पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतून प्रकाशन संस्था चालवताना अनेक गमतीशीर अनुभव येतात. कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य, नाटक अशा सगळ्या प्रकारची पुस्तकं आम्ही ‘चपराक’ तर्फे प्रकाशित केलीत. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ अशी आवई सर्वत्र दिली जात असतानाच आमची सातत्याने येणारी पुस्तकं पाहून अनेकजण आमच्याकडे पुस्तक प्रकाशनाविषयी विचारणा करत असतात. त्यात ‘पुस्तक प्रकाशनाला खर्च किती येतो?’ हा एक प्रश्न अटळ असतो.
ज्यांच्या कधी चार ओळीही वाचल्या नाहीत, जे कधी कुठे भेटलेही नाहीत ते फोन करतात आणि पहिलाच प्रश्न विचारतात, ‘‘आम्हाला पुस्तक काढायचंय... खर्च किती येतो?’’
त्यांना मी सांगतो, ‘‘बाबा रे! अजून मुलगी बघितलीही नाही. तिची आधी गाठ घाल. आम्ही एकमेकांना बघू आणि पुढचे ठरवू! स्थळ आहे इतकंच कळल्यावर थेट बारशाच्या कार्यक्रमाचीच विचारपूस कशाला करतोस?’’ त्यावर ते जरा थांबतात आणि मग संहिता पाठवतात.
सध्या बहुतेक लेखकांना प्रकाशक म्हणजे ‘प्रिंटर’ वाटतो. त्याला द्या पैसे आणि हवे ते पुस्तक घ्या छापून!
हे असे का व्हावे? मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेच्या नावे गळे काढणारे यावर शांत का? अनेक प्रकाशकांचा हा ‘धंदा’ असतो म्हणून ते बोलत नाहीत. मग याची नेमकी सुरूवात कशी झाली? हे लोन इतके का वाढले? त्यामुळे मराठी भाषेचे काही नुकसान झाले की फायदाही झाला? या सगळ्याचा मुळातूनच विचार करणे गरजेचे आहे.
काही प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक त्यांच्या वेळेनुसार आणि हौस म्हणून अधूनमधून ‘काहीबाही’ लिहित असतात. ते पुस्तक स्वरूपात यावे असे त्यांना किंवा त्यांच्या खुशम्हस्कर्या चमच्यांना वाटत असते. पुस्तक आले की सगळीकडे लेखक म्हणून ‘मिरवता’ येते. चार ठिकाणी प्रकाशन सोेहळ्याच्या बातम्या येतात. पुस्तकांची परीक्षणं छापून येतात. संबंधित विभागात बढतीचीही शक्यता असते. गेला बाजार चार-दोन सटरफटर पुरस्कारही मिळतात. मग ही संधी का सोडायची असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी एखादा प्रकाशक गाठला जातो. पाच-पन्नास हजार रूपये देऊन त्याच्याकडून पुस्तक प्रकाशित करून घेतले जाते आणि मग त्यांचे ‘साहित्यिक योगदान’ विविध माध्यमांद्वारे सातत्याने ‘ठसवले’ जाते. त्यासाठी काही प्रकाशकांनी चक्क ‘रेट कार्ड’ छापून घेतलेय आणि प्रकाशन समारंभापासून ते त्याची निर्मिती, जाहिरात याबाबतचे दर त्यात दिलेत.
यापुढे जाऊन काही प्रशासकीय अधिकारी तर विविध सरकारी योजनांना ही पुस्तके लावतात. आपल्या अधिकारांचा वापर करून अनेकांना ती विकतही घ्यायला लावतात. थेट ‘लाच’ स्वीकारण्याऐवजी आपण ‘वाचनसंस्कृतीचा’ कसा प्रसार करतोय हे सांगितले जाते. मग त्यांच्या आवृत्यावर आवृत्या निघतात. काहीवेळा त्यातील निवडक भाग शालेय अभ्यासक्रमातही समाविष्ट केला जातो. आजच्या अभ्यासक्रमातील बराचसा रद्दाड मजकूर बघितल्यावर कुणाचीही त्याची खात्री पटेल. कवी म. भा. चव्हाण म्हणतात,
कोण लेकाची कोणाची देशसेवा पाहतो
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो!
वाचकांच्या हाती त्यातून काय येते? तर मराठी साहित्याविषयी उदासीनता आणि आपल्या साहित्य क्षेत्राविषयीचा राग! त्यामुळे अशा प्रसिद्धीची चटक लागलेल्या लेखकांनी आणि गल्लाभरू प्रकाशकांनी मराठी साहित्याचे मोठे नुकसान केलेय, हे वास्तव मान्य करण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे ‘पुस्तकासाठी खर्च किती येतो?’ असा प्रश्न आला की व्यक्तिशः मला त्यांच्या साहित्यिक दर्जाविषयी शंका येते. अर्थात अनेकदा नवलेखकांना याविषयीची माहितीही नसते, त्यामुळेही हा प्रश्न विचारला जात असावा.
