Thursday, April 16, 2020

कोरोनाच्या लढाईतील देवाचं काम


आपल्या देशाची अखंडता टिकून राहण्यात सगळ्यात मोठा वाटा कशाचा असेल तर तो आहे आपल्या संस्कृतीत आणि माणूस म्हणून असलेल्या चांगुलपणात. आपल्याकडे गरीब-श्रीमंतीची दरी आहे, जात-धर्मातील संघर्ष आहे, प्रथापरंपरांचं जोखड आहे, विविध समूहांच्या टोकदार अस्मिता आहेत, विविध विचारधारांचा झापडबंदपणा आहे. हे सगळं खरं असलं तरी आपल्या श्रद्धा प्रबळ आहेत, आपल्या भावभावना सच्च्या आहेत, इतरांच्या व्यथा-वेदना समजून घेण्याची उपजत वृत्ती आहे. म्हणूनच आपलं चांगुलपण टिकून आहे, देश टिकून आहे, त्यातून मानवता टिकून आहे. आपल्या राष्ट्रावर अनेक आक्रमणे झाली, संघर्ष झाले, नैसर्गिक आपत्ती आल्या, आजारांच्या साथी आल्या. तरीही आपण टिकून आहोत, ठाम आहोत, जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता बाळगून आहोत. सध्या कोरोनामुळं जगातील प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना माणसामाणसातील अंतर कमी होतंय. 'सोशल डिस्टन्स' राखताना आपण मनानं जवळ येतोय आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जगभर मोठ्या प्रमाणात जे सकारात्मक प्रयोग सुरू आहेत त्याची सर्वत्र दखल घेतली जात आहेच. भविष्यातही घेतली जाईल. आज आपण आपल्या आजूबाजूला छोट्या स्वरूपात सुरू असलेल्या काही चांगल्या प्रयोगाकडे बघूया. अर्थात हे सगळे विधायक उपक्रम मांडायचे तर एक जाडजूड ग्रंथ होईल पण आपण काही प्रातिनिधिक उदाहरणं बघूया. मानवता जिवंत ठेवणाऱ्या या सगळ्या घटना आपलं मनोधैर्य वाढवायला मदत करतील. 

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर सर्वतोपरी मदत करत आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अव्याहतपणे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असं म्हणत प्रत्येकाला धीर दिला आहे. शिवथाळीच्या माध्यमातून कोणीही उपाशी राहू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत. इतर राज्यातील आपल्याकडं अडकलेल्या कर्मचाऱ्यांची त्यांनी सगळी व्यवस्था केलीय. सातत्यानं जनतेशी संपर्क साधून ते करत असलेल्या कार्याची माहिती देत आहेत. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मंत्रीमंडळातील सर्वच नेते उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करत आहेत. उद्धवसाहेबांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील निवृत्त अधिकारी, सैनिक, डॉक्टर, नर्स आदींनी या सेवा कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत डोंबिवलीच्या महापौर विनिता माने यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विनिताताई पूर्वी नर्स होत्या. सध्या महापौर आहेत. हे पद फक्त मिरवण्यासाठी नसतं तर जनतेची सेवा करण्यासाठी असतं याचं भान त्यांना आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी महापौरपदाची झुल, सगळा दिखाऊपणा बाजूला सारत डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्स म्हणून कोरोनाग्रस्तांची सेवा सुरू केली आहे. त्यांच्या या मातृहृदयी सेवाकार्याची भविष्यात योग्य ती नोंद नक्की घेतली जाईल.

अशा आपत्तीच्या काळात आपला दातृत्वभाव दाखवत अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. रतन टाटा यांच्यासारख्या माणसातल्या देवानं थोडेथोडके नव्हे तर तब्बल पंधराशे कोटी रुपये कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले. आपल्या विविध देवस्थानांच्या विरुद्ध अनेकांकडून कायम राळ उडवली जात असली तरी यावेळी बहुतेक तीर्थक्षेत्रांनी यथायोग्य मदतीचा हात पुढं केला. सोलापुरातील आराध्या अजय कडू या दुसरीतील विद्यार्थीनीनं आपला जन्मदिवस साजरा करणं रद्द करून ती मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. उद्धव ठाकरे यांनी आराध्याचं जाहीर कौतुक करत तिला आशीर्वाद दिले. बीड येथील पाच वर्षाच्या पार्थ पाटील आणि जयदत्त पाटील यांनीही त्यांच्या वाढदिवसाठी जमवलेली रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडं सुपूर्त केली. या बालचमुंची ही सजगता अनेकांचे डोळे उघडणारी आहे. पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांचा नुकताच 56 वा वाढदिवस झाला. 56 वर्षाच्या आयुष्यातील रोजचा एक रुपया याप्रमाणं त्यांनी 20464 रुपयांचा धनादेश आयुक्तांकडं मदत म्हणून दिला. प्रशांत दामले यांच्यासारख्या कलावंतानं कला क्षेत्रातील अनेक गरजूंना सढळ हातांनी मदत केली. आजूबाजूची अशी असंख्य उदाहरणं पाहता माणुसकीवरील विश्वास दृढ होतो.

घरकोंडीमुळं बाहेर पडणं अवघड झालं आहे. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना एकवेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. अशावेळी मदतीसाठी कोणी पुढं सरकलं नाही तरच नवल.  अनेकांनी अक्षरशः अन्नछत्र उघडल्याप्रमाणं यात योगदान दिलंय. पुण्यातील वंदे मातरम संघटना, सरहद काश्मीरी संघटना आणि गुरू गौतमी मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीनं गरजूंना भोजनाची व्यवस्था केली जातेय. श्रमिक वर्गासह परगावातील विद्यार्थ्यांची त्यामुळं मोठी सोय झाली. बुधवार पेठेतील देवदासी भगिनींना अन्नदान करून त्यांनी जो आदर्श निर्माण केला त्याला तोड नाही. सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी पडद्याआड राहत जे निर्माण केलंय ते पाहता महाराष्ट्रानं त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ रहायला हवं.

सोलापूरच्या बाळे भागातील अनेक गरजूंना अन्नधान्याची गरज होती. त्यांच्या चुली बंद पडल्या होत्या. अशावेळी लोणार गल्ली येथील शिवशक्ती बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या बिज्जू प्रधाने यांनी पुढाकार घेतला. त्यांनी 'एक घास तुम्हालाही' हा उपक्रम राबवत एक हजारहुन अधिक लोकाना मदतीचा हात दिला. भीम नगर, साठे नगर, खडक गल्ली, राहुल नगर, लक्ष्मी नगर, पाटील नगर, चांभार गल्ली येथील कोणीही उपाशी राहू नये यासाठी प्रधाने कुटुंबीय पुढं सरसावलं. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकरी बांधवानं तर त्याचा एक एकर गहू आसपासच्या गरजू कामगार स्त्रियांना वाटून टाकला. 

हा लेख लिहीत असतानाच साप्ताहिक 'विवेक'च्या रवींद्र गोळे यांची एक पोस्ट वाचण्यात आली. रवीदादांनी रेशनचं धान्य आणलं. इतकं धान्य घरात लागणार नसल्यानं ते गरजूंना द्यायचा त्यांचा विचार होता. 'घाई करू नका' असा सल्ला पत्नीनं दिला. थोड्या वेळात एक परप्रांतीय संडास साफ करण्याचे पैसे न्यायला आला. गोळे वहिनींनी त्याची विचारपूस केली. त्यानं सांगितलं कामही बंद आहे आणि चुलही. ते चार-पाच कर्मचारी एका खोलीत बंद होते. वहिनींनी ते धान्य त्याला देऊन टाकलं. 'भीक आणि भूक यांना धर्म नसतो' असंही त्यांनी सांगितलं. आपण कोणी फार मोठे दाते नाही मात्र माणूस आहोत, अशी भावना त्या व्यक्त करतात. या भावनेवरच तर आपला समाज तग धरून आहे. सरकारी पातळीवर जी मदत केली जातेय, दिली जातेय त्याची नोंद होईल पण सामान्य माणूस अशा पद्धतीनं त्याच्या घासातला घास इतरांना देतोय हे चित्र फार सुखद आहे.

प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचा 'मराठी संस्कृती' हा व्हाट्सऍपचा एक समूह आहे. त्यावर सुधाकर शेलार यांनी सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करायची संकल्पना मांडली. सुधाकर शेलार, राहुल पाटील, तुषार चांदवडकर, आनंद काटीकर, विजय केसकर अशा सर्वांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि बघताबघता 75 हजार रुपये जमा झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधत हा मदतनिधी कोरोनाच्या लढाईसाठी देण्यात आला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते अनेक संस्था संघटनापर्यंत सर्वजण यावेळीही नेटानं कामाला लागलेत. आपली सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस, अन्य सरकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, प्रसारमाध्यमं हे सर्वजण यावेळी जे काम करत आहेत त्यालाच तर 'देवाचं काम' म्हणतात. कोरोनाच्या काळात चांगुलपणावरील श्रद्धा वृद्धिंगत करणारी असंख्य उदाहरणं दिसून आली. त्यातल्या कित्येक घटना काळाच्या ओघात पुढे यायच्या नाहीत पण म्हणून त्यांचं महत्त्वही कमी होणार नाही. या घरकोंडीत माणूस किती हतबल असतो हे जसं दिसून आलं तसंच तो एकमेकांची किती काळजी घेतो हेही दिसून आलं. आपण एकटे नाही, आपल्यासोबत आपला समाज आहे, आपलं सरकार आहे, आपल्यावर प्रेम करणारी, आपली काळजी करणारी माणसं आहेत, इथली भक्कम यंत्रणा आपल्यासोबत आहे हे ठळकपणे अधोरेखित झालं. ही जागतिक समस्या आपल्याला अगतिक करू शकली नाही हे आपल्या राष्ट्राचं यश आहे. भविष्यात आपापल्या क्षेत्रात नव्या जोशात उभं राहण्याचं बळ यातूनच आपल्याला मिळणार आहे. हा एकोपा, हे सामंजस्य टिकून रहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी रमेश गोविंद वैद्य यांच्या चार ओळी सांगून आपला निरोप घेतो.

