Sunday, May 14, 2017

‘साला’ची साल किती काढणार?


राजकारण हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वी त्याला समाजकारणाची कड होती. सध्या राजकारणातून फक्त लाभ बघितले जातात. सत्तेच्या राजकारणाचा हव्यास सुटल्याने त्यातील सेवाधर्म मागे पडत गेला आणि हा धंदा बनला. कोटीच्या कोटी उड्डाणे घेताना राजकारण्यांना नैतिकेतेची चाड राहत नाही. मग त्यातूनच एक मस्तवालपणा अंगात येतो आणि सत्तेचा कैफ चढल्याने आपण कुणी फार वेगळे आहोत असा भ्रम त्यांच्या मनात निर्माण होतो. आजूबाजूची परिस्थिती त्यांच्या अहंकाराला खतपाणी घालते आणि ते स्वतःला राजे समजू लागलात. त्यातून त्यांच्या वागण्यात बेतालपणा येतो. रगेलपणा वाढत जातो. दर्पोक्तीचे ग्रहण त्यांना लागते. मनावरचा ताबा सुटल्याने हवी ती विधाने त्यांच्या तोंडात येतात. काही काळासाठी त्यातून जनभावना दुखावल्या जातात आणि पुन्हा लोक सगळे विसरतात व ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते.
हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान! जालना (मराठवाडा) येथे भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांना तुरीवरून प्रश्‍न विचारला. त्यावेळी त्या कार्यकर्त्याला उद्देशून ते म्हणाले, ‘‘तू जास्त पेपर वाचतो का? वाचू नको... तूर खरेदी, ऊस खरेदी, बाजरी खरेदी हे विषय सध्या तुम्ही बंद करा. ज्या मालाचे हमीभाव केंद्र सरकारने ठरवले आहेत तो माल जर का बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी केला जात असेल तर सरकार 25 टक्के माल खरेदी करते. आपल्या सरकारने तर सारीच्या सारी तूर घ्यायला सुरूवात केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 400 रूपयांपेक्षा जास्त अनुदान तुरीला दिले आहे. त्यामुळे रडे धंदे करू नका. आपल्या कार्यकर्त्यांनी आता रडायचे नाही लढायचे! पुन्हा काढायचा नाही आता तुरीचा विषय. ते काय ते आम्ही बघू. सगळी तूर आम्ही खरेदी करणार आहोत. आता परवाच एक लाख टन तूर खरेदी करायला केंद्राने परवानगी दिली. तरीही रडतात साले...!’’
त्यांच्या या विधानातील ‘साले’ या शब्दावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमात, समाजमाध्यमात केवळ दानवे यांचाच उद्धार होत आहे. आतापर्यंत राजकारण्यांची असभ्य, अप्रगल्भ, असंविधानिक भाषा आपण अनेकवेळा बघितली आहे. अगदी ‘धरणात पाणी नाही तर मी त्यात मुतू का?’ असाही प्रश्‍न यापूर्वीच्या उपमुुख्यमंत्र्यांनी विचारला होता. इतकेच काय तर ‘ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे शेतकर्‍यांना रात्री काही काम नसते; म्हणूनच आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललीय’ असेही वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजे कराड येथील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी ‘आत्मक्लेश’ही केला. या पार्श्‍वभूमीवर हेच नेते आज दानवे यांच्या ‘साला’ शब्दावरून राजकारण करत आहेत. शेतकर्‍यांचा केवळ आपल्यालाच कसा पुळका आहे हे दाखवताना दानवेंचा मात्र वाटेल त्या शब्दात उद्धार करत आहेत. शेतकर्‍यांचा संताप आणि आक्रोश व्यक्त करतोय असे म्हणत दानवे यांना शिव्यांची जी लाखोली वाहिली जात आहे ती यांचा खरा चेहरा दाखवून देणारी आहे.
दानवे हे ग्रामीण मुशीतून पुढे आलेले नेते आहेत. त्यांचे आईवडील स्वतः शेतकरी होते. हा माणूस सर्वसामान्य माणसात मिळून मिसळून राहणारा आहे. आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणून ते त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या साधेपणाचे अनेकांनी अनुभव घेतले आहेत. सत्तेची आणि पदाची कसलीही धुंदी नसणारा हा रस्त्यावरचा माणूस आहे. गावच्या सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कुणालाही अचंबित करायला लावणारा आहे. हा माणूस त्यांच्या मतदारसंघात पायी फिरतो. बांधावर जाऊन शेतकर्‍यांसोबत त्यांच्या डब्यातली भाकरी खातो. त्यांची सुखदु:खे समजून घेतो. नेता म्हणून नव्हे तर प्रामाणिक लोकप्रतिनिधी या भावनेतून त्यांना जमेल तशी मदत करतो. म्हणूनच रोजच्या बोलण्यात जे एकमेकांचा आईबहिणीवरून उद्धार केल्याशिवाय चार वाक्येही धड बोलू शकत नाहीत, ते दानवेंच्या ‘साला’ शब्दावरून रान पेटवत आहेत. हा निर्लज्जपणाचा कळसच म्हणायला हवा.
मुळात दानवे ज्या कार्यक्रमात बोलले ती कसली सभा नव्हती. त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. हे वाक्य त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला उद्देशून वापरल्याचे सांगितले आहे. त्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे. मात्र पराचा कावळा करणार्‍यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यापासून, जाळपोळ करण्यापासून ते त्यांच्या राजीनाम्यापर्यंतची मागणी लावून धरली आहे. ‘आदर्श’ प्रकरणात ज्यांचे हात कोळशासारखे काळेकुट्ट झालेत असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, करंगुळीवीर अजित पवार असे नेते दानवे यांच्या ‘साला’ शब्दावरून जेव्हा जंग जंग पछाडतात तेव्हा कुणालाही आश्‍चर्य वाटते. प्रसारमाध्यमांनी या घटनेत अकारण हवा भरल्याने दानवे यांच्यासारखा कार्यक्षम नेता हकनाक बळी जातोय. त्यांच्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करूनही जे सुडाचे राजकारण केले जातेय ते महाराष्ट्राच्या सभ्य संस्कृतीला तडा देणारे आहे.
