Sunday, October 15, 2017

इवलासा वेलू... गेला गगनावरी!


सध्याचे दिवस वाचनसंस्कृतीसाठी अत्यंत पोषक आहेत. तरूण पिढी त्यादृष्टिनं सजग आहे. मराठी साहित्यात कधी नव्हे इतका वाचक तयार होतोय आणि हे केवळ नव्यानं लिहिणार्‍यांमुळं शक्य होतंय. दीपस्तंभ ठरावी अशी एक पिढी बाजूला पडून आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणारे लेखक तयार होत आहेत आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेच्या दृष्टिनं हे चित्र अत्यंत सकारात्मक असं आहे. काही जुने लेखक आणि प्रकाशक ‘वाचतं कोण?’ असा अप्रस्तुत प्रश्न सातत्यानं उभा करत असतानाच मराठीतील सशक्त साहित्य जोमात पुढं येत आहे. हा बदल लक्षात न आल्यानं ‘अंतर्नाद’सारखी काही दर्जेदार नियतकालिकं उचक्या घेत आहेत. काहींनी केव्हाच माना टाकल्यात. वाचकांची ही बदलती अभिरूची लक्षात घेणारे, स्वतःचा नवा वाचक तयार करणारे, बदलत्या तंत्रज्ञानाची आव्हानं स्वीकारणारे मात्र यशस्वी घोडदौड करत आहेत. सर्व नकारात्मकता बाजूला सारून ‘मासिक’ या संकल्पनेलाच ऊर्जितावस्था देण्यात ‘चपराक’नंही खारीचा वाटा उचलला आहे.

एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून ‘चपराक’ सर्वदूर पोहोचला आहे. त्यात ‘चपराक‘चा दिवाळी महाविशेषांक म्हणजे तर शिरोमणीच असतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील सर्व प्रमुख शहरात आणि इतर काही देशातही ‘चपराक’चे वाचक आहेत. मायमराठीची ही पताका डौलात फडकत असताना वाचनसंस्कृतीची कोणीही चिंता करण्याचं कारण नाही. 

मराठी साहित्याला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण नवं नाही. प्रस्थापितांची उदासीनता कायम मारकच ठरत आलीय. त्यामुळं कुणालाही न जुमानता स्वतःची जागा स्वतः तयार करणं हाच आजच्या साहित्यिकांपुढील पर्याय आहे. समाजमाध्यमांचा वाढता आवाका ध्यानात घेता हे मुळीच अवघड नाही. तरूणांचे लाखोंनी वाचले जाणारे ब्लॉग याची साक्ष पटवून देतात. शिवाय ‘चपराक’सारखी नियतकालिकं नवोदित लेखकांच्या पाठिशी भक्कमपणं उभी आहेत. सध्या भूमिका घेणारी वृत्तपत्रं, मासिकं, साहित्यिक, साहित्यसंस्था दुर्मीळ होत चालल्यानं मराठी साहित्याचं मोठं नुकसान होत आहे.

विषय कोणताही असो, सर्वत्र गुडीगुडीचा मामला. ‘तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो’ असं चित्र! मराठीत ‘समीक्षा’ नावाचा प्रकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती. ज्या दगडांना शेंदूर फासून ठेवलाय त्यांचंच सातत्यानं महात्म्य, त्यांचीच पूजा! नव्यांसाठी मात्र कायमस्वरूपी ‘प्रवेश बंद’चा अलिखित फलक! वर उमलते अंकुर फुलत नाहीत, नवोदितांचं दर्जेदार लेखन पुढे येत नाही, वाचक कमी होत चाललेत अशी नेहमीची रड आहेच. या बजबजपुरीत अनेकजण आपापल्यापरीनं धडपडत आहेत, स्वतःचं विश्व निर्माण करत आहेत ही म्हणूनच सुखावह बाब आहे.

उत्तुंगतेचा ध्यास घेताना जुन्यांचा आदर्श  ठेवला पाहिजे. त्यांनी जे ‘मनोरे’ उभारलेत त्याविषयी कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. मात्र ही कृतार्थता जपताना आपल्याला आणखी पुढं जाता आलं पाहिजे. आपण त्यातच अडकून पडतो. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, मंगेश पाडगांवकर अशांच्या कर्तृत्वाविषयी मनात श्रद्धाभाव जरूर असू द्या; त्यांचा आदर्श ठेवा पण ‘त्यांच्यापेक्षा भारी कोणी होणारच नाही’ हा न्यूनगंड काढून टाका. जे जे अचाट आहे ते ते मराठी माणूस करतो. साहस त्याच्या रक्तातच आहे. त्याला कसल्याच सीमा नाहीत. त्याला कोणी रोखू शकत नाही. मूठभर मावळे हाताशी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय ज्या मातीत होऊन गेलेत ती माती पराक्रमाची परंपरा कधीही खंडित होऊ देणार नाही. आपण फक्त भक्कमपणं उभं राहणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवे मानदंड रचण्यासाठी तरूणाईनं सज्ज झालं पाहिजे. आजच्या काळाची आव्हानं लक्षात घेऊन मार्गक्रमणा केल्यास आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसानं इतकं अफाट योगदान दिलं पाहिजे की त्याचा जगालाही हेवा वाटावा. हा विश्वास जागविण्यासाठीच ‘चपराक’ कार्यरत आहे.

आपल्याकडची राजकीय अस्थिरता कधीही संपली नाही, संपणार नाही. लोकशाही व्यवस्थेत ती संपेल असं गृहितही धरता येणार नाही. आपल्यावर सातत्यानं निसर्ग कोपतोय. काही ठिकाणी मानवनिर्मित दुष्काळही पडतोय. सरकारची उदासीनता याला खतपाणीच घालते. ‘देश आगे बढ रहा है’, ‘सब का साथ, सब का विकास’ असं म्हणत आपण किती मागे जातोय याचा पत्ताही नाही. बरं, तूर्तास तरी याला काही पर्यायही दिसत नाही. कॉंग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या लोकांनी परिवर्तन घडवलं. हे परिवर्तन मात्र ‘आगीतून उठून फुफाट्यात’ यापेक्षा फारसं वेगळं नाही. 
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सध्याच्या विरोधकांची सर्वात मोठी कर्तबगारी कोणती? तर त्यांनी आपल्या जातीय अस्मिता कमालीच्या टोकदार केल्या. कालपर्यंत सत्तेत असणारे आज सामान्य माणसाचा, त्याच्या जगण्याचा विचार करत असल्याचं भासवू लागले. ज्यांनी कोमात ढकललं तेच ‘बघा बघा माय, कसा मरणाला टेकलाय...’ म्हणून गळे काढू लागले. वेश्येनं पतिव्रता धर्म शिकवणं म्हणतात ते यालाच! सामान्य माणूस म्हणून आपलं दुर्दैव इतकंच की, ही परिस्थिती बदलावी म्हणून आपण ज्या विश्वासानं नव्या राज्यासाठी नवे गडी निवडले तेही याच माळेचे मणी निघाले. त्यांचा शिरोमणी त्यातल्या त्यात बराय एवढंच! 

मोदी सरकारनं मागच्या वर्षी नोटाबंदी केली. सामान्य माणसाला त्याचा मोठा फटका बसला. त्यानं तो कसलीही कुरबूर न करता सहन केला कारण त्यामागं पंतप्रधानांनी दाखवलेली स्वप्नं होती. काळा पैसा बाहेर येईल, भ्रष्टाचाराला चाप बसेल या भावनेनं कुणीही त्याचा बागुलबुवा केला नाही. स्वकमाईच्या छोट्या छोट्या रकमा हातात येणं ही देशभक्ती वाटू लागली. त्यातून पुढं काय साध्य झालं या फक्त चर्चेच्याच गोष्टी ठरल्या.

नंतर जीएसटीनं कंबरडं मोडलं. त्यातूल ‘आर्थिक शिस्त’ लागेल असं सांगितलं जातंय. प्रत्यक्षात मात्र अनेकजण कोलमडून पडलेत. छोट्या उद्योजकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागलीय. केवळ ‘चपराक’बाबत बोलायचं झालं तर गेल्या वर्षी झालेल्या नोटबंदीमुळं दिवाळी अंक विक्रीवर वाईट परिणाम झाला. जाहिराती रोडावल्या. नंतर डोंबिवलीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. आजवरच्या इतिहासात प्रथमच असं झालं की संमेलनात प्रकाशकांचा वाहतूक खर्चही निघाला नाही. त्यात ‘संमेलनात पुस्तक ‘प्रदर्शन’ असतं. प्रदर्शनात फक्त पुस्तकांच्या एक-दोन प्रती आणून त्या दाखवायच्या असतात’ असं विधान करून अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी प्रकाशकांच्या जखमेवर मीठ चोळलं. ‘संमेलनात ग्रंथप्रदर्शन आणि ‘विक्री’ असते’ याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला. म्हणूनच सामान्य वाचकांकडून, रसिकांकडून दहा-दहा रूपयांची मदत वारंवार मागूनही साहित्य महामंडळाला मराठी माणसानं ठेंगा दाखवलाय.

ग्रंथव्यवहाराच्या दृष्टिनं नोटाबंदी, साहित्य संमेलन यानंतर पुढचं अरिष्ट आलं ते जीएसटीचं. या काळात पुस्तकांची विक्री मंदावलीय. कागदाचे, शाईचे दर वाढलेत. अनेक दिवाळी अंक त्यामुळं नेहमीपेक्षा कमी पानांचे झालेत. काहींना किंमती वाढवाव्या लागल्यात. आर्थिक गणितं जुळवणं भल्याभल्यांना कठीण गेलंय.

