघा, माणसाच्या तीन प्रमुख गरजा आहेत. एक पोटाची गरज, दुसरी मनाची. तिसरी तितकीच एक महत्त्वाची गरज म्हणजे ज्ञानाची. ज्ञानाची गरज भागविण्यासाठी असंख्य ज्ञानमंदिरं आपल्याकडं आहेत. शाळा-कॉलेज याची मोठी गरज आहे आणि सगळीकडे ती उभी आहेत. पोटासाठी औद्योगिक विकास, शेती महत्त्वाची आहे. हाताला काम असेल तर पोट भरेल. तेही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे सोडून मनाची भूक मोठी आहे. ती ना पैशाने भागेल, ना अन्नपदार्थांनी भागेल, ना औद्योगिक वसाहतींनी. भुकेच्या वेळी ज्याचे त्याचे खाद्य ज्याला त्याला द्यायला हवे. पोटाचे औषध डोळ्याला किंवा डोळ्याचे औषध पोटाला असे चालणार नाही. तसंच मनाची भूक मंदिरात भागते. त्यासाठी भक्तिची गरज आहे. त्यामुळं विद्यामंदिराइतकीच देवमंदिराचीही गरज आहे.

आजपर्यंत आपला देश केवळ मंदिरांमुळं अखंड राहिला. आमचे बारा ज्योतिर्लिंग असतील, वैष्णव क्षेत्र असतील किंवा आमची शक्तीपीठं असतील, गाणपत्य पीठं असतील किंवा साधूसत्पुरूषांची समाधीस्थळं असतील... इथं माणसं कुठंलीही जात, पात, प्रांत हे सगळं विसरून येतात. देश अखंडित ठेवण्याचा आणि भावैक्य साधण्याचा हा मार्ग आहे. देवळाकडे फक्त एक मूर्ती म्हणून पाहू नका. अनेक भावनांची, अनेक प्रांताची मंडळी तिथं एकत्र येतात. मंदिरात आलेला माणूस भक्तिभावानंच येतो. ज्याची त्याची मनोकामना, श्रद्धा यानुसार फळ मिळतं असं आपला धर्म सांगतो. आपला अहंकार अर्पण करण्यासाठीसुद्धा एक श्रद्धेची जागा लागते. ती मंदिराच्या माध्यमातून निर्माण होते. श्रद्धेनं मस्तक टेकवलं की एक वेगळंच समाधान लाभतं. शिवाय धर्मप्रबोधन करायचं असेल, आपल्या कलांचं प्रदर्शन करायचं असेल, संस्कृतीचं दर्शन घडवायचं असेल तर एक जागा लागते. मी या जातीचा, मी त्या जातीचा हा अहंकारही मंदिरात संपतो. म्हणून सगळे खांद्याला खांदा लावून दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी उभे असतात.

आपल्याकडे शिक्षणाअभावी फार अनर्थ झाला नाही. पूर्वी मंडळी शिकलेली नसली तरी क्रूर नव्हती कारण त्यांच्या श्रद्धा मजबूत होत्या. देव, देश, धर्माचे संस्कार त्यांच्यावर होते. म्हणून शिक्षण आणि उद्योगाची जेवढी गरज आहे तितकीच गरज मंदिरांचीही आहे. उद्योगात तुम्हाला पैसा गुंतवावा लागतो. इथं भावना अर्पण कराव्या लागतात. मानसिक समाधानासाठी श्रद्धायुक्त अंतःकरणानं देवाकडं गेलं पाहिजे. केवळ  भौतिक विकास, बौद्धिक विकास महत्त्वाचा नव्हे. भावनिक वाढही गरजेची आहे. औद्योगिक, शैक्षणिक विकास म्हणजे देशाची प्रगती नव्हे. त्यासाठी भावनिकदृष्ट्याही कणखर असायला हवं. असं कणखरपण श्रद्धेशिवाय मिळत नाही आणि या श्रद्धा जपण्याचं काम मंदिरं करतात. एका राममंदिराच्या माध्यमातून संपूर्ण देश एकत्र येतोय. त्यामुळं राममंदिर हे देश जोडण्याचं साधन आहे. त्यावरून टीका करणं अयोग्य आहे.

आपण राममंदिराविषयी बोलत आहोत. मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीराम आणि देवकीनंदन श्रीकृष्ण यांच्या चरित्राकडं आम्ही इतिहास म्हणून पाहायचं की त्यांच्या ग्रंथांचा महाकाव्य म्हणून अभ्यास करायचा? नेमकं हे काय आहे? इतिहास की महाकाव्य?

- ही महाकाव्ये तर आहेतच. रामायण हे जवळपास चोवीस हजार श्लोकांचे आहे. हा ग्रंथ छोटा नाही. प्रभू रामचंद्रांची जीवनकहाणी महर्षी वाल्मिकींनी काव्यमय शैलीत लिहिली. त्यामुळं हे महाकाव्य आहेच पण तो इतिहासही आहे. इतिहास का? तर त्या काव्यात ज्या ज्या ठिकाणांचा उल्लेख केलाय ती सर्व ठिकाणं इथं आहेत. प्रत्येक घटनाक्रमाचं स्थानमहात्म्य आपण समजून घेऊ शकतो, अभ्यासू शकतो. आठ हजार वर्षांनीसुद्धा त्या नावाची माणसं आपल्याकडं आहेत. मग हा इतिहास हा इतिहास का होऊ नये? काही गोष्टी अलंकारिकपणे अतिशयोक्त करून लिहिल्या आहेत, त्यात वेळोवेळी अनेकांनी बदल केलेत हेही मान्य पण त्यामुळं आपण हे सत्य नाकारू शकत नाही. राम आणि कृष्णजीवनातील ही सर्व ठिकाणं आपल्याला त्याची प्रेरणा देतात, अनुभूती देतात. त्यामुळं ही महाकाव्ये तर आहेतच पण आपल्या संस्कृतीचा, आपल्या आदर्शांचा हा इतिहासही आहे. त्यापासून काही बोध घेतला तर नुकसान काहीच नाही. उलट जगावं कसं, वागावं कसं हेच त्यातून प्रत्येकाला शिकता येईल.

राम आणि कृष्ण ही दोन्ही आपली श्रद्धास्थानं आहेत. मात्र दोघांचंही तत्त्वज्ञान वेगळं आहे, जगणं वेगळं आहे. आम्ही नेमकं कुणाला आदर्श मानायचं? सत्यवादी, एकपत्नीत्व जपणार्‍या रामाला की सोळा हजार एकशे आठ बायका असलेल्या श्रीकृष्णाला?

- हे बघा, या दोन्ही वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या परिस्थितीत घडलेल्या घटना आहेत. त्यांचं आयुष्यही त्या काळानुसार होतं. त्यावेळचे ते महापुरूष होते. जगात ज्या ज्या वेळी ज्या गोष्टींची गरज असते त्याच्या पूर्ततेसाठी भगवंताची ही व्यवस्था असते. रामायणकाळ हा वेगळा होता, कृष्णकाळ वेगळा होता. ज्याला उत्तम प्रशासक बनायचंय त्यांना या दोन्ही नीतिंची गरज वेगवेगळ्या प्रसंगानं लागणार आहे. केवळ प्रभूरामाच्या तत्त्वज्ञानानं किंवा केवळ श्रीकृष्णाच्या नीतिनंच आपण चालतो असं नाही. या दोघांचेही आदर्श तर आपण जपायलाच हवेत पण आपल्या घराण्यातील वडिलधार्‍यांनी, पूर्वजांनीही काही आदर्श घालून दिलेत. तेही आपल्याला मान्य करायला हवेत. पूर्ण अभ्यासाअंती, अनुभवाअंती त्यांनी राम आणि कृष्णाला देव म्हणून स्वीकारलं असेल तर आपण ते मान्य करायला काय हरकत आहे? सार्वकालिक नीती आणि सकालिक नीती असे दोन प्रकार असतात. सार्वकालिक नीती कधीच बदलत नाही पण सकालिक नीती देश, वस्तू, काल, परिस्थितीनुसार बदलत असते आणि बदलत्या गोष्टीनुसार आपणही बदलत राहणं गरजेचं असतं. परिवर्तन हाच तर सृष्टिचा नियम असतो. प्रवाहाबरोबर चालताना जसा प्रदेश भेटेल तसा मार्ग काढत पुढं जायला हवं.

