Sunday, March 19, 2017

व्यवस्थापन कौशल्यातला उत्तुंग मनोरा


टिमटाला हे अमरावती जिल्ह्यातील एक छोटेसे खेडे. 11 नोव्हेंबर 1914 रोजी या गावात एकनाथजी रानडे यांचा जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणून एकनाथजींनी आपल्या कामाची छाप उमटवली होती. 1960 च्या सुमारास मद्रासमध्ये विवेकानंदांचे स्मारक उभारण्याची तयारी सुरू होती; मात्र त्याला प्रचंड विरोध होत होता. त्या अडचणीतून मार्ग काढून स्वामीजींचे भव्य स्मारक उभारले जावे यासाठी एखाद्या कर्तव्यकठोर, निस्पृह, त्यागी, सर्वसमावेशक देशभक्ताची गरज होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री. गुरूजींनी या कामासाठी एकनाथजींची नियुक्ती केली. संघकार्यातून त्यांना मुक्त केल्यानंतर कन्याकुमारीच्या श्रीपाद शिलेवर विवेकानंदांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्याच्या कामात सहभागी होण्याच्या सूचना त्यांना मिळाल्या आणि एक अद्भूत इतिहास निर्माण झाला. शिलास्मारकाबरोबरच विवेकानंद केंद्राची स्थापना करून एकनाथजींनी राष्ट्रनिर्माणाबरोबरच मनुष्य निर्माणाला महत्त्व दिले.
‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’ ही एकनाथजींच्या कामामागची संकल्पना होती. वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून केंद्रासाठीच काम करणार्‍या व्रतस्थ कार्यकर्त्यांचा शोध, त्यांचे प्रशिक्षण, देशभरात महत्त्वाच्या आणि आवश्यक ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या अशा सर्व बाबींचं सर्वंकष, सर्वव्यापी, सर्वसमावेशक दर्शन घडतं ते एकनाथजींच्या पत्रातून! अशी हजारो पत्रं विवेकानंद केंद्रानं जपून ठेवलीत. त्यांचा अभ्यास करून अनेक पुस्तके प्रकाशित करणे अभ्यासकांना शक्य आहे. सुभाष वामन भावे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि ‘लर्निंग फॉर मॅनेजर’ हे पुस्तक जन्माला आले. ज्येष्ठ पत्रकार दत्ता पंचवाघ यांनी ‘एकनाथजी आणि व्यवस्थापन कौशल्य
या नावाने त्याचा मराठीत अनुवाद केला असून विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने ते दर्जेदार स्वरूपात प्रकाशित केले आहे.
एकनाथजींच्या जन्मशताब्दी वर्षात (2014) विवेकानंद केंद्रातर्फे देशभर अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकनाथजींच्या जीवनकार्यावर, विचार मौक्तिकांवर, कार्यपद्धतीवर आधारित तीन पुस्तकांचा संकल्प करण्यात आला होता. या पुस्तकांमुळे तो पूर्णत्वाकडे जात आहे. एकनाथजींनी जीवनव्रती कार्यकर्त्यांसमोर मांडलेले विचार, त्यांची दिनचर्या, केंद्र कार्यकर्त्यांसाठी आणि पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे एकनाथजींच्या सर्वोत्तम भाषणावरच दीनचर्या हे पुस्तक यापूर्वी प्रकाशित झालेलं आहे. केंद्राची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथजींनी ती कशी पार पाडली, त्यासाठी केलेला पत्रव्यवहार, केलेला प्रवास आणि घेतलेल्या गाठीभेटी, खर्चाचे नियोजन, योजलेल्या मोहिमा, त्यांचं कार्यान्वयन, सर्वोत्तम काम होण्यासाठी घातलेलं लक्ष, ग्रॅनाईटच्या स्मारकावर समाधानी न राहता हे स्मारक जिवंत कसं होईल, भावी पिढ्यांना प्रेरणा देणारं कसं बनेल याची घेतलेली काळजी अशा अनेक पैलूंचा अभ्यास व्यवस्थापन शास्त्राच्या अंगाने त्यांनी केला. प्रा. सुभाष भावे यांनी लिहिलेल्या आणि दत्ता पंचवाघ यांनी मराठीत अनुवाद केलेल्या या पुस्तकात आपण हे सारे वाचू शकाल.
मा. एकनाथजी यांचा जीवनपट, त्यांचा अल्पपरिचय, दृष्टी आणि ध्येय, नियोजन आणि व्यूहरचना, संघटन, प्रकल्प व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास, संपर्क, केंद्र प्रार्थना आणि सेवा कार्य अशा प्रकरणांमधून हे पुस्तक उलगडत जाते. कन्याकुमारीला सागराच्या मध्यभागी स्मारक उभारण्याचे काम म्हणजे सत्त्वपरीक्षाच! त्यासाठी मनुष्यबळ कार्यरत करणं, प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवणं, निधीची उभारणी हे सगळंच जिकिरीचं. एकनाथजींनी हे  शिवधनुष्य लिलया पेललंच पण सुयोग्य कार्यशक्तीची बांधणी केली. देशाच्या राजकीय नेतृत्वाचं मन वळवलं आणि हे स्मारक अनुकरणीय ठरेल याची व्यवस्थाही लावली. हे सारं सारं वाचकांपर्यंत साध्यासोप्या आणि प्रभावी भाषेत आणण्याचं आव्हानात्मक काम या पुस्तकाच्या निमित्तानं झालं आहे. त्यासाठी भावे यांनी सुमारे दहा महिने अभ्यास केला. समर्पक व्यवस्थापन क्षेत्रे निश्‍चित केली. वीसेक हजार पत्रे अभ्यासली. एखाद्या पीएचडीसाठी जे कष्ट घ्यावेत तितकेच किंबहुना त्याहून अधिक कष्ट प्रा. भावे यांनी या पुस्तकासाठी घेतलेत.
एकनाथजींनी शिलास्मारकाच्या कामाविषयी सल्लामसलत करण्यासाठी सहा जणांची भेट घ्यायचे ठरवले. त्यात डॉ. राधाकृष्णन, पं. जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, एम. सी. छागला, रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष आणि कांची कामकुटी पीठाचे शंकराचार्य यांचा समावेश होता. पं. जवाहरलाल नेहरू वगळता सर्वांची त्यांनी भेट घेतली. लालबहाद्दूर शास्त्री एकनाथजींना म्हणाले, ‘‘तुम्ही एकटे पंडितजींना भेटू नकात. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होता, त्यामुळे ते तुम्हाला योग्यप्रकारे समजून घेणार नाहीत. हे लक्षात घेऊन मी तुम्हाला योग्यवेळी त्यांच्याकडे घेऊन जातो!’’ पण ती वेळच आली नाही. पं. नेहरू कॉंग्रेसच्या बैठकीसाठी भुवनेश्‍वरला गेले, आजारी पडले आणि.....
शंकराचार्यांनी त्यांना सांगितले, ‘‘देव-देवतांसाठी जसे मंदिराचे आराखडे, रेखांकने बनवली जातात तसे या स्मारकाबाबत तुम्ही करू शकत नाही. तुम्ही मंदिरसदृष्य वास्तू उभारू शकता; पण ती वेगळ्या प्रकारची असावी. विवेकानंद हे देव नव्हते, ते एक मनुष्य होते.’’
स्वामी विवेकानंदांची ‘मनुष्यनिर्माण’ ही संकल्पना एकनाथजींनी प्रत्यक्षात आणली. त्यासाठी प्रामुख्याने त्यांनी अभ्यास केला तो शिवचरित्राचा! छ. शिवाजी महाराजांनी पुणे आणि परिसरातील चोवीस मावळांमधील, एकमेकांशी भांडत असलेल्या समुहांना एकत्र आणले. लोकसंग्रहाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून एकनाथजींनी तो आदर्श डोळ्यासमोर ठेवला. महाराजांचे संघटनकौशल्य आणि प्रेरणा देण्याचे कौशल्य एकनाथजींच्या जीवनकार्यातून दिसून येते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक किल्ल्यांची उभारणी करणारे छ. शिवाजी महाराज त्यांचे आदर्श होते.
एकनाथजी रानडे व्यावसायिक अभियंता किंवा लेखापाल नव्हते. तीन सागरांनी वेढलेल्या शिला खडकावर स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक उभारणे म्हणूनच सोपी गोष्ट नव्हती. बांधकामाबाबत तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध ज्ञान असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, जेट्टींच्या बांधकामाबाबत मरीन इंजिनिअर्सशी चर्चा करून, विविध श्रेणीच्या अभियंत्यांशी विचारविनिमय करून एकनाथजींनी स्मारक उभारणीचा सखोल आणि पद्धतशीर अभ्यास केला. कामाची एक निश्‍चित दिशा ठरवली आणि तसे प्रयत्न केले. शिस्तबद्धता, आर्थिक नियोजनाबाबतची सतर्कता, लोकांना प्रेरीत करण्याची क्षमता, संपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे ते कधीही विचलित झाले नाहीत. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान एकनाथजींनी खर्‍या अर्थाने आचरणात आणले.
एका मराठी माणसाने अमराठी भागात जाऊन जगाला आदर्श ठरावे असे प्रचंड प्रेरणादायी स्मारक उभारणे, विवेकानंद केंद्राची स्थापना करून भारतभर समाजकार्याची ज्योत तेवत ठेवणे हे सोपे काम नाही. ही किमया साध्य करण्यासाठी एकनाथजी रानडे यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला, निस्वार्थ आणि खमक्या माणूसच हवा. सगळ्यांचा विरोध झुगारून देत राज्यव्यवस्थेला या कामात सहभागी करून घेणारे, विरोधकांना आपलेसे करत लोकसहभाग वाढवणारे आणि सेवा व साधना ही तत्त्वे रूजवणारे एकनाथजी रानडे म्हणूनच आपल्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची ओळख करून देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे.
लेखक - प्रा. सुभाष भावे, अनुवाद - दत्ता पंचवाघ
प्रकाशन - विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग, पुणे (020-24432342)
पाने - 200, मूल्य 150

- घनश्याम पाटील
7057292092

Saturday, March 11, 2017

पुढे खडतर काळ!

जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम सर्वत्र जोरदारपणे सुरू असताना, त्याचे नियोजन सुरू असताना आपल्याकडे महिला दिनाच्या आदल्या दिवशी सर्वात मोठी शोकांतिका ठरावी अशी एक बातमी होती. मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ या गावात बाबासाहेब खिद्रापुरे हा होमिओपॅथिक डॉक्टर होता. त्याच्या ‘भारती हॉस्पिटल’मध्ये तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे ही विवाहिता दाखल होती. कशासाठी? तर स्त्रीभ्रूण हत्येसाठी! तिच्या नवर्‍यानेच तिला त्यासाठी दाखल केले होते. त्यात तिचा मृत्यू झाला. मग नवर्‍याने गावात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न केला पण गावकर्‍यांच्या सजगतेमुळे तो पुर्णत्वास आला नाही. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला. डॉ. खिद्रापुरे सारख्या नतद्रष्टावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आणि तो लगेच फरारही झाला. त्याने 19 गर्भ कॅरिबॅगमध्ये घालून पुरल्याचे तपासात समोर आले. क्रौर्याची परिसीमा ठरणारे हे दुष्कृत्य आपल्या महाराष्ट्रात घडले आहे.
यापूर्वी बीड येथील बालाजी मुंडे या डॉक्टरनेही असे उद्योग केले होते. त्याला अटक झाल्यावर अनेक भयंकर सत्ये पुढे आली. समाजसुधारणेत सदैव पुढाकार घेणार्‍या आणि देशाचे वैचारिक नेतृत्व करणार्‍या महाराष्ट्रात असे करंटे लोक आहेत याचा अत्यंत खेद वाटतो. वैद्यकीय क्षेत्राचे आदर्श धुळीला मिळवणारे हे कलंकीत डॉक्टर आणि मुलीची चाहूल लागल्याने गर्भपात करणारे मनोरूग्ण जोडपे, त्यांना पाठिशी घालणारे त्यांचे पालक हे सगळेच समाजद्रोही आहेत. यातील डॉक्टरावर तर कठोर कारवाई व्हायला हवीच पण ज्यांनी ज्यांनी गर्भपात केलाय त्या सर्वांना शिक्षा व्हायला हवी. एकीकडे स्त्री शक्तीचा जागर सुरू असताना आपण तिचा जन्मच नाकारतोय, ही आजच्या काळातील अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. आपण विकासाच्या गप्पा मारत असताना हे आणि असे जे प्रकार सातत्याने पुढे येतात ते निंदाजनक, संतापजनक आणि आपले मनुष्यत्व संपत चालल्याची साक्ष पटवून देणारे आहेत.
सध्या डॉक्टरी पेशाचे हिडीस वास्तव समोर येत असतानाच काही समाजसेवी संघटनांनी एक चळवळ उभारलीय. त्यांना सोनोग्राफीला मान्यता हवीय. कशासाठी? तर गर्भातील बाळात काही व्यंग असेल, तो गतिमंद असेल, त्याच्या शारीरिक क्षमता विकसित होणार नसतील तर वेळीच गर्भपात करून त्या बाळाचा जन्मच होऊ द्यायचा नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यातून या संस्थांची बुरखा पांघरलेली विकृत मनोवृत्ती दिसून येते. स्त्रीभ्रूणहत्येत जे रॅकेट कार्यरत आहे त्यांचेच हे षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यासाठी मात्र काही समाजसेवक, सामाजिक संस्था यांचा नेहमीप्रमाणे आधार घेतला जातोय. मुलगा किंवा मुलगी कोणत्याही रूपाने निसर्गाने जे काही दिले, त्याचा आदर करत बाळाच्या सर्वांगिण क्षमता विकसित करण्याऐवजी हे महाभाग त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याच्या हत्येची तयारी सुरू करतात. आपल्या संस्कृतीवर, माणूसपणावर श्रद्धा असलेल्या कुणासाठीही ही बाब चीड आणणारी आहे. अशी कारस्थानं आपण हाणून पाडायला हवीत.
डॉक्टर हा घटक जीवदान देतो. त्यामुळे त्याला आपण ‘देवदुता’ची उपमा दिली. मात्र वैद्यकीय क्षेत्राचे इतके बाजारूपण झालेय की आलेल्या प्रत्येकाला कापायचाच विचार हे लोक करतात. काही सन्माननीय अपवाद सोडले तर या क्षेत्राला बर्‍यापैकी कीड लागली आहे. ऍसिडीटीमुळे छातीत थोडीसी जळजळ झाली तरी हृदयापासून अनेक कारणे देऊन त्याची चिकित्सेच्या नावावर चिरफाड केल्याची उदाहरणे आपल्याकडे कमी नाहीत किंवा एक रूपयात हृदयाची शस्त्रक्रिया करणार्‍या एका भोंदूचा विक्रम मध्यंतरी चर्चेत आला होताच. त्याने तर गरीबांच्या किडण्याच गायब केल्या होत्या. हे सारे क्लेषकारक आहे. या क्षेत्रातील सेवाधर्म लयाला जाऊन इतर उद्योगाप्रमाणेच हाही ‘धंदा’ झालाय, हे वास्तव आपण स्वीकारायलाच हवे.
म्हैसाळच्या दुर्दैवी घटनेची चर्चा आमच्या कार्यालयात चालली होती. त्यावेळी आमचे एक ज्येष्ठ सदस्य म्हणाले, ‘मी ऑस्ट्रेलियात मुलीकडे गेलो होतो. तिथे एका हॉटेलमध्ये गेल्यावर एक नवी डिश मेन्यू कार्डवर दिसली. सहज म्हणून मुलीला ती मागवायची का, असे विचारले. तर तिने सांगितले, बाबा, ते आपल्याला चालणार नाही. इथे गायींना दुधासाठी आणि गर्भधारणेसाठी सातत्याने इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे त्यांचे निम्मे आयुष्य कमी होते. त्यातही गायीला कालवड झाली तर ठीक, कारण ती दुधासाठी कामाला येते; पण गोरा झाला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून त्याला मारले जाते. त्या नवजात गोर्‍याच्या मांसाला मोठी मागणी असते. त्या मांसाची ही डिश आहे...’ त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला आणि हे सांगताना त्यांनाही गलबलून आले.
जिथली जनावरे सुरक्षित नाहीत, माणसे, बायका सुरक्षित नाहीत, बालके आणि अर्भकेही सुरक्षित नाहीत त्या राष्ट्राचे भवितव्य काय असणार आहे? आपण प्रगतीच्या कितीही गप्पा मारत असलो तरी ही ‘सूज’ संवेदनशील मनाला अस्वस्थ करते. संस्कार आणि संस्कृतीचे टेंभे मिरवणार्‍या आपल्या देशात तर अनैतिकता, कुविचार आणि त्यातून कुकृत्याची मोठी परंपरा निर्माण झाली आहे. कधी काळी हा देश संस्कारशील, चारित्र्यसंपन्न, नीतिमान लोकांचा होता हे सांगितले तरी खरे वाटू नये अशी परिस्थिती निर्माण झालीय.
देशाच्या पंतप्रधानपदापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत आपल्याकडे स्त्रियांना संधी मिळाल्या. सर्व क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. तरीही त्यांना आपण सन्मान देत नाही. ‘चूल आणि मूल’ हे भाग्योदय समजणार्‍या बायकाही आपल्याकडे कमी नाहीत. अनेक रणरागिणींच्या त्यागाची, पराक्रमाची आपण कधी कदर केलीच नाही. म्हणूनच महाराणी ताराबाईसारख्या, अहिल्यादेवींसारख्या स्त्रिया आपल्याकडे तुलनेने खुपच उपेक्षित राहतात. स्त्रीच पुरूषांना जन्म देते आणि आपण तिच्यावरच अन्याय-अत्याचार करतो, तिची हेळसांड करतो, तिला कमी लेखतो, तिचा स्वाभिमान दुखावतो आणि तिचा जन्मही नाकारतो हे कशाचे लक्षण आहे?
अर्थात, हे सगळेच नकारात्मक आहे असेही नाही. आपल्या मुलींनाच भाग्यलक्ष्मी माणून त्यांच्यासाठी बरेच काही करणारे, त्यांना जगरहाट्यात स्वयंसिद्ध करणारे, त्यांची पूजा बांधणारे, त्यांच्या संस्कारछायेत वाढून उमलत्या कळ्यांचे स्वागत करणारेही कमी नाहीत. एकीकडे स्त्री सुरक्षा, स्त्री संरक्षण असे विषय चालू असताना दुसरीकडे ‘स्त्रीच स्त्रीची शत्रू‘ असेही चित्र दिसते. अनेक ठिकाणी स्त्रियाच स्त्रियांना कमी लेखतात, त्यांना अडचणीत ढकलतात. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर प्रकरणांचा अभ्यास केल्यास अनेक ठिकाणी त्या ‘आई’लाच मुलगी नको असल्याने हे घडल्याचे समोर येतेय. मग तिला आई तरी कसे म्हणणार?
बहिणाबाई चौधरी म्हणतात,
दुधावरी आला बुरा, तिले साय कधी म्हणू नये
जिची ममता आटली, तिले माय कधी म्हणू नये!

हे ‘ममत्व’ आटणे आपले राष्ट्र बेचिराख करण्यास कारणीभूत ठरणारे आहे.
व. पु. काळे हे आपल्याला कथाकार म्हणून सुपरिचित आहेत; मात्र त्यांचा ‘नको जन्म देवूस आई’ हा एक छोटासा कवितासंग्रहही प्रकाशित आहे. पुण्यातल्या ‘पृथ्वीराज प्रकाशन’च्या म. भा. चव्हाणांनी तो प्रकाशित केलाय. त्याच्या मुखपृष्ठावर आपल्याला हलवून सोडणार्‍या चार ओळी आहेत. व. पु. लिहितात,
गर्भवतीला म्हणाले
तिच्या गर्भातले बाळ
नको जन्म देवूस आई
पुढे खडतर काळ!

हा ‘खडतर’ काळ आपण आपल्या अविचारातून आणलाय. निसर्गाचे चक्र आपण बिघडवतोय. म्हणूनच खिद्रापुरे आणि मुंडेसारखे नराधम डॉक्टर हे अघोरी धारिष्ठ्य करतात. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करतानाच, आता समाजानेही बदलायला हवे! अन्यथा निसर्ग आपला ‘बदला’ घेतल्याशिवाय राहणार नाही!!

- घनश्याम पाटील
7057292092



Saturday, March 4, 2017

धोका प्रतिक्रियावाद्यांचा!