असं सारं चित्र असताना ‘चपराक’ला मात्र वाचकाश्रय मिळालाय. या काळात ‘चपराक’ तगून राहिला तो वाचकांच्या निर्व्याज प्रेमामुळं. अंकाच्या वर्गण्या येण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. जाहिरातदारांनीही नेहमीप्रमाणं विश्वास दाखवलाय. पुस्तकांच्या दुकानातून अत्यल्प विक्री होत असली तरी थेट ‘चपराक’च्या कार्यालयातून, ऑनलाईन विक्री मात्र वाढलीय. शालेय जीवनानंतर ज्यांचा वाचनाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता त्यांच्या डोक्यात आम्ही नवनवे विषय घातले. त्यांना लिहितं केलं, बोलतं केलं. त्यांची अभिरूची जागृत करून संबंधित पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्या अनुषंगानं त्यांनी इतर पुस्तकांचंही वाचन सुरू केलं. ‘चपराक’नं असा स्वतःचा वाचक निर्माण केलाय. ज्यांना ‘मासिक’ म्हणजे काय? हे कधी माहीतच नव्हतं किंवा ज्यांनी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांशिवाय एकाही ललित, वाङमयीन पुस्तकाला कधीच हात लावला नव्हता त्यांच्याकडं आज ‘चपराक’चे सर्व अंक आहेत. आपल्या पुस्तकांचा संच त्यांच्या घरी त्यांनी अभिमानानं ठेवलाय. ती पुस्तकं त्यांनी वाचलीत आणि त्यावर ते वेळोवेळी चर्चाही करतात. ही आमची खरी उपलब्धी! सहा राज्यातील अशा नव्या मराठी वाचक आणि लेखकांपर्यंत ‘चपराक’चा विस्तार झालाय. यंदाच्या या दिवाळी महाविशेषांकाचीही विक्रमी स्वरूपात पूर्वनोंदणी झालीय. इवलासा वेलू गगनावर गेलाय. चित्रकार संतोष घोंगडे यांनी साकारलेलं या अंकाचं मुखमृष्ठ हेच तर सुचवतं.

समाजानं साहित्याभिमुख झालं पाहिजे असं म्हणताना साहित्यिकांनीही समाजाभिमुख होणं गरजेचं आहे. सामान्य माणसाच्या व्यथा, वेदना कागदावर उतरल्या तरच तो तुम्हाला स्वीकारेल. हातात लेखणी किंवा एखाद्या वाहिनीचा बूम आहे म्हणून कुणाचे तरी लांगुलचालन केलेच पाहिजे, त्यांची तळी उचललीच पाहिजे असा काही नियम नसतो. सत्याची चाड असणारे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजणारे अनेक पत्रकार आपल्याकडं होऊन गेलेत. त्यांच्याच पुण्याईमुळं आपली थोडीफार विश्वासार्हता टिकून आहे. अन्यथा लोकांनी आजच्या पत्रकारांना धोबीपछाड केलं असतं.

‘मराठीतला सगळ्यात विक्रमी दिवाळी महाविशेषांक’ अशी गेल्या काही काळात ‘चपराक‘ची ओळख झालीय. नव्या-जुन्या लेखकांचा संगम साधत आम्ही सर्वोत्तम ते दिलेय. या अंकात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक अकिलन, डॉ. द. ता. भोसले, सदानंद भणगे, विद्या बयास, अमर कुसाळकर, अविनाश हळबे, चंद्रलेखा बेलसरे, सरिता कमळापूरकर यांच्या कथा दिल्यात. प्रा. बी. एन. चौधरींची अहिराणी कथा दिलीय. दुर्दैवी योगायोग म्हणजे ‘चपराक’ परिवाराचे लेखक ह. मो. मराठे यांची ‘श्रद्धांजली’ ही व्यंग्यकथा. त्यांची ही शेवटची कथा ठरावी आणि त्यांनाच ‘श्रद्धांजली’ वहावी लागावी ही फार वेदनादायी बाब आहे. ‘चपराक’ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

रमेश वाकनीस यांची संपूर्ण कादंबरी या अंकात दिलीय. ती आपणास निश्चितच आवडेल. व्यक्तिचित्रण विभाग सशक्त आणि प्रेरणादायी झालाय. डॉ. माधव पोतदार, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, सुनिताराजे पवार, लक्ष्मीकांत देशमुख, शुभांगी गिरमे, अर्चना डावरे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदाशिव शिवदे, सुरेखा शहा आदींनी त्यासाठी हातभार लावलाय. शंभरहून अधिक कविता दिल्यात. प्रस्थापितांबरोबर नवोदितांनाही हक्काचं व्यासपीठ दिलंय. भाऊ आणि स्वाती तोरसेकर, डॉ. न. म. जोशी, प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनवणी, उषा मंगेशकर, उमेश सणस, श्रीराम पचिंद्रे, उद्धव कानडे, प्रिया धारूरकर, संजय क्षीरसागर, संजय वाघ, अनिरूद्ध जोशी, श्रीपाद ब्रह्मे अशा सर्वच मान्यवरांचे लेख आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करतील. किमान पंधरा पुस्तकांचा खाऊ या एकाच दिवाळी महाविशेषांकात दिलाय. त्यामुळं तो आपल्या पसंतीस उतरेल याची संपादक म्हणून खात्री आहे. 

आपणा सर्वांना या प्रकाशोत्सवाच्या शुभेच्छा देतो, सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आगामी काळातही ‘चपराक’ कायम विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांवर तुटून पडेल, चांगले ते स्वीकारेल आणि वाईट ते अव्हेरेल याची ग्वाही देतो आणि थांबतो.
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२


Tuesday, September 19, 2017

कृतघ्न नको; कृतज्ञ राहा!


राजकारणात कुणी आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेले तर ते ‘गद्दार’ ठरतात आणि दुसर्‍या पक्षातून आपल्या पक्षात आले तर ते त्यांचे ‘हृदयपरिवर्तन’ असते! 

हा नियम खरे तर आता प्रत्येक क्षेत्रात लागू पडतोय. त्यासाठी राजकारणच कशाला हवेय?

माणूस इतका स्वार्थी झालाय की तो प्रत्येक घटनेचा, कृतीचा, निर्णयाचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून मोकळा होतो. बोलीत आणि करणीत इतकी मोठी दरी निर्माण झालीय की आयुष्य विसंगतीनेच व्यापून गेलेय.

हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यातील नितेश राणेंचे विधान! 

कोण आहेत हे नितेश राणे?

तर त्यांची स्वतःची अशी काही विशेष ओळख नाही. त्यांचे तीर्थरूप, महाराष्ट्राचे एकेकाळचे मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते सु(?)पूत्र! राणे कुटुंबातील सदस्य इतर राजकारण्यांप्रमाणेच अधूनमधून वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात. नाहीतर अशा उपटसुंभांना कोण विचारणार?

तर त्याचं झालं असं, की या राणेपुत्रानं, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आव्हान दिलंय...! 
काय आव्हान आहे? तर ‘तुम्ही एकटे बाहेर फिरून दाखवा...’

बाबासाहेबांचे सध्या वय आहे, शहाण्णव! 
राणे पितापुत्रांचे वय एकत्र केले तरी ते इतके व्हायचे नाही! असो.

तर या निमित्तानं आम्हाला काही वर्षापूर्वीची एक घटना पुन्हा आठवली.

श्रीपाल सबनीस नावाचे एक गृहस्थ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे होते. त्यावेळी ‘सनातन’चे वकील असलेल्या पुनाळकरांनी त्यांना सल्ला दिला होता की, ‘‘रोज मॉर्निंग वॉकला जात जा...’’ 

त्यावरून प्रचंड गहजब माजला. निखिल वागळेसारख्या पुरोगामी पत्रकारांनी त्या विधानावर खास ‘शो’ केले. त्यात अनेकांनी पोपटपंची केली. सगळ्यांना म्हणे ती खूप मोठी धमकी वाटली.

ऍड. पुनाळकरांचे म्हणणे होते, ‘‘श्रीपाल सबनीस यांना मी कधी भेटलो नाही. त्यांच्याशी माझा परिचयही नाही, पण ते संमेलनाध्यक्षपदासाठी उभे आहेत. वृत्तपत्रात, वाहिन्यांवर त्यांचा चेहरा बघितला. प्रत्येकवेळी ते खूप गंभीर दिसतात. आमच्या कोकणात पोट साफ होत नसेल तर असे विकार होतात असे मानले जाते. अशावेळी आम्ही सांगतो, ‘जरा मॉर्निंग वॉकला जात जा.’ त्याने अशा व्याधी कमी होतात. पोट साफ झाल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. त्याच्याकडे बघून समोरच्याला आनंद मिळणे राहू द्या पण किमान दिवस खराब जात नाही. माणूस ‘मंद आणि मठ्ठ’ वाटत नाही. ते साहित्यक्षेत्रातील महत्त्वाची निवडणूक लढवत असल्याने त्यांना हा प्रेमाचा सल्ला दिला.’’

पण हे विधान कुणाला कळले नाही किंवा पुनाळकरांचा प्रामाणिक उद्देशही कुणी ध्यानात घेतला नाही. जमाते पुरोगामींची फौज रस्त्यावर उतरली. सबनीसांनी ‘सामुहिक मॉर्निंग वॉक’ केले. 
वर ‘इथून पुढे मी रोज ‘सकाळी’ मॉर्निंग वॉकला जाणार’ असेही  विनोदी विधान केले. त्यांचा तो संकल्प किती दिवस टिकला हे माहीत नाही, मात्र त्यावरून प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेक दिवस चवीने चघळला होता.

हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यावेळीही हे नितेश राणे सबनीसांसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या कुमठेकर रस्त्यावरील निवासस्थानी जाऊन त्यांनी सबनीसांना ‘धीर’ दिला होता. ‘पुरोगामी महाराष्ट्रात अशा धमक्या सहन करणार नाही' असे म्हणत त्यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक शो’ही केला होता. सबनीसांनी त्यांच्या सवयीप्रमाणे नितेश यांचा शाल घालून सत्कार केला होता आणि त्यांना ‘मानलेला’ मुलगाही जाहीर केले होते. हेच नितेश राणे आता बाबासाहेबांना एकटे फिरण्याची धमकी देत आहेत आणि सबनीसांसारखे सगळे तथाकथित लेखक त्याविरूद्ध ब्रही काढत नाहीत. जमाते पुरोगामींच्या फळीतील पत्रकारांना यावर चर्चा घडवावी वाटत नाही, कारण बाबासाहेब अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत. 