पाप आणि पुण्य यांचा दूर ठेवा ताजवा
किर्रर अंधारी प्रकाश देण्या पुरेसा एक काजवा
अंतराळी उंच जावो प्रीतीची ही आरती
माणसाने माणसाला ओळखावे आणखी!

-घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Monday, April 13, 2020

'डॉ. आंबेडकरांचे सखे सोबती'

मुंबईला परतताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना त्यांच्या एका मित्रासह सातारा रोड  स्टेशनला जावे लागले. त्यावेळी त्यांचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. एके ठिकाणी त्यांनी टांगा थांबवला आणि खाली उतरून ते एका मैदानात शिरले. अचानक ते व्याकुळ होऊन रडू लागले. मित्राला काय झाले काहीच कळेना. थोडा दुःखभार कमी झाल्यावर ते म्हणाले, "इथे माझ्या आईच्या अस्थी आहेत. तिने आम्हा सर्व भावंडांसाठी खूप खस्ता खाल्ल्या. या पलीकडच्या पडक्या वाड्यात आम्ही राहत होतो. काही दिवस आमची आई व भावंडे खडी फोडून मोलमजुरी करीत होती. मी या रानात लहानपणी खूप खेळलो. माझी आई व बाबा मी किती शिकलो हे पाहण्यास जगले नाहीत. मी फार दुर्देवी आहे," अशी हेलावून टाकणारी एक आठवण डॉ. माधवराव पोतदार यांनी त्यांच्या 'डॉ. आंबेडकरांचे सखे सोबती' या पुस्तकात नोंदवली आहे. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द. ना. गव्हाणकर यांचा विपुल सहवास लाभलेल्या डॉ. माधवराव पोतदार यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. महाड येथील वास्तव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक मित्रांशी, सहकाऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच त्यांनी हे संशोधनात्मक लेखन केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अपरिचित पैलू यात मांडण्यात आले आहेत.  

डॉ  बाबासाहेब  आंबेडकर यांचे जीवनशिल्प कोरणारे त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्यावर या पुस्तकात पहिलेच प्रकरण आहे. "आपले वडील धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्यामुळेच माझा धार्मिक पिंड घडला. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात जायचे ठरले ते त्यांच्यामुळेच" असे डॉ.  बाबासाहेब  त्यांच्या मित्राला म्हणजे वामनराव गोडबोले यांना सांगतात आणि "रामदासांचे श्लोक मला मिळतील का?" असा असा प्रश्नही विचारतात. रामदास स्वामी ब्राह्मण होते म्हणून त्यांनी त्यांचा धिक्कार केला नाही तसाच समर्थांच्या प्रगाढ ज्ञानाचाही केला नाही, ते ज्ञानाचे पूजक होते आणि मनाने सश्रद्ध होते हेच यातून सिद्ध होते.  

बाबासाहेबांची प्राणप्रिय पत्नी रमाबाई आंबेडकर यांना बाबासाहेबांनी विलायतेतून पैसे मागताच रमाबाई बेभान झाल्या. त्यांनी धुणीभांडी केली, झाडलोट केली, शेण थापले, डोक्यावर गोवऱ्या घेऊन त्या विकल्या आणि त्यांना पैसे पाठवले. शिक्षणासाठी ते पैसे अगदी वेळेत मिळाल्यावर बाबासाहेब त्यांना पत्रातून लिहितात, "रमा, मला क्षमा कर! मी घरी आलो की तुझ्या हाताला तेल लावून देईन. तू पाठवलेले पैसे वेळेवर मिळाले. मला तुझा अभिमान वाटला. पत्नी असावी तर अशी! आयुष्याला साथ देणारी!"

ही कर्मयोगिनी त्यांना सोडून गेल्यावर मात्र ते अत्यंत अस्वस्थ झाले. तिच्यावरील उत्कट प्रेमामुळे त्यांनी रमाबाईंचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने त्यांच्या मुलाच्या हातून केले. याविषयी लिहिताना डॉ. पोतदार म्हणतात, "ते राजगृहात गाद्यागिरद्यावर लोळत होते पण पत्नीच्या फाटक्या लुगड्याचा त्यांना जराही विसर पडला नव्हता."

बाबासाहेबांचे अतिशय निकटवर्ती म्हणजे गंगाधर नीळकंठ सहस्त्रबुद्धे. ते बापूसाहेब नावाने ओळखले जात. बाबासाहेबांनी कधीही त्यांचा एकही शब्द अव्हेरला नाही. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आणि अनंतराव चित्रे हे दोन 'आगरकरी ब्राह्मण' डॉक्टरांच्या वैचारिक प्रवासातील मोठे साक्षीदार होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती स्वतः न जाळता बापूसाहेबांच्या हातून एकेक पान होमकुंडात टाकले. त्यांनी स्वतः मनुस्मृती का जाळली नाही यावर भाष्य करताना डॉ. पोतदार लिहितात, बाबासाहेबांना मनुस्मृतीतील ब्राह्मण श्रेष्ठता, वर्णश्रेष्ठता याचे दहन ब्राह्मणांच्याच हातून करायचे होते. हे एकप्रकारचे सनातनी वृत्तीला दिलेले उत्तर होते. त्यातली दुसरी बाजू म्हणजे मनुस्मृती हा ज्ञानग्रंथ होता याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे आपल्याच हाताने मनुस्मृतीला चूड लावणे त्यांना योग्य वाटले नसावे. 

डॉ. बाबासाहेबांचे खास साथी आर. बी. मोरे यांच्याविषयी लिहिताना डॉ. आंबेडकर म्हणतात, "ज्या थोड्या व्यक्तीमुळे मी राजकारणात प्रवेश केला त्यातील एक म्हणजे हे मोरे." एक स्वार्थत्यागी आणि प्रामाणिक अनुयायी म्हणून बाबासाहेबांच्या परिवारात त्यांना मानाचे स्थान होते. 
बाबासाहेबांच्या वाचनाचे साथी असलेले शां. शं. रेगे सर हेही असेच अफलातून व्यक्तिमत्त्व. सिद्धार्थ कॉलेजचं ग्रंथालय त्यांनी समृद्ध केलं. वाचनाची जबरदस्त भूक असलेल्या अशा महापुरुषाला हवे ते पुस्तक वेळीच उपलब्ध करून द्यायची तत्परता त्यांनी जपली. बाबासाहेबांची वाचनाची भूक शमविणे यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य वाहून घेतले. 

बाबासाहेबांच्या कार्यात बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंत चित्रे यांच्याप्रमाणेच यशवंत परांजपे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, हरी गणेश पटवर्धन, देवराव नाईक अशा अनेक 'ब्राह्मण' साथींचा सहभाग होता. याविषयी डॉ. पोतदार लिहितात, "डॉक्टरांचा लढा समतेचा होता. तो विषमतेविरुद्ध होता. त्यामुळे बाबासाहेब अस्पृश्यांनाच घेऊन लढले हा गैरसमज आहे."

देवराव नाईक यांची भूमिका समतावादी होती. ते म्हणायचे, "ब्राह्मणातला अहंकार हाच अनेक अनर्थांना कारणीभूत ठरला आहे." 

देवरावांनी 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' हे पाक्षिक सुरु केले होते. त्याच्या पहिल्याच अंकात त्यांनी लिहिले होते, "पेशवाईच्या काळात ज्यांचा छळ झाला त्या गोवर्धन ब्राह्मण जातीचे आपण! केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून भ्रष्ट ब्राह्मण इतर जातीतील कोणाहीपेक्षा श्रेष्ठ ही काही ब्राह्मणांची प्रवृत्ती जितकी आत्मघातकी आहे तितकीच 'ब्राह्मण ब्राह्मण तेवढा हरामखोर' ही काही ब्राह्मणेतरांनी पत्करलेली वृत्तीही आत्मघातकी व ऐक्य घातकीही आहे."

असे अनेक ब्राह्मण साथी असलेल्या आंबेडकरांचा विरोध ब्राह्मणांना नव्हता तर 'ब्राह्मण्याला' होता हे आजही समजून घेणे म्हणूनच गरजेचे आहे.

मैत्रीचा व कृतीचा चमत्कार असलेले सुरबानाना टिपणीस हेही त्यांचे खास मित्र होते. "सुरबा टिपणीस महाडला असताना तुम्ही मंडळी माझ्याकडे कशाला येता? तो तुम्हाला निश्चित न्याय मिळवून देईल" असे बाबासाहेब म्हणायचे. 

