Saturday, June 18, 2016

‘लायब्ररी फ्रेंड फॉलो युवर हार्ट’

सागर कळसाईत (लेखक)
सागर कळसाईत हा आजचा आघाडीचा युवा लेखक आहे. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्याने ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या या कादंबरीच्या तीन वर्षात पाच आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत आणि लवकरच या कादंबरीवर आधारित एक चित्रपटही येतोय. सागरची ‘लायब्ररी फ्रेंड’ ही नवी कादंबरी येत्या मंगळवार, दि. 21 जून रोजी पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. ‘चपराक’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचीच या कादंबरीला प्रस्तावना असून ती खास ‘महानगर’च्या वाचकांसाठी. या कादंबरीसाठी संपर्क : 020-24460909/7057292092

‘कॉलेज गेट नाण्याची तिसरी बाजू’ या कादंबरीच्या अभूतपूर्व यशानंतर सागर कळसाईत या तरुणाचे नाव कादंबरी विश्‍वात ठळकपणे अधोरेखित झाले. मैत्री आणि प्रेम यात गुंतलेल्यांना खिळवून ठेवण्याचे काम ‘कॉलेज गेट’ने केले आणि अल्पावधीतच या कादंबरीच्या तब्बल चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. ‘आजचे तरुण काय वाचतात?’ या विषयावर ‘सकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने एक सर्व्हेक्षण केले. त्यातून तरुणांच्या आवडीची दहा पुस्तके जाहीर केली. प्रकाशक या नात्याने सांगण्यास अत्यानंद होतो की, सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी’नंतर दुसर्‍या क्रमांकाला आमच्या सागर कळसाईतची ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी होती. इतकेच नाही तर त्यावर लवकरच एक चित्रपटही प्रदर्शित होतोय. मराठी तरुणांची वाचनाची अभिरूची वृद्धिंगत करणार्‍या सागर कळसाईत या तरुण लेखकाविषयी साहित्य सृष्टीकडून प्रचंड अपेक्षा वाढल्या होत्या. जेमतेम पंचविशीत असलेल्या सागरने ही अपेक्षापूर्ती करत नवी कादंबरी मोठ्या ताकतीने वाचकांसमोर आणली आहे. प्रेम, कुटुंब आणि स्वप्नात अडकलेल्या आजच्या तरुणाईचा आलेख त्याने प्रस्तुत ‘लायब्ररी फ्रेंड’ या आपल्या कादंबरीत मांडला आहे.
सागरची भाषा कशी? तर जवळच्या मित्राने हक्काने आपल्याशी चर्चा करावी, वाद घालावेत किंवा पाठीवर धपाटे देत ‘सत्कार’ करावेत अशी! आजच्या तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनत, त्यांच्याच शैलीत अभिव्यक्त होत, संवादाच्या कक्षा व्यापक करत सागरची लेखणी प्रवाही राहते. एक अबोल प्रेमकथा मांडताना ‘लायब्ररी फ्रेंड’ आजच्या तरुणाईच्या भावभावनांचे शानदार प्रगटीकरण करते. कधी खुसखुशीत शैलीत तर कधी भावनिक होत तरुणाईच्या मनाचा कानोसा घेते. प्रेम, मैत्री, नातेसंबंध रंगवताना सागर समाजातील वास्तव रेखाटतो. यातील बर्‍याचश्या घटना, पात्रं हे त्याच्या परिघातलेच असल्याने त्यात जिवंतपणा आला आहे. मैत्रीसाठी जीव ओवाळून टाकणार्‍या मित्रांचे सुहृदयी वर्णन सागर खुमासदार पद्धतीने करतो. ‘कॉलेज गेट’नंतर लेखकाची मानसिकता, त्यासाठी उपसलेले कष्ट, थोडीफार झालेली फरफट, क्वचित प्रसंगी आलेले नैराश्य, वडिलांनी मनात पेरलेला आशावाद, दोस्तांची साथसंगत, मैत्रीत दुरावा निर्माण होत असताना त्यांचे साधलेले ऐक्य हे सारे काही ‘लायब्ररी फ्रेंड’मध्ये आल्याने रंजनातून प्रबोधन अशा पद्धतीची ही कलाकृती साकार झाली आहे. या कादंबरीत आजच्या तरुणांच्या भावभावनांचे प्रतिबिंब उमटल्याने ही कादंबरी म्हणजे आजच्या काळाचे प्रतिक ठरले आहे.
या कादंबरीतील प्रमुख पात्र असलेला मानव हा अस्मितावर नकळतपणे जीव ओवाळून टाकतो. त्याची स्वप्नप्रेमिका असलेली अस्मिता लायब्ररीत केवळ दूरदर्शनाने त्याची प्रेरणा बनते. पुस्तक लिहायची सुरुवात करण्यासाठी, संपलेल्या महाविद्यालयीन जीवनाची अनुभूती घेण्यासाठी मित्रांच्याच महत्प्रयासाने लायब्ररीत बसण्याची परवानगी मानव घेतो; मात्र प्रयत्नपूर्वक रोज दोन-तीन पानांच्या पुढे त्याची गाडी जात नाही. त्यातून नैराश्य येत असतानाच समोर बसलेली अस्मिता तिच्या मैत्रिणीला सांगते, ‘‘सचिन तेंडुलकरला सेंच्युरी करण्यासाठी पहिल्या रनाने सुरुवात करावी लागते.’’ नाजूक आवाजात मैत्रिणीला दिलेला सल्ला मानव स्वत:साठी म्हणून स्वीकारतो. प्रेम तर दूरच मात्र साधी मैत्रीही नसताना ती मानवची ‘शक्तिस्थान’ बनते. सहजपणे तिने इतरांशी साधलेले संवाद मानवच्या कानावर पडतात आणि त्यातून तो स्वत:ची दिशा ठरवत जातो. अस्मितावर ‘लव्ह ऍट फस्ट साईट’ असे प्रेम करणारा मानव ग्रंथपालाविषयी मात्र ‘हेट ऍट फस्ट साईट’ म्हणतो. त्यातच त्या ग्रंथपालाच्या प्रेमभंगाची कहाणीही सुरसपणे रंगवतो. एमबीए होऊनही नोकरी न करता पूर्णवेळ लेखन केल्याने जवळचे मित्र मानवला शिव्या घालतात; मात्र तो वडिलांची समजूत घालतो की या पुस्तकानंतर मी नोकरी करेन. आपला मित्र उमेश याला याबाबतची भूमिका सांगताना मानव प्रतिप्रश्‍न करतो, ‘एकाचवेळी दोन सशांच्या मागे धावणार्‍या शिकार्‍याला एकतरी ससा मिळेल का वेड्या?’
आपल्या समाजाला लागलेली जातीव्यवस्थेची कीड आरडी आणि दीक्षा यांच्या वाट्याला येते. ‘हे लग्न झाले तर मुलीच्या जीवाला धोका आहे’, अशी थाप एक ज्योतिषी मारतो आणि त्यात या जोडप्याची ससेहोलपट होते. अभिसह मानव या प्रवृत्तीवर घाव घालण्यासाठी प्रयत्नशील असतो. आजच्या समाजव्यवस्थेत अपरिहार्य ठरलेले हे दुर्दैवी वास्तव ठळकपणे अधोरेखित करताना लेखकाने प्रेमकथेच्या माध्यमातून कठोर प्रहार केले आहेत.
एमबीएनंतर सर्व मित्रांना जोडून ठेवण्यासाठी मानवला अनेक क्लृप्त्या सुचतात. त्यातून तो काही उद्योग करतो. सुरूवातीला गणपतीच्या मूर्ती विकण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी प्रत्येकजण पॉकेटमनी काढतो आणि सर्वजण मिळून खास पेणहून गणपती मूर्ती आणतात. वारजेत दुकान लावून त्या विकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे प्रयत्न मुळातून वाचण्यासारखे आहेत. समाजातील विविध प्रवृत्तींची झलक त्यातून दिसून येतेे. व्यवस्थापनशास्त्राचे पदवीधर असलेल्या या तरुणांना मात्र गणेशमूर्ती विकण्याच्या व्यवसायात आपटी खावी लागते. त्यात प्रयत्न करूनही पदरात अपयश पडल्याने वाचकांना जसे वाईट वाटते तसेच लेखकाने ते अपयश ज्या शैलीत सांगितले आहे ते वाचताना पुरेपूर रंजनही होते. ‘माणूस फक्त वेगवेगळ्या मूर्ती बनवतो. आकार बदलला की देवाचे नावही बदलते’ इतके शहाणपण या घाट्याच्या व्यवसायातून येते. ‘रंग देत असणार्‍या मूर्तीमध्ये देव आहे की मूर्तीकार स्वत: मन लावून करत असलेल्या कामामध्ये?’ असा तर्कशुद्ध विचारही लेखकाने मांडला आहे. पेणहून गणेशमूर्ती आणताना रस्त्यात पोलीस यांची गाडी अडवितात. त्यांच्या वाहनात मूर्तीशिवाय आणखी काही नाही ना हे तपासून पाहतात. या प्रकाराने झोपमोड झाल्याने माऊली मानवजवळ पोलिसांना शिव्या घालतो. तेव्हा मानव त्याला म्हणतो, ‘अच्छा... तुझी दोन-अडीच तासांची झोप मोडली! साल्या, ते पूर्ण रात्र आपल्याच सुरक्षिततेसाठी जागतात ना?’ आजच्या तरुणाईचे हे सामाजिक भान सागर कळसाईत या हरहुन्नरी लेखकाने अचूकपणे नोंदविले आहे.