या सगळ्यात काही गोष्टी असतात ज्या कधीच बदलत नाहीत. त्याला सार्वकालिक नीती म्हणतात. म्हणजे प्रेम बदलत नाही, सत्य बदलत नाही, अहिंसा बदलत नाही, मित्रत्वाची भावना बदलत नाही... काही प्रासंगिक गोष्टी बदलतात. या सगळ्यातलं चांगलं ते आपण घेऊयात, बाकी सोडूयात.

आपल्याकडं धर्मांतरावर कायम चर्चा होते. हिंदू धर्मातून इतर धर्मात जाणार्‍यांचं प्रमाण खूप मोठं आहे. अनेकजण ख्रिश्चन, बौद्ध धर्म स्वीकारतात, मुस्लिम धर्म स्वीकारतात. त्यांचे धर्मगुरूही धर्मांतर करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्याकडं मात्र असं काही होत नाही. हिंदू धर्मातून इतर धर्मात जाणार्‍यांचं प्रमाण लक्षवेधी असलं तरी ‘इनकमिंग’ मात्र कायम बंद असतं. या सगळ्याकडं तुम्ही कसं पाहता?

- काय झालंय की आपल्या धर्मात अशा पद्धतीचं शिक्षणच कधी दिलं गेलं नाही. तशी संस्कृतीही रूजवली नाही. धर्मांतर करून घेणं हे आपल्या लोकाच्या मनातच नाही. जे मुळचे हिंदू आहेत पण काही कारणाने इतर धर्मात गेलेत आणि आता त्यांना परत हिंदू व्हावंसं वाटतंय तर त्यांच्यासाठी आपल्या समाजबांधवांची मती आणखी विशाल होण्याची गरज आहे. त्यांना आपण आपलं म्हणून मोठ्या मनानं स्वीकारण्याची गरज आहे. काळाचीही ती हाक आहे. आपल्या देशाला जातीसाठी आणि मतभेदासाठी जी किंमत वेळोवेळी मोजावी लागली ती भयंकर आहे. आता तरी आपण सुधारायला हवं. जातीपातीमुळं व्हायचं तितकं नुकसान होऊन गेलं. आता आपण डोक्यातून जातीयवाद काढून टाकायला हवा.

हे कसं होईल? उच्चनीचतेची भावना कशी कमी होईल? ‘जी मेल्यावरही जात नाही ती जात’ असं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणायचे. जातीनिर्मुलनासाठी कोणते मार्ग तुम्हाला प्रभावी वाटतात?

- यासाठी सर्वप्रथम धार्मिक क्षेत्रातील जे कोणी प्रबोधनपुरूष आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ असं म्हणतो आणि इतरांना सांगतो. वागायचं कसं याची प्रार्थना रोज करतो पण ते आचरणात आणत नाही. आपण रोटीपर्यंत आलोय पण बेटीपर्यंत कधी पोहोचणार? आपण एकमेकांच्या घरात जेवायला लागलो. प्रत्येकाकडं हवं ते काम करायला लागलो. एकाच आस्थापनेत सर्वजण एकत्र काम करायला लागतो. आता कोणत्याही जातीसमूहातील बेटी आपल्या घरात स्वीकारण्यासाठी आपण मन मोठं करायला हवं. माणूस माणूस वेगळा नाही हे दाखवून द्यायला हवं. मन विशाल करणं गरजेचं आहे. माणसात देवाचं रूप असतं, ते मोठ्या मनानं पहायला हवं. सगळ्यांच्या मनात भगवंत असतो असं भगवत्गीता सांगते. मग हा लहान, तो मोठा, तो शूद्र असे संकुचित दृष्टिकोन का बाळगावेत? ते आपण मानू नये. आपल्या पूर्वपुरूषांनी जे सांगितलं ते आचरणात आणायला हवं. त्यांच्यावेळी अशा जातीपाती प्रबळ नव्हत्या. काही प्रदेशामुळं, काही व्यवसायामुळं विशिष्ट समाजात अशी लग्नं व्हायची. आपल्या घरातील, आपल्या व्यवसायातील चालीरीती, रूढी परंपरा त्या मुलीला माहीत असल्यानं जुळवून घ्यायला त्रास होणार नाही असं आपल्या वडिलधार्‍यांना वाटायचं. अनेक ठिकाणी ते खरंही होतं. म्हणजे सोनाराच्या घरातली माणसं असतील तर अन्य व्यवसायाचं शिक्षण घेतलेली माणसं तिथं काय करणार? मग त्यांचं जुळवून घेणं शक्य नसायचं. त्यामुळं आपापल्या जातीत लग्न व्हायची. आजकाल तसं काही राह्यलं नाही. कोणीही कोणत्याही कामात तरबेज होतो. कोणतीही नोकरी-व्यवसाय करतो. त्यामुळं मन मोठं करून सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे. मनातली क्षुद्रता नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी धार्मिक क्षेत्रातील लोकानी आधी सुधारायला हवं. त्यांनी स्वतःत बदल करून इतरांचंही याबाबत प्रबोधन केलं पाहिजे.

खूप महत्त्वाचं विधान आहे तुमचं हे. असो. रामदास स्वामींनी महंत संप्रदाय सुरू केला. तशा पद्धतीचं आज आपल्या धर्मात काही राहिलं नाही. म्हणजे एखादे पोप आले तर त्यांची एक क्रेझ असते. मुस्लिम धर्मावर त्यांच्या धर्मगुरूंचा पगडा आहे. त्या त्या धर्माचे लोक त्यांच्या धर्मप्रमुखांचं ऐकतात. आपल्या चारही पीठांचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या त्या भागातील लोकाना मार्गदर्शन करावं, धार्मिक वर्चस्व ठेवावं असं अपेक्षित होतं. तसं काही होताना दिसत नाही. आपल्या धर्मशास्त्राच्या प्रमुखांना सामान्य माणूस फारसा महत्त्व देताना दिसत नाही. हे असं का झालं?

- ख्रिश्चन किंवा इतर धर्मात काय चालतं हे मला माहीत नाही पण आपल्या धर्मात धर्मगुरू आणि शिष्य यांच्यात अंतर खूप आहे. ते कमी होणं गरजेचं आहे. आधी गुरू लोकानी सामान्य माणसाला माणसासारखं वागवणं गरजेचं आहे. म्हणजे मला शिवू नकोस, माझ्या जवळ येऊ नकोस, मी तुझं अन्न खाणार नाही, माझ्याकडं फक्त व्हाईट कॉलरचीच माणसं चालतील, सामान्य माणूस चालणार नाही हे बंद झालं पाहिजे. आमच्या आणि समाजाच्या मधलं अंतर कमी झालं पाहिजे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, त्यांच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवणं हे गरजेचं आहे. मला तुमची दक्षिणा चालत असेल तर मग तुमच्या घरातील जेवण का चालणार नाही? धर्मशास्त्रांच्या प्रमुखांनी किती गरिबांच्या घरी जाऊन जेवण केलं? त्यांनी किती दलितांच्या घरी जाऊन वास्तव्य केलं? हे बघितलं पाहिजे. धर्मगुरू म्हणून आमच्यात असे काही दोष आहेत आणि ते आम्हाला मान्य करावेच लागतील. निदान ते आता सुधारायला हवेत. क्षुद्र भावना सोडून सामान्य माणसाला जवळ करायला हवं. शिवाय आपल्या धर्मात एकाधिकारशाही नाही. आपल्याकडं लोकशाही आहे. हुकूमशाही नाही. त्यामुळं कुणीही कुणावरही नियंत्रण ठेवत नाही. स्वयंनियंत्रणाचं, स्वयं मनःशासनाचं प्रशिक्षण नाही. इतर धर्मात तसं नाही. त्यांना त्यांच्या धर्मगुरूच्या, धर्माच्या, धर्मग्रंथांच्या विरूद्ध बोलण्याचा अधिकार नाही. आपल्याकडं प्रत्येकाला चिकित्सा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं ते अभ्यासाअभावी धर्मावर बोलतात, धर्मग्रंथावर बोलतात, धर्मगुरूवरही बोलतात. प्रत्येकाचं विवेचन करतात. ऐकण्याचं-न ऐकण्याचं, प्रबोधनाचं स्वातंत्र्य आपल्याकडं प्रत्येकाला आहे. आपल्या लोकाना हे सगळं ऐच्छिक ठेवलंय. त्यामुळं धर्मशास्त्रांच्या प्रमुखांपुढं मर्यादा आहेत.

हिंदू धर्माच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्यात? तुम्ही हिंदू धर्माची व्याख्या कशी कराल?