भाईशेठ वडके हेही बाबासाहेबांचे एक महत्त्वाचे साथी. दुर्देवाने त्यांचा उजवा हात निकामी झाला व तो कापावा लागला. त्यांच्याबाबतची एक छान आठवण पोतदारांनी या पुस्तकात दिली आहे. चवदार लढ्यात ज्यांचा सहभाग होता त्यांचा बाबासाहेबांच्या सोबत एकत्रित फोटो काढायचे ठरले. त्यासाठी सर्वजण गांधी टॉकीजजवळ एकत्र जमले. बाबासाहेबांच्या लक्षात आले की यात भाई वडके नाहीत. त्यांनी छायाचित्रण थांबवले. भाईशेठविना फोटो निघणार नाही असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी 'महत्त्वाच्या कामासाठी भेटून जा' असा निरोप भाईंना दिला आणि मग सर्वांचा एकत्र फोटो काढला. आपल्या कार्यकर्त्यावर असे विलक्षण प्रेम ते करीत. 

या पुस्तकातील महत्त्वाचा लेख म्हणजे बाबासाहेबांच्या सावली झालेल्या त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी विझत्या प्राणज्योतीशी स्वतःची तुलना केलीय. या ज्योतीला तेवत ठेवण्याचे श्रेय त्यांनी माईना दिलेय. माईंचे शारदा हे नाव बदलून त्यांनी सविता हे नाव ठेवले. त्यातून त्यांनी माईंची तेजस्विता कबूल केली. बाबासाहेबांच्या जीवनातील अंधारलेली जीवनसाथी म्हणून त्यांच्या जीवनात प्रवेश करून माईंनी सवितेची म्हणजेच सूर्याची तेजस्विता प्रत्ययास आणून दिली आहे. हा लेख वाचताना वाचकांचे डोळे आपोआप पाणावतात. बाबासाहेबांना मिळालेला 'भारतरत्न' पुरस्कार स्वीकारण्याची कृतार्थ संधी माईंना मिळाली.   

लोकमान्य टिळक यांचा विरोध उलटवून लावतानाच त्यांचे पुत्र श्रीधरपंत यांच्याशी मात्र त्यांचे घरोब्याचे संबंध होते. श्रीधरपंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्थ साथ दिली. त्यांनी सनातन्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करताना शेवटचे पत्रही बाबासाहेबांनाच लिहिले. श्रीधरपंत टिळक यांच्या आत्महत्येने बाबासाहेबांच्या हृदयाला जखम झाली होती. 

वैचारिक संवादासाठी जवळ गेलेले ग. त्र्यं. माडखोलकर यांच्याविषयीचा लेखही मस्त झालाय. बाबासाहेब भाऊसाहेबांना म्हणाले होते, "तुम्ही सगळे सवर्ण हिंदू मला अस्पृश्यांचा पुढारी समजता. माझ्याकडचे जे कार्यकर्ते आहेत त्यात मात्र तुम्हाला माझ्या जमातीचे फार लोक दिसणार नाहीत. कायस्थ प्रभू आणि ब्राह्मणच जास्त दिसतील. माझी भाषा आणि विचार ब्राह्मणांना लवकर समजतात आणि तो माझ्याशी चटकन समरस होतो."

प्रबोधनकार ठाकरे, पुढारीकार डॉ. ग. गो. जाधव, वामनराव गोडबोले, ना. ना. पाटील, आर. बी. मोरे, बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणारे अण्णासाहेब ललिंगकर यांच्यावरील लेखही वाचनीय आहेत. ललिंगकर यांना त्यांनी 'खान्देशचा वाघ' हा किताब दिला तर ललिंगकरांनी त्यांच्या मुलाचे नाव बाबासाहेबांच्या नावावरून 'जयभीम' असेच ठेवले. सुदाम गेनू या त्यांच्या सातवीपास नोकराला त्यांनी फक्त पगारच दिला नाही तर त्याचे बचतपत्रही काढून दिले. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना त्यांच्या निवडक स्नेहीजणांची ओळख व्हावी म्हणून डॉ. माधवराव पोतदार यांच्या या पुस्तकाची ही थोडक्यात ओळख करून दिली. ग्रंथ हेच गुरु मानणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला वंदन!
- घनश्याम पाटील, पुणे 
७०५७२९२०९२

दैनिक 'पुण्य नगरी'
१४ एप्रिल २०२०

Thursday, April 9, 2020

*आर्थिक शिस्त महत्त्वाची*

"नरेंद्र मोदी देशामध्ये कलम ३६० अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. देशाच्या आर्थिक स्थिरतेला किंवा भारताची राष्ट्रीय पत कमी होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती कलम ३६० नुसार देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करु शकतात" असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत पटेल उमराव यांनी ट्विटरवर व्यक्त केलं. त्यामुळं आर्थिक आणीबाणी म्हणजे नेमकं काय किंवा ती भारतात लागू होऊ शकते का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अशा आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी किंवा आर्थिक आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते. त्यात वावगं असं काहीच नाही. 

मुळात आणीबाणी म्हणजे निर्बंध. ते कितपत कठोर असतात त्यावर त्याचं यशापयश अवलंबून असतं. सद्यस्थितीचा विचार करता माणसाचं जगणं हेच महत्त्वाचं झालं आहे. आपल्या अस्तित्त्वाची लढाई सुरू असताना देशाचा आर्थिक डोलारा कोसळेल की अधिक भक्कम होईल याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. ही फक्त सरकारची जबाबदारी आहे असं म्हणून आपण त्यापासून दूर पळू शकत नाही.

'आर्थिक आणीबाणी'ची सोपी व्याख्या म्हणजे सर्व प्रकारचे अनावश्यक खर्च कमी केले जातात. सध्या आपल्या मंत्रिमंडळानं लोकप्रतिनिधींचे पगार तीस टक्क्यांनी कमी करून हे स्पष्ट केलं आहे. या दरम्यान सरकारच्या नवीन कोणत्याही खर्चिक योजना जाहीर होणार नाहीत. चालू असलेल्या खर्चिक योजनांचाही पुनर्आढावा घेऊन प्राधान्यक्रम ठरवले जातील. अन्न, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा ठराविक बाबी वगळता अन्य योजनांवरील खर्च मागे घेऊन तो अशा जीवनावश्यक तरतुदींकडे वळवला जाईल. 

शंकरराव चव्हाण यांनी यापूर्वी 'झिरो बजेट' आणलं होतं. आजच्या परिस्थितीत ते शक्य नसलं तरी आपले खर्च आटोक्यात आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या आर्थिक सवयी बदलणं भाग पडणार आहे. तुमचा खर्च किती यापेक्षा तुमची बचत किती हे नेहमीच महत्त्वाचं असतं हे आता स्वतःच्या मनावर बिंबवायला हवं.  

यातून बाहेर पडायला पुढची काही वर्षे प्रत्येकाला खूप प्रयत्न करावे लागतील. सरकारी पातळीवर जे शक्य आहे ते आपले राज्यकर्ते करतील. किंबहुना त्यांनी ते गंभीरपणे करावं. मात्र या सगळ्यात आपल्यासारख्या सामान्य माणसाची जबाबदारी मोठी असणार आहे.  

मराठी माणूस मनानं मोठा आहे. तो कंजूष नाही. मात्र आता 'कंजूषपणा' आणि 'काटकसर' यातला फरक समजून घेण्याची वेळ आहे. स्वतःच्या अनावश्यक गरजा कमी करणं, काटकसर करणं ही काळाची गरज आहे. पुढची काही वर्षे कोणीही जमीन घेणार नाही, महागड्या गाड्या घेणार नाही. गुंतवणूकीचे अनेक पर्याय बंद होतील. स्वाभाविकच त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. सरकारी पातळीवर सुरू असणारे मोठे प्रकल्प कदाचित थांबवले जातील. मोठमोठे रस्ते, धरणं, विमानतळं अशा प्रकल्पांचा पैसा जीवनावश्यक लोककल्याणकारी प्रकल्पाकडं वळवला जाऊ शकतो. वेतन आयोगाच्या मागं लागलेल्यांचे गलेलठ्ठ पगार कमी केले जाऊ शकतात. या गोष्टींचं भान ठेवून आपल्या खर्चाची स्वयंशिस्त महत्त्वाची ठरणार आहे. 

शंभर कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यासाठीची त्यांची धोरणं बदलणं क्रमप्राप्त आहे. उद्योजकांनी हतबल न होता एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी की आपली माणसं हेच आपलं भांडवल आहे. संपत्ती निर्माण करता येते. ती निर्माण करणारे आपणच असतो. अशा अडचणी येतात, जातात. कोणत्याही परिस्थितीत डगमगुन न जाता संकटाशी चार हात करणं हा आपला स्थायीभाव आहे. 