बाबासाहेबांवर टीका केल्याने त्यांचे योगदान कमी होणार नाही. शिवचरित्रासाठी समर्पित आयुष्य घालणारे इतके त्यागी दुसरे व्यक्तिमत्त्व दाखवा. बाबासाहेब या वयातही शिवकालच जगतात. त्यांचा तो ध्यास आहे, श्वास आहे. ज्यांना शिवचरित्रावर काही करावेसे वाटते त्यांनी इतके निरोगी आणि समाधानी दीर्घायु जगावे. हे काम व्रत म्हणून स्वीकारावे. बाबासाहेब कुठे कमी पडलेत असे वाटत असेल किंवा त्यांनी काही चुकीचे लिहिलेय असे वाटत असेल तर संशोधनातून, अभ्यासातून ते खोडून काढावे. मात्र त्यासाठी परिश्रम करावे लागतात. त्याला चिंतन लागते. गड, कोट, किल्ले पालथे घालावे लागतात. घरदार सोडून सातत्याने भ्रमंती करावी लागते. डोळ्यात तेल घालून इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. हजारो-लाखो कागदपत्रे वाचावी लागतात, अभ्यासावी लागतात. त्यासाठी भाषेचाही अभ्यास लागतो. नितेश यांच्यासारख्या कुणालाही बाबासाहेब चुकीचे वाटत असतील तर त्यांनी पोकळ धमक्या देण्याऐवजी हे करून दाखवावे. त्यातून प्रत्येकाला आपली ‘उंची-खोली’ लक्षात येईल. काहीच नाही झाले तर किमान श्रीमंत कोकाटेसारखा ‘विनोदी’ इतिहास तरी लिहावा. ‘शिवाजी’ या नावातच इतकी जादू आहे की त्यांच्याविषयी काहीही काम केले तरी त्या माणसाच्या आयुष्याचे सोनेच होते. नाहीतर कोकाटेसारखी माणसे महाराष्ट्राला कळली तरी असती का?

शिवाजीराजांचा पराक्रम समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी एक पायवाट तयार केलीय. भविष्यात त्या वाटेवरून कुणी गेले तर आनंदच आहे. मात्र केवळ टीका-टिपन्नी करून अशा विषयात राजकारण साधता येत नाही. एकेकाळी शिवसेनेसोबत संसार करताना हेच राणे कुटुंबिय बाबासाहेबांना ‘दैवत’ मानत. खुद्द नितेश राणे यांनीच बाबासाहेबांचे ‘आशीर्वाद’ घेतानाचे फोटो ट्विट केले होते. आता त्यांचा घटस्फोट झालाय. आता कॉंग्रेसबरोबरही त्यांचा घरोबा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे त्यांना होऊ घातलेल्या नव्या कुटुंबातले नियम, रूढी, परंपरा जपाव्या लागतात. नवर्‍याची खप्पामर्जी होईल असे काहीही करण्यास कोणतीही बायको सहजासहजी धजावत नाही.  ती आवडती असेल, नावडती असेल... पण तिला आपले पातिव्रत्य दाखवून देण्यासाठी धडपड करावीच लागते. नितेश यालाही अपवाद ठरले नाहीत. त्यांच्या तीर्थरूपांची राजकीय ससेहोलपट होत असली, घुसमट चालू असली तरी हा मांडलेला ‘संसार’ तर टिकवायला हवाच! म्हणून तर मग बाबासाहेबांसारख्या तपस्वी माणसांवर काहीबाही बोलण्याचे धाडस करावे लागते. नाहीतर त्यांना त्यांची स्वत:ची योग्यता माहीत नाही असे थोडेच आहे? महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस ही अगतिकता समजून घेऊ शकतो.
  
नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरभरून दिलेय. दगडाचा देव केल्यानंतर त्याने आपले ‘देवपण’ जपले पाहिजे. इथे हा ‘दगड’च स्वयंभू झाल्याच्या आविर्भावात वावरू लागला आणि म्हणूनच मोठी समस्या निर्माण झाली. दगड तो दगडच! तो निर्मितीच्या कामाला आला तर त्याचे वेगळे महत्त्व असते! इथे मात्र विध्वंसच दिसतो. ज्यांनी निर्मिती करायला हवी ते तोडण्या-मोडण्याची भाषा करू लागतात तेव्हा त्यांचे अस्तित्व संपते. राणे कुटुंबियांचेही तसेच झाले आहे. द्वेषाने पछाडलेल्या मानसिकतेतून ते फक्त आरोप करत सुटले आहेत, धमक्या देत सुटले आहेत.

जाताजाता आचार्य अत्रे यांचे एक विधान सांगावेसे वाटते. अत्रे साहेब म्हणाले होते, ‘‘भविष्यात जर कुणाला माझी समाधी उभारावीशी वाटली, तर त्यावर एक वाक्य हमखास लिहा. हा माणूस अविवेकी असेल, प्रमादशील असेल मात्र हा माणूस कृतघ्न कधीही नव्हता! कारण कृतज्ञता हे मानवी आयुष्याला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे आणि कृतघ्नता हा सर्वात मोठा शाप!’’

राणेसाहेब, महाराष्ट्राने तुम्हाला आजवर भरभरून दिले आहे. त्याविषयी तुम्ही कधी कृतज्ञता व्यक्त केल्याचे स्मरत नाही; निदान वाटेल ती विधाने करून कृतघ्नपणा तरी दाखवून देऊ नकात!
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२ 

Monday, September 4, 2017

'जुलूस' आणि महाराष्ट्रभूषण!


अर्चना डावरे या परभणीच्या लेखिका. त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘‘दादा, मला बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायचंय.’’ त्यांना म्हणालो, ‘‘या, भेटूया.’’

त्या काल पुण्यात आल्या. सोबत त्यांचे पती श्री. गिरीशही होते. आम्ही सर्वजण त्यांच्या घरी गेलो. सगळ्यांची ओळख करून दिली. छान गप्पा झाल्या. 

बाबासाहेेब नुकतेच दिल्लीला जाऊन आले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. साहजिकच त्या विषयावर चर्चा सुरू झाली. 
ते म्हणाले, ‘‘पंतप्रधानांकडं माझं काहीच काम नव्हतं. मीच त्यांचा भेटीसाठी वेळ घेतला. आम्हाला ‘जाणता राजा’चा प्रयोग दिल्लीत करायचाय. त्यासाठी त्यांनी उपस्थित रहावं अशी विनंती करायची होती. ते त्यांच्या व्यग्रतेतून पाच मिनिटांसाठी आले तरी आनंद होता. भेट झाली. त्यांना निमंत्रण दिलं. त्याबरोबर ते म्हणाले, ‘‘जाणता राजा’चा पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 ला झाला होता. त्यासाठी मी अहमदाबादहून पुण्याला आलो होतो. आता तर दिल्लीतल्या दिल्लीत यायचं आहे. नक्की येईन.’’ त्यांनी अस्खलित मराठीत असं बोलल्यावर मी अवाकच झालो. आता 6 फेब्रुवारी 2018 ला दिल्लीत ‘जाणता राजा’चा प्रयोग होतोय.’’

हे सारं ऐकून आम्ही स्तंभित झालो. अर्चनाताई लेखिका. त्यात निवेदिका. त्या गप्प थोडेच बसतील? त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. आम्ही शांत! अर्चनाताई म्हणाल्या, ‘‘बाबा, आम्हाला शिवाजीराजे कळले ते तुमच्यामुळं. इतिहास कळला तोही तुमच्यामुळं. आमचं बालपण त्यामुळं संपन्न झालं; पण तुमच्यात इतिहासाची आवड कशी निर्माण झाली?’’

ते हसले. म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांमुळं. त्यांनी आम्हाला ही समज दिली. अभ्यासाची दृष्टी दिली.’’

नंतर त्यांनी त्या आठवणी जागवल्या. ते बोलत होते. आम्ही नेहमीप्रमाणं मंत्रमुग्ध.

‘‘आता वयाच्या 96 व्या वर्षी काय बोलणार? पण नव्या पिढीत अभ्यासाची दृष्टी विकसित झाली पाहिजे. आमचा ऐतिहासिक चित्रांचा प्रकल्प सुरू आहे. त्यातली 106 चित्रं तयार झालीत. आम्ही आता चित्रमय शिवकाल साकारत आहोत. त्यातून तरी नवी पिढी इतिहासाकडं आकर्षित होईल.’’

सोबतचे सारेजण ऐकत होते. अर्चनाताई अधूनमधून काही प्रश्न विचारून त्यांना बोलतं करत होत्या. त्यांनी खास परभणीहून आणलेली शाल त्यांच्या अंगावर चढवली. ते खुश झाले. शाल पाहत म्हणाले, ‘‘फार सुंदर आहे...’’ नंतर अर्चनाताईंनी त्यांचा ‘जुलूस’ हा कथासंग्रह त्यांना भेट दिला. मागच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त आम्हीच तो प्रकाशित केलाय. मी त्यांना म्हणालो, ‘‘आणखी एक प्रत घ्या आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घ्या.’’  ‘जुलूस’ची दुसरी प्रत त्यांच्या हातात दिली. त्यावर त्यांनी मोडी लिपित सही केली. सगळे खूश!

थोडावेळ चौफेर गप्पा झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. सगळेजण भारावलेल्या अवस्थेत. या वयातही त्यांचा उत्साह, इतिहासाचं प्रेम, शिवमय जगणं, नवोदितांची आस्थेनं दखल आणि महत्त्वाचं म्हणजे तल्लख स्मरणशक्ती... सगळंच अचंबित करणारं!

