असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास
गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते
तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे
आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते.
ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास
ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी
इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना
इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक
वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!
13 फेब्रुवारी 1894 ला पेण येथे जन्मलेल्या बेंद्रे यांनी 1918 ला प्रथम भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकले आणि नंतर हयातभर स्वतःला महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा ‘17 व्या शतकाचा इतिहास’ हे संशोधनाचे क्षेत्र निवडले. एक साधन-संग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार अशा भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सन 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड ‘साधन चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याद्वारे त्यांनी नवीन अभ्यासक आणि संशोधकांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. बेंद्रे यांचे अफाट कार्य, चिकाटी व इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून 1938 मध्ये त्यांना खास शिष्यवृत्ती मिळाली व ते हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला गेले. पेशवे दप्तरातील सुमारे चार कोटी विस्कळीत कागदपत्रांचे कॅटलॉगिंग व विषयवार मांडणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यावेळी इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छ. शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित होते. ते योग्य नाही हे बेंद्रेंच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिवरायांच्या मूळ चित्राच्या संशोधनासाठी ते पुढे सरसावले. मॅकेनझीच्या ग्रंथाचे अवलोकन करताना त्यांना व्हलेंटाईन या डच चित्रकाराने काढलेले सुरतेच्या वखारीतील तिथल्या गव्हर्नराच्या भेटीचे महाराजांचे चित्र मिळाले. ज्यावेळी ते इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांनी प्रथम या चित्राची खात्री केली. हे चित्र पुढे आणण्यासाठी ‘इंडिया हाऊस’कडून परवानगी मिळवली आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ते प्रसिद्ध केले. आज आपल्या सरकारी कार्यालयात लावले जाणारे छत्रपती शिवरायांचे हेच ते चित्र! वा. सी. बेंद्रे यांची ही कामगिरी इतिहास संशोधन क्षेत्रात उत्तुंग ठरली.
त्याकाळी संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली. त्यातील बहुतेक नाटकात संभाजीराजे व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी असेच चित्र नाटककारांनी उभे केले होते. सोनाबाई केरकर या पहिल्या महिला नाटककार. 1886 साली त्यांनी संभाजीराजांचे चरित्र लिहिले होते. त्यातही राजांचे असेच वर्णन होते. इतिहास संशोधनाच्या अपुर्या साधनांमुळे छ. संभाजीराजांची मलिन झालेली प्रतिमा प्रथम धुवून काढण्याचे प्रचंड मेहनती काम बेंेद्रे यांनी केले. त्यासाठी त्यांनी चाळीस वर्षे संशोधन केले. परदेशात जाऊन साधने मिळवली. इंग्लंडहून त्यांनी 25 खंड होतील इतकी कागदपत्रे भारतात आणली. पुढे सन 1958 साली ‘छ. संभाजीराजांचे चरित्र’ हा 650 पानांचा चिकित्सक ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला. त्यामुळे संभाजीराजांची युद्धनीती, त्यांची धर्मप्रवणवृत्ती, त्यांचा तेजस्वी पराक्रम लोकांना ज्ञात झाला. मराठ्यांची अस्मिता ठरणार्या या राजांच्या बदनामीचा कलंक पुसून काढण्याचे काम करणार्या या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सात हजार रूपयांचे अनुदान दिले होते. छत्रपती संभाजीराजांची समाधी वढू ब्रुद्रुक येथे आहे हे सर्वप्रमथ त्यांच्याच लक्षात आले. त्यासाठीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचेही चरित्र लिहिले. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग, साठहून अधिक ग्रंथांचे लेखन, वयाच्या ऐंशीव्या वर्षी लिहिलेला ‘राजाराम चरित्रम्’ हा ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना अशा अफाट कार्यामुळे ते इतिहास संशोधन क्षेत्रातील भीष्माचार्य ठरतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे हे अफाट कार्य उभे करतानाच त्यांनी हुंडाविरोधी चळवळही उभी केली. ब्रदरहुड स्काऊट संघटना काढली. वयाच्या 90 व्या वर्षी म्हणजे 16 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी उभ्या केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला त्यांची नात साधना डहाणूकर यांनी दीड लाख रूपये देणगी दिली. त्यातून दरवर्षी एका इतिहास संशोधकाला कै. वा. सी. बेंद्रे पुरस्कार दिला जातो. यंदाचा (2017) पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात आला.
जाता जाता एक गोष्ट मात्र प्रांजळपणे सांगाविशी वाटते. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास लेखन जिथे संपते तिथूनच त्याला खर्याअर्थी फाटे फुटतात. बेंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजांचे ‘चंपा’ नावाच्या एका रजपूत मुलीशी लग्न झाल्याचे लिहिले आहे. या विवाहाचे सविस्तर वर्णनही त्यांनी केले आहे. वस्तुतः त्यावर पी. आर. गोडे या संशोधकाने शोधनिबंध लिहून ही घटना नंदुरबारच्या शंभूराजे देसाई यांच्याबाबत घडल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तरीही नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतून हा मजकूर काढून टाकण्यात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551, (19 फेब्रुवारी, सन 1630) ही नक्की करण्याचे अभूतपूर्व कामही वा. सी. बेंद्रे यांनीच केले. या महान इतिहास संशोधकाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता जपली जावी यासाठी त्यांचे महाराष्ट्रात यथोचित स्मारक होणे गरजेचे आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092