जागतिक परिस्थितीचा विचार करता आपल्या आयात-निर्यात धोरणांवर याचा फार फरक पडेल असं मात्र वाटत नाही. अनेक अत्यावश्यक उत्पादनांची आयात-निर्यात अपरिहार्य असते. चीनबाबत मात्र अनेक देश अपवाद म्हणून यापुढं वेगळा विचार करू शकतात. या आपत्तीच्या काळातही चीननं काही कोटींचे व्हेंटिलेटर अमेरिकेला विकल्याची बातमी आलीय. त्यामुळं यातील आर्थिक पैलूही लवकरच जगासमोर येतील. यापुढं भारतानं आपली देशांतर्गत उत्पादनं वाढवणं, आपण त्यांना बळ देणं गरजेचं आहे. आपल्या देशातील पैसा, संसाधनं बाहेर जाऊ नयेत याची काटेकोर काळजी घेतल्यास या आपत्तीतून बाहेर पडून आपण जगाचं आर्थिक नेतृत्व करू शकू. 

अमेरिका हा गरीब लोकाचा श्रीमंत देश आहे. त्यांची अर्थव्यवस्था कर्जाच्या डोलाऱ्यावर उभी आहे. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज काढून आपली चैन पूर्ण करणारा अमेरिकन भारतीयांची बरोबरी कधीही करू शकणार नाही. त्यामुळं आपण मनावर घेतलं तर कोरोना ही भारतासाठी इष्टापत्ती ठरू शकते. 

सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही आर्थिक सेवासुविधा घ्यायच्या नाहीत आणि सरकारला कोणते करही द्यायचे नाहीत, असा एक मतप्रवाह पूर्वीपासून आपल्याकडे आहे. मात्र तो कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे अंमलात येऊ शकत नाही. 

जाताजाता एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की आपली ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारी तत्त्वावर अवलंबून होती. ती अधिक बळकट करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी सरकारनं अधिक भक्कम धोरण राबवायला हवं. आपला महाराष्ट्र सहकारपंढरी म्हणून ओळखला जातो.  स्वाहाकार कमी होऊन सहकार वाढला तर भारत जगाचे आर्थिक नेतृत्व नक्की करेल आणि महाराष्ट्र त्याचा मेरूमणी असेल हे मात्र नक्की. 
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
(दैनिक पुण्य नगरी - १० एप्रिल २०२०)

Sunday, March 15, 2020

‘जागर’ समर्थ महासंगमाचा!

उपासनेला दृढ चालवावे । 
भूदेव संताशी सदा नमावे ।
सत्कर्म योगे वय घालवावे । 
सर्वामुखी मंगल बोलवावे ॥
जय जय रघुवीर समर्थ ॥

वेद, उपनिषदं, धर्मग्रंथ वाचणं, साधना, तपश्‍चर्या करणं, देव-देश अन् धर्माच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणं हे आजच्या काळात प्रत्येकाला जमेलच असं नाही. ते जमावं अशी अपेक्षा ठेवणंही खुळेपणाचंच! मग हे सारं साध्य करायचं असेल तर काय करावं? त्यासाठी एक ‘समर्थ’ पर्याय आहे. तो प्रवाह ‘चैतन्य’दायी आणि प्रवाही आहे. मनावरचं मळभ, नैराश्येची पुटं दूर करणारा आहे. संसारात राहून भक्तीयोगाचा अर्थ समजावून सांगणारा आहे. मुख्य म्हणजे त्यासाठी आपल्या नित्यक्रमात फार काही बदल करावे लागतील असा तो पर्याय नाही. हा साधा पण आयुष्य बदलून टाकणारा मार्ग म्हणजे श्रीसमर्थ रामदास स्वामींनी घालून दिलेल्या आदर्शांचा अभ्यास करणं, आपल्या जगण्यात त्याचे काही अंश उतरवणं...!

रामदास स्वामी आपल्याला कर्मकांडं शिकवतात का? ते अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलतात का? आपला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन दूर लोटतात का? संसारापासून पळ काढण्याचा सल्ला देतात का? तर त्याचं उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असंच आहे. उलट ते सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका । मग साधावे परमार्थ विवेका ॥

व्यक्तिशः आमच्यावर समर्थ विचारांचा पगडा का आहे? तर त्यांनी ठामपणे सांगितलं की ‘ज्ञानोपासना’ हा भक्तीचाच एक मार्ग आहे. राजकारणही ते बहिष्कृत मानत नाहीत. स्त्रियांना कमी लेखत नाहीत. दुर्बलांचे समर्थन करत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत विवेकापासून दूर जात नाहीत. जात-धर्म-पंथ भेदाला थारा देत नाहीत, ‘चोवीस तास देव-देव करत बसा’ असा निष्क्रियतेचा सल्ला देत नाहीत. मुख्य हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण। तिसरे ते सावधपणा । सर्वांविषयी ॥ हा जगण्याचा मूलमंत्र मात्र ते देतात. 

त्याकाळातही त्यांच्याकडं प्रचंड ग्रंथसंग्रह होता ही गोष्ट ‘ग्रंथप्रेमी’ म्हणून आम्हाला नेहमीच सुखावते. औरंगजेबानं त्यांचे अनेक मठ उद्ध्वस्त केले. त्यातील अनमोल ग्रंथ जाळून टाकले. तरीही त्यातील साडेचार हजार ग्रंथ आजही धुळ्याच्या ‘समर्थ वाग्देवता’ मंदिरात उपलब्ध आहेत. हे ग्रंथ त्याकाळी कुणाला वाचायला हवे असतील तर समर्थशिष्य स्वहस्ते त्याच्या प्रती लिहून काढून इतरांना देत. ‘समर्थ प्रताप’ या ग्रंथातील सूचीनुसार त्याकाळी त्यांच्याकडं उपलब्ध असलेल्या ग्रंथसागरात विविध जातीधर्माच्या, पंथांच्या 85 ग्रंथकारांचे ग्रंथ होते. त्यात चोखा मेळा, सेना न्हावी यांच्यापासून ते शेख महंमद यांच्यापर्यंत सर्वांच्या ग्रंथांचा समावेश होता. विविध जातीधर्माचे लोक तिथं त्या ग्रंथांचा अभ्यास करायचे याच्या अधिकृत नोंदी मिळतात. सध्याच्या ‘बारामतीश्वरांनी’ त्यांना जगभरातून भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तुंचं जे भव्य प्रदर्शन मांडलंय इतकं हे काम सोपं नव्हतं. या ग्रंथांच्या अभ्यासासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागत नव्हती की त्यासाठी कसलं शुल्क भरावं लागत नव्हतं. जे कोणी ‘ज्ञानोपासक’ आहेत त्यांची ज्ञानाची भूक भागविण्यासाठी त्याला ईश्‍वरोपासनेचं अधिष्ठान देण्यात आलं होतं. 

त्यांना उपेक्षितांचं जगणं कळलं होतं. वंचितांचं अर्थशास्त्र कळलं होतं. स्वराज्याची आणि त्याच्या अस्तित्वाची किंमत ठाऊक होती. भक्ती आणि शक्तीची महती ज्ञात होती. मातृशक्तीची अगाध लीला त्यांनी हेरली होती. वेणाबाईसारख्या बालविधवेला अनुग्रह देणं, तिला कीर्तनाच्या कलेत तरबेज करणं, इतरांना अनुग्रह देण्याचे अधिकार देणं आणि मिरजच्या मठाच्या मठपती बनवणं यातून त्यांची स्त्री-पुरूष समानतेची दृष्टी दिसून येते. समर्थांच्या निर्वाणानंतर त्यांच्या शिष्या असलेल्या अक्कास्वामींनी समर्थ संप्रदायाचं नेतृत्व केलं. महत्त्वाचं म्हणजे वेणाबाईंना ‘वेणास्वामी’, अक्काबाईंना ‘अक्कास्वामी’ असं विशेषणही त्या काळापासून लावण्यात येतंय. ‘मातृशक्तीला स्वामित्वाचा अधिकार देणारे समर्थ’ हेच तर खर्‍या पुरोगामित्वाचे मानदंड आहेत. ‘स्त्रियांना आम्ही 33 टक्के आरक्षण दिले’, ‘स्त्री-पुरूष समानतेची शिकवण आम्हीच दिली’ असा वृथा अहंकार बाळगणार्‍यांनी समर्थ चरित्राचा अभ्यास केल्यास त्यांचा अहंकार आणि न्यूनगंड दूर होण्याची शक्यता आहे. 

थोडक्यात काय तर समर्थांनी सर्वप्रकारचा संकुचितपणा दूर सारला. ‘चिंता करितो विश्‍वाची’ असं आपल्या बालवयात सांगणार्‍या समर्थांनी आपल्या सततच्या चिंतनातून समाजाला व्यापक दृष्टी दिली. शारीरिक आणि मानसिक सुदृढतेचं दुसरं नाव म्हणजेच समर्थ रामदास स्वामी! सर्वप्रकारच्या समानतेचा, समरसतेचा बुलंद आवाज म्हणजे रामदास स्वामी!! म्हणूनच ते काळाच्या प्रवाहात अभेद्य राहतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे विचार कालबाह्य होत नाहीत. जगण्याला दिशा देण्याचं काम ते अव्याहतपणे करतात. आजच्या कट्टरतावादाच्या काळात तर कधी नव्हे इतकी त्यांच्या विचार-आचारांची, आचरणाची गरज आहे. 