गणेशमूर्ती विक्रीच्या ठिकाणी अनेक लोक मूर्तींचा भाव करतात; मात्र त्यांना ती जागा उपलब्ध करून देणारा पुढारी जेव्हा त्याच्या फौजफाट्यासह येतो तेव्हा तो राजकीय आविर्भावात सांगतो, ‘आम्ही देवाच्या मूर्तीची किंमत करत नाही.’ अनपेक्षितपणे मानवचे आई-वडिलही या दुकानात येऊन मूर्ती मागतात. तेव्हा मानवचा सहकारी त्यांना, ‘तुम्हाला सवलतीच्या दरात मूर्ती देतो काका’ असे म्हणतो. त्यावर तेही म्हणतात, ‘मला सवलत नको.’ वडिलांचा आवाज ऐकून मानव हर्षोल्हासित होतो. तेव्हा एमजे म्हणतो, ‘बघ ना, त्या आधारस्तंभानेही सवलत मागितली नव्हती आणि बाबांनीही सवलत नाकारली. त्या राजकारण्याने दिलेल्या पैशामागे त्याचा दिखाऊपणा होता. तर बाबांच्या सवलत नाकारण्यामागे त्यांचं प्रेम होतं. भलेही आपण राजकारण्याच्या मूर्तीमागे जरा जास्तच पैसे कमावले पण आई-वडिलांच्या प्रेमामुळे झालेला नफा अनमोल आहे यार.’
गणेशमूर्ती विक्रीतून नुकसान सहन करावे लागल्यानंतर सगळेजण थोडे नाराज होतात; मात्र मानव आशावाद सोडत नाही. कॉलेजमध्ये आल्यानंतर अस्मिताच्या हातात चॉकलेट बॉक्स पाहून त्याला हॅण्डमेड चॉकलेटच्या व्यवसायाची कल्पना सुचते. मुंबईतील मित्रमैत्रिणींना गाठून तो ती कला अवगत करतो. त्यासाठी हे मित्रमंडळ कामाला लागते. त्यातही ते सडकून मार खातात. दुसर्‍या व्यवसायातही अपयश आल्याने काही मित्र साथ सोडतात. मात्र मैत्रीचा धागा बळकट ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेला मानव कच खात नाही. पराभवाने डगमगत नाही.
एका कंपनीकडून 25 लाखाचे गिफ्ट मिळणार म्हणून तो मित्रांच्या नकळत 25 हजार रुपये त्या कंपनीच्या खात्यावर भरतो. त्यातून झालेली फसवणूक लक्षात आल्यानंतर मित्रही यथेच्छ धुलाई करून धडपड्या मानवचा ‘सत्कार’ करतात. या फसवणुकीची तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलिसही त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांप्रमाणे त्यांना हुसकावून लावतात. ‘चक्रीवादळाने निसर्गात कितीही थैमान घातलं तरीही माणसाला जास्त दु:ख होत नसेल. जिव्हारी लागतं ते आपलं घर बरखास्त झाल्यावर! इथे चक्रीवादळही मी स्वत:च होतो आणि घरही स्वत:च्या स्वप्नांचं होतं’ अशी प्रांजळ कबुली देत आजची तरुणाई कोणकोणत्या आमिषाला बळी पडते, कशी भरकटत जाते, संकटाच्या काळातही आपली नीतिमत्ता कशी टिकवून ठेवते हे सारे ‘लायब्ररी फ्रेंड’मध्ये यथार्थपणे रेखाटण्यात आले आहे.
कादंबरी लिहिण्यासाठी म्हणून मानव कॉलेजच्या लायब्ररीत नियमितपणे जात असतो. ते पाहून काही मित्र उमेशला सांगतात की, ‘मानवला अस्मितापासून दूर राहायला सांग.’ कारण त्याच कॉलेजमधील सुजित मागच्या काही वर्षांपासून अस्मिताच्या मागे असतो. उमेशकडून हा निरोप मिळताच मानव प्रेमवीराच्या आविर्भावात सुजितला दम भरायला त्याच्याकडे जातो; मात्र आपल्यापेक्षा धष्टपुष्ट, उंचेल्या, गोर्‍यापान सुजितला पाहून तो सांगतो की, ‘तू माझा कॉम्पिटेटर आहेस.’ सुजितही ते हसण्यावारी घेतो आणि हे दोघेही अस्मिताला पटवण्याच्या मागे लागतात. सुजित आणि मानव दोघेही अस्मिताला ‘लाईक’ करतात आणि दोघेही एकत्रच वावरतात याचे उमेशला आश्‍चर्य वाटते. तेव्हा सुजित खिलाडूवृत्ती दाखवत म्हणतो, ‘मुलीसाठी दोस्तीत कुस्ती नाय!’
धडधडणार्‍या प्रत्येक हृदयाला या कादंबरीत कुठे ना कुठे आपल्या मनाच्या भावना दिसून येतील. शहरी भागात राहूनही साडी नेसण्याची हौस असणारी साक्षी शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यातूनच समाजातील आजचे प्रश्‍न लेखकाने ठामपणे मांडले आहेत. ‘जनरेशन गॅप’ समजून घेतली तरी ही कादंबरी प्रेम आणि मैत्री या दोन्ही आघाड्यांवर अव्वल ठरते. सागर कळसाईत याने आजूबाजूच्या घटनांचे निरीक्षण करून त्या शब्दबद्ध करताना लेखणीचा सुंदर आविष्कार घडविला आहे.
एखादा तरुण लेखक लिहायला लागतो तेव्हा साहित्यातील ठोकळेबाज विचारसरणीच्या धेंडांकडून आणि प्रकाशन संस्थांकडून येणारे भलेबुरे अनुभवही या कादंबरीत आले आहेत. ‘फक्त पुस्तकात अखंड डुबून राहणार्‍या लोकांसाठी नाही तर सर्वसाधारण माणसांनाही वाचता येईल, वाचताना मजा घेता येईल आणि त्यातून एखादा विचार देता येईल’ अशी कलाकृती घडविण्याचे लेखकाचे स्वप्न असते. या कादंबरीद्वारे ते पूर्णत्वास आले आहे. ‘जेव्हा माणूस स्वत:च्याच मनाशी वैर घेतो ना, तेव्हा त्याला सोपी गोष्ट करणेही खूप अवघड होऊन जाते आणि तेच जर आपण स्वत:शी मैत्री केली तर अशक्य वाटणारी स्वप्नेसुद्धा आपण पूर्ण करू शकतो,’ असा प्रेरणादायी विचार मानवचे बाबा त्याला देतात आणि मानव ताळ्यावर येतो. ‘मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघे मिळून स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात,’ असा आवाज त्याला त्याचे हृदय देते आणि ही कादंबरी सशक्तपणे फुलत जाते. ‘सरळ झाड असले की पहिली कुर्‍हाड त्याच्यावर पडते. वाकड्या झाडांना कोणी तोडत नाही’ अशी अनेक चिंतनसूत्रे जागोजागी प्रभावीपणे या कादंबरीत मांडली आहेत.
आजच्या तरुणाईची प्रातिनिधीक भावना मांडताना, आजच्या तरुणाईची घुसमट व्यक्त करताना सागर कळसाईत याने या कादंबरीला सर्वोच्च स्थानावर नेले आहे. ‘दुनियादारी’, ‘शाळा’, ‘कॉलेज गेट’ अशा तरुणाईवरील कादंबर्‍यांच्या परंपरेत ‘लायब्ररी फ्रेंड फॉलो युवर हार्ट’ या कादंबरीने भर पडली आहे. भविष्यात कादंबरी क्षेत्रात सागर कळसाईत हे नाव विद्युल्लतेप्रमाणे तळपत राहील असा आशावाद व्यक्त करत सागर कळसाईत याला पुढील लेखनासाठी अंत:करणपूर्वक शुभेच्छा देतो!

घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’ पुणे
मो. 70572 92092

Tuesday, May 24, 2016

विवाहसंस्थेतील ‘स्फोट’क ‘अतिरेक’ टाळा!



परवा पत्रकारितेचे प्रशिक्षण घेणारे काही मुलेमुली 'चपराक' कार्यालयाला भेट द्यायला आले होते. तेव्हा अवांतर चर्चा करताना अनिल काळभोर नावाच्या एका विद्यार्थ्याने एक किस्सा सांगितला.
पुण्याजवळील लोणी काळभोर येथे बापूसाहेब गणपत गाडे नावाचे एक गृहस्थ होते. लोणी गावात मंडईजवळ त्यांचा चहा विक्रीचा गाडा होता. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या पत्नीला अर्धांगवायु झाला होता. बापू पत्नीची खूप सेवा करायचे. स्वयंपाक बनवण्यापासून ते पत्नीला आंघोळ घालणे, नंतर साडी नेसवणे हे सारे ते आनंदाने करायचे. एके दिवशी दुपारी पत्नीशी बोलत असताना ती काहीच प्रतिसाद देईना. जवळ जाऊन बघितले तर त्यांनी देह सोडलेला! बापू अस्वस्थ झाले. त्यांनी पत्नीला आंघोळ घातली. आपल्या लग्नातील नऊवारी साडी नेसवली. मळवट भरला. सर्व दागदागिने घातले. तेवढ्यात शेजारची एक लहान मुलगी आली. आजीला त्यांनी इतके सजवलेले बघून तिने त्यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी शांतपणे त्या मुलीच्या हातात दहा रुपये दिले आणि तिला भेळ आणायला पिटाळले. मुलगी घराबाहेर जाताच त्यांनी स्वतः गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येचे आम्ही कधीही समर्थन करत नाही. आम्हाला हा पळपुटेपणा वाटतो; मात्र आपल्या आजारी पत्नीची इतकी सेवा करणारा आणि त्या वियोगात स्वतःला संपवणारा माणूस पाहून हेलावून गेलो. बापूंच्या पत्नीनिष्ठेला आमचे वंदन! समाजात असलेली अशी माणसे हेच आपल्या संस्कृतीचे बलस्थान आहेत. सहजीवनातील ही एकरूपता आणि एकमेकांवरील निस्सीम प्रेम, श्रद्धा कुणालाही लुभावणारी आहे. मुमताजसाठी थडगं बांधणार्‍यापेक्षा बापू गाडे यांचे प्रेम सर्व पातळ्यांवर म्हणूनच श्रेष्ठ ठरते. सध्या विवाहसंस्था, कुटुंबसंस्था धोक्यात आल्या असताना अशी दुर्मीळ उदाहरणे ऐकून वाळवंटातही पाण्याचा झरा दिसतो.
मध्यंतरी कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलूर शहरातील एक बातमी वाचण्यात आली. एका उच्चशिक्षित मुलीचे लग्न ठरले. लग्नासाठी वरपक्षाकडील वर्‍हाडी मंगल कार्यालयात आले. रात्रीच्या जेवणात त्यांना मटण बिर्याणी हवी होती; मात्र वधुपक्षाने तीस किलो चिकन बिर्याणी मागवली. वरपक्षाने मटण बिर्याणीची फर्माइश केली. आता एवढ्या रात्री मटण कुठे मिळणार नाही म्हणून वधुपक्षाने कशीबशी समजूत घातली. दुसर्‍या दिवशी सकाळीही चिकण बिर्याणीच खायला दिल्याने कडाक्याची भांडणे सुरू झाली. मटण उपलब्ध नसल्याने वधूपक्ष हतबल झाला होता आणि ते मिळत नसल्याने वरपक्ष हातघाईवर आला होता. दोन अडीच तास त्यावरून खडाजंगी झाल्यानंतर नवरी मुलगी पुढे आली आणि तिने सांगितले, ‘अशा भांडकुदळ लोकांच्या घरी मी लग्न करून जाणार नाही.’ मुलीचा हा आक्रमक पवित्रा पाहून वरपक्ष शांत झाला आणि लग्नमुहूर्त टळून गेल्याने अक्षता टाकण्यासाठी त्यांनी आग्रह धरला; मात्र मुलगी आपल्या हट्टावर कायम राहिली आणि वरपक्षाला अपमानित होऊन उपाशीपोटीच परत जावे लागले. तीस किलो मटण बिर्याणीसाठी लग्न मोडण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.
पुण्यातील अलका सिनेमागृह चौकात भारती विद्यापीठाची इमारत आहे. त्या इमारतीत कौटुंबीक न्यायालय आहे. तिथे घटस्फोटासाठी येणार्‍या जोडप्यांशी संवाद साधला तर आश्‍चर्य वाटते. लग्न होऊन केवळ दीड महिना झालेला. नवरा कामावरून परत येत असताना गाडी चालवत असल्याने त्याने घरून आलेला बायकोचा फोन घेतला नाही. झाले! एवढ्याशा कारणावरून बायकोने घटस्फोट मागितला. लग्नापूर्वी महाविद्यालयीन जीवनात एका कार्यक्रमात समूह फोटो काढताना आपली बायको एका मुलाच्या अगदी जवळ थांबलीय, या कारणाने एका मुलाने बायकोला सोडचिठ्ठी दिल्याचे प्रकरणही कानावर आले होते. अशा फुटकळ कारणावरून वेगळे होणारे महाभाग बघितले की, बापूंच्या पत्नीनिष्ठेला सलाम करावाच वाटतो.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात पैसा खुळखुळतोय. नवरा बायको दोघेही कमावते. कामाच्या वेळाही निश्‍चित नाहीत. घरी आल्यानंतरही मोबाईल, लॅपटॉप या माध्यमातून कार्यालयीन आणि व्यावसायिक घडामोडी सुरूच असतात. त्यामुळे एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. एकमेकांना समजून घेता येत नाही. मुलींच्यात निर्णयक्षमता आहे. त्यांना स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याची जाणीवही आहे. त्यामुळे त्या कोणत्याही कारणास्तव तडजोड करण्यास तयार नसतात. मुलेही काहीवेळा अति ताणतणावामुळे व्यसनाच्या आहारी जातात. पुण्यामुंबईसारख्या महानगरात तर रोज मद्यपान आणि धुम्रपान करणार्‍या मुलींची संख्याही कमी नाही.
अशा सर्व परिस्थितीत घरातील ज्येष्ठांनी दिलेले सल्लेही यांना पटत नाहीत. ‘आमच्या मर्जीचे आम्ही मालक’ या भूमिकेतून ही नवविवाहीत मंडळी वावरत असतात. ज्येष्ठांचीही एक गफलत होते. सर्व पालकांना त्यांच्या मुलींच्या जन्मानंतर पक्के ठाऊक असते, की एक दिवस ही लग्न करून दुसर्‍याच्या घरी जाणार. त्यामुळे त्यांची तशी मानसिकता झालेली असते; मात्र आपला मुलगा त्याच्या लग्नानंतर त्याच्या संसारासाठी म्हणून वेगळा राहिल हे सत्य पचवणे त्यांना जड जाते. जर तुम्ही मुलीच्या संसारासाठी त्यांची सासरी पाठवण करता तर एखाद्या मुलाला वेगळे रहावेसे वाटले तर आडकाठी कशासाठी? एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व न जाणणार्‍या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार अवश्य वेगळे राहू द्यावे. त्यातूनच त्यांना जगरहाटी कळेल. अर्थात तरूण मुलांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना वेगळे करावे, असे आम्हास म्हणायचे नाही! मात्र जर अशा कारणामुळे कुटुंबच उद्ध्वस्त होणार असेल, तर एकत्र राहून तरी काय फायदा? वेगळे राहून जर एकमेकांतील प्रेम, जिव्हाळा जोपासता येत असेल, नाती टिकवता येत असतील तर अशा गोष्टींचा बागुलबुवा कुणीही करू नये. ‘जन्मताना एकटाच आलोय आणि जातानाही एकटाच जाणार’ हे चिरंतन सत्य प्रत्येकाने ध्यानात ठेवावे.
स्त्री-पुरूष संबंध ही शारीरिक गरज तर आहेच; पण त्याहून अधिक ती मानसिक गरज आहे. शरीराच्या गरजा भागवताना मनाच्या कोंडमार्‍याचा विचार कुणी फारसा गांभिर्याने करताना दिसत नाही. आपल्यासाठी सर्व नाते सोडून आलेली मुलगी किती महान असणार? तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे हे मुलाचे कर्तव्यच आहे! आणि आपल्याला आयुष्यभराची साथ देणारा मुलगाही किती मोठा असणार? त्याचे मन जपणे, दोघांनीही एकमेकांचे नाते आणि नातेवाईक जपणे, सुखदुःखात भक्कम साथ देणे हेच तर सांसारिक जीवनाचे खरे यश आहे. एखाद्याला ‘कॅन्सर’ झाला तरी तो आयुष्यातून ‘कॅन्सल’ होतोच असे नाही, मात्र एखाद्याचा ‘घटस्फोट‘ झाला तर आपल्या संस्कृतीच्या आणि नैतिकतेच्या चिंधड्या उडवणारे ‘स्फोट‘ मात्र नक्कीच घडतील! विवाहसंस्था उद्ध्वस्त करू पाहणार्‍यांनी बापूसाहेब गाडे यांच्यासारख्यांचे आदर्श ठेवून जीवनातील अतिरेक टाळावा, हेच बरे!!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Friday, May 13, 2016

गडहिंग्लजचा ‘समाजभान पॅटर्न’!