- पंचमहायज्ञ दरदिवशी आपल्या जीवनात जो करतो, आचरणात आणतो तो हिंदू. म्हणजे 1) देवयज्ञ. ज्या देवानं आपल्याला हवा, प्रकाश, उन, अन्न, पाणी असं सगळं दिलं त्या देवाविषयी कृतज्ञता म्हणून त्याचं केवळ स्मरण करणं म्हणजे देवयज्ञ. 2) मातृपितृ यज्ञ. ज्या आईवडिलांनी मला हे शरीर दिलं त्यांच्या उपकारांचं स्मरण करणं, त्यांची सेवा करणं, त्यांची आज्ञा पाळणं हा माझा मातृपितृ यज्ञ आहे. 3) ऋषियज्ञ. म्हणजे गुरूजनांविषयी कृतज्ञ राहणं. माझ्या उपजीविकेसाठी असेल किंवा आध्यात्मिक मोक्षदानासाठी असेल ज्या गुरूजनांकडून हे आले त्यांची सेवा करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणं हा माझा ऋषियज्ञ. 4) माझा भूतयज्ञ. या पृथ्वीवर मनुष्य स्वतंत्र नाही. एक जीव दुसर्‍या जिवावर अवलंबून आहे. म्हणून एक जीव अन्य जिवांसाठी नेहमी योगदान देत असतो. जमिनीच्या गर्भात सूक्ष्म जीवाणू काम करतात म्हणून अन्न येतं. अन्न नावाच्या जीवापासून आपली संतुष्टी होते आणि आपल्यासाठी जनावरं काम करतात, पक्षी काम करतात; कारण पिकांवरचे जीवजंतू खाण्याचं काम पक्षी करतात. परागीकरणाचं काम कीटपतंगादी करतात. हे सगळे आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीनं उपकार करतात. म्हणून सगळ्यांचे आभार मानणं, त्यांना मदत करणं हा माझा भूतयज्ञ आहे आणि शेवटचा 5) मनुष्ययज्ञ. मनुष्य स्वावलंबी नाही. एक परिवार आहे, त्यात माणसं आहेत. कोणत्याही कार्यासाठी तो एकटा काही करू शकत नाही. त्यामुळं माझ्या आत्म्याला जे जे प्रतिकूल वाटतं ते ते त्यानं इतरांबरोबर करू नये. माझ्यावर कुणी प्रेम करावं असं वाटत असेल तर त्यानं इतरांवर प्रेम करावं. माणसानं माणसाबरोबर सद्गुणसंपन्न होऊन व्यवहार करावा. म्हणून हे पंचमहायज्ञ जो नित्यनेमानं आचरणात आणतो तो हिंदू.

हिंदुत्त्वाची किती अर्थपूर्ण आणि व्यापक व्याख्या आपण केलीत... खूप आनंद वाटला. मगाशी आपण नालंदा, तक्षशीलाचा उल्लेख केलात. आजच्या पिढीला वेदशास्त्रांचा, धर्मग्रंथांचा असा अभ्यास करायचा असेल तर तो एकाही विद्यापीठात उपलब्ध नाही. हे चित्र कसं बदलता येईल?

- वेदांचं शिक्षण अनेक ठिकाणी दिलं जातंय. तिथं जाण्याची मानवाची इच्छा नाहीये. अनेक मठा-मंदिरात ही व्यवस्था आहे. मात्र अर्थकेंद्रित शिक्षणव्यवस्था आल्यानं लोकाचं लक्ष तिकडं नाही. ‘हे शिकल्यानं मला पैसे किती मिळणार? पॅकेज कितीचं मिळणार?’ याचाच विचार अनेकजण करतात. कोणत्याही वैदिक विद्यांनी ‘पॅकेज’ मिळणार नाही. आनंद मिळणार आहे. आनंदासाठी कुणाला शिकायचं नाही, ‘अर्था’साठी शिकायचंय. आजही आपल्याकडं देशात ठिकठिकाणी चार-आठ हजार गुरूकुलं आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं ते वेद शिकवतात. वेदांचा एकेक भाग शिकवणारेही आहेत. म्हणजे कुणी सामवेद शिकवत असेल, कुणी अथर्ववेद शिकवत असेल, ऋग्वेद शिकवणारे आहेत, अनेक मठात त्या त्या वेदांचाच भाग असणारे, शास्त्र असणारेही अभ्यासक्रम आहेत. तिकडं कुणी फारसं फिरकत नाही. तुम्ही म्हणता तसं विद्यापीठातून मात्र वेद-उपनिषदं दुर्लक्षित राहिलीत.

यात परिवर्तन कसं घडेल? समाज वेदविद्येकडं वळेल का?

- माणसाला भौतिक गोष्टीची उब आली की तो आपोआप इकडं वळेल. मला समाधान पाहिजे असं वाटले की लोक इकडं वळतात. आजही लाखो लोक भजन-प्रवचनासाठी एकत्र येतात. गावात वारकरी सप्ताह चालतात, सात-सात दिवसाचे यज्ञ होतात. दासबोधाची-रामायण-भागवताची-अन्य ग्रंथांची पारायणं होतात. ही सुद्धा वेदविद्याच आहे. सगळ्या मार्गानं ती समाजमनावर झिरपत असते.

आपण सनातन वैदिक धर्मावर बोलतोय. हा वैदिक धर्म आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहेत असं काही विचारवंत सांगतात. हा नेमका काय प्रकार आहे?

- आपला सनातन धर्म कधी सुरू झाला हे सांगता येत नाही. म्हणूनच तो सनातन आहे. अमुक माणसानं, अमुक दिवशी आपला धर्म स्थापन केला असं आपण सांगू शकत नाही. हिंदू धर्म ही आपली जीवनपद्धती आहे. सिंधू नदीच्या तीरावरील राहणार्‍यांना बाहेरचे लोक सिंधू तीरावरील म्हणून ओळखायचे. भारतात प्रवेश करताना सिंधू नदी लागायची. त्यामुळं सिंधू तीरावरील हे सर्व हिंदू म्हणून ओळखले जाऊ लागले. आपला धर्म मात्र सनातनच. त्यामुळं यात काही मतभेद व्हावेत असा हा विषय नाही.

स्वामीजी मला एक विचारायचं होतं... पूर्वीपासून असं म्हणतात की राज्यसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्त्वाची असते. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्यांना गादीवर बसवून ते सिद्धही केलं. चंद्रगुप्तावर चाणक्यांचा अंकुश होता. आज आपल्या धर्मसत्तेचा राज्यसत्तेवरचा अंकुश कमी पडतोय का? आमच्या पुण्यातच आता कोरोनाचे दोन लाखाहून अधिक रूग्ण झालेत. मुख्यमंत्री मात्र काही ठोस करण्याऐवजी एकच सांगत आहेत की ‘कोमट पाणी प्या...’ असं असूनही एकही धर्मगुरू त्यांना काही सांगत नाहीत किंवा मोदी म्हणाले होते ‘मी दोन कोटी लोकाना रोजगार देईन.’ प्रत्यक्षात बेरोजगारांची संख्या वाढतच चाललीय. धर्मदंड हातात असलेले आपले कोणतेही धर्मगुरू त्यांना काहीच बोलत नाहीत. मग राज्यसत्तेपुढं आजची धर्मसत्ता क्षीण झालीय का?

- हा काळच असा आहे. आपण एकमेकांना भेटत नाही आहोत. कोरोनामुळं भेटण्याचीच मुभा राहिली नाही. माणसांनीच एकत्र यायचं नाही. तरी समाजमाध्यमातून धर्मगुरू किंवा अन्य लोक प्रबोधन करत आहेत. राज्यसत्ता मात्र आता एका विशिष्ट स्थितीतून जात आहे. पूर्वी धर्मसत्ता, राज्यसत्ता, समाजसत्ता होती. आता दुर्दैवानं राज्यसत्तेच्या डोक्यावर अर्थसत्ता बसलीय. म्हणजे राज्य कोण चालवतं? राज्य निर्माण कोण करतं? तर कॉर्पोरेटस् करतात. पैसा महत्त्वाचा झालाय. त्यामुळं राज्यसत्तेच्या वर अर्थसत्ता आहे. जो घटक खाली असायला हवा होता तो वर गेलाय आणि वरचा धर्मसत्तेचा घटक सगळ्यात खाली गेलाय. ही परिस्थिती काही फार चांगली नाही. धर्मसत्ता आपापल्या परीनं काम करतेय.

म्हणजे हे सगळं निराशाजनक वातावरण आहे तर...