प्रभू श्रीरामचंद्रांनी समर्थांना अनुग्रह देऊन चारशे वर्षे उलटली. त्यानिमित्त पुण्यातील चैतन्य ज्ञानपीठानं मराठवाड्यातील श्रीसमर्थ जांब या समर्थांच्या जन्मगावी समर्थसंगमाचं आयोजन केलं. त्याची माहिती वाचकांना व्हावी, त्याची अनुभूती मिळावी या उद्देशानं हा अंक या उपक्रमाला समर्पित करत आहोत. 

‘चैतन्य ज्ञानपीठ’ ही नेहमीच्या पठडीतल्या विद्यापीठासारखी बाजारू संस्था नाही. चैतन्याचे मानवी मनोरे उभे करण्याचं असिधारा व्रत जपणारे आणि सशक्त, समर्थ व बलशाली भारताचं स्वप्न साकारण्यासाठी धडपडणारे कर्तबगार समर्थप्रेमी यासाठी पुढं सरसावले आहेत. त्यांची आचार-विचारांची दिशा सुस्पष्ट आहे. म्हणूनच धार्मिकतेचं अवडंबर न माजवता, समाजसेवेचे बुरखे न पांघरता, व्यापारी मनोवृत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन न घडवता ही सर्व मंडळी परोपकार आणि समाजोद्धारासाठी धडपडत आहेत. श्रीसमर्थांच्या विचारांची दिव्य प्रेरणा, समर्थहृदय शंकर देवांचे आदर्श, निर्मळ आणि निकोप वृत्तीच्या कृतिशिलांचं संघटन यामुळं हा रथ वेगात पुढे जाईल याबाबत आमच्या मनात कसलाच किंतू नाही.

जांब येथे झालेल्या समर्थ संगमात अद्रश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, आचार्य स्वामी गोविंददेव गिरी यांनी अनमोल मागदर्शन केलं. चैतन्य ज्ञानपीठाची पुढची दिशा ठरण्यास हे सारं महत्त्वपूर्ण ठरणारं आहे.

श्रीसमर्थ जांब या गावात या महासंगमाचं आयोजन केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. करमळकर यांनी गावातील बुद्धविहाराची स्वच्छता केली. तिथल्या सर्व बांधवांना या समर्थ संगमाचं निमंत्रण दिलं. समर्थांनी घालून दिलेल्या सामाजिक एैैक्याचंच हे प्रतीक आहे. त्यामुळंच सर्व समाजबांधवांनी या उपक्रमात आपली वर्णी लावली. 

भारताच्या नकाशाच्या हृदयस्थानी असलेलं हे छोटंसं गाव गुगलच्या नकाशात दिसतं की नाही हे आम्हास माहीत नाही पण आगामी काळात श्रीसमर्थ जांब हे प्रत्येकाचा अभिमानाचा, गौरवाचा केंद्रबिंदू नक्की असेल याची मात्र खात्री वाटते. हा विश्वास सार्थ ठरवणं ही फक्त ‘चैतन्य ज्ञानपीठा’च्या पदाधिकार्‍यांचीच जबाबदारी नाही तर समाज म्हणून आपलंही ते कर्तव्य आहे. याच सामाजिक भानातून डिसेेंबर 2019 च्या अंकानंतर ‘साहित्य चपराक’ मासिकाचा हा अंकही श्रीसमर्थ वंदनेच्या उद्देशानं प्रकाशित करत आहोत. आमच्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य आणि समर्थ संगमाच्या आयोजन-नियोजनातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या दिलीपराव कस्तुरे काकांचे यामागील परिश्रम आणि त्यांच्या समर्थनिष्ठा अलौकिक आहेत, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करतो आणि थांबतो.
जय जय रघुवीर समर्थ! 
- घनश्याम पाटील
7057292092

Wednesday, March 4, 2020

दुराव्याचा ‘पुरावा’ गवसतो तेव्हा...

काही काही गोष्टी अशा घडतात की, त्याची आपल्याला लाज तर वाटतेच पण आपण अंतर्मुखही होतो. माझ्याबाबतही असंच काहीसं घडलंय.

मी माझं गाव सोडून जवळपास पंचवीसएक वर्षे तरी उलटलीत. इतक्या वर्षात काही प्रसंगानिमित्त तीन-चार वेळा गावाकडं गेलो असेल, तेही एखाद्या दिवसासाठी! मला सख्खे सात चुलते आहेत, चार आत्या आहेत. तीन मामा आहेत. त्यातल्या एक आत्या मध्यंतरी गेल्या.

...तर या काकांना, आत्यांना, चुलत-आत्ते, मामेभाऊ-बहिणींना भेटून मला वीसएक वर्षे तरी ओलांडली असतील. माझे आईबाबा या सर्वांच्या आणि हे सर्वजण आईबाबांच्या नियमित संपर्कात आहेत. मी मात्र दुर्मीळ प्राणी!! त्यांच्याकडं तर कधी जाणं होतच नाही पण ते कधी घरी आले तरी मी नसतो. या सर्वांची लग्नं, इतर कार्ये यातही मला कधी रस वाटला नाही.

माझ्याशी सबंधित असंख्य मुली-बायका मला ‘दादा’ म्हणतात आणि त्या ते नातं निभावतातही. समाजमाध्यमातल्याही अनेक स्त्रिया ‘दादा’च म्हणतात. माझ्या अशा कितीतरी ‘बहिणी’ अनेकदा मोकळेपणे त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. मीही त्यांना शक्य ती मदत करतो. काही गोष्टी सुचवतो...

फेसबुकवर अशीच एक ताई मला नियमित फॉलो करते. ‘‘सर प्रकाशकांच्या अडचणी आणि त्यावर तुम्ही शोधलेल्या नवीन वाटा कौतुकास्पद...’’ म्हणून प्रोत्साहन देते. ‘असंख्य वाचकांपैकी एक’ म्हणून मी तिला कधी प्रतिसाद दिला नाही.

मी माझ्या मोबाईलवरचं ‘मेसेंजर ऍप’ उडवलंय. त्यामुळं तिथले संदेश वाचता येत नाहीत. आज खूप दिवसांनी जरा वेळ मिळाल्यानं कार्यालयात संगणकावर फेसबुक उघडलं तर अनेक एसएमएस येऊन पडलेत. 

त्यात त्या ताईचाही संदेश आहे. 15 डिसेंबर 2019 चा तो संदेश मी आज वाचला. त्यात तिनं लिहिलंय, 

‘‘हाय घनश्याम, आय ऍम अमुक तमुक... फ्रॉम औरंगाबाद. युवर कझीन सिस्टर...’’ आणि पुढं बरंच काही...

तिचं तिकडचं आडनाव सुद्धा माझ्या लक्षात न आल्यानं मी तिची प्रोफाईल बघितली तर ती माझ्या मोठ्या काकांची मुलगी. माझी सख्खी चुलत बहीण! तिला मी दुसरी-तिसरीत असताना भेटलो असेल... म्हणजे साधारण 27-28 वर्षे तरी उलटली.

डोळे आपोआप पाणावले. 

या क्षेत्रात काम करताना मी असंख्य बहिणी मिळवल्यात पण घरच्या लोकाकडं अक्षम्य दुर्लक्ष झालंय. त्याची कारणं काहीही असोत पण मी ‘रक्ता’च्या सगळ्या नात्यांपासून कोसो मैल दूर गेलोय.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला माझ्या सख्ख्या छोट्या भावाच्या, श्रीच्या लग्नालाही जाता आलं नव्हतं. 

काहीवेळा आपण हे सगळं कशासाठी करतोय? असाही प्रश्न पडतो. आपण याला ‘समाजासाठी वाहून घेणं’ म्हणतो, पण त्याची खरंच काही गरज आहे का? हजारो-लाखो लोक आपापल्या परीनं मोठमोठी कामं करत असतात. त्यात आपण किती क्षुल्लक! मग हे मी केलं नाही तर असा काय फरक पडणार आहे? कुणावाचून कुणाचं काही अडत नाही! नात्याचे सगळे पाश सोडून असं अलिप्तपणे जगणं खरंच आवश्यक आहे?  

म्हणून मीही आता जरा ‘माणसात’ यावं म्हणतोय! सध्याचे हातातले काही व्याप उरकले की दोन-महिने मस्त सुट्टी घेतो. सगळ्यांच्या गाठी-भेटी (खरंतर ‘ओळख परेड’ म्हणूया!) घेतो. बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो. नातेवाईक, बालसवंगडी यांच्यात रमतो. तेव्हाच्या शिक्षकांना भेटतो.

आज या एसएमएसनं डोळे उघडलेत... कामाच्या, प्रतिष्ठेच्या, राग-लोभाच्या अहंकाराची जळमटं जरा दूर झालीत. माझं या क्षेत्रात येणं माझ्या आईबाबांचा अपवाद वगळता माझ्या घरच्या अन्य कुणालाही आवडलेलं नाही. मी मस्तपैकी एखादी नोकरी करावी, मोठा उद्योग उभारावा असंच सगळ्यांना वाटतं. म्हणून कळत्या वयापासून मी सगळ्यांना जाणिवपूर्वक दूर सारलं. हे क्षेत्र म्हणजे ‘भिकेची लक्षणं’ असंच सर्वांना वाटायचं. ते दिवस मी बदललेत. प्रकाशनक्षेत्रातला एक यशस्वी ‘उद्योजक’ म्हणून मी आता त्यांचे विचार बदलू शकतो. 

पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. या क्षेत्रातलं माझं यश बघून अनेकजण अनेक नाती जोडत असतात. मी कसा त्यांच्या जवळचा आहे हेही सातत्यानं दाखवत असतात. ज्यांनी कायम राग केला, द्वेष केला, सदैव पाण्यात पाहिलं असे अनेकजण माझं त्यांच्याशी असलेलं नातं सध्या उलगडत असतात. त्यामुळं त्यांचं मला फार काही वाटत नाही. जे माझ्या व्यग्रतेमुळं आणि मनातल्या अढीमुळं दुरावले गेलेत, नकळत दुखावले गेलेत त्यांना मात्र जवळ करण्याची वेळ आलीय मित्रांनो.  

समाजमाध्यमामुळं जग एका क्लिकवर आलंय... आपण आपल्या माणसांपासून, परिवारापासून, कुटुंबापासून मात्र कसे आणि किती दूर गेलोय याची व्यक्तिशः मला आज प्रकर्षानं जाणीव झाली. असं म्हणतात की, माणसानं हजार चुका कराव्यात पण एकच चूक हजारवेळा करू नये. मी चुकलो असेन किंवा नसेन! सगळ्यांना नव्यानं जोडून घेणं आणि प्रेम वाटणं हे मात्र दुरापस्त होऊ नये. 

-घनश्याम पाटील
‘चपराक,’ पुणे
7057292092

Tuesday, February 11, 2020

हे तर प्रचंड क्रौर्य!



शरद पवार हे देशातले एक बलाढ्य नेते आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. त्यामुळंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, कामकाजाविषयी, निर्णयाविषयी, त्यांच्या विविध भूमिकांविषयी सातत्यानं चर्चा होत असते. तशी चर्चा मराठीतला एक लेखक आणि पत्रकार म्हणून मीही सातत्यानं केली आहे. त्यांच्या चांगल्या कामकाजावर जसे आम्ही गौरवांक काढले, विविध नियतकालिकातून कौतुक केलं तसंच चुकीच्या धोरणांवर आम्ही सातत्यानं तुटून पडलोय.

गेल्या काही काळापासून समाजमाध्यमांचा वापर वाढला आणि आम्ही आमची भूमिका दृकश्राव्य माध्यमाद्वारे मांडू लागलो. आमच्या व्हिडिओंना शब्दशः लाखो दर्शक मिळू लागले. घराघरात हे विचार पोहोचल्यानं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. शरद पवार तरी याला कसे अपवाद राहतील? 

काँग्रेसमधून फुटून त्यांनी आपली एक वेगळी टोळी निर्माण केली आणि त्याला ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष’ असं व्यापक नाव दिलं. हा पक्ष देशपातळीवर काम करतो, तो राष्ट्रीय पक्ष आहे असा त्यांचा समज आहे. मात्र आजवर एकदाही या पक्षानं स्वतःच्या हिमतीवर राज्यात सत्ता आणली नाही ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना केंद्रीय कृषी मंत्री असतानाही शरद पवार पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला यायचे आणि ‘पुण्याचा कारभारी बदला’ असं आवाहन पोटतिडिकेनं करायचे हा इतिहास आहे. 

समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृषी, सहकार, क्रीडा, नाट्य, साहित्य अशा कोणत्याही क्षेत्राचा विचार केला तरी त्यात पवारांचा सहभाग आहेच. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर प्रकरण असेल किंवा स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय असतील ते सर्व गौरवास्पदच आहे. हे सारं करतानाच त्यांनी मात्र सातत्यानं स्वतःविषयी अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं. 

दिल्लीश्वरापुढं कायम लोटांगण घालत त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचं साम्राज्य उभं केलं. ‘दिल्लीचं तख्त’ ही त्यांची महत्त्वाकांक्षा आजच्या दिवसापर्यंत अपूर्ण राहिली कारण अजूनही दिल्लीत आणि इतर राज्यात त्यांच्याविषयी ‘धोकेबाज’ म्हणूनच बोललं जातं. 

विशेषतः ब्राह्मण, मराठा, दलित, आदिवासी अशा जातीजातीत कायम संघर्ष निर्माण होईल असंच वातावरण त्यांनी निर्माण केलं. राजू शेट्टी राजकीय अपरिहार्यतेतून त्यांच्या सोबत असले तरी त्यांची जात काढणं असेल, पुणेरी पगडी आणि कोल्हापुरी पागोट्याविषयीचं त्यांचं विधान असेल, पेशवे आणि शाहू अशी तुलना असेल किंवा मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख जाणीवपूर्वक ‘पंत’  असाच करणं असेल यातून त्यांची मनोवृत्ती दिसून येते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा सोयीस्कर वापर करतानाच त्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज हा विषयही राजकारणासाठीच वापरला. 

त्यांचा उल्लेख गेल्या अनेक वर्षांपासून ‘जाणता राजा’ असाच केला जातो. ज्या श्रीसमर्थ रामदास स्वामींचा द्वेष करण्यात शरद पवार नेहमी धन्यता मानतात त्याच समर्थांनी ‘जाणता राजा’ हे विशेषण छत्रपती शिवाजीमहाराजांसाठी वापरलं होतं. त्यामुळं इतिहासात छत्रपती शिवाजीराजे हे एकमेव जाणते राजे आहेत. आजच्या काळात तर राजा आणि प्रजा ही पद्धतही लोप पावलीय. त्यामुळं लोकशाहीत कुणालाही जाणता राजा म्हणणं निव्वळ हास्यास्पद आहे. शरद पवारांनी कधीही याला विरोध केला नाही. याविरूद्ध मी काही आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवरून आणि विविध लेखांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. हे सगळं सुरू असतानाच ‘रामदास स्वामी शिवरायांना समकालीन नव्हते किंबहुना असं कोणतं पात्रही नव्हतं. केवळ ब्राह्मणांनी त्यांचं वर्चस्व वाढविण्यासाठी ते निर्माण केलं आहे’ अशा आशयाची भूमिका त्यांनी घेतली.\

एकेकाळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार्‍या शालिनीताई पाटील यांच्यासोबत त्यांनी सुडाचं राजकारण केलं. वसंतदादा पाटलांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसल्याची चर्चाही महाराष्ट्रात सातत्यानं होते. इतकंच काय तर केवळ सत्तेच्या हव्यासापोटी ते ज्यांना गुरू मानतात त्या यशवंतराव चव्हाण यांनाही त्यांनी ‘परतीचे दोर कापून टाकलेत’ इतक्या स्पष्ट शब्दात सुनावलं होतं. 

हा सगळा इतिहास माझी पिढी सातत्यानं ऐकत, वाचत आलीय. त्याविषयी जाब विचारणं, त्यांचं म्हणणं जाणून घेणं हा आमचा अधिकार आहे. त्यामुळं आम्ही काही प्रश्‍न उपस्थित केले तर ते शरद पवार यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना झोंबण्याचं काहीच कारण नाही. ‘शरद पवार तुम्ही आमच्या आणखी किती पिढ्या बरबाद करणार?’ असा सवाल मी ‘द पोस्टमन’ या यू ट्यूब चॅनेलवरील व्हिडिओत उपस्थित केला आणि दिल्लीचं तख्त काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले हे ‘स्वयंघोषित जाणते’ राजे बिथरले. आमच्या त्या वक्तव्यावर शब्दशः हजारो प्रतिक्रिया आल्या. त्यातील काही प्रतिक्रिया निश्चितपणे आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहेत. त्या थांबवायला हव्यात. मात्र तशी कोणतीही यंत्रणा आमच्याकडे नाही. ‘चुकीच्या प्रतिक्रिया देऊन प्रतिक्रियावादी बनू नका’ हे आम्ही सातत्यानं सांगत असतो पण शरद पवार यांच्यावर लोकांचं इतकं ‘विलक्षण प्रेम’ आहे की लोक त्यांना शिव्या घातल्याशिवाय शांत राहूच शकत नाहीत. 

या सर्व लोकभावना समजून घेऊन स्वतःच्या आचारविचारात बदल करण्याऐवजी त्यांच्या एका निकटवर्तीयानं मी आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याविरूद्ध व ‘पोस्टमन’ विरूद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. बरं, जर यांना हे इतकंच अवमानकारक वाटत असेल तर त्यांनी किमान आमच्याविरूद्ध लोकशाही मार्गानं रीतसर गुन्हा नोंद करावा. तसं न करता ज्यात कसलाच दम नाही अशी अर्थहीन तक्रार देऊन त्यांनी यंत्रणेतही स्वतःचं हसं करून घेतलं आहे. इतक्यावरच न थांबता हे महाभाग राज्यातील विविध शहरात पत्रकार परिषदा घेऊन याबाबतची माहिती देत फिरत आहेत.

कोरेगाव भीमा येेथे उपस्थित न राहताही त्यांना त्याविषयीची सगळी माहिती असते. इथं त्यांच्याच एका निकटवर्तीय पदाधिकार्‍यानं मी आणि भाऊ तोरसेकर यांच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही त्यांना त्याचा पत्ता नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही. या तक्रारीनंतर राज्यातील राष्ट्रवादीच्या काही पंटरांकडून आम्हाला धमक्या येत आहेत. त्यात जीवे मारण्यापासून ते आम्हाला कापा, तोडा असा उल्लेख करत आमच्या आई-बहिणींचा उद्धार केला जातोय. 