काळाप्पान्ना तोरगल्ली! कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या गावचे एक निवृत्त कर्मचारी. त्यांना वृत्तपत्रे आणि मासिके वाचण्याचा छंद. त्यातून ते विधायक कार्य करणार्‍या लोकांची यादी तयार करत. आपल्या दैनंदिनीत त्यांची नावे आणि कामाचे स्वरूप यांचा तपशील लिहायचा त्यांचा नित्यक्रम. पुढे त्यांना अर्धांगवायू झाला. मग त्यांनी ठरवले, आजवर ज्यांच्या कामाची दखल दैनंदिनीत घेतलीय त्यांना आपली संपत्ती दान करायची. झाले! त्यांनी घरात हा निर्णय सांगितला. पत्नी विजयाबाई आणि घरातील इतर सदस्यांनी कसलीही खळखळ न करता तो मोठ्या मनाने मान्य केला. मग काय? ही जबाबदारी आली सूनबाईंवर. त्यांनी त्याचे नियोजन करावे.
उत्तूरचे निवृत्त प्राध्यापक, लेखक आणि उत्तम समाजभान असलेले प्रा. श्रीकांत नाईक हे या सूनबाईंचे शिक्षक. त्यामुळे त्यांनी नाईक सरांकडे धाव घेतली. आपल्या सासर्‍यांना काही संपत्ती विविध सेवाभावी संस्थांना दान करायची असल्याचे त्यांनी सांगितले. नाईक सरांनी हे काम करावे अशी त्यांची अपेक्षा. त्यांची तळमळ बघून नाईक सर काळाप्पाना भेटायला गेले. त्यांना वाटले दहा-वीस हजार ते एखाद्या संस्थेला देणार असतील!
काळाप्पांनी त्यांची दैनंदिनी दाखवली. अर्धांगवायूमुळे त्यांचे लेखन थांबले होते. मात्र ते वृत्तपत्रे आणि मासिके कुणाकडून तरी वाचून घेत आणि विधायक कामे करणार्‍यांच्या नोंदी ठेवत. त्यांनी नाईकांना आपली डायरी दाखवली आणि काही व्यक्ती व संस्थांना मदत करायचे असल्याचे सांगितले. ही मदत नाईकांनी संबंधितांपर्यंत पोहोचवावी अशी गळ घातली. नाईकांनी कागद बघितला. त्यावर काही नावे आणि रकमा लिहिल्या होत्या. आनंदवन पन्नास हजार, सिंधुताई सपकाळ पन्नास हजार, विकास आणि प्रकाश आमटे प्रत्येकी पन्नास हजार, नगरजवळील राजेंद्र धामणे पंचवीस हजार, हेल्पर्स ऑफ हॅन्डीक्राफ्ट या कोल्हापूरातील संस्थेला पन्नास हजार.... अर्धांगवायूमुळे शरपंजरी पडलेल्या या माणसाचा हा निग्रह आणि समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव पाहून नाईक थक्क झाले.
त्यांनी विचार केला, या सगळ्यांना ही मदत नेऊन देण्याऐवजी जर आपल्याला या मान्यवरांना काळाप्पांची भेट घालून देता आली तर...? ते कामाला लागले. या सर्वांना ही परिस्थिती सांगितली. आमटे बंधू आले. सिंधूताई आल्या. ‘मंदिर-मस्जिदींच्या दगडविटांच्या कामाला मदत करण्याऐवजी या लोकांच्या कामात देव दिसल्याने त्यांना हातभार लावायचाय...’ असे काळाप्पाना नाईकांना सांगत. या ‘देवां’ची समक्ष भेट त्यांना घडली. आपण ज्यांना फुल ना फुलाची पाखळी देणार आहोत त्यांना आपल्या घरी आलेले बघून काळाप्पाना भारावले.
पुढे काळाप्पांना देवाघरी गेले. मागे पत्नी श्रीमती विजयाताई तोरगल्ली आहेत. काळाप्पांनी शेवटच्या क्षणी शब्द घेतला, या दैनंदिनीत ज्यांची ज्यांची नावे आहेत त्यांना जमेल तशी मदत करा. तुम्हाला आणखी कुणी सकारात्मक काम करणारे दिसले तर त्यांनाही मदत करा... विजयाताईंनी त्यांना वचन दिले. आजही त्या वचनाची पूर्ती करत आहेत. काळाप्पानांच्या निधनानंतरही त्यांनी त्यातील अनेकांना मदत केली. प्रा. श्रीकांत नाईक त्यांना याकामी मदत करतात. बटकडल्ली आडनावाच्या एका विद्यार्थ्याला दिल्लीहून एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. सोबत लॅपटॉप असणे बंधनकारक होते. त्याच्या वडिलांची अचानक नोकरी गेलेली. परिस्थिती बेताचीच. केवळ लॅपटॉपअभावी त्याची ही संधी जाणार हे कळताच विजयाताईंनी नुकतेच त्याला बोलवून घेऊन तीस हजार रूपये दिले. तो दिल्लीला गेला आणि त्याच्या आयुष्याचेही सोने झाले. आता त्यांना अभय बंग यांना पन्नास हजार रूपये द्यायचे आहेत; मात्र बंग तालुक्यातील एका संस्थेच्या पूर्वीच्या काही गैरसमजामुळे गडहिंग्लजला यायचे टाळत असल्याचे कळते. डॉ. बंगांवर प्रेम करण्याचा अधिकार आम्हाला नाही का? एखाद्या संस्थेमुळे ते आम्हाला का अव्हेरतात? असा सवाल प्रा. नाईक करतात. या माध्यमातून कै. काळाप्पांनाचा दृष्टिकोन आणि त्यांच्या पवित्र भावना त्यांच्यापर्यंत जाव्यात अशी त्यांची इच्छा आहे.
या काळाप्पांनाकडून प्रेरणा घेतल्यानंतर प्रा. नाईकही जिद्दीला पेटले. मुळातच त्यांचा धडपड्या स्वभाव. वंचित, उपेक्षित यांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर. त्यात हा पर्वतासमान माणूस जवळून बघितलेला. प्रा. श्रीकांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, लेखक सदानंद पुंडपाळ, टी. के. पाटील, शैलेंद्र आमणगी, देशभूषण देशमाने, उद्योजक बाळासाहेब हजारे, बँकेतील निवृत्त कर्मचारी पी. एस. कांबळे या मंडळींनी समाजसेवेचा धडाका लावलाय. ‘कमी तिथे आम्ही’ आणि ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे त्यांचे सूत्र. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात या मंडळींनी विधायक कामाचा आदर्श ठेवलाय. त्याचा कसलाही गाजावाजा ते करत नाहीत. या ‘समाजभान अभियाना’त त्यांना त्यांचे अनेक विद्यार्थी मदत करतात. हा ‘गडहिंग्लज पॅटर्न’ राज्यभर राबवला गेला पाहिजे. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता जर असे काही प्रयत्न केले गेले तर राष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल.
काय आहे हा पॅटर्न? या मंडळींनी असे कोणते प्रयत्न केले?
काही उदाहरणे पाहूया!
चांगल्या कामाला मदत करायची वृत्ती असावी लागते. ती असेल तर मोठ्यात मोठे काम उभे राहू शकते अशी यांची श्रद्धा! त्यामुळे कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे निर्माते एकनाथजी रानडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी एक योजना राबवली. प्रत्येकाने ‘दाता’ व्हावे, त्याच्यात समाजभान निर्माण व्हावे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही प्रत्येकी एक रूपया सामाजिक कार्याला द्यायचा. त्यापेक्षा जास्त रक्कम कुणाकडूनही स्वीकारली जाणार नाही. हा रूपया का द्यायचा हे मुलांनी त्यांच्या पालकांना घरी सांगायचे. गलेलठ्ठ पगार घेणार्‍या शिक्षकांनीही प्रत्येकी फक्त एक रूपया द्यायचा. भविष्यात या एक रूपयाला स्मरूण जिथे जिथे काही विधायक काम सुरू आहे आणि आपण सहज मदत करू शकतो तिथे मदत करायची, असा संकल्प प्रत्येकाने करायचा. एकेक रूपया गोळा करणे सुरू केले आणि बघता बघता तब्बल एकेचाळीस हजार रूपये जमले. ते मग त्यांनी ‘आनंदवन’ला पाठवले.
दुसरा उपक्रम रद्दीचा! ‘रद्दीतून बुद्धिकडे’ हे सूत्र. त्यांनी आवाहन केले की, तुमच्याकडील रद्दी टाकून देऊ नका. त्यातून तुम्हाला फार काही मिळत नाही. ती आमच्याकडे द्या. रद्दी विकून जे काही पैसे येतील त्यातून आम्ही विधायक कार्य करू! गरजूंना मदत करू! या आवाहनातून तब्बल पस्तीस हजार रूपयांची रद्दी जमली. ते पैसे त्यांनी हेमलकसा येथील आश्रमशाळेला पाठवले.
श्रीकांत नाईकांनी त्यांच्या मित्रांना आवाहन केले. शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री यांनी दर सोमवारी भात खाणे सोडण्याचे आवाहन देशबांधवांना केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आपण दिवसभरातील अर्धा कप चहा सोडूया! अर्धा कप चहाला किमान पाच रूपये लागतात. म्हणजे वर्षभरात 1825 रूपयांची बचत. यातून ‘समाजभान’ ठेऊन प्रत्येकाने ते पैसे त्याला हवे त्याप्रमाणे विधायक कार्यासाठी खर्च करायचे. ते कुणाला द्यायचे? किती द्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे; पण वर्षात एकदा बैठकीत त्याने त्याचा तपशील सांगावा. साधारण दोन हजार रूपये प्रत्येकी ‘समाजधन’ मिळू लागले. यातून त्यांचे ‘समाजभान’ दिसू लागले.
गडहिंग्लजचे साधारण वीस व्यापारी आहेत. या मंडळींनी त्यांची भेट घेतली. त्यांना सांगितले, तुम्ही महिन्याला फक्त शंभर रूपये समाजासाठी द्या. अन्य कोणत्याही धार्मिक उत्सवाची वर्गणी दिली नाही तरी चालेल; पण महिना फक्त शंभर रूपये समाजधन द्या! या सामाजिक ऋणातू
उतराई व्हा! व्यापारी बांधवांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. या परिसरातील निवृत्त कर्मचार्‍यांचे या मंडळींनी संघटन केले. प्रत्येकाला सांगितले, आता तुम्ही नोकरीत नाही. तरीही सरकारच्या कृपेमुळे तुम्हाला निवृत्ती वेतन मिळते. त्याचा विनियोग विकासकामासाठी करा. प्रत्येकाने वर्षाला फक्त पाचशे रूपये द्या. त्यातून आपण काही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ. गरजूंना मदत करू. कलाकारांना व्यासपीठ देऊ. जे आजारी आहेत आणि ज्यांची क्षमता नाही त्यांना वैद्यकीय मदत, वैद्यकीय उपकरणे देऊ. ही योजनाही फळाला आली. ‘रसिका तुझ्याचसाठी’सारखा बहारदार कार्यक्रम त्यातून सुरू झाला. निवृत्तांना आनंद मिळेल असे कार्यक्रम यातून सुरू झाले. कुणी सभासदाने एखाद्याची गरज सांगितली तर सगळे मिळून त्याला मदत करू लागले.
प्रा. श्रीकांत नाईक यांनी आणखी एक फार मोठे कार्य केले. मुळात ते शिक्षक. त्यामुळे वाचनाची त्यांना न आवरण्याइतकी हौस. यातून त्यांना तालुक्यात काही ग्रंथालये असावित असे वाटू लागले. मग त्यांनी त्यांच्या हितचिंतक आणि विद्यार्थी मित्रांना त्यासाठी तयार केले. छोट्या गावात ग्रंथालय सुरू करायला किमान तीनशे पुस्तके लागतात. नाईक सरांनी या सगळ्यांना पदरमोड करून प्रत्येकी दोनशे पुस्तके दिली. पन्नास वर्षात त्यांनी जी दुर्मीळ पुस्तके जतन करून ठेवली होती तो ठेवाही त्यांनी या ग्रंथालयांकडे सुपूर्त केला. रविंद्र पिंग्यांनी नाईकांना सांगितले होते, ‘वाचून झालेल्या पुस्तकांची रद्दी घरात नको. जी पुस्तके पडून राहणार आहेत ती इतरांना वाचायला द्यावीत...’ हा मंत्र ध्यानात घेऊन नाईक सरांनी थोडी थोडकी नव्हे तर चार लाख रूपयांची पुस्तके दान केली. त्यातून ही ग्रंथालये उभी राहिली. त्यांच्याकडे आज हजारो पुस्तके झालीत. सरकारचे अनुदान मिळतेय. या परिसरात ही ज्ञानकेंद्रे अनेकांची वाचनाची भूक भागवतात. श्रीकांत नाईक हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत.
आजरा तालुक्यातील चिमणे हे एक छोेटेसे गाव. तेथील परेशराम कांबळे हा नाईक सरांचा विद्यार्थी. तो खाऊन-पिऊन सुखी आहे. नाईकांनी त्याला सांगितले, ‘काम प्रामाणिक केले की लोक आठवण ठेवतात. तू ग्रंथालय सुरू कर. सगळी संदर्भ पुस्तके उपलब्ध करून दे. ललित, वैचारिक पुस्तके ठेव. दर्जेदार पुस्तकांसाठी आणि कोणत्याही संदर्भासाठी या परिसरातील विद्वानांनी तुझ्याकडे आले पाहिजे.’
कांबळेंनी सल्ला ऐकला. त्याने गुरूऋण दाखवत आग्रहाने नाईक सरांनाच या ग्रंथालयाचा अध्यक्ष केले. नाईक सरांनी चेन्नईतील राजाराम मोहनरॉय ग्रंथालयाकडे पाठपुरावा करून या ग्रंथालयाच्या इमारतीसाठी साडेचार लाख रूपये मिळवले. आज चिमणे गावात ‘सकाळ सार्वजनिक वाचनालया’ची स्वतःची इमारत उभी आहे. या ग्रंथालयाला नाईक सरांनी एक लाख रूपयांची पुस्तके दिली.
आजरा तालुक्यातील मलिगरे हे असेच एक छोटेसे गाव. लोकवस्ती साधारण हजाराची. या गावात रमेश इंगवले हा सरांचा विद्यार्थी राहतो. त्याचा सिमेंटचा छोटासा व्यवसाय आहे. गावात शेती आहे. त्याच्या घरात लग्न, बारसे, वाढदिवस असा कोणताही कार्यक्रम असेल तर तो किमान पाचशे पुस्तके इतरांना भेट देतो. या दर्जेदार पुस्तकांवर वाचक तुटून पडतात. नाईक सरांनी कोल्हापूरच्या ‘अभिनंदन प्रकाशन’च्या मदतीन या तीन तालुक्यात साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या किमान एक लाख प्रती वाटल्या आहेत. उत्तुरला ते दरवर्षी ‘संत ज्ञानेश्‍वर लोकशिक्षण व्याख्यानमाले’चे आयोजन करतात. साधारण दीडएक हजार लोक त्याचा लाभ घेतात. इतके उत्तम वक्ते आणि त्यांना दाद देणारे दर्दी ‘कानसेन’ हे चित्र उत्तुरमध्ये दिसते.
आज आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठीही सरकारवर अवलंबून राहतो. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांना दुषणे देतो. मात्र या देशाचे ‘सजग नागरिक’  म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत की नाही? इतक्या छोट्या छोट्या कृतीतूनही मोठे काम उभे राहू शकते हे गडहिंग्लजच्या मंडळींनी दाखवून दिले आहे. त्यांचा हा आदर्श इतर तालुक्यांनी घ्यायला हवा. त्यातूनच आपल्या राष्ट्राची संपन्नतेकडे वाटचाल सुरू राहणार आहे. प्रा. श्रीकांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, सदानंद पुंडपाळ, टी. के. पाटील, शैलेंद्र आमणगी, देशभूषण देशमाने, बाळासाहेब हजारे, पी. एस. कांबळे आणि त्यांना सहकार्य करणार्‍या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा ‘समाजभान’ पॅटर्न राज्यभर, देशभर राबवला जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Sunday, May 8, 2016

अपेक्षांचे ओझे घातक!