मध्यंतरी व्हॉट्स अँपला एक विनोद आला.
एकदा एक परदेशी कुत्रा भारतात आला.
देशी कुत्र्यांनी त्याला विचारलं, ‘‘मित्रा, तुमच्याकडे कशाची कमतरता होती, ज्यामुळं तू इथं आलास?’’
तो म्हणाला, ‘‘आमच्याकडं राहणीमान, वातावरण, खाणंपिणं, जीवनाचा स्तर सगळं इथल्यापेक्षा कैक पटीनं झकासच आहे.... पण भुंकण्याचं जे स्वातंत्र्य भारतात आहे तसलं स्वातंत्र्य जगात कुठंही नाही...!’’
यातील विनोदाचा भाग सोडला तरी किती खरे आहे हे! कुणीही उठतो आणि वाटेल ते मत मांडून मोकळा होतो. ‘अभिव्यक्ती’च्या नावावर आपण फक्त ‘प्रतिक्रियावादी’च झालोय की काय असे वाटायला लागले आहे. घरात काय अडचणी आहेत याची माहिती नसते आणि हे महाभाग भारत-अमेरिका संबंधांवर, काश्मीर प्रश्‍नावर, दहशतवादावर मते मांडत असतात. बरं, त्यातला थोडाफार अभ्यास असेल असेही नाही. म्हणजे श्रीपाल सबनीसांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावर काही अभ्यास केलाय हे कोणी कधी ऐकलंय का? त्यावर त्यांचे एखादे पुस्तक आहे का? पण ते बोलून गेले की, ‘नरेंद्र मोदी तिकडे सीमेवर का बोंबलत फिरतोय? एखादी गोळी लागली तर कसा मेला तेही कळणार नाही...’
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष देशाच्या पंतप्रधानाविषयी असे बोलतो! जणू मोदी म्हणजे काही त्यांचा वर्गमित्रच! त्यात संमेलनाध्यक्षाच्या तोंडी भाषा कशी? तर ‘बोंबलत फिरतोय!’ वा रे वा!!
नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली आणि अर्ध्या तासाच्या आत तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ‘‘यात हिंदुत्त्ववाद्यांचा हात आहे...’’ म्हणजे खुनी कोण हे तुम्हाला आधीच माहीत होते! कुठे गेले ते हिंदुत्त्ववादी? तपास यंत्रणेच्याही आधी तुम्ही प्रतिक्रिया देऊन आणि दोषारोप करून मोकळे! मग का पकडले नाही त्यांना? खरंतर तुमच्यावरच गुन्हे दाखल व्हायला हवेत. ‘हिंदुत्त्ववाद्यांचा हात’ असे म्हणून तपासाची दिशा बदलली गेली का? आता तर इतके पाणी वाहून गेलेय की खुद्द खुनी पुढे आला आणि त्याने कबुली दिली तरी त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होणे अवघड.
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. कृष्णा किरवले यांचा आज कोल्हापूरात खून झाला आणि क्षणात असे एसएमएस सुरू झाले. कोणतीही हत्या वाईटच, त्याचे समर्थन होणारच नाही. अशा प्रकाराचा करावा तितका निषेध कमी! पण तपास यंत्रणेला त्यांचे काम आपण करू देणार की नाही? डॉ. किरवले यांचे साहित्यातले, चळवळीतले योगदान निश्‍चितपणे मोठे आहे; पण या खुनाचा संबंध थेट दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्याशी जोडून आपण मोकळे. किरवले यांनी नेमके काय लिहिले? त्यांनी कोणता ‘विचार’ दिला यावर मात्र कोणीच काही बोलत नाही. ‘प्रतिक्रियावाद्यां’पैकी खूप कमी जणांनी त्यांचे साहित्य वाचले असणार! तरीही ‘अच्छे दिन आ गए’, ‘हिंदुत्त्ववादी शक्तींचे कारस्थान’, ‘आणखी किती जणांचे आवाज घोटणार?’ असे प्रश्‍न आणि मते मांडणे सुरू!
प्रा. कृष्णा किरवले यांच्या मित्राच्या मुलाने फर्निचरच्या पैशाच्या न देण्यावरून खून केला असून, आरोपीला अटकही केल्याचे सूत्रांकडून कळते. विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासारखा कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी स्वतः यात लक्ष घालून तपास करतोय. असे असताना आपण निष्कर्ष काढून आणि विशिष्ट विचारधारेला दोष देऊन मोकळे! समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया पडल्यात त्या पाहता प्रत्येक घटनेचे आपण किती आणि कसे राजकारण करतोय हे सहजी ध्यानात येईल.
महात्मा गांधी असतील, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी किंवा आता किरवले असतील! इथे कायदा प्रत्येकाला सारखाच आहे. इथल्या सामान्य माणसाचा खून झाल्यावर जी कलमे लावली जातात तिच यांच्या मारेकर्‍यांवरही लावली जातात. गुन्हेगारांना शिक्षाही सारखीच असते. कुणाचाही खून तितकाच क्लेषकारक, निंदनीय आणि निषेधार्ह असतो. मग तपास यंत्रणेला त्यांचे काम करू देण्याऐवजी आपण त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हस्तक्षेप का करतो? जर एखाद्या घटनेचा, दुष्कृत्याचा तपास व्यवस्थित होत नसेल, त्यात हलगर्जीपणा केला जात असेल तर लोकशाही व्यवस्थेत न्याय मागण्याची अनेक साधने आहेत. मात्र घटना घडल्याबरोबर आपण त्यावरील आपली मते आणि निष्कर्ष मांडून मोकळे होतो. आपल्याला हवा तसा आणि हवा तितकाच तपास व्हावा असाही ग्रह करून घेतो.
गुरमेहर कौर या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थीनीने सांगितले की, ‘तिच्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले.’ तिचे वडील देशासाठी कामी आलेत. कारगिलच्या युद्धात त्यांना हौतात्म्य आले. गुरमेहरला मत मांडण्याचा अधिकार आहे. तिने ते मांडले. त्या विधानाचा थेट बुद्ध, गांधींशी संबंध लावून आपण प्रतिक्रिया दिल्या. प्रतिक्रिया देणार्‍यांपैकी कुणाचा आंतरराष्ट्रीय संबंध, युद्धनीती याचा अभ्यास असेलच असे नाही. गुरमेहरच्या वडिलांचे देशासाठीचे बलिदान निश्‍चितच महत्त्वपूर्ण आहे. म्हणून तिने कितीही अपरिपक्व विधाने करावीत आणि आपण त्यावर चर्चेचे गुर्‍हाळ चालवावे हे काही खरे नाही. चिंतेची गोष्ट म्हणजे, गुरमेहरने समाजमाध्यमांद्वारे एक गंभीर आरोप केलाय की, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुलांनी तिला बलात्काराची धमकी दिलीय.’ हे तर निव्वळ राजकारण झाले. जर कोणी असा करंटेपणा केला असेल तर त्या ‘नीचोत्तमा’वर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. मात्र तसे काही न करता केवळ आरोप करायचे आणि राजकारण साधत प्रसिद्धीच्या झोतात रहायचे असा एक नवा खेळ सध्या आपल्याकडे सुरू झालाय. गुरमेहर ही आपल्या देशासाठी प्राणार्पण करणार्‍या एका हुतात्म्याची मुलगी आहे. त्यामुळे तिच्याविषयी सहानुभूती आहेच; पण अशी धमकी इथल्या कोणत्याही भगिनीला मिळाली तर आधी तिने गुन्हे दाखल करावेत आणि त्यावर त्वरीत कारवाई व्हावी. आपल्याकडे कायद्याचे राज्य आहे याचेच भान या ‘प्रतिक्रियावाद्यांना’ राहिलेले नाही.
मध्यंतरी एक बातमी वाचण्यात आली होती. ‘वीज पडून दलित युवकाचा मृत्यू.’ आता त्या विजेलाही वाटले असेल हा ‘दलित’ आहे, आपण याच्यावरच अन्याय करावा आणि ती बरोबर त्याच्यावर पडली. ही घटना दुर्दैवी आणि अपघाती आहे. मात्र तिथेही ‘जात’ आणून आपण, आपली प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे नक्की काय साध्य करू इच्छितात? एकीकडे जातीअंताच्या लढाईची भाषा करायची आणि दुसरीकडे सातत्याने जातींचे-ज्ञातींचे मेळावे घ्यायचे, सभा घ्यायच्या, त्यावरून राजकारण करायचे हे कशाचे लक्षण म्हणावे? मध्यंतरी ज्या काही जातीयवादी घटना घडल्या, माध्यमांनी राळ उठवली, राज्य पेटले, दलित अत्याचार म्हणून प्रचंड बोभाटा झाला त्याचा शेवट काय झाला ते आपण बघितलेच! घरच्याच लोकांनी वैयक्तिक कारणातून ते हत्याकांड घडवले होते. अशा कितीतरी घटना आहेत. आपण फेसबूक, ट्विटर, ब्लॉगवरून हवे ते निष्कर्ष काढतो, यंत्रणेला गुन्हेगारांच्या पिंजर्‍यात बसवतो आणि शेवटी वेगळेच सत्य पुढे येते.
व्हॉट्स ऍपसारख्या माध्यमांमुळे तर कहरच झालाय. एखादा संदेश आला की लगेच तो पुढे ढकलायचा. त्याची थोडीही शहानिशा करायची नाही. जणू आपल्याला खूप मोठ्या सत्याचा शोध लागलाय आणि आपण ही माहिती पुढे पाठवली नाही तर फार मोठा अनर्थ होईल अशा आविर्भावात आपण या संदेशांची उचलफेक करतो. मग त्यात कधी अमिताभ बच्चन यांना श्रद्धांजली वाहिली जाते, कधी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मारले जाते तर कधी कोणत्या नेत्याला जिवंतपणीच स्वर्गात पाठवले जाते. हे खूप घातक आहे. अशाने जर इतर काही देशांप्रमाणे आपल्याकडेही समाजमाध्यमांवर बंधने आली तर आश्‍चर्य वाटायला नको.
माहिती आणि तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारत चालले असताना आपला विवेक शाबूत रहावा, आपण जे काही करतोय त्याची किमान जाणीव आणि गरजेपुरते गांभीर्य असावे इतकीच अपेक्षा आहे. असे म्हणतात की, बाळाला बोलणे शिकायला वर्ष-दोन वर्षे लागतात; पण काय बोलावे हे कळायला संपूर्ण आयुष्य निघून जाते! त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत आपली मते जरूर मांडा मात्र त्यामुळे आपण यंत्रणेत अडथळे निर्माण करणार नाही, चुकीची माहिती पसरवणार नाही, द्वेष वाढवणार नाही, सामाजिक ऐक्य धोक्यात आणणार नाही इतकी माफक काळजी घ्या! अन्यथा भविष्यात ‘सोशल’ माध्यमे आपल्याला ‘सोसणा’र नाहीत, हे मात्र नक्की!! 

- घनश्याम पाटील
7057292092

Saturday, February 25, 2017

ही राजभाषा असे!