शरद पवार यांच्या समर्थकांची बौद्धिक उंची, त्यांची झेप, रक्तातली गुंडगिरी याविषयी माझ्या आणि भाऊंच्या मनात कसलीही शंका नाही. त्यामुळंच जर उद्या यात आमचा देह पडला किंवा आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला तर त्याचे सूत्रधार शरद पवार हेच असतील हे वेगळे सांगायला नको.

एकीकडं नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं गळे काढायचे आणि दुसरीकडं कुणी काही प्रश्न उपस्थित केला की त्याचा प्रतिवाद करण्याऐवजी असं सूडाचं राजकारण करायचं हे फक्त आणि फक्त शरद पवार यांनाच शोभू शकतं. राजकीय विश्‍लेषक या नात्यानं मी जेव्हा पवारांच्या कारकिर्दीकडं पाहतो तेव्हा त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा मला मनस्वी अभिमान वाटतो. या नेत्याची आपण कदर केली नाही, महाराष्ट्र याबाबत करंटा ठरला असंही मला वाटतं. त्याचवेळी त्यांनी सातत्यानं चालवलेलं सूडाचं राजकारण, त्यांनी निर्माण केलेला द्वेष, अविश्वास हे सर्व पाहिलं की चीडही येते.

आपल्याकडं माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवा नाही. त्यामुळं पवारांवर नंतर पोवाडे रचले जातील पण आमच्या पिढीनं काही प्रश्न उपस्थित केले तर आम्हाला संपवण्याचं पातक त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी करू नये. यात माझं किंवा भाऊंचं काही बरंवाईट झालं तरी त्यांच्या काळ्याकुट्ट मनोवृत्तीचं आणि क्रौर्याचंच दर्शन समाजाला घडणार आहे एवढं मात्र नक्की.
- घनश्याम पाटील
संपादक, 'चपराक', पुणे
7057292092

Tuesday, January 14, 2020

जाणते राजे आणि अजाणते नेते!


