Monday, September 4, 2017

'जुलूस' आणि महाराष्ट्रभूषण!


अर्चना डावरे या परभणीच्या लेखिका. त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘‘दादा, मला बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायचंय.’’ त्यांना म्हणालो, ‘‘या, भेटूया.’’

त्या काल पुण्यात आल्या. सोबत त्यांचे पती श्री. गिरीशही होते. आम्ही सर्वजण त्यांच्या घरी गेलो. सगळ्यांची ओळख करून दिली. छान गप्पा झाल्या. 

बाबासाहेेब नुकतेच दिल्लीला जाऊन आले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. साहजिकच त्या विषयावर चर्चा सुरू झाली. 
ते म्हणाले, ‘‘पंतप्रधानांकडं माझं काहीच काम नव्हतं. मीच त्यांचा भेटीसाठी वेळ घेतला. आम्हाला ‘जाणता राजा’चा प्रयोग दिल्लीत करायचाय. त्यासाठी त्यांनी उपस्थित रहावं अशी विनंती करायची होती. ते त्यांच्या व्यग्रतेतून पाच मिनिटांसाठी आले तरी आनंद होता. भेट झाली. त्यांना निमंत्रण दिलं. त्याबरोबर ते म्हणाले, ‘‘जाणता राजा’चा पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 ला झाला होता. त्यासाठी मी अहमदाबादहून पुण्याला आलो होतो. आता तर दिल्लीतल्या दिल्लीत यायचं आहे. नक्की येईन.’’ त्यांनी अस्खलित मराठीत असं बोलल्यावर मी अवाकच झालो. आता 6 फेब्रुवारी 2018 ला दिल्लीत ‘जाणता राजा’चा प्रयोग होतोय.’’

हे सारं ऐकून आम्ही स्तंभित झालो. अर्चनाताई लेखिका. त्यात निवेदिका. त्या गप्प थोडेच बसतील? त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. आम्ही शांत! अर्चनाताई म्हणाल्या, ‘‘बाबा, आम्हाला शिवाजीराजे कळले ते तुमच्यामुळं. इतिहास कळला तोही तुमच्यामुळं. आमचं बालपण त्यामुळं संपन्न झालं; पण तुमच्यात इतिहासाची आवड कशी निर्माण झाली?’’

ते हसले. म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांमुळं. त्यांनी आम्हाला ही समज दिली. अभ्यासाची दृष्टी दिली.’’

नंतर त्यांनी त्या आठवणी जागवल्या. ते बोलत होते. आम्ही नेहमीप्रमाणं मंत्रमुग्ध.

‘‘आता वयाच्या 96 व्या वर्षी काय बोलणार? पण नव्या पिढीत अभ्यासाची दृष्टी विकसित झाली पाहिजे. आमचा ऐतिहासिक चित्रांचा प्रकल्प सुरू आहे. त्यातली 106 चित्रं तयार झालीत. आम्ही आता चित्रमय शिवकाल साकारत आहोत. त्यातून तरी नवी पिढी इतिहासाकडं आकर्षित होईल.’’

सोबतचे सारेजण ऐकत होते. अर्चनाताई अधूनमधून काही प्रश्न विचारून त्यांना बोलतं करत होत्या. त्यांनी खास परभणीहून आणलेली शाल त्यांच्या अंगावर चढवली. ते खुश झाले. शाल पाहत म्हणाले, ‘‘फार सुंदर आहे...’’ नंतर अर्चनाताईंनी त्यांचा ‘जुलूस’ हा कथासंग्रह त्यांना भेट दिला. मागच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त आम्हीच तो प्रकाशित केलाय. मी त्यांना म्हणालो, ‘‘आणखी एक प्रत घ्या आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घ्या.’’  ‘जुलूस’ची दुसरी प्रत त्यांच्या हातात दिली. त्यावर त्यांनी मोडी लिपित सही केली. सगळे खूश!

थोडावेळ चौफेर गप्पा झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. सगळेजण भारावलेल्या अवस्थेत. या वयातही त्यांचा उत्साह, इतिहासाचं प्रेम, शिवमय जगणं, नवोदितांची आस्थेनं दखल आणि महत्त्वाचं म्हणजे तल्लख स्मरणशक्ती... सगळंच अचंबित करणारं!