काही लेखक ‘तुम्ही मानधन देता का?’ असाही प्रश्न विचारतात. त्यांचे मला कौतुक वाटते. चांगल्या साहित्याला मानधन देणे हे प्रकाशकांचे कर्तव्यच आहे आणि ते आम्ही देतो! आमचे अनेक लेखक याबाबतची साक्ष देतील!
आता आमच्या कामकाजाविषयी थोडक्यात सांगणे गरजेचे आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय पुस्तके प्रकाशित करताना त्याचा ‘गुणात्मक दर्जा’ हा एकमेव निकष आम्ही बघतो. नवोदित-प्रस्थापित, जात-धर्म, प्रांत, लेखकाचे वय, लिंग अशा बाबीही बघण्याची कुप्रथा या पवित्र क्षेत्रात सुरू झालीय. त्यामुळे हे सांगणे आवश्यक वाटते. वेगळ्या विषयांवरील, सांस्कृतिक संचित पेरणारी पुस्तके आम्ही चोखंदळपणे निवडलीत आणि लेखकांचा पूर्ण सन्मान राखत, आकर्षक स्वरूपात ती प्रकाशित केलीत. त्याची जाहिरात आणि वितरण यासाठी प्रचंड कष्ट उपसलेत. म्हणूनच नवोदितांच्या पुस्तकांच्याही चार-चार, पाच-पाच आवृत्या अल्पावधितच प्रकाशित होण्याचा विक्रम घडला. अशी पुस्तके लेखकांना आणि आम्हाला पैसा व प्रतिष्ठा मिळवून देणारी ठरली.
काही कवितासंग्रह, नाटके आम्ही पदरमोड करून प्रकाशित केली. त्यांचे निर्मितीमूल्य सोडाच मात्र प्रकाशन समारंभाचाही खर्च निघाला नाही. अशा पुस्तकांचे कर्ज फेडत राहिल्याने हातातील अन्य दर्जेदार कलाकृतींवर निश्चितच अन्याय झाला.
मग व्यावसायिक तडजोडी स्वीकारत आम्हीही यातून मध्यममार्ग काढला. आम्हाला आवडलेल्या आणि आम्ही निवडलेल्या विषयांवरील पुस्तके आम्ही आमच्यातर्फे प्रकाशित करतो. त्यातून लेखकांचेही समाधान होईल याला प्राधान्य देतो. मात्र काही पुस्तके दर्जेदार असूनही ती बाजारात कितपत चालतील याची खात्री नसते. साहित्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या कवितांचा क्रम तर विक्री व्यवस्थेत गृहितच धरला जात नाही. त्यामुळे ज्या लेखकांची पुस्तके आम्हाला प्रकाशनयोग्य वाटली आणि त्यांची काही गुंतवणूकीची क्षमता आहे त्यांच्याकडून माफक निर्मितीमूल्य घेऊन त्याबदल्यात तितक्या रकमेची पुस्तके त्यांना द्यायची व पुस्तक प्रकाशित करायचे. यातील काही प्रती लेखकांनी विकत घेतल्याने होणार्या नुकसानीचा भाग तुलनेने कमी होतो. हे करतानाही पुस्तकाचा दर्जा, व्याकरण, मांडणी, मुखपृष्ठ, कागद, छपाई, बाईंडिंग आणि नंतर त्याचे वितरण यात कसलीही तडजोड केली जात नाही. पुस्तकाचा आशय आणि विषय आम्हाला आवडला तरच ते प्रकाशनासाठी निवडले जाते आणि आवश्यक तिथे संपादकीय संस्कार करून ते पुस्तक जास्तीत जास्त परिपूर्ण कसे होईल यासाठी आमचे प्रयत्न असतात.
या माध्यमातून एकच सांगावेसे वाटतेय, तुम्ही जर उत्तम लिहित असाल तर प्रकाशक मिळत नाहीत, प्रकाशनासाठी पैसे नाहीत अशा गोष्टींचा विचार करू नकात! तुमचे साहित्य आमच्यापर्यंत पाठवा. ते योग्य वाटले तर त्याला न्याय देणे ही आमची जबाबदारी! मराठीत सर्वाधिक पुस्तके प्रकाशित होत असताना ती केवळ ‘संख्यात्मक’ न ठरता ‘गुणात्मक’ही ठरावेत यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करूयात!
त्यामुळे ‘पुस्तक प्रकाशनाला खर्च किती येतो?’ याची अनाठायी भीती न बाळगता आधी तुम्ही जास्तीत जास्त चिंतनशील, प्रबोधनपर, रंजक, अभ्यासपूर्ण लिहा आणि ते आमच्यापर्यंत पाठवा.
त्यासाठी संपर्क - ‘चपराक प्रकाशन’, 617, साईकृपा, पहिला मजला, शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ, पुणे 411 002. दूर. 020-24460909.
websait : www.chaprak.com