प्रत्येक पालकांना वाटते की आपल्या मुलाने खूप शिकावे. रग्गड पैसा कमवावा. बंगला बांधावा, आलिशान सदनिका विकत घ्यावी. परदेशी बनावटीची गाडी त्याच्या घरासमोर असावी. ‘इंडिया विरूद्ध भारत’ या स्पर्धेत तो ‘इंडिया’तच असावा आणि गर्भश्रीमंतीत त्याने त्याचे आयुष्य व्यतिथ करावे.
पाल्याचे हित चिंतणे, त्याला त्या दृष्टिने घडविणे, तशा अपेक्षा ठेवणे यात गैर ते काय? मात्र सध्या या अपेक्षांच्या ओझ्याने कोवळ्या वयातच मुलांची कंबरडी मोडत आहेत. त्याची क्षमता न पाहता त्याच्याकडून इतक्या अपेक्षा केल्या जातात की, या स्पर्धेत कुबड्या घेऊन चालणेही त्याला अशक्य व्हावे! त्यात नैराश्याने ग्रासून आलेले मानसिक पंगुपण कायम राहते.
मुलं सुसंस्कृत झाले काय किंवा न झाले काय, त्यांनी सुशिक्षित मात्र झालेच पाहिजे असा कल दिसतो. आपल्या पाल्याने आयआयटीत जावे यासाठी चाललेली पालकांची धडपड पाहून आश्‍चर्य वाटते. राजस्थानातल्या कोटा शहरात अशा वर्गांचे पेव फुटले आहे. त्याठिकाणी तब्बल दीड लाख विद्यार्थी विविध वर्गातून आयआयटीची तयारी करतात. त्यांच्यात जीवघेणी स्पर्धा असते. या स्पर्धेतून तिथे गेल्यावर्षी 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मग आपली दिशा कोणती? पालकांना नेमके काय हवे? रविकुमार सुरपूर हे तिथले जिल्हाधिकारी. त्यांनी शिकवणी वर्गांच्या प्रमुखांसाठी भावनिक आवाहन करणारे एक पत्रक काढले. मुलांनी स्पर्धेचा अतिरेक करू नये, आपली आवड पाहून क्षेत्र निवडावे, आयुष्य मोलाचे आहे आणि आयआयटीतून अभियंता होणे म्हणजेच सर्वकाही नाही, हे त्यांनी ठासून मांडले आहे. तरीही पालक जागे होत नाहीत. अवास्तव अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलं जिकिरीला येतात. त्यासाठी अट्टाहास करतात आणि तोंडघशी पडतात.
सध्या मुलांना सुट्ट्या सुरू आहेत. पूर्वी सुटट्यात आपली धमाल असायची. मामाच्या गावला जाऊन चंगळ करायचे हे दिवस.  विविध शारीरिक खेळ, बौद्धिक गमतीजमती असे सारे काही चालायचे. मात्र आजची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलीय. फेसबुक, व्हॉटस् ऍप, इंटरनेटवरचे खेळ यातच त्यांना स्वारस्य वाटते. सुटीच्या काळात खेळापेक्षा पुढच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जातेय. पूर्वी या दिवसात काही शिबिरे व्हायची. त्यांची जागाही अशा अभ्यासक्रमांच्या शिकवणी वर्गांनी घेतलीय. यातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास कसा घडणार?
ध्येयवादी तरूणांपेक्षा दिशाहीन तरूणांचे प्रमाण अधिक जोमाने वाढतेय. शिस्त आणि अभ्यासाच्या नावावर पालक या भरकटलेपणाला खतपाणीच घालतात. त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवतात. ते पूर्ण करण्यासाठी मग वाटेल त्या मार्गांचा अवलंब करायचा. एक साधे निरीक्षण पाहा. व्यसनाधीन मुला-मुलींचे प्रमाण झपाट्याने वाढलेय. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण. आठवी-नववीच्या मुलामुलींच्याही जोड्या जुळलेल्या असतात आणि त्यांच्यात अनेक विषयांवर ‘सखोल’ चर्चा होते. दूरचित्रवाणी मालिका आणि नवनवे चित्रपट यामुळे काहीजण काही ‘प्रयोग’ही करतात. त्यांच्या ‘अनुभवसंपन्नते’ची पुसटशी जाणिवही पालकांना नसते. ते मात्र त्यांच्याकडून अव्वल शालेय कामगिरीची वाट पाहत असतात.
आपल्या देशाला जशी ‘पुस्तकी किड्यां’ची गरज नाही; तशीच ‘अशा’ अनुभवसंपन्नतेचीही गरज नाही. संस्कार आणि संस्कृतीची बंधने त्यांच्यावर नकोच; मात्र त्याचे महत्त्वही त्यांना ठाऊक असायला हवे. एकीकडे देशाच्या महासत्तेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे उद्याच्या उज्ज्वल राष्ट्राचे भवितव्य असलेल्या मुलांच्या भावनेशी खेळ खेळायचा. हे आता थांबायला हवे. आपण एका विचित्र टप्प्यावर आहोत. डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी मुलांचे संघटन केले. त्यांच्यावर शिस्तीचे संस्कार केले. साने गुरूजींनीही मुलांचे गोष्टीतून प्रबोधन केले. आपल्या फसलेल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादणारे पालकच सध्या बिथरले आहेत तिथे या नव्या पिढीला संस्कार कोण देणार? त्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्‍याने यांचे भावविश्‍व बदलत चालले आहे.
बदलत्या शैक्षणिक धोरणांमुळे दहावीपर्यंतची गाडी एका लयीत येते. पुढे मात्र प्रत्येकांची दिशा वेगळी. मुलांची स्वप्ने आणि पालकांच्या अपेक्षा यात त्यांच्या आयुष्याचे मातेरे होते. मुलांनी अभियंता व्हावे, वैद्यकीय क्षेत्रात जाऊन खोर्‍याने पैसा ओढावा अशीच अनेक पालकांची अपेक्षा असते. मुलांपुढे काहीच ध्येय नसताना देखील त्यांच्या मनावर या क्षेत्राची लालसा बिंबवली जाते. त्यातूनच सुरू होते जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेचा निकाल कधीच लागत नाही. आयुष्यभर फक्त पळत रहायचे. ‘आणखी हवे, आणखी हवे’ चा जयघोष सुरूच ठेवायचा. मानसिक समाधान, तृप्ती, आत्मानंद या गोष्टी दुर्मीळ होत चालल्या आहेत. फक्त पैसा उकळणारी यंत्रं आपल्याला हवीत. आपला देश चालवणारे बहुतेक राज्यकर्ते, स्पर्धा परीक्षांद्वारे पुढे गेलेले प्रशासकीय अधिकारी, घटनातज्ज्ञ विधिज्ञ, मुलांना ज्ञानाची शिदोरी देणारे प्राध्यापक-शिक्षक, समाजाचे चित्र धाडसाने मांडणारे पत्रकार असे समाजातील बहुतेक महत्त्वाचे घटक ‘कला शाखेद्वारे’ पुढे येतात. विज्ञान किंवा वाणिज्य विषय न घेतल्याने त्यांचे काही अडत नाही. तरीही पालकांना आपला मुलगा अभियंता व्हावा, डॉक्टर व्हावा, बँकेत लागावा असेच वाटते. हे वाटणे गैर नाही. त्यांच्या त्यांच्या कलानुसार मुले त्या त्या क्षेत्रात आपले भवितव्य गाजवतीलही! मात्र त्यांच्यावर ते लादणे आणि त्यातून विपरीत घडणे आपल्याला परवडणारे नाही.
18 ते 30 या वयोगटातील मुलामुलींच्या मृत्युचे प्रमाण बघा. शालेय जीवनात अपयश आल्याने आत्महत्या, नैराश्याने मृत्युला कवटाळले, प्रेमप्रकरणातून जीवनयात्रा संपवली, व्यसनाच्या आहारी जाऊन अखेर, नशेत गाडी चालवल्याने अपघातात मृत्यू या व अशा कितीतरी बातम्या रोजच पाहून अक्षरशः चर्र होते. तरूणाई हे राष्ट्राचे भवितव्य आहे. अशा घटना म्हणजे आपल्या राष्ट्राचे फार मोठे नुकसान आहे. पालकांनी तरूण मुलामुलींचा मृत्यू डोळ्याने पाहणे यापेक्षा भयंकर दुःख कोणते? त्यातून त्यांना सावरणे शक्य नाही. काहीजण तसे ‘दाखवत’ असले तरी ते सत्य नाही. ती स्वतःची फसवणूक असते. शत्रूराष्ट्राकडून होणारे आक्रमण जितके घातक आहे त्याहून आपल्या तरूणाईचे असे मृत्यू भीषण आहेत. हे थांबायला हवे. निमय बनवून किंवा धाकधोपटशाहीने हे चित्र बदलणारे नाही. पालकांनी त्यासाठी सजग असायला हवे.
साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प, अभिनय अशा कोणत्याही क्षेत्रात मुलांना काम करू द्या! त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नकात. यावर अनेकांनी लेखन केले, चित्रपटाद्वारे प्रबोधन केले. तरीही आपली आसक्ती संपत नाही. आजजी मुलं उद्याच्या बलशाली राष्ट्राचा आत्मा आहेत. आपल्या फुटकळ महत्त्वाकांक्षेपोटी आपण त्यांचा गळा घोटतोय. हे पातक थांबायला, थांबवायला हवे. आत्मकेंद्रीत वृत्ती सोडून मनाचे व्यापकत्व दाखवले नाही तर पश्‍चातापाशिवाय हाती काहीच राहणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, ‘साहित्य चपराक’, पुणे
7057292092

Saturday, April 30, 2016

माझ्या मराठीची बोलू कौतुके!

