सामान्य माणसाच्या असामान्यत्वावरील श्रद्धा बळकट करणारे संजय वाघ यांचे ‘गंध माणसांचा’ हे पुस्तक जित्याजागत्या आदर्शांचे मनोरे उभारणारे आहे. हे पुस्तक ‘चपराक’च्या परंपरेत मानाचा तुरा ठरावे.
माणसाची अनंत रूपे आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळतात. प्रत्येकाच्या नाना तर्हा. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ असे आपण म्हणतो ते त्यामुळेच. मात्र यांच्यातील चांगुलपण हेरणे, ते समाजासमोर आणणे यासाठी निकोप दृष्टी लागते. मित्रवर्य संजय वाघ हे पंचवीस वर्षाहून अधिककाळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्यांच्याकडे अशी व्यापक दृष्टी आहे. गुणग्राहकता आहे. त्यामुळेच त्यांनी स्वत:च्या खिशाला झळ देऊन समाजातील काही रत्नं शोधली. त्यांच्यातील तेज जगाला दाखवून दिले. ‘स्वत:साठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तरच जगलास’, असे म्हणतात. अशा इतरांसाठी जगणार्या माणसांचा गंध ‘वाघां’ना येतो. मात्र हे वाघ त्यांची शिकार करण्याऐवजी त्यांच्यातील ‘दिव्यत्वाचे प्रकटीकरण’ घडवतात.
यातील प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे एक स्वतंत्र कादंबरी; मात्र ती नेमकेपणाने मांडण्याचे वाघ यांचे कसब थक्क करायला लावणारे आहे. महाभारतातील संजय जसे युद्धभूमिवरील वर्णन जिवंत करायचा अगदी त्याचप्रमाणे हा आधुनिक संजय सामान्य माणसाचा अलौकिक संघर्ष अलवारपणे उलगडून दाखवतो. जणू आपण त्या व्यक्तिला भेटतोय आणि त्याच्या आयुष्याचे सार जाणून घेतोय, असेच यातील व्यक्तिचित्रणात्मक लेख वाचताना शब्दाशब्दाला जाणवते. चांगुलपणावरील विश्वास घट्ट करणारे, बेचिराख झाल्यावरही पुन्हा जोमाने मुसंडी मारण्यासाठी प्रेरणा देणारे, प्रामाणिकपणा, जिद्द, सेवाभाव, दानत याचे जवळून दर्शन घडवणारे हे पुस्तक मराठी साहित्यातील एक जबरदस्त क्षमतेचे ‘टॉनिक’ ठरणारे आहे.
देवभूमी नाशिक हे संजय वाघ यांचे कार्यक्षेत्र. त्यामुळे हाच परीघ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील या कस्तुरीमृगांचा शोध घेतला. प्रतिकूलतेवर मात करत आपल्या अचाट कर्तृत्वाचा सुगंध दरवळत ठेवणार्यांना अचूकपण हेरत त्यांनी पत्रकारिता धर्माचे पालन केले आहे. इतकेच नाही तर ‘ध्येयाकडे वाटचाल करणारी माणसे मला माझ्या जातकुळीतली वाटली, त्यांचा आणि माझा रक्तगट एक वाटला’, असे ते आत्मीयतेने सांगतात. त्यांच्यातील मुळातच असलेले चांगुलपण त्यांना अशा ध्येयनिष्ठ माणसांकडे खेचून नेत असावे. त्याशिवाय अशी एकरूपता साधणे शक्य नाही.
मातीत पुरलेल्या एका निष्पाप ‘जाई’ला वाचवताना डॉक्टर देवीप्रसाद शिवदे या ‘धन्वंतरी’ने आरोग्यसेवेचा धर्म निभावला व परिचारिकारूपी ‘सिंधूताईंच्या लेकीं’नी खरोखर मातृधर्म पार पाडला. या ग्रंथातील हा पहिलाच लेख वाचताना डॉक्टरांना देवाची उपाधी का दिली जाते याचे भान येते. विधायक वृत्ती वाढवण्याबरोबरच समाजातील भयाण वास्तव वाघ यांनी प्रभावीपणे मांडले आहे. यातील लेख वाचताना अंगावर शहारे येतात, डोळे पाणावतात, अभिमानाने उर भरून येतो, काहीवेळा कुप्रवृत्तीविषयी रागही उफाळून येतो. म्हणजे एकंदर काय तर आपल्यातील माणूसपण जिवंत असल्याची खात्री पटते. ‘इगतपुरीतील शिवसेनेच्या पहिल्या तालुकाप्रमुखावर गाव त्यागण्याची वेळ का आली?’ असा बनतोड सवाल करताना भिका राजू बोडके या निष्ठावंताच्या नशिबी जे संन्याशाचे जिणे आले त्याची हेलावून टाकणारी कथा संजय वाघ यांनी मांडली आहे.