- अगदी तसंही म्हणता येणार नाही. धर्मसत्तेवरची लोकाची श्रद्धा कमी झालीय. विश्वास कमी झालाय. त्यामागची कारणं कोणती याचा विचार झाला पाहिजे. हे बघा, धर्मसत्तेला कमी लेखण्यासाठी खूप लोकानी काम केलं. गेल्या साठ-सत्तर वर्षात सिनेमा नावाच्या माध्यमानं तर हेच रंगवलं. एकही चांगला साधू किंवा सन्याशी सिनेमात दाखवला गेला नाही. प्रत्येक सिनेमात अत्यंत विषयलंपट, चोर, दरोडेखोर अशाच पद्धतीनं त्यांचं चित्रण केलं गेलं. दुसरं म्हणजे समाजातील वृत्तपत्रं किंवा वृत्तवाहिन्या या माध्यमांनीही चुकीचीच प्रतिमा रंगवली. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राष्ट्रात 15 ते 20 लाख साधू राहतात. त्याच्यात एखाद-दुसर्‍यानं काही चूक केली की त्याचाच प्रपोगंडा केला जातो. दिवसरात्र तेच दाखवले जातं, छापलं जातं. दोष कुणात नसतात? अन्य क्षेत्रात असं काही होतच नाही का? एखादा तरूण तेजपाल नैतिकभ्रष्ट निघाला म्हणून सगळ्या संपादकांना दोष द्यायचा का? किंवा एक सत्तर-ऐंशी वर्षाचा राज्यपाल विषयलंपटता दाखवतो म्हणून सगळे राजकारणी तसेच असतात का? चांगले राजकारणी नाहीत का? एखाद्या व्यापार्‍यानं कुणाला बुडवलं म्हणून सगळे व्यापारी चोर कसे ठरतील? तसेच एखादा संत, एखादा साधू चुकला तर बुद्धिपूर्वक काही देशी आणि काही विदेशी समदुःखी लोक एकत्र येऊन धर्मक्षेत्र बदनाम करण्याचं काम गेली साठ-सत्तर वर्षे निरंतर करतात आणि तेही सत्तेत असलेले करत आलेत. पाठ्यपुस्तकात जे आदर्श पुरूष म्हणून धडे दिले जातात त्यात किती साधूंवर धडे असतात? आजही आपल्याकडे अनेक साधू शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत. सामाजिक, कृषी, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात मोठे काम करत आहेत. त्यांचा चांगुलपणा कधीही दाखवला जात नाही किंवा शिकवला जात नाही. त्यातल्या एखाद्याकडून काही चूक झाली तर मात्र सगळे पेटून उठतात. त्यामुळे समाजमन घडवलं गेलं. साधूबद्दलची समज बदलली गेली. पूर्वी राजा धर्मक्षेत्राची काळजी घ्यायचा, त्यांचा आदर करायचा, त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा निर्माण करायचा. आता राजा कोणत्याही धर्मप्रमुखांसाठी, धर्मासाठी काहीच करत नाही. आमच्यासाठी त्यांच्याकडे एकही रूपयाचे बजेट नसते. मग अनेक धर्मातील भानगडी करणारे मोठे झाले. राजकारण्यांनी त्यांचा फायदा घेतला. भानगडी न करणारे हिंदू धर्मप्रमुख मात्र मागे राहिले कारण हे त्यांना कोणी शिकवलेच नाही. आमच्याकडे चार आण्याचं काम करून बारा आणे वसूल करण्याची वृत्ती नाही. ‘नेकी कर और कुएँ में डाल’ हीच शिकवण आपल्याला मिळालीय. चांगलं करायचं आणि विसरून जायचं. त्यांच्यात असं नव्हतं. दहा पैशाचं काम करायचं आणि दहा हजार रूपयांचा प्रचार करायचा.

ही मदर तेरेसा नावाची म्हातारी... दोन-चारशे मुलं तिनं सांभाळली असतील. त्या मुलांच्या नावावर मात्र कोट्यवधी रूपये मिळवून आणले. स्वतःच्या खात्यावर युरोपियन राष्ट्रात ठेवले आणि त्या मुलांकरता हॉस्पिटल काढतो म्हणून जुन्या यंत्रणा आणून टाकल्या. त्यातून ती नोबेलपर्यंत गेली. आमच्या लोकाना हे कळत नाही. आपल्या असंख्य मठात हजार, दोन हजार, पाच हजार, दहा हजार मुलांना दरवर्षी मोफत शिक्षण दिले जाते आणि तेही वर्षानुवर्षे. केजी टू पीजी पर्यंत शिक्षण देणारे हिंदू संत त्याची जाहिरात करत नाहीत म्हणून मागे आहेत. शिवाय अनेक माध्यमंही त्यांच्या हातातले बाहुले बनलीत. गिरीश कुबेर नावाच्या ‘लोकसत्ते’च्या संपादकानं कधी नव्हे ते ‘असंताचे संत’ हा मदर तेरेसाचा बुरखा फाडणारा अग्रलेख लिहिला होता, मात्र त्यांच्यावर इतका दबाव आला की तो दुसर्‍याच दिवशी माघारी घ्यावा लागला. असा दबाव आणून मुस्कटदाबी करण्याचं काम आपला धर्म करीत नाही. अशा माध्यमांचा भविष्यात लोकाना वीट येईल. सामान्य माणसंही त्यांची छी-थू करतील. त्यांची विश्वासार्हता संपून ती नष्ट होतील. हे व्हायचं नसेल तर माध्यमांनी अजूनही सुधारणं गरजेचं आहे. चांगलं ते स्वीकारणं आणि वाईट ते अव्हेरणं ही भूमिका असेल तरच ते काळाच्या ओघात टिकू शकतील. ती टिकावीत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

- घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी - चपराक दिवाळी अंक 2020



Friday, March 5, 2021

‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’

‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ या रमेश वाघलिखित पुस्तकाला ‘चपराक’चे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही पुस्तके घरपोच मागविण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. आमच्या 7057292092 या क्रमांकावरही आपण आपली मागणी नोंदवू शकाल.

महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या धमन्यातून संतविचारांचा प्रवाह अखंडितपणे वाहत असल्याने आपल्यातील चांगुलपण शिल्लक आहे. विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत ते त्यामुळेच. महाराष्ट्रातील अनेक बुलंद दुर्ग आपल्याला आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि धैर्याची साक्ष देतात त्याचप्रमाणे इथल्या मातीत रूजलेला संतविचार आपल्याला जगण्याचे बळ देतो. वारकरी संप्रदायाची पताका डोक्यावर घेऊन ती डौलाने मिरवताना अनेक आक्रमणांना, मानसिक द्वंदांना आपण सहजपणे सामोरे जाऊ शकलो. कोणतीही गोष्ट नेमकेपणाने सांगताना संतांनी समाजमनाचा अचूक वेध घेतला.

आपली पंढरीची वारी, आपला गणेशोत्सव आणि आपल्या दिवाळी अंकांची परंपरा या तीन गोष्टी माझ्या मनाला कायम भुरळ घालतात. आपल्या संस्कृतीची ओळख ठरणार्‍या या तीन गोष्टी जगभर पसरल्या. ‘मराठी संस्कृतीचे वैभव काय?’ असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी अभिमानाने या तीनही गोष्टींची महती जोरकसपणे मांडेन. काळाच्या ओघात यात काही दुष्प्रवृत्ती घुसल्या असल्या तरी त्यांना हुसकावून लावत आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे ही गोष्ट मुळीच अवघड नाही. या तीनही गोष्टींचा पाईक होण्याचे भाग्य मला मिळाले याबद्दल मी विधात्याच्या कायम ऋणात आहे.

सोवळेपणाची व्याख्या सांगताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, 

‘विटाळ तो परद्रव्य परनारी । त्यापासूनि दुरी तो सोवळा॥’

सोवळेपणाची ही व्याख्या माझ्या मनात जाऊन ठसली, बिंबली. ‘सदा नामघोष। करू हरिकथा । तेणे सदा चित्ता। समाधान॥’ हा संदेश माझ्या मनात बालपणीच रूजला आणि माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. संतांनी त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या, आचरणाच्या माध्यमातून जो संदेश दिलाय त्याचा अभ्यास केला आणि त्यांचा एखादा विचार जरी अंमलात आणला तरी आपल्या आयुष्याचे सार्थक झाले असेच म्हणावे लागेल.

युवा कीर्तनकार, शिक्षक आणि अभ्यासक असलेल्या रमेश वाघ यांनी घरकोंडीच्या काळात दहा संतांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि त्यातून अतिशय साध्या-सोप्या भाषेत त्यांचे शब्दचित्र वाचकांसमोर उभे केले आहे. बालकुमारांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांनी वाचावे, अभ्यासावे आणि आचरणात आणावे अशी मांडणी या पुस्तकात केली आहे.