आम्ही बाहेर पडलो. त्यांच्या घराजवळील एक छोटंसं हॉटेल. तिथं आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमच्यासोबत नगरचे लेखक सदानंद भणगे हेही होते. त्यांचीही पुस्तकं ‘चपराक’नंच केलेली. बाबासाहेबांना भेटायचं म्हणून त्यांनाही अतीव आनंद झालेला. शिवाय अर्चनाताईंच्या ‘जुलूस’ची प्रस्तावनाही आम्ही त्यांच्याकडून आग्रहानं लिहून घेतलेली.
आमच्या गप्पा सुरू असतानाच मला बाबासाहेबांचा फोन आला. जेमतेम 15 मिनिटांपूर्वीच त्यांच्या घरातून बाहेर पडलो होतो. त्यांनी विचारलं, ‘‘कुठे आहात? जवळपास असाल तर परत पाच मिनिटांसाठी येऊ शकाल का?’’

त्यांना म्हणालो, ‘‘आम्ही सगळेच तुमच्या घराबाहेर आहोत. आलोच.’’

पुन्हा आमचा ताफा त्यांच्या घराकडं वळला. सगळ्यांच्याच मनात विचारचक्र सुरू झालं. त्यांनी परत का बोलावलं असावं? 

आत जाताच त्यांनी अर्चनाताईंना जवळ बोलावलं. ते म्हणाले, ‘‘मी आता ‘जुलूस’ची प्रस्तावना आणि तुमची ‘जुलूस’ ही शीर्षककथा वाचली. त्यावर मला काही बोलायचं आहे...’’

अर्चनाताई भांबावून गेलेल्या.

बाबासाहेब म्हणाले, ‘‘ही कथा सुंदर झालीय. यातील हिंदी आणि उर्दू शब्द तुम्हाला कसे सुचले?’’

ताई म्हणाल्या, ‘‘माझे वडील हैद्राबाद मुक्ती संग्रामात होते. आमच्याकडे मराठी बोलतानाही हे शब्द सहजपणे येतात. त्यामुळे वापरले.’’

मग त्यांनी एकदोन उर्दूमिश्रीत हिंदीतली वाक्यं सांगितली. त्याचा अर्थ विचारला. तो सांगितल्यावर म्हणाले, ‘‘मागच्या तीन महिन्यापासून मला जी चिंता होती त्यातून मी मुक्त होईन. तुम्ही एक काम कराल का? ते तुमच्याकडून 99 टक्के होईल. ‘जाणता राजा’चे आजवर 1200 प्रयोग झालेत. त्यात हिंदीत 200 प्रयोग झालेत. तुम्ही सोप्या भाषेत आणि भाषेचा लहेजा राखत याचे रूपांतर करा.’’

सगळे अवाक! ताई तर भारावूनच गेल्या. केवळ त्यांची एक भेट मिळावी म्हणून त्यांचा अट्टहास चाललेला. इथं तर त्यांनी इतकी मोठी जबाबदारी सोपवली... लगेच बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ची एक प्रत त्यांना भेट दिली. त्यातील चारपाच पानांचा अनुवाद करायला सांगितला. अर्चनाताई रात्री परभणीला परतणार असल्यानं तो माझ्यासोबत द्यायला सांगितला. तो कसा वाटतोय यावर पुढची दिशा ठरणार होती. 

‘‘मराठवाड्यात इतके प्रकाशक असताना पुण्यातून पुस्तक प्रकाशित करायची काय गरज?’’ असा प्रश्न त्यांना काहींनी विचारला होता. त्याच पुस्तकानं आज अर्चनाताईंचे आदर्श असलेल्या बाबासाहेबांच्या हृदयात घर केलं होतं. त्यांच्याकडून लेखनाला, भाषेला, आशयाला दाद मिळाली होती. दर्जेदार लेखनाचं आणि ते संबधितांपर्यंत पोहोचवल्याचं असं समाधान असतं...

