छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रांतीकारी योद्धे! त्यांच्या केवळ स्मरणाने अंगात वीरश्री संचारते. युद्धकलेत त्यांचा आदर्श जागतिक पातळीवर गौरवाने घेतला जातो. सध्या आपल्याकडे महाराजांना जातीपातीत वाटण्याचे कारस्थान वेगात सुरू असताना त्यांच्या पराक्रमाची परंपरा खंडित होतेय की काय, असे चित्र आहे. महाराज बघायचे तर त्यांची तलवार बघा! असा पराक्रमी राजा पुन्हा होणे नाही!! त्यांच्या गनिमीकाव्याचा अभ्यास जगभर सुरू असताना आपण मात्र त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस संकुचित करत आहोत. आपल्या स्वार्थापोटी आपण इतिहासाचा किती निर्दयीपणे बळी देतोय याचीही जाणीव दुर्दैवाने आपल्याला नाही. अशा भीषण वातावरणात एक माणूस मात्र अव्याहतपणे आयुष्यभर केवळ शिवचरित्रावर काम करतोय. त्यांचा ध्यास, श्वास केवळ आणि केवळ महाराज आहेत. अतिशय त्यागी आणि समर्पित भावनेने त्यांनी शिवचरित्रासाठी स्वतःला वाहून घेतल्याने ते शिवमय झाले आहेत. राजांचा धगधगता इतिहास प्रभावीपणे मांडणार्या आणि नव्या पिढीत ऊर्जेचे स्फुल्लिंग चेतवणार्या या एकमेवाद्वितीय प्रेरणास्त्रोताचे नाव म्हणजे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे! या आठवड्यात म्हणजे नागपंचमीला ते वयाच्या 96 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी ‘चपराक’च्या संपूर्ण टीमसह बाबासाहेबांची भेट घेतली. आदल्या दिवशी रात्री साडेबाराला ते दिल्लीहून आले होते. प्रवासाच्या थकव्याने त्यांना विश्रांतीची गरज आहे असे आम्हास वाटले. मात्र त्यांचा उत्साह पाहून आम्ही अचंबित झालो. दरवेळी ते महाराजांच्या प्रत्येक मोहिमेची, त्यांच्या मोठेपणाची इतक्या तपशीलवार माहिती देतात की कुणीही थक्क होऊन जाईल. त्यांची स्मरणशक्ती तर अफाट तल्लख आहे. सनावळीसह ते जेव्हा इतिहासाचे वर्णन करतात तेव्हा आपण शिवकाळात कधी गेलोय हे आपल्यालाही कळत नाही. बाबासाहेबांनी हजारो व्याख्यानं दिली. ‘जाणता राजा’सारखं महानाट्य निर्माण करून त्याचे प्रयोग जगभर केले. शिवसृष्टी साकारली. विपुल लेखन केलं. इतकं सगळं करूनही अहंकाराचा वारा त्यांच्या जवळपासही दिसत नाही. या सर्वाचे श्रेय ते महाराजांच्या कर्तबगारीला देतात. बाबांच्याच शब्दात सांगायचे तर ते म्हणतात, ‘‘शिवाजीमहाराजांसारख्या थोर पुरूषाचे मी गुणगान करतो म्हणून तुम्ही येता. मी जर ‘क्रूड ऑईलचे उपयोग’ या विषयावर बोललो असतो तर तुम्ही इतक्या प्रचंड संख्येनं आला असता का?’’
तर परवाच्या भेटीची गोष्ट सांगत होतो. वयाच्या 96 व्या वर्षात पदार्पण करत असताना एखादा माणूस काय करू शकतो? इतरांचे माहीत नाही पण बाबासाहेब अजूनही शिवकालच साकारत आहेत. सध्या त्यांचा सुरू असलेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे, ‘चित्रमय शिवकाल.’ काही कलावंतांकडून त्यांनी राजमाता जिजाऊसाहेबांपासून सर्व शिवकालीन व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या फोटोवरून मोठ्या आकारात चित्रं करून घेतली आहेत. ती चित्रं इतकी जिवंत आहेत की आपल्याशी आता संवाद साधतील असे वाटावे. नव्या पिढीसाठी चित्रांच्या माध्यमातून शिवकाल साकारण्याचे काम ते करत आहेत आणि आम्ही कपाळकरंटे मात्र त्यांचे मोल अजूनही लक्षात घेत नाही. त्यांना मी विचारले, ‘‘बाबासाहेब, कदाचित आमची पिढी तुमच्यासारखं काही भव्यदिव्य करू शकणार नाही. इतकं लेखन करू शकणार नाही. गड, कोट, किल्ले पाहणार नाही. मग आम्ही काय करावे?’’
त्यावर त्यांनी एका शब्दात उत्तर दिले, ‘‘अभ्यास!’’
इतिहासातील सत्कृत्यांच्या व सत्पराक्रमांच्या स्मृती प्रेरणेसाठी कायमच्या जतन करायच्या असतात असा बाबासाहेबांचा आग्रह असतो. महाराजांची युद्धनीती, मुत्सद्दीपण, समय सूचकता, सर्वधर्म आत्मीयता, न्यायनिष्ठुरता, कर्तव्यदक्षता, गोरगरीबांविषयी कळवळ, माणसांची पारख याविषयीच ते बोलत असतात. शून्यातून ब्रह्मांड कसं निर्माण करावं हे सांगणारं जीवन म्हणजे शिवचरित्र याची ओेळख बाबासाहेबांनी मराठी माणसाला करून दिली.