मुळात रावसाहेब दानवे जेव्हा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा ‘एक दानवे, बाकी जानवे’ अशा शब्दात आम्ही त्यांचे वर्णन केले होते. भाजपसारख्या पक्षाला जातीवादाच्या विटाळातून बाहेर पाडण्यात ज्या मोजक्या नेत्यांचा हात आहे त्यात दानवे यांचे स्थान मोठे आहे. महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात मोठा पक्ष झालेल्या भाजपाचे सर्वसमावेशक धोरण टिकून आहे ते दानवे यांच्यासारख्या नेत्यांमुळे! स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जे काम केले तोच वारसा दानवे नेटाने पुढे चालवत आहेत आणि हेच विरोधकांचे खरे दुखणे आहे. म्हणूनच अगदी ठरवून त्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे.
यापूर्वी नाशिक येथे त्यांनी शेतकरी आत्महत्येवरून जे वक्तव्य केले होते त्यावरून त्यांना अडचणीत आणले गेले. त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त जो अवाढव्य खर्च केला गेला त्यावरून टिकेची झोड उठवली गेली. प्रत्यक्षात त्या लग्नाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते विरोधकांपर्यंत सर्वजण सहभागी होते. मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना कोट्यवधी रूपयांचा चुराडा का केला असा त्यांच्यावरचा आक्षेप! यापैकी कितीजणांनी या लग्नाच्या खर्चाचा तपशील मागितला? दानवे यांनी हा खर्च केवळ काळ्या पैशातून केला का? त्या खर्चाचा तपशील, त्यांनी मिळवलेल्या संपत्तीचा कर त्यांनी भरलाय का हे खरे प्रश्‍न असायला हवेत. जर त्यांनी नैतिक मार्गाने हा पैसा मिळवला असेल तर तो त्यांनी कुठे आणि कसा खर्च करावा  याबाबत त्यांना सांगणारे आपण कोण? तो पैसा ते त्यांच्या मुलाच्या लग्नात खर्च करतील किंवा दानधर्म करतील! तो पूर्णतः त्यांचा अधिकार आहे.
यापूर्वी दुष्काळात सामान्य माणूस तग धरून रहावा म्हणून रोजगार हमीसारख्या योजना राबवल्या गेल्यात. रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नात कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला याचा अर्थ त्या परिसरातील अनेकांना मोठ्या संख्येने रोजगारच मिळाला. मग हे वाईट आहे का? आयुष्यात एक रूपयाही कधी कोणत्या विधायक कामाला न देणारे अशा खर्चावरून बोलतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते.
शेती आणि शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. विरोधक त्यावरून सातत्याने राजकारण करतात. ते करायलाही हवे; मात्र नैतिकतेचे डांगोरे पिटताना आपण किती स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवण्याचा जो केविलवाणा अट्टाहास आहे तो वाईट आहे. ‘रावसाहेब दानवे यांना पदावरून दूर करण्याची मागणी करू नका. असे नेते भाजप बुडवायला पुरेसे आहेत. त्यांच्यामुळे आपले काम सोपेच होत आहे’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलीय. ‘जाणता राजा’ असे बिरूद मिरवणार्‍या या नेत्याने केंद्रीय कृषीमंत्री या नात्याने भरीव योगदान दिले असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी शेतकर्‍यांसाठी काही ठोस केल्याचेही उदाहरण नाही. त्यांनी ‘कर्जमाफी’चा निर्णय घेतला खरा; पण त्याचे फलित काय? आज शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झालाय आणि पुन्हा कर्जमाफीचीच मागणी सुरू आहे. त्यावरून राज्य पेटवले जातेय. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे असे नेते लोकक्षोभ ओढवून सत्य सांगण्याचे काम करत आहेत. कर्जमाफीने तत्कालीक प्रश्‍न सुटतील पण शेतकर्‍यांना सावरण्याचा हा उपाय होऊ शकत नाही. शेतकरी पुन्हा कर्जाच्या खायीत ढकलला जाईल. त्यांच्यासाठी भरीव अशा काही योजना राबवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील आहे. आपण त्याकडे सकारात्मक दृष्टिने पहायला हवे. दानवे यांच्या ज्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे त्यातील ‘साला’ हा शब्द सोडला तर बाकी काहीही चुकीचे नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने ते त्यांची बाजू उत्तम पद्धतीने मांडताना दिसतात. ‘रडायचे नाही, लढायचे’ असे म्हणत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना दिसतात. त्यामुळे याची आपण आणखी किती साल काढणार? तळागाळातून वर आलेल्या आणि शेतकर्‍यांच्या  परिस्थितीची योग्य ती जाण असलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्याला संपवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे आणि दुर्दैवाने आपली प्रसारमाध्यमेही एकतर्फी बाजू मांडत त्यांना सहकार्य करत आहेत. यात सार्‍यांचेच हात बरबटले असल्याने दानवे यांना एकट्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे योग्य होणारे नाही.
- घनश्याम पाटील
7057292092