सत्प्रवृत्तींचा वारसा नेकीने जपणारे नेरकर दाम्पत्य, ‘अंजुमन’द्वारे बेवारस प्रेतांचे वारसदार होणारे हुसेनभाई शेख, जवळपास पंचेचाळीस लाख रूपये खर्च करून शिवरायांचे अश्वारूढ शिल्प साकारणारे भाऊसाहेब अहिरे, सरकारी दवाखान्यातील गरजूंना मोफत अन्नसेवा पुरवणारे गंगाराम पांडे, जलदान करून ‘जीवन’ जनास वाटणारे विलास सावंत, निर्मलग्रामसाठी चपलांचा त्याग करणारे आगळे वेगळे असे सिद्धार्थ आगळेे, वृद्धाश्रमात जीवन कंठणार्या असहाय्य पक्षिणीची आर्त हाक देणार्या कुसुमताई भडक, गजानन महाराजांचे परमभक्त असणारे वृत्तपत्र विक्रेते प्रल्हाद भांड यांची नाशिक ते शेगाव अशी सायकलवारीची दशकपूर्ती, गोदामात ग्रंथसंसार थाटून विनाअनुदानित वाचनालय चालवणारे जयंतराव कुलकर्णी, सर्पमित्र मनीष गोडबोले आणि 28 टाक्यांच्या वेदना सहन करून चोवीस तासात चौदा अंडी घालणार्या धामणीला जीवदान देणारे डॉ. संजय गायकवाड, सेवाभावी पुस्तक विक्रेते प्रा. मच्छिंद्र मुळे अशा अद्भूत आणि अफाट क्षमतेच्या लोकाविषयी वाचताना भारावून गेल्यासारखे होते.
संजय वाघ यांनी यापूर्वी 26/11 च्या हल्ल्यातील हुताम्यांवर पुस्तक लिहिले होते. देशभक्त, समाजभक्त यांच्या कीर्तीचे पोवाडे गाताना ते हरखून जातात. समाज इतकाही रसातळाला गेला नाही, अजून चांगुलपण टिकून आहे याची साक्ष पटवणारे त्यांचे लेखन आहे. सध्याच्या बजबजपुरीत असे लिखाण करणे, ते वाचले जाणे हे समाजाच्या सदृढ मानसिकतेचे लक्षण आहे. पैशाची, वेळेची, आरोग्याची पर्वा न करता गुणवंतांच्या आदर्शांचे पोवाडे गाणारे संजय वाघ सद्गुणांची पेरणी करत आहेत. आपले कर्तव्य पार पाडत सुट्टीच्या दिवशी कुशल कर्मवीरांना शोधून काढणारे वाघ समाजात सकस आणि निकोप विचार भक्कमपणे रूजवत आहेत. एका जागरूक पत्रकाराचे हे कार्य आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे.
ही यशोगाथा सदर स्वरूपात प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे शब्दांची मर्यादा सांभाळत त्यांनी मोजक्या शब्दात जो संदेश दिलाय त्याला तोड नाही. त्यांच्या लेखणीचा हा आविष्कार नवोदित पत्रकारांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. यातील कर्तृत्ववान व्यक्तिंचा गौरव करताना त्यांनी जो फॉर्म हाताळलाय तो भाषेच्या पातळीवर दखलपात्र ठरला आहे. उगीच शब्दांचे फुलोरे फुलवण्याऐवजी आणि आलंकारीक भाषेतून क्लिष्टता वाढवण्याऐवजी सामान्यातील सामान्य व्यक्तिला कळेल अशी शब्दयोजना त्यांनी केली आहे. त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालेला प्रबोधनाचा, जनजागृतीचा वारसा ते समर्थपणे चालवित आहेत. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि सामान्यातील सामान्य माणसाच्या जीवनाची विजयपताका सातत्याने डौलात फडकेल यात शंका नाही.
संजय वाघ यांनी या पुस्तकाच्या रूपाने मराठी साहित्यात मोठी भर घातली आहे. फक्त नाशिक जिल्ह्यात इतक्या ताकतीच्या व्यक्ती असतील तर आपल्या आजूबाजूला असे भरीव कार्य करणारे कितीजण आहेत, याचा शोध वाचकांनी घेतला पाहिजे. आपापल्या पातळीवर त्यांना शक्य ते सहकार्य केले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे. इतकी दृष्टी जरी या पुस्तकातून मिळाली तरी वाघ यांच्या लेखनाचे सार्थक होईल. भविष्यात त्यांनी असेच उत्तमोत्तम लेखन करावे यासाठी त्यांना हृदयापासून शुभेच्छा देेतो.
पाने - 128, मूल्य 130
‘चपराक प्रकाशन’, पुणे (7057292092)