मध्यंतरी राज ठाकरे यांनी त्यांची एक प्रगट मुलाखत घेतली. त्यात त्यांनी विचारले, ‘‘बाबासाहेब, शिवाजीमहाराजांच्या जन्मतिथीवरून कायम वाद होतात. त्यांची जयंती नक्की कधी साजरी करावी?’’
यावर त्यांनी सांगितले, ‘‘रोज जरी महाराजांची जयंती साजरी केली तरी कमी पडेल. त्यानिमित्ताने तुमच्या मनात महाराजांचे स्मरण होईल हे काय थोडे आहे? असे वाद घालत बसण्यापेक्षा महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांचा एखादा तरी गुण, एखादा तरी अंश आपल्यात कसा येईल सासाठी प्रयत्न करा.’’
बाबासाहेबांनी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, साता समुद्रापार अगदी युरोप, अमेरिकेतही हजारो व्याख्यानं दिली. त्यातून मानधनाचे जे पैसे मिळाले ते वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक काम करणार्यांना अर्पण केले. महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्यावर त्यासोबतची रक्कमही त्यांनी वैद्यकीय सेवेसाठी दिली. शिवाजीराजांच्या नावावर ‘धंदा’ आणि ‘राजकारण’ करणार्यांनी डोळे सताड उघडे ठेवून हे पहावे.
मुंबईला एकदा बाबासाहेबांच्या भाषणानंतर पुलंच भाषण होतं. त्यावेळी पुलं म्हणाले, ‘‘या व्याख्यानानंतर माझं भाषण म्हणजे गंगास्नानानंतर नळाखाली स्नान करण्यासारखं आहे.’’
नरहर कुरूंदकरांनी त्यांच्याविषयी लिहिलं आहे, ‘‘आजवर इतिहासाप्रमाणे रंजक चरित्र नव्हते. आता आपल्या सुदैवाने असे चरित्र उपलब्ध आहे. इतिहासाशी अत्यंत प्रामाणिक असणारे आणि रंजक, काव्यमय असणारे शिवचरित्र लिहिण्याचा एक यशस्वी प्रयोग शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांनी केला आहे.’’
‘राजा छत्रपती’ या बाबासाहेबांच्या ग्रंथाविषयी लिहिताना आचार्य अत्रे म्हणतात, ‘‘हे शिवचरित्र सार्या महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचत सुटावं इतकं सुंदर आणि बहारदार झालेलं आहे. हे शिवचरित्र गद्य आहे की काव्य, इतिहास आहे की नाट्य याचा प्रत्येक शब्दागणिक वाचकांना भ्रम पडतो नि वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे की इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे, याचा डोक्यात विलक्षण गोंधळ उडतो.’’
बाबासाहेब एका लेखातून समजून घेणं शक्य नाही. मात्र त्यांच्या सूनबाई डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘शिवशाहिरांचे वाङमयीन ऐश्वर्य’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांचे हे पुस्तक नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्रानं प्रकाशित केलं असून ते प्रत्येकानं आवर्जून वाचलं पाहिजे.
जाताजाता एक किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतो. काही विकृत लोक त्यांच्याविषयी वाटेल त्या अफवा अधूनमधून परसवत असतात. एकदा त्यांच्या निधनाची बातमी कोणीतरी समाजमाध्यमात टाकली. औरंगाबादमध्ये एकानं तर श्रद्धांजलीचा फ्लेक्सही लावला. लोकांनी नेहमीच्या मूर्खपणानं ते सर्वत्र पसरवलं. त्यावेळी बाबासाहेबांचं मुंबईत व्याख्यान सुरू होतं. पत्रकारांच्या व्हाटस ऍपला त्या फ्लेक्सचे फोटो आले. व्याख्यान संपल्यावर एका पत्रकारानं धाडस करून त्यांना हे सांगितलं आणि त्यावर चक्क त्यांची ‘प्रतिक्रिया’ही विचारली.
बाबासाहेब क्षणाचाही विलंब न करता त्या पत्रकारांना म्हणाले, ‘‘असं कसं होऊ शकतं? मी तर पुढच्या दोन वर्षाच्या कार्यक्रमाच्या तारखा लोकांना दिल्यात...’’ याला म्हणतात हजरजबाबीपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन!
बाबासाहेबांचा शंभरावा वाढदिवस राजगडावर उत्साहात साजरा करायचा आहे. आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादानं हा वैखरीचा स्वामी अजूनही जगभर शिवव्याख्यानं देतो आहे. महाराष्ट्राला समृद्ध करण्यात ज्या थोड्याथोडक्या माणसांनी हातभार लावलाय त्यात बाबासाहेब अग्रणी आहेत.
‘राजा शिवछत्रपती’च्या लेखनाविषयी ते म्हणतात, ‘‘शिवचरित्र हे कुणा एका व्यक्तीचे चरित्र नाही. ते चरित्र म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. समाजधर्म आहे. शत्रूशी कसे वागावे आणि स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी मित्राच्या जीवाला जीव कसा द्यावा हे सांगणारे ते एक शास्त्र आहे. तत्त्वज्ञान आहे. विद्वत्ता गाजविण्यासाठी आणि शाली-मशालीचा मान मिळविण्यासाठी ही अक्षरे मी लिहिलेली नाहीत. मी हे शिवचरित्र एका सूत्रान्वये लिहिलेले आहे. ‘शिवाजीराजा... एक प्रेरक शक्ती’ हे ते सूत्र होय...!’’
अशा या महान शिवचरित्रकाराचा सहवास, त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि अतिशय जिव्हाळ्याने त्यांनी दिलेली कौतुकाची थाप ही म्हणूनच माझी सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला आयुष्याची सार्थकता वाटावी असेच त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभावे हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092