8 comments:

  1. खूपच छान लेख सर । नाण्याची दुसरी बाजूही तुम्हीं दाखवून जळजळीत राजकीय परिस्थिती वाचकांसमोर आणलीत । हाच खरा पत्रकारीतेचा धर्म आहे हे सध्याच्या परिस्थितीताही न डगमगता सांगणे ह्याला सुध्दा धारिष्ट्य लागते जे तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारामुळे सिद झाले । आभिनंदन

    ReplyDelete
  2. सर अप्रतिम विवेचन. अगदी योग्य प्रकारे आपन आपली 'सल'ही बोलून दाखवली. राजकारण खरोखर कसे खेकड़ा प्रवृतिने पाय खेचते ते यावरून लक्षात येताय. वास्तविक पाहता, दानवे यांच्याशी निगडित नसताना त्याच्या वर अशी इतकी भयंकर मीडिया बाजी करणे म्हणजे अस करण्यारांच्या बुद्धिची ही दिवालखोरी आहे.

    ReplyDelete
  3. खूपच छान.दानवेंबद्दल वाईटवाटत होतं.तुमच्या लेखनातून पूर्ण व्यक्त होतं.ते शब्द कार्यकर्त्यासाठी आहेत शेतकऱ्यांच्या साठी नाहीत. हे महत्वाचे आहे.अर्थात असे शब्द वापरणे चुकीचेच आहे.पण शिवराळ आणि घाणेरडी भाषा वापरणार्यांनी त्याचे राजकारण करणे मूर्खपणाचे व स्वतःच्या बोलण्याची आठवण जनतेला करून देण्यासारखे आहे

    ReplyDelete
  4. खूपच छान.दानवेंबद्दल वाईटवाटत होतं.तुमच्या लेखनातून पूर्ण व्यक्त होतं.ते शब्द कार्यकर्त्यासाठी आहेत शेतकऱ्यांच्या साठी नाहीत. हे महत्वाचे आहे.अर्थात असे शब्द वापरणे चुकीचेच आहे.पण शिवराळ आणि घाणेरडी भाषा वापरणार्यांनी त्याचे राजकारण करणे मूर्खपणाचे व स्वतःच्या बोलण्याची आठवण जनतेला करून देण्यासारखे आहे

    ReplyDelete
  5. जोरदार आतिषबाजी दादा 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. विरोधकांना विरोध करायला मुद्दाच नाही .

    ReplyDelete