खरेतर प्रत्येक संतांच्या आयुष्यात अनेक आख्यायिका जोडल्या आहेत, चमत्कार जोडले आहेत. ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ असे म्हणतात ते उगीच नाही. त्यामुळे त्या त्या संतांच्या अनुयायांनी हे उद्योग केलेले असावेत. ज्या गोष्टी, घटना वैचारिक, वैज्ञानिक तर्काच्या कसोटीवर पटत नाहीत त्या निदान माझ्यासारखा बुद्धिप्रामाण्यवादी माणूस कधीही स्वीकारणार नाही! पण म्हणून संतांचे योगदानच नाकारायचे किंवा त्यांच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी उडवून लावायच्या असा करंटेपणा कोणीही आणि कधीही करू नये. यातील काही लेखात भगवंताची अगाध लीला वर्णन करताना परंपरागत ऐकत आलेले जे चमत्कार मांडले आहेत ते अमान्य करूनही या पुस्तकाचे श्रेष्ठत्व स्वीकारावेच लागेल. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे म्हणतात त्याप्रमाणे एक तरी संत समजून घ्यावा आणि तो समजून घेण्यास, किमान त्यांच्याविषयी जिज्ञासा निर्माण करण्यात हे पुस्तक यशस्वी ठरते. लेखकाचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी त्यांची शैली वाचकांना भुरळ घालते आणि या सर्व संतांविषयी आदर आणि श्रद्धाभाव जपण्यास, तो अधिक वृद्धिंगत करण्यास हातभार लावते. ‘अजानवृक्षाची मुळी मला टोचते आहे, ती तू दूर कर’ असा दृष्टांत योगीराज ज्ञानेश्वरमाउलींनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना दिला होता. या क्षेत्रातील थोड्याफार अनुभवाचा फायदा घेत मला माझे सन्मित्र रमेश वाघ यांना अधिकाराने सांगावेसे वाटतेय की भविष्यात तुम्ही संतांच्या जीवनाशी जोडलेले चमत्कार आणि त्यातून निर्माण झालेल्या अंधश्रद्धा दूर करा आणि संतविचारांचा तात्त्विक गाभा समर्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवा. हे कार्य करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला उदंड बळ देईल याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही.

ज्ञानियांचा राजा माउली, त्या काळातही भक्तिचा महिमा भारतभर पोहचविणारे संत नामदेव, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी असे म्हणत श्रमसंस्कृतीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे संत सावता महाराज, सर्व संतांचे काका गोरोबाकाका, देवादेवांत भेद करू नका असा संदेश देणारे संत नरहरी सोनार, कुविचारांची हजामत करणारे संत सेना न्हावी महाराज, सर्वांगी चोखळा असलेले संत चोखामेळा, आपल्या गवळणी आणि भारूडांच्या माध्यमातून अलौकिक कार्य करणारे शांतिब्रह्म एकनाथ महाराज, मेणाहून मऊ असूनही गरज पडल्यास कठीण वज्रासही भेदण्याचा दुर्दम्य आशावाद पेरणारे, मायबापांपेक्षाही अधिक प्रेम करणारे आणि प्रसंगी शत्रूपेक्षाही अधिक घातपात करण्याचे सामर्थ्य बाळगणारे माझे आणि अर्थातच असंख्यांचे प्रातःस्मरणीय जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्यांच्या मनाच्या श्लोकाने प्रचंड क्रांती केली, ज्यांनी शक्ती आणि भक्तिची उपसना केली, ‘गुणवंतांची उपेक्षा करू नका’, ‘सत्कर्म करण्यात वय घालवा’ असा कृतिशील संदेश दिला ते समर्थ रामदास स्वामी अशा दहा संतांच्या जीवनावर आधारित असलेले हे दहा लेख म्हणजे दाही दिशांचा वेध घेणारे आणि आपल्या अंतःकरणातील भक्तीचे, प्रेरणेचे, प्रेमाचे, करूणेचे, मानवतेचे दिवे प्रज्वलित करणारे अस्सल साहित्य आहे.

मुख्य म्हणजे प्रत्येक जाती-धर्मातील, प्रांतातील या संतांनी माणसामाणसांत भेदाभेद करू नका असाच संदेश दिला. आजच्या अतिरेकी कट्टरतावादाच्या काळात संतसाहित्य हे फक्त दाखले देण्यापुरते आणि अनेकांसाठी पोटार्थी साधने उपलब्ध करून देण्याइतके सीमित झाले आहे. हे चित्र बदलून एका उदात्त, व्यापक आणि मानवी कल्याणाच्या चिरंतन सुत्रांचा अभ्यास करायचा असेल तर संतचरित्राच्या अभ्यासाला पर्याय नाही. रमेश वाघ यांच्यासारखे कोणतेही पूर्वग्रह नसलेले तरूण अभ्यासाच्या दृष्टीने या वाटेवरून चालत असतील आणि इतरांनाही इकडे आणण्यासाठी प्रेरित करत असतील तर हे खरे देवाचे काम आहे.

संतसाहित्य हाच माणसाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढू शकणारा शाश्वत पर्याय आहे. त्यामुळे या अस्थिरतेच्या, धकाधकीच्या, आपल्या संस्कार आणि संस्कृतीचे अधःपतन सुरू असलेल्या काळात कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञापेक्षा संतविचारांचे टॉनिकच अधिक प्रभावी ठरणार आहे. ती गुटी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अविरतपणे धडपडणार्या रमेश वाघ यांना भविष्यातील वाटचालीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो.

घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक
‘चपराक’, पुणे
चलभाष-7057292092

Monday, March 1, 2021

अहंकाराचा वारा न लागो राजसा...

संतशिरोमणी नामदेव महाराज यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या विकासाची पताका भारतभर पसरवली. वारकरी संप्रदायाचा पाया भक्कमपणे भरण्यात खूप मोठं योगदान दिलं. त्यांचं हे 750 वं जयंती वर्ष आहे. या वर्षात शासकीय पातळीवर त्यांच्याविषयी काही विशेष कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या अनुषंगानं शासकीय जयंती, दिन साजरे करण्याच्या महापुरूषांच्या यादीत संतश्रेष्ठ नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाचा समावेश करावा अशी मागणी जोर धरत आहे.


संत नामदेव महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे आराध्य संत आहेत. पांडुरंगाच्या सर्वश्रेष्ठ भक्तराजात त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या कीर्तनात स्वतः विठुमाउलीही डोलत, अशी आख्यायिका आहे. आपल्या संतपरंपरेनं भागवत संप्रदायाचा पाया भक्कम केला. त्यामुळं या यादीतून विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला दूर ठेवणं हा आपले सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचाही अपमान ठरेल. मराठी साहित्याचा एक नम्र अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की मराठी साहित्य भारतभर नेण्याचं काम संतशिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. भागवतधर्माची पताका हातात धरणं ही अभिमानाची गोष्ट आहे हे जातीधर्माच्या पलीकडं जाऊन सांगितलं. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या संत नामदेवांनी माउलींनंतर पन्नास वर्षे भक्तीचा महिमा सांगितला. त्यांचं नाव या यादीत असणं हे राज्य सरकारसाठीही म्हणूनच भूषणावह ठरेल.

महाराष्ट्रात वारकर्‍यांचं एक वेगळं योगदान आहे, वेगळं अधिष्ठान आहे. संतपरंपरेचा फायदा हिंदवी स्वराज्यासाठीही झालाय हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी  साधार आणि सप्रमाण दाखवून दिलंय. त्यामुळं संतांचं महत्त्व आणि संतांच्या कार्याचं वेगळेपण अधोरेखित केलं जात असताना, महाराष्ट्र या संतपरंपरेमुळं इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे माहीत असताना संतशिरोमणींना दूर सारू नये. संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त शासकीय पातळीवर संत नामदेव महाराजांविषयी जागृती करणारे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतानाच संतसेवेत आमचा खारीचा वाटा म्हणून यंदा ‘चपराक प्रकाशन’ आणि ‘वारकरी दर्पण’च्या माध्यमातून आम्ही एक दिवसीय संतशिरोमणी नामदेव महाराज साहित्य महोत्सवाचे आयोजन करणार आहोत. त्यात संत नामदेव महाराजांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी चर्चासत्रं आणि नामदेव महाराजांवरच कीर्तन होईल. त्यावेळी त्यांच्यावरील काही पुस्तकंही ‘चपराक’कडून प्रकाशित होतील.