हैदराबाद! या शहराविषयी मला बालपणापासूनच प्रचंड कुतूहल. मी मूळचा मराठवाड्याचा. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला; मात्र पुढचे तेरा महिने म्हणजे 17 सप्टेंबर 1948 पर्यंत आम्हाला पारतंत्र्यातच राहवे लागले. (दुष्काळ, नापिकी ही मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेली. त्यात देश स्वतंत्र्य झाल्यानंतर आम्हाला तेरा महिने उशीरा स्वातंत्र्य मिळाले. त्यातूनच ‘दुष्काळात तेरावा’ अशी म्हण प्रचलीत झाली असावी!) मराठवाड्यावर निजामाचे साम्राज्य होते. त्यामुळे हैदराबाद संस्थान आणि क्रूरकर्म्या निजामाच्या छळकथा शालेय जीवनापासूनच ऐकत, वाचत आलेलो. स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जो यशस्वी लढा दिला तो फार महत्त्वाचा आहे. अशा या हैदराबादला एकदोनदा जाण्याचा योग आला पण तो केवळ काही कामानिमित्त!
मागच्या महिन्यात हैदराबाद मराठी साहित्य परिषदेच्या कार्यवाह डॉ. विद्या देवधर यांचा दूरध्वनी आला आणि त्यांनी हैदराबाद साहित्य परिषदेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मूळचा ‘मराठवाडी’ असल्याने मुक्ती संग्रामाचा लढा डोळ्यासमोर तरळू लागला. तब्बल 58 वर्षे इथं मराठी साहित्य परिषदेचं असं काय काम सुरू आहे, असंही वाटून गेलं. महाराष्ट्रात मराठीची होणारी गळचेपी आणि दुरवस्था पाहता या लोकांनी त्यांचं ‘मराठीपण’ कसं टिकवलंय हे पाहण्याची इच्छा मनात निर्माण झाली आणि मी त्यांना कार्यक्रमाला येण्यासाठी लगेच होकार दिला.
मी, माझे सहकारी माधव गिर, महेश मांगले आणि तुषार उथळे असे चौघेजण या कार्यक्रमासाठी जायचे ठरले. त्यातच लातूरहून मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष भास्कर बडे त्यांच्या कवी मित्रांसह येणार असल्याचे कळले. म्हणजे हैदराबादेत मराठीचा आवाज दमदारपणे घुमणार हे नक्की होतं. बरं, डॉ. विद्याताई देवधर यांचं कामही सुपरिचित. त्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षा. साहित्यिक चळवळीत कायम सक्रिय. त्याहून महत्त्वाचे म्हणजे ‘चपराक’ दिवाळी अंकाच्या लेखिका. मग म्हटले बघूया काय अनुभव येतो ते!
24 एप्रिलला पहाटे आम्ही भावनगर एक्सप्रेसने हैदराबाद गाठले. हैदराबाद मराठी महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद देशमुख स्वागतासाठी आले होते. त्यांनी महाराष्ट्र मंडळात आमच्या निवासाची व्यवस्था केलेली. सकाळी प्राचार्य देशमुखांशी आम्ही चर्चा सुरू केली आणि हैदराबादच्या मराठी माणसांचे एकेक कंगोरे समोर येऊ लागले.
देशमुखही मूळचे लातूरचे. गेल्या काही वर्षापासून हैदराबादेतील मराठी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते काम पाहतात. या महाविद्यालयाची ते माहिती सांगू लागले. तब्बल 58 वर्षापूर्वी हैदराबाद मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि त्याचवेळी या महाविद्यालयाचा जन्म झाला. म्हणजे देशभरात अशी एकमेव मराठी साहित्य परिषद आहे की जी, मराठी महाविद्यालय चालवते! तेही परिषदेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून! फार मोठी गोष्ट आहे ही! प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून यावा अशी!
देशमुखांनी सांगितलं, ‘हैदराबादेत जवळपास आठ लाख मराठी माणसं आहेत. मराठवाडा, विदर्भ येथून मुलं नोकरीच्या निमित्तानं या महानगरात येतात. त्यांना काहीतरी काम करत, कुटुंबाला हातभार लावत शिक्षण पूर्ण करायचं असतं. त्यामुळं हे सायंमहाविद्यालय सुरू झालं.’
आम्ही शब्दशः भारावून गेलो. पुण्या-मुंबईसारख्या शहरात मराठी शाळा धडाधड बंद पडत असताना हे लोक भाषा, संस्कृती जपण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसत आहेत. मला कधी एकदा हे महाविद्यालय पाहतोय असं झालं होतं. देशमुखांना मी तशी गळ घातली. ते म्हणाले, ‘सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळं आत्ता महाविद्यालयात कोणीही नसेल!’ त्यांना म्हणालो, ‘हरकत नाही. आम्हाला या ज्ञानकेंद्राचं, पवित्र वास्तुचं दर्शन घ्यायला आवडेल.’
त्याचवेळी डॉ. विद्याताई देवधर, माधवराजे चौसाळकर, अर्चना अचलेकर, प्राचार्य गोविंद देशमुख, माजी प्राचार्य सुरेश कुलकर्णी ही सारी मंडळी जमली होती. लातूरहून डॉ. भास्कर बडे, आजच्या मराठवाड्याचा सांस्कृतिक आवाज असलेले अंबेजोगाई येथील कवी दिनकर जोशी, नागेश शेलार, लक्ष्मण खेडकर, शैलजा कारंडे, मेनका धुमाळे, गोविंद कुलकर्णी, पार्वती फड, नभा बडे हे सर्वजण आले होते. कवी माधव गिर, समीक्षक महेश मांगले, तुषार उथळे यांच्यासह आम्ही आमचा मोर्चा मराठी महाविद्यालयाकडे वळवला.
डॉ. विद्या देवधर यांनी या महाविद्यालयाची माहिती दिली. येथून अनेकांनी एम.ए., एम. फिल, पीएचडी केलेली आहे. पूर्वी संध्याकाळी सहा वाजता हे महाविद्यालय सुरू व्हायचे. सध्याचा जमाना मॉल्सचा. त्यामुळं हे मोठमोठे मॉल रात्री उशीरापर्यंत चालू असल्याने कामगार वर्गाची लवकर सुट्टी होत नाही. परिणामी विद्यार्थीसंख्या रोडावली आहे. ज्यांना हैदराबादमध्ये नोकरी करून शिक्षण पूर्ण करायचे आहे त्यांनी या महाविद्यालयाशी आवर्जून संपर्क साधावा. अशा विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी रविवारीही विशेष वर्ग घेतले जातात.
मराठी महाविद्यालयाची टोलेजंग इमारत बघितल्यानंतर आम्ही पोहोचलो हैदराबादच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात. ही वास्तुही भव्यदिव्य आहे. पुणे मराठी ग्रंथालयाच्या तोडीस तोड पुस्तके. मुख्य शहरात यायची गैरसोय टाळता यावी यासाठी या ग्रंथालयाने हैदराबाद शहरात आणखी चार शाखा चालू केल्या आहेत. सर्वत्र वाचकांची वर्दळ. मराठीविषयीचा जिव्हाळा कुणालाही सहजपणे जाणवेल. सकस वाचनासाठी हे लोक प्रयत्नपूर्वक वेळ काढतात. पुण्यासारख्या सांस्कृतिक महानगरीने शरमेने मान खाली घालावी इतकी यांची उच्च सांस्कृतिक अभिरूची. मराठी महाविद्यालय आणि मराठी ग्रंथसंग्रहालय येथील कर्मचार्‍यांचा अपवाद वगळता कार्यवाहासह सर्वजण विनामानधन येथे काम करतात हे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसे!
‘चपराक’चा अंक इथं कायम ‘वेटींग’ला असतो. ‘या अंकाचे संपादक आलेत’ असं कळल्यानंतर कर्मचार्‍यांनी आणि पदाधिकार्‍यांनी आमचे जोरदार स्वागत केले. ‘चपराक’च्या काही लेखांवर चर्चा झाली. त्यांनी आमच्यासोबत फोटो काढून घेतले. त्यांचे प्रेम, जिव्हाळा, त्यांच्याकडून मिळणारा आदर यामुळे आम्ही सर्वजणच भारावून गेलो.
आता ज्या कार्यक्रमासाठी गेलो होतो त्याची वेळ झालेली. आम्ही ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या काशिनाथराव वैद्य सभागृहात गेलो. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहापेक्षा मोठं सभागृह. उपस्थिती? साधारण दोनशे लोक खुर्च्यांवर विराजमान झालेले! महाराष्ट्र साहित्य परिषदेत तीस-चाळीस लोकांचीही सांस्कृतिक कार्यक्रमाला यायची मारामार. इथं मात्र उत्फूर्तपणे इतकी मंडळी जमलेली.
विद्याताई देवधरांनी मला थेट व्यासपीठावर नेलं. माझा परिचय करून दिला आणि माईक माझ्यासमोर दिला. खरंतर मी पूर्णपणे भारावून गेलेलो. एक क्षण काय बोलावे असे वाटले आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘‘साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी या परिसरात येऊन स्वराज्याचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रातल्या महाबळेश्‍वरच्या खोर्‍यातून येणारी कृष्णा नदी थेट श्रीशैल्यम्पर्यंत गेली आहे. त्यामुळे याच मराठी पाण्यावर इथली संस्कृती पोसली गेली आहे. आज आम्ही मोजकीच मंडळी इथं आलो आहोत. मराठी भाषेच्या संवर्धनाचा, जतनाचा विडा उचलून डॉ. विद्याताई देवधर यांच्यासारखी काही मंडळी इथं अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या पाठिशी आम्ही कायम उभे राहू! महाराष्ट्रात मराठी शाळा धडाधड बंद पडत आहेत. इंग्रजीचे थैमान माजलेय आणि तुम्ही इतके चांगले काम करत आहात. मराठी साहित्य परिषद एक महाविद्यालय चालवते हे भारतातील एकमेव उदाहरण असल्याने तुमच्या कार्याला, मराठी प्रेमाला सलाम करतो.’’
हैदराबाद आता तेलंगणात गेले आहे. त्यामुळे तो धागा पकडत मी सांगितले, ‘‘महाराष्ट्रात सध्या विदर्भ, मराठवाडा वेगळा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र ‘अखंड महाराष्ट्र’ हीच ‘चपराक’ची भूमिका आहे. सांस्कृतिक एकता जपताना आम्ही भाषिक ऐक्य साधण्याला मात्र भविष्यात प्राधान्य देणार आहोत. किमान पंधरा भारतीय भाषातील साहित्य मराठीत यावे आणि मराठीतील साहित्य या भाषात जावे यासाठी ‘चपराक प्रकाशन’चे प्रयत्न असणार आहेत. तेलगू भाषेतील साहित्य मराठीत आल्यास आनंदच वाटेल. तसेच आपल्यापैकी जे प्रतिभावंत सातत्याने, निष्ठेने लिहित आहेत मात्र ज्यांना पुरेसे व्यासपीठ मिळाले नाही त्यांनी ‘चपराक’शी हक्काने संपर्क साधावा. आपला आवाज, आपला हुंकार तमाम मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’
त्यानंतर डॉ. भास्कर बडे यांचे कथाकथन झाले. ‘कथा काव्य संध्या’ या कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील कवींनी रसिकांची मने जिंकली. माधव गिर, दिनकर जोशी, लक्ष्मण खेडकर, नागेश शेलार, शैलजा कारंडे, गोविंद कुलकर्णी यांच्या एकाहून एक सरस कविता! असा कार्यक्रम जर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झाला तर सांस्कृतिक महाराष्ट्राची विजयी पताका सर्वदूर प्रभावीपणे फडकेल.
सुंदर आणि नेटके नियोजन, शिस्त, दिनकर जोशी यांचे प्रभावी सूत्रसंचालन, अर्चना अचलेकर यांच्या गोड आवाजातील मराठी गीताने झालेली सुरूवात यामुळे कार्यक्रम रंगत गेला. त्यानंतर आम्ही सर्वजण महाराष्ट्र मंडळात आलो. जेवणानंतर लातूरची मंडळी परत जाणार होती. मात्र आम्ही मुक्कामी थांबणार होतो. त्यामुळे त्यांनी त्यांचा बेत बदलला आणि महाराष्ट्र मंडळात आमचे सर्वांचे कवी संमेलन रंगले. रात्री दीडपर्यंत एकाहून एक सरस कवितांचा आस्वाद घेता आला. पहाटे चार वाजता डॉ. भास्कर बडे आणि त्यांचे प्रतिभावंत सहकारी लातूरकडे निघाले.
सोमवार, दि. 25 एप्रिलची सकाळ. आम्ही डॉ. विद्याताई देवधरांच्या घरी पोहोचलो. त्या मूळच्या मुंबईच्या. मात्र मागची साधारण पन्नास वर्षे त्या मराठी भाषेसाठी निर्व्याजपणे कार्य करीत आहेत. त्यांच्या आई सुशीला महाजन. राष्ट्र सेविका समितिच्या संस्थापक सदस्य. वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय. वहिनी सुमित्रा महाजन लोकसभेच्या सभापती. विद्याताईंच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन थेट अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झालेले. वाजपेयी-अडवाणी कुटुंबीयांशी त्यांचे घरोब्याचे संबंध.
मात्र त्यांच्या स्वभावात एक माधुर्य आहे, ममत्त्व आहे. अहंकाराचा लवलेशही नाही. म्हणूनच हैदराबादसारख्या अमराठी शहरात त्यांनी मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. ‘पंचधारा’सारख्या दर्जेदार वाङमयीन नियतकालिकाचे त्या संपादन करतात. सेतू माधवराव पगडी यांच्यावर त्यांनी ‘पर्वतप्राय’ खंड प्रकाशित केले आहेत. अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचे संपादन करण्याचा मान विद्याताईंना मिळालाय.
हैदराबादची मराठी माणसं, इथल्या सांस्कृतिक, साहित्यिक चळवळी, मराठी माणसांचे या शहराच्या विकासातील योगदान अशा विषयावर आमची सखोल चर्चा झाली. तेथून आम्ही बाहेर पडलो आणि थेट ‘उस्मानिया विद्यापीठ’ गाठले. हे एक जगप्रसिद्ध ज्ञानकेंद्र आहे.
अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे या विद्यापीठात स्वतंत्र मराठी विभाग आहे. डॉ. नम्रता बगाडे या मराठीच्या विभागप्रमुख. नेमक्या आजपासून त्या रजेवर होत्या. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. मात्र आम्हाला इथं भेटले प्रा. अरूण कुलकर्णी. ते उस्मानिया विद्यापीठात मराठीचे अध्यापन करतात. आणखी एका महाविद्यालयातही ते मराठी भाषा शिकवतात. त्यांच्यासोबत चहा घेतला आणि आम्ही थेट ग्रंथालयात गेलो.
इथली ग्रंथसंपदा पाहून कुणाचेही डोळे फिरतील. पाच लाखाहून अधिक पुस्तके या ग्रंथालयात आहेत. प्रत्येक भाषेचा वेगळा विभाग. शब्दशः हजारो तरूण-तरूणी येथे वाचत बसले होते. हे चित्र मी महाराष्ट्रातही कुठं पाहिलं नव्हतं. आम्ही या ग्रंथालयातील मराठी पुस्तकांचा विभाग बघितला. वेद उपनिषदांपासून ते कथा, कविता, कादंबरी अशा ललित साहित्यापर्यंत हजारो पुस्तकं इथं आहेत. अगदी मराठीतील सर्व नामवंत दिवाळी अंकही येथे उपलब्ध आहेत. त्यांच्या वेबसाईटवर सर्व पुस्तकांची सुची उपलब्ध आहे. दुर्मिळात दुर्मीळ पुस्तकेही याठिकाणी उपलब्ध असून संशोधकांना, अभ्यासकांना मोठी पर्वणी आहे. मायमराठीचे हे वैभव पाहून आम्ही थक्क झालो.
आपण विविध उपक्रमांनी ‘महाराष्ट्र दिन’ ‘साजरा’ करतोय! मात्र ही मंडळी मराठीपण ‘जगतात.’ महाराष्ट्राबाहेर अनेक शहरात मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत. ती आपल्या आणि आपल्या राज्यकर्त्यांच्या खिजगणतीतही नसतात. या सर्वांना आपण बळ द्यायला हवे. त्यांचे हात शक्य तितके मजबूत करणे मराठी भाषेसाठी पोषक ठरणारे आहे. अमराठी भागात राहून मराठीची विजयपताका डौलात फडकत ठेवणार्‍या या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त वंदन करतो!
- घनश्याम पाटील
संपादक, मासिक ‘साहित्य चपराक’, पुणे
7057292092

