Wednesday, March 4, 2020

दुराव्याचा ‘पुरावा’ गवसतो तेव्हा...

काही काही गोष्टी अशा घडतात की, त्याची आपल्याला लाज तर वाटतेच पण आपण अंतर्मुखही होतो. माझ्याबाबतही असंच काहीसं घडलंय.

मी माझं गाव सोडून जवळपास पंचवीसएक वर्षे तरी उलटलीत. इतक्या वर्षात काही प्रसंगानिमित्त तीन-चार वेळा गावाकडं गेलो असेल, तेही एखाद्या दिवसासाठी! मला सख्खे सात चुलते आहेत, चार आत्या आहेत. तीन मामा आहेत. त्यातल्या एक आत्या मध्यंतरी गेल्या.

...तर या काकांना, आत्यांना, चुलत-आत्ते, मामेभाऊ-बहिणींना भेटून मला वीसएक वर्षे तरी ओलांडली असतील. माझे आईबाबा या सर्वांच्या आणि हे सर्वजण आईबाबांच्या नियमित संपर्कात आहेत. मी मात्र दुर्मीळ प्राणी!! त्यांच्याकडं तर कधी जाणं होतच नाही पण ते कधी घरी आले तरी मी नसतो. या सर्वांची लग्नं, इतर कार्ये यातही मला कधी रस वाटला नाही.

माझ्याशी सबंधित असंख्य मुली-बायका मला ‘दादा’ म्हणतात आणि त्या ते नातं निभावतातही. समाजमाध्यमातल्याही अनेक स्त्रिया ‘दादा’च म्हणतात. माझ्या अशा कितीतरी ‘बहिणी’ अनेकदा मोकळेपणे त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. मीही त्यांना शक्य ती मदत करतो. काही गोष्टी सुचवतो...

फेसबुकवर अशीच एक ताई मला नियमित फॉलो करते. ‘‘सर प्रकाशकांच्या अडचणी आणि त्यावर तुम्ही शोधलेल्या नवीन वाटा कौतुकास्पद...’’ म्हणून प्रोत्साहन देते. ‘असंख्य वाचकांपैकी एक’ म्हणून मी तिला कधी प्रतिसाद दिला नाही.

मी माझ्या मोबाईलवरचं ‘मेसेंजर ऍप’ उडवलंय. त्यामुळं तिथले संदेश वाचता येत नाहीत. आज खूप दिवसांनी जरा वेळ मिळाल्यानं कार्यालयात संगणकावर फेसबुक उघडलं तर अनेक एसएमएस येऊन पडलेत. 

त्यात त्या ताईचाही संदेश आहे. 15 डिसेंबर 2019 चा तो संदेश मी आज वाचला. त्यात तिनं लिहिलंय, 

‘‘हाय घनश्याम, आय ऍम अमुक तमुक... फ्रॉम औरंगाबाद. युवर कझीन सिस्टर...’’ आणि पुढं बरंच काही...

तिचं तिकडचं आडनाव सुद्धा माझ्या लक्षात न आल्यानं मी तिची प्रोफाईल बघितली तर ती माझ्या मोठ्या काकांची मुलगी. माझी सख्खी चुलत बहीण! तिला मी दुसरी-तिसरीत असताना भेटलो असेल... म्हणजे साधारण 27-28 वर्षे तरी उलटली.

डोळे आपोआप पाणावले. 

या क्षेत्रात काम करताना मी असंख्य बहिणी मिळवल्यात पण घरच्या लोकाकडं अक्षम्य दुर्लक्ष झालंय. त्याची कारणं काहीही असोत पण मी ‘रक्ता’च्या सगळ्या नात्यांपासून कोसो मैल दूर गेलोय.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला माझ्या सख्ख्या छोट्या भावाच्या, श्रीच्या लग्नालाही जाता आलं नव्हतं. 

काहीवेळा आपण हे सगळं कशासाठी करतोय? असाही प्रश्न पडतो. आपण याला ‘समाजासाठी वाहून घेणं’ म्हणतो, पण त्याची खरंच काही गरज आहे का? हजारो-लाखो लोक आपापल्या परीनं मोठमोठी कामं करत असतात. त्यात आपण किती क्षुल्लक! मग हे मी केलं नाही तर असा काय फरक पडणार आहे? कुणावाचून कुणाचं काही अडत नाही! नात्याचे सगळे पाश सोडून असं अलिप्तपणे जगणं खरंच आवश्यक आहे?  

म्हणून मीही आता जरा ‘माणसात’ यावं म्हणतोय! सध्याचे हातातले काही व्याप उरकले की दोन-महिने मस्त सुट्टी घेतो. सगळ्यांच्या गाठी-भेटी (खरंतर ‘ओळख परेड’ म्हणूया!) घेतो. बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो. नातेवाईक, बालसवंगडी यांच्यात रमतो. तेव्हाच्या शिक्षकांना भेटतो.