आम्ही बाहेर पडलो. त्यांच्या घराजवळील एक छोटंसं हॉटेल. तिथं आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमच्यासोबत नगरचे लेखक सदानंद भणगे हेही होते. त्यांचीही पुस्तकं ‘चपराक’नंच केलेली. बाबासाहेबांना भेटायचं म्हणून त्यांनाही अतीव आनंद झालेला. शिवाय अर्चनाताईंच्या ‘जुलूस’ची प्रस्तावनाही आम्ही त्यांच्याकडून आग्रहानं लिहून घेतलेली.
आमच्या गप्पा सुरू असतानाच मला बाबासाहेबांचा फोन आला. जेमतेम 15 मिनिटांपूर्वीच त्यांच्या घरातून बाहेर पडलो होतो. त्यांनी विचारलं, ‘‘कुठे आहात? जवळपास असाल तर परत पाच मिनिटांसाठी येऊ शकाल का?’’

त्यांना म्हणालो, ‘‘आम्ही सगळेच तुमच्या घराबाहेर आहोत. आलोच.’’

पुन्हा आमचा ताफा त्यांच्या घराकडं वळला. सगळ्यांच्याच मनात विचारचक्र सुरू झालं. त्यांनी परत का बोलावलं असावं? 

आत जाताच त्यांनी अर्चनाताईंना जवळ बोलावलं. ते म्हणाले, ‘‘मी आता ‘जुलूस’ची प्रस्तावना आणि तुमची ‘जुलूस’ ही शीर्षककथा वाचली. त्यावर मला काही बोलायचं आहे...’’

अर्चनाताई भांबावून गेलेल्या.

बाबासाहेब म्हणाले, ‘‘ही कथा सुंदर झालीय. यातील हिंदी आणि उर्दू शब्द तुम्हाला कसे सुचले?’’

ताई म्हणाल्या, ‘‘माझे वडील हैद्राबाद मुक्ती संग्रामात होते. आमच्याकडे मराठी बोलतानाही हे शब्द सहजपणे येतात. त्यामुळे वापरले.’’

मग त्यांनी एकदोन उर्दूमिश्रीत हिंदीतली वाक्यं सांगितली. त्याचा अर्थ विचारला. तो सांगितल्यावर म्हणाले, ‘‘मागच्या तीन महिन्यापासून मला जी चिंता होती त्यातून मी मुक्त होईन. तुम्ही एक काम कराल का? ते तुमच्याकडून 99 टक्के होईल. ‘जाणता राजा’चे आजवर 1200 प्रयोग झालेत. त्यात हिंदीत 200 प्रयोग झालेत. तुम्ही सोप्या भाषेत आणि भाषेचा लहेजा राखत याचे रूपांतर करा.’’

सगळे अवाक! ताई तर भारावूनच गेल्या. केवळ त्यांची एक भेट मिळावी म्हणून त्यांचा अट्टहास चाललेला. इथं तर त्यांनी इतकी मोठी जबाबदारी सोपवली... लगेच बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ची एक प्रत त्यांना भेट दिली. त्यातील चारपाच पानांचा अनुवाद करायला सांगितला. अर्चनाताई रात्री परभणीला परतणार असल्यानं तो माझ्यासोबत द्यायला सांगितला. तो कसा वाटतोय यावर पुढची दिशा ठरणार होती. 

‘‘मराठवाड्यात इतके प्रकाशक असताना पुण्यातून पुस्तक प्रकाशित करायची काय गरज?’’ असा प्रश्न त्यांना काहींनी विचारला होता. त्याच पुस्तकानं आज अर्चनाताईंचे आदर्श असलेल्या बाबासाहेबांच्या हृदयात घर केलं होतं. त्यांच्याकडून लेखनाला, भाषेला, आशयाला दाद मिळाली होती. दर्जेदार लेखनाचं आणि ते संबधितांपर्यंत पोहोचवल्याचं असं समाधान असतं...

अर्चनाताईंनी त्यांचं परभणीला परत जाण्याच्या प्रवासाचं आरक्षण रद्द केलं. त्यातील काही भागाचा समर्थ अनुवाद केला. आज (सोमवार) तो घेऊन आम्ही पुन्हा त्यांच्याकडं गेलो. तो त्यांनी वाचला. सगळ्यांच्या मनात धडकी भरली होती. ते मात्र खुश झाले. म्हणाले, ‘‘मी आता हे कावळ्याच्या दृष्टिनं वाचलं. थोड्यावेळानं आस्वादक रसिकाच्या भूमिकेतून वाचेल. हे काम तुमच्या हातून घडेल. त्यासाठी तुम्हाला परत यावं लागेल. काही शब्दांवर आपल्याला चर्चा करावी लागेल...’’ 

लगेच त्यांनी ‘जाणता राजा’च्या हिंदी प्रयोगाची सिडी मागवली. ती आज संध्याकाळी आम्ही सगळेजण ऐकणार आहोत. त्यांचं म्हणणं असं की, अर्चनाताईंची भाषा रसाळ आहे. त्यात मराठवाडी गोडवा आहे. त्या त्याचा हिंदी अनुवाद आणखी ताकदीनं करू शकतील...

एका लेखिकेची केवळ एक कथा वाचून त्यांनी हा केवढा मोठा विश्वास दर्शविला! अर्चनाताई पूर्ण सामर्थ्यासह हा प्रकल्प यशस्वी करतील याविषयी माझ्या मनात अजिबात किंतु नाही.

लेखकानं लिहित राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमचं साहित्यच यश, कीर्ती, समाधान, पैसा सारं काही मिळवून देईल. त्यासाठी अनेकदा वाट पहावी लागते. संधीनं दरवाजा ठोठावला की तो तुम्ही उघडला पाहिजे. 

अनेकजण नैराश्यानं ग्रासतात. ‘लेखनानं मला काय दिलं?’ म्हणून चिंताक्रांत होतात. कुणाचं नशीब कसं उघडेल हे सांगता येत नाही! पण आपलं लेखन हा आपल्या हौसेचा नाही तर जीवननिष्ठेचा भाग झाला पाहिजे. ते झालं की पुढचं सगळं सोपं होतं. 

तूर्तास मात्र आम्ही ‘जाणता राजा’च्या मराठवाडी शैलीतील उर्दूमिश्रीत हिंदी आवृत्तीची वाट पाहत आहोत.
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

Monday, August 21, 2017

एक हात ‘अमर’ वाटचालीसाठी!



ज्ञान ही कुण्या एका विशिष्ठ जातीची मक्तेदारी नाही. शिक्षणावर, ज्ञानावर सर्वांचा अधिकार आहे. सूर्यप्रकाश काय फक्त कुण्या एका जातीसाठी-समुदायासाठी असतो का? मात्र एक मोठा वर्ग त्यापासून दीर्घकाळ दूर राहिल्यानं अनेकांच्या मनात न्यूनगंड आहे. तो दूर करण्यासाठी सर्वच जाती-धर्मातील अनेक महापुरूष पुढं सरसावले. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्ञानाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःची झिज करून घेतली. तरीही अनेकांची उपेक्षा झाली. काहींची समाजाने केली आणि बहुतेकजण स्वतःच खितपत पडले! काय करावे याचे निश्चित ज्ञान त्यांना नव्हते. शिक्षण, आरोग्य याची प्रचंड हेळसांड झाल्याने त्यांचा विकास खुंटला. हा समाज व्यसनाच्या आहारी गेला. आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असलं तरी एका मोठ्या वर्गाला अजूनही त्याचा अर्थ कळलाय असं वाटत नाही. 

आपल्याकडं जातीअंताची चळवळ कित्येक वर्षापासून सुरू असली तरी लोकांच्या मनातून जात काही जात नाही. बहुतेकांना आपल्या जातीचा अभिमान असतो. हे एकवेळ परवडलं! मात्र आता जातीयवाद इतक्या टोकाला गेलाय की स्वजातीच्या विकासापेक्षा इतर जातींचा द्वेष करण्यातच यांचा अधिक वेळ जातो. त्यातही ब्राह्मणांना झोडपणं, मराठ्यांची टर उडवणं, दलितांचं आणि दलित असण्याचं राजकारण करणं हे काही नवीन नाही. या सर्वात वडार समाज मात्र कुठे दिसत नाही. त्याचं वेगळं असं अस्तित्वही जाणवत नाही. गरीबी, बेकारी, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव यामुळं हा समाज विकासापासून कोसो मैल दूर आहे.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की पर्याय निर्माण होतात. वडार समाजाच्या विकासासाठीही काही सुशिक्षित, कर्तबगार लोक पुढं आले. त्यांनी इतर जाती-ज्ञातीप्रमाणं वडार समाजाच्या संघटना काढल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात काम उभं केलं. मात्र त्यांच्यातही संघटन नाही. त्यामुळे गरजूपर्यंत पोहोचता येत नाही. सरकार दरबारी त्यांना त्यांच्या मागण्या रेटून धरता येत नाहीत. अशा सगळ्या बिकट वातावरणात अमर कुसाळकर नावाचा एक कार्यकर्ता पुढं येतो आणि नेतेगिरी न करता समाजाच्या भल्यासाठी धडपडतो ही म्हणूनच कौतुकाची गोष्ट आहे. कुसाळकरांनी समाजातील गरजूंना हात देण्याबरोबरच शिक्षणाचा प्रचार केला. बुद्धिच्या क्षेत्रात काम करावं म्हणून, वडार समाजात साहित्यिक आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. म्हणूनच त्यांची दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. इतर जातींचा द्वेष न करता त्यांनी ‘स्वाभिमानी वडार संघटना’ स्थापन केलीय. त्या माध्यमातून ते विविध उपक्रम, कार्यक्रम राबवत आहेत.