Thursday, April 28, 2016

महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले!

सेनापती बापट, आचार्य अत्रे अशा धुरिणांच्या प्रयत्नाने 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि ‘लोककल्याणकारी’ राज्याचं स्वप्नं जनतेनं बघितलं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी ठरली. महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतरे पचवली. मराठी माणूस काळासोबत बदलत गेला. आधुनिक तंत्रज्ञान आले. नवनवीन शोध लागल्याने लोकांचे जगणे समृद्ध झाले. मात्र आजवर महाराष्ट्राला मोठमोठे नेते लाभूनही महाराष्ट्र एका अराजकतेतून जातोय. महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आज राज्याची काय परिस्थिती आहे हे पाहणे गरजेचे आहे.
बहुतांश काळ सत्तेत कॉंग्रेसच होती. शरद पवार हेच मागच्या पन्नास वर्षात महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहेत.  लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर तितक्याच ताकतीच्या असलेल्या पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. देशभर त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. अटलबिहारी वाजपेयी असोत अथवा नरेंद्र मोदी! पवारांच्या सल्ल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत, हे महाराष्ट्राने अनेकवेळा पाहिले आहे, अनुभवले आहे. वाजपेयी-मोदी यांनी तशी जाहीर कबुलीही दिली आहे. मात्र या ‘जाणत्या राजा’ची दूरदृष्टी विकासात परावर्तीत झालेली दिसत नाही. त्यांच्या चेल्यांची मात्र ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ समोर येत आहेत.
सध्या महाराष्ट्राची परिस्थिती फारच दयनीय आहे. लोकांना रोजगार नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने जनावरे मरत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. हे सारे अराजक गेली अनेक वर्षे सुरू आहे. शरद पवार जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनी सभागृहात सांगितले की, ‘आपल्याकडील शेतकरी प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या करतात...’ यापेक्षा देशाचे आणि आपल्या राज्याचे आणखी मोठे दुर्दैव ते कोणते असणार? पुढे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपवाले सत्तेत आले आणि तेही हाच कित्ता गिरवत आहेत. आजचे केंद्रीय मंत्रीही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची ही आणि अशीच कारणे सांगत आहेत.
‘इंग्रज गेले आणि कॉंग्रेसवाले आले’ अशी परिस्थिती देशात दीर्घकाळ होती. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी गाजरं मोदींनी दाखवली. त्यामुळे देशात परिवर्तन घडले. मोदी यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा, देशहितदक्ष पंतप्रधान देशाला मिळाला. आपल्या राज्यातही परिवर्तन घडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तुलनेने नवखा नेता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून मिळाला. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र भाजपला प्रभावी नेतृत्व नव्हते. मात्र फडणवीस यांनी प्रयत्नपूर्वक ती जागा भरून काढली. मुंडे यांच्यासारखा जनाधार त्यांना अजूनतरी मिळाला नाही, हे वास्तव असले तरी सत्तेत असल्याने त्यांच्याकडून अनेकांच्या अनेक अपेक्षा आहेत.
एकनाथराव खडसे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा पालवे असे त्यांचे सहकारी त्यांना समर्थ साथ देत आहेत. मात्र महाराष्ट्रात सध्या नको तेच विषय चर्चेला येतात आणि गाजतातही. पाण्याअभावी जनजीवन धोक्यात आले आहे आणि सध्या कोणते विषय चर्चेत आहेत? तर मंदिर प्रवेश आणि पंकजा मुंडे यांचा ‘सेल्फी!’
या सेल्फी वरून अनेक ‘सेल्फिश’ लोकांचे चेहरे उघड होत आहेत. पाण्याचा एकेक थेंब दुर्मीळ झालेला असताना पुण्या-मुंबईत क्रिकेटचे सामने होतात. त्यात कोट्यवधींचा चुराडा होेतो. लाखो लीटर पाणी त्यासाठी वाया जाते. मिरजकरांनी मोठ्या मनाने लातूरला पाणी दिल्याने ‘जलराणी’ लातूरला पोहोचली. मात्र तिथेही ‘श्रेयवादा’चा विषय चर्चेत आला. इतक्याशा पाण्याने काय होणार? असाही प्रश्‍न उपस्थित केला जातोय. रेल्वेने पाणी मागवणे लातूरकरांसाठी भूषणावह आहे का? आपण लातूरमध्येच पाणी नियोजनासाठी काय करणार आहोत? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
मराठवाड्यात पाण्याची कमतरता असतानाही मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले गेले. साखर कारखाने, दारूचे कारखाने यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले गेले. अजूनही ते पाणी सुरूच आहे. एकेका घोटासाठी लोक तडफडत असताना ‘उद्योगांना पाणी मिळालेच पाहिजे’ अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधक एकदिलाने घेत आहेत. कारण याच मंडळींची कारखानदारी या पाण्यावर अवलंबून आहे. हे राजकारण न समजण्याएवढा मराठवाडी बांधव दुधखुळा नाही; मात्र ‘आलीया भोगासी असावे सादर’ म्हणत तो दिवस कंठत आहे.
माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे याच्यासारखे एखादे पिल्लू सोडून मराठवाडा, विदर्भ वेगळा करण्याची मागणी काही बांडगुळं करतात. कन्हैय्यावरून अकारण वातावरण तापवले जाते. तरूणांची माथी भडकवली जातात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात  एका पाठोपाठ एक घोटाळे उघड व्हायचे. त्यावर जोरदार रणकंदन व्हायचे; मात्र विरोधकांकडे सध्या असे मुद्देच नाहीत. त्यांच्या दुर्दैवाने सत्ताधारी अजूनतरी कोणत्याही मोठ्या घोटाळ्यात अडकली नाहीत. त्यामुळे ‘असहिष्णुता’, ‘राष्ट्रवाद’, ‘मंदिर प्रवेश’, ‘सेल्फी’ असली काहीतरी खुसपट काढली जातात.
मराठवाड्याचा दुष्काळवाडा होतोय. मराठवाड्याचे राजस्थानसारखे वाळवंट होईल, असे अनेक अहवाल सांगत आहेत. त्याचवेळी ‘जलयुक्त शिवार’ सारखी प्रभावी योजना अंमलात येत असताना त्या विभागाच्या मंत्र्याने एखादा ‘सेल्फी’ काढला तर बिघडले कुठे? आपण करत असलेल्या कामाची होत असलेली पूर्तता पाहणे हा समाधानाचाच विषय असतो. मात्र ‘धरणात पाणीच नाही तर मी आता त्यात मुतू का?’ असा बिनडोक सवाल करणारे नेते आणि त्यांचे बगलबच्चे पंकजा मुंडे-पालवे यांना ‘सेल्फी’वरून जाब विचारत आहेत. या सगळ्या चोराच्या उलट्या बोंेबा आहेत.
यांच्या अकार्यक्षमतेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची नेतेमंडळी हे चित्र बदलण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे यांच्यासारखा नेता मराठवाडा पिंजून काढतोय. शेतकर्‍यांची दुःखे समजून घेतोय! आणि दुसरीकडे हताश, हतबल झालेले, नैराश्य आलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले नको ते वाद निर्माण करत आहेत.
महाराष्ट्राचे चित्रच त्यामुळे गंभीर दिसतेय. मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे. त्याचवेळी त्यांच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सहकार्यही केले पाहिजे. शिवसेनेसारखा मराठमोळा पक्ष शेतकरी हिताचे निर्णय घेतोय, त्यांच्या मदतीसाठी धावून जातोय, हे चित्र फारच आश्‍वासक आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी परवा म्हणाले, ‘हिमालय गेले, सह्याद्री गेले, डोंगर आणि टेकड्याही गेल्या... आता आहेत काही उंच तर काही खुजी वारूळे! आणि वारूळातल्या उंचीतली स्पर्धा जास्त भिषण असते...!’
संजय सोनवणी यांनी ही धोक्याची घंटा दिलीय. त्यातले सत्य सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही काहीजण झोपेचे सोंग घेतात. त्यांनी आता जागे झाले पाहिजे. हे चित्र बदलण्यासाठी मोठे प्रयत्न होणे ही काळाजी गरज आहे. महाराष्ट्र दिन ‘साजरा’ करणे, त्यासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधींची जाहिरातबाजी करणे याऐवजी थोडीशी संवेदनशीलता वाढवली तर ते अधिक लाभदायक ठरेल! आपल्या नाकर्तेपणामुळे, स्वार्थसंकुचित वृत्तीमुळे, वैयक्तिक हेवेदावे आणि ईर्षेमुळे महाराष्ट्र विनाशाकडे ढकलला जाऊ नये, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. शेवटी सेनापती बापटांच्याच ओळी आठवतात,
महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले;
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा!