अर्चनाताईंनी त्यांचं परभणीला परत जाण्याच्या प्रवासाचं आरक्षण रद्द केलं. त्यातील काही भागाचा समर्थ अनुवाद केला. आज (सोमवार) तो घेऊन आम्ही पुन्हा त्यांच्याकडं गेलो. तो त्यांनी वाचला. सगळ्यांच्या मनात धडकी भरली होती. ते मात्र खुश झाले. म्हणाले, ‘‘मी आता हे कावळ्याच्या दृष्टिनं वाचलं. थोड्यावेळानं आस्वादक रसिकाच्या भूमिकेतून वाचेल. हे काम तुमच्या हातून घडेल. त्यासाठी तुम्हाला परत यावं लागेल. काही शब्दांवर आपल्याला चर्चा करावी लागेल...’’ 

लगेच त्यांनी ‘जाणता राजा’च्या हिंदी प्रयोगाची सिडी मागवली. ती आज संध्याकाळी आम्ही सगळेजण ऐकणार आहोत. त्यांचं म्हणणं असं की, अर्चनाताईंची भाषा रसाळ आहे. त्यात मराठवाडी गोडवा आहे. त्या त्याचा हिंदी अनुवाद आणखी ताकदीनं करू शकतील...

एका लेखिकेची केवळ एक कथा वाचून त्यांनी हा केवढा मोठा विश्वास दर्शविला! अर्चनाताई पूर्ण सामर्थ्यासह हा प्रकल्प यशस्वी करतील याविषयी माझ्या मनात अजिबात किंतु नाही.

लेखकानं लिहित राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमचं साहित्यच यश, कीर्ती, समाधान, पैसा सारं काही मिळवून देईल. त्यासाठी अनेकदा वाट पहावी लागते. संधीनं दरवाजा ठोठावला की तो तुम्ही उघडला पाहिजे. 

अनेकजण नैराश्यानं ग्रासतात. ‘लेखनानं मला काय दिलं?’ म्हणून चिंताक्रांत होतात. कुणाचं नशीब कसं उघडेल हे सांगता येत नाही! पण आपलं लेखन हा आपल्या हौसेचा नाही तर जीवननिष्ठेचा भाग झाला पाहिजे. ते झालं की पुढचं सगळं सोपं होतं. 

तूर्तास मात्र आम्ही ‘जाणता राजा’च्या मराठवाडी शैलीतील उर्दूमिश्रीत हिंदी आवृत्तीची वाट पाहत आहोत.
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

16 comments:

  1. अभिनंदन हार्दिक अभिनंदन अर्चनाताई आणि घनश्यामसर तुमचे । हे सगळे एका लेखक लेखिकेच्या स्वप्नातलं परंतू तुमच्या सार्थ प्रयत्नांच यश आहे । ह्याच्या सारखा मोठा पुरस्कार तो काय असावा । पुढील कार्यास माझ्या शुभेच्छ्या । ही तर नक्कीच श्रींची ईच्छा आहे ।।

    ReplyDelete
  2. अभिनंदन अर्चनाताई !खुप खुप शुभेछा !! आगे बढो .

    ReplyDelete
  3. आदरणीय पाटील सर, खूपच सुंदर प्रसंग लिखित केला. अर्चना मॅडम आपल्या पुढील कार्यास व वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...... खूप छान लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद सर.

      Delete
  4. अहाहा!
    दुग्धशर्करा योग!!!!!
    मोठी माणसे अशी मनाने मोठीच असतात. आणि म्हणूनच ती ''मोठी" असतात... कोत्या मनाची आणि जात्यांध माणसे कोतीच राहतात. अर्चनाताई आणि पाटील सर, आपले मनःपुर्वक अभिनंदन!!!!
    आणि अनुवादास हार्दिक शुभेच्छा!!!!!!

    ReplyDelete
  5. व्वा..बहोत अच्छे..। सर्वात मोठा पुरस्कार...
    अर्चनाताई, पाटील सर मनापासून अभिनंदन!!

    ReplyDelete
  6. अर्चना ताई, घनश्याम जी
    अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  7. संधीच सोने निश्चितच होईल. धन्यवाद .

    ReplyDelete
  8. संधीच सोने निश्चितच होईल. धन्यवाद .

    ReplyDelete