व्यसनाच्या आहारी गेलेला, दगडकाम, मातीकाम यात अहोरात्र अडकून पडलेला, दारिद्य्रात खीतपत पडलेला हा समाज! शिक्षणाचा फारसा गंध नाही, त्यामुळं मिळेल ते काम करायचं, आलेला दिवस काढायचा अशी त्यांची गत. खरंतर आपल्याकडील मूर्तिशास्त्र त्यांनी विकसित केलं. मोठमोठे राजेरजवाडे, किल्ले बांधण्यात मोलाचं योगदान दिलं. ज्या हातांनी दगडाच्या मूर्तीला देवत्वाचं रूप दिलं ते हात ‘माणूस’ म्हणूनही इतर समाज हातात घेत नाही, हे त्यांचं शल्य. एखाद्या गावात तंबू टाकून रहावं, पाटा-वरवंटे तयार करावीत, मिळतील त्या रकमेला, अगदी धान्याच्या मोबदल्यात ती विकावीत, गावच्या पाटलाकडून गुन्हेगार नसल्याचं आणि चांगल्या वर्तणुकीचं पत्र घ्यावं आणि पुढच्या गावात चालू लागावं असा त्यांचा प्रवास. छन्नी आणि हातोडा घेऊन सुंदर शिल्प साकारणारी ही भटकी जमात त्यामुळं शिक्षणापासून कोसो मैल दूर राहिली.

याला अमर कुसाळकर यांच्यासारखे काही अपवाद ठरले. नुसते अपवाद ठरून ते थांबले नाहीत तर आपल्या समाजाच्या भल्याचा विचार करून त्यांनी वैयक्तिक सुखांची आहुती दिली. समाजाचं प्रबोधन सुरू केलं. शिक्षणाचा प्रचार केला. लग्नं जुळवण्यात पुढाकार घेतला. आरोग्याचे प्रश्‍न सुटावेत यासाठी काही उपक्रम राबवले. पदरमोड करून शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचं सहाय्य केलं. विविध क्षेत्रातील गुणवंतांचा वेळोवेळी गौरव केला. तो करतानाच त्यांची सामाजिक जाणीव वाढावी, त्यांनीही समाजाच्या विकासात योगदान द्यावं यासाठी त्यांना प्रवृत्त केलं.

अमर कुसाळकरांनी हणुमंत कुर्‍हाडे नावाच्या एका तरूण लेखकाला माझ्याकडं आणलं. एका खाणीत काम करताना त्याचे एक नातेवाईक दरडीखाली अडकले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्या घटनेनं हादरलेल्या हणुमंतनं ‘दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ ही लघुकादंबरी लिहिली. साहित्याचा आणि या समाजाचा तसा फारसा संबंध नसल्यानं अर्थातच प्रकाशक मिळत नव्हता. कुसाळकरांनी ही संहिता वाचली होती. त्यासाठी प्रस्तावनाही त्यांनी आंतरिक जिव्हाळ्याने आणि पोटतिडिकेने लिहिली. ती कादंबरी आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली. इतकंच नाही तर महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्या कादंबरीचं प्रकाशन केलं. कुसाळकर नसते तर कदाचित हा प्रतिभावंत लेखक मराठीला कळलाही नसता. 

भरत दौंडकर, लक्ष्मण खेडकर, सुरेश धोत्रे असे या समाजातील ताकतीचे कवी गेल्या काही काळात पुढे आलेत. शशिकांत धोत्रे यांच्यासारखा जागतिक दर्जाचा चित्रकार मिळालाय. नागराज मंजुळेसारखा अफाट ताकतीचा दिग्दर्शक वडार समाजातून पुढं आलाय. यापैकी कुणीही जातीचं राजकारण केलं नाही. ते जातीमुळे पुढं आले नाहीत. त्यांच्या त्यांच्या कलागुणानं, साधनेनं ते पुढं आले. त्यासाठी अहोरात्र संघर्ष केला. मात्र हे समाजाचे ‘आयडॉल’ ठरले. कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होता येते हा संदेश त्यांनी दिला. जात, दारिद्य्र यामुळे खचता कामा नये हे त्यांनी कृतीशिलतेतून दाखवून दिलं. जातीअंताची भाषा करताना काहींना जात मिरवण्याची लाजही वाटत असावी; मात्र या समाजाचं अज्ञान दूर करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी हा आदर्श त्यांच्यासमोर ठेवणं ही काळाजी गरज आहे. कुसाळकर नेमकं तेच काम करत आहेत.

अमर कुसाळकरांसारखे लोक फक्त एक व्यक्ती राहत नाहीत. ते स्वतःच एक संघटना बनतात. त्यामुळेच त्यांनी एक चळवळ उभी केली आहे. संजय सोनवणी, राजू परूळेकर, हरी नरके असे विचारवंत त्यामुळंच काही तत्त्वांना मुरड घालून त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतात. जातीअंत तर व्हायलाच हवा पण त्याआधी या समाजाची किमान माणूस म्हणून दखल घेतली जावी, इतकीच माफक अपेक्षा त्यामागं या सर्वांची असते. 

कुसाळकरांनी ‘ओडर संदेश’ हे मासिक सुरू केलं. भलीभली मासिकं उचक्या घेत असताना ते चालणं सोपंही नव्हतं. मात्र त्यांनी तो प्रयोग केला. व्यावसायिक मर्यादा असूनही दिवाळी अंक काढला. खरंतर अशी मासिकं जगायला हवीत, पण त्यामागच्या भावना समजून घेण्याइतकी आपल्या समाजाची अजून प्रगल्भता वाढली नाही. वडार समाजाचं मासिक आहे ना? मग ते आम्ही विकत घेऊन का वाचावं? असाच बहुतेकांचा मानस दिसला. 

कुसाळकर खचणार्‍यांपैकी नाहीत. मासिक चालवणं हे काही त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं. त्यामुळंच त्यांनी ती गोष्ट फारशी मनाला लावून घेतली नाही. वडार समाजातील लेखक शोधले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांची पुस्तकं विकत घेतली. ती इतरांना मोफत वाटली. नुकताच त्यांनी वडार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेतला. त्यासाठी आमच्या किल्लारीपासून ते अगदी औरंगाबाद, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ, अमरावतीपर्यंतचे विद्यार्थी आणि पालक आले होते. सर्वांना पुस्तकांचा संच, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ याबरोबरच त्यांनी चक्क प्रवासखर्चही दिला. हे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या किती दुर्बल आहेत आणि कोणत्या परिस्थितीतून त्यांनी हे यश मिळवलंय याची कल्पना त्यांना होती. हा दृष्टिकोन किती जणांकडे आहे? अशा सहवेदना समजून घेणारी माणसं खरंच मोठ्या मनाची असतात.

त्यांच्या सामाजिक कामात काहीजण अडथळेही आणत आहेत. त्यात त्यांचे काही समाजबांधवही आहेत. मात्र हा त्रास कुणाला चुकलाय? प्रबोधनकार ठाकरे यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली होती. सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकले गेले. र. धों. कर्वे असतील किंवा आगरकर असतील प्रत्येकाला उपहास सहन करावा लागला, अवहेलना वाट्याला आली. पण यापैकी कुणीही कधी हार मानली नाही. घेतलेला वसा सोडला नाही. अमर कुसाकळरांनाही थकून भागुन चालणार नाही. समाजासाठी काही करायचे तर वैयक्तिक सुखांचा त्याग करावाच लागतो. बरं, इतकं करूनही समाज तुम्हाला डोक्यावर घेईल असंही काही नाही. नाव ठेवणारे ठेवतीलच. नेत्यानं त्याला जुमानायचं नसतं. 

अमर कुसाळकर यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं म्हणताना आपणही थोडा आत्मीयतेने विचार करून या समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी हातभार लावायला हवा. यांचा शैक्षणिक विकास घडवण्यासाठी जमेल तशी मदत करायला हवी. सध्याच्या काळात एखादा गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेणं (त्यासाठीचा त्याचा खर्च उचलणं) अनेकांना शक्य आहे. अशा मार्गानंच सामाजिक एकोपा साधला जाईल. त्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढं टाकायची गरज आहे. तसं झालं तरच अमर कुसाळकर यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला सुखा-समाधानानं जगता येईल. 
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, August 20, 2017

सत्य कधीही पराभूत होत नाही!


छोट्या वृत्तपत्रांना ‘लंगोटी वृत्तपत्र’ म्हणून कायम हिणवण्यात येते. मात्र याच ‘छोट्या’ वृत्तपत्रांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीची लाज राखण्याचे मोठे काम वेळोवेळी केले आहे. सत्य सांगण्याचे काम छोटी वृत्तपत्रेच धाडसाने करतात. भलेही मोठी वृत्तपत्र डोनाल्ड ट्रम्पपासून ते नवाज शरीफपर्यंत आणि नरेंद्र मोदींपासून ते मदर तेरेसापर्यंत सातत्याने लिहित असतील; मात्र आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघार घेण्याची अशी नामुष्की केवळ त्यांच्यावरच येते. महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती, अगदी गावचा सरपंच यांच्या कारभाराविषयी पोटतिडिकेने सत्य मांडण्याचे काम अशी गावोगावची छोटी वृत्तपत्रेच करतात आणि त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत या वृत्तपत्रांचा वाटा मोठा आहे.

हे सारे मांडण्याचे कारण म्हणजे संगमनेरातील एक घटना. देशभर स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच संगमनेर शहरात मात्र एका स्थानिक दैनिकाच्या संपादकावर चक्क खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दैनिकाचे संपादक असलेले राजा वराट हे गेल्या दोन दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. या परिसरातील अनेक प्रश्न धाडसाने मांडण्याचे आणि ते तडीस नेण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. संगमनेरातील कत्तलखान्याचा विषय त्यांनी आक्रमकपणे मांडल्यानंतर महाराष्ट्रातील पाच आमदारांना हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा लागला. त्यावेळी वराट यांच्या घरावर संबंधितांकडून दगडफेकही झाली होती. कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यातील वृक्षतोड, वन्यजीव प्राण्यांचे प्रश्न, या परिसरातील आदिवासी बांधवांना भेडसावणार्‍या अडचणी, पर्यावरणाचे प्रश्न, आश्रमशाळांचे पप्रश्न, संगमनेरातील सहकारी संस्थांमुळे पर्यावरणाचा झालेला र्‍हास अशा विषयावर ते कायम भूमिका घेऊन लढत असतात.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केल्यानंतर मदतीचे असंख्य हात पुढे आले. त्यावेळी संगमनेर-अकोले परिसरातील पत्रकारांनी आपल्या खिशात हात घालून नामला मदतनिधी दिला होता. हे पैसे त्यांनी कुणाकडून ‘खंडणी’ म्हणून घेतले नव्हते तर आपल्या तुटपूंज्या मानधनातून त्यांनी हा निधी जमवला होता. ही संकल्पना अर्थातच राजा वराट यांची होती आणि स्थानिक पत्रकारांनी सर्व गटतट विसरून त्यांच्या या सकारात्मक विचाराला प्रतिसाद दिला होता. त्यासाठी राजा वराट यांनी केलेली धडपड मी स्वतः बघितली आहे कारण हा निधी त्यांनी माझ्याच हस्ते संबंधितांना दिला होता. सामान्य माणसाविषयी कळवळा असलेल्या या हरहुन्नरी पत्रकाराविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होणे म्हणूनच दुर्दैवी आहे.

