'चपराक प्रकाशन', पुणे |
त्यांच्या अनेक कवितांत जगण्यातील अनुभव उतरले आहेत. आईच्या मृत्युनंतरची भावना शब्दबद्ध करताना ते हळवे होतात. ‘जपून ठेवल्यात तुझ्या अस्तित्वाच्या खुणा, आठवण येते तुझी पुन्हा पुन्हा’ असे ते सांगतात. जीवनाचे वास्तव टिपताना ‘उद्याचा सूर्य उगवेल की पुन्हा फितवेल’ अशी साशंकता त्यांच्या मनात आहे.
पोटात एक ओठावर एक
असे कधी वागलोच नाही
त्यामुळे
जवळचे कधी लांब गेले
कळलेच नाही
अशी आप्तस्वकियांबाबतची खंत ते व्यक्त करतात. ‘नाते मनाशी मनाचे’ या त्यांच्या कवितासंग्रहाच्या शीर्षकातूनच त्यांच्या कवितांचा ढाचा रसिकांच्या लक्षात येतो. कोणत्याही संस्कृतीत आदर्शांचे, मूल्यांचे जतन आणि संवर्धन करणे गरजेचे असते. संस्काराचा धागा बळकट करणारे साहित्यच मानवी मनात आशावाद पेरते. अशी अनेक चिंतनसूत्रे रमेश जाधवांच्या कवितांत आहेत. वाणगीदाखल त्यांची ‘आशा’ ही कविता पहा-
किती आली वादळे आणि संकटे
वादळात झेपावणार्या हातांमुळे
वाटले नाही एकटे
वाहणार्या मनास थांबवलं
संस्काराचं बीज रूजवलं...
हे संस्काराचं बीजच उद्याच्या पिढीच्या नीतिमत्तेचा वृक्ष डौलदार करतात. या संग्रहातील अनेक कविता मनाची दारं सताडपणे उघडणार्या आहेत. मनाचा गुंता सोडवणं अनेकांना शक्य नसतं. म्हणून कवी मनाचं दार बंद केल्यानंतर डोळे असून अंध असणार्यांना कुणालाही वेदनेचा गंध नसतो, हे काव्यात्म शैलीत वाचकांपुढे मांडतात.
रमेश जाधव यांच्या कविता फेसबुकसारख्या समाजमाध्यमातही वाचकप्रिय ठरल्या आहेत. यातून त्यांनी असंख्य माणसं जोडलीत. या माध्यमातूनच त्यांना अनेक ‘व्हर्च्युअल’ मित्र ‘ऍक्चुअली’ मिळालेत. ‘आभासी जग’ या कवितेतून ते समाज माध्यमाविषयी भाष्य करतात.
मृत्युसारखे चिरंतन सत्य स्वीकारणे भल्याभल्यांना जमत नाही. मृत्युच्या विचारानेही अनेकांच्या मनाचा आणि शरीराचा थरकाप उडतो; मात्र जाधव यांनी ‘माझी अंत्ययात्रा’ या कवितेद्वारे त्यांचे मृत्युविषयीचे चिंतनही धाडसाने प्रगट केले आहे. ही कविता वाचताना अनेकांना कविवर्य वसंत बापटांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
नका जमवू लोकांची जत्रा
नका काढू माझी अंत्ययात्रा
खांदा देऊन सोसू नका माझा भार
नको ते गळ्यात हार
लाकडे जाळून करू नका
निसर्गाची हानी
जाळण्यासाठी आहे ना
विद्युदाहिनी
नको ती रक्षा सावडणे
तेव्हा गरज असेल कुटुंबाला सावरणे
नको ते दहावा-तेराव्याचे विधी
त्यापेक्षा अनाथआश्रमात द्या निधी
इतक्या स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत त्यांनी या भावना मांडल्या आहेत. कोणत्याही कर्मकांडांना भाव न देणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली, तरीही श्रद्धायुक्त अंत:करणाने संस्काराची बीजे पेरणारी, सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारी, सामान्य माणसांच्या सुख-दु:खाचा वेध घेणारी, स्त्रियांचा सन्मान करणारी, जीवनाचे वास्तव अधोरेखित करणारी, शिक्षणाच्या बाजारावर प्रहार करणारी, वास्तवतेचे भान ठेवणारी आणि तरीही स्वप्नातच अडकून राहिलेली त्यांची कविता आहे. बळीराजापासून एकत्र कुटुंब पद्धतीपर्यंत आणि नारीशक्तीपासून ‘लोक काय म्हणतील?’ या खुळचट सवालांचा वेध घेण्यापर्यंतचे वैविध्य त्यांच्या कवितेत आहे.
मनाशी मनाचं जडलेलं हे नातं अत्यंत दृढ आहे. यातील कविता मुक्तछंदातील आहेत. या कवितांना कोणी कवितेचे तंत्र किंवा कवितेच्या व्याकरणाचे नियम लावले तर त्याची फसगत होईल. हृदयाच्या गाभार्यातून आलेल्या भावना त्यांनी त्यांच्या कवितेत व्यक्त केल्या आहेत आणि हेच त्यांचे सामर्थ्य आहे. प्रत्येक वाचकाला, रसिकाला या कविता त्यांच्याच मनातील सूर व्यक्त करताहेत असे वाटेल. यापेक्षा कवीचे आणि कवितेचे मोठे यश ते कोणते?
रमेश जाधव यांचा हा दुसरा काव्यसंग्रह. छंदबद्ध रचना, गीत, गझल अशा तंत्रशुद्ध कविता घेऊन ते पुन्हा वाचकांच्या भेटीस येतील याची मला खात्री आहे. त्यांच्या साहित्य प्रवासाला उदंड शुभेच्छा देतो आणि या क्षेत्रातील त्यांची कमान कायम चढती राहील, असा आशावाद व्यक्त करतो.
घनश्याम पाटील
संपादक-प्रकाशन
‘चपराक’ पुणे
मो. 7057292092