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला यात दिवसेंदिवस प्रगती होत असताना आपण 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करतो. ज्यांनी मराठीला सौंदर्यपूर्ण साज चढवला अशा कुसुमाग्रजांचा म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांचा जयंतीदिन हा ‘भाषा दिन म्हणून साजरा करणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यात आणि देशात नव्या पर्वाची नांदी लागलेली असताना, जातीय आणि प्रांतीय अस्मिता टोकदार बनत चाललेल्या असताना आपल्यापुढे भाषेच्या संवर्धनाचे मोठे आव्हान आहे. एकीकडे मराठीत रोज उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित होत आहेत, नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, नाटकाचे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होत आहेत, प्रवचन-कीर्तनासारख्या कार्यक्रमांना मोठी गर्दी जमतेय आणि दुसरीकडे ‘वाचक नाहीत’, ‘मुलं मराठी बोलत नाहीत’ अशा आवया दिल्या जात आहेत. शहरी भागातील एक ठराविक वर्ग सोडला तर अजूनही रोजच्या जीवनात मराठीचाच वापर केला जातो आणि संवादाचे प्रमुख माध्यम मराठीच आहे. तरीही मराठी ‘संपल्या’ची अफवा पसरविली जाते! यापुढे तो दखलपात्र गुन्हा ठरवायला हवा.
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाचा ठेका आपणच घेतलाय, असा ‘समज’ असणारे काही राजकीय पक्ष, साहित्य संस्था, ठराविक साहित्यिक आणि मुख्यत्वे मराठीतील प्राध्यापक मंडळी, नियतकालिके यांनी मराठीचे वाटोळे करण्यात मोठा हातभार लावलाय. काही अपवाद वगळता, आजच्या मराठीच्या प्राध्यापकांचे वाचन पाहता या परिस्थितीचा अंदाज कोणीही बांधू शकेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही अनेकदा कोणी ना कोणी मराठीचे प्राध्यापकच असतात. वर्षानुवर्षे साहित्यिक निष्ठेने विविध संमेलनाला हजेरी लावणारा रसिक, संपूर्ण हयात मराठी भाषेचे अध्यापन करणारा  एखादा तत्त्वनिष्ठ शिक्षक, कीर्तनाच्या माध्यमातून रंजन आणि प्रबोधन करणारा एखादा कीर्तनकार, ‘लावणी’सारख्या माध्यमातूनही मराठी भाषा जिवंत ठेवण्यास हातभार लावणारी एखादी कलावंत, दुर्गम भागात वाचनसंस्कृती टिकून रहावी यासाठी अहोरात्र कार्यरत असलेला ग्रंथालय चळवळीतील एखादा कार्यकर्ता, किंबहुना उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारा कुणी प्रकाशक किंवा कष्टपूर्वक ती सर्वत्र वितरित करणारा विक्रेता यांच्यापैकी किंवा अशांपैकी कोणी एखादा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला काय हरकत आहे? यांनीही मराठी भाषा जिवंत ठेवण्यात मोठे योगदान दिलेच आहे की! प्राध्यापकीय वर्तुळात अडकलेला साहित्याचा हा केंद्रबिंदू इकडे वळला तर आपली भाषा अजून सशक्त होऊ शकते.
‘चांगले ते स्वीकारायचे’ आणि ‘वाईट ते अव्हेरायचे’ ही आपली वृत्ती असायला हवी. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात इतर भाषेतले अनेक शब्द मायमराठीने स्वीकारले आहेत. त्यावरून वादंग घालण्याऐवजी भाषा अधिक समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मराठीतच बोलणे, मराठीतच लिहिणे याला आपण प्राधान्य द्यायला हवे. अनेकजण आपली ‘सही’ सुद्धा मराठीत करत नाहीत. बहुभाषिकता ही काळाची गरज आहे. इतर भाषांचा मुळीच द्वेष करू नये; मात्र आपली भाषा आणखी समृद्ध व्हावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी नाही का?
प्रकाशक या नात्याने मी भाषेबाबत आग्रही असतो. आमच्याकडे अनेक लेखक त्यांची संहिता पाठवतात. त्यात हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषेतील अनेक शब्दांचा भडिमार असतो. ती संहिता मी हमखास नाकारतो. एका विख्यात लेखकाने त्यावरून माझ्याशी वाद घातला. ते म्हणाले, ‘‘मी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकात सातत्याने लिहितो. आजवर मला कोणीही भाषेवरून कधी बोलले नाही. काही नामवंतांचे विचार ‘कोट’ करायचे असतील तर इंग्रजीला पर्याय नाही...’’
बराच वेळ समजावून सांगूनही त्यांना त्याचे महत्त्व पटत नव्हते. शेवटी मी त्यांना म्हणालो, ‘‘ठीक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या एखाद्या वृत्तपत्रात तुम्ही तुमचा लेख छापून आणा आणि त्यात मध्ये मध्ये मराठी शब्द पेरा...’’
ते म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे? ते असे काही छापणार नाहीत...’’
‘‘मग मराठी नियतकालिकांनी तुमच्या लेखनातील इंग्रजी शब्द, वाक्यं आणि काहीवेळा उतारेच्या उतारे का छापावेत?’’
त्यावर ते निरूत्तर झाले.
आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती याच्या जतन आणि संवर्धनासाठी आपणच तर पुढाकार घ्यायला हवा. बरं, इंग्रजी वापरण्याच्या दुराग्रहापोटी आपण अनेक इंग्रजी शब्दांचे अर्थही पडताळून पाहत नाही. उदारहरणच घ्यायचे झाले तर ‘मिसेस’ या शब्दाचे घेऊया! ‘बायको’साठी मिसेस हा शब्द आपल्याकडे सर्रासपणे वापरला जातो. ‘ऑक्सफर्ड’ हा जगन्मान्य शब्दकोश आहे. यात ‘मिसेस’चा अर्थ काय दिलाय ते पहा! मूळ शब्द ‘मिस्ट्रेस!’ त्याचा अपभ्रंश झालाय ‘मिसेस.’ मराठीतला अर्थ काय दिलाय माहीत आहे का? तो आहे - रखेल, अंगवस्त्र किंवा लग्न न करता ठेवलेली बाई!
हे असे का झाले? कारण त्यावेळी इंग्रजांचे जगावर राज्य होते. इतर देशात राज्य करताना त्यांच्या लैंगिक गरजांच्या पूर्ततेसाठी ज्या बायका ठेवायचे त्यांना ते ‘मिसेस’ म्हणायचे. लग्नाच्या बायकोसाठी इंग्रजीतला योग्य शब्द आहे ‘वाईफ.’ आपल्याकडे मराठीत बायको, अर्धांगिनी, भार्या, पत्नी, खटलं, बायडी असे कितीतरी शब्द असताना आपण अभिमानाने सांगतो की, ‘ही माझी मिसेस...’ त्यांना काय बोलावे?
मराठीला दुसरा रोग लागलाय द्विरूक्तीचा. त्यातही अनेकवेळा इंग्रजी शब्दांचा आधार घेतला जातो, काहीवेळा मराठीतही द्विरूक्ती होते. उदहारणार्थ - गाईचे गोमूत्र! आता गोमूत्र काय बैलाचे असणार का?, महिला लेखिका, महिला नगरसेविका असे शब्दही सध्या सर्रासपणे वापरले जातात. ‘लेखिका’ म्हटल्यावर ती ‘महिला‘ आहे हे सांगणे किती हास्यास्पद! पिवळं पितांबर, गोल सर्कल, लेडिज बायका, चुकीची मिस्टेक झाली असेही शब्द आणि वाक्य ऐकायला मिळतात. पाठिमागचे ‘बॅकग्राऊंड’ किंवा ‘सरकारी जी. आर.’ असे शब्दही प्रचलीत होत आहेत. माझा एक मित्र सांगतो, ‘‘मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातो...’’ त्याला म्हणालो, ‘‘आम्ही रात्री मॉर्निंग वॉक करतो.’’ आणखी एक मित्र नेहमी सांगतो, ‘‘काल रात्री माझी नाईट होती...’’ आता यांच्याकडे ‘दिवसा’ही ‘नाईट’ असेल बहुतेक! अशा कितीतरी शब्दांनी आपण आपल्या भाषेच्या हत्येचे सत्र सुरू ठेवले आहे.
मध्यंतरी एका अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचा मला दूरध्वनी आला. तो म्हणाला, ‘‘दादा, मी तुमचे लेखन नियमित वाचतो. तुम्ही खोटे लिहिणार नाही, याची मला खात्री आहे; पण शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचा खरंच ‘मर्डर’ केलाय का हो? हे तुम्ही ठामपणे लिहिलेय म्हणजे तुमच्याकडे काहीतरी पुरावा नक्की असेल...’’ क्षणभर मला घामच फुटला. सध्या माझ्या लेखनात सोयीस्कर फेरफार करून किंवा काहीवेळा चक्क माझे नाव टाकूनही त्यांना हवा असणारा मजकूर समाजमाध्यमातून फिरवला जातो. मला वाटले कोणीतरी आगाऊपणा केलेला दिसतोय. त्यामुळे त्याला मी शांतपणे संदर्भ विचारले. तो म्हणाला, ‘‘या अमुक अमुक लेखात तुम्ही लिहिलंय की, शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसला...’’ मग तो ‘पॉलिटिकल मर्डर’ होता हे त्याला इंग्रजीत सांगेपर्यंत कळले नाही... विशिष्ट वर्गातले हे चित्र नक्कीच दुर्देवी आहे.
मध्यंतरी एक वाक्य वाचण्यात आलं होतं. ‘तुम्ही मला ‘आई’ म्हणणारा एक इंग्रज दाखवा, मी तुम्हाला ‘ममी’ म्हणणारे हजारो हिंदुस्थानी दाखवेन!’ किती खरे आहे हे! विदेशी भाषा आणि संस्कृतीच्या आहारी जाऊन आपल्या पायातील शृंखला आणखी मजबूत होत चालल्या आहेत. इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केलं तरी आपण सुधरायला तयार नाही.
मराठीला इंग्रजीचा जितका धोका आहे तितकाच, नव्हे त्याहून अधिक धोका ‘हिंदी’चा आहे. हिंदी ही आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे या अज्ञानातून आणि भ्रमातून आपण बाहेर पडायला तयार नाही. आपल्या राज्यघटनेत भारताला राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही केवळ ‘संपर्क भाषा’ आहे. ‘संस्कृत’ ही राष्ट्रभाषा व्हावी असा अनेकांचा आग्रह असताना पंडित नेहरू यांनी त्याला विरोध केला आणि हिंदीचा हट्ट धरला. ‘उत्तर प्रदेशपेक्षा कोणतेही राज्य मोठे नसावे आणि हिंदी सर्वांवर लादली जावी’ असे त्यांचे मत होते. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला. त्या वादात भारताला कोणतीही ‘राष्ट्रभाषा’ नाही हे सत्यच आपण विसरलो. म्हणूनच अनेक हिंदी शब्द आपल्याकडे सर्रासपणे वापरले जातात. बरं, हिंदी चित्रपटातून दाखवले जाते तेही अस्खलित हिंदी नसते. ज्याला हिंदीचे उमाळे दाटून येतात त्याने आपल्या प्रशासकीय कामकाजातील हिंदी वाचावी आणि त्याचे अर्थ लावावेत. एकेकाची भंबेरीच उडेल.
मराठी भाषा दिन हा एका दिवसापुरता ‘साजरा’ होऊ नये! आपण आपले मराठीपण रोज जगायला हवे. तसे वागायला हवे. भाषा संपली तर संस्कृती संपेल आणि संस्कृती संपली तर आपले राष्ट्र पुन्हा बेचिराख होईल. भाषा शुद्धिकरणाची आणि भाषा संपन्नतेची चळवळ राबवण्यासाठी आपण आता पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने किमान मराठीत बोलणे सुरू केले तरी खूप फरक पडेल. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ आपली मातृभाषा आहे. ही राजभाषा आहे. आपण आता सजगपणे हालचाल केली नाही तर आपल्याच मातृभाषेचा खून आपणच केल्याचे पातक आपल्याला लागणार आहे. मराठी माणूस इतका अविवेकी आणि कृतघ्न नक्कीच नाही. आपण सर्वांनी म्हणूनच मराठीतच बोलावे, मराठीतच लिहावे, मराठी वाचावे, मराठीतच व्यक्त व्हावे या शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, February 18, 2017