राजा वराट हे फक्त पत्रकार नाहीत तर सामाजिक जाण असणारे एक प्रगल्भ कार्यकर्ते आहेत. या भागातील आदिवासी शाळा, तेथील विद्यार्थी यांना त्यांनी वेळोवेळी पदरमोड करून सहाय्य केले आहे. संगमनेर-नगर परिसर म्हणजे विखे पाटील आणि थोरात पाटलांची  राजकीय मक्तेदारी! मात्र कसल्याही आमीषाला बळी न पडता खिळखिळ्या झालेल्या दुचाकीवरून फिरत राजा वराट यांनी आपला प्रामाणिकपणा जपला आहे. 

मागची वीस-बावीस वर्षे ते ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या ‘सामना’चे संगमनेर वार्ताहर आहेत. सात-आठ महिन्यापूर्वी त्यांनी ‘नायक’ हे सायंदैनिक सुरू केले. त्यासाठी पाच पत्रकार मित्र एकत्र आले आणि ‘पंचम प्रकाशन’ची स्थापना केली. या अंतर्गत हे दैनिक चालवण्यात येते. सुरूवातीपासूनच स्थानिक विषय प्राधान्याने मांडल्याने अनेकांना पोटशूळ उठणे स्वाभाविक होते. त्यामुळे अमर कतारी या शिवसेनेच्या शहरप्रमुखाने राजा वराट आणि अंकुश बुब या दोन पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील अंकुश बुब याचा ‘नायक’शी काहीही संबंध नाही. तो त्यातील प्रमुख आरोपी आहे. संबंधितांनी राजा वराट यांचेही नाव त्यात गोवले आहे.

शिवसेनेच्या शहरप्रमुखाने ‘सामना’च्या वार्ताहरावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे. याबाबत फिर्यादी अमर कतारी सांगतात की, ‘‘राजा वराट यांनी यापूर्वी येथील एका उद्योजकाला धमकावून ‘सामना’साठी दीड लाख रूपयांची जाहिरात घेतली. आता ते स्वतःचे दैनिक चालवतात. त्यासाठी त्यांनी माझ्याकडे वीस हजार रूपयांची खंडणी मागितली. त्यातले दहा हजार रूपये मी दिले, मात्र त्यांचा तगादा सुरूच असल्याने मला खंडणीचा गुन्हा दाखल करावा लागला. राजा वराट यांना सात-आठ महिन्यापूर्वीच सामनातून काढून टाकण्यात आले आहे.’’

याबाबत ‘सामना’ कार्यालयात चौकशी केली असता ते सांगतात की, ‘‘राजा वराट हे आमचे बातमीदार आहेत. गेली अनेक वर्षे ते निष्ठेने कार्यरत आहेत. त्यांच्यावर शंका घेताच येणार नाही. आजही ते सामनात सक्रिय असून त्यांच्यावर हे आरोप सूडभावनेने केले गेले असण्याची शक्यता आहे. फिर्यादी हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने त्याने काही चुकीचे वाटल्यास पक्षाकडे किंवा आमच्याकडे तक्रार द्यायला हवी होती. मात्र तो ज्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करतोय ते पाहता त्याच्यामागे नक्की कोण आहे हेही तपासून बघितले पाहिजे.’’

या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

महत्त्वाचे म्हणजे छोट्या वृत्तपत्रांचे भवितव्य! कोणीही उठतेय आणि जिल्हा दैनिकांवर, साप्ताहिकांवर वाटेल ते आरोप करतंय. ते आरोप सिद्ध करण्याची मात्र यांची कुवत नसते. म्हणजे उद्या एखाद्या वृत्तपत्राचा प्रतिनिधी कुणाकडे जाहिरातीचे दरपत्रक घेऊन गेला तर तो खंडणीखोरच ठरवला जाईल. अमर कतारी याच्याकडे जर खंडणी मागितली गेली असेल तर त्यांनी ते पुरावे तपास यंत्रणेकडे आणि प्रसिद्धी माध्यमांकडे अवश्य द्यावेत. ऊठसूठ वाटेल ते आरोप करायचे आणि एखाद्याचे चारित्र्यहनन करायचे ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. यात जर राजा वराट किंवा त्यांच्या सहकार्‍यापैकी कोणीही किंवा अन्य जर दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई व्हावी. मात्र अशा ज्येष्ठ पत्रकारांवर असे गुन्हे दाखल करून त्यांचे खच्चीकरण केले जात असेल तर सर्वांनी त्यांच्या पाठिशी समर्थपणे उभे रहायला हवे. अशी वेळ कोणत्याही पत्रकारावर आणि कधीही येऊ शकते याचे भान ठेवणे ही काळाजी गरज आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेली जी पिढी आहे त्याचे प्रतिनिधित्व राजा वराट करतात. सामना आणि मार्मिक मधील त्यांचे अनेक विषय राज्यभर चर्चेला आले आहेत. तथाकथित शिवसैनिकाकडून पत्रकारावर आणि त्यातही सामनाच्याच वार्ताहरावर खंडणीचा गुन्हा दाखल होणे हे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम आहे. एकतर पत्रकारिता त्या थराला गेली असावी किंवा स्वार्थाचा भरणा झालेले लोक सेनेत सक्रिय झाले असावेत. जर पत्रकारिता बिघडली असेल तर ती अतिशय चिंतेची बाब आहे. या प्रकरणात तसे काही झाल्याचे दिसत नाही. राजा वराट यांची आजवरची निर्भिड, निरपेक्ष पत्रकारिता पाहता त्यांच्यावरील आरोपामागचे तथ्य कुणाच्याही लक्षात येईल. अमर कतारी हा शिवसेनेचा शहरप्रमुख आहे. येथील शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, इतकेच काय इतर पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्याशी बोलले असता ते राजा वराट यांच्याविषयी गौरवानेच बोलतात.

एका दैनिकाच्या संपादकावर खंडणीचा गुन्हा दाखल होवूनही अनेक मान्यवर पत्रकार संघटना अजून गप्पच आहेत. कदाचित हा विषय त्यांच्यापर्यंत गेला नसावा किंवा त्यांना तो तितकासा महत्त्वाचा वाटला नसावा. संगमनेरातील पत्रकार मात्र राजा वराट यांच्या पाठिशी असून त्यांनी एकत्र येऊन पोलीस उपाधिक्षकांची भेट घेतली आहे. या प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय ते अधिकारीही फिर्यादीच्या पाठिशी असल्याचे कळते. येथील अवैध प्रवासी वाहतूक, गांजाची तस्करी, गोवंश हत्या, अन्य बेकायदेशीर धंदे यांच्याविषयी वराट यांनी सातत्याने वृत्तमाला चालविल्याने पोलिसांचे हप्ते कमी झाले होते. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्याच्या माध्यमातून तेही त्यांचा राग काढत असतील तर याचा वरिष्ठ पातळीवरून तपास झाला पाहिजे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गृहखाते आपल्याकडेच आहे. तुमच्या राज्यात पत्रकारांवर अशी वेळ येत असेल आणि पत्रकार दडपणात, दहशतीत जगत असतील तर हे आपले मोठे अपयश आहे. एखाद्यावर पूर्ववैमनस्यातून खंडणीचा गुन्हा दाखल करणे आणि त्याचे भवितव्य धोक्यात आणणे हाच गंभीर गुन्हा आहे. राजा वराट जर दोषी असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी मात्र यात जर तथ्य आढळले नाही तर संबंधित सर्वांचे काय करायचे? न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारे राजा वराट यापुढे आणखी धाडसाने कार्यरत राहतील याबाबत आमच्या मनात मुळीच शंका नाही. पण प्रामाणिक पत्रकारितेची अशी गळचेपी होऊ नये.

निखिल वागळेसारख्या बड्या पत्रकारांनी दहा नोकर्‍या बदलल्या किंवा त्यांना काढून टाकले तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. त्यांच्यापासून लाभ मिळणारे सर्वजण त्यांच्या पाठिशी उभे राहतात. मात्र दुसरीकडे राजा वराट यांच्यासारखे ग्रामीण वार्ताहर आपली आयुष्यभराची तपश्चर्या पणाला लावून अन्याय-असत्याविरूद्ध लढत असतात तेव्हा त्यांच्यावर अशी दुर्दैवी वेळ येते. हाच आपल्या पत्रकारितेतील फरक आहे. हेच वर्ण आहेत, याच जाती आहेत... ज्याच्याकडून काही लाभ होतील त्याच्यासाठीच रस्त्यावर उतरणे हा काहींचा धंदा झालाय. त्यात राजा वराट यांच्यासारखे कितीतरी पत्रकार हकनाक भरडले जात असतील. 

खाकी आणि खादी हीच देशाची ओळख झालीय. त्यामुळे सूर्य दिसत असूनही सर्वत्र काळोखच मातलाय. हे ग्रहण वेळीच सुटायला हवे. त्यासाठी सत्प्रवृत्तीच्या लोकांनी संघटित होणे, एकत्र येऊन चुकीच्या प्रवृत्तीविरूद्ध लढणे गरजेचे आहे. राजा वराट, तुम्ही एकटे नाही. आपापल्या कुवतीनुसार त्या त्या परिसरात नेटाने कार्यरत असलेले, समाजापुढे सत्य मांडण्याचे काम धाडसाने करणारे आमच्यासारखे असंख्य पत्रकार आपल्यासोबत आहेत. 