कुण्यातरी जय भगवान गोयल नावाच्या एका भाजप नेत्यानं ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी’ या शीर्षकाचं पुस्तक लिहिलंय. दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत भाजपच्याच दिल्ली कार्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकाच्या शीर्षकावरून वादळ निर्माण झालं आहे.
आजवर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत झाली. उदा. नेपोलियनसोबत महाराजांची तुलना झाली. ती तुलना अत्यंत अयोग्य होती कारण नेपोलियन हा चारित्र्यहीन, लंपट माणूस होता. हिटलरसोबत महाराजांची तुलना झाली पण तो हुकूमशाही वृत्तीचा होता. फ्रेडरिक द ग्रेट, अलेक्झांडर, विस्टन चर्चिल अशा अनेकांसोबत महाराजांची तुलना झाली पण ती अयोग्य होती हे इतिहासाची पानं चाळताना कुणाच्याही लक्षात येईल. अलेक्झांडर जग जिंकत आल्यावर भारतात आला. त्यावेळी त्याचं सैन्य परत गेलं. ‘‘इतक्या वर्षाच्या लढाईत आम्ही घर सोडून बाहेर आहोत. आमच्या बायका कशा आहेत आम्हाला माहीत नाही. मुलं काय करतात, कशी दिसतात हे माहीत नाही. त्यामुळं आम्ही परत चाललो’’ असं त्याच्या सैन्यानं त्याला सांगितलं. महाराज चर्चिलसारखे व्यसनी आणि अहंकारी नव्हते. त्यांचं चारित्र्य धवल होतं. ते आदर्श मुलगा, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राज्यकर्ते होते.
आपल्याकडील विक्रमादित्य, शालिवाहन अशा महापुरूषांसोबतही महाराजांची तुलना करण्यात आली. यांनी स्वतःच्या नावे शके सुरू केली. महाराजांनी कुठंही स्वतःचं नाव न वापरता ‘राज्याभिषेक शक’ सुरू केलं. त्यामुळं त्यांच्यासोबतही महाराजांची तुलना होऊ शकत नाही. तुलनात्मक अभ्यास केला तर महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. ते एकमेवाद्वितीय होते. आहेत.
आपण काही वर्षे मागे गेलो तर यशवंतराव चव्हाण यांनाही ‘प्रतिशिवाजी’ म्हटलं जायचं. ती तुलनाही अयोग्य होती कारण मृत्यू समोर दिसत असतानाही महाराजांचे मावळे त्यांना सोडून गेले नव्हते. यशवंतराव चव्हाण यांच्याकडं शेवटी फक्त चार आमदार उरले होते. त्यानंतर त्यांनी स्वाभिमान बाजूला ठेवून परत इंदिरा गांधी यांच्याशी जुळवून घेतलं. अत्यंत गरीब घरातून पुढं आलेल्या या मुलानं देशस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली पण ते ‘प्रतिशिवाजी’ होऊ शकत नाहीत. सध्याच्या काळाचा विचार केला तर नाना पटोले यांच्यासारखा खासदार मोदींना उघड शिव्या देऊन सोडून गेला. अशांची तुलना महाराजांसोबत कशी बरं होऊ शकेल? 
समोर मृत्यू दिसत असतानाही तीनशे बांदलांना सोबत घेऊन  बाजीप्रभू देशपांडे सार्वजनिक हौतात्म्य पत्करायला आणि प्राणार्पण करायला धाडसानं गेले. त्यांचं हे बलिदान लक्षात घेतल्यावर तुलना करणार्‍यांना त्याची जाणीव होईल. मुरारबाजीसारख्या मर्द मावळ्यानं मृत्यू समोर दिसत असतानाही दिलेरखानाच्या बक्षीसावर थुंकण्याची हिंमत दाखवली. त्यामुळं महाराजांच्या अद्भूत गुणांची तुलना कुणासोबतही होणार नाही. 12 मे 1666 ला आग्य्राच्या किल्ल्याबाहेर महाराजांनी ठणकावून सांगितलं, ‘‘माझं शीर कापून दिलं तरी चालेल पण या माणसाच्या दरबारात मी जाणार नाही.’’
इतिहासात महाराजांची तुलना झाली ती फक्त नेताजी पालकर यांच्यासोबत. नेताजी आदिलशहाला जाऊन मिळाले. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. ते मुहम्मद कुली खान झाले. मात्र ‘शिवाजी’ नावाचा परिसस्पर्श झाल्यानं तेे पुन्हा माणसात आले.
मावळे ज्याला देव मानत होते तो राजा किती मोठा हे समजून घेतलं पाहिजे. मूल्यमापनाच्या कोणत्याही कसोट्या शिवचरित्राचा अभ्यास करताना टिकत नाहीत. शिवाजी हा जगाच्या इतिहासातला एक चमत्कार आहे.
5 सप्टेंबर 1659 ला सईबाईंसाहेबांचा मृत्यू झाला. त्यावेळी रजा न घेता महाराज अफजलखानाच्या भेटीस गेले. त्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. ‘स्वराज्य’ महत्त्वाचं ही त्यांची त्यामागची भूमिका होती. सामान्य माणसाच्या मनात निष्ठा आणि ध्येय निर्माण करायचं आणि त्याच्याकडून असामान्य पराक्रम करून घ्यायचा हे काम राजांनी केलं. ते जगात कुणालाच जमलं नाही. त्यामुळं महाराजांवर दैवीपणाची पुटं चिकटवू नका.
मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेल्या तानाजी मालुसरे यांनी ‘आधी लगीन कोंडाण्याचं’ म्हणत मोहीम हाती घेतली. आपल्या पत्नीच्या मृत्युचा वियोग बाजूला ठेवून लढणारा राजा त्यांचा आदर्श होता. आज असं काही दिसतंय का? 
6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळीच संभाजीराजे ‘युवराज’ झाले. महाराजांनी रयतेवर राज्याभिषेक कर लावला नाही. आज अजितदादा मुद्रांक शुल्क वाढवत आहेत.
महाराजांनी राजव्यवहार कोेश सुरू केला. रघुनाथ पंडितांची त्यासाठी निवड केली होती. आज मोदी किंवा ठाकरे त्यासाठी काय करत आहेत? किती भाषांना त्यांनी अभय दिलंय? आपल्या मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जाचं घोंगडं सरकार दरबारी किती काळ भिजत पडलंय? मग हे ‘आजचे शिवाजी’ कसे होऊ शकतात?
महाराजांचं न्यायदानाचं खातं अतिशय निष्कलंक होतं. असा निस्पृहपणे वागणारा आज एक नेता दाखवा. त्याविषयी महाराजांचे एक उदाहरण बघितले पाहिजे.
पिलाजीराव शिर्के हे संभाजीराजांचे सासरे. त्यावेळी चिंचवडला मोरया गोसावी यांचं प्रस्थ मोठं होतं. मोरया गोसावी यांनी पिलाजी शिर्के यांना ‘देवाच्या वार्षिक उत्सवासाठी काहीतरी मदत करा’ अशी गळ घातली. शिर्के यांनी हा विषय संभाजीराजांच्या कानावर घातला आणि ‘परिसरातल्या शेतकर्‍यांकडून भात आणि मीठ गोळा करण्याची’ सनद त्यांना मिळवून दिली.
शेतकर्‍यांनी तीन-चार वर्षे कर दिला. त्यानंतर मात्र दुष्काळी परिस्थिती होती. भात आणि मीठ देणं शक्य नव्हतं. त्यामुळं देवस्थानचा वार्षिक उत्सव अडचणीत आला. ते पाहून मोरया गोसावी यांनी सिंहगडच्या किल्लेदाराला सांगितलं की ‘यांना अंधारकोठडीत डांबा.’
 राजघराण्याशी संबंधित आध्यात्मातला मोठा माणूस असल्यानं त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली. त्या निष्पाप शेतकर्‍यांना अंधारकोठडीत डांबण्यात आलं.
या अन्यायाच्या विरूद्ध दाद मागण्यासाठी या शेतकर्‍यांचे नातेवाईक  रायगडावर गेले. महाराजांना भेटण्यासाठी मध्यस्थांची गरज नसायची. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्यावर त्या शेतकर्‍याला त्याच्या मुलीसकट बाहेर हाकलतात.  नरेंद्र मोदी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. शरद पवार यांच्यासोबत कायम बंदुकधारी खासगी सुरक्षारक्षक असतात. त्या महाराजांतला आणि आजच्या नेत्यांतला हा मूलभूत फरक आहे.
तर ते शेतकरी राजांकडं गेले. त्यांनी सांगितलं, ‘‘कोणत्याही चौकशीशिवाय आमच्या नातेवाईकांना अटक केलीय. तुम्ही उलटतपासणी करून पहा.’’
महाराजांनी चौकशी केली. हे अन्यायकारक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी सिंहगडच्या किल्लेदाराला पहिला आदेश दिला, ‘‘तुला किल्लेदार म्हणून आम्ही नेमलंय. त्यामुळं आमचं ऐक. अन्य कुणाच्याही आदेशाचं पालन करणं तुला गरजचेचं नाही. आता त्या सर्व शेतकर्‍यांना सन्मानानं घरी नेऊन सोड. त्यांना थोडाही त्रास झाला तर त्या अंधारकोठडीत तू असशील!’’
संभाजीराजांनी युवराज या नात्यानं मोरया गोसावी यांना भात आणि मीठ वसुलीचा परवाना दिला होता. युवराजांच्या आदेशाचं पालन म्हणून त्यांनी सांगितलं, ‘‘यापुढं या वार्षिक उत्सवाचा सगळा खर्च शिवाजीराजांच्या खासगी तिजोरीतून, वैयक्तिक उत्पन्नातून केला जाईल. त्यासाठी कुणाला काहीही मागायची गरज नाही.’’
यानंतर त्यांनी मोरया गोसावी यांना पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात, ‘‘तुम्ही तर गोसावी! राज्यकारभाराची इतकीं हाव तुम्हास कशासाठी? राज्यकारभाराची इतकीं हाव असेल तर आपली वस्त्रे आम्हास द्या आणि आमची वस्त्रे तुम्ही घ्या. याउपर राज्यकारभारात हस्तक्षेप केलात तर ब्राह्मण म्हणून, साधू म्हणून मुलाहिजा राखला जाणार नाहीं हे खूब ध्यानात ठेंवा.’’
ही वागणूक मोदींनी, पवारांनी शेतकर्‍यांना देऊन दाखवावी. महाराज मोरया गोसावी यांना आध्यात्मिक गुरू मानायचे. तरी त्यांनी न्यायदान करताना त्याचा विचार केला नाही. 
महाराजांच्या रूपानं परमेश्‍वरापेक्षा मोठी ताकद पृथ्वीवर अवतरली होती. नरेंद्र मोदी आणि महाराजांची तुलना करायची असेल तर त्यावर चर्चासत्र ठेवा. अशी तुलना करायची आमची तयारी आहे. 
त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ते जात्यांध नव्हते. महाराजांनी कधीही गोध्रा घडवलं नाही. महाराजांच्या मागं महाराष्ट्र होता. त्यांच्या राज्यात शेतकर्‍यानं आत्महत्या केल्या नव्हत्या. चुकून कोणी आत्महत्या केलीच असती तर त्यांनी दारू पिऊन, लफडे करून आत्महत्या केल्या असं शरद पवार यांच्यासारखं  सांगितलं नसतं. इब्राहिम सिद्धी हा त्यांचा सहकारी अफजलखान भेटीचा सोबती होता. मदारी मेहतर या मुस्लिम युवकानं त्यांच्यावर स्वप्राणाहून अधिक प्रेम केलं. महाराजांनी शहा मदर शहा, याकूत बाबा अशा त्यांच्या मुस्लिम गुरूंचे दर्गे बांधून दिले, तिथल्या खर्चाची सोय केली. असा पराक्रम पुन्हा मानवता घडवेल, इतिहास घडवेल असं वाटत नाही.
शरद पवार यांनाही ‘जाणता राजा’ हे विशेषण गेल्या कित्येक वर्षांपासून वापरलं जातं. तेही अतिशय चुकीचं आहे. 
निश्‍चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी
यशवंत कीर्तीवंत सामर्थ्यवंत
वरदवंत पुण्यवंत नीतीवंत, जाणता राजा।
असं श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन केलंय. त्यामुळं जाणते राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. बाकी कुणालाही ती सर येणार नाही. शरद पवार यांना ‘जाणता राजा’ हे विशेषण प्रथम वसंत बापटांनी वापरल्याचं सांगितलं जातंय. मात्र हे धादांत खोटं आहे. आज भाजपवाले शरद पवारांच्या ‘जाणता राजा’ या विशेषणावरून रान पेटवत असले तरी त्यांचा तसा प्रथम उल्लेख भाजपा नेते प्रमोद महाजन यांनी केला होता हा इतिहास आहे. 
बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे किंवा अन्य कोणत्याही स्वकियानं कधीही सांगितलं नाही की शिवाजीराजांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. पवारांचे सहकारी हे उघडपणे सांगतात. त्यांनी जवळच्या अनेक लोकांना त्रास दिला. त्यांचं राजकारण पाहून जवळचे अनेक लोक दूर गेले. त्यामुळं त्यांनीच सगळ्यांना सांगायला हवं की ‘‘बाबांनो मला जाणता राजा म्हणू नका. ती माझी योग्यता नाही. किंबहुना महाराजांचा ‘मावळा’ होण्याचीही क्षमता माझ्यात नाही.’’
त्यामुळं यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नरेंद्र मोदी किंवा आणखी कोणीही ‘शिवाजी महाराज’ होऊ शकणार नाहीत. तेवढं सामर्थ्य, तेवढी कुवत कुणाच्याही जवळ नाही. 
जाता जाता एक उदाहरण देतो आणि थांबतो.
रामायणातलं राम आणि रावणाचं युद्ध 85 दिवस चाललं. त्यातले पहिले 84 दिवस राम जमिनीवर होते आणि रावण रथात. सगळ्या देव-देवता स्वर्गातून हे युद्ध बघायच्या. आयपीएलचा ट्वेन्टी ट्वेन्टीचा सामना असावा असं वातावरण होतं. जर आपण प्रभू श्रीरामचंद्राला मदत केली आणि यात दुर्र्दैवानं रावण जिंकला तर आपलं काही खरं नाही हे त्यांना ठाऊक होतं. 84 दिवस प्रभू रामचंद्रांनी नेटानं लढा दिल्यावर देव मदतीला आले. त्यांनी त्यांना रथ दिला. 85 व्या दिवशी राम रथात आरूढ झाले आणि ही विषम लढाई सम झाली. त्या दिवशी रामांनी रावणाचा वध केला. तेव्हा देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली.
देवही इतके सोयीस्कर वागू शकतात तर माणसाचं काय? मात्र महाराजांसोबतच्या सगळ्या मावळ्यांना पावला पावलावर मृत्यू दिसत असूनही त्यांनी कधी त्यांची साथ सोडली नाही. त्यांच्याशी प्रतारणा केली नाही. गद्दारी करून ते शत्रू पक्षात सामील झाले नाहीत. शिवाजीराजांचं श्रेष्ठत्व अधोरेखित होतं ते अशा घटनांतून. त्यामुळं त्यांच्याशी कुणाचीही तुलना करू नये.
मध्यंतरी ‘अण्णा हजारे आंधी है, देश के दुसरे गांधी है’ असा एक घोष कानावर पडायचा. अमित शहांना भाजपचे ‘चाणक्य’ म्हटलं जायचं. आता आता संजय राऊत यांच्यासारखा विदुषकही माध्यमांना ‘चाणक्य’ वाटू लागलाय. अशी कुणाचीही, कुणासोबतही तुलना करण्याचा जमाना आलाय. मात्र या सगळ्यात छत्रपती शिवाजीराजांच्या नावाचा वापर सातत्यानं स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणार्‍या कोणत्याही राजकारण्यानं, पक्षानं, माध्यमांनी अशी अनाठायी तुलना करू नये. छत्रपती शिवाजी महाराज ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही याचं भान सुटू नये. ते सुटलं तर मग आम्हालाही महाराजांसोबत तुमची तुलना करावी लागेल आणि महाराजांनी कधीही स्वतःच्या पत्नीचा त्याग केला नाही हे अधोरेखित करावे लागेल.
- घनश्याम पाटील
संपादक ‘चपराक’
7057292092