संवेदनशील कल्पनारम्यतेचा परिणामकारक आविष्कार

वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! ही किमया सगळ्यांनाच जमते असे नाही. आपल्याला जे मांडायचे आहे ते नेमकेपणे, सुस्पष्ट आणि थेट वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडणारे असावे. असे लेखन करणार्‍या मोजक्या लेखकांपैकी एक म्हणजे समीर नेर्लेकर! कवी, कथाकार, तंत्रज्ञ, चित्रकार अशा अनेक भूमिकांतून ते सुपरिचित आहेत. यापूर्वी त्यांची ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ व ‘हसण्यावर टॅक्स नाही’ ही पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली. त्यांचा हा लघुकथा संग्रहही वाचनीय आणि तितकाच उद्बोधक आहे. वाचकांना उपदेशाचे डोस न पाजता साध्या-सोप्या भाषेत त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन करणे ही नेर्लेकरांची खासीयत असल्याने हा कथासंग्रह सर्वांना हवाहवासा वाटेल.
यात एकूण बारा कथा आहेत. प्रत्येक कथा म्हणजे एक स्वतंत्र तत्त्वज्ञान. त्यात नेर्लेकरांची स्वतंत्र शैली. त्यांची भाषा हेच तर त्यांचे सामर्थ्य. प्रत्येकाला वाचावेसे वाटेल आणि त्यातून वाचनानंदाबरोबरच काहीतरी हरवलेले गवसल्याचे समाधान वाटेल असे त्यांचे लेखन. मराठी कथा सशक्त होण्यासाठी असे प्रयोग व्हायलाच हवेत.
‘पांढरी बट’ ही कथा वरकरणी रूक्ष व खडूस वाटणार्‍या ‘बॉस’ची आहे. असे अनेक वरिष्ठ आपल्या आजुबाजूला असतात आणि अशा ‘नारळा-फणसा’सारख्या माणसांची खरी ओळख व्हायला आपल्याला अनेकदा बराचसा काळ जावा लागतो. ऐन पंचवीशीतले ज्युनिअर सिनेमा पाहण्यासाठी ‘शॉर्ट लिव्ह’ मागायला बॉसच्या केबिनमध्ये जमतात. बॉसचा गंभीर चेहरा पाहून सगळ्यांच्या नजरा खाली जातात. पुढे काय घडणार आणि आपल्या सुटीचे काय होणार या विचारात असतानाच बॉस मात्र पंचवीस वर्षापूर्वीच्या इतिहासात जातात. जेव्हा उमेदवारीच्या काळात बॉसला अशी सुट्टी हवी असते तेव्हा त्याची बॉस त्यांना कशी वागणूक देते याची आठवण जागी होते आणि कथानक फुलत जाते. पंचवीस वर्षांनीही तिची ‘पांढरी बट’ बॉसला ‘माणुसपणाची’ शिकवण देते.
मनुष्य हा मुळातच प्रयोगशील प्राणी आहे. त्यात आजची पिढी तर आणखी चंट! ही मूलं काय काय करत बसतील हे भल्याभल्यांना कळणे शक्य नाही. रविवारच्या रम्य सकाळी वामनरावांच्या घरात अचानक पाणी येणे बंद होते. नळाला पाणी येत नसल्याने सौभाग्यवती त्यांना साखर झोपेतून उठवतात. ते एका प्लंबरला बोलावतात. तोही संपूर्ण पाईपलाईन बदलण्याचा सल्ला देतो. खरेतर वामनरावांच्या चिरंजीवाने केलेला हा प्रताप! गोट्या त्याची करामत सांगतो आणि वामनरावांच्या घरातील पाणीप्रश्‍न सुटतो. म्हटले तर अगदी साधे कथासूत्र असलेले ही कथा; पण नेर्लेकरांनी ज्या शैलीत ती मांडलीय ती पाहता मराठी कथेच्या भवितव्याची कोणीही चिंता करण्याचे कारण नाही.
जसं मुलांचं तसंच बायकांचंही! त्यादृष्टिने त्यांची ‘पियानो वाजवणारी राजकन्या’ ही कथा पहायला हवी. ‘स्त्री म्हणजे काय?’ असा सवाल एक शिष्य त्याच्या गुरूला करतो आणि अंतरात्म्याला साद घालत, सर्व ज्ञानकोश उलगडूनही त्यांना त्याचे उत्तर मिळत नाही. तो साधू, तो शिष्य आणि त्यांच्या शोधाचे साधन असलेली ती राजकन्या यापैकी कोणीही आज हयात नाही; मात्र कथाकार नेर्लेकर यांच्यासह वाचकही या प्रश्‍नाच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत.
‘वधुपिता आणि मी’ हा मेलोड्रामा आजच्या परिस्थितीवर चपखल भाष्य करतो. प्रत्येक वधुपिता उत्तम जावयाच्या शोधात असतो. जवळपास प्रत्येकाला आपला जावई धनाड्य, कमावता असावा असेच वाटते. ते स्वतः ‘आपण किती शून्यातून वर आलोय’ याच्या फुशारक्या मारत असतात; मात्र जावई मात्र स्थिरस्थावर असलेलाच लागतो. ‘तुमचे लग्न झाले तेव्हा तुमच्याकडे काय होते? तुम्हीदेखील अंगावरच्या कपड्यानिशी खेड्यातून या शहरात आला होता, असं तुमची मुलगी सांगते’ असं थेट वधुपित्याला सुनावण्याचं धारिष्ट्य नेर्लेकरांच्या कथानायकात आहे. आजच्या तमाम तरूणाईचं प्रतिनिधित्व करणारा हा नायक अशा तरूणांना त्यांचा ‘बुलंद’ आवाज वाटल्याशिवाय राहणार नाही. वस्तुस्थितीवर अचूक बोट ठेवत समाजातली, दोन पिढ्यातली, परिस्थितीतली विसंगती दाखवून देण्यात नेर्लेकर पटाईत आहेत. हे काम ते इतक्या खुबीने करतात की, मनातली अढी कधी आणि कशी दूर झाली, अजिबात न दुखता हा काटा कधी आणि केव्हा निघाला हेही संबंधितांना कळत नाही. ‘एक दिवस माझी नायिका प्रेक्षकांमधून धावत येईल रंगमंचावर, माझ्या दिशेने बाहू पसरून...’ असा आशावाद त्यांनी पेरलाय. हा आशावाद म्हणजे आजच्या तरूणांच्या मनातला हुंकारच जणू!
‘पोस्टमार्टम’, ‘स्पर्श’ या कथाही त्यांच्या भावभावनांचं प्रगटीकरणच आहेत. या कथा आजच्या पिढीच्या आहेत. त्यांनी त्या वाचायलाच हव्यात. त्यांच्याच मनातील भावना नेर्लेकरांनी शब्दबद्ध केल्यात. एखादा गुलाब नशिबवान असतोच. तो कुणाच्या हायहील्सच्या सँडलखाली तुडवला जात नाही किंवा त्याचं पोस्टमार्टमही होत नाही. तो टेबलावरच्या फुलदाणीत रूबाबात बसतो!!
‘स्पर्श’ ही एक रहस्यकथा आहे. कथांचे सगळे फॉर्म एकाच पुस्तकात समर्थपणे आणि पूर्ण सामर्थ्यासह हाताळण्याचा यशस्वी प्रयोग नेर्लेकरांनी केलाय. ही कथा वाचताना वाचक स्तब्ध होतात. ‘पुढे काय’ हा कथेचा आत्मा असतो. ही उत्कंठा शेवटपर्यंत जिवंत ठेवण्यात ‘स्पर्श’ यशस्वी ठरलीय. या स्पर्शाचे हे रहस्य जाणून घेण्यासाठी ही कथा मुळातूनच वाचायला हवी.
‘ती सध्या काय करतेय?’ हा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. ‘ती’च्या बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असणे हा मानवी स्वभावाचा गुणधर्मच आहे. मात्र वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू असताना ‘ती’चा खूप वर्षांनी अचानक एका ‘मीटिंग’साठी मेल येतो. ही ‘ती’ म्हणजे ‘ती‘च आहे हेही नायकाला माहीत नसते. तिला वाटते आपण खरे सांगितले तर कदाचित तो येणार नाही. म्हणून तिही अशा पद्धतीने त्याला बोलवून घेते. मग या ‘मीटिंग’मध्ये नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
या कथामाळेतील ‘शिरोमणी’ म्हणजे ‘है क्या आव्वाज’ ही कथा. प्रत्येक बापाने वाचावी आणि आपल्या मुलांना वाचायला द्यावी अशी ही ‘दमदार’ कथा. सध्या अनेकांना ‘स्वत्त्वा’चाच विसर पडतो. हे स्वत्त्व जागे करण्यासाठी ‘है क्या आव्वाज’ म्हणजे मैलाचा दगड ठरेल. अनेक सुप्त गुण, क्षमता आपल्यात मुळातच असतात. रोजच्या कामाच्या धबडग्यात आणि जीवनाच्या रहाटगाड्यात आपल्याला त्याचा विसर पडतो. मग अगदी किरकोळ आणि फुटकळ घटकही आपला गैरफायदा घ्यायला  लागतात. कुणाला रॅगिंगसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागते. कुणाला सहकार्‍यांचा, इमारतीतील सदस्यांचा त्रास सहन करावा लागतो तर कुणाला दहशतीला, गुंडगिरीला सामोरे जावे लागते.  हतबलतेतून आलेले नैराश्य आणि अन्याय सहन करायची वृत्ती यामुळे आपण ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’चा जप करतो. थोडेसे धाडस अंगी बाळगले तर अनेक समस्या सहज सुटू शकतात याचाही विवेक आपल्यात उरलेला नसतो. हा विवेक जागा करण्याचे काम नेर्लेकरांची कथा करते. शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत सगळे काही बरबटलेले असताना त्यावर सामान्य माणूस काय ‘तोडगा’ काढू शकतो यावर ती भाष्य करते.
सिंडल आणि मेगा समुद्रतळावर जेव्हा एकत्र येतात... मग काय घडत असावे? त्यासाठी ‘शिंपला’ ही कथा अवश्य वाचा. इमारतीच्या पॅसेजमधून डक्टमध्ये भिरकावलेला तो शिंपला अजूनही तिथेच तरंगतोय! कथा नायकाच्या घराबाहेर!!
‘अडगळ’ वाचताना तर आपण हेलावून जातो. आपल्या सासूबाई ठणठणीत बर्‍या व्हाव्यात यासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करणारी सूनबाई बघितली की ‘धन्य’ व्हायला होते. असे नातेवाईक बघितले की ‘नातेवाईट’ असतात यावर कोणीही विश्‍वास ठेवेल. म्हातारीची ‘काळजी’ घेण्यासाठी मुलगा आणि सून किती खालच्या थराला जाऊन त्यांना ‘ऍडमिट’ करतात हे वाचून संताप अनावर होतो. काळ कितीही बदलला तरी मुला-सुनेची ही हरामखोरी आपणाला अस्वस्थ करतेच. हेच अस्वस्थलेपण आपल्या माणूसपणाची, जिवंतपणाची साक्ष देतात. अशा कथांतून परपिडा समजून घ्यायला मदत होते.
‘सप्तमातला केतू’ आणि ‘मुखवटा’ या लघुकथाही समीर नेर्लेकर यांच्या क्षमतेची चुणूक दाखवून देतात.
‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हे संग्रहाचे शीर्षक देण्यामागचा त्यांचा उद्देशही मजेशीर आहे. त्यांच्या आयुष्याचे त्यांनी पंधरा पंधरा वर्षाचे तीन टप्पे केलेत. या प्रत्येक टप्प्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. खरेतर नेर्लेरांनी त्यावर आत्मचरित्रात्मक लेखन करायला हवे. त्यांचे वडील स्व. सुधाकर नेर्लेकर यांनी ‘पहाट प्रकाशन’ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून अनेक लेखक-कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचा ‘उद्योग’ ही नेर्लेकरांची ‘वंशपरंपरागत’ वृत्ती आहे. त्यात स्वार्थाचा लवलेश नसतो. त्यामुळेच माणूस म्हणून असलेले त्यांचे सच्चेपण भावते. याच निरागस आणि निर्मळतेतून त्यांचे साहित्य आल्याने त्याला पावित्र्याची झालर असते. मुख्य म्हणजे या संग्रहाचे आकर्षक, सूचक मुखपृष्ठ दस्तुरखुद्द समीर नेर्लेकरांनीच साकारले आहे. लेखक आणि मुखपृष्ठकार एकच असण्याचा दुर्मीळ योग या पुस्तकाने साधलाय.
समीर नेर्लेकर हे मराठी साहित्यातलं एक चिंतनशील बेट व्हावं आणि भविष्यात त्यांनी उत्तमोत्तम लेखन करून त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार घडवावा यासाठी त्यांना तहे दिल से शुभेच्छा देतो!!

- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

केतकीची सुरक्षा आणि आयोजकांना मनस्ताप

मराठीत उत्तमोत्तम बालकलाकार निर्माण होतात. अंगभूत कला आणि अत्यंत कठोर परिश्रम, त्यातील सातत्य यामुळे अनेकजण पुढच्या आयुष्यात यशस्वी होतात; तर काहीजण काळाच्या ओघात कुठे हरवले ते लक्षातही येत नाही. आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लगाटे, रोहित राऊत या व अशा टीव्ही शोमुळे पुढे आलेल्या कलाकारांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे सातत्याने प्रयत्न केले. आर्या आंबेकर, रोहित राऊत हे यशस्वी होताना दिसतात. कार्तिकीच्या वडिलांनी सतत कार्यक्रमाच्या सुपार्‍या घेऊन तिला संपवले असाही आक्षेप घेतला जातो. सध्या ‘सैराट’मुळे चर्चेत आलेले रिंकु राजगुरू, आकाश ठोसर हे कलाकारही पुढे कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हे सारे मांडण्याचे कारण म्हणजे ‘टाईमपास’मुळे थोडेसे वलय प्राप्त झालेली कलाकार केतकी माटेगांवकर! जळगावमध्ये बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या केतकीला चाहत्यांचा त्रास सहन करावा लागला. या मनस्तापाला वैतागून तिच्या वडिलांनी म्हणजेच पराग माटेगांवकरांनी एक पत्र लिहून थेट राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्याकडेच तक्रार नोंदविली आहे. तिथे घडलेल्या प्रकारामुळे केतकीला आणि तिच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचेही त्यांनी सांगितलंय. महत्त्वाचं म्हणजे
पुन्हा कोणत्याही महिला कलाकारासोबत अशी घटना घडू नये’ अशी मागणीही त्यांनी महासंचालकांकडे केली आहे. प्रथमदर्शनी ही तक्रार रास्त वाटत असली तरी नाण्याची दुसरी बाजुही पडताळून पहायला हवी.
केतकीची आई सुवर्णा माटेगावकर या उत्तम गायिका आहेत. विविध क्षेत्रातील लोकांच्या साठी-पासष्ठीनिमित्त गाणे गाऊन उपस्थितांचे मनोरंजन करण्याचे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेत. त्यानंतर त्यांचे गाण्याचे अनेक अल्बमही गाजले. अशा कार्यक्रमात अर्थातच केतकीची अनेकदा त्यांना साथ असायची. त्यातूनच कलाकार म्हणून तिची जडण-घडण झाली. असे ‘कमर्शिअल’ कार्यक्रम करणारे कलाकार आपल्याकडे कमी नाहीत. या क्षेत्रावरील निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे माटेगांवकर मायलेकींप्रमाणे काहींना यश मिळते. त्यातून असंख्य चाहते निर्माण होतात. समाजमाध्यमांमुळे सध्या अनेक कलाकारांचा बोलबाला होतो. युवापिढी त्यांच्याकडे आकर्षित होते. त्यातून काहीवेळा अशा घटना घडतात. घसघशीत मानधन देऊन अशा कलाकारांना कार्यक्रमासाठी बोलवणारे आयोजक मात्र तोंडघशी पडून बदनाम होतात.
केतकी सध्या एक वलयांकित कलाकार आहे. हे वलय किती काळ राहील हे कोणीही सांगू शकत नाही. जळगावात बहिणाबाई महोत्सवात तिला पाहुणी म्हणून बोलावल्यानंतर तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आयोजकांचे कर्तव्य होते. त्यात निश्‍चितपणे ते कमी पडले असतील; मात्र आपल्याकडील लोकांची मानसिकता केतकीला आणि तिच्या सोबत आलेल्या तिच्या वडिलांना माहीत नाही असे कसे म्हणता येईल? गलेलठ्ठ मानधन घेऊन विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करणारे असे कलाकार स्वत:चे सुरक्षारक्षक का नेमत नाहीत? जळगावात केतकीभोवती जो गराडा पडला तो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा होता. प्रामुख्याने त्यातील तरूणींना दूर सारणे आयोजक, कार्यकर्त्यांना शक्य झाले नाही. बहिणाबाई महोत्सवात बचत गटातील महिलांचे आणि विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवणार्‍या महिलांचे सत्कार केतकीच्या हस्ते करण्यात आले. तिने आयोजकांना जो वेळ दिला होता त्याच्या आधीच तिथून ती निघाली. या कार्यक्रमासाठी तिने तब्बल दीड लाख रूपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते. हा कार्यक्रम ठरल्यानंतर जवळपासच्या विविध संस्थांचे चार-पाच कार्यक्रम ऐनवेळी तिने स्वीकारल्याने बहिणाबाई महोत्सवातून लवकर निघण्याची घाई तिला झाली. त्यामुळे आयोजकांना व्यासपीठावरील मान्यवरांकडे लक्ष द्यावे की तिला बाहेर सोडावे हेच कळत नव्हते. तेथील काही महिलांनी आणि ढोल पथकाच्या मुलींनी कडे करून केतकीला सुखरूप बाहेर काढले. भांडून, आग्रह करून मानधन भरगच्च घ्यायचे आणि कार्यक्रम अर्धवट सोडून निघायचे हे काही बरे नाही. चित्रपट आणि अन्य क्षेत्रातीलही अनेक कलाकार असेच करतात.
त्यातील आणखीन एक गोष्ट खटकते. साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना आपल्याला वलयांकीत कलाकारच लागतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हणूनच अमिताभ बच्चन, आशा भोसले, सुबोध भावे अशा कलाकारांना बोलवले जाते. मग त्यांचेही नखरे सुरू होतात. अमिताभ बच्चनचे मराठी साहित्यातले योगदान काय? हा प्रश्‍न मात्र कोणीही विचारत नाही. उलट अशा वलयांकित लोकांमुळे कार्यक्रमास गर्दी होते असे आयोजकांकडून सांगितले जाते. मुळात बहिणीबाई महोत्सवात केतकीसारख्या नवख्या कलाकारास बोलवणे हीच मोठी चूक होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार तिच्या हस्ते करणे अशोभनीय होते. पोलीस कमिशनरचा सत्कार कॉन्स्टेबलच्या हातून करावा किंवा आदर्श प्राचार्यांचा सत्कार एखाद्या बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिपायाच्या हस्ते करावा अशातला हा मामला. केतकीला कलाकार म्हणून अजून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे एका छोट्याशा कारणावरून थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणे म्हणजे केतकीच्या वडिलांच्या अविवेकाचे आणि डोक्यात हवा गेल्याचे लक्षण आहे. चाहते आहेत म्हणून कलाकार आहेत. त्यांच्याकडून मिळणारे प्रेम, मिळणारे प्रोत्साहन हा सर्वोच्च पुरस्कार असतो. म्हणूनच ‘सेल्फीवरून मनस्ताप झाला’ असे गळे काढत प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍यांची कीव कराविशी वाटते. पराग माटेगांवकर यांच्या तक्रारीनंतर माध्यमांनी बातम्या दिल्या आणि काहींनी केतकीविषयी सहानुभूतीही दाखवली. जळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी यांनी याबाबतचे सत्य मांडून माटेगांवकर कुटुंबियांकडून कसा आक्रस्ताळेपणा केला जातोय हे दाखवून दिले. जळगावकरांना अकारण बदनाम करण्याचे त्यांचे कारस्थान दिलीप तिवारी यांनी हाणून पाडले.
शोलेसारखा चित्रपट इतक्या वर्षांनीही चर्चेत राहतो तो त्यातील अभिनयामुळे! याउलट चार-सहा महिन्यांपूर्वी सर्वोतोमुखी असलेला ‘सैराट’ आज अनेकांच्या विस्मृतीतही गेला. हा उच्च अभिरूची असलेल्या कलाकृतीचा आणि त्यातील प्रतिभावंत कलाकरांचा विजय असतो. कलाकारच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील यशस्वीतांचे जीवन आपल्याकडे खाजगी राहत नाही. त्यामुळेच ते कायम चर्चेत असतात. एखाद्या गाढवावरून डोंगराळ भागात मूर्ती नेताना आजुबाजूचे लोक त्या मूर्तिला झुकून नमस्कार करतात. त्यावेळी त्या गाढवाचाही अहंकार सुखावला जातो. कलाकारांचा मान-सन्मान हा त्यांच्या कलेला असतो. म्हणूनच हुरळून जाऊन कलाकारांनी कोणताही गाढवपणा करू नये. शाहरूख खानसारखा कलाकार जेव्हा सुरक्षारक्षकावर हात उगारतो तेव्हा आपले कलाकार किती गाढवपणा करतात याची प्रचिती येते.
पुण्यामुंबईसारख्या महानगरात केतकीसारखी एक कलाकार शोधायला गेल्यास शंभर मिळतात. इकडे यांना कोणीही विचारत नाही. म्हणूनच अन्य ठिकाणी गेल्यास त्यांचा अहंकार सुखावतो. आयोजकांनी चार-दोन पोलीस सुरक्षेसाठी बोलवले नाहीत तर हे लगेच कांगावा सुरू करतात. आपल्या देशात अनेक विचारवंत, संशोधक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते राजरोसपणे, निडरपणे फिरत असताना केतकीसारख्या तुलनेने अगदीच नवख्या कलाकारांना त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण देणे म्हणजे जणू व्यवस्थेची चेष्टाच आहे. स्वत:चे पगारी सुरक्षारक्षक ठेवायचे नाहीत, मनात येईल तितके मानधन घ्यायचे, प्रवास, निवास, भोजनासह सर्व सुविधा अव्वल असाव्यात यासाठी आग्रह धरायचा आणि त्यावर कडी म्हणजे चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी त्रास दिला म्हणून गावगन्ना करायचा हे कोणत्याही सुसंस्कृत आणि सभ्य परंपरेला शोभणारे नाही. हा व असा मनस्ताप सहन होणार नसेल तर कार्यक्रम घेऊच नयेत, खुशाल घरी झोपून रहावे. आपल्या कृत्यामुळे आणि मिरवण्याच्या लालसेमुळे व्यवस्था वेठीस धरली जाते याचे भान प्रत्येक कलावंतांनी सदैव ठेवले पाहिजे.