संत नामदेवांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ते मानवतावादी संत आहेत. भारतभर पोहोचलेले ते पहिले सहिष्णुतावादी संत आहेत. पंजाबपर्यंत जाऊन घुमानमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. गुरूग्रंथसाहिबात त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं. सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या पुढाकारातून पंजाबमधील घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ. सदानंद मोरे यांच्यासारखा व्यासंगी लेखक त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होता. त्यावेळी पंजाबी आणि मराठी या भाषाभगिनी एकत्र आल्या होत्या. आता या वर्षी महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेतल्यास संत नामदेवांचे अभंग, त्यांचं तत्त्वज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. 


यानिमित्तानं मला आठवण येते ती संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाईंची. त्या लिहितात,


संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥
नामा तयाचा कंकर । तेणें केला हा विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ॥
तुका झालासें कळस । भजन करा सावकाश ॥  
बहेणी फडकते ध्वजा । निरूपण आलें ओजा ॥


महाराष्ट्र भागवतधर्माची ही इमारत किती भक्कम आहे हे संत बहिणाबाईंनी इतक्या समर्थ शैलीत नोंदवून ठेवलं आहे. त्याचा विसर आपल्या राज्यकर्त्यांना पडू नये. समाजाला तर मुळीच पडू नये. 


गेल्या काही वर्षात दुर्दैवानं वारकरी संप्रदायातही काही वाईट प्रवृत्ती घुसल्या आहेत. त्या प्रवृत्ती या भक्तिमार्गाचंही राजकारण करतात. इथंही जातीवाद आणतात. राजकारण्यांच्या आहारी जाऊन मतांचं राजकारण करतात. त्याचाच एक भाग म्हणून वरील अभंगात ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ याऐवजी त्यांनी ‘नामदेवे रचिला पाया’ अशी मांडणी सुरू केली आहे. इतकंच काय, जे वारकरी वर्षानुवर्षे ‘ज्ञानोबामाउली तुकाराम’चा घोष करत वारीत एकोप्यानं सहभागी होतात त्यांच्यातही भेद निर्माण करण्याचं कारस्थान सुरू आहे. ‘ज्ञानदेव-तुकाराम’ ऐवजी ‘नामदेव-तुकाराम’ हे कसं बरोबर आहे हे ते पटवून देत असतात. खरंतर संतशिरोमणी नामदेव महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे समकालिन आहेत. माउलींच्या संजीवन समाधीनंतर पुढे संत नामदेव महाराजांनी पन्नास वर्षे ही भक्तीमार्गाची पताका सर्वदूर अभिमानानं फडकावली. त्यामुळं या संतांच्या मांदियाळीत आपण असं विषमतेचं विष कालवणं हे अक्षम्य पाप आहे. आजवर सर्व संतांनी व्यापक समाजकल्याणाचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही संताचा उपमर्द होऊ नये. त्यांची निंदा होऊ नये. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, 

‘संतनिंदा ज्याचे घरी । नव्हे घर ते यमपुरी ॥’ 

 
संतशिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, 


अहंकाचार वारा न लागो राजसा ।
माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥


आज हेच तत्त्वज्ञान आपण जगणं, आचरणात आणणं गरजेचं आहे. जिथं अहंकार आला तिथं उद्ध्वस्त होणं आलं, नष्ट होणं आलं. भलीभली साम्राज्ये येतात, जातात. नंतर त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दिसणंही दुरापास्त होऊन जातं. आज आपण विजयनगरला गेलो तर तिथं मातीच्या ढिगार्‍याशिवाय काहीच मिळणार नाही. फार लांब कशाला, शनिवारवाड्याचं वैभवही आज त्याच्या पडक्या भिंतीवरूनच अनुभवावं लागतं. त्यामुळं सत्ताधार्‍यांनी हे व असे विषय चर्चेला आणून जनक्षोभ उसळेल याची वाट पाहू नये. संतविचारांवर आपल्या राज्याची, राष्ट्राची उभारणी झालीय. आपल्यावरील संस्काराचा पगडा त्यामळेच अजून कोणी दूर करू शकले नाही. अनेक आक्रमणे झाली, जुलूमी सत्ता आल्या पण अशा कोणत्याही अरिष्टांवर मात करत आपण टिकून आहोत, मानसिकदृष्ट्या सुदृढ आहोत याचे बरेचसे श्रेय संतविचारांकडे जाते.


वारकरी संप्रदायाचे उपासक असलेल्या सचिन पवार यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे की, आपल्या राष्ट्राच्या उभारणीत वैचारिक योगदान देणार्‍या संतांच्या विचारांचा गौरव महाराष्ट्र सरकारने नव्हे तर पाकिस्तान सरकारने करायचा का? त्यांच्या या भावना आपल्याकडील तमाम वारकरी बांधवांच्या म्हणून स्वीकारायला हव्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संतशिरोमणी नामदेव महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, शांतिब्रह्म एकनाथ महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या किमान प्रमुख संतांची नावं महापुरूषांच्या यादीत घालावीत. त्यामुळं या संतांच्या कीर्तीत भर पडेल असे नाही तर महाराष्ट्र सरकारसाठी ही बाब गौरवाची, अभिमानाची असेल. शासकीय पातळीवरून हा विचार सामान्य माणसांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत गेला तर आपल्या राष्ट्राच्या बौद्धिक विकासास बळकटी मिळू शकेल.
- घनश्याम पाटील
7057292092


प्रसिद्धी - दैनिक पुण्य नगरी, २ मार्च २०२१

Friday, February 26, 2021

भूमिका न घेणं हीच भूमिका!


मराठी भाषा दिन साजरा करताना आपण फक्त भाषेविषयी चिंता व्यक्त करणं किंवा फुकाचा अभिमान बाळगणं यापेक्षा काही मूलभूत चिंतन करून भाषेला बळ दिलं, लेखक-प्रकाशकांना प्रोत्साहन दिलं तरच ही परिस्थिती बदलू शकेल.
-----------------


मराठीतल्या बहुतेक प्राध्यापकांची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून शिकत असतात. हेच लोक ‘मायमराठी वाचवा’ म्हणून भाषणं करत फिरतात, अनेक पुरस्कार लाटत असतात, सरकारी अनुदान, शिष्यवृत्ती पदरात पाडून घेतात. असे विद्यापीठीय आणि विविध मालिकांसाठी रतीब टाकणारे लोकच आजच्या काळात भाव खाऊन जातात, पैसा-प्रसिद्धी मिळवतात आणि वाचन संस्कृतीविषयी कायम नकारघंटा वाजवतात. ‘लेखकांनी सरकारविरूद्ध तुटून पडायला हवं’ असं त्यांना वाटत असतं. त्यांनी स्वत:च अर्ज भरावेत, पुस्तकं पाठवावीत आणि सरकारकडून पुरस्कार मागून घ्यावेत. नंतर ‘पुरस्कार वापसी’च्या लाटेवर स्वार व्हावं. या काळात त्यांचं हे दुटप्पी वागणं मुद्दाम अधोरेखित करावंसं वाटतं.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात कितीसे लेखक रस्त्यावर गोळ्या छातीवर झेलायला उभे राहिले? 1972 ला मोठा दुष्काळ पडला, हाहाकार उडाला. महाराष्ट्र होरपळून निघाला. तेव्हाही सामान्य माणसाच्या मदतीसाठी कुणी लेखक रस्त्यावर उतरला नाही. त्यानं कोणत्या संघटनेत काम केलं नाही की कसला मदतनिधी गोळा केला नाही. अणीबाणीच्या काळात मराठी लेखकांनी माफीनामे  लिहून देणार नाही असे ठणकावत तुरूंगवास सहन केला नाही, आपला मराठी बाणा दाखवला नाही. रणजित देसाई, बाबा कदम, वसंत कानेटकर ज्यांची नाटकं फार प्रक्षोभक आहेत म्हणून उल्लेख केला जातो ते विजय तेेंडुलकर, ज्यांना क्रांतिकारी समजलं जातं ते दि. पु. चित्रे असे कोणीही कुठल्या आंदोलनात सहभागी झाल्याचं वाचलं नाही. लांब रहायचं, आडोशाला उभं रहायचं, पाऊस बघायचा आणि पावसावरच कविता लिहायच्या हेच काम मराठी लेखकांनी केलं.