सत्य कधीही पराभूत होत नाही, इतके सगळ्यांनीच लक्षात ठेवावे म्हणजे झाले.

- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Wednesday, August 16, 2017

व्यर्थ न हो बलिदान!


  देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे पूर्ण झाली. सत्तर वर्षांचा कालखंड हा एका देशासाठी, जगासाठी छोटा असू शकतो. मात्र एका व्यक्तिचा विचार करता तो त्याचे आयुष्य व्यापून टाकणारा कालखंड असतो. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी जन्मलेली एक पिढी आता वृद्धावस्थेत आहे. या पिढीने जी स्थित्यंतरे बघितली ती महत्त्वाची आहेत. गेल्या दशकापासून थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीमुळे आपण महासत्तेची स्वप्ने बघितली. धड चांगला माणूस होण्याचीही आपली योग्यता नसल्याने महासत्ता हे दिवास्वप्नच ठरते आहे. स्वार्थाच्या मागे लागल्याने आपल्याला 'स्वअर्थ' काही लक्षात येत नाही. 

  उत्तरप्रदेशमधील गोरखपूरात प्राणवायुच्या अभावामुळे साठहून अधिक बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा आकडा आणखी वाढल्याचे कळते. हा प्रकार कशामुळे झाला, कुणामुळे झाला, त्यांच्यावर काय कारवाई करणार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चूक की बरोबर या व अशा विषयावर जोरदार रणकंदन सुरू आहे. हे करतानाच आपली गोकुळाष्टमीची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. लाखोंच्या दहीहंड्यांचे थर राजकारण्यांनी लावलेत. बायका तालासुरात नाचवल्या जात आहेत. मद्यांचे पाट वाहत आहेत. साठहून अधिक बालके मरूनही आम्हाला त्याचे काहीच वैषम्य वाटत नाही. या आपत्तीचे सूतक देशबांधव म्हणून आम्ही पाळत नाही. उलट नवरात्रोत्सव आणखी जोरात साजरा करण्यासाठी काय करता येईल याचे चर्वीतचर्वण मेजवान्या झोडत करतो. या सत्तर वर्षात इतका निर्ढावलेपणा आमच्यात भिनलाय. जवळच आलेल्या गणेशोत्सवासाठी रस्त्यांची तोडफोड करण्यात आलीय. मांडव टाकण्यासाठी, देखावे उभे करण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होतोय. लोकोपयोगी योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काजू-बदाम खातानाचे फोटो टाकणारे, वातानुकुलीत गाडीतून संघर्षयात्रा केली म्हणून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडणारे हेच 'उत्सवी' लोक आहेत. नवरात्र मंडळ आणि गणेश मंडळात ते पाण्यासारखा पैसा खर्च करतील आणि आपली जबाबदारी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षावर ढकलतील. यांना सारे काही आयते हवे. हा दुटप्पीपणा दाखवून दिल्यास हे आयतोबा काही मंडळांनी केलेली विधायक कामे छाती फुगवून दाखवितात किंवा अशी टीका मुस्लिम, ख्रिश्चन अथवा अन्य धर्मियांवर व त्यांच्या उत्सव, चालीरीतींवर, परंपरांवर करून दाखवा म्हणत उडवून लावतात. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश आणि आजचे त्याचे विकृत स्वरूप पाहता हा उत्सव बंद करावा असे वाटणारा एक मोठा वर्ग निर्माण होतोय. राजकारण्यांची सोय आणि अब्जावधींचे अर्थकारण हा त्याचा पाया झालाय. पुण्यासारख्या महानगरात दस्तुरखुद्द लोकमान्य टिळकांच्या घरातील महापौर असतानाही पालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेतून लोकमान्य टिळकांचा फोटो वगळण्यात आला आहे. जात्यांधांना भीक घालत आपण आणखी किती खाली घसरणार?

   हिंदू धर्म हा सुधारणावादी आहे. त्यात सातत्याने परिवर्तन झाल्यानेच त्याचे डबके झाले नाही हे मान्य करण्यास आम्ही तयार नाही. स्वामी विवेकानंद यांनी मनुष्यत्त्वाच्या दिव्यत्त्वाच्या प्रगटीकरणाची अपेक्षा व्यक्त केली होती. हे दिव्यत्त्व तर दिसत नाहीच पण गुन्हेगारी, बेरोजगारी, भ्रष्टाचार या दिव्यातून बाहेर कसे पडावे याची सामान्य माणसाला वंचना आहे. अशा परिस्थितीत आपण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. 

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधतील. काही लोकांना प्रोत्साहन देतील. त्यांच्या कामाची कदर करून गौरवतील. दरवर्षी यापेक्षा वेगळे काय होते? काय व्हावे? सामान्य माणसाला या सर्वांशी काहीच देणे-घेणे नसते. सत्तेतील नेते मात्र आपल्याच मस्तीत मश्गुल आहेत. विरोधक हतबल आहेत. 

  विनोद तावडे नावाचे एक गृहस्थ सध्या महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आहेत. मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली. सभागृहात सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून बोलताना ते म्हणाले, "या विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव देऊ नकात. ते दिले तर ते जातीयवादी ठरेल.'' विद्यापीठाला कुणाचे नाव द्यावे किंवा देऊ नये, याबाबत त्यांची मते असू शकतात. मात्र राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव देणे जातीयवादी कसे ठरते हे आम्हास कळले नाही. 'मन की बात' करणाऱ्या मोदींना कदाचित याचे काही वाटणारही नाही, कदाचित असे विषय त्यांच्यापर्यंत जाणारही नाहीत. मात्र यातून या लोकांची द्वेषमूलक भावना दिसून येते.

  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणक्षेत्रात क्रांती घडली. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. विविध क्षेत्रात माणसाने प्रगती केली. जग एका क्लिकवर आले. मात्र हे सर्व होतानाच आमच्यातील माणूस म्हणून मुळातच असलेले चांगुलपण नष्ट होत गेले. पर्यावरण आणि शेतीपासून आम्ही कोसो मैल दूर गेलो. भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा या विषयीचा अभिमान केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि बढत्या मिळविण्यासाठी दाखविला जातोय. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षालाही सातत्याने पोलीस संरक्षणात फिरावे लागते. स्त्रीवादाच्या नावावर स्वैराचार वाढीस लागलाय. कायद्याचा गैरवापर करत कुणालाही, कधीही सहजपणे धमकावले जात आहे. एकेरी रस्ता ओलांडतानाही जीव मुठीत धरून दोन्ही बाजूला बघत रस्ता ओलांडावा लागतो. हेल्मेटचा वापर करणे ही आम्हाला सक्ती वाटते. नो एन्ट्रीत घुसणे, सिग्नल मोडणे, चालत्या गाडीतून किंवा गाडीवरून पिचकाऱ्या मारणे याचे आम्हास काहीच वाटत नाही. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच आम्ही अभिमानाने मिरवतो आणि हेच आजच्या लोकशाहीचे वास्तव आहे. 
  
या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबतचा एक किस्सा आवर्जुन सांगावासा वाटतो. बापुजी साबरमतीच्या आश्रमात सूतकताई करत बसले होते. त्यावेळी एक गृहस्थ त्यांच्याकडे आले. ते बापुजींना म्हणाले, "मला देशाची सेवा करायची आहे. त्यासाठी काहीतरी मार्ग दाखवा. मला देशसेवेची एखादी जबाबदारी द्या." 

  बापुजींचे काम सुरू असल्याने त्यांनी त्यांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. हे गृहस्थ धनदांडगे असल्याने वाट पाहणे त्यांच्या रक्तात नव्हते. तरीही बापुजींच्या सुचनेचा अनादर नको म्हणून चुळबुळ करत ते बसून राहिले. थोड्यावेळाने सूतकताई झाल्यावर बापुजींनी त्यांना विचारले, "बोला काय म्हणताय?" त्यावर ते गृहस्थ म्हणाले, " बापुजी आयुष्यभर खूप पैसा कमावला. चारही मुले मार्गी लागली. आता देशासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. काय करू ते सांगा?"

  बापुजी म्हणाले, "भल्या गृहस्था, मी सूतकताई करताना माझे लक्ष तुझ्याकडेच होते. तू इतका वेळ काहीही काम न करता बसून राहिलास, चार वेळा या माठातले पाणी घेतले. अर्धा ग्लास पाणी प्यायलास आणि अर्धा ग्लास पाणी टाकून दिले. यापुढे एक कर, जेवढी तहान असेल तेवढेच पाणी घे. इतका नियम पाळला तरी तुझ्या हातून देशाची मोठी सेवा घडेल."

  आपणही देशभक्तीच्या वल्गना करण्यापेक्षा अशा छोट्याछोट्या गोष्टीतून आपली देशभक्ती दाखवून द्यायला हवी. इतिहासाची माहिती नाही, वर्तमानाचे ज्ञान नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही अशी अनेकांची अवस्था झाली. त्यातूनच कमालीचे नैराश्य वाढलेय. तरूण हतबल होत चाललेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन हे थांबवायला हवे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेय ते व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल तर आपल्याला कृतीशिलतेची गरज आहे.
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

Tuesday, August 1, 2017

कवितेसाठी जगलो तेव्हा...!



‘कवितेसाठी जगलो तेव्हा कवितेनेही मला जगवले’ अशी कृतार्थतेची भावना जपणारे आणि जगणारे कवी म्हणजे रमेश गोविंद वैद्य! कवी आणि कवितांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या वैद्यांनी अनेक विधायक स्वप्नं पाहिली आणि ती पूर्णत्वासही नेली. खरंतर स्वप्नं पाहणं, स्मृतींना उजाळा देणं हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण असतं. म्हातारे भूतकाळ आठवत बसतात तर तरणेताठे भविष्याचे स्वप्नरंजन करतात. रमेश गोविंदांचा जन्म 1942 चा असला तरी ते ‘तरणे बॉन्ड’ कवी आहेत. त्यांची कविता समाजासाठी दिशादर्शक आणि तितकीच रसरशीत आहे. ती जितकी हळवी, प्रेमळ आहे तितकीच अन्याय-अत्याचाराविरूद्ध, विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांविरूद्ध तुटूनही पडते. त्यांनी कवितेच्या माध्यमातून जे आसूड ओढलेत त्याचे वळ गलथान व्यवस्थेच्या पाठीवर अजूनही दिसून येतात. 