- घनश्याम पाटील
7057292092

Monday, February 13, 2017

विद्यार्थी साहित्य संमेलन

घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'

घनश्याम पाटील यांचे अध्यक्षीय भाषण

व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो,
सस्नेह नमस्कार!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं साहित्य संमेलन होतंय ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. यानिमित्ताने आजचे जे अनेक उत्तमोत्तम लेखक आहेत ते जोमाने फुलतील, पुढे येतील, अशी मला आशा वाटते. भारत हा असा एक देश आहे जिथे सध्या सर्वाधिक तरूणांचं प्रमाण आहे. ‘तरूणांचा देश’ अशी आपल्या राष्ट्राची ओळख आहे आणि इथली आदर्श संस्कृती आपणा सर्वांना माहीतच आहे. साहित्य संमेलनं ही अखिल भारतीय स्तरावरची होतात, विभागीय, उपनगरीय होतात. वेगवेगळ्या प्रांतांची, जाती-धर्माची आणि भाषेचीही होतात. या सगळ्या साहित्य संमेलनातून साहित्यच हरवत चाललंय, अशी खंत जाणकारांकडून व्यक्त केली जातेय. म्हणूनच अशा वातावरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे येते आणि विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घेते ही खूप कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे.
मित्रांनो, मगाशी साठे सरांनी ‘चपराक’ काय आहे हे सांगितलं. तर आपली चपराक ही फक्त चुकीच्या प्रवृत्तीला आहे. आमच्या संस्थेची ‘चपराक’ ही आद्याक्षरे आहेत. चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष! आज या व्यासपीठावर आल्यावर मला अतीव आनंद वाटला; कारण माझ्याच वयाची मुलं पुढं येऊन साहित्यासाठी काहीतरी करत आहेत. खरंतर आपण कायम विद्यार्थीच असतो. आपल्या शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच असते. मी आठवीच्या वर्गात असताना दै. ‘तरूण भारत’ला वार्ताहर होतो. दहावीत शिकत असताना दै. ‘संध्या’ला उपसंपादक होतो आणि बारावीच्या वर्गात शिकत असताना ‘चपराक’ सुरू केलाय. हा विद्यार्थी शक्तीचा विजय आहे. हे यश माझ्या एकट्याचे नाही. आज ‘चपराक’चे सहा राज्यात सभासद आहेत. ‘चपराक’मुळे अनेक प्रतिभावंत महाराष्ट्रासमोर आलेत. त्यातलं एक उदाहरण याच व्यासपीठावर आपल्या समोर आहे, ते म्हणजे सागर कळसाईत! सागरने वयाच्या बावीसाव्या वर्षी ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. पुण्यातल्या प्रकाशकांनी अर्थातच नेहमीप्रमाणे दोन कारणे सांगितली. बावीस हे काही कादंबरी लिहिण्याचे वय नाही आणि दुसरे म्हणजे तू पुण्यातला नाहीस! ती कादंबरी आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली आणि प्रकाशक या नात्याने, सागरचा मित्र या नात्याने सांगायला अभिमान वाटतोय की, मागच्या चार वर्षात या कादंबरीच्या चार आवृत्या संपल्या असून आता पाचवी आवृत्ती येतेय. लवकरच सागरच्या कादंबरीवर चित्रपटही येतोय. इतकंच नाही, तर ‘सकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने मध्यंतरी एक सर्व्हे केला की, ‘आजचे तरूण वाचतात तरी काय?’ आणि त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या महाविद्यालयात तरूणांशी संपर्क साधून त्यांच्या सर्व आवृत्यांना त्याचे निष्कर्ष पहिल्या पानावर छापले होते. त्यात पहिल्या क्रमांकाला सुहास शिरवळकरांची ‘दुनियादारी’ होती, दुसर्‍या क्रमांकाला ‘शाळा’ होती आणि तिसर्‍या क्रमांकाला आमच्या सागरची ‘कॉलेज गेट’ होती. आजचे तरूण काय वाचतात, काय लिहितात यासाठी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
आता आपण थोडंसं मागं जाऊया! 12 जानेवारी 1863! या दिवशी एका महान युगपुरूषाचा आपल्याकडे बंगालमध्ये जन्म झाला. त्यांच्या प्रतिमेचं आत्ताच पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. 1880 चा तो कालखंड. हा तरूण त्याच्या गुरूकडे गेला. गुरू कालिकादेवीच्या पूजेत मग्न होते. त्याने गुरूंना वंदन करून सांगितलं, ‘‘गुरूवर्य, सध्या मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या वडिलांचं निधन झालंय. मला प्रचंड नैराश्य आलंय. हे जग सोडून कुठंतरी दूर निघून जावंसं वाटतं.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘का तुला असं वाटतं? तू तर एक संन्यस्त वृत्तीचा राष्ट्रप्रेमी तरूण आहेस... हा विचार तुझ्या मनात का यावा?’’
त्या तरूणानं सांगितलं, ‘‘हे दुःख, या वेदना फक्त माझ्यासाठी नाहीत. मला माझ्या आईच्या वेदना पाहवत नाहीत. बहिणीच्या डोळ्यातले अश्रू अस्वस्थ करतात. त्यातून मी प्रचंड बेचैन झालोय.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘ठीक आहे. आत कालिकादेवीच्या समोर जा आणि तुला हवं ते माग. तुझं हे दुःख दूर व्हावं यासाठी कालिकामातेकडे साकडं घाल. ही माता तुला दुःखमुक्त करेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल.’’
हा तरूण पुढं गेला. डोळे भरून कालिकादेवीला बघितलं. त्याला स्वत्वाचा विसर पडला आणि भारावून जात त्यानं मागणं मागितलं, ‘‘माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’
गुरूंनी विचारलं, ‘‘काय रे, आईचं, बहिणीचं दुःख दूर कर, असं तू देवीला सांगितलंस का?’’
तो म्हणाला, ‘‘मी हे विसरूनच गेलो.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘पुन्हा आत जा. तुला जे हवं ते माग...’’
पुन्हा हा तरूण आत गेला. कालिकादेवीकडं पाहत त्याच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडले, ‘‘माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ आणि त्यातूनच भगवान रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं, ‘‘नरेंद्रा, तुझा जन्म मानवी कल्याणासाठी आहे. तू राष्ट्राला नवा विचार देऊ शकतोस. अनेकांचा उद्धारकर्ता होऊ शकतोस. तू नेहमी स्वतःचा नाही तर समाजाचा, राष्ट्राचाच विचार करशील...’’ आणि आपण सर्वांनी त्यांनी पुढे घालून दिलेला आदर्श बघितलाच आहे.
मगाशी संस्काराचा विषय निघाला. साठे सरांनी सांगितलं, आजचे हे विद्यार्थी संस्कार जिवंत ठेवत आहेत. खरंय हे! ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरं मरतात. काहीवेळा माणसंही मरतात! मात्र जिथं संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हा संस्कारांचा दुष्काळ पडू नये यासाठी आपण तरूणांनीच पुढं येणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थी परिषदेनं एक पाऊल पुढं टाकलंय ही म्हणूनच आत्यंतिक अभिमानाची बाब आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या येरवडा शाखेचं हे पहिलंच साहित्य संमेलन आहे. ही परंपरा पुढं कायम चालू रहायला हवी. यात सातत्य रहायला हवं. पुढच्या वर्षी तुम्ही या संमेलनाचं आणखी चांगलं नियोजन करा. आमचं ‘चपराक‘चं पूर्ण सहकार्य तुम्हाला असेल. एक मोठ्ठं साहित्य संमेलन, राज्यस्तरीय, ज्यात अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी सहभागी होताहेत आणि येरवडा शाखा त्यासाठी पुढाकार घेतेय असं चित्र दिसायला हवं. आपल्यापैकी जे लिहिते हात आहेत त्यांना बळ मिळायला हवं. त्यांची पुस्तकं या विद्यार्थी साहित्य संमेलनात प्रकाशित व्हायला हवीत. प्रकाशक या नात्यानं मी नक्कीच त्यात पुढाकार घेईन, हे या निमित्तानं सांगतो.
आपण सारेजण विद्यार्थी आहोत म्हणून काही गोष्टी मांडतो. आता ग्रीस देशाकडे वळूया. ग्रीसमध्ये उत्तमोत्तम नाटके व्हायची. ही नाटकं करताना पात्र कुणाचं आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे राजा कोण, प्रधान कोण, राणी कोण, सेवक कोण हे कसं ओळखायचं? मग त्यासाठी ‘पर्सोने’ तयार केले गेले. पर्सोना म्हणजे मुखवटा. हे मुखवटे सगळ्यांना दिले गेले. हा राजाचा मुखवटा, हा राणीचा मुखवटा, हा प्रधानाचा तर हा शिपायाचा मुखवटा. त्यातून कळायला लागलं की हे पात्र नक्की कुणाचं आहे ते! हा जो ‘पर्सोना’ आहे त्यातूनच पुढं ‘पर्सनॅलिटी’ हा शब्द आला. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्त्व! आपल्या सगळ्यांना एक व्यक्तिमत्त्व असतं. ते वैचारिक, बौद्धिक तर असतंच पण शारीरिकही असतं. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं एक व्यक्तिमत्त्व असतं. एक चेहरा, मुखवटा असतो. इथं जमलेल्या प्रत्येकाला एक मुखवटा आहे, व्यक्तिमत्त्वही आहे. त्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार अशा संमेलनाच्या माध्यमातून व्यक्त होतो. यातून तुमचं व्यक्तिमत्त्व पुढं यायला हवं. यातूनच चांगले लेखक, कलाकार भेटतील.