1993 ला मुंबईत बॉम्बस्फोट झाला, दंगल उसळली! पण त्यावेळी कोणता मराठी लेखक बाहेर पडला नाही. याच वर्षी आमच्या किल्लारीत भूकंप झाला. या भूकंपात सर्वाधिक सहन करावं लागलं ते घरातील बाईला. मात्र हे सहन करणं, हे बदल अनुभवणं एकाही स्थानिक महिलेच्या लेखणीतून शब्दबद्ध झालं नाही. 2008 ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. तेव्हाही कोणत्या मराठी लेखकानं पुस्तक लिहून याचा निषेध केला नाही. त्यामुळं समाजमनाचा विचार करून लेखक कधी भूमिका घेत होते, आपल्या कल्पनाविलासातून बाहेर पडून सामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांवर फुंकर घालत होते असं समजण्याचं कारण नाही.

आपल्या मराठी लेखकांचं अनुभवविश्व समृद्ध नाही, त्यांचं आयुष्य तोकडं आहे आणि वाचनही तितकसं दांडगं नाही हे आजवर अनेकांनी सांगितलंय. त्यामुळंच मराठी लेखक जागतिक स्तरावर पोहोचू शकले नाहीत. असा लेखक मराठीला मिळाला असता तर तो नोबेलपर्यंत गेला असता. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांत मराठी ही दहाव्या क्रमांकावर असताना लेखनाच्या जीवावर कोणी मराठी लेखक जॅग्वार, ऑडीसारख्या महागड्या गाड्यांमधून फिरतोय, नरिमन पॉईंट, दादरला किमान त्यानं एखादा वन बीएचके फ्लॅट घेतलाय असं चित्र दिसत नाही. मराठी लेखकाचा इथल्या सर्वसामान्य माणसाच्या सुख-दु:खाशी, त्याच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही.

महाराष्ट्राचं ग्रामीण जीवन समृद्ध असल्यानं त्यावर आणखी दखलपात्र लेखन येण्याची गरज आहे. जे जगले, माणूस म्हणून जे अनुभवले ते आपल्या अनेक लेखकांना शब्दात मांडता येत नाही. शे-पाचशे पानांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं की आपल्या लेखकांकडं सांगण्यासारखं काहीच शिल्लक राहत नाही. जीवनाचे विविध रंग त्यांना अनुभवता येत नाहीत. अद्वितीय आयुष्य जगण्याचं धाडस खूप कमी लोकांकडं असतं. मराठी माणूस याबाबत कच खातो. दरवर्षी साहित्य संमेलनातच सीमा प्रश्नाबाबत ठराव मांडणारा मराठी लेखक वर्षभर त्यावर काहीच भूमिका घेत नाही. किंबहुना कोणतीच भूमिका घ्यायची नाही एवढी एकच भूमिका आपले मराठी लेखक प्रामाणिकपणे घेत आलेत. ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी घोषणा वर्षात एकदा दिली की मराठी लेखकांची जबाबदारी संपते का? सीमा भागात जाऊन आपले लेखक काही साहित्यिक उपक्रम का राबवत नाहीत?

प्रशासकीय अधिकारी असलेले काही लेखक आपल्याकडे पदाचा वापर करून लोकप्रिय झाले. त्यांच्या साहित्यात काहीच दम नाही. त्यातले काहीजण तर संमेलनाध्यक्षही झाले. मराठी बाणा दाखवणार्‍या दुर्गाबाई भागवत, पु. ल. देशपांडे यांच्यासारखे काही अपवाद आहेत. त्यांचीही इथल्या व्यवस्थेनं ससेहोलपट केली. मराठीतील सुमार लेखकांनी व्यवस्थेच्या विरूद्ध कधीच बंड पुकारलं नाही. कुठं फार प्रवास केला नाही. संशोधन-अभ्यास याच्याशी तर त्याचा काही संबंधच येत नाही. म्हणूनच इतर क्षेत्रात जे लोक काम करतात आणि लेखनाशिवाय ज्यांच्या उपजिविकेचं काही साधन आहे तेच लोक त्यांची हौस पूर्ण करण्यासाठी म्हणून लिहित असतात आणि तेच लेखक म्हणून सर्वत्र सन्मानानं मिरवतात. आपल्या या वृत्तीमुळंच ‘पूर्णवेळ लेखन’ हे अनेकांना भिकेच्या डोहाळ्याचं लक्षण वाटतं. संत साहित्याची, लोकसाहित्याची मोठी परंपरा असतानाही मराठी साहित्य पुढे तेवढं बहरू शकलं नाही. एकनाथांची भारूडं किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगातील विद्रोह पुन्हा कुणाच्या लेखनात दिसला नाही. मराठीचा अभिमान असलेले लेखक कमी झाल्यानं ही दुरवस्था ओढवली.

संजय राठोड किंवा धनंजय मुंडे यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलं तरी उत्तम कादंबरी होईल पण आपले लेखक सामाजिक, राजकीय घडामोडींकडे डोळसपणे बघतच नाहीत. सेक्स आणि व्हायलंस असलेले असे विषय आपण दुर्लक्षित ठेवतो. पुण्यामुंबईत बसून मराठी बाणा दाखवता येणार नाही. त्यासाठी सातारला, चंद्रपूरला, भंडारा-गोंदियाला गेलं पाहिजे. आमच्या लातूर-सोलापूरला आलात तर मराठी बाण्याशिवाय दुसरं काही दिसणार नाही. सामान्य माणसात, शेतकर्‍यांत, कामगारांत, कष्टकर्‍यात मिसळल्याशिवाय तुम्ही उत्तम लिहू शकणार नाही.

उत्तमोत्तम लिहिणार्‍या लेखकांच्या पाठिशी मराठी वाचकांनीही उभं राहिले पाहिजे. नवनव्या लेखकांची पुस्तकं आपण विकत घेतली तर त्यांना बळ मिळेल. चांगले लेखक पुढं यायचे असतील तर हे व्हायला हवं. आपण नको त्या पुढार्‍यांच्या चार-चार पिढया जगवल्यात. चांगल्या लेखकांच्या पाठिशी आपण उभं राहिलं तर चांगले लेखक पुढे येऊ शकतील. मराठी भाषा दिन साजरा करताना आपण फक्त भाषेविषयी चिंता व्यक्त करणं किंवा फुकाचा अभिमान बाळगणं यापेक्षा काही मूलभूत चिंतन करून भाषेला बळ दिलं, लेखक-प्रकाशकांना प्रोत्साहन दिलं तरच ही परिस्थिती बदलू शकेल.
(प्रसिद्धी - दै. पुण्यनगरी, 27 फेब्रुवारी 2021)
- घनश्याम पाटील
संपर्क : 7057292092

Wednesday, February 24, 2021

सरकारला शहाणपण कधी येणार?

महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या विकासाची पताका भारतभर पसरवणारे संतशिरोमणी नामदेव महाराज! वारकरी संप्रदायाचा पाया भक्कमपणे भरण्यात ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं त्यांचं नाव महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनं शासकीय जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याच्या कार्यक्रमाच्या यादीतून वगळण्याचा करंटेपणा केला आहे. संत नामदेव हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे आराध्य संत आहेत. पांडुरंगाच्या सर्वश्रेष्ठ भक्तराजात त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या कीर्तनात स्वतः विठुमाऊलीही डोलत असत अशी आख्यायिका आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी नामदेव महाराज यांनी भागवत संप्रदायाचा पाया भक्कम केला. त्यामुळं या यादीतून विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला दूर करणं हा फक्त संत नामदेव महाराजांचा, फक्त संत परंपरेचा अपमान नाही तर तो आपले सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचाही अपमान आहे. या भक्तराजाला अशी वागणूक देणार्‍या मुख्यमंत्र्याला विठ्ठल पुढच्या वेळी त्यांच्या पुजेचा मान देणार नाहीत असं माझ्यासारख्या श्रद्धावान माणसाला वाटतं.

मराठी साहित्याचा एक नम्र अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की मराठी साहित्य भारतभर नेण्याचं काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. भागवतधर्माची पताका हातात धरणं ही अभिमानाची गोष्ट आहे हे जाती-धर्माच्या पलीकडं जाऊन सांगितलं. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या संत नामदेवांनी माउलींनंतर पन्नास वर्षे भक्तीचा महिमा सांगितला. त्यांचं नाव या यादीतून वगळून प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची नावं यात घुसडली आहेत. कुणाची नावं घालावीत, कुणाला महापुरूष म्हणून मान्यता द्यावी याबाबत प्रत्येक सत्ताधार्‍याची काही धोरणं असतात. त्यामुळं संत नामदेवांचं नाव या यादीत का घातलं आणि आता ते का वगळलं हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यानंतर कधी संधी मिळेल की नाही हे ते स्वतःही ठामपणे सांगू शकणार नाहीत. त्यामुळं त्यांनी त्यांचं स्वतःचं नावही या यादीत आत्ताच घातलं तरी आमची हरकत नाही. पुढच्या सत्ताधार्‍यांना आम्ही ते वगळायला लावू! मात्र संत नामदेवांची ही अशी उपेक्षा का केली हे त्यांनी कोमट पाणी पित जनतेला निदान एखादा व्हिडिओ करून सांगायला हवं.