वैयक्तिक सुखांचा त्याग करून, प्रापंचिक बंधनात न अडकता ते गेली कित्येक दशकं अखंडपणे काव्यसाधनाच करीत आहेत. स्वतः कविता करून आणि त्या रसिकांपर्यंत पोहोचवून ते थांबले नाहीत तर त्यांनी इतर कविंनाही हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यातला सगळ्यात मोठा भाग म्हणजे ‘काव्यसप्ताह.’ ग्रामीण भागात जसे अखंड हरिनाम सप्ताह होतात तसा त्यांनी काव्यसप्ताह सुरू केला आणि त्यात कवितेचा नंदादीप तेवता ठेवला. त्यात कविसंमेलनं, एका प्रतिभावंताची मुलाखत, काव्यक्षेत्रात सक्रिय असणार्‍याला ‘शांता-गोविंद’ पुरस्कार, काही कवींचे त्यांच्या रचनांवर आधारित स्वतंत्र कार्यक्रम असं भरगच्च वैचारिक खाद्य काव्यप्रेमींना मिळतं. दरवर्षी 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम पुण्यात पार पडतो. एकेवर्षी त्यांनी मुंबईतही काव्यसप्ताह घेतला आणि दिल्लीत निदान एकतरी ‘काव्यसप्ताह’ आयोजित करून कवितेच्या प्रेमध्वजाखाली सर्वांना एकत्र आणण्याचा त्यांचा मानस आहे.

रमेश गोविंद वैद्य यांच्या लेखणीत आणि वाणीत समोरच्याचं मन जिंकण्याचं सामर्थ्य आहे. व्यक्तिशः मी तर ते समोर असताना संमोहित होतो. मागच्या पंधरा वर्षात या माणसाचे अनेक रंग मी जवळून बघितलेत. स्वभावातला रोखठोकपणा, चुकीच्या वृत्तीविषयी चीड, व्यक्तिकेंद्रित मूर्तिपूजेला बळी न पडणं, अकारण कुणाचं स्तोम न माजवणं आणि गुणवंतांना न्याय मिळावा यासाठी धडपडणं यामुळं प्रस्थापित यंत्रणेकडून अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी ‘नो एन्ट्री’चा अलिखित फलक असतो. ‘उद्याचा कालिदास अनवाणी पायानं जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही राजा भोजाची जाते’ या तत्त्वज्ञानावर त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळं क्षमता असूनही त्यांच्या वाट्याला जी अवहेलना, उपेक्षा आली त्याचं त्यांना काहीच सोयरसुतक नसतं. 

रमेश गोविंद कोणत्याही राजकीय विचारधारेला बांधील नाहीत. जे चांगलं ते स्वीकारायचं, वाईट ते अव्हेरायचं अशी त्यांची धारणा आहे. तरीही त्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या ऐन भरापासून म्हणजे 1957-58 पासून आजतागायत भारतातील राजकीय घडामोडींविषयी सातत्यानं चिंतन सुरूच असतं. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यावर पडलंय. त्यांच्या ‘बापूजींचे राष्ट्र’ या जळजळीत कवितेची दोन चरणे वानगीदाखल पाहूया - 

अन्नपाण्यातून येथे विष जाते चारले
न्याय आणि ज्ञान यांना उघड जाते मारले
कोटी कोटी बधीर मेंदू कोणी कैसे भारले?
बापूजींचे राष्ट्र मजला कधीच वाटे वारले

फुलवण्याचे सत्य ज्यांनी तेच थापा मारती
बेदिलीचे बीज जहरी हेच भडवे पेरती
रोज लागे रांड कोरी, फुगत जाती बंगले
बापूजींचे राष्ट्र मजला कधीच वाटे वारले...

पर्वतीवरील सूर्याच्या सोनेरी किरणांच्या साक्षीने मी वैद्यांच्या अनेक कविता अनेकदा त्यांच्याकडून ऐकल्यात. लोककवी मनमोहन नातू, रॉय किणीकर, माधव ज्युलियन, उमर खय्याम, कवी अनिल, कवी यशवंत, आचार्य अत्रे, पु. भा. भावे, ग. वा. बेहरे, शिरीष पै, शांता शेळके, सुरेश भट यांच्याविषयीचे अनेक किस्से ते इतक्या रंगतदारपणे सांगतात की बस्स! प्रत्येक गोष्टीत सातत्य, सराव आणि सखोल विचार महत्त्वाचा याची जाणीव ते नव्या पिढीला करून देतात. याबाबत त्यांच्या कार्यक्रमाची एक आठवण मुद्दाम सांगणे अगत्याचे आहे.

2005 सालच्या ‘काव्यसप्ताहात’ 30 डिसेंबर रोजी त्यांचा किणीकर आणि मनमोहन यांच्या कवितांवर आधारित ‘दोन मनोरे गगनापार’ हा कार्यक्रम होणार होता. या सप्ताहातील मैफली म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंगच! पुण्यातील भारत स्काऊट ग्राऊंड संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम रूळलाय. त्यादिवशी खजिना विहिर चौकातून ‘चपराक’कडं जाताना साडेचारच्या दरम्यान वैद्य या संस्थेच्या सभागृहात जाताना दिसले. कार्यक्रम सात वाजता असताना हे इतक्या लवकर इकडं कसे असं वाटल्यानं मी माझाही मोर्चा तिकडे वळवला. गाडी लावून दहा-पंधरा मिनिटात आत पोहोचलो तर सभागृहातून कवितावाचनाचा आवाज येत होता. मोठ्या कुतूहलानं मी हळूच दरवाजा ढकलून आत गेलो तर व्यासपीठावरील माईकचा ताबा घेऊन ते कार्यक्रम सादर करीत होते. पूर्ण रिकाम्या सभागृहात मी एकटाच समोरच्या खुर्चिवर जाऊन बसलो आणि तो  संपूर्ण कार्यक्रम मी एकट्यानंच ऐकला. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी सांगितलं, ‘हा कार्यक्रमाचा सराव होता...’ त्यानंतर अर्ध्याच तासानं मी तीच मैफल पुन्हा काव्यरसिकांनी तुडुंब भरलेल्या त्याच सभागृहात ऐकली. रसिकांचा टाळ्यांचा कडकटात होत होता आणि त्यांच्या साहित्यसाधनेचा सराव माझ्या अंतःकरणाचा वेध घेत होता.

रामाच्या मागे उगा न गेली सीता
हे प्रेमच माझे कुराण आणि गीता

अशा ओळी लिहिणार्‍या वैद्यांनी कवितेवरच प्रेम केलं आणि कवितेसोबतच संसार केला. ‘माणूस माणूस जावा जोडत, इतकेच मला कवितेने शिकवले’ असे ते सांगतात. स्वर्गातल्या देवांच्या अमृतपानापेक्षा त्यांना भूतलावरची चटणी-भाकरी अधिक प्यारी आहे. म्हणूनच हा माणूस जगण्यावर प्रेम करतो आणि सदैव आनंदी असतो. त्यातूनच ते माणुसकीचा संदेश जगाला देतात. 

मंदीर-मस्जिद हवी कशाला?
आधी चांगला माणूस घडवा
तीच खरी रे ईद मुबारक
तोच खरा रे गुढीपाडवा

अशा प्रगल्भ आणि वास्तवादी ओळी त्यांचे सामर्थ्य सिद्ध करतात. त्यांची मुंबईच्या जीवनाचे दर्शन घडविणारी ‘बॉम्बे’ ही कविताही आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’नं गौरवानं प्रकाशित केली होती.

आभाळाच्या कडेस मर्डर
लोकल लोकल भुंकत जाई
या शहराला रूपयाखेरीज
दुसरी भाषा समजत नाही

अशी सुरूवात असलेल्या या कवितेत शेवटी ते म्हणतात,

मांसाच्या लोभाने जमले
इथे लांडगे फसफसणारे
आणि रावणासमोर उघडी
रूपयाखातर सीतामाई
पहा तिच्या दुःखाची दिंडी
दाद ईश्‍वरा मागत जाई
या शहराला...

वैद्यांचे ‘जिना बिलोरी’, ‘सळसळे सोन्याचा पिंपळ’, ‘निळाभोर मी सगळा’ असे उत्तमोत्तम कवितासंग्रह प्रकाशित आहेत. चिंचवडच्या मोरया गोसावी यांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. मुंबईच्या जीवनावरच बेतलेली ‘टर्मिनस व्हिक्टोरिया’ ही अद्वितीय पे्रमकथा असलेली लघुकादंबरी ‘चपराक’नं प्रकाशित केलीय. असं सारं असूनही या कलावंताच्या आयुष्यात समाजाकडून मात्र घोर उपेक्षाच वाट्याला आली. त्यातूनच ते लिहितात -

तुम्हास अमृत देण्यासाठी
विषच केवळ प्यालो 
मी मृत्युला भ्यालो नाही
मी जगण्याला भ्यालो.

माणसाचा अंतरात्मा हलवण्याचे सामर्थ्य ज्या कवितेत असते ती खरी श्रेष्ठ कविता, असा त्यांचा सिद्धांत आहे. कवितामय जीवन जगणार्‍या या प्रतिभासंपन्न कविच्या कविताविषय चिंतनाचा हा आविष्कार पहा -

तान्ह्या बाळाच्या गालावरची 
तीट म्हणजे कविता
पांडुरंगाच्या चरणतळीची
वीट म्हणजे कविता
कविता म्हणजे
फूलपाकळ्यांवरील दहिंवर
कविता म्हणजे माणुसकीचा गहिंवर... 
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092