साठे सर बीएमसीसीला प्राध्यापक आहेत. कालच मला सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांचा फोन आला. त्यांना बोलताना मी सहज सांगितलं की, ‘‘उद्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं साहित्य संमेलन आहे आणि मी संमेलनाध्यक्ष आहे.’’ त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी माझं अभिनंदन केलं. तेही बीएमसीसीला प्राचार्य होते. आजचे त्यांचे वय 88! आजही ते सातत्याने उत्तमोत्तम लिहितात. त्यांनी सांगितलं, ‘‘संदीप खर्डेकरला माझा नमस्कार सांगा...’’ आता संदीप खर्डेकर राजकारणात सक्रिय होऊन खूप दिवस झालेत. आज ते विद्यार्थी परिषदेतही नाहीत, पण ही ओळख विद्यार्थी परिषदेमुळे अशा नेत्यांना मिळते. यातूनच अनेक नेते तयार होतात. हे या विद्यार्थी परिषदेचं यश आहे. म्हणूनच यातून आणखी प्रज्ञावंत, कलावंत पुढे यायला हवेत. तुमचं क्षेत्र कोणतंही असेल, तुम्ही कुठलंही काम करा. माणूस म्हणून असलेलं ‘चांगुलपण‘च तुम्हाला तारून नेणार आहे एवढं लक्षात ठेवा. असं चांगूलपण ही खरी गौरवाची बाब असते.
आज याठिकाणी तुम्ही कवी संमेलन ठेवलं आहे. पथनाट्य सादर करत आहात. लघुचित्रपट आणि चित्रांची आर्ट गॅलरीही आहे. ही खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. यानिमित्तानं मुलांमधलं टॅलेंट पुढं येतं. तुम्ही लिहित रहा, वाचत रहा, नाचावंसं वाटतं नाचत रहा, गावंसं वाटतं गात रहा. ज्याला जे जमेल त्याने ते करावे. क्षमता असूनही काहीच न करणे हा एक मोठा सामाजिक गुन्हा आहे आणि आपण सर्वजण तो सातत्यानं करतोय. गाणं सुंदर गाता येतं पण गात नाही. वेळच नाही आपल्याकडं. छान कविता करता येते पण करत नाही. उत्तम कादंबरी लिहिता येते पण लिहित नाही. मग आपण दोष कुणाला देणार?
मगाशी सरांनी सांगितलं की, इथं असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची क्षमता आहे. हो, आहे! निश्‍चितच आहे! पण ती क्षमता दिसायला हवी ना? त्याची अभिव्यक्ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं तुमच्या क्षमता दाखवून द्यायला हव्यात. संस्कार जिवंत ठेवायचं पवित्र कर्तव्य आपण सार्‍यांनी मिळून पार पाडायला हवं. तरूणाई म्हणजे एक जाज्ज्वल्य आविष्कार, जबरदस्त उन्मेष! आपल्यात खूप काही आहे. प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेचा आपण राष्ट्राच्या भल्यासाठी उपयोग करायला हवा. सध्या हे चित्र दुर्मीळ दिसतंय. आपल्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. धर्माधर्मात आपण वाटले गेलोय. देश विकलांग होत चाललाय. म्हणजे आपण हे जातीय मोर्चे पाहतोय. कुणाचा थांगपत्ता कुणाला नाही. सगळ्या विचारधारा... त्याही लादल्या जातात. शब्दशः कुठल्याही विचारधारेला बळी पडू नकात. सगळे काही पडताळून पहा आणि मग अनुनय करा. म्हणजे, स्वामीजीच म्हणायचे, ‘‘आपल्या राष्ट्राला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही.’’ तर असे बौद्धिक क्षत्रिय खरोखर निर्माण व्हायला हवेत. म्हणजे धर्म कशात आहे? खरा धर्म कोणता? स्वामीजीच सांगतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’ स्वतःची ओळख पटणं, स्वतःच्या क्षमतांची जाणीव होणं तो खरा धर्म! स्वतःतल्या क्षमता ओळखायला हव्यात. त्या आणखी विकसित करायला हव्यात आणि त्यातून व्यापक राष्ट्राची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास आणायला हवी. म्हणजे अब्दुल कलामांनी सांगितलं, 2020 ला आपला भारत हा महासत्ता असेल. अरे, कसा असेल? आपण त्यासाठी निश्‍चित काय करतोय? आपले काय प्रयत्न आहेत? कोण कुठला कन्हैया कुमार उगवतो आणि राष्ट्रविरोधी घोषणा देतो. सैनिकांवर आरोप करतो. देश पेटवतो. त्याचे पडसाद पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतील फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत उमटतात. हे कसले भिकार लक्षण आहे? हे सगळं थांबायला हवं. आपली प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारी आहे.
सध्या सगळ्या क्षेत्रांचं बाजारीकरण झालंय. हे बाजारीकरण थांबायलाच हवं. म्हणजे मी अनेक ठिकाणी फिरत असतो. बरेचजण मला विचारतात, ‘‘तुमचे आईवडिल तुमच्याकडेच राहतात का?’’ मी सांगतो, ‘‘नाही, मी माझ्या आईवडिलांकडे राहतो.’’ स्वतःचे कुटुंब, आईवडील यांचीही आपण पर्वा करत नाही आणि जगाशी संपर्क वाढवायला निघालोय. मग भाजी बिघडलीय असं नवर्‍यानं सांगितलं तर बायको म्हणणारच, ‘‘असं कसं, याच भाजीला मला 300 लाईक आणि 102 कमेंट आल्यात. अनेकांच्या तोंडाला पाणीही सुटलंय.’’ घरात काय चाललंय, आजुबाजूला काय चाललंय, गावात काय चाललंय हे माहीत नसतं आणि यांच्या जगभरच्या चर्चा सुरू असतात. बराक ओबामानं असं करावं, नरेंद्र मोदींनी हे केलं, मायावती हे करताहेत, ममता बॅनर्जी ते करताहेत! अरे, आता तू काय करतोस हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे आपलं पडणारं प्रत्येक पाऊल विकासाच्या दृष्टिनं जायला हवं. आपण आधी ‘माणूस‘ म्हणून संपन्न व्हायला हवं. त्यासाठी आपले मुळात काय प्रयत्न आहेत? आपण सर्वजण विद्यार्थी आहोत म्हणून बोलतो... सगळ्यात मोठं ज्ञानकेंद्र कोणतं? तर विद्यापीठ!! महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या फक्त कुलगुरूंची नावं तुमच्यापैकी एकानं जरी सांगितली तरी मी माझं भाषण इथंच थांबवतो. एकही शब्द मी पुढं बोलणार नाही. कसले सल्ले देणार नाही, युवा पिढीची चिंता करणार नाही. कितीजण ही सगळी नावं सांगू शकतील? आहे तुमच्यापैकी कुणाला माहीत? मग ही शोकांतिका नाही का? यादृष्टिने काही विचार होणार का? ज्ञानकेंद्र दुर्लक्षित आहेत... इंग्लंडसारख्या राष्ट्रात तुम्ही गेलात तर ते सांगतील, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू; पण आमचा शेक्सपिअर आणि आमचं क्रिकेट आम्ही कुणालाच देणार नाही...’ याला म्हणतात अस्मिता! आपली भाषा, आपली संस्कृती, आपले खेळ यासाठी आपण काय करतोय? इथले मराठमोळे खेळ जिवंत रहावेत यासाठी कोणी काही प्रयत्न करतंय का? क्रिकेटवर तुम्ही जरूर प्रेम करा पण कबड्डीची काय अवस्था आहे हेही बघा. आपल्या खेळाडूंची, इथल्या मातीतल्या कलावंतांची काय उपेक्षा आहे ती बघा. याला कोणीच काही उत्तर देत नाही तर ही जबाबदारी एकमेकांवर ढकलतात. म्हणजे ही माझी जबाबदारी नाहीच! पण तसं नाही मित्रांनो! आपलं टॅलेंट ओळखायला हवं. आपल्यातल्या क्षमता जास्तीत जास्त विकसित व्हायला हव्यात. एक चांगलं राष्ट्र, एक चांगलं राज्य, एक चांगलं गाव आणि एक चांगलं कुटुंब निर्माण व्हायला हवं. अर्थात याची सुरूवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून व्हायला हवी. मला खात्री आहे, तुम्ही नक्कीच या दृष्टिनं एक पाऊल पुढं टाकाल. उत्तमोत्तम लिहित रहा. अभिव्यक्ती महत्त्वाची. तुमच्या साहित्याला ‘चपराक‘च्या माध्यमातून एक सशक्त व्यासपीठ मिळेल. साठे सर, मगाशी तुम्ही आजच्या विविध ‘डे’ज विषयी जे सांगितलं त्याचा मला अनुभव नाही. दहावीत असताना मी उत्तम वार्तांकन करत होतो आणि बारावीत असताना मी ‘चपराक’ सुरू केला. त्यामुळं परीक्षेपुरताच कॉलेजात गेलो. कॉलेजशी तसा काही फारसा संपर्कच नव्हता. म्हणून या सर्व ‘डे’ज पासून दूर राहिलो.
तुम्ही जर चांगलं शिकलात तर अशा उत्तमोत्तम संमेलनांचं आयोजन करू शकाल! आणि शिकण्याबरोबरच स्वतःतल्या क्षमता विकसित केल्या तर तुम्हाला माझ्यासारखं अध्यक्ष म्हणून या खुर्चिवर बसता येतं. अर्थात, शिक्षण महत्त्वाचंच आहे. विनोदाचा भाग सोडून द्या पण स्वतःला घडवा. आजकाल कुणीही तुमच्यासाठी काहीही करणार नाही. आता कोणताही परमेश्‍वर तुमच्या भल्यासाठी येणार नाही. आपण जे काही उत्तमोत्तम करू तेच सत्य आणि चिरंतन असणार आहे. ‘राष्ट्र’ ही संकल्पना खूप व्यापक असते. ती आपण सातत्याने समजून घेऊ! सुरूवात स्वतःपासून करू!
आपल्यापैकी कितीजण रोज किमान दहा मिनिट व्यायाम करतात? म्हणजे श्‍वासोच्छ्वास आपण कुणाला विचारून करतो का? तो ठरवून करत नाही तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे. तसेच रोज व्यायाम ही सुद्धा एक गरज आहे. रोज किमान अर्धा तास अवांतर वाचन ही गरज आहे. याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. सगळ्या जगाचा ठेका माझ्याकडेच आहे, मलाच जग सुधारायचंय अशा आविर्भावात आपण असताना आपण स्वचिंतन करत नाही. स्वविकास साधत नाही. स्वतःकडं आपण लक्षच देत नाही, ही शोकांतिका आहे. ती थांबवायला हवी. या संमेलनातून ते साध्य होईल, तुमच्यात ती जागृती निर्माण होईल, अनेक कलाकार पुढे येतील, त्यांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या तरूणाईचा हा हुंकार आहे. तो सर्वदूर पोहोचेल. यातून प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी अशी संमेलने होतील अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करतो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या येरवडा शाखेला धन्यवाद देतो आणि थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092