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, April 16, 2016

कार्यसिद्धीस नेण्यास ‘समर्थ’!

मेघराज राजेभोसले (चित्रपट निर्माते)
कोणत्याही विश्‍वस्त संस्थेत अध्यक्ष, सभासद जेव्हा मालक झाल्यासारखे वागू लागतात तेव्हा त्या संस्थेचे मातेरे होते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळही दुर्दैवाने याला अपवाद ठरले नाही. मोठमोठी उड्डाणे घेणार्‍या या संस्थेच्या मागच्या पंचवार्षिक कालावधीतील अध्यक्षांनी कायम स्वतःची तुंबडी भरली. हे करताना त्यांना त्यांच्या नैतिक कर्तव्याची तसूभरही जाणीव राहिली नाही. पाच वर्षात तीन अध्यक्ष आणि प्रत्येकाची तर्‍हा तीच! यांची खाबुगिरी इतक्या टोकाला गेली की अध्यक्षाला सभा अर्धवट सोडून रिक्षातून पळ काढावा लागला.
चित्रपट समाजमनावर परिणाम घडवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. लोकजागृती, समाजप्रबोधन, मनोरंजन यासाठी चित्रपटासारखे अन्य प्रभावी माध्यम नाही. चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेचा विचार केला तर लेखक, पटकथाकार, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ या सर्वांचाच मोठा वाटा असतो. अनेक खटपटी, लटपटी करून निर्माते चित्रपटावर काम सुरू करतात. त्यात त्यांना महामंडळाकडून सेन्सॉरचे प्रमाणपत्र आवश्यक असते. अर्थात असे प्रमाणपत्र देण्यासाठी ‘इम्पा’सारख्या अन्य संस्थाही आहेत; मात्र अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला तुलनेने अधिक महत्त्व दिले जाते. सरकार आणि चित्रपट निर्माते यांच्यात समन्वय साधन्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे चित्रपट महामंडळ. महामंडळाच्या प्रमाणपत्रानंतरच चित्रपटाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.
ज्या चित्रपटांना सरकारकडून अनुदान मिळते त्यातील दीड टक्के रक्कम महामंडळाला मिळते. त्यामुळे साहजिकच महामंडळाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी प्रामुख्याने मराठी चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरात व्हायचे. तो केंद्रबिंदू पुण्याकडे सरकला. सध्या अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरातच केले जाते. असे असतानाही पुण्यातील कार्यालय बंद करण्याचा अविवेकी निर्णय महामंडळाने घेतला. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि राजकारण यामुळे महामंडळाचे पुरते वाटोळे झाले आहे. कार्यक्रमासाठी महामंडळाच्या ठेवी मोडणे आणि त्यातून आर्थिक गैरव्यवहार करणे असेही प्रकार उघड होऊनही संबंधितांवर काहीच कारवाई केली जात नाही. उलट ‘माझ्या जवळील साडे सात लाख रूपये आयकर अधिकार्‍याला लाच देण्यासाठी ठेवले आहेत’ असे लाज आणणारे वक्तव्य महामंडळाचे अध्यक्ष सर्वसाधारण सभेत करतात. याबाबत जाब विचारल्यानंतर विषय अर्धवट सोडून सभेतून पळ काढतात. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच चित्रपट महामंडळाची ही सारी कथा आहे.
परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम असतो. त्यामुळे हे चित्र बदलणे आवश्यक आहे. स्वच्छ चारित्र्याचे, निष्कलंक, प्रामाणिक आणि काहीतरी भरीव करू पाहणार्‍या, या क्षेत्रात आपले योगदान पेरणार्‍या नेतृत्वाची महामंडळाला गरज आहे. गेली पाच वर्षे सातत्याने महामंडळातील अपप्रवृत्तीवर तुटून पडणारे निर्माते मेघराज राजेभोसले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपटाशी संबंधित सर्वच घटकांचा गंभीरपणे विचार करणारे, त्यांच्यासाठी अनेकानेक उपक्रम राबवणारे राजेभोसले महामंडळाला शिस्त लावण्यासाठी समर्थ आहेत. या क्षेत्रातील जुन्या नव्या कलाकारांचा, निर्मात्यांचा, तंत्रज्ञांचा समावेश करत त्यांनी ‘समर्थ पॅनेल’ची स्थापना करून निवडणुकीचे आव्हान स्वीकारले आहे. वर्षा उसगावकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीपासून ते वितरक असलेल्या मधुकरअण्णा देशपांडे यांच्यापर्यंत सर्वांचा संगम घडून आला आहे. ‘चमकोगिरी’ न करता सतत निरपेक्षपणे कार्यरत असलेले संजय ठुबे यांच्यासारखे सत्शील उमेदवार या पॅनेलमध्ये आहेत. जे काम करतात पण प्रसिद्धीच्या मागे धावत नाहीत अशा उमेदवारांचा हा समूह आहे.
आजूबाजूला अनेक दुर्दैवी घटना सातत्याने घडतात. गुन्हेगारी वाढत चाललीय. प्रत्येकजण आत्मकेंद्रीत बनत चाललाय. अशावेळी व्यवस्थेच्या नावाने खडे फोडण्याऐवजी प्रत्यक्ष बदल घडवू पाहणारे कुशल कर्मवीर नेहमीच श्रेष्ठ ठरतात. मेघराज राजेभोसले यांच्यासारखा क्रियाशील निर्माता चित्रपट महामंडळात बदल घडविण्यासाठी पुढाकार घेतोय हे चित्र आश्‍वासक आहे. आपण त्यांचे हात बळकट करायला हवेत. आधीच्या कार्यकारिणीने ज्या चुका केल्यात त्या सुधारायच्या असतील तर नेतृत्वबदल ही काळाची गरज आहे.
कोणतेही कार्य जिद्दीने, समर्थपणे हाती घेतल्यास त्यात यश येतेच येते. मराठी चित्रपटाला सध्या चांगले दिवस येत आहेत. त्यात आणखी सुधारणा घडाव्यात यासाठी निर्माते, सरकार आणि महामंडळ यांच्यात योग्य तो समन्वय असायला हवा. राजकीय बजबजपुरी बाजूला ठेवून हे सारे घडवून आणण्याचे कसब आणि कौशल्य राजेभोसले यांच्याकडे आहे. उमेदवारांची निवड करताना त्यांनी एकही डागाळलेला आणि भ्रष्ट चेहरा आपल्या पॅनलमध्ये घेतला नाही. शिवाय मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणे अशा सर्व परिसरातील उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांनी व्यापकता दाखवली आहे. या पॅनलमध्ये तीन महिलांचा असलेला समावेश हीदेखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळेच चारूकाका सरपोतदार यांच्यासारख्या ऋषितुल्य माणसानेही मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ पॅनेल’ला जाहीर पाठिंबा दिला आहे. सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि निर्माते रामदास फुटाणे यांनी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असताना या संस्थेच्या कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिली. पुणे आणि कोल्हापूर येथील कार्यालये त्यांच्याच कारकिर्दित झाली. इतकेच नाही तर फुटाणे उत्तम चित्रकार असून चित्रपट महामंडळाचा लोगोही त्यांनीच तयार केला आहे. रामदास फुटाणे यांच्यासारख्या दिग्गजानेही या पॅनेलला दिलेला पाठिंबा ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
मेघराज राजेभोसले यांचे ‘समर्थ पॅनेल’ या निवडणुकीत संपूर्ण सामर्थ्यासह उतरले आहे. ‘ध्येयं पारदर्शी, धोरणं दुरदर्शी’ हे मूलतत्व घेऊन त्यांनी या पॅनेलची रचना केली आहे. पतंग हे त्यांच्या पॅनलचे चिन्ह आहे. येत्या 24 तारखेला ही निवडणूक होणार असून ’समर्थ पॅनेल’ प्रचंड मताधिक्याने विजयी होईल आणि महामंडळाला आणखी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ‘चपराक’ परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. 

- घनश्याम पाटील, 
संपादक ‘चपराक’
7057292092