शिंपी समाज महाराष्ट्रात अल्पसंख्य आहे, तो विरोध करणार नाही, केला तरी आपल्या मताच्या टक्क्यात काही फरक पडणार नाही असं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत नाही ना? तसं असेल तर किमान संत-महात्म्यांना तरी जातीपातीत वाटण्याचे उद्योग करू नका. ते तुम्हाला झेपणारं नाही. ज्यांना स्वतःच्या वडिलांचं स्मारक अजून करता येत नाही त्यांनी आपल्या वडिलांचं-आजोबांचं नाव अशा यादीत घुसवताना काहीतरी अभ्यास केलेलाच असेल. मात्र संत नामदेवांना का वगळलं हे कळायला मार्ग नाही. ‘मराठी माणसाचा स्वाभिमान’ या मुद्द्यावर स्थापन झालेल्या शिवसेनेत आता लाचारांची मोठी फळी तयार होतेय आणि हे व असे सगळे निर्णय हा त्याचाच परिपाक आहे.

भाग्यवंत लाचारांना दिसे मीच नंगा
घेउनी न झालो आलो म्हणून मी लफंगा


असं गझलसम्राट सुरेश भट म्हणायचे. म्हणजे तुमच्यासमोर जे लाचार नाहीत ते सगळे लफंगे का?

वारकर्‍यांचं एक वेगळं योगदान आहे, वेगळं अधिष्ठान आहे. संतपरंपरेचा फायदा हिंदवी स्वराज्यासाठीही झालाय हे साधार आणि सप्रमाण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी दाखवून दिलंय. त्यामुळं संतांचं महत्त्व आणि संतांच्या कार्याचं वेगळेपण अधोरेखित केलं जात असताना, महाराष्ट्र या संतपरंपरेमुळं इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे माहीत असताना संतशिरोमणींना तुम्ही दूर सारता? एवढी कसली तुम्हाला मस्ती आलीय? एवढा कसला अहंकार आहे? का संत नामदेवांचं नाव वगळलं? प्रारंभी उल्लेखल्याप्रमाणे संत नामदेव आणि अल्पसंख्य असलेला सहिष्णु शिंपी समाज तुम्हाला क्षमा करेल पण पांडुरंग आता त्याच्या दारात तुम्हाला उभा करेल का? सत्तेचा उन्माद काय असतो हे तुमच्या वागण्यातून दिसून येतंय.

संत शिरोमणी नामदेव महाराजांचं हे 750 वं जयंती वर्ष आहे. शासकीय पातळीवर संत नामदेव महाराजांविषयी जागृती करणारे उपक्रम राबवणं अपेक्षित असताना सरकारनं हा करंटेपणा केला आहे. या गोष्टीचा करावा तितका निषेध थोडाच आहे. या पार्श्वभूमिवर संतसेवेत आमचा खारीचा वाटा म्हणून यंदा माझे सन्मित्र ह. भ. प. सचिन पवार यांच्या पुढाकारातून ‘चपराक प्रकाशन’ आणि ‘वारकरी दर्पण’च्या माध्यमातून आम्ही एक दिवसीय संतशिरोमणी नामदेव महाराज साहित्य महोत्सव घेणार आहोत. त्यात संत नामदेव महाराजांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी चर्चासत्रं आणि नामदेव महाराजांवरच कीर्तन होईल. त्यावेळी त्यांच्यावरील काही पुस्तकंही ‘चपराक’कडून प्रकाशित होतील.

संत नामदेवांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ते मानवतावादी संत आहेत. भारतभर पोहोचलेले ते पहिले सहिष्णुतावादी संत आहेत. पंजाबपर्यंत जाऊन घुमानमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. गुरूग्रंथसाहिबात त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि त्यांच्या मंत्रीमंडळानं एक गोष्ट विसरू नये की सत्ता ही सर्वकाळ कुणाकडंही नसते. कधीतरी तुमची, तुमच्या घराण्याची सत्ता जाईल. एकदा विजयनगरचं साम्राज्य बघून या. तिथं मातीचे ढिगारेच दिसतील. रोमन साम्राज्यही ओस पडलंय. त्यामुळं तुम्ही जर तुमचं असंच वर्तन ठेवलं तर तुमचं साम्राज्य संपल्यावर तुमच्या पूर्वजांच्या जयंत्या सोडा त्यांचे फोटो लावायलाही कोणी शिल्लक राहणार नाही. इतका भुक्कडपणा सत्ताधार्‍यांना न शोभणारा आहे.

आता हतबलपणे असं सुचवावंसं वाटतं की सगळ्या राष्ट्रपुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या रद्द करा. ज्या दिवशी ज्यांची जयंती असेल त्या दिवशी शासकीय आणि खासगी कार्यालयात त्यांच्यावर प्रेम असणार्‍या सर्वांनी चार तास जास्त काम करावं. प्रबोधनकार ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर किंवा कोणत्याही राष्ट्रपुरूषांवर प्रेम असणार्‍या त्यांच्या अनुयायांनी चार तास जास्त काम करावं. अर्थात याचीही कुणावर सक्ती करू नये. मुख्यमंत्र्यासह सर्व आमदारांनी आणि राज्याच्या मुख्य सचिवांपासून ते ग्रामपंचायतीच्या शिपायापर्यंत सर्वांनी त्यांच्या त्यांच्या आवडत्या महापुरूषांच्या जयंतीनिमित्त किमान त्या एक दिवसाचा त्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावा.

राष्ट्रपुरूषांबद्दल प्रेम दाखवण्याची पद्धत कोणती? तर त्यांचा विचार पुढं नेणं... ते तर कोणीही करताना दिसत नाही. या उपक्रमामुळं निदान काही चांगल्या योजना पुढं जातील. समजा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल तर त्यांच्या सर्व चाहत्यांनी त्यांचं ग्रंथप्रेम लक्षात घेऊन त्या दिवशी अधिकाधिक वाचन करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांचं मा. बाबासाहेबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अधिकाधिक पुस्तकं विकत घ्यावीत आणि ती गरजू ग्रंथालयांना, वाचकांना भेट द्यावीत. महापुरूषांची जयंती अशा पद्धतीनं साजरी करण्याची सवय समाजाला लावली गेली तर ठाकरे सरकारप्रमाणे असा करंटेपणा भविष्यात कोणी करू शकणार नाही आणि कुणाच्या जयंत्या साजर्‍या करायच्या यावरून राजकीय पक्षात मतभेद राहणार नाहीत.

लग्नाच्या अक्षता पडण्याच्या अगोदरच घटस्फोटाची केस चालवायला घेण्याचा उद्योग ठाकरे सरकार सातत्यानं करत आहे. हा धंदा त्यांनी आता बंद करावा. ज्या तत्परतेनं संत नामदेव महाराजांचं नाव वगळलं तशा तत्परतेनं संजय राठोडसारख्या नेत्यांकडं लक्ष द्या. लोकशाहीत आर्टिकल 14 प्रमाणे सत्तेतले लोक जसा उन्माद करतात त्याप्रमाणेच पाचशे दुचाकी घेऊन गजा मारणेंना रॅली काढण्याचा अधिकार आहे. अशा लोकात आणि सध्याच्या सत्ताधार्‍यांत काही फरक असेल तर तो निव्वळ योगायोग आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराजांबाबतचा हा प्रकार नेमका का घडला याचं स्पष्टीकरण देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. नामदेवांचं नाव वगळून तुम्ही संतपरंपरेच्या पहिल्या पायरीला हात घातलाय. तुम्हाला मिळालेली ही शिकवण कुणाची हे सांगताना आणि आधीची परंपरा नष्ट करून, मोडीत काढून नवी परंपरा निर्माण करण्याचे निकष काय हेही सांगायला हवं.

राजकारणी जर अशा पद्धतीनं काम करणार असतील तर उद्या निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचं, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा कुणाचीही नावं राष्ट्रपुरूषांच्या यादीत दिसणार नाहीत. ते व्हायचं नसेल तर या सत्ताधार्‍यांना आणि समाज म्हणून आपल्यालाही आता थोडंफार शहाणपण यायला हवं.
- घनश्याम पाटील
7057292092