आज या एसएमएसनं डोळे उघडलेत... कामाच्या, प्रतिष्ठेच्या, राग-लोभाच्या अहंकाराची जळमटं जरा दूर झालीत. माझं या क्षेत्रात येणं माझ्या आईबाबांचा अपवाद वगळता माझ्या घरच्या अन्य कुणालाही आवडलेलं नाही. मी मस्तपैकी एखादी नोकरी करावी, मोठा उद्योग उभारावा असंच सगळ्यांना वाटतं. म्हणून कळत्या वयापासून मी सगळ्यांना जाणिवपूर्वक दूर सारलं. हे क्षेत्र म्हणजे ‘भिकेची लक्षणं’ असंच सर्वांना वाटायचं. ते दिवस मी बदललेत. प्रकाशनक्षेत्रातला एक यशस्वी ‘उद्योजक’ म्हणून मी आता त्यांचे विचार बदलू शकतो. 

पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. या क्षेत्रातलं माझं यश बघून अनेकजण अनेक नाती जोडत असतात. मी कसा त्यांच्या जवळचा आहे हेही सातत्यानं दाखवत असतात. ज्यांनी कायम राग केला, द्वेष केला, सदैव पाण्यात पाहिलं असे अनेकजण माझं त्यांच्याशी असलेलं नातं सध्या उलगडत असतात. त्यामुळं त्यांचं मला फार काही वाटत नाही. जे माझ्या व्यग्रतेमुळं आणि मनातल्या अढीमुळं दुरावले गेलेत, नकळत दुखावले गेलेत त्यांना मात्र जवळ करण्याची वेळ आलीय मित्रांनो.  

समाजमाध्यमामुळं जग एका क्लिकवर आलंय... आपण आपल्या माणसांपासून, परिवारापासून, कुटुंबापासून मात्र कसे आणि किती दूर गेलोय याची व्यक्तिशः मला आज प्रकर्षानं जाणीव झाली. असं म्हणतात की, माणसानं हजार चुका कराव्यात पण एकच चूक हजारवेळा करू नये. मी चुकलो असेन किंवा नसेन! सगळ्यांना नव्यानं जोडून घेणं आणि प्रेम वाटणं हे मात्र दुरापस्त होऊ नये. 

-घनश्याम पाटील
‘चपराक,’ पुणे
7057292092

13 comments:

  1. माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं!
    कधीतरी मनातलं मनमोकळेपणानं सांगावं!

    ReplyDelete
  2. खूप छान. प्रांजळ लेखन

    ReplyDelete
  3. खर आहे .... जे काम केल ते हि आणि हा निर्णय हि

    ReplyDelete
  4. घनशामजी सुंदर मांडलय. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी उसवलेली नाती असताच. गरज असते पूर्ण फाटयच्या आत शिवून घेण्याची - गणेश महादेव

    ReplyDelete
  5. खूप छान , आत्म अवलोकन .... अशी जाणीव होणं सुद्धा , मनांत नातं /प्रेम अजूनही आहे तसंच अस्तित्वात आहे ! त्या मुळे मनांत आलेले पूर्ण करा संपादक महाशय ! तुमचं कौतुक कितीही जगाने केलं तरी आपल्या माणसांना पण थोडं समाधान फक्त तुमच्या भेटण्यामुळे मिळत असेल तर त्यांचा तो हक्क डावलला जाऊ नये एवढंच मला सांगायचं आहे ! 🙏 😊

    ReplyDelete
  6. सर ,खूपच स्पष्ट आणि वास्तव या लेखातून आपण व्यक्त केलंय....नातेसंबंध टिकवून ठेवणं खूप गरजेचे आहे , हेच यावरून लक्षात येतं..!!

    ReplyDelete
  7. खूप सुरेख आणि दिलखुलास लेखन.

    ReplyDelete
  8. हे सगळं तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केलंत याचं कौतुक आहे.

    ReplyDelete
  9. मी तर उडलोच जागचा. इतकी वर्ष माणूस कसा नाती गोती विसरून राहू शकतो याचेच आश्चर्य वाटले. तपस्वी च म्हटल पाहिजेल आपणाला.😊.

    ReplyDelete
  10. आपले प्रांजल आत्मकथन आवडले. उगीच शब्दांचा खेळ करून आणि तर्क वितर्काच्या राशी मांडून स्वतःच्या नाते संबंधांना दूर लोटण्याचे समर्थन केले नाही याचे कौतुक वाटले.
    आपल्या व्यस्त जीवनशैलीचा अंदाज आला आहे तरी पण जरा लौकर लौकर ब्लॉगद्वारे भेटत चला ही नम्र विनंती.
    वाट बघतोय असतो.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  11. आवडले.आत्मपरिक्षण कोणत्याही टप्प्यावर उपयुक्त असते.त्यातून मनाचा प्रांजळपणा असेल तर सोन्याहून पिवळे. आपले कुटुंब आपल्याला फार मोठी उर्जा देते.आजच्या काळात तर याची गरज अधिक आहे.ही जाणीव आपल्याला अधिक काम करण्याची प्रेरणा देईल.खूप शुभेच्छा.

    ReplyDelete